Wednesday, September 4, 2019

थोडक्यात सांगायचं झालं तर

जर्मन भाषेतील 'कुर्त्झगेझाग्ट' म्हणजे इंग्रजीतील 'In a nutshell' किंवा मराठीतील 'थोडक्यात सांगायचं झालं तर'.

तर या कुर्त्झगेझाग्ट नावाचं एक युट्यूब चॅनेल आहे. वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना सुंदर अॅनिमेशनच्या सहाय्याने थोडक्यात समजावून सांगणे हा या चॅनेलचा उद्देश आहे. आणि हे काम करत गेली सहा वर्षे ते यशस्वीपणे टिकून आहेत.

असं काही चॅनेल आहे हे मला माहिती नव्हतं. सकाळी पोरांना घेऊन बाहेर गेलो होतो. त्यांच्याबरोबर रिसेशनवर गप्पा मारत होतो. काही व्हिडिओ बघत होतो. एक दीड तासाने मी जरा गप्प बसलो तर मोठा लेक म्हणाला, "बाबा तुला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. विषय वेगळा आहे. पण तुला आवडेल."

मी गाडी चालवत होतो. त्याने व्हिडिओ लावला आणि मग मला ९०लाख सबस्क्रायबर असलेल्या आणि २०१३ साली स्थापन झालेल्या या चॅनेलची ओळख झाली. मग उरलेला दिवस या चॅनेलच्या मागे कधी संपला ते कळलंच नाही.

जो व्हिडिओ लेकाने आग्रहाने दाखवला त्याचं नाव होतं The Egg.

अॅण्डी वियर नावाच्या लेखकाच्या कथेवर बेतलेला हा व्हिडीओ गेली दोन वर्षं बनत होता. दि १ सप्टेंबरला तो अपलोड केल्यापासून आज ४ सप्टेंबरला संध्याकाळी सातपर्यंत त्याला ६६लाख लोकांनी पाहिलंय.

काळ एकरेषीय असतो या गृहितकाला छेद देत आयुष्याचं प्रयोजन सांगणारा हा व्हिडीओ नितांतसुंदर आहे.

या निमित्ताने गेल्या वर्षी सुरू केलेली सिध्दार्थ मालिका पूर्ण करण्याची इच्छा तीव्र झाली. आणि मुलांना स्मार्टफोन घेऊन दिल्याचं चीज झाल्यासारखं वाटलं.

 

इतिहासाची पुनरावृत्ती

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस किंवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर फेसबुक असतं तर किती वेगळं चित्र दिसलं असतं.

सतीबंदीवरची भद्र लोकांची अभद्र मतं राजा राममोहन रॉयना जितकी ऐकू आली त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात ऐकू आली असती. आणि सतीसमर्थकांनी रॉयविरूध्द जनमत एकत्र करून त्यांना बिनशर्त माफी मागायला लावली असती.

नेहरू सुभाष संबंधांबद्दल उडणाऱ्या अफवा बघून सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेला 'चलो दिल्ली' ऐवजी 'चलो घर' म्हणून बरखास्त तरी केले असते किंवा मग 'तुम मुझे खून मत दो क्यूंकी उससे मै तुम्हे केवल अंग्रेजोंसे आजादी दे सकता हूं, तुम्हारे अज्ञानसे नही |' असं म्हणत अज्ञातवास स्विकारला असता.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? किंवा पुनश्च हरिओम सारख्या अग्रलेखांवर आम जनतेची मतं. गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक साजरी करण्यावरून केवळ ब्रह्मवृदांतंच नाही तर जनसामान्यांत उठलेला गदारोळ टिळकांना अधिक तीव्रतेने ऐकू आला असता. आणि कदाचित त्यांनी 'कायमचा रामराम' असा एखादा अग्रलेख लिहून केसरीला टाळं ठोकलं असतं.

सावरकरांची जन्मठेप व त्यानंतरच्या सशर्त सुटकेच्या बातम्या, गाय हा उपयुक्त पशू आहे सारख्या त्यांच्या विधानांवर आणि 1857 चे स्वातंत्र्यसमर सारख्या पुस्तकांवर वाचकांची मते त्यांना लगोलग मिळाली असती. आणि सरकारने लादलेल्या शर्तींचा भंग करून पोहत जाऊन त्यांनी अंदमानचे काळेपाणी गाठले असते.

पुणे करार. गोलमेज परिषदा. दांडी यात्रा. असहकार आंदोलन. फाळणी. पाकिस्तानला दिलेले पन्नास लाख. हिंसाचाराचा आगडोंब यासारख्या प्रत्येक घटनेवर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून आपण 'पराई पीड जाणत नाही' म्हणून गांधीजींनी स्वतःला 'वैष्णव जन' मानणं सोडलं असतं.

चवदार तळे, पुणे करार, मंदिर प्रवेश, मनुस्मृती दहन, निवडणुकीतील पराभव, धर्मांतर यासारख्या घटनांवर आपल्या विरोधकांच्या अनुयायांची टोकाची मतं आणि स्वतःच्या मूक अनुयायांना गतकालीन मानसिकतेला सोडताना होणारा प्रचंड त्रास पाहून तो महान मूकनायक हतबल झाला असता की अधिक त्वेषाने लढला असता?

जुनागढ आणि हैदराबाद येथील सरकारी समर्थनाने आणि काश्मीरबाबतीत पाकिस्तान समर्थनाने चालणाऱ्या पेड ट्रोल्सच्या पोस्टचा मारा सहन न होऊन पोलादी पुरूष भारतीय एकीकरण व्हायच्या आधीच वितळला असता.

एडविनाची उडवली जाणारी खिल्ली, नियतीशी करारच्या भाषणावरील लोकांची मते, अणुऊर्जा, शिक्षण, आय आय टीची स्थापना, धरण प्रकल्प यावर प्रस्थापितांची आणि विस्थापितांची मते ऐकून पंडीतजी पुन्हा भारत एक खोज लिहायला बसले असते.

कधी कधी वाटतं मार्क झुकरबर्गच्या आईबाबांनी मार्कला जन्म देण्याची घाई न केल्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अप्रत्यक्षपणे मोठी मदत केली आहे. नाहीतर आपल्या वाडवडिलांनी त्यांच्या समाजबांधवांना रोजच्या रोज फेसबुकवर हाणून आणि नेत्यांना कायम तोंडघशी पाडून आजच्या पिढीला पारतंत्र्यात जन्माला घातलं असतं.

फोडा आणि झोडा हे ब्रिटिशांचं राजकारण नव्हतंच हे मला फेसबुकमुळे कळलंय. फोडा आणि झोडा ही भारतीय प्रवृत्ती आहे.

Tuesday, September 3, 2019

उत्क्रांती

पाठीवर सॅक, अंगावर ढगळ टीशर्ट, कमरेवर ढगळ जीन्स, डोक्यावर उलटी टोपी, त्यातून बाहेर आलेला आणि पाठीवर लोंबणारा केसांचा शेपटा अशा अवतारातला तिशी चाळीशीचा तरुण, एअरपोर्टच्या वॉशरुममधे माझ्याशेजारी दोन जागा सोडून एका हाताने व्हॉटस अॅप झरझर वापरत निसर्गाच्या हाकेला ओ देत, कुठलाही अपघात होऊ न देता उरलेल्या मोकळ्या एका हाताने जीन्सची चेन लावत फोनच्या स्क्रीनवरुन नजर अजिबात न हटवता ज्या सहजतेने बाहेर गेला ते पाहता पूर्ण लक्ष देऊन दोन हात वापरूनही कायम अपघातप्रवण असलेला मी अतिशय आश्चर्यचकित झालो आहे.

उत्क्रांतीत माझ्यापुढे असलेला तो जीव पाहून; माणसांकडे पहाताना ओरांग उटान, चिंपांझीला काय वाटत असेल त्याचा अनुभव घेतो आहे.

अटकेपार इकॉनॉमिक्स

मी आर्थिक बाबींवर लिहिताना गांभीर्य पाळतो. कारण तो विषय मला पूर्णपणे कळत नसला तरी अतिशय आवडतो.

आर्थिक बाबींवर लिहिण्याचे दोन प्रकार असतात.

१) डेटासकट लिहिणे. सेन्सेक्स इतक्या टक्क्यांनी वाढला. जीडीपी अमूक एक टक्क्यांनी कमी झाला. बेरोजगारीचा दर, रेपो रेट असा असा कमी झाला /वाढला वगैरे. डेटा वाचताना वाचकाला एखादी संकल्पना माहिती नसेल किंवा कळली नाही तर तो ती शोधून समजून घेईल अशी अपेक्षा असते. हे लिखाण बातमीसारखं असतं.

2) केवळ संकल्पनांवर लिहिणे. यात डेटापेक्षा संकल्पनांवर भर दिलेला असतो. भाषा सोपी किंवा क्लिष्ट असू शकते. संकल्पना कळली की ती कुठे वापरायची ते वाचक शोधेल अशी खात्री असते. हे लिखाण कथेसारखं असतं.

माझं लिखाण दुसऱ्या प्रकारात मोडतं असं मला वाटतं.

पहिल्या प्रकारचं लिखाण महत्त्वाचं असतं कारण ते विमानाच्या डॅशबोर्डप्रमाणे महत्वाच्या निर्देशांकांची एका क्षणात माहिती देतं. हुशार विमानचालक त्या माहितीचा अचूक वापर करून आपल्या विमानाचं इंजिन गरम न करता, इंधन वाया न घालवता, वेगावर नियंत्रण ठेवत, केबिन प्रेशर योग्य ठेवत, एअर पॉकेट्स, जमिनीपासूनची उंची या सर्व बाबींना लक्षात ठेवत आणि आतल्या प्रवाशांच्या सोयीत कमीत कमी घट करत प्रवास सुखकर करतो.

पण डॅशबोर्ड म्हणजे काय? डॅशबोर्डवरची माहिती कशी वापरायची? याचं ज्ञान नसलेल्या माणसाला इंजिनच्या हीट इंडिकेटरचा आकडा, केबिन प्रेशर, आर्द्रता वगैरे सांगून काही उपयोग होत नसतो. झालाच तर त्रासच होतो. आपापल्या पूर्वानुभवानुसार आणि मतीनुसार ते आपापले निर्णय घेऊ शकतात आणि त्यामुळे समस्या असेल तर ती कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त असते.

पण म्हणून अशा प्रकारची माहिती देऊच नये या मताचा मी नाही. माहिती सर्वांना उपलब्ध असणे हा आधुनिक अर्थाभ्यासाचा पाया आहे. पण आधुनिक अर्थाभ्यासाचं अजून एक गृहीतक आहे. ते म्हणजे व्यक्ती रॅशनल असते. तर्कशुद्ध रहाणे आणि भावनांवर हेलकावे न खाणे हे प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षित असतं.

तर्कशुद्ध विचार करायचा कसा? भावनांना मतांवर आरुढ होण्यापासून कसं रोखायचं? हे समजण्यासाठी संकल्पना समजून घेणं आवश्यक असतं. संकल्पना अमूर्त असतात. त्यांचे शब्दरुप हीच त्यांची मूर्ती असते. अर्थव्यवस्था अमूर्त असते. त्यामुळे अमूर्त अर्थव्यवस्थेबाबतच्या अमूर्त संकल्पना समजावून सांगणे अजून कठीण असते.

सांगणाऱ्याचे शब्दवैभव, विषयाची सखोल माहिती, आणि वापरलेल्या उदाहरणाची मार्मिकता यावरून ठरते की सांगणारा आपल्या मनातले सर्व काही यथास्थित वाचकापर्यंत पोचवण्यात यशस्वी झाला की नाही.

अगदी साधं उदाहरण म्हणजे मंदीबाबत बोलताना अनेकदा 'तेजी मंदीचं चक्र असतं' असं म्हटलं जातं. त्यातील चक्र या शब्दामुळे संकल्पना वेगळ्या पद्धतीने वाचकाला समजते. म्हणून मी 'तेजी मंदीच्या लाटा शब्द' वापरतो. पण दोन तीन दिवसापूर्वीची पोस्ट लिहिताना जाणवलं की या लाटा तलावातल्या आहेत की नदीतल्या की समुद्रातल्या ते कळणार कसं? आणि खरंतर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे पाण्यातील लाटांवरुन चालणारं जहाज नसून हवेच्या लाटांच्या तडाख्यात सापडलेलं विमान असतं. याचाच अर्थ ज्याला मंदी म्हणजे महामार्गावरील खड्डा वाटतो किंवा समतल तलावातील लाट वाटते किंवा नदीतली लाट किंवा समुद्रातील लाट त्या प्रत्येकाचं मंदीबाबतची आकलन वस्तुस्थितीपेक्षा बरंच वेगळं असणार.

म्हणून विषय सोपा करण्यापेक्षा चपखल पण शक्य तितकी अचूक उदाहरणे देण्याकडे माझा कल असतो.

अर्थात मी सर्वज्ञ नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर, सरकारने डेफिसिट फिनान्सिंग ऐवजी सरप्लस ट्रान्स्फरचा मार्ग अवलंबला म्हणजे नक्की काय फरक पडला? डेफिसिट फिनान्सिंगमधे आरबीआयचा ताळेबंद भक्कम रहातो पण अर्थव्यवस्थेत जास्त पैसा खेळू लागल्याने महागाई वाढते. हे मला माहिती आहे. पण सरप्लस ट्रान्स्फरमुळे आरबीआयचा ताळेबंद नाजूक झाला असला तरी आता महागाई वाढेल का? हे मला अजूनही नीट कळलेलं नाही. मी त्याबाबत अजून वाचन करतो आहे. त्यामुळे माझ्या पोस्ट्स केवळ मला काय कळतं ते दाखवणारा पिसारा नसून कित्येकदा तो इथल्या मित्रांबरोबर केलेला संवाद असतो. त्यातून मला माझं अज्ञान दूर करता येतं आणि माझ्या उदाहरणांतील कच्चे दुवेही लक्षात येतात.

पण फेसबुकवर संवाद साधणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. अर्थविषयक निर्णय सरकार घेत असल्याने आणि सरकारसमर्थक व विरोधकांत अर्थनिर्णयांना राजकीय निर्णयाचे पूरक म्हणून बघण्याची सवय असल्याने इथल्या अर्थसंकल्पनांविषयक पोस्टवर अपरिहार्यपणे राजकीय कमेंट्स येतात आणि संकल्पना पूर्ण समजून घेण्याऐवजी शाब्दिक आसूडाचे फटकारे ऐकू येत रहातात.

मी पॉलिटिकल सायन्सपेक्षा इकॉनॉमिक्समधे जास्त रस घेतो. आणि त्यातल्या सीमारेषा मला स्पष्ट दिसतात. माझ्या बऱ्याच मित्र मैत्रिणींना त्या तशा दिसत नाहीत हे मला आता कळून चुकलंय. त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण त्यामुळे जेव्हा पोस्ट भरकटते तेव्हा ज्या संकल्पनांचा व्यूह पाश्चात्य समाजाने रचला, जो आपण कळत नकळत स्वीकारला, जो आपल्या जीवनावर सर्वांगीण प्रभाव पाडतो, तो समजून घेण्यासाठी आपण अजूनही पुरेसे गंभीर नाही, हे जाणवून मन थोडं खट्टू होतं.

मी पोस्ट लिहिताना राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवतो आणि माझ्या मित्र मैत्रिणींनी शक्य असेल तर माझ्या पोस्टवर किंवा अन्यत्रही आर्थिक संकल्पनाविषयक पोस्टवर राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला तर अटकेपार गेलेल्या मराठी भाषेत अर्थविषयक संकल्पना अधिक स्पष्टपणे व्यक्त होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा पुढील अनेक पिढ्यांना होईल याची मला खात्री आहे.

त्याचबरोबर माझे काही मित्र मैत्रिणी पोस्ट ऐवजी अन्य बाबींवर कमेंट करुन काव्य आणि विनोदाचा आनंद घेत असतात. त्याला कदाचित माझी किंचित विनोदी विषयांवर पोस्ट्स लिहिण्याची सवयही कारणीभूत असेल, हे मला मान्य आहे. पण शास्त्रविषयक पोस्टवर काव्य विनोद माफक असेल तर शोभून दिसतो अन्यथा शोभा होते हे वेगळे सांगायला नको.

कुणाला कदाचित माझी ही पोस्ट पटणार नाही. पण गूगल वापरून अर्धवट निदान करुन डॉक्टरशी वाद घालणाऱ्या पेशंटपेक्षा चुकीची उदाहरणं देऊन आणि अर्थाभ्यासाला राजकारणाची उपशाखा मानून सर्वत्र राजकीय मते मांडणारे लोक अधिक घातक आहेत. कारण जेव्हा पेशंट गडबड करतो तेव्हा तो केवळ स्वतःच्या जीवनाशी खेळतो. याउलट अर्थविषयक संकल्पनांना कमी लेखणारा समाज या ना त्या प्रकारे गुलामीत रहातो.

काशीला जायची गोष्ट

बंगळूरुत आहे. मेहुणीच्या लग्नाला आलोय. रम्य सकाळ आहे. हवेत सुखदपेक्षा किंचित जास्त गारवा आहे.

विधी सुरू झाले आहेत. नवरा मुलगा कमरेला वेष्टी आणि अंगावर उपरणं आणि डोक्यावर कानडी पगडी या वेषात काशीला निघालाय. मुलीकडचे आम्ही सगळे त्याची विनवणी करतोय की 'बाबारे ! नको जाऊस. आमची सालंकृत लेक तुला देतो. तुझ्या आयुष्यात ती छान रंग भरेल'

तो नाही म्हणतोय. शेवटी छान सजलेली वधू पुढे आली. तिला पहाताच नवरदेवाचं मन पाघळलं. त्याने काशीचा विचार रद्द केला. आता दोघं मोकळ्या अंगणात फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर झोके घेत आहेत. सगळे आनंदले आहेत. मला एकंच वाटतंय की, नवरा उघडा आहे. थंडी बोचरी आहे. फार जोरात झोके देऊ नका रे. नाही झालं सहन तर पुन्हा विचार बदलेल आणि जाईल काशीला.

इतक्यात माझ्या नजरेला माझी हसतमुख अर्धांगिनी आणि तिचे वडील दिसले. आणि लग्नानंतर आता एकोणीस वीस वर्षांनी जर मी काशीला जाण्याचा हट्ट धरला तर अगदी चटकन परवानगी देतील की काय या विचारामुळे मला या भर थंडीत घाम फुटला आहे.

मंदीचे फायदे

वर्गात असताना नोटिफिकेशन्सचा त्रास होऊ नये म्हणून मी सर्व मेसेजिंग अॅप्सना म्यूट करून ठेवतो. त्यामुळे मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा जाऊन कुणाचे मेसेज आले आहेत का ते बघणं हा एक नेहमीचा कार्यक्रम असतो.

काल सकाळी क्लासला जायची तयारी करत होतो. पाच मिनिटं होती. म्हटलं जरा इनबॉक्स चेक करुया. तसाही तो थंड असतो पण तितकंच नित्यकर्म केल्याचं समाधान. माझा स्वभावच तसा आहे. नियम म्हणजे नियम. भले इनबॉक्स थंड का असेना, पण आपण ठरलेल्या वेळी बघावं.

आज जर चौदावं शतक असतं तर माझा निष्काम नियमबद्धतेचा हट्ट बघून साक्षात विठुमाऊलीने संतशिरोमणी नामदेवांना माझा आदर्श देऊन नैवेद्य खाण्याचा आपला हट्ट सोडायला सांगितला असता. पण माझ्या आईबाबांच्या लग्नाचा मुहूर्त नेमका विसाव्या शतकातला निघाल्याने नामदेवांना आदर्श मिळाला नाही आणि विठुरायाला नैवेद्य खावा लागला.

हा तर मी काय म्हणत होतो, मी नियमाप्रमाणे इनबॉक्स बघायला गेलो आणि अहो आश्चर्यम्! फेसबुकवरील एका सुंदर खाशी सुबक ठेंगणीचं (सुंखासुठे) नाव वर आलं होतं. या मैत्रिणीला कधी प्रत्यक्षात भेटलेलो नसल्याने आणि फेसबुकवर तिने वरसंशोधनासाठी असतो तसा पूर्णाकृती फोटो टाकलेला नसल्याने तिच्यासाठी ठेंगणी हे विशेषण लागू होतं की नाही ते माहिती नाही. पण ज्याप्रमाणे पितांबर पिवळे असते, नीलांबर निळे असते त्याप्रमाणे सुंदर खाशी सुबक म्हटलं की ठेंगणी म्हणणे क्रमप्राप्त आहे, म्हणून तसंच म्हणून पुढे जातो.

या मैत्रिणीला फोन नंबर कधी आणि कशासाठी दिला होता ते काही आठवेना. पण आज नामदेवाप्रमाणे माझ्यावरही प्रसन्न व्हावं असं विठोबाला वाटलं असावं हे जाणवून मी हवेतल्या हवेत विठोबाला नमस्कार केला. जुन्या मराठी चित्रपटातील संतलोक अभंग गाताना जशी गिरकी मारतात तशी गिरकी मारली आणि कृतकृत्य मनाने फोन हातात घेतला. 'भगवानके घर देर है अंथेर नही है' हे गाणं म्हणत माझी बोटं व्हॉटस अॅपकडे झेपावली.

नोटिफिकेशन म्हणत होतं सुंखासुठे ने मेसेज डिलीट केला आहे. हे रे काय देवा? असा कसा तू निर्दयी झालास? एका कळीचं फूल होण्याआधीच का बरं उखडून टाकलंस? असा कसा तू निष्ठूर झालास? एक स्वप्न पडण्याआधीच तू का बरं भंग पाववलंस?

पाववलंस बरोबर की पावलंस बरोबर की भंगवलंस बरोबर ते मला कळेना, म्हणून मी हताश होऊन मेसेज उघडला. त्यात 'Good morning Anand' हा मेसेज दिसला आणि त्याखालचा मेसेज डिलीट केलेला होता.

गुड मॉर्निंग म्हटलंय की. म्हणजे अजून जीव आहे हे जाणवताच, 'काय झालं असेल? काय म्हणायचं असेल तिला? का बरं डिलीट केला असेल मेसेज? मी आधी का बरं नाही बघितला मेसेज?' असे हजारो प्रश्न डोक्यात गर्दी करु लागले.

मागे एकदा एका मैत्रिणीने फेसबुकवर मेसेज करून फोटो मागितला होता. तिच्यासाठी अनुवादाचं एक किंचित काम केलं होतं. त्या मासिकासाठी तिला फोटो हवा होता. (जिज्ञासूंनी 'मैत्रिण जेव्हा फोटो मागते' नावाची माझी पोस्ट शोधावी). आजच्या मेसेजवाल्या मैत्रिणीला मी कुठल्याही अनुवादासाठी मदत केल्याचं मला आठवत नव्हतं. मग तिला माझा फोटो कशासाठी हवा असेल? असा प्रश्न आपोआप मनात आला. आधीची मैत्रिण दक्षिण गोलार्धातली होती. यावेळची माझ्याच शहराजवळ होती. मग 'फोटो कशाला? हवं तर प्रत्यक्ष भेटूया' असा प्रस्ताव माझ्या डोक्यात तयार होत होता.

कुठला शर्ट घालावा, बाईकने जावं की कारने याबद्दल एक मन विचार करु लागलं. आणि हात पुन्हा पुन्हा केसांवरून, दाढीवरून फिरवत; पोट आत घेत मी नमस्काराचा मेसेज पाठवून चमत्काराची वाट बघू लागलो.

मग झालेला संवाद याप्रमाणे

सुंखासुठे : कसा आहेस?

मी : मस्त आणि थोडा जाडा. (आपण अगदीच गंभीर नाही आहोत, आणि प्रत्यक्ष भेटीत छान गप्पा मारु शकतो याची एक झलक दाखवण्यासाठी मी माफक विनोद केला.)

सुंखासुठे : हा हा हा.. ते चांगलंय. तू जाडाच बरा.

मी (प्रकट) : (जाडाच बरा म्हणजे कौतुक आहे की टोमणा ते न कळल्याने) बोल. काय काम काढलंस? आज कशी काय माझी आठवण आली?

मी (स्वगत) : का गं असं बोलतेस. अगं मी गंमत केली. दीक्षित डायेट केल्यापासून मी तितका जाडा नाही राहिलो. फोटो हवाय का माझा? कशाला उगाच? आपण प्रत्यक्ष भेटूया की.

सुंखासुठे : जरा एक काम होतं.

मी : एक काय दहा कामं सांग. हा हा हा.

सुंखासुठे : अरे मी एका फेसबुक ग्रुपवर आहे.

मी : अरे वा ! फेसबुकचा फार चांगला वापर करतेस तू. (आता तिने काहीही सांगितलं असतं तरी मी अरे वा च म्हटलं असतं)

सुंखासुठे : तर ना , त्या ग्रुपवर एकाने मंदीबद्दल लिहिलं आहे. त्याच म्हणणं आहे की आता आपल्या रुपयाचं डिव्हॅल्यूएशन करावं लागेल. मला कळलं नाही. हे डिव्हॅल्यूएशन काय आहे ते. मग मला आठवलं की गेले काही दिवस तू तुझ्या भिंतीवर मंदीवर फार काही काही लिहितोय. म्हणून म्हटलं तुलाच विचारावं.

आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मेसेज माझ्यासाठी नसून मंदीसाठी होता. आणि मग एकाएकी माझ्यात शिक्षकाचा संचार झाला. कुणी शंका विचारली की मी गप्प बसत नाही. मग मी रिसेशन म्हणजे काय? त्याची कारणे? त्यातून बाहेर पडण्याचे उपाय? त्यातील जोखीम? सरकारची जबाबदारी, सामान्य नागरिकांनी घ्यावयाची काळजी, चलनाचा विनिमय दर, डेप्रीसिएशन आणि डिव्हॅल्यूएशन मधला फरक अशी सगळी माहिती लिहून पाठवली. माझा स्वभावच तसा आहे. कुणी काही विचारलं की शंका विचारणाऱ्यापेक्षा माझ्या मनाचं समाधान होईपर्यंत मी थांबत नाही.

सगळं लिहून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की समोरची मैत्रिण कधीची ऑफलाईन गेली आहे. म्हणजे मी इतका वेळ एकटाच बोलत होतो तर. भानावर आल्यावर मी घड्याळाकडे पाहिलं. तर क्लासला पंधरा मिनिटं उशीर झालेला होता. कधी नव्हे ते इनबॉक्स मध्ये आलेली मैत्रिण ऑफलाईन गेलेली होती. काय करावे ते न कळल्याने मी जड अंतःकरणाने शेवटचा मेसेज टाईप केला, 'अजून काही माहिती हवी असल्यास नि:शंकपणे शंका विचार.' आणि निःशंकपणे शंका या शब्दावर माझा मीच खुश झालो. माझा स्वभावच तसा आहे. चटकन खुश होणारा.

त्याच खुशीत क्लासला जाण्यासाठी स्कुटरला किक मारून निघालो. फक्त एकंच शंका आहे की सुंखासुठे आता परत इनबॉक्समधे येईल का?

टीप : सदर घटना सत्य आहे की काल्पनिक ते अजून ठरलेले नाही. त्यामुळे सुंखासुठे कोण त्याबद्दल फार चौकशा करू नयेत.

मंदी आणि सकारात्मक विचार

1) जगावर आणि भारतावर मंदीचं सावट पडलेलं आहे. असं अनेकजण म्हणत आहेत. त्यावर 'कुठाय मंदी' असं काहीजण म्हणत आहेत. तर काहीजण,'आमचं तर ठीक चाललंय ' असंही म्हणत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंदीच्या संकल्पनेचा संक्षिप्त आढावा घेऊया.

2) सगळ्यांना कठीण गेलेल्या पेपरमधेही काही मुलांना चांगले मार्क मिळतात. (कारण ते कदाचित खरंच हुशार असतात किंवा त्यांनी केलेल्या अभ्यासावरचेच प्रश्न नेमके परिक्षेला आलेले असतात किंवा त्यांना पेपर आधी मिळालेला असतो किंवा ते परिक्षकाला ओळखत असतात किंवा ते मार्कशीटमधे अनधिकृत फेरफार करून बघणाऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करतात)

यातील केवळ पहिलं कारण खरं आहे असं गृहीत धरलं तरी काहीजणांना पैकीच्यापैकी मार्क्स मिळाले म्हणजे पेपर सोपा आहे असा निष्कर्ष काढणं चूक आहे.

गेल्या शतकातील ख्यातनाम अर्थतज्ञ जॉन मेनार्ड केन्सने सांगून ठेवलंय की 'जे एका झाडासाठी योग्य ते संपूर्ण जंगलासाठीही योग्य ठरत नाही.' त्यामुळे आपल्या धंद्याला झटका बसला नाही म्हणजे अर्थव्यवस्था तेजीत आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे.

हे मान्य असेल तर पुढचे मुद्दे वाचताना तुमचं मन शांत असेल.

3) इंग्रजीतला शब्द आहे इकॉनॉमिक सायकल. बरेचदा सायकल शब्द वाचला की आपल्या मनात एक वर्तुळ येतं. पण इथे वर्तुळ अपेक्षित नसून वर खाली होणाऱ्या लाटांचं पुनरावर्तन अपेक्षित आहे.

लाटेचा वरचा बिंदू म्हणजे 'बूम किंवा सुबत्ता' तर लाटेचा खालचा बिंदू म्हणजे 'डिप्रेशन किंवा मंदी'.

मंदीतून वर उठणाऱ्या लाटेला म्हणायचं रिकव्हरी तर सुबत्तेकडून खाली घसरणाऱ्या लाटेला म्हणायचं रिसेशन.

4) बरं या लाटा एकाच उंचीच्या नसतात. त्यांची उंची कमीजास्त होऊ शकते. त्यामुळे कधी प्रगती संपणार नाही असा आशावाद तर कधी अधोगती संपणार नाही अशा स्थिती तयार होतात.

5)आणि त्याहून महत्वाचं म्हणजे सगळ्या लाटा एकाच समतल पृष्ठभागावर नसून त्या लाटाही चढणीवर किंवा उतरणीवर समाजाला पुढे नेत असतात. म्हणजे वर खाली हेलकावे घेत अर्थव्यवस्था उंचावर जाऊ शकते किंवा मग वरखाली हेलकावे घेत अर्थव्यवस्था रसातळाला जाऊ शकते.

6) वरखाली हेलकावे घेणारी अर्थव्यवस्था यशोशिखराकडे चालली आहे की रसातळाला, हे कसं कळणार? तर एक सोपा संकेत आहे. सलग दोन तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जर मागच्या तिमाहीपेक्षा कमी होत चालला असेल तर समजून जावे आपण रसातळाला जाण्यासाठी वळलो आहोत. रिसेशन सुरू झालं असं मानून सरकारने हातपाय हलवावेत. नाहीतर बैल गेला आणि झोपा केला अशी गत व्हायची.

थोडक्यात सांगायचं तर पावसाची एखादी सर आली म्हणजे लगेच घाबरून जाऊ नये पण लागोपाठ दोन दिवस पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी घराबाहेर पडताना रेनकोट छत्री घ्यायला विसरू नये.

7) आता यावर कुणी म्हणेल की दोन दिवस पाऊस आला म्हणून तिसर्‍यांदा येईलंच याची काय खात्री?

अगदी खरं आहे. पण काळजी घेतली की दुर्घटना टळते. रिसेशनमधून बाहेर पडणं डिप्रेशनमधून बाहेर पडण्यापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी कष्टप्रद आहे.

दोन तिमाहीत झालेली घट म्हणजे रिसेशन. आता अर्थव्यवस्था पुढे घसरणार की सावरणार ते बाह्य घटकांवर अवलंबून असतं. या बाह्य घटकांवर प्रभाव पाडणं हे एकेकट्या व्यक्तीचं काम नाही. एकेक कंपनी किंवा एकेक इंडस्ट्रीही तसं करु शकत नाही. मोकाट सुटलेल्या बाह्य घटकांना वेसण घालणं केवळ सरकारला शक्य असतं. जर सरकारने योग्य निर्णय घेतले तर दोन तिमाहीतील घसरण अर्थव्यवस्थेसाठी कातरवेळ न ठरता सुर्योदयापूर्वीची पहाट होऊ शकते.

योग्य निर्णय घेणं, ते कौशल्याने राबवणं ही दोन्ही कामं सरकारला करावी लागतात आणि त्यासाठी सरकारने Economics चे नियम सर्वशक्तिमान आहेत हे मान्य करणं आवश्यक असतं.

सर्वसामान्य नागरिकांनी सकारात्मक रहावे हे खरं असलं तरी सरकार अर्थव्यवस्थेला प्राधान्यक्रमात मागे टाकत असताना सर्वसामान्य माणसांनी सकारात्मक राहून रिसेशनचं संकट टळेल असं म्हणणं म्हणजे सर्जन नीरसपणे काम करत असताना अॉपरेशन टेबलवर भूल घेऊन पडलेल्या रुग्णाने सकारात्मक विचार केला की अॉपरेशन यशस्वी होईल असं मानण्यासारखं आहे.

इथे सरकारची जबाबदारी जास्त आहे. कारण सरकारकडे एकाच वेळी अनेक बाह्यघटकांना प्रभावित करण्याची शक्ती असते.

सरकारचे समर्थक किंवा विरोधक काहीही म्हणोत Economics चे नियम त्याप्रमाणे बदलणार नाहीत. सध्या जे आहे ती रिसेशनची सुरवात आहे असंच Economics सांगतंय. या विद्याशाखेला मूर्खात काढणाऱ्यांसाठी भारतीय अर्थशास्त्राच्या आद्यगुरुचा एक व्हिडिओ खाली देतो. 



या वेळची गोष्ट २००८ पेक्षा वेगळी आहे. थोडी जास्त कठीणही आहे. ती व्यवस्थितपणे हाताळून काळरात्र न होऊ देता उषःकाल घडवून आणण्यासाठी या सरकारला माझ्या शुभेच्छा.

चंद्रगुप्त विरुद्ध धनानंद

कुमारवयात होतो. रविवारी ही सिरीयल लागायची. सकाळी खेळायच्या वर्गाला जायचो. तिथून धावत पळत सिरीयल सुरु होण्याच्या वेळेत घरी पोहोचायची घाई असायची. पुढे याच्या डीव्हीडीचा सेट विकत घेतला. यातील मध्यवर्ती भूमिका करण्यासाठी दुसरा कलाकार घ्यायला हवा होता असं सुरवातीला वाटलं होतं पण नंतर मात्र त्या कलाकाराशिवाय अन्य कोणी त्या भूमिकेत बघणं अशक्य वाटू लागलं.

कित्येकदा याची पारायणं केली. यातलं अलक्सेंद्रने (Alexander) आपल्या सैन्याला उद्देशून केलेलं भाषण. संस्कृती म्हणजे काय ? ती का नष्ट होते? भाषा आणि परंपरांचा संस्कृतीच्या अमरत्वात काय हात असतो याबाबत चाणक्यने आपल्या शिष्यांना केलेलं मार्गदर्शन. पाटलीपुत्र सोडून जाणाऱ्या आचार्यांची मनधरणी करताना केलेला युक्तिवाद, इतरांची सरशी होते आहे म्हणून गांगरून गेलेल्या सहकाऱ्यांचं मनोबल वाढावं म्हणून केलेलं भाषण, पौरवराज आणि चाणक्यची जुगलबंदी, अमात्य राक्षस आणि चाणक्यची जुगलबंदी; या सगळ्यावर मी तासंतास बोलू शकतो. यातलं 'हम करे राष्ट्र आराधन' हे गाणं अतिशय आवडतं होतं आणि अजूनही आहे.

जेव्हा धनानंद राजगादीवरून पायउतार होतो तेव्हाचा चाणक्य आणि धनानंद यांच्यातील संवाद म्हणजे या सगळ्यावर कळसाध्याय आहे. माझ्या काही डाव्या मित्रांना मी हा संवाद ऐकायला दिला.तेव्हा त्यांनी चाणक्यशी संबंधित काहीही बघण्यात रस नाही असं सांगून हा संवाद ऐकण्यास नम्रपणे नकार दिला.

संवाद याप्रमाणे आहे. (पहिल्या कमेंटमध्ये संवादाची लिंकही देतो. संवाद १:३० मिनिटाला चालू होतो)

---
धनानंद : महाअमात्य ! क्या तुम विजयी हुए ?

चाणक्य : नही सम्राट । शासक कि पराजय में शिक्षक कि विजय नही हो सकती । कहीं कोई विष्णुगुप्त चूक गया था इसलिये आज किसी धनानंद को पराजित होना पड रहा है । यह विजय शिक्षक के लिये उपलब्धी नही हो सकती ।

धनानंद : यह तथाकथित विजेताओंका दर्शन बोल रहा है ? या एक शिक्षक का आदर्श ?

चाणक्य : जो आदर्श यथार्थ ना हो, वह शिक्षक का दर्शन नही हो सकता ।

धनानंद : तुम सच कह रहे हो विष्णुगुप्त ! जो दर्शन तुम्हारा नही वह यथार्थ और आदर्श नही हो सकता ।

चाणक्य : सच कह रहे हें सम्राट । सत्य कि परिभाषा भी हर व्यक्ती के लिये भिन्न भिन्न होती है ।

धनानंद :तुम्हारे सत्य कि परिभाषा क्या है ? जो जितना ज्यादा जोरसे कहे वह सच है ? या जो जितने ज्यादा लोग कहे वह सच है ? सच तो यह है विष्णुगुप्त, कि तुम विजयी नही हुए । सच यह है कि मै पराजित नही हुवा ।

चाणक्य : मै जानता हूं सम्राट कि मरने से मृत्यूपर विजय नही होती । धनानंद के मरने से धनानंद पर विजय नही हो सकती । मार्ग के एक कंटक से मुक्ती पानेसे मार्ग निष्कंटक नही हो जाता । पर इससे विष्णुगुप्त का प्रवास थम नही जाता । यदी कोई धनानंद उग्र होगा तो कोई लघु विष्णुगुप्त भी रुद्र होगा । मेरा कार्य हि जागना और जगाना है सम्राट ।

धनानंद : किसे जगाओगे तुम विष्णुगुप्त ? इस सोये हुए समाज को ? या उसे जो विचारोंका आधार लिये आसन पे आयेगा और समय के साथ स्वयं को सम्राट धनानंद पायेगा । वही मुझे फिरसे जन्म देंगे ।


---
काय दणदणीत संवाद आहेत !

ही सिरियल उजव्या विचाराच्या लोकांमधे फार लोकप्रिय होती. त्यामुळे माझे उजवे मित्र हा व्हिडीओ अगदी नक्की बघतील याची मला खात्री आहे. पण ज्याप्रमाणे डाव्या मित्रांनी तो पाहिलाच नाही त्याप्रमाणे उजवे मित्र तो पाहूनही त्यात चाणक्यने मांडलेला विचार समजून घेतील याची मला खात्री नाही.

चाणक्य आणि धनानंद स्पष्टपणे मांडतात की धनानंद ही एक प्रवृत्ती आहे. झोपलेल्या समाजामुळे विचारांचा आधार घेऊन राजगादीपर्यंत पोहोचलेला मनुष्यदेखील शेवटी स्वतःला धनानंद बनलेला पाहतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे मला याचा लागलेला अर्थ इतकाच आहे की समाज झोपलेला असला की शुद्ध विचारांनी प्रेरित राज्यकर्तादेखील शोषक होतो. त्यांना विचारांच्या कक्षेत ठेवण्यासाठी गादीवर न बसणाऱ्या चाणक्यांची गरज असते. जे समाजालादेखील जागं करतील आणि धनानंद या प्रवृतीलादेखील मोकाट सुटू देणार नाहीत.

अर्थात नवीन युगाचे हे आधुनिक चाणक्य कोण? ते ठरवणं जरा कठीण आहे. ज्याला जास्तीत जास्त लोक आधुनिक चाणक्य म्हणतात तो, की जो स्वतः जोरजोरात आपली बाजू मांडतो तो, की ज्याला पदाची कुठलीही अपेक्षा नसताना जो आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडत राहतो तो ? हा प्रश्न आपण ज्या प्रकारे सोडवू त्यावरून आपल्या समाजाचं भविष्य ठरेल.

कलम ३७०

जाहिरनाम्यात सांगितलेला एक मुद्दा पूर्ण केल्याबद्दल सरकारचं अभिनंदन.

लहानपणी मला प्रश्न पडायचा की नारदमुनी भेटायच्या आधी जर वाल्या कोळ्याच्या बायकोने त्याला प्रश्न विचारला असता की, 'बाबारे, तू हे जे काही रोज पैसे घरी आणतो आहेस, त्यासाठी तू नक्की कुठलं काम करतो आहेस?'

त्यावर 'मी वाटमारी करतो आहे' असं खरं उत्तर वाल्याने दिलं असतं तर बायकोची प्रतिक्रिया काय झाली असती?

तिने त्याच्या व्यवसायाला संमती दिली असती? की 'मी हवं तर भाकरतुकडा खाईन पण तुमची पापाची पक्वान्नं नकोत मला' असं वाल्याला सांगितलं असतं?

जर तिने स्वतःहून वाल्याला पापाचरण करण्यापासून परावृत्त केलं असतं तर वाल्याने तिला जुमानलं असतं की तिला टाकून देऊन त्याच्या व्यवसायात आनंद मानणारी किंवा 'गुठलिया गिने बिना आम खाणारी' नवीन बायको शोधली असती?

किंवा मग जर दशरथासारख्या वाल्यालापण दोन तीन बायका असत्या. उत्तानपादाच्या बायकांप्रमाणे त्यांची नावं सुरुची व सुनीती असती. त्यातल्या सुनीतीने वाल्याला वाटमारीपासून परावृत्त करायचा प्रयत्न केल्यावर, सुरुचीने वाल्याची पाठराखण केली असती तर वाल्याने कुणाचं ऐकलं असतं? नेहमीप्रमाणे सुनीती नावडती आणि सुरुची आवडती ठरली असती? की वाल्याला सुनीतीचं ऐकावंसं वाटलं असतं?

आणि जर वाल्याने सुनीतीचं ऐकायचं ठरवलं असतं तर सुरुची आणि तिच्या माहेरच्यांनी वाल्याला षंढ ठरवून त्याची निर्भत्सना केली असती की सुनीतीचे पाय धरले असते?

२००८ मधे जेव्हा सत्यमचा घोटाळा उघडकीस आला तेव्हा प्रश्न पडला की खरंच इतका मोठा घोटाळा एकट्या रामलिंग राजूने कुणालाही काहीही कळू न देता केला असेल का? नियम तुटत आहेत हे कुणालाच दिसलं नसेल का? कुणीच त्याला आक्षेप घेतला नसेल का? ज्यांनी आक्षेप घेतला असेल त्यांना नेभळट ठरवून बाजूला काढलं असेल का?

कंपनी कायद्यातील Oppression and Mismanagement च्या संकल्पना शिकवताना मुलं विचारतात की या कलमांची गरज काय? कुठलाही एक गट कंपनीतील अल्पभागधारकांची गळचेपी का करेल? तेव्हा मी नेहमी सांगतो की 'Spiderman also needs to be told that with great powers come great responsibilities'.

सत्ताधाऱ्यांनी नियम पाळावेत ही अपेक्षा करणारे कायम मूर्खात काढले जातील का? 'जरा सबुरीने घेतलं तर चालेल' हा सल्ला, शिर्डीवाले साईबाबांचे अगणित भक्त असणाऱ्या देशात मूर्खपणाचा ठरेल का? सुनीतीचा आग्रह धरणारे नेभळट आणि देशद्रोही ठरतील का? यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं सार्वकालिक आहेत हेच काल जाणवलं.

सुनीती मिथ आहे. सुरुची सत्य आहे. We all love people who are riding tiger. Not just that we love people who will help us ride a tiger although no one knows how to get off the same.

भांडवलशाही असो वा साम्यवाद, हुकूमशाही असो वा लोकशाही, आस्तिकांचा असो वा नास्तिकांचा समूह, धार्मिकांचा असो वा निधर्मींचा समूह; सुनीतीची जागा फक्त देव्हाऱ्यात बसण्याची. लाडाने मांडीवर बसणार फक्त सुरुची आणि तिची लेकरं.

बैल गेला अन् झोपा केला

काश्मीरबाबत आणि इतर अनेक बाबतीत सरकार कसे चालवायचे त्याबाबतीत १९४७ मधील सरकारच्या विरोधकांच्या काय भावना असतील?

हे आपल्या मताचं सरकार नाही पण हा आपला देश आहे, ही भावना त्यांच्या मनात असेल का?

हे आपल्या मताचं सरकार नाही म्हणून या सरकारच्या धोरणांवर सनदशीर मार्गाने प्रभाव टाकण्याचा आपण प्रयत्न करू किंवा सनदशीर मार्गाने आपल्या मताचं सरकार यावं म्हणून आपण प्रयत्न करू या दोन मार्गांपैकी एका मार्गाचा अवलंब त्यांनी केला असेल. त्यांनी दुसऱ्या मार्गास अधिक पसंती दिली हे माझं मत महत्वाचं नाही. कारण आपल्या मताचे सरकार यावेसे वाटणे यात काही गैर नाही. विरोधी पक्ष असावा इतकी आपली घटना प्रगल्भ असली तरी आपलं समाजमन तितकं प्रगल्भ नाही.

प्रश्न आहे तो विद्यमान सरकारचा विरोध करणाऱ्या पक्षांचा आणि त्यांच्या समर्थकांचा. आपल्या मताचं सरकार यावं म्हणून केवळ निवडणुकांच्या वेळी अतीव विरोध करुन काम होईल असं मला वाटत नाही. आपलं मत नक्की काय आहे? आपल्याला कसा भारत हवा आहे. आपण सत्तेवर आल्यावर कुठली ध्येयधोरणे राबवणार आहोत याबद्दल जर ते स्पष्ट नसतील, तर भारतात एकपक्षीय लोकशाही लागू झाली आहे असं समजायला आता हरकत नाही.

जर सरकारविरोधी प्रस्थापित पक्ष हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले असतील, त्यांचे नेते हतबल झाले असतील तर त्यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यांचा अनुनय थांबवून आपली मते निवडणूक नसलेल्या काळातही मांडत राहिले पाहिजे. भाषा संयत आणि विचार सुस्पष्ट ठेवले पाहिजेत. वैयक्तिक आयुष्यात यशस्वी झाले पाहिजे. यश मिळवताना शक्य तितक्या प्रमाणात साध्य साधन विवेक ठेवला पाहिजे आणि ते करताना आपण कट्टर किंवा खोटारडे किंवा दोन्ही होत नाही आहोत इथेही लक्ष दिले पाहिजे.

सरकार काश्मीरबाबत कमालीची गुप्तता बाळगत नवीन निर्णय घेत आहे. अनेक बाबतीत सरकार नवीन कायदे आणि नवीन संकल्पना राबवण्यासाठी पावले टाकत आहे. समर्थकांचा उन्माद वाढणार आहे. अशावेळी विरोधकांची आणि सामान्य नागरिकांची अचूक भूमिका देशाला पुढे नेऊ शकते.

१९४७ पासून विरोधात असलेल्यांनी तत्कालीन सरकारच्या चुका हेरत आणि आपली बलस्थाने सांभाळत प्रगती केली आहे. आता बहुपक्षीय लोकशाही वाचवण्याची जबाबदारी टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न ते करणारंच. त्यामुळे विरोधकांची जबाबदारी जास्त आहे. बैल गेला अन् झोपा केला ही म्हण सार्थ करण्याची ही वेळ नाही.

कुत्रा आणि आयुष्याचं प्रयोजन

सकाळी क्लासला पोचलो. कारमधून उतरलो. बॅग काढत होतो. पायाजवळ कुणीतरी आहे असं वाटलं. बघितलं तर गळ्यात पट्टा बांधलेला कुत्रा. मी बॅग घेतली. निघालो. कुत्रा माझ्याबरोबर निघाला.

थोडा पुढे गेलो आणि आठवलं की बहुतेक काचा वर करायच्या राहिल्यात. मागे वळलो. कुत्राही वळला. कारपर्यंत गेलो. खरंच मागच्या काचा वर करायच्या राहिल्या होत्या. गाडी चालू करताना खाली केलेल्या काचा नंतर एसी चालू करताना वर करायला विसरलो म्हणजे आपण absent minded professor बनत चाललो आहोत हे जाणवून एकाच वेळी हसूही आलं आणि दुःखही झालं. कुत्र्यानेही एक डोळा बारीक आणि एक डोळा मोठा करुन माझ्या भावनांना साथ दिली.

काचा वर करुन पुन्हा क्लासकडे वळलो. तर कुत्राही माझ्यासोबत निघाला. बारीक डोळा तसाच होता. मग मला जाणवलं की मगाशी तो माझ्या हर्ष खेदाच्या भावनांशी तद्रूप झाला नसून त्याचा एक डोळा बारीकंच असावा. किंवा मग त्याचा मालक रोज सकाळी आस्था चॅनेल बघून कपालभाती / सिंह आसन वगैरे करत असताना कुत्र्याने 'मी तर कायम जीभ बाहेर काढून असतो. त्यामुळे सिंह आसन माझ्यासाठी नसून, बहुतेक डोळा बारीक करण्याचं आसन माझ्यासाठी आहे' असा विचार केला असावा.

कुत्रा बरोबर का चालत असावा त्याचा विचार करताना मला Dark Knight मधला जोकर आठवला. I am like a mad dog chasing cars, I wouldn’t know what to do if I caught one, you know, I just do…things.
 


मग वाटलं, 'बरंय आपल्याला काय करायचं आहे ते माहिती आहे. नाहीतर आपणही मॅड डॉग झालो असतो.'

नंतर वाटलं पुढे काय करायचं ते कुत्र्याला माहिती नाही असं आपण ठरवतो. कदाचित कुत्र्याला कारचा पाठलाग शक्य तोवर करायचा असेल. त्याचं प्रयोजन अल्पकालीन आणि आपलं दीर्घकालीन आहे त्यामुळे आपलं प्रयोजन श्रेष्ठ ठरत नाही. कारण अजून वीस एक वर्ष क्लास चालवल्यावर पुढे काय करायचं आहे ते मलातरी कुठे माहिती आहे? म्हणजे एका अर्थाने मी आणि तो रामदेव बाबाचा चतुष्पाद शिष्य सारखेच. फक्त आम्हा दोघांना चालायला / पळायला लावणाऱ्या प्रयोजनचा काळ कमीजास्त आहे. तो साक्षात्कार झाला आणि ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवल्यानंतर बघणाऱ्यांना जे वाटलं असेल तशी माझ्या मनाची अवस्था झाली.

त्याच अध्यात्मिक अवस्थेत मी कुत्र्याकडे अतीव प्रेमाने पाहिलं. त्यानेही लहानमोठ्या डोळ्यातून माझ्याकडे तसंच पाहिलं. मनात म्हटलं यालाही तीच अनुभूती झाली असेल की काय? त्यालाही माझ्याकडे बघून तसाच प्रश्न पडला असेल असं वाटून मला हसू आलं. मग Life of Pi मधल्या Pi च्या वडिलांनी प्राण्यांच्या डोळ्याबद्दल सांगितलेला सल्ला आठवला.

मग मला युधिष्ठिराच्या स्वर्गारोहणाची गोष्ट आठवली. पण मी हिमालयात चालत नसून क्लाससाठी चालत असल्याने आणि मला चार भाऊ नसल्याने शिवाय माझ्याकडे भाकरतुकडा नसल्याने मी याबद्दल फार विचार करणं टाळलं. मी विचार करणं टाळल्यावर कुत्र्यानेही टाळलं असावं कारण त्याने चालण्याचा वेग कमी केला आणि मला एकट्याला पुढे जाऊ दिलं. वळून बघितलं तर त्याला दुसरं प्रयोजन सापडलं होतं. एका सुस्वरूप ललनेच्या बाजूने चालण्यात तो मग्न झाला होता. म्हटलं युधिष्ठिराच्यावेळी हिमालयात सुस्वरूप ललना नव्हती म्हणून त्या कुत्र्याला स्वर्गात प्रवेश मिळाला. नाहीतर कदाचित पुन्हा दुसऱ्या कुणाबरोबर शेपूट हलवत फिरत राहिला असता.

कुत्रा गेला आणि मी आज शिकवायचा टॉपिक, रिटायरमेंट अॉफ पार्टनरचा विचार करायला मोकळा झालो.

पुढची वीस वर्षे काय करायचं ते माहिती असल्याने मला धावण्यापासून / चालण्यापासून / शिकवण्यापासून बाजूला होता येणार नाही. नंतर कदाचित माझा त्यातला रस संपेल आणि मग ज्या सहजतेने त्या रामदेवबाबाशिष्याने माझ्याबरोबर आज चालणं सोडलं त्या सहजतेने मीही शिकवणं सोडीन. दुसऱ्या कुठल्यातरी प्रयोजनामागे लागेन. फक्त शिकवण्यातला माझा रस संपायच्या आत विद्यार्थ्यांचा माझ्यातला रस संपू नये हीच इच्छा.

एका कुत्र्याने माझ्यासारख्या absent minded professor ला इतकं सगळं इतक्या चटकन शिकवलं म्हणून मला दत्तगुरुंबरोबरच्या चार कुत्र्यांना चार वेद का म्हणत असावेत ते कळलं.

What do you do ?

दोन वर्षांपूर्वी माझा मित्र सुयशने Everyday Heroes की असंच काहीतरी नावाच्या एका फेसबुक पेजची पोस्ट शेअर केली होती.

अमेरिकेतील PBS टेलिव्हिजन नेटवर्कवर लहान मुलांसाठी कार्यक्रम करणाऱ्या एका निर्मात्याचं सरकारी बजेट निम्मं करण्याचा निर्णय निक्सन सरकारने घेतला होता. त्याविरुद्ध दाद मागायला तो निर्माता कॉंग्रेसच्या कमिटीपुढे गेला. त्याला केवळ पाच मिनिटं मिळाली होती स्वतःची बाजू मांडायला.

अतिशय शांत संथ सुरात एक एक शब्द सुटा बोलणाऱ्या त्या माणसाने शेवटी आपल्या कार्यक्रमातील एक कविता म्हणून दाखवली. ती अशी,

What do you do with the mad that you feel
When you feel so mad you could bite?
When the whole wide world seems oh, so wrong...
And nothing you do seems very right?

What do you do? Do you punch a bag?
Do you pound some clay or some dough?
Do you round up friends for a game of tag?
Or see how fast you go?

It's great to be able to stop
When you've planned a thing that's wrong,
And be able to do something else instead
And think this song:

I can stop when I want to
Can stop when I wish
I can stop, stop, stop any time.
And what a good feeling to feel like this
And know that the feeling is really mine.
Know that there's something deep inside
That helps us become what we can.
For a girl can be someday a woman
And a boy can be someday a man.

त्याच्या त्या पाच मिनिटाच्या उत्तराचा प्रभाव इतका तात्काळ आणि सकारात्मक होता की बजेट कमी करण्याचा निर्णय रद्द झाला.

सुयशने शेअर केलेल्या पोस्टमधील कविता ऐकून माझेही डोळे पाणावले. तेव्हा मीही ती पोस्ट शेअर केली होती.

आज चित्रपटांवर आणि चित्रपटांच्या विविध अंगांवर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या अक्षय शेलार या मित्राने टॉम हॅंक्सच्या A Beautiful Day in the Neighbourhood या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. ट्रेलर बघताना सुयशच्या पोस्टची आठवण आली. थोडी शोधाशोध केली आणि खात्री पटली की हा चित्रपट त्याच माणसाच्या आयुष्यावर काढलेला आहे.

Fred Rogers. मुलांमधे आत्मविश्वास वाढावा म्हणून झपाटलेला माणूस. स्वतःच निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार. पपेट शो आणि एकपात्री प्रयोग करून 900 हून अधिक टिव्ही कार्यक्रम करून अनेक अमेरिकन मुलांना सकारात्मकता शिकवणारा माणूस. असं म्हणतात (या घटनेची खातरजमा केलेली नाही) की त्याची कार चोरणाऱ्या चोराने पुन्हा आणून दिली आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली की 'माफ करा. पण ही गाडी तुमची आहे हे माहिती असतं तर कधी चोरली नसती'.

अशा या अतिशय लोकप्रिय माणसाचा जीवनपट रुपेरी पडद्यावर येणार आहे आणि त्याची भूमिका माझा आवडता टॉम हॅंक्स करणार आहे ही खरंच फार छान बातमी आहे.

आज टिव्हीवर मुलं जे कार्यक्रम बघतात त्याबद्दल विचार केला तर आपल्यालाही एका फ्रेड रॉजर्सची गरज आहे हे नक्की.

ही आहे कॉंग्रेससमोरील फ्रेडच्या भाषणाची लिंक आणि चित्रपटाचं ट्रेलर.


एका महत्वाच्या व्यक्तीचं मनोगत

इस्रोच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांचं मनःपूर्वक अभिनंदन करुन थोडी गंमत करतो.

दिवसा उडवणार असं कळलं आणि मला टेंशनच आलं. सूर्ययान असेल आणि दिवसा उडवलं तर ठीक. पण हे तर चंद्रयान मग रात्री उडवायला हवं.

मी लगेच इस्रोला ईमेल केलं. आता माझ्याकडून ईमेल म्हटल्यावर त्यांनी लगेच प्रक्षेपण थांबवलं. तांत्रिक अडचणीची सबब जगाला सांगितली आणि सगळे तंत्रज्ञ लागले विचार करायला. काहींनी आपापल्या लाडक्या बाबांचा धावा केला तर काहींनी बालाजीचा. प्रश्न सुटेपर्यंत बाबांना पाण्यात ठेवावं अशी कल्पना काहींनी सुचवली तर अन्य काहींनी बालाजीला पाण्यात ठेवायची युक्ती सुचवली. बाबांपेक्षा बालाजी आकाराने लहान असल्याने बालाजीलाच पाण्यात ठेवण्यावर एकमत झालं. काही बाबांनी रोखून धरलेला श्वास सोडल्याचं ऐकू आलं असंही काहीजण म्हणाले. बालाजीच्या श्वासाबद्दल काही कळलं नाही.

कुणी सुचवलं की श्रीहरिकोट्याला रात्रीच्या ठिकाणी हलवू पण पृथ्वी फिरत असल्याने आपण श्रीहरिकोट्याला तिथे घेऊन जाईपर्यंत तिथे दिवस उजाडला तर सगळंच मुसळ केरात म्हणून तो विचार बदलला. मग कुणी म्हणालं की श्रीहरिकोट्याला एक मोठं कव्हर घालूया. पण तसं केलं तर कव्हरमुळे चंद्र दिसणार नाही म्हणून ती योजनाही बारगळली. कुणाला काही सुचेना.

इथे मीही विचार करत होतोच. शेवटी रात्रीच्या प्रक्षेपणात अंधाराची अडचण येऊ नये म्हणून श्रीहरीकोट्याच्या यानतळासाठी एल ई डी बल्ब पंतप्रधान प्रकाश योजनेतून मागवायचं ठरु लागलं. त्यामुळे पूर्ण प्रोजेक्टची किंमत वाढणार याची काळजी सर्वांच्या चेहऱ्यावर दाटून आली.

चीफ मला फोनवर म्हणाले सर काहीतरी मार्ग काढा. करदात्यांचा पैसा वाचला पाहिजे.

मग मी गणित केलं. तेच माझं आवडतं गणित. आणि आताही मला 2ab सापडला.

मी म्हणालो काळजी नको. दुपारी उडवा. लाईटची गरज नाही. वर जाईपर्यंत संध्याकाळ होईल आणि पोचेपर्यंत रात्र होईल. बेनिफीट होऊन जाईल.

मग काय दिलं उडवून.

अजून काय हवं आयुष्यात

आवडत्या माणसांबरोबर संध्याकाळ छान जावी. मग वाढदिवसाला मिळालेलं पुस्तक वाचता वाचता रात्री लवकर झोपावं. त्यामुळे पहाटे साडेतीनलाच जाग यावी. मग फेसबुक चाळताना जिवलग मित्राने शेअर केलेल्या एकाच कृष्णभजनाच्या तीन सादरीकरणाच्या लिंक्स दिसाव्यात. घरातले सगळे झोपले आहेत म्हणून लवकर पाच वाजायची आपण वाट पहावी.

पाच वाजताच आधी ते भजन ऐकावं. मग मद्रास क्वार्टेट ने सादर केलेली त्याच भजनाची लिंक उघडावी. ते ऐकून मन तृप्त होत असताना खाली युट्यूबने सजेस्टेड व्हिडिओमधे पद्मश्री डॉ काद्री गोपालनाथ यांच्या एका प्रयोगाची लिंक दाखवावी. आपल्याला सॅक्सोफोनमधलं काही कळत नाही हे माहिती असूनही त्या फोटोत एक तबलावादक आणि एक मृदुंगवादक दिसतो म्हणून आपण ती लिंक ओपन करावी आणि भारतीय तालवाद्यांनी आपली पहाट, आपलं घर आणि आपलं मन भारुन टाकावं.

मृदुंगम् वादक श्री. बी. हरिकुमार आणि तबला वादक श्री. राजेंद्र नाकोडा या दोघांनी आपल्याला घडवून आणलेल्या दैवी स्पर्शामुळे डोळ्यातून घळाघळा पाणी वहावं. युट्यूबवरील कमेंट्स वाचताना एका कमेंटकर्त्याने 'That man playing mrudungam resembled a lion... His music roared' केलेली कमेंट वाचून. आपण काहीच केलेलं नसताना केवळ तालवाद्य आवडतात म्हणून आपण उगाचंच खूष व्हावं.

आणि मग इथे येऊन पोस्ट टाईप करताना; संध्याकाळ छान करणाऱ्यांना, वाढदिवसाला पुस्तक भेट देणाऱ्यांना, कृष्णभजन शेअर करणाऱ्या मित्राला, युट्यूबच्या अल्गोरिदम् ला की संगीतस्वर्ग उभा करणाऱ्या त्या गंधर्वांना, की ती सुंदर कमेंट करणाऱ्या श्रोत्याला; यापैकी कुणाला धन्यवाद द्यावेत तेच न कळावं. आणि बाकी काही नसून इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत म्हणजे आपण भाग्यवान आहोत यावर आपला विश्वास बसावा. अजून काय हवं आयुष्यात?


गुरुपौर्णिमेचा चिमटा

जीवनाचं प्रयोजन काय? ते कसं जगावं? त्याचं साफल्य कशात असतं? यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नसताना; जेव्हा केवळ शिक्षकी पेशा स्विकारला म्हणून आपल्यासारख्या पोटार्थ्याला आपले विद्यार्थी 'Happy Guru Pournima Sir' , असं म्हणतात तेव्हा नाही म्हटलं तरी गहिवरायला होतं.

'अरे मी गुरु नाही. मी शिक्षक. मला 5 सप्टेंबरला शुभेच्छा द्या', वगैरे सांगून आपण दाटलेला कंठ आवरतो.

तोच आपले शाळेतले समवयस्क मित्र 'गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा' म्हणून शाळेच्या ग्रुपवर मेसेज पाठवतात. तेव्हा उगाच आपली कॉलर ताठ होऊन सुखावायला होतं. त्यांनाही आपण 'कसचं कसचं' वगैरे म्हणत आपल्या विनयशीलतेचं शाळेच्या ग्रुपवर प्रदर्शन मांडतो. असा मान मिळाला म्हणून आणि आपल्या विनयशीलतेचं प्रदर्शन करता आलं म्हणून आपण गुरु पौर्णिमेची प्रथा सुरू करणाऱ्या आपल्या पूर्वजांचे मनातल्या मनात आभार मानतो.

त्याच आनंदात, आलेल्या नवीन शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जेव्हा आपण व्हॉटस अॅप उघडतो आणि शाळेतली मैत्रिण, जी अजूनही सुंदर खाशी सुबक ठेंगणी वगैरे कॅटेगरीत आहे, जी इतर सर्व मित्रांना नावाने हाक मारते ती देखील 'मोरे सर तुम्हाला गुरु पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा' असा मेसेज त्याच ग्रुपवर टाकून आपल्याशी झालेल्या पहिल्याच जाहीर संवादात आपल्याला परकं करुन टाकते. तेव्हा आपल्यातला शिक्षक जागा होऊन 'धन्यवाद. पण पोर्णिमा नव्हे पौर्णिमा.' असा रिप्लाय देऊन आपण तो ग्रुप सोडतो.

त्यानंतर मात्र गुरु पौर्णिमेची प्रथा सुरू करणाऱ्या आपल्या पूर्वजांबद्दल आपल्याला वाटणारा आदर एका झटक्यात कमी होतो खरा.

माझा गॉगल

माझ्या लहानपणी गॉगल ही फक्त श्रीमंतांनी घालायची गोष्ट होती. त्यामुळे मी श्रीमंत होण्याच्या मागे लागलो. बाबा म्हणाले श्रीमंत होण्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो. म्हणून रात्र रात्र जागून अभ्यास करु लागलो. नंतर रेबॅनचा गॉगल घेण्याइतके पैसे कमवू लागल्यावर लक्षात आलं की आपल्याला सतत घालावा लागणारा चष्मा लागलेला आहे. त्यामुळे, आणि एकंच नाक व दोनंच डोळे असल्यामुळे, नाकावर ठेवायचा डोळ्यांचा तो दागिना, माझ्या आयुष्यात न येण्याची शक्यता पक्की होत चालली होती.

पण आपण पसंत केलेल्या ध्यानाला सजवावं असं माझ्या 'नैनोमें सपना सपनोमें सजना' गाणं म्हणणारीने ठरवल्यामुळे माझ्या आयुष्यात रेबॅन आला.

तो घालून गोव्याच्या समुद्रात बागडत असताना, त्या रत्नाकराला माझ्याशी खेळावसं वाटलं. म्हणून त्याने पाठवलेल्या एका मोठ्या लाटेला मी धीरोदात्तपणे सामोरा गेलो असताना गडबड झाली. लाट ओसरली पण जाताना माझा गॉगल आणि धीरोदात्तपणा दोन्ही घेऊन गेली.

'साक्षात रत्नाकराला तू दिलेलं रत्न इतकं आवडलं की तो ते घेऊन गेला ' वगैरे कामचलाऊ वाक्य मी किनाऱ्यावरील गृहलक्ष्मीकडे बोललो, तेव्हा तिने जो कटाक्ष टाकला तो पाहून मला गोव्याच्या त्या समुद्रकिनारी आपोआप 'ताथैया ताथैया हो... दुम् तननन दुम् तननन' असं पार्श्वसंगीत ऐकू येऊ लागलं. तसंच, लक्ष्मी आणि हलाहल दोघेही सहोदर आहेत याबद्दल मला खात्री पटली.

नंतर कधी गॉगल माझ्या वाटेला गेलेला नाही आणि मीही फिट्टं फाट करून त्याच्या वाटेला गेलेलो नाही.

Stiff Upper Lip

मराठी माध्यमातून शिकणाऱ्या आणि मराठी वस्तीत रहाणाऱ्या मुलांच्या आयुष्यात इंग्रजी पुस्तके जशी उशीरा येतात तसंच माझंही झालं. अगदी कॉलेजात गेलो तरी माझा पिंड मराठी लेखकांच्या लेखनावर आणि इंग्रजी लेखकांच्या मराठीतील अनुवादावर पोसला जात होता. त्यामुळे हा बाबा माझ्या आयुष्यात येण्याची शक्यता अजिबात नव्हती.

माझ्यावर ज्यांनी गारुड केलं त्या पुलंनीही याच्यावर एक लेख लिहिला होता. तो लेख इयत्ता आठवीत समोर येऊनही का कुणास ठाऊक पण तो सोडून पुलंच्या त्या पुस्तकाची पारायणं केली होती.

नंतर सीए करायला लागलो. इंग्रजी माध्यमात शिकलेली प्रेयसी आयुष्यात आली. तिने इंग्रजीत वाचलेली पुस्तकं मराठीत अनुवादित स्वरूपात उपलब्ध असल्याने आणि मी ते अनुवाद वाचलेले असल्याने माझी कॉलर ताठ ठेवणं मला सोपं गेलं होतं. पण 'शिखरावर पोहोचणं सोपं, तिथे टिकणं अवघड' या नियमाप्रमाणे प्रेयसीवर छाप पाडणं सोपं पण तिची निवड उत्कृष्ट आहे याची तिला सातत्याने खात्री पटवत रहाणं अवघड असतं. त्यामुळे मी इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीतला आळस झटकला आणि इंग्रजी पुस्तकं इंग्रजीत वाचायच्या मागे लागलो.

डोंबिवलीत फ्रेंड्स लायब्ररीत माझं खातं होतं. तिथे इंग्रजी पुस्तकांचा भाग मर्यादित होता. जेम्स हॅडली चेसच्या पुस्तकांची मुखपृष्ठ समंथा फॉक्स आणि इतर ललनांच्या अर्ध अनावृत्त फोटोंचं आवरण घेऊन असल्याने आमच्या चाळीतल्या घरात तीर्थरूपांसमोर वाचणं अशक्य होतं. सिडनी शेल्डन, जेफ्री आर्चर मराठीत वाचून झाले होते. त्यामुळे आमच्या फ्रेंडस लायब्ररीत माझ्या इंग्रजी वाचनासाठी अतिशय तुटपुंजे पर्याय उपलब्ध होते. मग एक दिवस घाईघाईत दोन पूर्ण पोषाखातील पुरुषांचं चित्र मुखपृष्ठावर असलेलं पुस्तक घेऊन घरी आलो. लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव, काही न बघता केवळ घरी स्वीकार होईल असं मुखपृष्ठ आहे म्हणून आणलेल्या त्या पुस्तकाने माझ्या सीएच्या अभ्यासाचं ओझं इतकं सहजगत्या हलकं केलं की ज्याचं नाव ते. शिवाय प्रेयसी आणि तिची बहीण दोघी 'अय्या, कित्ती हुश्शार आहे हा मुलगा' अशा नजरेने बघू लागल्या ते वेगळंच. तीर्थरुपांच्या करड्या नजरेचा एक अनपेक्षित फायदा झाला तो असा.

त्यानंतर हा बाबा माझ्या आयुष्यात आला तो कायमचा. मग एकदा पुन्हा पुलंचं ते पुस्तक समोर आलं. त्यातला तो मी नेहमी काणाडोळा केलेला लेख समोर आला. यावेळी मात्र तो वाचला. जेव्हा पुलंना आपण विनोदी लेखन करतो याचा थोडाफार गर्व होतो तेव्हा ते या माणसाचं कुठलंही पुस्तक हातात घेतात, कुठल्याही पानावरून सुरुवात करतात आणि एखाद्या वाक्यातंच हा बाबा त्यांचं गर्वहरण करतो हे कळल्यावर आपली आवड फार छान आहे यावरचा विश्वास वाढला.

नंतर मुंबईत फिरत असताना टेलिग्राम अॉफिससमोरच्या रस्त्यावरच्या जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्याकडे त्याचा फोटो असलेलं पुस्तक मिळालं म्हणून अत्यंत आनंदाने विकत घेतलं आणि त्याकाळच्या व्हिटी स्टेशनवरच्या पीसीओ बूथवरुन प्रेयसीला फोन करून आनंद शेअर केला होता, ते अजूनही आठवतंय.

त्याचा फोटो त्याच्या ब्रिटिश वंशाला साजेसा होता. स्टिफ अप्पर लिप. बघून कुणाला वाटणार नाही की याला प्रेमाने अख्खं जग प्लम म्हणून ओळखतं आणि याने इंग्रजी भाषिक जगाला आपल्या विनोदाने खळखळून हसवलंय आणि अजूनही हसवतो आहे.


प्लम ऊर्फ पी जी वुडहाऊस म्हणजे इंग्रजी साहित्यातील विनोदाचं झळाळतं पान. अक्षरशः शेकड्याने ग्रंथापत्य प्रसवणारी त्याची लेखणी अजोड आहे. बर्टी वूस्टर आणि जीव्हज्, स्मिथ (ज्याच्या आडनावाच्या सुरवातीला P असतो) मि. मुलीनर, लॉर्ड एम्सवर्थ, उल्क्रिज हे सगळे वुडहाऊसचे मानसपुत्र आपापल्या आयुष्यात जी धमाल उडवत असतात ती वाचणं हा शब्दातीत आनंद आहे.

फ्रेंड्स लायब्ररीत हाताला लागलेलं याचं पहिलं पुस्तक बर्टी वूस्टर आणि जीव्हज् चं असल्याने मला या दोघांवरची पुस्तकं त्याच्या इतर मानसपुत्रांपेक्षा जास्त आवडतात.

हा बर्टी वूस्टर, पहिल्या महायुद्धापूर्वीच्या इंग्लंडात रहात असतो. उमराव घराण्याशी संबंध असल्याने याला उपजीविकेसाठी काही कामधंदा करावा लागत नाही. याच्या अगाथा (कजाग) आणि डालिया (प्रेमळ) अशा दोन काकवा (किंवा मावश्या किंवा आत्या) असतात. (अमृतातेही पैजा जिंकेवाल्या मराठीत काकू, मावशी आणि आत्या या तीन नात्यातला दिसणारा फरक वाघिणीच्या दूधवाल्या इंग्रजीत कळत नाही) तर या काकवा किंवा मावश्या वूस्टरची काळजी घेत असतात. जन्मजात वेंधळेपणा अंगी असलेल्या बर्टीचा मदतनीस (वॅले) म्हणजे जीव्हज्.

दिवसभर लंडनच्या ड्रोन्स क्लबमधे मित्रांबरोबर पत्ते किंवा अन्य खेळ खेळायचे, स्वतः वेगवेगळ्या मुलींच्या प्रेमात पडायचं किंवा मित्रांना असं प्रेमात पडलेलं पहायचं, मग त्यांना मदत करायला जायचं, किंवा मग त्यांना प्रेमातून बाहेर पडण्यासाठी मदत करायला जायचं, त्यासाठी वेगवेगळ्या योजना बनवायच्या, त्यात गोंधळ घालायचा आणि मग शेवटी जीव्हज् कडून मदत घ्यायची, मधे मधे काकवा (किंवा मावश्या किंवा आत्यांकडून ) शिव्या खायच्या किंवा चिमटे काढणारं कौतुक करुन घ्यायचं,शेवटी पुन्हा बॅचलरंच रहायचं, ही बर्टीची खासियत. जीव्हज् याला सांभाळून घेत असतो.

'श्री. वूस्टर यांचं वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणं वापरता येतील पण हुशार हे विशेषण काही लागू होत नाही' हे जीव्हज् चं आपल्या मालकाबद्दलचं मत. आणि आपण जीव्हज् च्या हातातील बाहुला नाही हे दाखवण्यासाठी वारंवार बर्टीने 'मखमली हातमोजामधील पोलादी पंजा' दाखवण्याचा प्रयत्न करणं हे या दोघांच्या नात्याचं सूत्र. कुठे खलनायक नाही, खून नाही, बलात्कार नाही, अन्याय नाही. अगदी साधी सोपी पण अतुलनीय शब्दात मांडलेली गोष्ट. अतुलनीय अशासाठी की वुडहाऊसचा विनोद प्रसंगनिष्ठ असला तरी शब्दांचे फुलोरे इतके सुंदर की त्यांचा अनुवाद करणं अतिशय कर्मकठीण. त्यामुळे वुडहाऊस वाचावा तो इंग्रजीतच. वुडहाऊस वाचण्याची संधी मिळाली, केवळ या एकमेव कारणासाठी मेकॉलेच्या कट्टर विरोधकांनीही मेकॉलेचे आभार मानायला हरकत नाही.

या बर्टी वूस्टर आणि जीव्हज् वर बीबीसीने सिरीयलंही केली होती. ज्यात सध्या डॉ हाऊस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्यू लॉरीने वेंधळ्या वूस्टरचं आणि स्टीफन फ्रायने जीव्हज् चं काम केलं होतं. सिरीयल अतिशय सुरेख असली तरी तिला पुस्तकाची सर नाही हे ही खरं.

दोन तीन महिन्यांपूर्वी सकाळी चालायला जाताना ऐकायला हवी म्हणून डॉक्युमेंटरी शोधत होतो. सहज गंमत म्हणून पी जी वुडहाऊस सर्च केलं आणि बीबीसी सिरीयलच्या व्हिडिओज् खाली एक नवीन व्हिडिओ दिसला आणि जो आनंद झाला की 'माझा आनंद गगनात मावेना' हा वाक्प्रचार अनुभवता आला. तो व्हिडिओ म्हणजे वूस्टर आणि जीव्हज् च्या पुस्तकांचं अभिवाचन होतं. 1992 - 95 मधे ही अॉडियो बुक्स रेकॉर्ड केली गेली होती आणि आता त्या सीडीजचे संच युट्यूबवर कुणीतरी अपलोड करुन ठेवले आहेत.



लगेच जवळच्या मित्रमैत्रिणींना याची लिंक दिली आणि दोन्ही मुलांना म्हटलं आता हे ऐकल्याशिवाय तुमची खैर नाही.

आज दुपारी एका पोस्टवर 'मी जर घोड्याच्या शर्यतीत एखाद्या घोड्यावर पैसे लावले तर तो इतका हळू धावेल की तो दुसर्‍या शर्यतीत पहिला येईल' हे वुडहाऊसच्या वाक्यावर बेतलेलं वाक्य लिहिलं आणि ते इथल्या मैत्रिणीला आवडलं. तेव्हा म्हटलं की आपल्याला मिळालेला खजिना सगळ्यांबरोबर वाटावा. म्हणून ही पोस्ट.

रविवारच्या सकाळचे साक्षात्कार

१) आपण वयाच्या मानाने कितीही तरुण दिसत असलो आणि हसतमुख असलो तरी विशेष फरक पडत नाही. याउलट ज्यांच्याकडे कुत्रे असतात ते स्वतः कितीही बेढब दिसले तरी ललना त्यांच्याशी बोलायला तयार असतात. (आता कुत्रे पाळले पाहिजेत, तरंच काहीतरी होऊ शकेल.)

२) हेडफोन लावून 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' ऐकत जाताना स्वतःही मोठमोठ्याने म्हणत गेलं की तीच उदात्त भावना वृक्षवल्लींच्या मनात येणं अशक्य असतं. (बरंय मला माझी गायनी कळा किती धन्य आहे ते माहिती आहे. नाहीतर कित्येक अरण्यं उजाड होण्याचं प्रमुख कारण केवळ 'आनंद तिथे चालायला जायचा', असं भूगोलाच्या भावी पुस्तकात छापलं असतं)

३) MIB चं तिकिट काढलंय हे कळल्यावर माझ्याजवळच्या मोठ्या लेकाने मला लगेच हॅपी फादर्स डे असं सांगितलं. आणि हे माझ्यापासून दूर असलेल्या धाकट्या लेकाला कळल्यावर त्यानेही हॅपी फादर्स डे म्हणण्यासाठी फोन केला आणि मला पितृकर्तव्याची जाणीव करून दिली. (बरंय धाकट्याने गीतरामायण ऐकलं नाहीये. नाहीतर 'माझ्याविण एम् आय बी कसा पाहतो' हे गाणं ऐकवलं असतं)

४) आदल्या रात्रीच हॉटेलात जेवून आलेलो असलो तरी सकाळी चालून झाल्यावर बाहेर नाष्टा करायला जाऊया असं म्हटलं की बायको 'दिवाळी दिवाळी आली', 'लख लख चंदेरी तेजाची' वगैरे गाणी एकाचवेळी म्हणू लागते. (पुढच्या वेळी वटसावित्रीच्या दिवशी सकाळी सहकुटुंब चालायला जाणे, गेल्यास नाष्ट्यास बाहेर नेणे टाळले पाहिजे. चुकून प्रेमाच्या भरात तिने वटसावित्रीचं व्रत धरलं आणि चुकून यमाने तिचं म्हणणं मान्य केलं तर बिचारीला पुढचे सात जन्म दुसरा चॉईस रहाणार नाही. मी कितीही कठोर असलो तरी तिला पर्याय निवडायची संधी डावलण्याइतका निष्ठूर नाही)

इदं न मम

जुन्या काळी बरं होतं. एखादा माणूस प्रसिद्ध झाला की लोक आपले विचारही त्या प्रसिद्ध माणसाच्या नावे इतरांना सांगायचे. परिणामी व्यासांच्या जय नावाच्या काव्याचे महाभारत नावाचे प्रचंड महाकाव्य झाले आणि उष्ट करुन सोडायची सवय नसलेल्या व्यासांवर व्यासोत्छिष्टं जगत् सर्वम् चा आळ आला.

नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञाना म्हणे, एका जनार्दनी, दास रामाचा, जनी म्हणे अशी नाममुद्रा उठवत अनेक सदू आणि दादूंनी आपले विचार लोकप्रिय करुन घेतले.

कदाचित जुन्या काळात लोक भलतेच खाष्ट असावेत. की इतका चांगला विचार आपला सदू किंवा दादू कसा काय करेल याबद्दल ते साशंक असावेत. बहुतेक त्या काळी आपलं ते कार्ट दुसऱ्याचा तो बाब्या ही म्हण प्रचलित असावी. त्यामुळे आपले चांगले विचार इतरांच्या नावावर खपवण्याशिवाय त्या काळच्या सदू आणि दादूंना गत्यंतर नव्हते.

पण नंतर म्हणींच्या पुस्तकाच्या कुठल्यातरी आवृत्तीत आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट अशी छापण्यात चूक झाली आणि लोकांचा दृष्टीकोन बदलला. साहित्य मानवी जीवनावर परिणाम करतं ते असं.

हा परिणाम दृश्य स्वरूपात जाणवू लागला तो मात्र या सोशल माध्यमांच्या जमान्यात. आपला माणूस कुठलाही उत्कृष्ट विचार किंवा विनोद करु शकतो याची मित्रांना खात्री असल्याने इथे कुणाची पोस्ट पॉप्युलर झाली तर ती उचलून स्वतःच्या नावावर डकवणे सर्रास चालते. आणि सर्व मित्र वाहवा करतात. मग वाहवा मिळवण्यासाठी दिसतील त्या पोस्ट उष्ट्या करण्याकडे अनेकांचा कल असतो.

माझ्या कित्येक मित्रांच्या पोस्ट दुसऱ्याच्या नावाने माझ्याकडे व्हॉटस अॅपवर येतात. (म्हणजे माझे मित्र त्या ढापून स्वतःच्या नावावर खपवतात असं मी म्हणत नसून मित्रांच्या पोस्ट्स इतरजण ढापतात असं मी म्हणतो आहे)

माझे कित्येक मित्र अशा वाङ्मयचौर्याबद्दल किंवा उष्टावणाच्या सामूहिक कार्यक्रमाबद्दल पोस्ट्स टाकत असतात. त्यांचा त्रागा बघून मला फार वाईट वाटतं. पण सध्या माझे काही लोकप्रिय मित्र स्वतःचं सांत्वन करुन घेताना 'फेसबुकाय स्वाहा.. इदम् न मम' असा मंत्र म्हणतात.

मला हा मंत्र फार आवडला. आता आपणही हा मंत्र म्हणायला हवा असं माझ्या मनाने घेतलं. याबाबतीत माझ्यात आणि सलमान खानमधे फार साम्य आहे. एकबार मैने जो कमिटमेंट कर दि तो मै अपने आप कि भी नही सुनता. म्हणून मी माझ्या पोस्ट्स लोकांनी चोराव्यात आणि स्वतःच्या नावावर खपवाव्यात याच्या मागे लागलो.

सर्व पोस्ट्सचं सेटिंग पब्लिक केलं. पोस्टमधे वैयक्तिक संदर्भ टाळण्यास सुरवात केली. Feel free to share अशी लालूचही दाखवली. पण चोर बधेनात.

आधुनिक सदू आणि दादू भलतेच चोखंदळ झालेले जाणवून मी विषय वैविध्य आणायला सुरुवात केली. मी विनोदी लिहिलं. आर्थिक, सामाजिक, राजकीय विषयांवर लिहिलं. सिनेमावर लिहिलं. गाणी, पुस्तकं, नाटकं काही काही सोडलं नाही. कधीकधी चावटही लिहिलं. पण छे! एकाएकी जगातले सगळे सदू आणि दादू भलतेच सज्जन झाल्यासारखे वागू लागले. बरं मित्र रोज इदं न ममचा मंत्रघोष करत होतेच पण माझ्यासाठी मात्र इदमपि त्वयम् चा अघोषित मंत्रघोष जग करत होतं.

आता मी पेटून उठलो. कुणीच आपली पोस्ट चोरुन स्वतःच्या नावावर खपवत नाही म्हणून मीच माझी पोस्ट चोरुन सोसायटीच्या व्हॉटस अॅप ग्रुपवर दुसऱ्याच्या नावाने टाकली. पण कुणाचीच काही प्रतिक्रिया आली नाही. मग शाळेच्या मित्रांच्या ग्रुपवर टाकली. तिथेही मित्रांनी अजिबात कुतूहल दाखवलं नाही. शेवटी मुलांच्या शाळेच्या ग्रुपवर टाकली. तर त्यावर मुख्याध्यापकांनी मला खडे बोल पाठवले आणि त्याखाली मुलांच्या मित्रांनी खदाखदा हसण्याच्या स्मायली टाकल्या. मग त्यावर मुख्याध्यापक त्या मुलांवर डाफरले. मग मी खदाखदा हसण्याच्या स्मायली टाकल्या. नंतर काय झालं कळत नाही पण मला त्या ग्रुपमधे आता काही पोस्ट करता येत नाही. पण असो.

आपणंच आपल्या पोस्ट चोरुन इतरांना पाठवल्या तर त्या आपल्याला परत कशा मिळणार? त्यासाठी त्या इतरांनी आपल्याला पाठवायला हव्या हा विचार माझ्या मनात आला. आणि मी खट्टू झालो. इदं न मम म्हणण्याचा आनंद या जगात मला मिळणारंच नाही काय? लिहित्या हाताला ही सजाए कालापानी किंवा अंडा सेलची शिक्षा का? असं मी स्वतःलाच विचारु लागलो. पोस्टचा आकार छोटा केला. तरी जग माझा इवलासा आनंद मला द्यायला तयार नव्हतं.

मग एक दिवस मला उपाय सुचला. मी ड्युएल सिमचा फोन घेतला. त्यावर व्हॉटस अॅपचं अजून एक अॅप सुरू केलं. माझी पोस्ट मीच चोरली. मग त्याखाली सदू आणि दादूचं नाव टाकलं आणि मलाच पाठवली.

मग एक स्क्रीन शॉट काढला. आणि फेसबुकवर टाकून म्हणालो 'इदं न मम'.

भाजप ३०० पार

भाजपच्या ऐतिहासिक विजयाच्या निकालानंतर फेसबुकवरील मित्रांच्या प्रतिक्रिया वाचतो आहे.

अनेक भाजपविरोधक मित्र या निकालाने दुःखी आहेत. त्यांच्यापैकी काहींना या निकालात भारतीय जनतेचा ढासळलेला बुध्द्यांक दिसला. तर काहींना भारतीय जनतेला विकासापेक्षा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा महत्त्वाचा वाटला म्हणून विषाद वाटलेला पाहिला. काहींना हा हिटलरसदृश सामूहिक संमोहनाचा प्रकार वाटला. काहीजण भाजपचे अभिनंदन करुन शांत बसले तर काहींनी नाझी सलाम न करणाऱ्या अॉगस्ट लॅण्डमेसरचा फोटो शेअर केला. काही मित्रांनी भारतीय जनतेबद्दल काहीही भाष्य न करता आपण भाजपविरोधी का आहोत त्याची कारणमीमांसा मांडली.

सगळ्या प्रतिक्रिया विचारांना प्रवृत्त करणाऱ्या होत्या पण यातल्या तीन प्रतिक्रियांनी माझ्या डोक्यात विचारांची अनेक चक्र फिरवली. आज त्यातल्या एका प्रतिक्रियेने माझ्या मनात उमटवलेले तरंग लिहितो. बाकीच्यांबद्दल जसा वेळ मिळेल तसं लिहीन.

एका मित्राने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डोंबिवलीतील स्वयंसेवक श्री. बाळासाहेब खरे यांच्या निरलस वृत्तीबद्दल आणि भाजपच्या या विजयात संघाच्या अशा अनेक निस्वार्थी स्वयंसेवकांचा वाटा आहे अशा अर्थाची पोस्ट लिहिली. त्या पोस्टचा शेवट होता की आज जर बाळासाहेब भेटले तर ते मोदी विजयामुळे फार हुरळून न जाता सायंशाखा लावण्याचं आपलं काम करायला निघतील.

पोस्ट अतिशय हृद्य आहे. आणि मी थोडा हळवा असल्याने वाचताना माझ्या घशात आवंढा दाटून आला.

पण मग मला जाणवलं की, माझे सासरे देखील असेच आहेत. रोज सकाळी उठून कुणी पहात असो किंवा नसो, त्यांची देवपूजा अगदी साग्रसंगीत तास दीड तास चालते. त्या देवाने त्यांच्या कित्येक इच्छा पूर्ण केलेल्या नाहीत, त्यांना कधी दर्शन दिलेलं नाही, तरीही त्यांची पूजा नियमबरहुकून चालते.

मग मला आठवले पुलंच्या असामी असामी मधील धोंडो भिकाजी जोशींचे कोकणातील कीर्तनकार काका. ज्यांच्या किर्तनाला कित्येकदा फक्त गाभाऱ्यात कोदंडधारी राम आणि बाहेर स्वतः काका इतकेच लोक असायचे. तरीही किर्तनात खंड पडला नाही.

मग मला आठवले माझ्या कुलस्वामिनीचे मंदिर. जिथे रोज ठरलेल्या वेळी देवीची साग्रसंगीत पूजा होते. पडदा लावून देवीला नैवेद्य दाखवला जातो. बाहेर किती भाविक आहेत याने काही फरक पडत नाही. आणि सबंध भारतात अशी अनेक देवळं असतील की जिथे बाहेर भाविक असो किंवा नसो, पुजारी नित्यनेमाने दिवाबत्ती आणि आरती करत असतील.

मग मला जाणवलं की आपल्या नियमांप्रमाणे काम करत राहणे ही भारतीयांची वृत्ती असावी. अगदी प्रत्येक कामात जरी वापरता नाही आला तरी 'कर्मण्ये वाधिकारस्ते'चा सिद्धांत भारतीय किमान देवाच्या बाबतीत तरी पाळताना दिसतात. संघाने त्याचा वापर करून, देवाऐवजी भारतमाता आणली. परिणामी अनेक व्यक्तींना आपल्यातील निरलस आणि निस्वार्थी पैलू जगापुढे मांडता आला.

फक्त यात एक गडबड होते. ज्याप्रमाणे देवाने दर्शन द्यावे, नैवेद्य खावा म्हणून कुणीच नामदेवासारखा हट्ट धरत नाही, त्याप्रमाणे बाळासाहेब खरेंसारखे अनेक आदरणीय कार्यकर्ते आपल्या कामाच्या परिणामाची फार काळजी न करता आपल्या नित्यनेमाला पूर्ण करत राहतात.

इथपर्यंत पोहोचल्यावर माझं मनात अजून एक विचार आला. जर आपल्या कार्याचा संस्था टिकण्यासाठी काय फरक पडतो आणि अशा टिकलेल्या संस्थेच्या शीर्षस्थानी कोण आलं आहे याबद्दल उदासीन राहून आपल्या नित्यनेमाला लागणे हा भारतीयांचा आत्मा आहे तर मग कदाचित इतकी सारी परकीय आक्रमणे होऊनही आपली संस्कृती टिकून कशी राहिली? हे कोडं सुटतं.

आता मुद्दा असा आहे की जर हा आपल्या संस्कृतीचा आत्मा असेल तर तो बदलता येणं कठीण आहे. किंबहुना अशक्य आहे. मग या आत्म्याला लोकशाहीच्या नवीन आकृतीबंधात बसवायचं कसं? कारण लोकशाहीत जीवन प्रवाही असून दर पाच वर्षांनी आपल्याला राज्यकर्ता निवडायचा असतो. त्यामुळे निरलस कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थ विसरले तरी त्यांनी सामाजिक स्वार्थ विसरून चालणार नाही. आपला राज्यकर्ता कोण आहे आणि तो आपण टिकवलेल्या संस्थेचा, संस्कृतीचा वापर करून या देशावर, या राष्ट्रावर कोणत्या धोरणांची अंमलबजावणी करतो आहे याबद्दल या कार्यकर्त्यांनी उदासीन असून चालणार नाही. देव नैवेद्य खाणार नाही. कदाचित एखादा निस्वार्थी राज्यकर्ताही सत्तेचा मलिदा खाणार नाही. पण देव आणि राज्यकर्ता यांतला मोठा फरक म्हणजे देवाला निवडून यायचं नसतं. त्यामुळे त्यालानिवडणुकीचा खर्च नसतो. पक्ष चालवायचा नसतो, आर्थिक लागेबांध्यांची गरज नसते. मानवी राज्यकर्त्याला मात्र या सगळ्या गोष्टी लागू असल्याने देवासारखं नैवेद्य निरपेक्ष राहणं कायम जमेल याची खात्री नाही.

त्यामुळे भारतीय समाजाच्या आत्म्यावर आधारित जे मॉडेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वापरून भाजपला विक्रमी विजय मिळवून दिला त्या मॉडेलमधील असंख्य आदरणीय स्वयंसेवकांना आपले कार्यक्षेत्र राजकारण नाही ही माहित असल्यामुळे त्यांनी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही तरी, राजकारणातील खाचाखोचा वापरून राज्यकर्ते झालेल्या आपल्या सहकाऱ्यांबद्दल त्यांना उदासीन राहून चालणार नाही. अन्यथा भारतीय संस्कृतीचा अक्षय आत्मा, संस्कृती टिकवण्यात यशस्वी होईल पण तो कायम अत्याचारी राज्यकर्त्याला हरवण्यासाठी अवताराची वाट पहात राहील.

आज राज्यकर्ता अत्याचारी नाही, म्हणून अत्याचारी राज्यकर्ता कधीच येणार नाही अशी समजूत अतिशय भाबडेपणाची ठरेल. त्यामुळे अत्याचारी राज्यकर्ता कधीच येऊ नये यासाठी भारतीय समाजाला आपल्या निस्वार्थी वृत्तीत थोडा बदल करावा लागेल. वैयक्तिक निस्वार्थ सर्वोच्च ठेवून सामाजिक बाबतीत आपल्याला थोडं स्वार्थी व्हावं लागेल.

संसदीय लोकशाही ही नवीन संकल्पना आहे. तिला राबवताना भारतीय समाजाच्या मूळ आत्म्याला धक्का न लावता आपण योग्य ते संस्कार नवीन पिढीवर करू शकू तर मागील पिढीतील बाळासाहेबांसारख्या अनेक निरलस आणि निस्वार्थी व्यक्तींच्या कार्याचं चीज होईल.

मॅग्ना कार्टा

बाईक आणि सायकल चालवताना वळणावर सिग्नलला भलत्या ठिकाणी उभं राहून मी अनेक कार, बस आणि ट्रकवाल्यांना त्रास दिला आहे हे मला कार चालवायला शिकल्यावर समजलं. रस्त्यावरच्या कमीत कमी फटीतून पुढे घुसणारे बाईकवाले झुरळांसारखे आहेत असं मी बायकोला गमतीने म्हणतो. त्यावर बायको म्हणते की हे तुला बाईक चालवताना बरं आठवत नाही, तेव्हा कसा तू ही पुढे पुढे जाण्यासाठी धडपडत असतोस. आणि मग मी खदाखदा हसतो.

आज सकाळी क्लासला बाईकने येत होतो. उशीर झाला होता. मोठ्या सिग्नलला पुढे भरपूर बसेस ट्रक्स आणि कार्सची गर्दी होती. सिग्नल बदलला असता तरी मी तिथे पोचेपर्यंत पुन्हा लाल झाला असता. क्लासला उशीर होत होता. म्हणून कार्स ट्रक आणि बसेसमधल्या मोकळ्या सुटलेल्या रस्त्याच्या सांदीकोपऱ्यातून बाईक काढत एकदम पुढे जाऊन उभा राहिलो. उजव्या टर्नच्या बाजूला उभा होतो.

सिग्नल पडला. मी चटकन पुढे निघालो. पण त्यामुळे माझ्या डाव्या बाजूला असलेल्या कारचा चालक नवशिका असावा. त्याला उजवीकडे वळायला त्रास झाला. ती कार बंद पडली. मग पुन्हा स्टार्ट करण्यात वेळ, तोपर्यंत मागच्या गाड्यांनी हॉर्न वाजवणे वगैरे साग्रसंगीत झालं. मी पुढे निघून गेलो. मागचा गोंधळ ऐकू येत होता. त्या कारवाल्याने कदाचित मला शिव्या घातल्या असतील किंवा नसतील पण मला त्या मनात ऐकू आल्या.

आज मी कार चालवत असतो तर मी झुरळवृत्तीबाबतचं माझं मत अजून घट्ट केलं असतं. पण आज मी बाईक चालवत होतो त्यामुळे मी स्वतःच्या वागण्याचं दुबळं समर्थन करत होतो.

आणि मला एकाएकी आपल्या राजकीय परिस्थितीचं एक सूत्र सापडलं. कुठलाही पक्ष विरोधात गेला की वेगळा वागतो आणि सत्तेत असला की वेगळा वागतो. परिणामी आपला समाज आहे तिथेच गोलगोल फिरत रहातो कारण झुरळं संपत नाहीत. कारवाले बाईकवर बसले की सांदीकोपऱ्यातून पुढे सरकतात आणि बाईकवाले कारमधे बसले की आडव्या तिडव्या गाड्या लावून रस्ता अडवतात. आणि हेच कारवाले पुन्हा बाईकवर आले की पुन्हा झुरळ होतात. जहॉं शुरु वहॉं खतम् वाली ही दास्तान मला मग फारशी अजीब वाटेनाशी झाली. लोकंच असे तर त्यांचे पक्षही तसेच. अजीब काय त्यात?

मग मला एकाएकी ब्रिटनच्या मॅग्ना कार्टाची आठवण झाली. त्यातही राजा आणि पंचवीस सरदार स्वतःच्या सोईने कधी कारवाल्यांसारखे तर कधी बाईकवाल्यांसारखे वागत होते. पण शेवटी त्यातील कलमांना 1297 मधे इंग्लिश कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं. त्यातही कौतुकास्पद गोष्ट ही की त्यानंतर कुणी सोयीस्कर वागण्यासाठी आपद्धर्माचं तत्व वापरलं नाही. सरंजामी व्यवस्था मागे पडली आणि नामधारी राजघराण्याखाली लोकशाही आली पण मॅग्ना कार्टाची तत्वे पाळण्यापासून ब्रिटन फार ढळला नाही. कदाचित हेच त्यांच्या विश्वविजयाचं मूळ कारण असावं. ज्या वर्तनाने समाजाची प्रगती होत नाही उलट एकाची मनमानी होते त्याविरुद्ध कायदा बनवणे. तो बनताना संघर्ष झाला तर अटीतटीचा करणे. पण संघर्षांत एक बाजू जिंकली तर हरलेल्या बाजूनेही नंतर तो कायदा पाळणे. परिणामी गोल गोल फिरत रहाणाऱ्या इतर समाजांच्या तुलनेत ब्रिटन महासत्ता न बनता तरंच नवल होतं.

माझा हे निरीक्षण आणि त्यावरचा निष्कर्ष कुणाला पटो की न पटो, मी मात्र आता बाईकवर असताना झुरळासारखं न वागण्याकडे आणि कारमध्ये असताना कार आडवीतिडवी उभी न करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देईन.

महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या विभागात काम न मिळालेला माणूस

आजकाल तुम्ही राजकारणावर फार लिहू लागले आहात.
आजकाल तुम्ही थेट नावं घेऊन लिहू लागले आहात.
आजकाल तुम्ही तटस्थ वाटत नाही.
आजकाल तुम्ही भूमिका घेऊ लागले आहात. .

या किंवा अशा प्रकारच्या कमेंट्स माझ्या पोस्टवर वाचून मला हसायला येतं.

मी अगदीच काही महानगरपालिकेत उंदीर मारायच्या कामावर नसलो तरी मला माझ्या मर्यादित आकलनाची आणि त्यामुळे येणाऱ्या मर्यादांची जाणीव आहे. त्यामुळे न मो, अ शा, रा गां, रा ठा, उ ठा, श प किंवा अन्य नेत्यांनी काय करावं ते सांगण्याचा माझा अधिकार किती मर्यादित आहे हे मला पक्कं ठाऊक आहे.

गेली वीस वर्षे स्वतःचा व्यवसाय करत असल्याने, सत्ता मिळवणे, टिकवणे, राबवणे यासाठी केवळ स्वप्नाळू असून चालत नाही याची मला जाणीव आहे.

त्यामुळे माझ्या ज्या पोस्ट्स राजकारणाशी संबंधित आहेत असं माझ्या मित्रांना वाटतं त्यात मी नेत्यांनी काय बरोबर किंवा चूक केलं याबद्दल कधी बोलत नाही. नेता दिवंगत असेल तर त्याचं कार्य सांत असल्याने मूल्यमापन करता येईल पण नेता सक्रिय असेल तर भविष्यात त्याची क्षमता आणि तिचा वापर कसा बदलेल हे सांगणं कठीण असल्याने मी सक्रिय नेत्यांवर बोलणं शक्यतोवर टाळतो.

नेत्यांचं विश्व माझ्या आकलनापेक्षा विस्तारित असलं तरी नेत्यांचे अनुयायी माझ्यासारखे असतात. घर, नोकरी, व्यवसाय, मुलं वगैरेंच्या चिंता असणारे. धडपडे पण कित्येकदा हतबलता अनुभवणारे.

त्यामुळे जेव्हा मी माझ्या मित्रांना राजकारणाच्या धुळवडीत गुदमरताना आणि हे गुदमरणं म्हणजेच खरा आनंद असं समजून अधिक त्वेषाने धुळवड खेळताना बघतो तेव्हा मला मित्रांच्या पोस्टवरुन पोस्ट सुचतात. माझ्या पोस्ट्स नेत्यांनी कसं वागावं हे सांगणाऱ्या नसून माझे मित्र असे का वागतात त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करणाऱ्या असतात.

माझी राजकीय भूमिका मला माहिती असते. पण ती इतरांना सांगून इतरांना प्रभावित करण्यात मला रस नसतो. मी गमतीने स्वतःलाच सांगतो की मी खरा हिंदू असल्याने कुणाचे परिवर्तन करण्यात मला रस नसतो. आणि माझी राजकीय भूमिका स्थिर नसून प्रवाही असते. मग कुठल्याही नेत्याची बाजू घेऊन मी स्थिर राहू शकत नाही. मी फारतर कसा विचार करतो ते मित्रांना सांगू शकतो.

पक्षनिष्ठा हा शब्द कार्यकर्त्यांसाठी ठीक आहे. सामान्य नागरिकाने पक्षनिष्ठा दाखवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेणे असं माझं स्पष्ट मत आहे. पारंपरिक मतदार हा देखील एक चुकीचा पायंडा आहे. घराणेशाही नको असेल तर मतदारांनी पारंपरिक मतदार बनणंं बंद केलं पाहिजे. इथे आपला पारंपरिक मतदार आहे हे कळलं की राजकीय पक्ष त्यांच्या कर्तव्यात ढिले पडतात.

आमचं जीवन सुखकर करण्यासाठी जो सध्या योग्य वाटेल तो आमचा तत्कालीन नेता इतकं साधं गृहितक लोकांनी ठेवलं की सगळे राजकीय पक्ष सुतासारखे सरळ येतील असं मला वाटतं.

मी महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या विभागात कामाला नसल्याने मी इतकाच विचार करु शकतो. आणि तो मांडणे म्हणजे तटस्थ रहाणे किंवा भूमिका घेणे वगैरे काही आहे असं मला वाटतं.

इस्लामी हिंदू

तुम्ही ज्याचा द्वेष / तिरस्कार करता तेच तुम्ही बनत जाता हे सिद्ध होताना बघतोय.

इस्लामबद्दल वाचत असताना एक मस्त संकल्पना कळली. 'अल्लाह न्यायी असतो' हे वाक्य इस्लामी धर्मगुरूंना मान्य नसतं. कारण मग अल्लाहपेक्षा न्याय ही संकल्पना अधिक मूलभूत आणि बलवान होते. मग कशाला न्याय म्हणायचं ते ठरवणाऱ्या एका शक्तीचं अस्तित्व मान्य करावं लागतं. परिणामी अल्लाह सर्वशक्तिमान, सर्वश्रेष्ठ न रहाता, त्या अज्ञात शक्तीने ठरवून दिलेल्या न्याय संकल्पनेला अमलात आणणारा साधा अधिकारी ठरतो. हे तर चालणार नाही.

