आमच्या लहानपणी असं (नव्हतं) होतं
म्हणजे प्रत्येकाचं तिथे एक अकाउंट असायचं. तिथे अकाउंट उघडलं की प्रत्येकाला एक भिंत मिळायची. आधी तिथे लोक काहीबाही लिहायचे. पण नंतर भिंती वापरून लोक एकमेकांना ब्लॉक देऊ लागले.
पण काही काही लोकांची दोन तीन किंवा जास्त अकाउंटही असायची. एका अकाउंटवर आपली खरी माहिती सजवून टाकायचे आणि इतर अकाउंटवर फुलं पानं निसर्ग किंवा मग सिनेमा तारे तारकांचे फोटो वापरले जात.
आता सिनेमा तारे तारका म्हणजे काय ते विचारू नकोस. तो वेगळा विषय आहे. त्याबद्दल बरंच काही बोलता येईल. पण नंतर कधीतरी सांगीन. आता इतकंच सांगतो की आजच्यासारखं सगळ्यांच्या आयुष्यात तेव्हा लोकांना रस नसायचा. उलट फक्त काही लोकांचं आयुष्य उघड्यावर मांडलेलं असूनही त्यात लोकांना फार रस असायचा. या लोकांना तारे तारका म्हणायचे.
तर सिनेमा तारे तारकांचे फोटो लावलेली जास्तीची अकाउंट वापरून लोक आपल्या दबलेल्या भावनांना मुक्त होऊ द्यायचे. बायकांना j1 झालं का? असं विचारणं. पुरुष असूनही स्त्री असल्याचं नाटक करुन आपल्याला शाळेत कधीच सुबोध भावे, भाऊ कदम, कुशल भद्रिके, सागर कारंडे सारखी स्त्री भूमिका करायला न मिळाल्याची भरपाई करणं, आपल्या मूळ अकाउंटवरील पोस्टवर विरोधी मत नोंदवणाऱ्या व्यक्तींशी खोट्या अकाउंटवरुन मैत्री करुन त्याच्या पोस्टवर काड्या करणं, आणि विविध क्लोज्ड ग्रुपमधे ज्वलंत भूमिका मांडणं, असे उद्योग केले जात.
त्याशिवाय त्या फेसबुक नावाच्या डेटिंग साईटवर लग्न झालेले, टिंडर कसं वापरायचं ते न कळणारे आणि इंस्टाग्रामवर प्रत्येक फोटोत आधार कार्डच्या फोटोसारखे दिसणारे लोक आपापल्या पिकल्या पानाचा देठ हिरवा आहे का? ते चाचपून बघायचे. त्यासाठी आपल्या लहानपणीच्या घडलेल्या आणि बहुतांशी न घडलेल्या गोष्टी रंगवून सांगायचे.
बाबा मला कधी कधी वाचून दाखवायचे.
पण मग एकदा काहीतरी वेगळं घडलं. भारत आणि पाकिस्तानमधे तणाव निर्माण झाला. आणि तो जितका तिथे होता त्यापेक्षा जास्त फेसबुकवर दिसू लागला.
काही लोक इतरांना बुळ्या किंवा शेपूटघालू म्हणू लागले. तर उत्तर देताना इतर लोक पहिल्या लोकांना युध्दखोर आणि रक्तपिपासू म्हणू लागले. पण एका गोष्टीवर सगळ्यांचे एकमच झाले की दुसऱ्या गटातले लोक xत्ये आणि देशद्रोही आहेत. त्यामुळे मोठा देशद्रोही कोण? हे ठरवण्याची स्पर्धा सुरू झाली. पण मुळात सगळे भारतीय सहिष्णू असल्याने सगळेजण तो बहुमान दुसऱ्याला देण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे संपूर्ण फेसबुकला तेव्हा नाहिश्या होत चाललेल्या जेवणावळीचं स्वरूप आलं. लोक आग्रह करकरुन दुसऱ्याच्या पोस्टखाली कमेंट करुन देशद्रोहीपणा वाढायचे. तो ताटावर आडवा हात केल्यासारखा आग्रह नाकारायचा. मग पोस्टच्या पंगतीवर आलेले इतर लोक वाढा वाढा असा कालवा करायचे. शेवटी पोस्टकर्त्याच्या पदरात देशद्रोहीपणा टाकूनंच लोक शांत व्हायचे.
मग पुन्हा आपापल्या भिंतीवर जाऊन एकमेकांबद्दल मोठमोठाले निबंध लिहायचे. इकडून एक पोस्ट सूं सूं करत निघायची... लगेच तिचे स्क्रीनशॉट दुसर्या ग्रुपच्या लोकांना मिळायचे... लगेच इकडून दुसरा मोठा निबंध तयार व्हायचा आणि पोस्ट केला जायचा... दोन्ही निबंध फेसबुकवर एकमेकांना भिडायचे... चकचकाट व्हायचा.. अनेकांचे डोळे दिपायचे... काहीजण ब्लॉक व्हायचे... पण इतर खोटी अकाउंट असल्याने हे पोस्टबिंबासुर विकट हास्य करत पुन्हा जिवंत व्हायचे..
हे पोस्टयुध्द आणि कमेंट खणाखणी बघून माझ्या बाबांना त्यांच्या लहानपणी टिव्ही नावाच्या गोष्टीवर रविवारी सकाळी रामायण नावाच्या मालिकेतील युध्दाचं चित्रीकरण आठवायचं.
बाबांच्या लहानपणी टिव्हीवरची रामायण महाभारतातली युध्द होती. माझ्या लहानपणी फेसबुकवरची पोस्ट, निबंध आणि शेलक्या विशेषणांची युध्द होती. पण आता तुझ्या लहानपणी काहीच विशेष घडत नाहीये. मला तर काळजी वाटते पोरा की तुझ्या म्हातारपणी तू तुझ्या मुलांना कसल्या आठवणी सांगशील?
No comments:
Post a Comment