Friday, August 31, 2018

सारं काही परत येतं (भाग १)

शिक्षणाच्या निमित्ताने वाघिणीचं दूध पिणं झालं पण मातृभाषा आणि संस्काराची भाषा मराठी असल्याने विचारांची भाषा मराठीच राहिली. त्यामुळे अनुवादात मूळ लेखनाचा आत्मा जसाच्या तसा उतरेल याची खात्री नसली तरी इंग्रजी पुस्तकांच्या अनुवादाकडे माझं मन ओढ घेतं. कित्येकदा तर अनुवाद वाचून झाल्यावर मी मूळ पुस्तक घेतलेलं आहे. माझ्या नशीबाने मराठीत उत्तमोत्तम अनुवादक असल्याने माझ्यासारख्या धेडगुजरी (किंवा मग धेडइंग्रजी म्हणतो) माणसाची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे पुस्तकांच्या दुकानात माझी एक तरी चक्कर अनुवाद सेक्शनकडे जातेच.

सात आठ वर्षांपूर्वी असाच डोंबिवलीच्या मॅजेस्टिकमध्ये रमलो असताना, खरेदी आटोपली आणि निघताना अनुवादाच्या सेक्शनमध्ये असलेल्या एका पुस्तकाच्या एकुलत्या एका प्रतीकडे लक्ष गेलं. काळ्या रंगाच्या मुखपृष्ठावर सेपिया टोनमध्ये लेखकाचा फोटो, त्यावर पिवळसर रंगात लेखकाचं नाव, खाली गडद आकाशी रंगात पुस्तकाचं नाव आणि पुन्हा पिवळसर रंगात अनुवादकाचं नाव अशी मांडणी असलेलं पुस्तक होतं. शब्दांच्या प्रभावाने गुंग होणारा मी, चित्रकलेत यथातथा असलो तरी मुखपृष्ठावरील चित्रभाषा मला पुस्तकाकडे खेचते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील कृश युरोपियन माणसाचा सेपिया रंगातील फोटो फारसा आकर्षक वाटला नसला तरी कुठल्यातरी अगम्य कारणामुळे मी ते पुस्तक माझ्या हातातील गठ्ठ्यावर ठेवलं आणि बिल बनवून घरी परतलो. आमच्या घरी माझ्या खरेदीची दोन प्रमुख गिऱ्हाइकं म्हणजे मी आणि माझे बाबा. मी इतर पुस्तकं सुरु केली आणि बाबांनी हे अनुवादित पुस्तक.

त्यांचं वाचून झाल्यावर मोजकं बोलण्याच्या आपल्या सवयीनुसार त्यांनी, ‘फार सुंदर पुस्तक आहे, नक्की वाच’ म्हणून मला सांगितलं. मी कामाच्या धबडग्यात अडकलेलो होतो आणि मुखपृष्ठाची चित्रभाषा माझ्यासारख्या प्रेक्षक वाचकासाठी अनाकर्षक होती म्हणून ते पुस्तक माझ्या हातात येत नव्हतं. तोपर्यंत बाबांनी तीनदा वाचून काढलं. प्रत्येक वेळी ते एकंच सांगत होते, ‘ फार सुंदर पुस्तक आहे, आनंद. नक्की वाच’.

नंतर बाबा गेले पण पुस्तकाची आणि माझी वेळ जुळत नव्हती. आणि एक दिवस (पुस्तक विकत घेतल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी) माझ्या आयुष्यात या पुस्तकाची वेळ आली.

पुस्तकाचं नाव ‘सिद्धार्थ. पूर्वेची यात्रा’. लेखकाचं नाव हरमन हेसे आणि अनुवादकाचं नाव त्र्यं वि सरदेशमुख.

प्रस्तावना, लेखकाचं मनोगत वगैरे वाचून मग पुस्तक वाचायचं हा माझा नेहमीचा शिरस्ता; पण या पुस्तकाच्या वेळी का कोण जाणे तो मोडला गेला. त्यामुळे पुस्तकाबद्दल मनात कुठलीही पूर्वपीठिका नव्हती. दिवसभराच्या लेक्चरनंतर रात्री पुस्तक हातात घेऊन सुरवातीची अठ्ठावीस तीस पानं वाचून झाली. बहुतेक रात्रीच्या गुंगीमुळे असावं पण गौतम बुद्धाच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सारखे नसूनही मला मात्र ही कथा गौतम बुद्धाची वाटत होती. नायक क्षत्रिय नसून ब्राह्मण असणे, अविवाहित असणे, त्याला जीवनातील चार दुःखे न दिसता त्याने घर सोडण्याचा निर्णय घेणे हे सारे वाचून ही गोष्ट गौतम बुद्धाची नाही हे अगदी लहान मुलालाही कळणे सहज शक्य होते पण माझ्या आकलनक्षमतेवर गुंगीचा पडदा पडला होता. उपवास करून शरीर कष्टवणारा सिद्धार्थ मला गौतम बुद्धच वाटत होता. त्याच गुंगीत पुढे वाचत असताना मग सिद्धार्थ, गौतम बुद्धाला भेटतो असा प्रसंग आला. आणि माझी गुंगी खाडकन उडाली. पुन्हा पहिलं पान उघडलं आणि प्रस्तावनेपासून वाचायला सुरवात केली.

