Source : Internet |
हिंदीतला क्रिशसारखा किंवा G1 सारखा सुपरहिरो प्रेम करतो, गाणी म्हणतो आणि खलनायकाशी लढताना संतपदाला पोचल्यासारखा वागतो. त्याचा आणि त्याच्या खलनायकाचा लढा तात्विक नसतो. खलनायक तंत्रज्ञानकुशल असला तरी कुठल्याही विचारधारेशी बांधलेला वगैरे नसून लहानपणी झालेल्या अन्यायामुळे विकृत झालेला असतो.
भारतीय सुपरहिरोंचे चित्रपट म्हणजे देव - असुर, सुष्ट दुष्ट प्रवृत्ती यांच्यातल्या झगड्याचं सत्प्रवृत्ती आणि खलप्रवृत्तीमधील किंवा प्रकृती आणि विकृतीमधील झगड्याचं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगवलेलं रुप असतं.
भारतीय सुपरहिरोला लोकप्रिय करण्यासाठी एखाद्या स्टार कलाकाराची गरज असते. लोकप्रिय सुपरहिरोचं काम करुन एखादा अनाम कलाकार प्रकाशझोतात आला असं अजून भारतात घडायचं बाकी आहे.
याउलट मार्व्हल किंवा डिसी कॉमिक्समधले सुपरहिरो आणि खलनायक तत्त्वासाठी झगडताना दिसतात. आपल्याला सत्य समजलं आहे हा त्यांचा दावा असतो. झगडा सत्प्रवृत्ती विरुध्द खलप्रवृत्ती असा नसून दोन प्रवृत्तीमधला असतो. कित्येकदा नायक आणि खलनायक यांच्यातील कोण बरोबर हेदेखील प्रेक्षकाला कळेनासे होते.
बॅटमॅनचा जोकर असो किंवा अॅव्हेंजर्सचा थॅनोस, त्यांच्या वागण्याला विकृतीऐवजी विचारांचं अधिष्ठान असतं.
विश्व आणि त्यातील साधनसामुग्री सांत आहे पण सतत मोठ्या संख्येने जन्म घेत रहाणार्या जीवांमुळे जीवन अनंत आहे. या सर्व जीवांना साधनसामुग्री पुरणार नाही. अमर्याद जीवन शेवटी सर्व जीवांसाठी साधनसामुग्रीचा तुटवडा तयार करेल. त्यावेळी सर्व जीवांचा हालहाल होऊन मृत्यू होईल. म्हणून विश्वातील निम्मे जीव भावनिक न होता संपवले पाहिजेत. त्यामुळे उरलेल्यांना साधनसामग्री पुरेल हा विचार करणारा थॅनोस. तर अमर्याद जीवनाला आपण संपवणे अयोग्य असे मानणारे अॅव्हेंजर्स, यापैकी कोण बरोबर? असा प्रश्न घेऊन प्रेक्षक सिनेमाबाहेर पडतो.
माझ्या डोक्यात अजून दोन प्रश्न आले. मराठी सुपरहिरो कधी येतील? आणि ते कुठल्या वाटेने जातील, बॉलीवूडच्या की हॉलीवूडच्या?
No comments:
Post a Comment