म्हणून मुस्लिम तत्वज्ञानाने दणदणीत उपाय काढला. तत्वज्ञानाने जाहीर केलं की अल्लाह न्याय करत नाही,तर अल्लाह जे करतो तोच न्याय असतो.

अशी मांडणी केल्याने मग अल्लाहपेक्षा सर्वशक्तीमान कुणी असण्याची गरज नाही. न्याय संकल्पनाही रहाते. आणि असं का केलं अल्लाहने? या प्रश्नाचं उत्तर द्यायची जबाबदारी संपते. मग अल्लाह पूर आणो की दुष्काळ, सज्जनांना दुःखात लोटो की दुर्जनांना सुखात ठेवो... सगळं काही अल्लाहचा न्याय ठरतं. आणि अल्लाहला प्रश्न विचारणारे पाखंडी, धर्मद्रोही.

पंतप्रधानांचे आणि त्यांच्या पक्षाचे समर्थक मुस्लिमांचा त्यातही कट्टर मुस्लिमांचा उघड द्वेष करतात. मुस्लिमांना जरब बसवणारा नेता ही पंतप्रधानांची प्रतिमा लोकप्रिय आहे.

पण नेहरू गांधी परिवाराबाबतची पंतप्रधानांची वक्तव्ये, कित्येक मुद्द्यांवर दडपून केलेला सत्यापलाप या सर्व बाबतीत पंतप्रधानसमर्थक ज्या अहमहमिकेने बोललेला प्रत्येक शब्द अचूक आणि पूर्णसत्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात ते बघून मला कट्टर हिंदूंची कट्टर मुसलमान बनण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण होते आहे असं वाटतं.

आता त्यांनी, पंतप्रधान नेहमी सत्य बोलतात याऐवजी पंतप्रधान जे बोलतात तेच सत्य असतं अशी घोषणा केली की पंतप्रधानांची अल्लाह म्हणून प्रतिष्ठापना होईल आणि नवे धर्मगुरू तयार होतील. आणि कट्टर मूर्तीभंजकांना तोंड देण्यासाठी कट्टर मूर्तीपूजक अजून प्रगती करतील. आणि 'तुम्ही ज्याचा द्वेष / तिरस्कार करता त्याच्यासारखेच बनत जाता' हे सत्य पुन्हा सिद्ध होईल. आणि कदाचित तलवारही न वापरता नकळत धर्मांतर करुन घेण्यात मुस्लिम धर्म यशस्वी झाला आहे हे कुणालाही कळणार नाही.

तेव्हा कुठे गेला राधासुता तुझा धर्म ?

लोकशाहीची गळचेपी होते आहे असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे अशा अर्थाचं वक्तव्य विक्रम गोखलेंनी केल्याची बातमी वाचली. तीव्र भाषा असल्याने यावर समाजमाध्यमांवर प्रतिसादांचा महापूर लोटणं स्वाभाविक होतं. त्याप्रमाणे तो लोटलाही. त्यात माझ्या एका तरुण मित्राने 'तुमचे तेंडुलकर आमचे गोखले', अशा अर्थाची एक पोस्ट टाकली आणि माझ्या तरुणपणी (म्हणजे आजच्यापेक्षा मी पंधरा वीस वर्ष लहान असताना) एका इंटरव्ह्यूत मला विचारला गेलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाने आजतागायत मला केलेली साथ आठवली.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्या प्रश्नाचं माझं मलाच वेगवेगळं उत्तर मिळत गेलं आणि प्रत्येक वेळी मला मिळालेलं उत्तर माझ्या मते आधीच्या उत्तराची सुधारित आवृत्ती होती. वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात प्रत्येक वेळी मला त्या उत्तरांचा फायदा झाला, वैचारिक गोंधळ कमी झाला आणि काय योग्य काय अयोग्य? याचा निवाडा करणं सोपं गेलं. वेगवेगळ्या अनुभवांमुळे समज जसजशी वाढत गेली तसतशी गतायुष्यातील चुकीच्या निर्णयांतील चुकाही समजू शकलो आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची बऱ्यापैकी काळजी घेऊ शकलो. (इथे जर कुणी 'अजून काही तुझी समज वाढलेली दिसत नाही', असा आक्षेप घेतला तर तो मला खोडता येईलंच याची खात्री नाही त्यामुळे त्याने पुढे वाचलं नाही तरी चालेल.)

प्रश्न होता 'where do you think your authority comes from?'

जेव्हा तो प्रश्न इंटरव्ह्यूत विचारला गेला तेव्हा मी पंचविशीच्या आसपास होतो. घरच्यांचा माफक विरोध शांत करत आंतरजातीय, आंतरराज्य आणि आंतरभाषिक विवाह करून आयुष्य स्थिर करु पहात होतो. चार वर्षाच्या कोर्टशिपनंतर प्रेयसी जेव्हा बायको होते तेव्हा तिच्यात होणारे बदल अनुभवत होतो. नवीन घर घेतलं होतं. लग्न पहावं करुन आणि घर पहावं बांधून हे आयुष्यातले महत्त्वाचे दोन्ही निर्णय स्वतःच्या हिमतीवर घेतल्याने मी उत्तर दिलं, 'योग्य विचार करण्याच्या माझ्या क्षमतेतून मला आयुष्यात कुठलीही गोष्ट करण्याचे आणि इतरांकडून करुन घेण्याचे अधिकार मिळतात.'

उत्तर दिलं खरं पण माझा मीच समाधानी नव्हतो. त्यामुळे तो प्रश्न डोक्यात रुंजी घालत राहिला. अजूनही घालतो.

एक दिवस जाणवलं की जर चार वर्षाच्या कोर्टशिपनंतर प्रेयसी जेव्हा बायको होते तेव्हा तिच्यात बदल होतात हे प्रियकराला वाटू शकतं तर तसे बदल नवरा बनल्यावर प्रियकरात झाले आहेत असं बायकोलाही वाटू शकतंच की. आणि मला माझ्या इंटरव्ह्यूतल्या उत्तरातला फोलपणा जाणवला.

जेव्हा मला वाटतं माझा विचार योग्य आणि समोरच्यालाही तसंच वाटतं, तोपर्यंत ठीक. पण जेव्हा मला वाटतं माझा विचार योग्य पण समोरच्याला दुसरा विचार सुचतो आणि त्याला स्वतःचा विचार योग्य वाटतो तेव्हा माझा विचार समोरच्यावर लादण्याचा मला काय अधिकार? आणि समजा जर मी लादण्याचा असा माझा अधिकार मान्य केला तर तो अधिकार समोरच्यालाही आहे हे मला मान्य करावं लागेल. मग कुणाचं मत ग्राह्य धरायचं हा प्रश्न उभा राहील. मग परंपरेमुळे, आर्थिक किंवा सामाजिक किंवा शारिरीक ताकदीमुळे जो बलवान असेल तो विचार लादण्याचा आपला अधिकार जास्त समर्थपणे वापरेल आणि दुसऱ्याची गळचेपी होईल.

आपण गळचेपी करणं शक्य तितकं टाळायचं असा माझा आग्रह असल्याने मी माझं पहिलं उत्तर टाकलं आणि नवीन उत्तराच्या शोधाला लागलो. प्रश्न तोच 'where do you think your authority comes from?'

मी आता तिशी ओलांडली होती. दोन मुलांचा बाप झालो होतो. स्वतःच्या व्यवसायात थोडा स्थिर झालो होतो. मुलांच्या मागण्यांमुळे कधीकधी स्वतःच्या मागण्यांना मुरड घालू लागलो होतो.

त्याचवेळी वयाने माझ्यापेक्षा किंचित लहान असलेला अतिशय लाडका नातेवाईक स्वतःच्या व्यवसायात अडकल्याने माझ्याजवळ आला. त्याला मदत करण्यात मला आनंद वाटू लागला. त्याच्यासाठी, त्याला तोट्यातून आणि कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी माझ्या लहानसहान सुखासीन इच्छांचा त्याग करणं मला आनंददायी वाटू लागलं. मी स्वतःला त्यागमूर्ती समजू लागलो. न केलेले किंवा थोडेफार केलेले त्यागही मला मोठे भासू लागले. जिवलग नातेवाईक बिचारा अडकला असल्याने माझे सगळे विचार ऐकत होता. अमलातही आणत होता. त्याच्यावर माझे विचार मी लादतो आहे असं मला स्वप्नातही वाटत नव्हतं त्यामुळे गळचेपी वगैरेचा प्रश्नंच उद्भवत नव्हता.

यथावकाश माझा जिवलग ऋणमुक्त झाला. त्याचा मार्ग त्याला सापडला. आता त्याला माझे जे विचार पटत नव्हते ते तो सांगू लागला. आणि माझ्या अधिकारांच्या भरधाव निघालेल्या गाडीला धक्के बसू लागले. मी तुझ्यासाठी त्याग केला आहे त्यामुळे तुझ्यावर मला अधिकार आहे. आणि तुला माझे विचार अमलात आणावे लागतील अशी माझी त्याच्याकडे मागणी होती. आणि माझ्या या मागणीसाठी एक प्रचंड तत्वज्ञान माझ्याकडे तयार होतं. त्यागाचं तत्वज्ञान.

आईवडीलांना मुलांवर अधिकार का असतो? कारण ते मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून स्वसुखाचा त्याग करतात. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुरुंगवास भोगलेल्यांना किंवा देशासाठी प्राण गमावणाऱ्या सैनिकांना इतर नागरिकांवर अधिकार का असतो? कारण त्यांनी इतरांसाठी स्वसुखाचा त्याग केलेला असतो. गांधीजींचा त्याग मोठा म्हणून त्यांचा अधिकार मोठा. इथपर्यंत मी पोचलो होतो आणि त्यागाच्या इंधनावर पळणाऱ्या माझ्या अधिकारांच्या गाडीतलं इंधन संपत आलं.

त्याग केला आहे हे केवळ त्याग करणाऱ्याला वाटून चालत नाही तर ज्याच्यासाठी तो त्याग केला आहे त्यालाही त्या त्यागाचं मोल जाणवलं पाहिजे तरंच त्याग करणाऱ्याला अधिकार मिळतात. ज्याच्यासाठी त्याग केला त्याला जर त्या त्यागाचं मोल नसेल किंवा कमी वाटत असेल तर त्यागमूर्तीला मिळणारे अधिकार अनिर्बंध किंवा अमर्याद नसून त्यांची व्याप्ती किंवा मर्यादा ज्यांच्यासाठी तो त्याग केला त्यांच्या मनातील त्यागाच्या मूल्यावर अवलंबून असते. जितकं ते मूल्य जास्त तितकी अधिकारांची व्याप्ती जास्त. जेव्हा हे कळलं तेव्हा अनेकांना मान्य असणारा गांधीबाबा काहींना का मान्य नाही? किंवा एका गटाला मान्य असणारे सावरकर, आंबेडकर, टिळक इतर गटांना का मान्य नाहीत त्याचं उत्तर मिळालं.

जिवलगाच्या आयुष्यावर मीच ठरवलेल्या त्यागातून उद्भवलेल्या माझ्या अधिकारांचा विळखा मग सैल पडला. 'where do you think your authority comes from?' चं उत्तर 'मी केलेल्या त्यागातून' हे काही सार्वकालिक नाही आणि ते अमर्याद अधिकार देऊ शकत नाही हे जाणवलं आणि मी तिसरं उत्तर शोधण्याच्या मागे लागलो.

आता मी चाळिशीजवळ पोहोचू लागलो होतो. योग्य विचार करण्याची क्षमता, इतरांसाठी त्यांच्या नकळत किंवा त्यांनी न मागितलेले त्याग आपल्याला इतरांवर अमर्याद अधिकार देत नाहीत हे कळून चुकलं होतं. पण मग दोन व्यक्तींना एकाच गोष्टीबाबत दोन वेगवेगळे विचार सुचले असतील तर कुणाचा विचार मान्य करायचा आणि का? याचं उत्तर मिळत नव्हतं.

आणि एक दिवस डोक्यात एकदम लख्खकन प्रकाश पडला. उत्तर का मिळत नव्हतं त्याचं उत्तर सापडलं. माझा प्रयत्न होता की अधिकार मिळण्याचं जे कारण मी शोधीन त्यामुळे मिळणारे अधिकार सार्वकालिक असावेत आणि पुन्हा पुन्हा अधिकार मिळवण्याची कटकट येऊ नये. अधिकार एकदा मिळावेत आणि नंतर ते कायमचे वापरता यावेत हे माझं गृहितक सगळा घोटाळा करत होतं.

एकाला आपले विचार इतरांकडून राबवून घेण्याचा अधिकार मिळणं शक्य आहे पण तो क्षणिक असतो कायमचा नसतो हे गृहीतक वापरलं तर मात्र माझा प्रश्न सुटू शकतो हे जाणवलं.

'where do you think your authority comes from?' या प्रश्नाचं आता जे उत्तर मिळालं आहे ते शेवटचं आहे असं मी म्हणत नाही. कदाचित अजून आयुष्य बघितलं तर अजून सुयोग्य उत्तर मिळेल हे मला मान्य आहे. पण आता तरी मला असं वाटतं की इतरांचे विचार आपल्यापेक्षा वेगळे असताना आपला विचार इतरांकडून राबवून घेण्याचा अधिकार आपल्याला तेव्हाच मिळतो जेव्हा आपण इतरांपेक्षा जास्त घटकांचा आणि कारणपरिणामांच्या साखळीचा वेध घेऊ शकतो. अर्थात आपण असं केलं आहे हे इतरांना झटकन मान्य होणार नाही. त्यामुळे त्यांना ते समजावून सांगण्यासाठी अंगी सहनशीलता लागेल, समोरच्याचा आणि त्याच्या मताचा आदर करावा लागेल. इतकं करून जर आपण समोरच्याला पटवू शकलो तरीही मिळणारा अधिकार क्षणिक असेल. कारण तोवर जर इतर कुणी अधिक सखोल आणि दूरगामी विचार केला तर आपल्याकडे आलेला अधिकार त्याच्याकडे जाईल. जर कुणीच तसं केलं नाही तर अधिकार आपल्याकडेच राहील हे जितकं खरं तितकंच निर्णयाच्या बऱ्या वाईट परिणामांची जबाबदारी आपल्यावरंच असेल हेही तितकंच खरं. अधिकार मिळतो तो समयोचित आणि समर्पक असण्यातून. वयामुळे, पैशामुळे, स्थानामुळे, त्यागामुळे अधिकार मिळत नाहीत. आणि मिळालेला अधिकार कायमस्वरूपी टिकत नाही. समयोचित राहून तो टिकवावा लागतो.

प्रत्यक्ष आयुष्यात सगळेजण हे आचरणात आणतील याची आजतरी शक्यता अतिशय कमी आहे. पण अधिकारांचा जन्म आणि त्यांचं वहन याप्रकारे होऊ देणारं नातं, व्यवस्था किंवा समाज अधिक प्रगल्भ असेल आणि त्याच्याकडून घोडचुका होण्याची शक्यता कमी असेल असं मला वाटतं.

आता या सगळ्याचा विक्रम गोखलेंच्या वक्तव्याशी काय संबंध? तर तो संबंध माझ्या मित्राने केलेल्या पोस्टमुळे आहे. त्याची पोस्ट गेल्या काही वर्षांत फेसबुकवर लोकप्रिय झालेल्या 'तेव्हा कुठे गेला राधासुता तुझा धर्म?' किंवा 'त्यांना का नाही बोललात?' या वाक्यांसारखी आहे. ही दोन्ही वाक्य अधिकारांच्या जन्माचा वेगळाच सिध्दांत वापरतात.

कारण इथे मागितले जाणारे अधिकार मी ज्या अधिकारांबद्दल बोलतोय ते नसून पूर्णपणे वेगळे आहेत. एकंच अडचण सोडवण्याच्या दोन वेगवेगळ्या विचारांतून एक पर्याय कसा निवडायचा? कुठल्या विचाराला इतर विचारांवर अधिकार मिळावा? आणि का? हे माझे प्रश्न होते आणि आहेत. एखाद्याने आधी एक चूक केली म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी अधिकार कसे तयार होतात हा मुद्दा माझ्या पध्दतीतल्या तिन्ही उत्तरांच्या आधारे सोडवणे चूक आहे.

'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?' हे वाक्य खरोखरच महाभारतात बोललं गेलं असेल तरीही ते वैयक्तिक अन्यायाचा बदला घेण्यासाठी वापरलेलं आहे. मी अधर्माचरण करतो आहे याची त्यात कबुली आहे आणि हे अधर्माचरण केवळ तुझ्यापुरतं करतो आहे याचीही त्यात जाणीव आहे. बदला घेण्यासाठी आपण धर्मच्युत होतो आहोत हे अयोग्य आहे हे त्यात अध्याहृत आहे.

लोकशाहीत जेव्हा सत्ताधारी पक्ष बदलतो तेव्हा सध्याच्या सत्ताधारी पक्षाने पूर्वीच्या सत्ताधारी पक्षाचा किंवा सध्याच्या सत्तासमर्थकांनी पूर्वीच्या सत्तासमर्थकांचा बदला घ्यायचे ठरवले तर ती संपूर्णतया चूक आहे. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी चुका केल्या, त्यांच्या समर्थकांनी चुका केल्या म्हणून तर सत्ताबदल झाला. याचा अर्थ असा की जनतेला त्या चुका नकोशा आहेत. त्याच चुका आता तुम्ही कशा प्रकारे करुन दाखवाल? यासाठी तुम्हाला वेगळी संधी दिलेली नाही.

एकाने चुका केल्या, सत्तेचा गैरवापर केला, म्हणून त्याच किंवा त्याहून अधिक मोठ्या चुका करण्याचा अधिकार दुसऱ्याला मिळतो ही तार्किक चूक आहे. हा तर्कदोष तर आहेच पण तो समाजासाठी अतिशय घातक आहे.