बाबा जे सांगत होते ते अख्ख्या जगानेही सांगितलेलं होतं. मुखपृष्ठावरील सेपिया रंगातील कृश युरोपियन माणूस म्हणजे लेखक हरमन हेसे यांनी अनुवादकाला पाठवलेले स्वतःचे छायाचित्र होते. हरमन हेसे यांना १९४६ साली साहित्याचे नोबेल मिळालेले होते. १९२२ साली प्रसिद्ध झालेली, ‘सिद्धार्थ’ ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी आहे. माझ्या हातातील एका पुस्तकात त्यांच्या सिद्धार्थ या कादंबरीचा आणि पूर्वेची यात्रा या दीर्घकथेचा किंवा दीर्घकाव्याचा अनुवाद होता. म्हणजे मी ज्याला एक पुस्तक समजत होतो ती खरंतर दोन पुस्तके होती.

हरमन हेसे जर्मन, फ्रेंच आणि स्विस रक्ताचे होते. त्यांचे वडिलांचे वडील डॉक्टर तर आईचे वडील मिशनरी आणि प्राच्यविद्येचे अभ्यासक होते. हेसेंचे वडील आणि आईदेखील मिशनरी होते. आणि त्यांनी आपल्या कवीमनाच्या लहान मुलासोबत काही काळ भारतात घालवलेला होता.

हिटलरच्या जर्मनीने हरमन हेसेंचा तीव्र तिरस्कार केला पण त्यांनी आपल्या लेखनाने मानव आणि समाज यांच्या परिवर्तनाबद्दल अतिशय मूलगामी विचार मांडले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील अतीव नरसंहाराच्या काळात ‘अस्तित्वसत्याला न नाकारता भावसौंदर्य कसे जपायचे’ (अवतारणातील वाक्य अनुवादकाच्या मनोगतातील आहे) ते सांगणाऱ्या काही मोजक्या साहित्यिकातील एक महत्वाचे नाव म्हणजे हरमन हेसे.

प्लेटो, स्पिनोझा, शोपेनहोअर आणि नित्शे यांच्या प्रभावाचे ऋणी असणाऱ्या हेसेंनी 'भारतीय आणि चिनी दर्शनांचा आपल्यावरील प्रभाव अधिक वरचढ होता', असे प्रांजळपणे मान्य केले आहे. मिशनरी लोकांच्या कार्यपद्धतीमुळे दुखावल्या गेलेल्या अनेक भारतीयांना एका मिशनरी जोडप्याच्या मुलाने भारतीय दर्शनांना वापरून लिहिलेली ही कादंबरी वाचून काय वाटेल त्याची कल्पना करून मला मौज वाटली. कदाचित न वाचलेल्या भारतीय दर्शनांबद्दलची कुणाची अस्मिता जागृत होईल आणि सगळं आमच्याकडे पूर्वीपासून आहेच याचा गजर होईल किंवा मग या कादंबरीमुळे मिशनरी लोकांच्या इतर कृत्यांवर पडदा टाकता येणार नाही असा निषेधाचा सूरही निघेल. पण काहीही असो या कवीमनाच्या लेखकाचे वर्णन करताना अनुवादकाने त्यांना ज्ञानेश्वरांच्या भाषेत ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीत बसवलेले आहे, ते मला पूर्णपणे पटलेले आहे.

गौतम बुद्धाच्या काळात, जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी, अस्तित्वाचे प्रयोजन शोधण्यासाठी एक युवक घराबाहेर पडतो. त्याच्या या शोधात तो ब्राह्मण, श्रमण, आणि बौद्ध या विचारांचा अनुनय करतो. साधक, संसारी, व्यापारी, आसक्त आणि विरक्त अश्या अवस्थांतून जातो. त्याच्या शोधप्रवासाची छोटेखानी काव्यात्म कादंबरी म्हणजे सिद्धार्थ. कादंबरीची ही मध्यवर्ती कल्पनाच मला अतिशय आवडली. आणि मी हेसेंच्या नजरेतून सरदेशमुखांच्या सहाय्याने सिद्धार्थाच्या प्रवसाची गोष्ट वाचायला सुरवात केली.


No comments:

Post a Comment