Thursday, January 9, 2020

विश्वाचा पसारा

गजर झाला. जाग आली. पण अंथरुणात लोळत राहिलो. काल एका मैत्रिणीने पाठवलेलं 'झोपणे इज अ थिंग बट लोळणे इज अ फीलिंग' मीम अनुभवत होतो. बायनरी म्हणजे काय यावरचा टेड एडचा व्हिडिओ बघण्यात वेळ गेला. मग घाईघाईत उठलो. चालायला जायला उशीर झाला असं वाटलं होतं पण मोबाईलवर अॉडियोबुक सुरु करताना बघितलं तर नेहमीच्याच वेळेवर पोचलो होतो.

टेकडीच्या पायथ्यापासून वर चालायला निघालो. अॉडियोबुकची फाईल बहुतेक करप्ट झाली होती. त्यामुळे ते बंद केलं. अजून झुंजूमुंजू झालेलं नव्हतं त्यात आज वीकडे त्यामुळे रस्त्यावर चिटपाखरुही नव्हतं. रात्र वाटावी असा पहाटेचा काळोख, नीरव शांतता, हवीहवीशी पण किंचित बोचरी थंडी आणि भरपूर धुकं. त्यातून चाललेला मी.

मग मधलं मैदान आलं. इथली जागा अशी आहे की एका बाजूला जंगल, मधे रस्ता, दुसऱ्या बाजूला मैदान त्याच्या पुढे पुन्हा जंगल. त्या जंगलातून माझी नेहमीची पायवाट जाते म्हणून तिथे वळलो. समोरचं दृश्य खरोखर अवर्णनीय होतं. तरी थोडा प्रयत्न करतो.

मैदान. त्यात माझ्या आधी आलेल्या लोकांच्या उभ्या केलेल्या तुरळक कार्स. पुढे निस्तब्ध झाडं. झाडांवर तरंगणारा धुक्याचा ढग. आणि त्या सगळ्यापुढे उभा असलेला एकटा मी. सोबतीला माझ्याच श्वासाचा आवाज. मला एकदम हॅरी पॉटरमधला मेझ सीन आठवला.



मग ख्रिस्तोफर नोलानच्या कुठल्यातरी सिनेमातला मी नायक आहे असं वाटून मी खूष झालो आणि जंगलात शिरलो.

पुढे एका ठिकाणी अरुंद वाट आहे आणि दोन्ही बाजूच्या झाडांच्या फांद्या एकमेकांत गुंफल्या गेल्याने एखाद्या लांबलचक गुहेतून किंवा कमानीखालून गेल्यासारखं वाटतं तो भाग आला. धुकं अजूनंच दाट झालं होतं. रस्ता नेहमीचा असूनही मी वेग कमी करुन थोडा हळू जाऊ लागलो.

त्या अंधाऱ्या थंडीत झाडांच्या कमानीखाली माझ्या पायाखालच्या ओलसर पाचोळ्याचा माझ्याच चालण्यामुळे झालेला आवाज ऐकू आला. आणि वाटलं या पाचोळ्याखाली असलेल्या लहान किडा मुंग्यांचं आणि कृमी किटकांचं अस्तित्व मला जाणवतही नाही आहे. त्यांच्यासाठी मी गलिव्हर आहे. एखादा महाकाय राक्षस आहे. घटोत्कच किंवा बकासूर.

किडामुंगीच्या तुलनेत स्वतःच्या महाकाय आकाराची जाणीव होऊन उगाच खूष झालेलो असताना एकाएकी मला असं वाटलं की आता या जंगलावरून एखादं विमान जात असेल तर त्यांना खाली फक्त धुक्याची चादर दिसेल. त्या चादरीखालची टेकडी, टेकडीवरचं जंगल, जंगलातली झाडांच्या दाटीची छोटीशी पायवाट, त्यावरुन एकटाच चालणारा मी; यातलं काहीच त्या विमानातल्या प्रवाश्यांना दिसणार नाही. हा विचार आला आणि या विश्वाच्या पसाऱ्यात आपण किती क्षुद्र आहोत ते जाणवलं.

अणूपासोनी ब्रह्मांडाऐवजी, ब्रह्मांडापासोनी अणूपर्यंत माझ्या विचारांनी एका क्षणात केलेल्या या प्रवासामुळे मी उगाच आनंदी झालो. मनात आलेल्या असंख्य विचारांतील 'विश्वाचा पसारा' या शब्दांचा प्रतिध्वनी पुन्हा पुन्हा ऐकू येत राहिला.

आठवीत असताना शाळेत खगोल मंडळ या संस्थेने एक छोटं व्याख्यान ठेवलं होतं. ते द्यायला तर बारकेला तरुण आला होता. प्रदीप नायक म्हणजे माझा प्रदीप दादा. त्या व्याख्यानानंतर खगोल मंडळाचा पहिला सभासद म्हणून मी नाव नोंदवलं होतं. मग प्रदीप दादाबरोबर दर महिन्याच्या अमावस्येच्या आसपास येणाऱ्या शनिवारी आकाशदर्शनाला जाऊ लागलो. तिथे आकाशदर्शन घडवून आणणारे अनेक मार्गदर्शक यायचे. त्यांच्या सगळ्यांच्या तोंडी हा शब्द कायम असायचा 'विश्वाचा पसारा'. ते सगळं आठवलं.