अधिकार चुका करण्यासाठी मिळत नसतात. ते चुका सुधारण्यासाठी मिळत असतात. तुमचा दाऊद तर आमचा गवळी, तुमचे खान तर आमचा हृतिक. ही जशी हास्यास्पद आणि चिंताजनक विधानं होती, तशीच तुमचे तेंडुलकर तर आमचे गोखले हेही विधान हास्यास्पद आणि भविष्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

अधिकार मिळतात ते काम करायला. चुका करायला कुणालाच अधिकार मिळत नाहीत. चुका होतात. त्यांची जबाबदारी घ्यायची असते आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची खबरदारीदेखील. इतरांच्या चुकांतून आपल्यालाही त्याच चुका करण्याचा अधिकार मिळवणं म्हणजे शेखचिल्ली मानसिकता आहे. त्यातून केवळ ज्या फांदीवर आपण बसलो आहोत ती तुटेल आणि आपला कपाळमोक्ष होईल.

जर सध्या चालू आहे ते महाभारत असेल, आणि प्रत्येकाला आपली बाजू पांडवांची वाटत असेल, तरी भगवंतांना मात्र दोन्ही बाजूला कौरव आहेत असंच दिसत असेल. जोपर्यंत आपण 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म' चा खेळ खेळत राहू तोपर्यंत अठराव्या अध्यायातील 'यत्र योगेश्वरः कृष्णो' चा श्लोक भगवंत म्हणणार नाहीत याची मला खात्री आहे.

टीप : where do you think your authority comes from? हा प्रश्न जर इंटरव्ह्यूत आला आणि इंटरव्ह्यू मॅनेजरच्या जागेसाठी असेल तर I think my authority comes from the system असं उत्तर द्यावं. आणि जर तो सीईओच्या जागेसाठी असेल तर रेडिमेड उत्तरं लागू होत नसून स्वतःचं डोकं वापरणं आवश्यक आहे.

Abide With Me

परवा सकाळी डोक्याने एक मोठी रोलरकोस्टर राईड पूर्ण केली. पण तिची गंमत तुम्हाला सांगण्यासाठी थोडं मागे जावं लागेल.

गेल्या वर्षी हेमंत राजोपाध्येने फेसबुकवर एक लिंक शेअर केली होती. इराणच्या कुठल्यातरी दऱ्याखोऱ्यात लोक जमले आहेत. पुरुष गायक लंबगोलाकार वर्तुळ करून बसले आहेत. मागे स्त्री गायिका आहेत. या सगळ्यांच्या अवतीभवती अनेक प्रेक्षक आहेत. सर्व गायकांच्या हातात केवळ उकुलेले सारखं एक वाद्य आहे. आणि तालासुरात ते एक गाणं म्हणत आहेत. गाण्याचे बोल कळत नव्हते. पण गाणं मनाला वेड लावून गेलं होतं. कितीतरी दिवस तेच तेच गाणं रिपीट मोडवर लावून ऐकत होतो. गाण्याचे बोल, त्यांचा अर्थ मिळावा म्हणून इथल्या अनेक मित्रांशी संपर्क साधला. पण कुणाकडून गाण्याचे बोल किंवा त्याचा अर्थ मिळाला नाही. तरीही त्यातील ‘या अली, हैदर हैदर हैदर मदत’ हे शब्द समजत होते. गाणं म्हणणारे इराणी असावेत त्यामुळे गाण्याचा आणि नाद ए अलीच्या दुवाचा संबंध मी मनातल्या मनात लावून मोकळा झालेलो होतो. अजूनही मला गाण्याचा अर्थ कळलेला नाही. कुणी जाणकार मित्र तो सांगतील तर मी त्यांचा उपकृत राहीन. या नाद ए अलीच्या दुवाबरोबर थोडं अजून मागे जातो. 



माझी दहावीची का बारावीची परीक्षा झाली होती. माझी सगळ्यात धाकटी मावशी घरी आली होती आणि तिने पिक्चरला जाऊया असा आग्रह केला. म्हणून कधी नाही ते बाबांनी आम्हाला पिक्चरला नेलं. चित्रपट होता अजूबा. त्यातील ऋषी कपूर कुठे अडकला की ‘या अली कर मदद’ असं म्हणायचा आणि सगळ्या गोंधळातून तरून जायचा. त्यानंतर कित्येक वर्ष अडचणीत सापडलो की या अली कर मदद म्हणणारा ऋषी कपूर आठवायचा.

नंतर थोडं वाचन वाढलं तसं इस्लाममधील उहुद आणि खैबरच युद्ध, त्यातील नाद ए अलीची दुवा, शियांसाठी पवित्र असलेल्या अलींना मदतीसाठी हाक मारणं वहाबी सुन्नींना का पटत नाही ते वाचलं. म्हणजे बहुतेक ऋषी कपूरचं पात्र शिया असावं असा कयास बांधला. आणि इस्लाममध्ये शेवटचा उपाय म्हणून सुन्नी मुसलमान अल्लाहला हाक मारणं योग्य समजतात तर शिया मात्र अलीला हाक मारण्यात काही चूक समजत नाहीत अशी खूणगाठ मनात बांधली.

लगान चित्रपटातील माझं ऐकायला अतिशय आवडतं पण चित्रीकरणात मात्र पीटीचे प्रकार केल्यासारखं वाटल्यामुळे बघायला न आवडणारं ओ पालनहारे गाणंही त्याच प्रकारचं आहे. आता मॅच हरणार असं वाटू लागलेले गावकरी एकत्र येऊन

है पथ में अंधियारे
दे दो वरदान में उजियारे;
म्हणतात तेव्हा त्यातील याचना, आर्तता मनाला भिडते आणि त्यांच्या मनासारखं व्हावं म्हणून प्रेक्षकांची मनोदेवताही भुवनच्या बाजूने कौल देऊन टाकते.

सीमा चित्रपटातील तू प्यार का सागर है या गाण्यातील,
घायल मन का पागल पंछी उड़ने को बेकरार
पंख हैं कोमल, आँख है धुंदली,
जाना है सागर पार अब तू ही इसे समझा,
राह भूले थे कहाँ से हम;
या कडव्यातील आर्तता मला ‘या अली कर मदद’ सारखीच वाटू लागते.

एकंदरीत अडचणीत असलो की दैवी शक्तीला हाक मारावी ही सगळ्या मानवी समाजात रूढ असलेली पद्धत आहे. मी स्वतः देव मानत नसलो तरी कित्येकदा अडचणीच्या वेळी निर्णय कसा घ्यावा म्हणून माझ्या मनोदेवतेला साद जरूर घातली आहे.

परवा सकाळी न्यायमूर्ती फली नरिमन यांचं एक भाषण ऐकत चाललो होतो. विषय बघितला नव्हता. फक्त फली नरिमन आहेत हे बघून भाषण चालू केलं आणि फोन खिशात टाकून चालायला सुरवात केली. आणि अनपेक्षितरित्या डोक्याला जी काही मेजवानी मिळाली की ज्याचं नाव ते. 



भाषण गांधीजींवर होतं. अनेक धर्म, पंथ - उपपंथ असलेल्या प्राचीन भूमीतून नवीन जगात पाऊल ठेवू शकेल असं राष्ट्र घडवताना गांधीजींनी वापरलेल्या सर्व धर्मांच्या प्रार्थनासभांचा प्रयोग याबद्दल नरिमन यांनी विवेचन केलं होतं.

भारतात एकाच वेळी नांदणारे विविध धर्म, त्यांचे विभिन्न रितीरिवाज, त्यांच्या विविध परंपरा आणि त्यांचा परस्परविरोधी कारवायांचा आणि शोषणाचा इतिहास या कच्च्या मालातून एकसंध राष्ट्र तयार करणे म्हणजे शिवधनुष्य होते. आणि ते उचलण्यासाठी गांधींजीनी आपली संपूर्ण क्षमता वापरली. त्यांच्या अनेक विचारांचा आपल्या घटनेवर प्रभाव आहे. हे आणि यासारखे अनेक मुद्दे अतिशय ओघवत्या शैलीत आणि ससंदर्भ मांडून नरिमन यांनी श्रोत्यांना गांधींजींच्या मनोवस्थेची आणि त्यांच्यापुढील आव्हानांची प्रचीती दिली. संपूर्ण भाषणाचं सूत्र म्हणून त्यांनी स्कॉटिश धर्मगुरू हेन्री फ्रान्सिस लायेट यांनी रचलेलं Abide With Me हे भजन (hymn) वापरलं होतं. नरिमन यांनी त्यातली तीन कडवी उद्घृत केली. माझी उत्सुकता चाळवली गेली. म्हणून यूट्यूबवर भजन शोधलं आणि मग इंटरनेटवर त्याची माहिती वाचली. टीबीच्या आजारामुळे अंथरुणाला खिळले असताना अखेरच्या काही दिवसांत लायेट यांनी हे भजन रचलं होतं. 



जरी हे भजन एका भक्ताने आपल्या वैयक्तिक दुःखावर विजय मिळवण्यासाठी रचलेलं होतं तरी त्याचा गाभा इतका सुंदर आहे की केवळ धार्मिकच नव्हे तर सैनिकी समारंभातही याचा वापर जगभर केला जातो. आणि जगाचं नेतृत्व करणाऱ्या अनेक नेत्यांचं हे आवडतं भजन आहे. गांधीजी त्यातील एक. दर वर्षी २९ जानेवारीला दिल्लीला प्रजासत्ताक सोहोळ्याची सांगता करताना आपल्या तिन्ही सैन्यदलांचे बँड एकत्र येऊन हेच भजन वाजवतात 



मी त्या भजनाचं भाषांतर केलं नसून स्वैर रूपांतर केलं आहे. पण मूळ ख्रिस्ती भजनाच्या गाभ्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली आहे. मूळ भजनाचे इंग्रजी शब्द त्याखाली दिले आहेत.

माझी साथ सोडू नकोस, संध्याकाळ वेगाने होते आहे. अंधार सगळीकडे दाटून येतो आहे अशा वेळी हे परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस. जेव्हा मदतीचा ओघ आटत चालला आहे, समाधान लोप पावते आहे, अशा वेळी हे परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस. असहाय्याला सहाय्य कर.

जेव्हा पृथ्वीवरची सगळी सुखे कोमेजू लागली आहेत, अंत वेगाने जवळ येतो आहे, विजय दूर जातो आहे, सारं काही वेगाने बदलताना दिसतं आहे तेव्हा कधी न बदलणाऱ्या परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस.

माझी याचना आहे की माझ्याकडे केवळ कटाक्ष टाकू नकोस, केवळ सांत्वनपर शब्द बोलू नकोस, जसा तुझ्या शिष्यांसोबत राहिलास घरच्यासारखा, सहनशील तसाच माझ्यासोबत रहा.

तुझ्या सर्वशक्तिमान रुपात रोंरावत येऊ नकोस. प्रेमळ आणि चांगला, ज्याच्या पंखांवर सगळे उपाय आहेत, माझ्या दुःखासाठी अश्रू आहेत आणि माझ्या वंचना ऐकण्यासाठी हृदयात जागा आहे, असा पाप्यांनाही जवळ घेणारा होऊन ये.

माझ्या शैशवात तू माझ्यावर कृपा ठेवलीस. नंतर तारुण्यात मी बंडखोर झालो. मी तुला सोडलं तरी तू मला सोडलं नाही. आणि आता या शेवटच्या क्षणी हे परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस.

येणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी मला तू जवळ हवा आहेस. तुझ्या कृपेने मी सगळ्या आमिषांपासून दूर राहू शकेन. तुझ्याशिवाय मला दुसरा कोण चांगला मार्गदर्शक असू शकेल. हे परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस.

तुझा वरदहस्त माझ्यापाठी असेल तर मला कळीकाळाचीही भीती नाही. वाईट गोष्टी नाहीश्या होतील. अश्रूंतील कडवटपणा नाहीसा होईल. मृत्यू असो वा अनंतकाळाची वेदना, तुझी साथ असेल तर मीच विजेता होईन.

तुझा कृपाहस्त माझ्या मिटणाऱ्या डोळ्यांवर ठेव. झाकोळणाऱ्या दुःखाला बाजूला सारून मला रस्ता दाखव, मंगलाचा प्रकाश पडू दे माझ्यावर आणि अमंगलाच्या वाईट सावल्या हटव माझ्यावरून. माझ्या जीवनात आणि माझ्या मृत्यूत हे परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस.

भजनाचे शब्द असे आहेत.

Abide with me; fast falls the eventide;
The darkness deepens; Lord with me abide.
When other helpers fail and comforts flee,
Help of the helpless, O abide with me.

Swift to its close ebbs out life's little day;
Earth's joys grow dim; its glories pass away;
Change and decay in all around I see;
O Thou who changest not, abide with me.

Not a brief glance I beg, a passing word,
But as Thou dwell'st with Thy disciples, Lord,
Familiar, condescending, patient, free.
Come not to sojourn, but abide with me.

Come not in terror, as the King of kings,
But kind and good, with healing in Thy wings;
Tears for all woes, a heart for every plea.
Come, Friend of sinners, thus abide with me.

Thou on my head in early youth didst smile,
And though rebellious and perverse meanwhile,
Thou hast not left me, oft as I left Thee.
On to the close, O Lord, abide with me.

I need Thy presence every passing hour.
What but Thy grace can foil the tempter's power?
Who, like Thyself, my guide and stay can be?
Through cloud and sunshine, Lord, abide with me.

I fear no foe, with Thee at hand to bless;
Ills have no weight, and tears no bitterness.
Where is death's sting? Where, grave, thy victory?
I triumph still, if Thou abide with me.

Hold Thou Thy cross before my closing eyes;
Shine through the gloom and point me to the skies.
Heaven's morning breaks, and earth's vain shadows flee;
In life, in death, O Lord, abide with me.

हे भजन मी जर आधी ऐकलं असतं तर कदाचित इतका हेलावून गेलो नसतो. पण गांधींजींचं हे आवडतं भजन त्यांच्या आयुष्यात का महत्वाचं होतं याचा नरिमन यांनी ज्याप्रकारे अन्वयार्थ लावला ते ऐकताना मी भारावून गेलो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसववेणात आणि फाळणीच्या वणव्यात सगळीकडे एकाच वेळी उपस्थित राहू न शकलेल्या त्या महापुरुषाला या भजनाने किती आधार वाटला असेल ते जाणवून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. चालताना थांबून आधी त्या अश्रूंना मनसोक्त वाट करून दिली.

मग मनात विचार आला की केवळ गांधीजींच का? अपूर्व परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक नेत्याला (मग तो देव मानत असो किंवा नसो) भूतकाळ गाडताना, नवीन प्रथा पाडताना, भविष्यकाळ घडवताना जी असामान्य जबाबदारी उचलावी लागते ती पाहता आपण घेतलेले निर्णय भविष्यासाठी सुखकारक व्हावेत अशी इच्छा येताना, आपले मानवी सामर्थ्य किती तोकडे आहे हे जाणवले असताना; हे भजन खरोखर मनाला क्षणभर का होईना पण शांतता देऊ शकेल.

मग ते अफझलखानाला भेटायला निघालेले किंवा पुरंदरचा तह करणारे किंवा मग आग्र्याहून निसटणारे शिवाजी महाराज असोत, किंवा मुलींसाठी शाळा काढणारे फुले दाम्पत्य असो किंवा धर्मांतर करायचा निर्णय घेणारे बाबासाहेब असोत. या महापुरुषांनी आपल्या आयुष्यात जी विलक्षण जबाबदारी पेलली तिचा विचार करताना, जर दैवी शक्ती असेल तर तिने त्यांना आपलं पाठबळ द्यायलाच हवं असं माझ्या मनाला वाटून गेलं. आपल्याला कुठल्यातरी अज्ञात शक्तीकडून मदत मिळावी आणि आपल्या निर्णयाचं सोनं व्हावं म्हणून यांनी आपल्या मनोदेवतेला जर कुठली प्रार्थना केली असेल तर ती नक्कीच अशाच धर्तीवरची असेल असा विचार मनात आला .

विचारांच्या बरोबर धावत असताना मग एकदम जाणवलं की, केवळ नेतेच नव्हे तर आपण सर्वजण आपल्या आयुष्यात अनेकदा अपूर्व परिस्थितीला सामोरे जात असतो. आपले निर्णय समाजावर परिणाम घडवू शकत नसले तरी आपल्या आसपासच्या जिवलगांच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम घडवणारे असतात. ते निर्णय बरोबर यावेत म्हणून आपल्यालाही प्रार्थना करायची असेल मग ती कुठल्या देवाला असो किंवा मनोदेवतेला तर तीही अशीच असावी. ज्यामुळे आपल्याला निर्णय घेण्यासाठी आणि ते राबवण्यासाठी मानसिक आधार मिळेल.

फली नरिमन यांच्या भाषणामुळे, लहानपणी अजूबातील या अलीपासून सुरु झालेला मदत मागण्याचा प्रवास मग अगम्य इराणी गाण्यातून ‘ओ पालनहारे’, ‘तू प्यार का सागर है’ चे टप्पे घेत शेवटी Abide with me पर्यंत जाऊन पोहोचला. माझी नाळ एका सूक्ष्म धाग्याने का होईना पण राष्ट्रपित्याशी जुळली आहे याचा मला आनंद झाला. सकाळी चालायला जाताना विषयाचं बंधन न ठेवता जे मिळेल ते ऐकायच्या माझ्या सवयीवर मी खूश झालो. आणि आनंद वाटला की वाढतो असं म्हणतात म्हणून मग ही पोस्ट लिहून मोकळा झालो.