Friday, January 26, 2018

रिच डॅड पुअर डॅड (भाग ४)


गाडी डोंबिवलीतून बाहेर पडली आणि जोरजोरात पळू लागली. गाडीतले सगळे आनंदी होते. माझी पिल्लं फार खुशीत होती. त्यांची बडबड चालू होती. गाडीच्या म्युझिक सिस्टिमला प्रत्येकाचे फोन ब्लूटूथने जोडण्याचा प्रयत्न सुरु झाला. ते होईना मग गाडीचं मॅन्युअल काढून सर्व सूचना वापरून पाहण्यात आल्या. पण गाडीला आमच्या फोनशी जोडून घ्यायचं नव्हतं. त्यामुळे गाडीच्या स्पीकर्सवर फोनमधली गाणी ऐकण्याच्या त्यांच्या बेतावर पाणी पडले. पण गप्प बसतील तर ती माझी मुलं कसली म्हणून मग त्यांनी फोनवरच मोठ्या आवाजात गाणी लावली. हा सगळा धांगडधिंगा चालू असताना गाडीच्या आसपासची इतर गाड्यांची गर्दी वाढू लागली होती. आपण गाडी घेतली ती बघायला संपूर्ण जग रस्त्यावर गर्दी करून राहिलं आहे अशी कल्पना करून मला हसू येऊ लागलं. पण मग गाडी भिवंडी नाक्याला पोहोचेपर्यंत पाचव्या गियरवरून उतरून केवळ दुसऱ्या किंवा पहिल्या गियरवर चालवणे सक्तीचे होऊ लागलं. आणि मग माझ्या डोक्यात उजेड पडला की शनिवारची संध्याकाळ असल्याने संपूर्ण कल्याण डोंबिवली गाड्या घेऊन फिरायला बाहेर पडलेलं होतं आणि आम्ही मुंगीच्या पावलाने हलणाऱ्या ट्राफिक जॅममध्ये अडकलो होतो.

मुलांची फोनमधली गाणी दोनदा ऐकून झाली. एफ एम रेडिओवरचे आर जे पुन्हा पुन्हा तेच तेच विनोद सांगू लागले. कांदिवलीच्या कुठल्याश्या गृहनिर्माण प्रकल्पाची जाहिरात ऐकून डोकं दुखायला लागलं. गाडी पळत असली की फार काही वाटत नाही पण गाडी थांबलेली असली किंवा अत्यंत मंदगतीने जात असली की चिडचिड सुरु होते. त्यामुळे एर्टिगातले सगळे आता कावू लागले होते. मग शहरांच्या नावांच्या भेंड्या खेळून झाल्या. वाहतूक कोंडी सुटण्याचं नाव घेत नव्हती. तेव्हढ्यात पुतण्याचा फोन आला, ‘काका तू लौक्कर ये. आईने पाणीपुरी केली आहे. मला भूक लागलीये. तू लौक्कर ये.’ आता तर ती वाहतूक कोंडी अजूनच डाचू लागली. पुतण्याचा गोडुला चेहरा. त्याच्या आवाजातील आर्जव. क्लच आणि ब्रेकशी खेळून पायाला लागलेली रग. पोटात ओरडणारे कावळे. आणि भावाच्या घरी मला लवकर बोलावणारी पाणीपुरी. या सगळ्यांचा माझ्यावर परिणाम होऊन मी गाडी जमेल तिथे घुसवून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरु केला. माझ्या त्या प्रयत्नामुळे मी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी वचने पटवून देऊ शकलो.

गर्दीतल्या ऑड्या, इनोव्हा, फॉर्च्युनर, मागे टाकून आमची एर्टिगा जशी पुढे चालली होती त्यावरून युद्धे जिंकण्याचे कारण सैनिकांच्या हातातील शस्त्रे नसून त्यांच्या पोटातील विजयाची भूक असते हे मी माझ्या मुलांना विजय म्हणजे पाणीपुरी इतका बदल करून पटवलं.

‘पुरुषाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो’ असं म्हणतात पण त्याच पोटात पडू शकणाऱ्या पाणीपुरीमुळे तो रस्ता पुढे वाहतूक कोंडीतून मार्ग काढत भावाच्या घरापर्यंत जातो हे माझ्या बायकोला त्या दिवशी कळलं.

आणि माझ्या लाडक्या पुतण्याने फोनवर काय सांगितलं ते जर बाहेरच्या गर्दीला समजलं असतं तर गाडी पेट्रोल किंवा डिझेल किंवा सीएनजीपेक्षा पाणीपुरीवर जास्त जोरात पळू शकते आणि कुठल्याही वाहतूक कोंडीला फोडून बाहेर जाऊ शकते हे मी सप्रमाण सिद्ध केलं आहे असा निर्वाळा दिला असता.

शेवटी चाळीस पंचेचाळीस मिनिटांचा प्रवास दोन अडीच तासात पूर्ण करून मी भावाच्या घरी पोहोचलो. दारातंच पुतण्याने अंगावर उडी मारली आणि माझी दाढी हलकेच खेचण्याचा त्याचा आवडता उद्योग सुरु केला. वर पुन्हा हुकूम सोडला की, ‘लौक्कर पाणीपुरी खा आणि मला घाण पाण्याच्या गार्डनकडे घेऊन चल’. पुतण्याला ही सवय माझ्या दोन्ही लेकांनी लावली होती. कुठेही जायचं तर त्याला गार्डन म्हणायचं. त्यामुळे डोंगर गार्डन, रेती गार्डन, नदी गार्डन मला माहिती होतं. पण हे ‘घाण पाण्याचं गार्डन’ म्हणजे काय प्रकरण आहे ते कळेना. मग कळलं की याआधी तो मरिन ड्राईव्हला कायम रात्री गेला होता त्यामुळे त्याला समुद्र कायम काळा दिसला होता म्हणून त्याच्यालेखी राणीचा रत्नहार म्हणजे घाण पाण्याचं गार्डन होतं. त्याच्याशी खेळत पाणीपुरी खात दहा वाजून गेले. आणि मग आम्ही घाण पाण्याच्या गार्डनकडे जाण्यासाठी तयारी सुरु केली.

पुतण्याला जे सी बीची फार आवड. त्यामुळे त्याने त्याच्याकडच्या दोन तीन जेसीबीच्या प्रतिकृती बरोबर घेतल्या. मग फुटबॉल घेतला. मग सायकल घ्यायचा हट्ट धरला. शेवटी त्याला समजावून सांगावं लागलं की आनंद काकाची मोठी गाडी खरं तर छोटी आहे. त्यामुळे सायकल घेता येणार नाही. असं बाबापुता करत करत आमची गाडी साडेदहाला मुलुंडहून निघाली. गाडी हायवेला लागली आणि पुतण्या हातातल्या जेसीबीला नाचवत मोठमोठ्याने ‘जेसस्सबी जेसस्सबी’ असं ओरडू लागला. जेसीबीला त्याने दिलेलं जेसस्सबी हे नाव ऐकून त्याचे दोन्ही दादा हसू लागले. आणि मग दादा हसतायत म्हणून तोही खिदळत अजून जोरजोरात ‘जेसस्सबी जेसस्सबी’ ओरडू लागला. त्याला शांत करण्यासाठी आम्ही त्याला शाळेत नुकतीच शिकवलेली मुळाक्षरे विचारली. तर त्या पठ्ठ्याने ‘एसस्सबी - बीसस्सबी - सीसस्सबी’ असा प्रकार चालू केला. तिन्ही मुलं खिदळत होती. मुळाक्षरं संपली मग ‘वनसस्सबी - टूसस्सबी - थ्रीसस्सबी’ असं चालू झालं. त्यांच्या त्या मस्तीत अँबेसेडर हॉटेल कधी आलं ते कळलंच नाही.

समोर मोठा समुद्र पसरला होता. अंधाऱ्या रात्री राणीचा रत्नहार चमचमत होता. किनाऱ्याच्या तटबंदीवर अनेक जोडपी गप्पा बसली होती. लहान मुले खेळत होती. कुणी कुत्र्याला फिरवत होते. कुणी आईस्क्रीम खात होते. आणि मी पार्किंग शोधत होतो. शनिवार रात्रीची गर्दी असल्याने पार्किंग मिळत नव्हतं. गाडीतून खाली उतरायला उतावीळ झालेली मुलं प्रत्येक छोट्या जागेकडे बोट दाखवून ‘इथे इथे नाच रे मोरा’ च्या चालीवर ‘इथे इथे पार्किंग कर’ म्हणून सुचवू लागली. पार्किंग काही मिळेना. भिवंडीच्या रस्त्यावर ज्यांना मागे टाकून मी पुढे निघून आलो होतो त्या सगळ्या गाड्यांचे नातेवाईक पार्किंग अडवून आम्हाला वाकुल्या दाखवत आहेत असा भास मला होऊ लागला. गाडी बरीच पुढे आली. शेवटी भाऊ म्हणाला, ‘जाऊ दे आपण चौपाटीला जाऊया. तिथे बसायला जागा मिळेल.’ मग यावर गाडीतल्या सगळ्यांचं एकमत होईपर्यंत तिन्ही मुलांनी ‘थांबा थांबा’ असा ओरडा केला. त्यांना एक जागा दिसली होती. बोलण्याच्या नादात आम्ही चुकून थोडे पुढे आलो होतो. पण पार्किंगला जागा मिळते आहे हे दिसताच चौपाटीचा बेत तात्काळ रद्द करून आम्ही तिथे उतरायचं ठरवलं. गाडी किंचित रिव्हर्स घेतली.

आधी भाऊ उतरला. मग सासू सुना उतरल्या. मग मागच्या सीटवर अडकलेल्या मुलांना बाहेर काढणं झालं. मग फुटबॉल बाहेर आला. सगळे समुद्रकिनाऱ्याच्या कट्ट्यावर बसले. आता गाडी व्यवस्थित पार्क करण्यासाठी मी मागे बघितलं तर आमचा संसार खाली उतरेपर्यंत एका टॅक्सीवाल्याने तिथे गाडी लावली होती. माझ्यासाठी जागा होती. पण त्यासाठी जास्त कसरत करावी लागणार होती. भाऊ आणि मुलं खेळू लागली होती. मातोश्री कट्ट्यावर बसल्या होत्या आणि दोन्ही सुना सेल्फीच्या मागे लागल्या होत्या. मी खाली उतरलो. टॅक्सीवाल्याला त्याची गाडी मागे घ्यायला सांगितलं. फार जागा नव्हती पण जितकी होती तितक्या जागेत त्याला थोडं मागे सरकवलं. मग पाच दहा मिनिटे झटापट करून माझी गाडी सरळ रेषेत लावली. आणि खाली उतरून बाकी सगळ्यांबरोबर मिसळणार तोच भावाने दुसऱ्या बाजूने दार उघडलं. तो आत आला. पुतण्याही आला आणि भावजयही आली. भाऊ म्हणाला ‘चल चौपाटीला.’

पुतण्याच्या पोटातील पाणीपुरी बोलू लागली होती आणि आता तिला बाहेर यायचं होतं. त्यामुळे सुलभ शौचालय शोधणं महत्वाचं होतं. बाकी सगळ्यांना हाकारे घालून मी चौपाटीकडे जातो आहे. तुम्ही इथेच थांबा, असं सांगून आमचा मारुतीराया झेपावे चौपाटीकडे निघाला. इथेही पार्किंगची बोंब होतीच. भावाला म्हटलं की गाडी वळवून पलीकडच्या रस्त्याला घेतो. पिल्लाचं आटपून तुम्ही रस्ता ओलांडून या. मग आपण पुन्हा मरिन ड्राईव्हला जाऊया. तितक्यात मुलांचा फोन आला की आम्हाला इथे कंटाळा आला आहे. आम्हालापण चौपाटी बघायची आहे. मग भावाला उतरवलं आणि बाकीच्या मेम्बरांना घ्यायला गाडी वळवली. गाडी पुढे घेताना आठवलं की मायलेक मरिन ड्राईव्हला जिथे थांबले आहेत त्यासमोरच्या इमारतीचं नाव बघायला मी विसरलो होतो. राणीच्या रत्नहारालगतच्या इमारती एकसारख्या दिसतात. आता माझा गोंधळ होऊ लागला होता. गाडी बाजूला घेतली. पोरांना फोन लावला. समोरच्या इमारतीचं नाव मोठ्याने वाचायला सांगितलं. आणि मग ती इमारत शोधत निघालो.

हळू हळू गाडी पुढे जात होती. पोरांनी सांगितलेली इमारत काही मला दिसेना. शेवटी पुन्हा अँबेसेडर हॉटेलच्या पुढचा नाका आला. गाडी यू टर्न करून हळू हळू चालवत सगळ्यांना शोधू लागलो. माझ्या भेदक नजरेमुळे काही जोडप्यांतील अंतर वाढून सभ्यतेच्या पातळीवर आले, काही झिंगलेले सरळ चालू लागले आणि फेरीवाल्यांच्या चेहऱ्यावर अजीजी आली. त्या दिवशी अनेक लोकांना मी सिव्हिल गस्तीपथकातील अधिकारी वाटलो असण्याची शक्यता आहे. अजून थोडावेळ गस्त घातली असती तर चित्रपटात दाखवतात तशी पोलिसांची वरकमाई खरोखरंच होते का? याबद्दल मला पुरावा मिळाला असता. पण तेवढ्यात सगळे सापडले. त्यांना गाडीत घेईपर्यंत भावाचा फोन आला. पिल्लाचं आटपलं होतं. त्याला तिथेच थांबायला सांगून मी गाडी पुन्हा चौपाटीच्या दिशेने पिटाळली. सगळ्यांना चौपाटीच्या समोर उतरवलं. आणि पार्किंग मिळत नसल्याने पुन्हा गाडी पुढे घेऊन गेलो. तीन वेळा यू टर्न मारून झाल्यावर गस्तीवरच्या पोलिसांनी माझ्याकडे संशयाने पाहायला सुरवात केली. शेवटी कंटाळून मी गाडी एका कोपऱ्यात थोडी आत थोडी बाहेर अशी उभी करून चौपाटीवरील इतरांबरोबर बसायला धावलो.

समोर समुद्र गाज घालत होता. मागे गाड्या धावत होत्या. समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दुकानांवर तोबा गर्दी होती. फुगेवाले, पिपाणीवाले, चक्रवाले इकडे तिकडे फिरत होते. लोक चटया टाकून बसले होते. लहान मुले धावत होती. कुणी वाळूचे किल्ले करत होते. सगळीकडे प्रसन्न गोंगाट होता. मी माझी मंडळी शोधत होतो. त्या गोंगाटात मी भावाला फोन लावला. गर्दीत चुकामूक होऊ नये म्हणून भावाने मला गेटजवळ थांबायला सांगितलं. दिवसभर गाडी चालवून मी थकलो होतो. पाच दहा मिनिटांनी भाऊ आला. आम्ही दोघे खांद्यावर हात ठेवून चौपाटीच्या वाळूत शिरलो. आणि समोरून प्रकाशाचा मोठ्ठा झोत आला. एकाएकी बसलेले लोक उठायला लागले. प्रसन्न गोंगाटाची जागा आता आवरा आवरीने घेतली. तो प्रकाशाचा झोत आमच्या दिशेने येