Sunday, February 3, 2019

चिमण्यांचा बहिष्कार

आपले व्यक्तिमत्व कसे बनते? आपली मतं कशी बनतात? आपल्यावर कुणाचा प्रभाव पडतो? आपल्या जोडीदाराचा आणि त्याच्या मूल्यव्यवस्थांचा आपल्यावर कसा आणि किती प्रभाव पडतो? आणि तो किती काळ टिकतो? आपल्याला जो मानसन्मान ज्या लोकांकडून मिळतो त्यामुळे आपली मतं बदलतात का? आपल्याला ज्या टीकेचा, विरोधाचा आणि निंदेचा सामना करावा लागतो त्याचा आपल्या मतांवर काय परिणाम होतो? हे माझे आवडते प्रश्न आहेत. आवडते म्हणजे, अजून ते पूर्णपणे सुटले आहेत असं मला वाटत नाही. आयुष्य दरवेळी काहीतरी नवीन रंग दाखवतं आणि मला सापडलेली उत्तरं पुन्हा तपासून घ्यायला भाग पाडतं. 

परवा एका मैत्रिणीने यू आर अनंतमूर्तीची घटश्राद्ध ही कथा वाचली असा मेसेज पाठवला. एकदम तिचा हेवा वाटला. कारण मी गेले कित्येक वर्ष ही कथा आणि यावरचा चित्रपट शोधतोय. १९७७ साली प्रदर्शित झालेला या चित्रपटाने दिग्दर्शक गिरीश कासारवल्लींनी (किंवा कसरवल्ली किंवा कासरवल्ली किंवा कासरावल्ली; जे असेल ते) चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. पदार्पणाच्या या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि चित्रपटमाध्यमाच्या द्विशताब्दीच्या वेळी केलेल्या आंतरराष्ट्रीय संकलनात हा चित्रपट भारतातून निवडला गेला. सर्वश्रेष्ठ भारतीय चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आहे. चित्रपटही पहायला मिळत नाही आणि कथाही वाचायला मिळत नाही म्हणून मी इतके दिवस शोधाशोध करत असताना मैत्रिणीला कथा वाचायला मिळालीसुद्धा हे कळल्याने मला जगाच्या धावपळीत मागे पडल्यासारखे वाटलं.

तिला ज्या पुस्तकात ही कथा वाचायला मिळाली त्याचा फोटो तिने पाठवला आणि ते पुस्तक माझ्या घरी गेली कित्येक वर्ष असल्याचं मला आठवलं. जेव्हा तो कथासंग्रह विकत आणला होता तेव्हा त्यातील "न संपणारी गोष्ट' ही पहिलीच कथा मनाची पकड न घेऊ शकल्याने मी तो कथासंग्रह कपाटात ठेऊन दिला होता. त्यात घटश्राद्ध आहे हे कळताच धावत जाऊन आधी अनुक्रमणिका शोधली आणि घाईघाईत कुठेपर्यंत पोहोचलो.


छोटीशी कथा असल्याने तिचं सार सांगून अनंतमूर्तीचा अधिक्षेप करत नाही. पण कथेत शेवटी एका ठिकाणी कथानायिकेच्या आयुष्यातील वैयक्तिक दु:खाने परिसीमा गाठलेली असताना तिच्यासमोर ख्रिश्चन धर्मगुरू येतो आणि तिला सांगतो की अश्या अवस्थेत तू घरी परत जाशील तर तुझ्या ब्राह्मण समाजातील लोक तुला बहिष्कृत करतील. त्यापेक्षा तू आमच्याकडे ये. आमचा देव दयाघन आहे. सर्वांच्या पापांना तो क्षमा करतो. पाय घसरलेली तरुण विधवा नायिका ते ऐकत नाही. आपल्या घरी परतते. तिचे लोक तिला बहिष्कृत करतात. तिचे एकाकी वृद्ध वडील तिच्या नावाने श्राद्ध करून जाज्वल्य नीतिमंत असल्याचा लौकिक कमावतात आणि नंतर लगेचच एका कोवळ्या मुलीबरोबर विवाह करून आपल्या संसाराला लागतात. अंघोळ न करता देवमूर्तीला शिवल्याने साप येऊन आपल्याला शिक्षा करणार आहे या भीतीखाली वावरणाऱ्या लहान मुलाइतकीच पापपुण्याची समज असलेला समाज या घटनांना योग्य मानून पुन्हा आपल्या दिनक्रमात गुंतून जातो. कथा वाचून पुस्तक खाली ठेवलं आणि अनंतमूर्तीच्या कथनशैलीबद्दल विचार करत होतो. अतिशय प्रवाही आणि चित्रदर्षी भाषा आणि कमी शब्दात विचार मांडण्याचं कसब ही अनंतमूर्तीची बलस्थानं आहेत. कथेतील अंगावर येणाऱ्या रूढीपरंपरांच्या भयकारी दर्शनाने मी हताश झालेलो असताना माझ्या मनात त्या ख्रिश्चन धर्मगुरूचा प्रसंग पुन्हा पुन्हा येत राहिला.


उजव्या विचारसरणीच्या लोकांत अनंतमूर्ती अजिबात लोकप्रिय नाहीत. जसे आपल्याकडे तेंडुलकर तसे कर्नाटकात अनंतमूर्ती. एकाने 'बंदूक द्या गोळी घालतो' या अर्थाचं विधान काही काळापूर्वी केलेलं होतं तर एकाने 'त्यापेक्षा मी देश सोडून निघून जाईन' या अर्थाचं विधान केलेलं होतं. अनंतमूर्तीच्या निधनानंतर कर्नाटकातील दुसऱ्या फळीतील उजव्या मंडळींनी फटाके फोडून त्याचा आनंद व्यक्त केलेला होता (अर्थात पहिल्या फळीतील नेत्यांनी 'अशी घटना घडली असेल तर ते निंदनीय आहे' अशी सफाई दिली होती आणि आपण 'मरणांती वैराणी'च्या तत्वावर विश्वास ठेवतो असे आपल्या समर्थकांना पटवले होते).

राममनोहर लोहियांचा प्रभाव असलेले अनंतमूर्ती म्हणजे कन्नड वाङ्मयातील मोठं प्रस्थ होते. त्यांची विचारसरणी डावी होती. आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचे ते कट्टर विरोधक होते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले अनंतमूर्ती साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि FTII चे देखील. इंग्रजीचे पीएचडी असलेले अनंतमूर्ती, जेएनयूसहित देशविदेशातील अनेक विद्यापीठात मानद व्याख्याता म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय अनेक सरकारी समित्यांवरही त्यांनी महत्वाची पदे भूषवलेली होती. सात कथासंग्रह; पाच कादंबऱ्या, एक नाटक, तीन कवितासंग्रह, आठ वैचारिक प्रबंध आणि एक आत्मकथन त्यांच्या नावावर आहेत.

आधुनिक कन्नड साहित्यात नव्योदय आणि नव्य अशा दोन परंपरा आहेत. त्यातील नव्य परंपरेचे ते एक समर्थ वाहक मानले जातात. या परंपरेत आयुष्य म्हणजे परंपराशरण कालक्रमण न मानता परंपरांचे अंतरंग शोधून त्यातील त्याज्य गोष्टी टाकून नव्याचा स्वीकार करण्याची प्रवाही घटना मानली जाते. त्यामुळे नव्य परंपरेतील लेखक आणि कवींचे नायक नायिका परंपरेशी झगडताना दिसतात आणि परंपरा योग्य की अयोग्य त्याचा निर्णय ते वाचकांवर सोडतात. नव्य परंपरेतील साहित्याच्या या रेषेत घटश्राद्ध अगदी बरोबर बसते. फक्त माझ्या डोक्यात तो ख्रिश्चन धर्मगुरूचा उल्लेख मात्र घट्ट बसला होता. आणि मला आठवलं की अनंतमूर्तीच्या भारतीपूरचा नायकही परदेशात असताना ख्रिश्चन मुलीबरोबर लग्न न करता राहतो. आणि नंतर भारतात परतल्यावर स्वतःच्या मनातील परदेशी प्रेयसीच्या प्रतिमेशी काही काळ संवाद साधत रहातो. मग मला हेदेखील आठवलं की संस्कृतमधून शिक्षणाची सुरवात केलेल्या आणि माध्व ब्राह्मणांच्या घरात जन्मलेल्या अनंतमूर्तीची पत्नीदेखील ख्रिश्चन आहे.

विचार करत इथपर्यंत पोहोचलो आणि मग आठवले ते अनंतमूर्तीचें साहित्यक्षेत्रातील कडवे विरोधक आणि उजव्या विचारांच्या लोकांचे प्रिय साहित्यिक एस एल भैरप्पा. तत्वज्ञानात डॉक्टरेट केलेल्या भैरप्पांची लेखणी बहुप्रसवा आहे. आजपर्यंत २६ कादंबऱ्या, तीन प्रबंध आणि एक आत्मकथन नावावर असलेले भैरप्पा कन्नडमधील सर्वात अधिक वाचले जाणारे साहित्यिक आहेत. अनंतमूर्तीसमर्थक भैरप्पांना लेखक न मानता वादविवादपटू मानतात तर भैरप्पा समर्थक अनंतमूर्तीना अडीच कादंबऱ्यांचा लेखक म्हणून हिणवतात (संस्कार आकाराने फार लहान कादंबरी आहे). अत्यंत लोकप्रिय असूनही भैरप्पांना राष्ट्रीय स्तरावर केवळ एकच साहित्य अकादमी पारितोषिक मिळाले आहे आणि कन्नड सरकारचा एक राज्य पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना ज्ञानपीठ मिळालेले नाही म्हणून कित्येक कन्नड वाचक नाराज आहेत.


कन्नड साहित्यातील नव्योदय परंपरेतील प्रगतीशील परंपरेचे वाहक असलेले भैरप्पा विविध विषयांवर लेखन करतात. म्हैसूर, नंतर गुजरातमधील सरदार पटेल विश्वविद्यालय नंतर दिल्ली अश्या विविध ठिकाणी तत्वज्ञानाची प्राध्यापकी करत त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची प्रत्येक पात्रे आपापल्या कृतींमागील विचार आपल्याला सांगतात आणि ते विचार बरोबर आहेत की नाही याचा निर्णय भैरप्पा आपल्यावर सोडतात. गरीब ब्राह्मण घरात जन्मलेले आणि लहानपणी प्लेगच्या साथीत मातृछत्र हरवलेल्या भैरप्पांनी शिक्षणाला मध्येच विराम देऊन मुंबईत हमाली केली, नंतर साधूंच्या मागे जीवनाचा शोध घेत फिरले आणि शेवटी पुन्हा शिक्षणाकडे वळून त्यांनी तत्वज्ञानावर आपली पीएचडी पूर्ण केली. सत्य आणि सौंदर्य हा त्यांचा प्रबंध समजून घेण्यासाठी मला कन्नड शिकायची इच्छा आहे. भैरप्पांची पत्नी मात्र ख्रिश्चन नाही.

भैरप्पांच्या धर्मश्री या कादंबरीत ख्रिश्चन धर्मगुरूंचा विपुल उल्लेख आहे. ख्रिश्चन धर्मोपदेशक कशा प्रकारे अज्ञानी लोकांना भुलवून आपल्या धर्माच्या जाळ्यात खेचतात यावर धर्मश्रीमध्ये तपशीलवार शब्दचित्रण केलेलं आहे. आज इंटरनेटवर किंवा टीव्हीवर अंगात येणाऱ्या बायाबापड्या, त्यांच्यासमोर जोरजोरात ओरडणारा धर्मोपदेशकाच्या मंत्रोच्चाराने किंवा स्पर्शाने किंवा हातवाऱ्यासरशी शांत होताना बघून भैरप्पांनी धर्मश्रीमधे केलेलं चित्रण अतिरंजित न वाटता वाचकाला सहजपणे पटतं. एक वाक्य इंग्रजीमध्ये उच्चारवात बोलणारा धर्मगुरू आणि त्याचे वाक्य संपते न संपते तोच त्याहून वरचढ आवाजात मराठी किंवा हिंदी किंवा इतर भारतीय भाषांत भाषांतर करून प्रभुकृपेची शुभवार्ता सांगणारा अनुयायी हे चित्र मी टीव्हीवर नेहमी बघत असल्याने धर्मश्री वाचताना मला भैरप्पांच्या नायकाची बाजू पूर्णपणे पटली होती. धर्मांतराची ही काळी बाजू मला अस्वस्थ करून गेली होती.

पण घटश्राद्ध वाचताना मात्र परित्यक्ता स्त्रीला जेव्हा समाज आधार देत नाही त्यावेळी समाजाला तोंड देण्यासाठी धर्माचा आधार देणारा धर्मगुरू मला काळ्या बाजूचा न वाटता परंपराशरण समाज काळ्या बाजूचा वाटला. आणि धर्मप्रसारासाठी का होईना पण व्यक्तिगत पापभावनेतून बाहेर पडण्यासाठी, परमेश्वराने दिलेलं आयुष्य एका तथाकथित पापाचरणामुळे बहिष्कृत न करता पुन्हा मुख्य प्रवाहात घेण्यास तयार असणारा धर्मगुरू पांढऱ्या बाजूला झुकलेला वाटला.

आणि मग माझ्या मनात या दोन्ही साहित्यिकांबद्दल तुलना सुरु झाली.

दोघेही कन्नड. दोघांचे जन्मस्थान एकमेकांपासून कारने तीन साडेतीन तासांच्या अंतरावर. त्यातल्या त्यात अनंतमूर्ती तर जगप्रसिद्ध उडुपी मठाच्या जवळचे (गावाचे नाव लावण्याच्या दक्षिणेतील प्रथेप्रमाणे त्यांच्या नावातील यू उडुपीचा आहे). दोघांचे शिक्षण म्हैसूरमधले. दोघेही शेवटी बंगळूरात स्थिरावलेले. दोघेही ब्राह्मण. दोघेही आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च शिक्षण पूर्ण केलेले. दोघांचेही बहुतांश नायक ब्राह्मण. दोघांचे नायक / नायिका पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मूल्यव्यवस्थेच्या संघर्षात अडकलेले. दोघांनीही ब्राह्मण समाजातील रुढींचे चित्रण केलेलं आहे. 'राजकारण आणि कल्पित वाङ्मय' हा एकाच्या डॉक्टरेटच्या प्रबंधाचा विषय तर 'सत्य आणि सौंदर्य' हा दुसऱ्याच्या प्रबंधाचा विषय (म्हणजे दोन्ही विषय सौंदर्यशास्त्राशी संबंधित आहेत). एकाच्या प्रोफेसरकीचा सुरवातीचा काळ कम्युनिस्टबहुल केरळमध्ये गेलेला तर दुसऱ्याला स्थैर्य लाभले ते काँग्रेसच्या काळातील गुजराथच्या सरदार पटेल विश्वविद्यालयात (त्यावेळी तिथे उजव्या विचारांच्या पक्षाचे सरकार नव्हते हा मुद्दा मी पुन्हा अधोरेखित करतो आहे).

पण एक डाव्या विचारांचा तर एक डाव्यांच्या तथाकथित दडपशाहीला विरोध करणारा. एक सरकारी समित्यांवर कार्यरत तर दुसरा सरकारी समित्यांपासून दूर. एकाला राज्यपातळीवर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळालेले तर दुसऱ्याला तुलनेने फार कमी सन्मान मिळालेले. एकाचा विवाह आंतरधर्मीय तर एकाचा बहुधा स्वधर्मीय आणि स्वजातीय. एकाच्या कथनात परंपराशरण समाज हा दुर्गतीचे कारण तर परंपरा मोडताना सर्व परंपरा मोडण्याचा आणि गतेतिहासाबद्दल अपराधबोध न बाळगण्याचा दुसऱ्याचा आग्रह. पाश्च्यात्य मूल्यांबद्दल एकाची आस्था तर पौर्वात्य ते टाकाऊ हा गैरसमज रोखण्यात दुसऱ्याला रस.

दोघांच्या नायक नायिकांचा परधर्माशी संबंध येतो खरा पण अनंतमूर्तीच्या साहित्यात जेव्हा नायक / नायिका स्वधर्मातील परंपराशरणतेने हताश झालेले असतात, त्यावेळी असा संबंध येतो (भारतीपूर आणि घटश्राद्ध). याउलट भैरप्पांच्या नायक नायिकांचा परस्परांशी संबंध येण्यापूर्वी परधर्माशी संबंध आलेला असतो (धर्मश्री) किंवा मग त्यांचा परस्परांशी संबंध येऊन ते सुखी असताना एकाला पुन्हा परंपरा आणि जोडीदार यात एकाची निवड करावी लागते (पारखा). त्यामुळे साहजिकपणे दोघांचे नायक नायिका आपल्याला जे सांगू इच्छितात त्या कथनात मोठा फरक पडतो. आणि वाचक मग लेखकाला काय सांगायचं आहे ते सोडून त्याला लेखकाबद्दल काय वाटतं त्याप्रमाणे संपूर्ण लेखन डोक्यावर घेतो किंवा मोडीत काढतो.

खरंतर धर्मांतराची काळी बाजू पुढे आणणाऱ्या धर्मश्रीमध्ये केवळ नोकरी मिळावी म्हणून धर्म बदलून ख्रिश्चन होणारा आणि नंतर आपल्या जुन्या धर्मबंधूंशी कठोरपणे वागणारा पोलीस ऑफिसर आहे. धर्म बदलणारा मुलगा आम्हाला कायमचा मेला असं म्हणणारे त्याचे वृद्ध आईबाप आहेत. म्हणजे भैरप्पांच्या धर्मश्रीमधे आणि अनंतमूर्तीच्या घटश्राद्धमध्ये धर्म बदलणे, आई वडिलांनी नाव टाकणे या गोष्टी समान आहेत. पण नायक आणि त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. भैरप्पांच्या धर्मश्रीमध्ये पोलिसाची नोकरी मिळावी म्हणून धर्म बदलणारा पूर्वाश्रमीचा ब्राह्मण, कथानायक नाही. त्याने धर्मबदल केलेला असून त्याच्या धर्मबदलाचे कारण वैयक्तिक पाप नसून आर्थिक लाभ आहे. याउलट अनंतमूर्तीच्या घटश्राद्धमध्ये परंपरेने पापाचरण ठरवलेले वर्तन करणारी नायिका केंद्रस्थानी आहे. ती धर्म बदलत नसूनही ती जातीबहिष्कृत आणि समाजबहिष्कृत केली जाते आणि ख्रिश्चन धर्मगुरू तिला फक्त मदत देऊ करतात पण ती धर्मबदल नाकारते.

इथपर्यंत पोहोचल्यावर माझ्या मनातल्या विचारांनी अजून एक वळण घेतलं. जर धर्मश्रीमधील पोलीस अधिकारी नायक असता तर भैरप्पांनी त्याची कथा कशी रंगवली असती? आणि जर घटश्राद्धमधील नायिकेने धर्मांतराचा मार्ग स्वीकारला असता तर अनंतमूर्तींनी तिचा भविष्यकाळ कसा रंगवला असता?

हे दोन्ही प्रश्न 'आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काय म्हटले असते?', या प्रकारचे आहेत हे मला मान्य आहे. पण त्यांचा विचार करताना मला वाटतं त्या त्या लेखकाची मनोभूमिका, त्याचे जोडीदार, त्याला मिळणारे मानसन्मान, त्याला सहन करावी लागणारी टीका, त्याच्यावर स्तुतीसुमने किंवा टीकाप्रहार करणाऱ्यांची वैचारिक भूमिका या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात. आणि या सर्वांचा परिणाम कितीही नगण्य का असेना पण एकदा लेखकाला एखाद्या पठडीत बसवणारे त्याचे चाहते आणि विरोधक त्याच्या सर्व विचारांना आपल्यासाठी सोयीस्कर वाटणाऱ्या चष्म्यातूनच बघतात. आणि मग चाहते व विरोधक यांच्या या खेचाखेचीत लेखकाच्या भूमिकाही अधिक टोकदार होत जातात.

त्यामुळे उजव्यांवर कडाडून टीका करणारे अनंतमूर्ती आपोआप डावे ठरतात. त्यांच्या कथनात इथल्या परंपराशरण दमित स्त्री पुरुषांच्या वेदनेला आवाज उमटलेला आहे हे मागे पडते. आणि डाव्यांच्या तथाकथित सांस्कृतिक वर्चस्वावर कडाडून टीका करणारे भैरप्पा आपोआप उजवे ठरतात. आपली मुळे कशी आहेत याचा विचार न करता पाश्चात्य विचारांचे कलम करून घेतल्यावर सैरभैर झालेल्या समाजाचे चित्रण त्यांच्या साहित्यात आहे हे मागे पडते. आणि मग भारतीय परंपरेनुसार दोघांचे समर्थक एकमेकांना अस्पृश्य समजून एकमेकांवर बहिष्कार टाकतात.

मला तर वाटतं भारतीय कशात अग्रेसर आहेत? कोठल्या गोष्टीत ते जगाचं नेतृत्व करू शकतात? या प्रश्नांचं उत्तर एकंच आहे. 'बहिष्कार टाकण्यात'. जो आपल्यासारखा नाही त्याला नाकारणे हे भारतीयांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. हे आपल्या सामाजिक व्यवहारात दिसून येतं.आपल्या साहित्यिक व्यवहारांत दिसून येत.. इतकंच काय पण आपल्या समाजमाध्यमांवरील व्यवहारांतही दिसून येतं. लहानपणी ऐकलं होतं. चिमणीच्या पिल्लाला हात लावला की बाकीच्या चिमण्या त्याला मरून टाकतात, त्याचा बहिष्कार करून टाकतात. बहुतेक भारतीय विचारांचा गाभा चिमण्यांच्या मानसिकतेचा आहे. लगेच बहिष्कार. लगेच वाळीत टाकणे. लगेच मरून टाकणे.

भैरप्पा असोत किंवा अनंतमूर्ती दोघेही आपल्याला चिमण्यांच्या मानसिकतेतून बाहेर यायला सांगत आहेत. फक्त एकाची सुरवात मार्क्सपासून होते तर एकाची आनंद कुमारस्वामींपासून. आपल्याला साहित्याचे मर्म घ्यायचे आहे की आपल्या सोयीस्कर भूमिका साहित्यावर लादायच्या आहेत? सत्याचे सौंदर्य आपण बघणार आहोत की आपल्या आवडत्या सौंदर्यालाच सत्य म्हणून कवटाळून बसणार आहोत? हाच मूळ प्रश्न आहे. आणि हाच या दोन्ही लेखकांच्या डॉक्टरेट प्रबंधाचा विषय होता. एक म्हणतो 'राजकारण आणि कल्पित वाङ्मय' दुसरा म्हणतो 'सत्य आणि सौंदर्य'.

No comments:

Post a Comment