माझी स्मरणशक्ती बरी असली तरी मी पुढच्या अमावस्येपर्यंत आकाशाचा सगळा नकाशा मी विसरलेला असायचो. 'विश्वाचा पसाराच इतका मोठा आहे की कसा काय लक्षात ठेवणार?' असं म्हणत मी ज्यांना नक्षत्रांचे आकार लक्षात रहातात त्यांचा हेवा करायचो. पडणाऱ्या उल्का मोजत रहायचो. एका रात्री दिडशेच्यावर उल्का मोजल्या होत्या. आणि ते करताना मी इतका रंगून गेलो होतो की मी मधेच 'एकोणपन्नास, पन्नास' वगैरे ओरडत होतो त्यामुळे आकाशदर्शन घडवणारे त्या रात्री माझ्या व्यत्ययामुळे किंचित कावले होते हे मला दुसऱ्या दिवशी घरी जाताना प्रदीप दादाने सांगितलं होतं तेव्हा कळलं. नंतरही बरेच दिवस मला तिथे डोंबिवलीचा उल्का मोजणारा म्हणून ओळखत होते. पुढे एकदा कुणीतरी शंका विचारली असताना प्रमुख वक्त्यांना टिळक पंचांगाचं स्पर्धक पंचांग असलेल्या दाते पंचांगाचं नाव चटकन आठवेना तेव्हा मी जोरात आगरकर पंचांग बोललो आणि माझा लौकिक बदलून आगरकर पंचागाचा मुलगा झाला, ते आठवलं. तीन चार वर्षापूर्वी फेसबुकवर अॉस्ट्रेलियातील मैत्रिण, वाई धोत्रेने मृग नक्षत्रातील बीटलगीज या ताऱ्याबद्दल लिहिलेलं ते आठवलं.

मग प्रदीप दादाने त्याच्याकडचं राहुल सांकृत्यायन असं नाव असलेल्या लेखकाचं वोल्गा ते गंगा नावाचं पुस्तक वाचायला दिलं होतं ते आठवलं. त्या पुस्तकातील प्रवाहण नावाच्या प्रकरणातील ऋषी प्रवाहण आणि लोपमुद्रा व गार्गी यांच्यातील संवाद वाचून पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या ऋषीस्मरणावर पोसलेल्या माझ्या मनावर खोलवर झालेला परिणाम आठवला. नववीतल्या उमलत्या वयात पिवळी पुस्तके वाचलेली नसल्याने वोल्गा ते गंगातील एका राजाच्या कामजीवनाचं वर्णन वाचून गरम झालेली कानशीलं आठवली. मग पैसे कमवायला लागल्यावर राहुलजींची भरपूर विकत घेऊन ठेवलेली पण हिंदीत असल्याने पूर्ण वाचून न झालेली घरातली पुस्तकं आठवली.

टेकडीवरुन परतताना दूर डोंगरावर दाटलेलं धुकं दिसत होतं. बाईकच्या सीटवर दव पडलेलं होतं. गाडी चालू न करता नुसती उतारावर लोटली. आज रस्त्यावर गर्दी नसल्याने अगदी मेनरोडपर्यंत गाडी चालू न करता यायचं माझं छोटंसं स्वप्न पार पडलं. त्यामुळे खूष झालो. आणि टेकडीचा रस्ता संपून जिथे मुख्य रस्ता सुरू होतो तिथे आमनेसामने असलेल्या दोन टपरीवजा दुकानांसमोर झाडलोट चालू असलेली दिसली. जेमतेम एक माणूस उभा राहील इतकी ती दुकानं छोटी असली तरी एकाच्या नावात मार्केट तर दुसऱ्याच्या नावात सुपरमार्केट आहे हे वाचून मागे एकदा मी हसलो होतो ते आठवलं.

पण आज एकाचवेळी गलिव्हरची भव्यता आणि विश्वाच्या पसाऱ्यातील क्षुद्रता अनुभवल्यामुळे आणि आठवीपासून ते आजपर्यंतचा कालप्रवास व डोंबिवली ते वांगणी ते अॉस्ट्रेलिया ते पुणे असा स्थलप्रवास मनाने केल्यामुळे त्या दोन्ही अनोळखी दुकानदारांबद्दल मनात भरपूर प्रेम दाटून आलं.

त्यांची दुकानं भरपूर चालोत. आपल्या मुलाबाळांना ते भरपूर शिकवोत. मार्केट मेकर, मार्केट रेग्युलेटर आणि मार्केट पार्टिसिपंट या संकल्पना माहीत नसताना आपल्या दुकानाला मार्केट किंवा सुपरमार्केट म्हणत त्यांनी लावलेल्या त्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचं बीज त्या मुलाबाळांत रुजो... अशा सदिच्छा मनातल्या मनात व्यक्त करत मी हमरस्त्याला लागलो.

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete