Monday, July 30, 2018

फेसबुकची छळछावणी

लग्नाचा समारंभ आहे. आमंत्रित आनंदी आहेत. हास्य विनोद चालू आहे. वातावरणात उत्साह भरलेला आहे आणि एकाएकी काही आमंत्रितांना गुदमरायला होऊ लागतं. नक्की काय होतं आहे ते कळण्याआधी आमंत्रितांपैकी पंधरा व्यक्ती गुदमरून मृत्युमुखी पडतात. काय घडले असेल त्याचा शोध घेणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना एक योगायोग दिसून येतो की मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्ती नवऱ्यामुलाकडील असतात आणि नाझी छळछावणीतून वाचलेल्या एका वृद्ध महिलेशी रक्ताच्या नात्याने जोडलेले असतात.

मग काही दिवसांनी एका कॉफी शॉपमध्ये अशाच प्रकारे अनेक लोक मृत्युमुखी पडतात. सगळ्यांच्यात एक सामान धागा असतो की या सगळ्या व्यक्तींचे डोळे तपकिरी रंगाचे असतात.

तपास अधिकाऱ्यांना मग पत्ता लागतो तो एका अश्या रासायनिक हत्याराचा की जे प्रचंड गर्दीतही केवळ विशिष्ट गुणसूत्र असणाऱ्या व्यक्तींनाच लक्ष्य करू शकेल. बाकी कुणालाही काहीही न होता केवळ विशिष्ट गुणसूत्रे असणाऱ्या व्यक्तींची जीवनयात्रा संपवू शकेल. अॅमेझॉन प्राईमवर असलेल्या फ्रिन्ज नावाच्या सिरियलच्या दुसऱ्या सीझनच्या चौदाव्या भागाचे हे कथासूत्र आहे.


मला सिरियलमध्ये रस नाही, किंबहुना तो या लेखाचा विषयही नाही. पण एका प्रिय मित्राशी फेसबुकच्या जाहिरात मॉडेलबद्दल बोलत असताना त्याला हा एपिसोड आठवला आणि मला जे सांगायचे आहे त्याची व्याप्ती समजून घेण्यासाठी हा एपिसोड अतिशय चपखल उदाहरण आहे. शेजारी उभ्या असलेल्या माणसाला काही होत नाही पण तुमच्यातील विशिष्ट शारीरिक गुणांमुळे तुमचे जीवन संपवेल इतका घातक परिणाम घडवून आणता येऊ शकतो, ही कल्पना अतिशय भयानक आहे. असं एखादं तंत्रज्ञान जर नाझी जर्मनीच्या हाती लागलं असतं तर विविध ठिकाणी छळछावण्या उभारून जगभरातील ज्यूंना तिथे आणून मग त्यांच्यावर अत्याचार करण्यापेक्षा त्यांनी जगभर असे घातक विषारी वायू सोडून, इतर कुणाच्या नखालाही धक्का न लावता आरामात ज्यू लोकांचे प्राण घेतले असते.

असे रासायनिक तंत्रज्ञान अजून प्रगत झालेले नाही हे आपले सुदैव आहे पण समाजमाध्यमांवर मात्र या तंत्राच्या जवळपास जाऊ शकेल अशी प्रगती झालेली आहे. २०१९ ला भारतात पुन्हा निवडणुका होतील. त्याचे पडघम आता वाजायला सुरवात होईल आणि यावेळी या निवडणुकांच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांकडून समाजमाध्यमांवरही मोठा धुरळा उडेल. आणि कदाचित त्यातून समाजातील अनेकांची मने एकमेकांबद्दल कायमची दूषित होऊन बसतील. सरकार कुणाचेही येवो पण समाजमाध्यमांवर उडू शकणाऱ्या या धुरळ्यामुळे कुणाच्याही मनात कायमचे विष कालवले जाऊ नये या इच्छेपोटी हा लेख लिहिला आहे.

या लेखात मी जी शक्यता मांडली आहे तसेच होईल याची मला खात्री नाही. किंबहुना असे झाले नाही तर त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद मला होईल. पण दुर्दैवाने कुठल्याही पक्षाकडून हा मार्ग चोखाळला गेला तर किमान माझ्या मित्रांनातरी त्याचा त्रास न व्हावा अशी इच्छा आहे.

गूगल आणि फेसबुकच्या जाहिरातींचे मॉडेल पूर्णपणे वेगळे आहे. तुम्हाला कुठली जाहिरात दाखवायची हे गुगलला; तुम्ही काय शोधता? तुम्ही काय बघता? तुम्ही कुठल्या वेबसाईट्सना भेट देता; यावरून कळते. गूगल तुम्हाला दाखवत असलेल्या जाहिराती ‘तुम्ही कोण आहात?’ यावर अवलंबून नसतात. तर 'तुम्ही सध्या काय शोधताय?' यावर अवलंबून असतात. गुगलच्या जाहिराती संपूर्ण इंटरनेटवर विविध वेबसाईट्सवर पसरलेल्या असतात. गुगलच्या जाहिराती बघायला तुम्ही गुगलच्या वेबसाईट्सवर जात नाही तर तुम्ही जिथं जाल तिथे तुम्हाला गुगलच्या जाहिराती दिसतील. म्हणजे मी दाढीच्या सामानाबद्दल गूगल सर्च करून मग नंतर युट्युबवर अंदाज अपना अपना हा चित्रपट बघायला गेलो तर मला चित्रपटाच्या खाली आणि मधेमधे दाढीच्या सामानाच्या जाहिराती दिसतील पण माझ्या बायकोने लिपस्टिकबद्दल गूगल सर्च करून नंतर अंदाज अपना अपना बघायला युट्युब वापरले तर जिथे मला दाढीच्या जाहिराती दिसत आहेत तिथे तिला लिपस्टिकच्या जाहिराती दिसतील. आणि ज्या वेबसाईट्सवर गूगलच्या जाहिराती दाखवतात त्या सर्व वेबसाईट्सवर आम्ही आपापल्या लॅपटॉपवरून किंवा मोबाईलवरून गेलो तर तिथेही हाच प्रकार होईल.

गंमत म्हणजे समजा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला भेट म्हणून मी हिला लिपस्टिक आणि हिने मला दाढीसाठी ट्रीमर देण्याचं ठरवून त्याबद्दल गूगल सर्च केलं असेल तर तिला पुढे ट्रीमरच्या तर मला लिपस्टिकच्या जाहिराती दाखवून गूगल शांत होईल. याचा अर्थ गूगल तुमचे प्रोफाईल बनवत नाही असा नाही पण जितक्या स्पष्टपणे आपण फेसबुकवर आपली माहिती स्वतःहून देतो तितक्या स्पष्टपणे स्वतःहून गुगलकडे माहिती देत नाही. अॅड्रॉईड, क्रोम आणि विविध अॅप्सच्या माध्यमातून गूगल आपल्याबद्दल विश्वास बसणार नाही इतकी माहिती गोळा करत असते. याउलट फेसबुकवर ही माहिती आपण फेसबुकसाठी, तिथल्या जाहिरातदारांसाठी आणि उर्वरित जगासाठी स्वतःहून देत असतो.

म्हणजे सर्च करणारा पुरुष आहे की स्त्री? तरुण आहे की वृद्ध? सिंगल आहे की मॅरिड याचा उपयोग गूगलच्या जाहिरातींपेक्षा फेसबुकच्या जाहिराती अधिक प्रभावीपणे करतात.

कारण फेसबुक वापरण्याची आपण सगळ्यांची पध्दत गूगल वापरण्याच्या पध्दतीपेक्षा वेगळी आहे. आपण गूगलच्या वेबसाईटवर थांबत नाही, सर्च करून पुढे जातो. याउलट आपण फेसबुकवर रमतो. दिवसाचे तासन् तास इथे घालवतो. आपण कुठे रहातो, कुठल्या भाषा बोलतो, आपला फोन नंबर काय, आपल्याला कुठली पुस्तके आवडतात, चित्रपट आवडतात, संगीत आवडते, आपले शिक्षण कुठपर्यंत झाले आहे, आपण कुठल्या हुद्द्यावर काम करतो; याची माहिती नोंदवून ठेवतो. आपला आवडता नट, नटी, राजकीय पुढारी, राजकीय पक्ष, चित्रपट, चित्रपटविषयक कार्यक्रम वगैरेंची पेजेस असतील तर तीही लाईक करून ठेवतो. आणि रासायनिक अस्त्राला लाजवेल अशी स्फोटक तयारी फेसबुकला आणि फेसबुकवरील जाहिरातदारांना करून देत असतो. कारण आपली शारीरिक गुणसूत्रे कुणाला कळली नाहीत तरी आपली सामाजिक गुणसूत्रे आपण जगजाहीर करुन ठेवतो.

फेसबुकवर तुम्हाला दिसणारी जाहिरात तुम्ही काय शोधता यावर अवलंबून नसते, तर तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे राहता, तुमचे वय, लिंग, हुद्दा, भाषा, मूळगाव, आवडी निवडी यासारख्या घटकांवर म्हणजे तुम्ही जाहीर केलेल्या सामाजिक गुणसुत्रांवर अवलंबून असते.

फेसबुकच्या अॅड मॅनेजरमध्ये जेव्हा एखादी जाहिरात तयार केली जाते तेव्हा ती कुणाला दिसावी याचे परिपूर्ण नियोजन करण्याची संधी जाहिरातदाराला मिळते. म्हणजे माझ्या क्लासची जाहिरात फेसबुकर करताना मी फेसबुकला असे सांगू शकतो की माझ्या क्लासची जाहिरात फक्त डोंबिवली आणि पुणे या शहरात राहणाऱ्या, फक्त १८ ते २० वयोगटातील मुलं आणि मुलींना दाखव. मला क्लासमध्ये केवळ उच्चभ्रू पालकांची मुलं हवी असतील तर मी फेसबुकला असेही सांगू शकतो की ही जाहिरात फक्त इंग्रजी भाषा येणाऱ्यांना दाखव, किंवा मग ज्यांनी व्होडाफोनच्या पेजला लाईक केलं आहे त्याच लोकांना दाखव, किंवा मग ज्यांना ऑडी गाडी आवडते आहे, ज्यांनी क्लब महिंद्राच्या पेजला लाईक केले आहे त्यांनाच दाखव.

यावर कुणी म्हणेल की यात वाईट काय आहे? धुरळा, रासायनिक अस्त्राला लाजविणारी ताकद कुठे आहे?

तर थोडा विचार करून बघा. जाहिरात फक्त वस्तू किंवा सेवांची नसते. जे गूगलवर सहजी शक्य नाही ती ताकद फेसबुकवर सगळ्यांना मिळते. फेसबुकवर कुणीही कुठल्याही विषयाला वाहिलेलं पेज तयार करू शकतो. आणि मग त्या पेजची जाहिरात करुन त्या पेजवरील बातम्या, चित्रे, फोटो, व्हिडिओ इतरांनी पहावेत म्हणून मी फेसबुकवरुनंच जाहिरात करू शकतो.

म्हणजे समजा मला समाजात तेढ पसरवायची आहे. मग मी माझ्या पेजची, अॅपची, वेबसाईटची जाहिरात कुणाला दाखवायची ते फेसबुकला सांगताना असे सांगू शकतो की, 'हे झुकरबर्ग माझी जाहिरात मुंबईत राहणाऱ्या, पण मूळच्या उत्तर प्रदेशातील, आणि संजय निरुपम यांचे पेज लाईक करणाऱ्या वय वर्षे २५ ते ४५ मधील, पुरुषांनाच दाखव. किंवा मग माझी जाहिरात ‘I hate Modi’ किंवा ‘I hate Rahul Gandhi’ किंवा ‘I love Modi’ किंवा ‘I love Rahul Gandhi’ किंवा तत्सम पेज लाईक करणाऱ्या, १८ ते ७५ वयोगटातील स्त्री पुरुषांना दाखव. किंवा माझी जाहिरात बहुजन समाज पार्टीचे पेज लाईक करणाऱ्या लोकांनाच दाखव.' त्यामुळे तुम्हाला फेसबुकवर दिसणाऱ्या जाहिराती तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्राला दिसणाऱ्या जाहिरातींपेक्षा वेगळ्या असू शकतील. या जाहिराती त्याला न्यूजफीडमध्ये दिसू शकतील किंवा मेसेंजरमध्ये दिसतील.

आणि या जाहिराती, जाहिरातदाराच्या विषयाला पुढे आणण्यासाठीच असाव्यात असे बंधन फेसबुक घालत नाही. किंबहुना निवडणुकीच्या निमित्ताने दुष्प्रचार करणारी, खोट्या बातम्या देणारी पेजेस तयार केली जातात. आणि ट्रोल्सचे सैन्य सर्व चर्चांमधे घुसून भडक कमेंट्स करून सर्वसामान्य माणसांच्या मनात विष पेरत रहाते. हाच प्रकार अमेरिकेतील निवडणुकांच्या वेळी केंब्रिज अॅनालिटिकाने आणि रशियन हॅकर्सने केला होता.

म्हणजे आपल्याकडे दलितांवर अत्याचार झाला अश्या खऱ्या किंवा खोट्या बातम्या देणाऱ्या पेजची जाहिरात केवळ एका राजकीय पक्षाच्या पेजला लाईक करणाऱ्या लोकांना दिसतील, तर मुसलमानांनी काय खरे खोटे अत्याचार केले याच्या बातम्या देणाऱ्या पेजच्या, वेबसाईट्सच्या जाहिराती एका धर्माचे अनुयायी असणाऱ्या लोकांना दिसतील. हिंदू, बौद्ध, जैन, मुसलमान, शीख अश्या विविध धर्माच्या अनुयायांना वेगवेगळ्या जाहिराती दिसतील आणि त्यातही पुरुषांना, स्त्रियांना, तरुणांना, वृद्धांना, अधिकाऱ्यांना, कारकुनांना, डॉक्टरांना, वकिलांना वेगवेगळ्या जाहिराती दिसतील. आणि प्रत्येकाच्या मनात इतर समाजाविषयी चुकीच्या धारणा पसरविणे सोपे जाईल.

मग यातून बाहेर कसे पडायचे?

प्रश्न कठीण वाटला तरी उत्तरे सोपी आहेत.

१) कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या hate pages ना लाईक न करणे.
२) कुठलीही बातमी, शहानिशा न करता शेअर न करणे
३) भडक चित्रे, चिथावणीखोर भाषा किंवा व्हिडीओ असलेल्या बातम्या देणाऱ्या पेजेसना लाईक न करणे. त्यांच्या पोस्ट्स शेअर न करणे.
४) कुठलीही पाशवी अत्याचाराची बातमी आली तर त्यावरून रान पेटवण्याआधी, जर फेसबुक नसते तर अश्या बातम्या कानी पडल्यावर आपण काय केले असते असा प्रश्न स्वतःला विचारणे, आणि मग मन शांत झाल्यावर योग्य शब्दात व्यक्त होऊ याची खात्री झाल्यावर समाजमाध्यमांवर आपले मत किंवा विचार मांडणे.
५) सरकार कुठलेही येवो आपल्या समाजातील लोकांच्या चांगुलपणावरील आपला विश्वास ढळू न देणे.

हे करू शकलो तर अनेक निवडणुका आणि अनेक वादळे आपण सहज पचवू शकू.

Wednesday, July 25, 2018

चपखल

भिकबाळी (किंवा बिगबाळी जे काय असेल ते) घातलेले, हातात मोठाली कडी किंवा ब्रेसलेट घातलेले किंवा गळ्यात पदक असलेल्या चेन घातलेले पुरुष जेव्हा मी बघतो तेव्हा मला त्यांचा अतिशय आदर वाटतो. म्हणजे हे लोक हे असं सगळं कसं काय बरं वागवत असतील? या प्रश्नाने मी हैराण होतो. कामासाठी घराबाहेर गेल्यावर थोड्या वेळातच हातातील घड्याळ आणि खिशातील पाकिटाचंही मला ओझं होतं. घाम आल्यावर घड्याळ नकोसं होतं आणि खुर्चीवर बसताना मागील खिशातील पाकीट अनावश्यक ऍक्युप्रेशर करतंय असं वाटल्याने मी अस्वस्थ होतो.

केसांच्या वेगळ्या रचना करणारे किंवा केस रंगवणारे किंवा पोनीटेल बांधणारे किंवा शाळकरी मुलींसारखा हेअरबॅण्ड घालणारे पुरुष जेव्हा मी पहातो किंवा झिरमिळ्यांची ओढणी घेऊन सलवार कुडते घालून सराईतपणे वावरणारे पुरुष पाहतो तेव्हा मला मनातल्या मनात त्यांच्याबद्दल हेवा वाटतो. पुढे जाऊन मी हिंदी सिनेमाच्या हिरोसारखे मधोमध भांग पाडून त्याचा कोंबडा मिरवू नये याची काळजी घेत परमेश्वराने माझे केस साळींदराच्या काट्यांच्या गुणधर्माचे बनवून मला या भूतलावर पाठवले. आणि दाढीच्या बाबतीत आपल्याला दाढी नीट दिसेल का? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत दाढी पांढरी होण्याची वेळ झाली. डोकं आणि खांदे या दोघांच्या मध्ये मान नावाचा एक अवयव देताना विधात्याने हात आखडता घेतल्याने आणि आमच्या मालीशवाल्या बाईंचा ‘ईश्वरेच्छा बलियसी’ वर विश्वास असल्याने ओढणी कुठे लटकवावी हा प्रश्न माझ्या बाबतीत माझ्या हयातीत सुटणार नाही. त्याशिवाय त्या झिरमिळ्यांच्या ओढणीत नेहमी काहीतरी अडकते किंवा मग ती ओढणी स्वतःच कशाततरी अडकते आणि माझ्या कूर्ममानेला ओढ देऊन आपले ओढणी हे नाव सार्थ करते.

केवळ ली कूपर किंवा हश पपीजचे बूट वापरणारे, अॅरो किंवा व्हॅन हयूसेनचेच शर्ट्स वापरणारे, फुलशर्टच्या बाह्या जोडण्यासाठी बटन न वापरता महागाचे कफलिंक्स वापरणारे, रेबॅनचा गॉगल वापरणारे किंवा मग टॉमी हिलफिगरचं घड्याळ वापरणारे, फोन कंपनीने नवीन मॉडेल बाजारात उतरवताच ते विकत घेणारे लोक पाहून मी अचंबित होतो. अर्थशास्त्रातील उपयोगितेचे तत्व यांना आणि ध्यानाकर्षी खरेदीचे तत्व मला शिकवू न शकलेल्या शिक्षकांबद्दल मला सहानुभूती वाटावी की राग यावा ते न कळल्याने मी गोंधळात पडून गप्प बसतो.

मादक पेयांची माझी व्याख्या ही द्राक्षासवापर्यंतच संपत असल्याने टकीला, शॉट्स, पेग, क्वार्टर असे शब्द वापरणारे, वेगवेगळ्या ब्रॅंड्सची नावं आणि त्यांची वैशिष्ट्ये माहिती असणारे पुरुष जेव्हा मी पाहतो आणि विशेषतः हॉटेलमध्ये वेटर अदबीने बाटली घेऊन आल्यावर त्याला हात लावून कसला तरी विचार करून त्याला होकार किंवा नकार देणारे पुरुष जेव्हा मी पाहतो तेव्हा मला माझ्या अज्ञानाचा महासागर किती अथांग आहे याची जाणीव होते.

कुठल्याही संगीताच्या मैफलीत माना डोलावणाऱ्या, वा वा करणाऱ्या लोकांबद्दल तर मला अतीव आदर आहे. म्हणजे ही जागा वाहवा करण्याची आहे हे यांना कसं कळत असेल त्याचं मला भयंकर कुतूहल आहे. रागांची नावे चटकन ओळखणारे, कुठली गाणी कुठल्या रागावर बांधली आहेत ते चटकन सांगू शकणारे लोक पाहून माझी मती गुंग होते. इथे मला गाण्याचे बोल लक्षात रहायची मारामार आणि यांना राग, त्याची द्रुतलय की मध्यलय वगैरे गोष्टीही इतक्या आरामात समजतात ते पाहून यांच्याबद्दल आणि यांच्या संगीतशिक्षकांबद्दल माझ्या मनात अपार आदर दाटून येतो.

आपण अभिनय करू शकतो, गाणं म्हणू शकतो, चित्र काढू शकतो, कविता करू शकतो, लेखन करू शकतो, मूर्ती घडवू शकतो; आणि पुढे आयुष्यभर आपल्याला हेच करायचं आहे; हे काही लोकांना नक्की केव्हा कळत असेल हादेखील एक न सुटलेला प्रश्न आहे. म्हणजे मला या सर्व कलांपैकी एकही कला येत नाही हे माझ्या शिक्षकांनी कमी मार्क देऊन किंवा विविध गुणदर्शनच्या स्पर्धेत शिरकाव करण्याच्या माझ्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडून जाहीर रित्या सुचवायचा प्रयत्न केला. आणि मी ही गुर्वाज्ञा शिरसावंद्य मानून या कलांच्या वाट्याला गेलो नाही.

आपण कुणालाही गाढवात काढू शकतो, आपण फेसबुकवरून मोठमोठ्या राजकारण्यांना सल्ले देऊ शकतो, त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना शाब्दिक चिमटे, गुद्दे, कोपरखळ्या, धपाटे इतकेच काय पण लाथाळ्याही करू शकतो अशी खात्री असलेल्या अनेक फेसबुकी विद्वानांबद्दल तर मला अतीव भीतीयुक्त आदर आहे. इथे मी सोसायटीच्या सेक्रेटरीला साधं पत्र लिहिताना डिअर सर लिहू की रिस्पेक्टेड सर लिहू यावर अडखळतो. त्यामुळे फेसबुकवर काही लोक नेत्यांना पप्पू, फेकू, उठा, पेंग्विन अश्या शेलक्या विशेषणांनी संबोधताना बघून मला हे सगळे लोक दाऊदपेक्षा जास्त धैर्यशील वाटतात. नावडत्या पक्षाच्या नेत्याबद्दल आणि त्याच्या अनुययांबद्दल बोलताना यांच्या वाणीला जो त्वेष चढतो तो पाहून आज लोकमान्य असते तर त्यांनी पुनश्च हरिओम वगैरे करण्याऐवजी अग्रलेख लिहिण्याच्या कामी यांची नेमणूक करुन स्वतः पुन्हा गणित किंवा गीतेत डोकं घातलं असतं आणि यांच्या अग्रलेखातील ज्वल्जहाल भाषेला टरकून स्वदेशीयांचं सरकारही इंग्रजांबरोबर भारत सोडून इंग्लंडला परतलं असतं.

यांच्या घरी कधी काही साधा प्रॉब्लेम झाला तर ही मंडळी सरळ फोन उचलून पप्पूला किंवा फेकूला किंवा उठांना आज्ञा करतील आणि त्या आज्ञेतील जरब ओळखून हे नेतेही धावत धावत, तातडीने, विजेच्या वेगाने, निमिषार्धात यांची कामं करून देतील याची मला खात्री आहे. किंबहुना यांच्या घरची कोथिंबीर, घेवडा, गवार वगैरे निवडून झाल्यावर, दिवसातून अर्धाच तास पाणी येणाऱ्या यांच्या बाथरूममधील ड्रम भरून झाल्यावर मग ही नेतेमंडळी देशाच्या कारभारात लक्ष घालत असावीत असा माझा कयास आहे.

फेसबुकवर सक्रिय होण्याअगोदर आपण ३६ आणि ३८ च्या मधील कंबर असल्याने रेडिमेड पॅन्ट जशीच्या तशी वापरू न शकणारे, ९ आणि १० च्या मधील मापाचा पाय असल्याने मोठे बूट घेऊन पुढे कापूस घालून वापरणारे असे जन्मजात कुठेही चपखल न बसणारे आहोत हे समजून चुकले होते.

पण आता फेसबुकवर सक्रिय झाल्यानंतर ‘आपल्याला नक्की काय हवंय? आपल्याला जे हवंय तेच योग्य का आहे? आणि आपल्याला जे नकोय ते टाकाऊच का आहे?’ याबद्दल आपल्याला काहीच ठाम मते नसल्याने आपण इथेही चपखल न बसणारे आहोत हे नक्की कळले आहे.

Wednesday, July 18, 2018

पुनः त्वम् मूषक: भव

आज तीन घटना घडल्या.

एका जिवलग मित्राने माझ्या पोस्टवर चर्चा सुरु करून लगेच स्वतः थांबवली.

एका मैत्रिणीच्या पोस्टवर मी दंगा करत असताना अजून एका मित्राने मी आऊट ऑफ लीग आहे असे मला बजावले.

(स्वतःच्या) कारमधून (स्वतःच्या) बायकोबरोबर (स्वतःच्या) घरी येत येतो. एफ एम वर अमिताभ बच्चन झीनत अमानला आरडीच्या आवाजात पटवून देत होता की बाई गं ‘समुद्रात न्हायल्यामुळे तू चविष्ट झाली आहेस.’ ‘नमकीन हो गयी हो’ चं भाषांतर मी, ‘चविष्ट झाली आहेस’ असं केल्यामुळे बायको हसू लागली. मग मला स्फुरण चढलं. ‘माझ्या नजरेची तू ही आता शौकीन झाली आहेस’, हे सध्याच्या काळात, ‘माझ्या व्हॉट्सअप किंवा मेसेंजर किंवा अजून कुठल्यातरी मेसेजची तू पण वाट बघत असतेस’ असं रूपांतर झालेलं आहे असा सिद्धांत मांडून मी गाण्यावर, प्रेमाच्या अभिव्यक्तीच्या बदलत्या रूपावर, शारीर स्वरूपावर निरूपण करत गेलो. थोड्या वेळाने बायकोकडे वळून पाहिलं तर कळलं की ती पेंगत होती.

आणि या तीन घटनांचा परिपाक म्हणून एकदम शाळेतल्या संस्कृत विषयाच्या पुस्तकातील एका धड्याचं शीर्षक, एखादा जटा कमंडलूधारी ऋषी हातात अभिमंत्रित जल घेऊन माझ्या दिशेने भिरकावत शापवाणी उच्चारल्याप्रमाणे म्हणतोय “पुनः त्वम् मूषक: भव’; असंच वाटलं.

गोष्ट अशी होती की एक ऋषी असतो. त्याला एक उंदीर सापडतो. मग त्या उंदराला तो सांभाळतो. एकदा उंदीर म्हणतो की मला मांजराची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या उंदराला मांजर करतो. काही दिवसांनी मांजर म्हणते की मला कुत्र्याची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या मांजराला कुत्रा करतो. मग काही दिवसांनी कुत्रा म्हणतो की मला वाघाची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या कुत्र्याला वाघ करतो. वाघ झाल्यावर तो ऋषीकडे बघून गुरगुरतो आणि ऋषीवर झेप घेतो. ऋषी कमंडलूतील पाणी हातात घेतो, त्याला अभिमंत्रित करून वाघावर फेकतो आणि शापवाणी उच्चारतो की, ‘वाघा रे, पुनः त्वम् मूषक: भव’ आणि वाघाचा पुन्हा उंदीर होतो.

मी गाणी बिणी म्हणायचो. सुलटी आणि उलटीही. मी भरपूर पुस्तकं वाचायचो. पण मित्र फार नव्हते. त्यामुळे स्वतःशीच गप्पा मारायचो. शाळेच्या नाटकांत काम करायचो. त्यातही मला सालस मुलगा, पांढरा रंग अश्या भूमिका मिळायच्या. मग डोक्यात येणारे विचार धाकट्या भावाला, आईला आणि बाबांना ऐकवायचो. त्याचे महत्व जाणून किंवा मग त्याचा कंटाळा येऊन त्यांनी मला ‘तू हे सगळं लिहून ठेव’ असा सल्ला द्यायला सुरवात केली.

पण तोपर्यंत माझी प्रेयसी आयुष्यात आली. डोळ्याच्या पापण्यांची पिटपिट करत ती ज्याप्रमाणे माझ्याकडे बघत होती त्यामुळे तिला माझे विचार आवडतात असा माझा समज बळकट व्हायला सुरवात झाली. म्हणून मी घरच्यांशी बोलण्याऐवजी तिच्याशी भरपूर बोलू लागलो. कदाचित त्याचमुळे आई बाबा आणि धाकटा भाऊ या तिघांना ती फार चटकन आवडली असावी. मग तिच्याशी लग्न झालं. ती घरकाम करते आहे आणि मी बडबड करतो आहे असं आमच्याकडचं कायमचं दृश्य असायचं. कधी कधी मी बोलण्यात इतका गुंग होऊन जायचो की ती काम संपवून झोपी गेली आहे हे मला कळायचं सुद्धा नाही. शेवटी ती आमच्या घरात पूर्णपणे एकजीव झाली आणि तिनेही तोच सल्ला द्यायला सुरवात केली की, ‘अहो, नुसतं बोलून वाया घालवू नका. तुम्ही हे सगळं लिहून ठेवा’

तसा मी आज्ञाधारक नवरा असल्याने मी फेसबुकवर लिहू लागलो. इथे अनेक मित्र आहेत. त्यांच्या भिंती बघत होतो. त्यावर कमेंट करू लागलो. मग स्वतःच्या भिंतीवरही लिहू लागलो. आता बघतो तर मला जाणवतं आहे की इतरांच्याच काय पण माझ्या पोस्टवरील कमेंटमध्येही भरपूर दंगामस्ती करणारा मी, पोस्टचे विषय मात्र बहुतेकदा गंभीर निवडतो. मग अजून एक गंमत जाणवली की शाळेत भरपूर उपक्रमात भाग घेऊनही माझा मित्रपरिवार फार छोटा होता. इथे फेसबुकवरही भरपूर बडबड करूनही माझा मित्रपरिवार फार मर्यादित आहे. शाळेतील नाटकात माझ्या वाटेला सोज्वळ माणूस, पांढरा रंग अश्याच भूमिका यायच्या. आणि माझा मित्र सुयश म्हणतो त्याप्रमाणे फेसबुकवरही माझी प्रतिमा सोज्वळ माणसाचीच आहे. आणि या सर्वावर चेरी ऑन द केक असावी तशीच माझी इथली ओळखही माझ्या #आपुला_संवाद_आपणाशी या सिरीजमुळेच आहे.

म्हणजे शाळेत असो वा घरी वा प्रेयसीबरोबर वा बायकोबरोबर वा आता इथे समाजमाध्यमांवर प्रत्येक नवीन चक्राचा शेवट स्वतःशीच बोलण्यात होतो आहे. जणू प्रत्येक वेळी ऋषी सांगतोय की कुठल्याही गटात, नात्यात तू कितीही मोठं वर्तुळ तयार केलंस तरी शेवटी तू शेवटी स्वसंवाद करण्याच्या लायकीचा आहेस.

सगळी वर्तुळं अशीच पूर्ण होताना बघून एकदम चपराक बसल्यासारखं झालं. म्हणून गुपचुपपणे अमेझॉन प्राईमवर मिस्टर रोबोट ही इंटरनेट हॅकिंगवर असलेली सिरीयल मुलांबरोबर बघायला बसलो. एपिसोड संपला. आणि मुलांना टीसीपी आयपी मधील थ्री वे हॅन्डशेक, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक वगैरे संकल्पना समजावून सांगू लागलो. मुलांचे डोळे कुतूहलाने आणि नवीन काहीतरी कळतंय या आनंदाने भरलेले दिसत होते. त्यामुळे स्फुरण चढून अजून रंगवून रंगवून सांगू लागलो. आणि एकाएकी मला जाणवलं की नवीन वर्तुळ चालू झालं आहे. कदाचित याचा शेवटही स्वसंवादात होईल. कदाचित इथेही मुलं चर्चा सुरु करून मधेच मागे सरतील. कदाचित त्यांनाही झोप लागेल. कदाचित तेही मला सांगतील, ‘बाबा, तू हे सगळं लिहून ठेव.’ आणि मग मला नवनवीन वर्तुळात टाकणारा अदृश्य ऋषी मंद स्मितहास्य करत असेल. कारण त्याला आता मंतरलेलं पाणी माझ्यावर फेकून शापवाणी उच्चारायची गरज पडणार नाही. कारण आता मला शेवट माहिती आहे.

शेवटी मी स्वसंवादासाठी बनलो आहे.

अमृतातेही पैजा जिंके

दिवसभर धो धो पाऊस कोसळत असतो.

आपण आठवडाभर घरात मदत न केल्याने आज अंग चोरुन बसणं शक्य नसतं. त्यामुळे आपण घरच्यांसाठी निमूटपणे दिवसभर वाहनचालक बनणं मान्य करतो.

