भैरप्पांची साक्षी ही नवीन प्रसिद्ध झालेली कादंबरी वाचली. नवीन म्हणजे मराठीत नवीन. कारण मूळ कानडी कादंबरी तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली होती. तिचा मराठी अनुवाद आता प्रसिद्ध झाला.
स्त्री पुरुष संबंध. एका माणसाची टोकाची अनिर्बंध कामेच्छा आणि त्यातून झालेला त्याचा खून. एक माणसाचा टोकाचा सत्यवादीपणा आणि त्यातून त्याने केलेली आत्महत्या; एका माणसाचा टोकाचा कंजूषपणा आणि त्यातून झालेली त्याच्या मोजक्या कुटुंबियांची कुचंबणा; एका स्त्रीचा टोकाचा हट्टीपणा आणि त्यातून झालेली तिची परवड; एका माणसाचा टोकाचा निरिच्छपणा आणि त्यातून त्याच्या कुटुंबीयांची होणारी घुसमट; एका स्त्रीचा टोकाचा राग आणि त्यामुळे तिच्या हातून घडलेला नृशंस खून; हे साक्षीचे मुख्य खांब आहेत. आणि या खांबांच्या बरोबर भारतीय पुराणातील चित्रगुप्ताची कल्पना वापरत भैरप्पा सत्य या संकल्पनेचे पदर उलगडण्याचा प्रयत्न करतात.
कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झालेला असल्याने कादंबरीचा गोषवारा देऊन वाचकांचा रसभंग करणं मला योग्य वाटत नाही. त्याचप्रमाणे मी रूढार्थाने समीक्षकही नाही. त्यामुळे कादंबरीच्या कथावस्तूबद्दल न बोलता कादंबरी वाचताना माझ्या आयुष्यातील काही प्रसंगांमुळे माझ्या मनात कोणकोणते विचार आले तेव्हढेच मांडायचा प्रयत्न करतो आहे.
भारतीय परंपरेत, चित्रगुप्ताकडे सगळ्यांच्या पाप पुण्याचा हिशोब असतो आणि मृत्यूनंतर आत्म्याला स्वर्गात पाठवायचे की नरकात याचा निर्णय घेण्यासाठी यमधर्माला या हिशोबाचा उपयोग होतो असं मानलं जातं. भैरप्पा या संकल्पनेचा विस्तार करत चित्रगुप्त ही एक व्यक्ती नसून एक व्यवस्था आहे असं चित्र रंगवतात. प्रत्येक व्यक्तीबरोबर एक चित्रगुप्त त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अदृश्य साक्षी म्हणून वावरत असतो. मृत्यूनंतर जेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा यमधर्मासमोर उभा राहतो तेव्हा त्याला आपल्या आयुष्याचा लेखाजोखा स्वतःच मांडायचा असतो. हे करत असताना जर त्या व्यक्तीच्या आत्म्याने असत्याचा आधार घेतला तर मात्र चित्रगुप्ताचा नम्र आणि गंभीर आवाज मधे येतो आणि घडलेल्या घटनांवर व्यक्तीने चढवलेले असत्याचे आवरण दूर करतो असा भैरप्पांचा कल्पनाविस्तार आहे.
पुनर्जन्म ही भारतीय परंपरेला मान्य असलेली संकल्पना आहे. त्यामुळे पहिला जन्म संपल्यावर त्याचा पाढा यमधर्मासमोर वाचायचा मग स्वर्ग किंवा नरकवास. पुण्यक्षय किंवा पापक्षयानंतर स्वर्ग किंवा नरकवास संपवून मग दुसरा जन्म मग पुन्हा मृत्यूनंतर पुन्हा आयुष्यातील घटनांची उजळणी मग पुन्हा स्वर्ग किंवा नरकवास. हे चक्र मोक्ष मिळेपर्यंत चालू राहणार आहे अशी भारतीय मान्यता आहे. त्यात आयुष्याची उजळणी करताना मनुष्य असत्य बोलू शकतो हे गृहीत धरलेलं आहे. म्हणजे असत्याचा जन्म माणसाच्या जन्माआधीच झालेला असतो आणि माणसाच्या मृत्यूनंतरही असत्याचा मृत्यू होत नाही. किंबहुना सत्य आणि असत्य हे सृष्टीचे मूळ घटक असावेत आणि त्यापैकी कशाचा वापर करावा ते व्यक्ती ठरवते. त्यामुळे व्यक्ती सत्य सांगते आहे की असत्य ते प्रत्यक्ष यमधर्मालाही माहीत नसते. ते माहीत करून घेण्यासाठी मग यमधर्माला गरज पडते ती साक्षीची.
अर्थात इथे भैरप्पा घटनेच्या सर्व बाजू त्या घटनेत सहभागी असलेल्यांना माहिती असतातंच पण तरीही व्यक्ती असत्य बोलतात असा मुद्दा मांडत नाहीत. याउलट एखाद्या घटनेत आपला सहभाग किती होता आणि का होता याचं स्पष्टीकरण देताना व्यक्ती असत्याचा आधार घेऊ शकते असा मुद्दा मांडतात. म्हणजे कादंबरीत सत्य असत्याची केलेली चर्चा ही घटनेच्या सत्य स्वरूपाबद्दल नसून घटनेतील सहभागी व्यक्तींनी आपापल्या वर्तणुकीच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याच्या सत्यासत्यतेबद्दल आहे. मग हे समर्थन सत्य आहे की असत्य ते ठरवणार कसं? त्यासाठी भैरप्पा चित्रगुप्त या व्यवस्थेची योजना करतात.
जो सर्व घटनांच्या वेळी होता पण कुठल्याही घटनेत कुठल्याही प्रकारे ज्याची भावनिक गुंतवणूक नव्हती, कुठल्याही घटनेतून ज्याला कुठलाही फायदा अगर तोटा होणार नसतो तोच खरा साक्षी असू असतो. आणि त्याने साक्ष देताना केलेलं व्यक्तीच्या मनोव्यापारांचं वर्णन हेच सत्यकथन असू शकतं असा एक मुद्दा भैरप्पांनी मांडला आहे.
कादंबरी वाचून संपली. सत्य असत्याबद्दल आणि सत्यकथनाबद्दल भैरप्पांचे विचार मनात घोळत राहिले.
मग एके दिवशी चुलत सासू सासऱ्यांना पुण्याहून डोंबिवलीला घेऊन जात असताना भरपूर गप्पा मारत होतो. बोलता बोलता बोलेरो या संगीताचा विषय निघाला. म्हणून यूट्यूबवर त्यांना बोलेरो लावून ऐकवलं.
मग त्याबद्दल बोललो. मग हे कुठे कुठे वापरलं आहे ते सांगताना राशोमोनचा विषय निघाला. म्हणून राशोमोनमधे वापरलेला जपानी बाजाचा बोलेरोचा तुकडा त्यांना ऐकवला.
मग राशोमोनबद्दल बोललो. गाडीचं स्टीयरिंग माझ्या हातात असल्याने, मी जे ऐकवीन आणि सांगीन ते निमूटपणे ऐकण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नव्हतं. पण घरी गेल्यावर जेव्हा मी त्यांना राशोमोन पाहणार का? असं विचारलं तेव्हा त्यांनी चटकन हो म्हटलं त्यामुळे मी त्यांना अगदीच बोअर केलं नाही हे जाणवून मला थोडं हायसं वाटलं.
राशोमोन सुरु केला. लाकूडतोड्याची साक्ष संपली. पोलिसाची साक्ष संपली. सामुराई योद्ध्याच्या बायकोची साक्ष संपली. सासरे आणि मुलं तल्लीन होऊन राशोमोन पाहत होते. आणि त्यांना आपण एक महान आनंद मिळवून दिला आहे असा विचार करून मी खूष होत होतो. मग राशोमोनमधला महत्वाचा प्रसंग सुरु झाला. मृत सामुराई योद्ध्याच्या आत्म्याला साक्ष देण्यासाठी कोर्टांत बोलावलं गेलं. आणि मी चपापलो. मृताम्याची साक्ष. चार दिवसांपूर्वी भैरप्पांनी शब्दरूपात रंगवलेली मृत व्यक्तीची साक्ष वाचली होती आणि आता कुरोसावांनी चित्रपटात रंगवलेली मृत व्यक्तीची साक्ष बघत होतो.
माझ्या नकळत मनातल्या मनात या दोन्ही साक्षींची तुलना सुरु झाली.
साक्षीमधे आणि राशोमोनमध्ये सत्य काय असत्य काय? हे समान सूत्र आहे. पण त्यांचा विस्तार मात्र वेगवेगळ्या दिशेने जातो.
राशोमोनमधील साक्ष मानवी न्यायालयात आहे.
घटनेचे अनेक पदर असतात. आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा तिच्या बाजूने घटना मांडते तेव्हा एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या कथा समोर येतात. मग त्यातील सत्य कुठली आणि असत्य कुठली?, हे कसं ठरवायचं? वेगवेगळ्या कथनांमधून कुणावर विश्वास ठेवायचा? हे मुद्दे राशोमोमधे मांडलेले आहेत. लाकूडतोड्या असत्य सांगत आहे हे यात्रेकरूला लगेच कळतं. त्यामुळे बुद्ध भिक्षूलाही लाकूडतोड्या, पोलीस, ताजोमारू, बलात्कारित स्त्री, सामुराईचा आत्मा यापैकी कुणीच संपूर्ण सत्य सांगत नाही आहे याचा उलगडा होतो. आणि तिथेच राशोमोन पुढचा प्रश्न टाकतो.
जेव्हा सगळेच खोटं बोलत आहेत हे कळून चुकतं तेव्हा माणसाने कुणावरही विश्वास ठेवण्यासाठी कशाचा आधार घ्यायचा? लाकूडतोड्याकडे लहान मूल सोपवून बुद्ध भिक्षू त्याची निर्णय घेण्याची पद्धत आपल्याला सांगतो. जेव्हा सगळे जण खोटं बोलत आहेत असं कळतं तेव्हा ज्याच्याकडे खोटं बोलण्यासाठी सबळ कारण आहे आणि ते जीवनाला पुढे नेणारं आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी मांडणी राशोमोनने केली आहे, असं माझं आकलन आहे.
म्हणजे माझ्या मते सत्य काय? असत्य काय? या प्रश्नांवरून सुरु होणारा राशोमोनचा प्रवास सगळेच आपापल्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी असत्याचा आधार घेत असताना विश्वास कुणावर ठेवावा? या प्रश्नापर्यंत पोहोचतो.
राशोमोनच्या माध्यमातून असत्याचा जन्म कसा होतो ते कुरोसावा आपल्याला सांगतात आणि त्यापासून सुटका नाही हेही समजावतात. व्यक्तीला दिसणारी घटना अर्धसत्य असते. त्या घटनेचं स्वतःच्या प्रतिमेला सुसंगत असं चित्र प्रत्येक व्यक्ती तयार करते आणि त्यालाच सत्य मानते. त्यामुळे घटनेची न दिसलेली बाजू आणि स्वप्रतिमाप्रेम यातून असत्याचा जन्म होतो. मूळ घटना आणि व्यक्तीने सांगितलेली घटना यात किती अंतर आहे हे सांगणं कुणालाही शक्य नाही; अशी सिद्धता मांडून मग वेगवेगळ्या असत्यांत जगत असताना माणसाने आजूबाजूंच्यापैकी कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवावा ? या प्रश्नाकडे कुरोसावा आपलं लक्ष वेधतात.
याउलट साक्षी कादंबरीतील साक्ष यमधर्मासमोर आहे.
साक्षी कादंबरीमध्ये मृत व्यक्तीने केलेलं वर्णन सत्य आहे की असत्य आहे हे सांगण्यासाठी चित्रगुप्त या दैवी साक्षीदाराची योजना केलेली आहे. आणि यमधर्माच्या तोंडी, 'इथे चित्रगुप्ताचा शब्द प्रमाण मानला जातो', या अर्थाचं वाक्य आहे.
म्हणजे साक्षीत असत्य हा जीवनाचा एक घटक मानला आहे. त्याची निवड करावी अगर नाही तो व्यक्तीचा निर्णय असतो. व्यक्तीला जे दिसतं ते अर्धसत्य आहे हे भैरप्पांनाही मान्य आहे. पण आपल्याला दिसलेलं अर्धसत्य जसं आहे तसंच सांगावं की त्यात स्वतःची प्रतिमा वाचवणारे आणि स्वतःचे हेतू दडवणारे रंग मिसळून त्याला बदलावं हा व्यक्तीचा निर्णय असतो. आणि व्यक्तीने असे रंग मिसळले आहेत की नाहीत ते सांगणं चित्रगुप्ताला शक्य असतं, असं प्रतिपादन साक्षी कादंबरी करते. जर सत्य काय आहे ते शोधणं शक्य असेल तर वेगवेगळ्या असत्यांच्या जगात विश्वास कुणावर आणि कशाच्या आधारावर ठेवायचा?, हा प्रश्न भैरप्पांच्या पात्रांना पडत नाही.
म्हणजे राशोमोनमध्ये घटना सत्य, तिचा अनुभव घेणाऱ्यांना होणारं तिचं आकलन अर्धसत्य तर त्यांच्या कथनातून जगाला त्या घटनेची होणारी वेगवेगळी दर्शनं म्हणजे असत्याची वेगवेगळी रूपं असा मुद्दा आहे. याउलट साक्षीमध्ये घटना सत्य, तिचा अनुभव घेणाऱ्यांना होणारं तिचं आकलन भलेही अर्धसत्य असलं तरी त्याच्यापुरतं ते सत्य आणि जर त्याने त्याच कथन करताना आपले रंग त्यात मिसळले तर ते असत्य असा मुद्दा आहे.
राशोमोनमध्ये असत्यापासून सुटका नाही. याउलट साक्षीमध्ये चित्रगुप्त साक्षीदार असल्याने आणि त्याचा शब्द प्रमाण मानणे हाच नियम असल्याने असत्याला झिडकारणे शक्य आहे.
असा विचार करत मी भानावर आलो. तोपर्यंत सासरे झोपी गेले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा काही सांगण्यासाठी झोपेतून उठवणं मला जीवावर आलं होतं. त्यामुळे माझ्या मनात आलेला शेवटचा प्रश्न अनुत्तरीत राहिला. 'जर भैरप्पा जपानी परंपरेत वाढलेले असते तर चित्रगुप्ताशिवाय त्यांनी साक्षी कादंबरी कशाप्रकारे मांडली असती? आणि जर कुरोसावा भारतीय परंपरेत वाढलेले असते तर चित्रगुप्त वापरून त्यांनी राशोमोनचा शेवट कसा केला असता?