Wednesday, October 16, 2019

सुष्ट दुष्ट आणि फुलांच्या माळा


 नवरात्रीत आमच्या घरी घट बसतात. माझी कानडी बायको हौशी असल्याने ज्यात नटणे मुरडणे किंवा खाणेपिणे या गोष्टींना महत्त्व असते ते सगळे सण आमच्या घरी साजरे होतात. नटून खुश झालेल्या हिचं कौतुक करणे किंवा मग तिने बनवलेले चविष्ट पदार्थ चापणे, या दोन्ही गोष्टी मला सारख्याच आवडत असल्याने, कुठलाही उत्सव साजरा करण्यास माझी ना नसते.

कॉलेजात असताना रोज रात्री गरबा खेळायला उत्सुक असलेली मुलगी ते आता नऊ दिवस उपवास करणारी मुलगी हा तिचा प्रवास मला स्त्रीच्या कायम बदलत रहाण्याच्या आणि सदैव आनंदी राहण्याच्या वृत्तीचं प्रत्ययकारी दर्शन घडवतो. अर्थात इतक्या वर्षात मी फारसा बदललो नाही हेही तितकंच खरं आहे. एका अर्थाने ती नित्यनूतन प्रकृती आहे आणि मी जड पुरुष.

माझ्यात फार बदल न होण्यात माझ्या तीर्थरुपांचा फार मोठा हात आहे. 'मुलाला सोळापर्यंत आणि मुलीला सोळानंतर सांभाळावं लागतं' ही म्हण त्यांना कुणीतरी वाढवून 'एकवीसपर्यंत' अशी सांगितली असावी. त्यामुळे 'फाल्गुनी पाठकच्या तालावर नाचताना आनंद मोरे' अशी छायाचित्र कधीच कुठल्याही वर्तमानपत्रात झळकली नाहीत. अर्थात मला कधी कधी वाटतं की मी गरब्यात न नाचल्यानेच फाल्गुनी पाठक टिकली असावी, कारण माझं विलक्षण नृत्यकौशल्य जर मी सार्वजनिक व्यासपीठावर प्रगट केलं असतं तर फाल्गुनीने संगीतसंन्यास घेतला असता. जर गरबा भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेवरुन प्रेरित असेल तर साक्षात भगवंतानी रासलीला खेळून असा पायंडा पाडून मला नृत्यसंधी दिल्याबद्दल भारतवर्षाची माफी मागितली असती आणि लगोलग 'हा पहा शेवटचा कौरव' असं अर्जुनाला सांगून मला शरपंजरी निजवून मग अवतारकार्य संपवलं असतं. तसंच, जर गरबा आणि देवीचं काही नातं असेल तर देवीने महिषासुराला जरा टाईमप्लीज घालून आधी माझ्याकडे मोर्चा वळवला असता. नृत्याच्या बाबतीत अशा प्रकारे मी सनी देओलचाही गुरु असल्याने कॉलेजच्या दिवसात माझी प्रेयसी 'पंखिडा तू मोतियोंकी ला बहार रे' वगैरेवर गिरक्या घेत असताना मी सातच्या आत घरात असे. आणि आजही मी सनी देओलचं गुरुपद टिकवून आहे त्यामुळे गरब्यात मी कधी रमलो नाही.

उपवास या गोष्टीची मला साबुदाणा खिचडी आणि केळीचे तिखट मीठ लावलेले लांब वेफर्समुळे पडलेली भुरळ अजूनही कायम आहे. त्यामुळे हिच्यात होणारे बदल बघत, तिला नऊ रंगाच्या साड्या, नारळपाणी वगैरे आणून देत आणि स्वतः नेहमीचा नाश्ता करून वरुन पुन्हा साबुदाण्याची खिचडी खात मी जसाच्या तसा राहिलो आहे.

तात्पर्य काय? तर भारताच्या विविध भागात नवरात्र साजरी करण्याचे विविध प्रकार अजमावणाऱ्या आणि विश्वातील आनंदाचे ब्रह्मज्ञान अनुभवणाऱ्या माझ्या अर्धांगासमोर मी बराच कोरडा पाषाण आहे. असो. हे विषयांतर झालं. मुद्दा होता घरच्या घटस्थापनेचा. ती जरी घटस्थापनेचा हा उत्सव मनोभावे करत असली तरी माझा वाटा तिला शहाळ्याचे पाणी आणून देणे, आरतीच्या वेळी टाळ्या वाजवणे आणि 'जयदेवी जयदेवी' असे जोरात ओरडणे इथपर्यंतच आहे.

या वर्षी हिने घटावर टांगण्यासाठी एक लाकडी छत्र करून घेतलं होतं. त्याला खालच्या बाजूला भरपूर हुक्स होते. दर दिवशी फुलांची एक एक माळ ओवून ती त्या हुक्सना अश्या प्रकारे अडकवायची की त्यातील झेंडूची फुले देवीच्या मुखवट्याला लागली पाहिजेत. देवी युद्ध करत असताना तिच्या मस्तकाचा दाह होतो म्हणून आपण तिला फुलांनी शांत करत राहायचं. सुष्ट आणि दुष्टांच्या या युद्धात आपण सुष्टांच्या बाजूला आहोत हे आपल्या कृतीने सिद्ध करायचं आणि आपल्यासाठी लढणाऱ्या देवीची ताकद वाढवायची, अशी ही कल्पना.