सकाळपासून चार फेऱ्या मारुन होतात. मग आपल्याला वाढलेल्या दाढीची आठवण होते. आपण पुन्हा चारचाकी काढतो. तेवढ्यात अर्धांगाला अजून एक काम आठवतं. मग आपण वाहनचालकाच्या भूमिकेत शिरतो.

पाऊस कोसळत असतो.

कामं पूर्ण होतात. बाजारात असताना, अर्धांग शेजारी बसलेलं असताना आपण दुकानात फोन करुन गर्दी आहे का ते विचारतो. त्यावर गेली 26 वर्षे आपली श्मश्रू / क्षौर करुन मित्र झालेला दुकानदार आपल्याला लगेच बोलावतो. सकाळपासून आपण केलेल्या सेवेमुळे प्रसन्न झालेलं अर्धांग गाडीत बसून वाट पहायला तयार होतं.

पाऊस कोसळत असतो. आपण कशीबशी जागा शोधून गाडी उभी करतो. दुकानाकडे धाव घेतो. आपला मित्र समोर बसलेल्या गिऱ्हाईकाला बांधलेलं फडकं काढत असतो.

आपल्याला खुर्चीत बसायला सांगतो. पांढरं शुभ्र कापड आपल्या गळ्याभोवती बांधून दाढीवर पाणी मारतो. आता तो वस्तरा हातात घेणार इतक्यात आधीचं गिऱ्हाईक झालेल्या कामात सुधारणा सुचवतो. आपल्याला तसंच सोडून मित्र आधीच्या गिऱ्हाईकाकडे पुन्हा वळतो.

एका गिऱ्हाईकाची अर्धी दाढी करुन दुसर्‍या गिऱ्हाईकाकडे वळणाऱ्या रस्त्याकडेच्या न्हाव्याच्या गोष्टीची आठवण आपल्या डोक्याचा ताबा घेते.

जुन्या गिऱ्हाईकाने वेळ खातं. आणि इतका वेळ गाडीत थांबलेल्या अर्धांगाचा फोन येतो. गुंडाळलेल्या पांढऱ्या कापडातून शर्टाच्या खिशातील फोन आपण कसा बसा बाहेर काढतो. 'हो. हो. आलोच आलोच' म्हणत आपण फोन समोर आरशाखालच्या टेबलावर ठेवतो. अर्धांग गाडीत बसलं आहे ही सत्यपरिस्थिती आपण 26 वर्ष जुन्या मित्राला सांगतो.

बाका प्रसंग ओळखून तोही कामाची घाई करतो. इतक्यात त्याला लागोपाठ दोन फोन येतात. वेळ गेल्याने आपण चुळबुळ सुरु करतो. मग तो घाईघाईने आपल्याकडे वळतो.

इतक्यात आपण समोर ठेवलेला आपला फोन वाजतो. 'वहिनींचा फोन आलाय वाटतं. घ्या लवकर.' असं आपला मित्र सांगतो.

परदेशी असलेल्या आणि यापूर्वी एकदाच बोलणं झालेल्या आपल्या एका सुस्वरूप वर्गमैत्रिणीने कधी नव्हे तो आज व्हॉटस अॅप कॉल केलेला आहे हे बघून आणि मित्राने 'वहिनींचा फोन' असं म्हटल्याने किंचित रोमांचित होऊन आपण फोन उचलतो. हॅलो हॅलोत वेळ जातो. 'थोड्या वेळाने फोन करु का? आता मी सलूनमधे आहे' किंवा 'आता मी बार्बरकडे आहे' किंवा 'आता मी पार्लरमधे आहे' अशा विविध वाक्यरचना निमिषार्धात डोक्यात तयार होतात.

पण अर्धी दाढी करुन गिऱ्हाईकाला अडकवून ठेवणाऱ्या आणि काही क्षणांपूर्वी डोक्याचा ताबा घेतलेला न्हावी पुढे येतो. आणि 'थोड्या वेळाने फोन करु का? जरा न्हाव्याकडे बसलोय' असं वाक्य आपण त्या परदेशस्थ सुस्वरूप मैत्रिणीस ऐकवतो.

इंप्रेशन मारण्यात कायम गडबड करणाऱ्या आपल्याला त्याचवेळी समोरच्या आरशात स्वतःचा गोरामोरा झालेला चेहरा दिसतो. आणि 26 वर्ष श्मश्रू / क्षौर करणारा तो नाभिक / वारिक मित्र आपल्या शब्द योजनेमुळे विचलित होऊन वस्तरा परजताना दिसातो. की मग एकाएकी अमृतातेही पैजा जिंकेवरचं आणि एकाच वेळी अनेक गोष्टी आठवणाऱ्या स्मरणशक्तीवरचं आपलं प्रेम आटू लागतं.