कुठल्यातरी सुताराने आणि कुठल्यातरी फुलवाल्याने आपला व्यवसाय वाढावा म्हणून पुढे केलेल्या कल्पनेला सुष्ट आणि दुष्टाच्या चिरंतन लढ्याचं कोंदण लाभल्याने घटावर छत्र आणि छत्राला फुलांच्या माळा आता एक परंपरा बनली आहे , असे विचार माझ्या मनात आले. नंतर रोज देवीच्या मुखवट्याभोवती वाढत जाणाऱ्या माळा बघून मला माझ्या बायकोच्या हौसेचे कौतुक वाटत होते.

 

दसऱ्याच्या दिवशीच्या पहाटे लवकर उठलो होतो. पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेलो. वातावरण थंड होते. सगळीकडे शांतता होती. घरात आणि घराबाहेर अजूनही कुठला प्रकाश नव्हता. फक्त देव्हाऱ्याजवळ समयांचा मंद प्रकाश पसरला होता. त्या मंद प्रकाशात पाटावरची परडी, तिच्यातील मातीत उगवलेले नऊ धान्यांचे तुरे, त्यांच्यामधे ठेवलेला घट, त्यावरचा देवीचा मुखवटा, त्यावरचं छत्र आणि त्याला लटकून देवीच्या चेहऱ्याला स्पर्श करणाऱ्या माळा दिसत होत्या. मन प्रसन्न करणारं ते दृश्य बघत मी तिथेच उभा राहिलो. मग वाटलं. आज दहावा दिवस म्हणजे सिंहारूढ होऊन 'अंबा निघे सीमोल्लंघनी हो, शुंभनिशुंभादीक राक्षसा किती मारशी रणी हो' हे वर्णन आज लागू होणार. आणि त्या प्रसन्न क्षणीही मला हसू फुटलं.

म्हणजे बघा, दहावा दिवस आहे. देवी गेले नऊ दिवस रोज युद्ध करते आहे. अनेक राक्षस देवीवर तुटून पडत आहेत. देवी सगळ्यांना पुरून उरते आहे. आज राक्षसांनी शेवटचा निकराचा हल्ला चढवायचं ठरवलं आहे. त्यांच्या गटात रात्रभर व्यूहरचनेबद्दल खलबतं चालली आहेत. सकाळ झालेली आहे. दोन्ही बाजूला रणभेरी, संबळ, तुतारी, शंख वगैरे रणवाद्ये वाजू लागलेली आहेत. रणक्षेत्राच्या आजूबाजूचे पक्षी घाबरून ओरडू लागले आहेत आणि तिथून उडून चालले आहेत. त्यांच्या थव्यामुळे किंचिंत काळ रणक्षेत्र अंधारले आहे. दोन्ही बाजूचे हिंस्त्र प्राणी डरकाळ्या फोडत आहेत. जंगलातील कोल्हेकुत्रे भेसूर आवाजात ओरडून वातावरणातील ताण वाढवत आहेत. देवीला युद्धज्वर चढू लागलेला आहे. देवी आता असुरनिर्दालन करण्यासाठी सिंहावर आरूढ होते आहे. सिंह आता शेपटी आपटतो आहे. मान हलवून आयाळ उडवतो आहे. दृश्य मोठं भीतीदायक होत आहे. इतक्यात घरा घरातील सुगृहिणी आपापल्या हाताने बनवलेल्या झेंडूच्या फुलांच्या माळा देवीच्या चेहऱ्याला लागतील अश्या प्रकारे घरातील घटावरील छत्रीला अडकवत आहेत. आणि रणक्षेत्रावरील देवीला त्याची जाणीव होत आहे.

काय वाटेल अश्या वेळी देवीला? काय म्हणत असेल ती?

"अरे जरा थांबा. काय हे मधेच फुलं आणि माळा वगैरे. इथे समोर शुंभनिशुंभ उभे आहेत. माझा क्रोध अनावर होतो आहे आणि तुम्ही माळा लावून माझा युध्दज्वर उतरवताहात? अशाने युध्द संपायचं नाही. आणि काय रे भक्तांनो, या माळांमुळे माझ्या नजरेत अडथळा येणार नाही का? तुमच्या लग्नात मुंडावळ्या बांधलेल्या असताना इकडे तिकडे बघताना तुमचं जजमेंट चुकत होतं की नाही? मग मला का त्रास देताय? सुष्टांच्या बाजूने उभं राहताना शेवटी दुष्टांना सहाय्य करताय ते कळत नाही का तुम्हाला?"

मी असा विचार करून हसत होतो. तितक्यात हीदेखील देवघराजवळ आली. नित्यकर्माला सुरवात करण्याआधी देवीला भक्तिभावाने नमस्कार करत एक क्षण उभी राहिली. माझं हसू तिला दिसलं नव्हतं. आपण सुष्टांच्या बाजुने लढणाऱ्या देवीची मनोभावे सेवा करतो आहोत याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. तिच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंद पाहून माझ्या मनात आलेले विचार सांगून तिची थट्टा करण्याचा मोह मी आवरला. माझ्या विचारांच्या मुंडावळ्या काढून टाकल्या आणि मनातल्या मनात म्हणालो की ज्या कुणी सुताराने आणि फुलवाल्याने ही माळांची कल्पना सुरु केली असेल त्यावरही देवी प्रसन्न होवो.

No comments:

Post a Comment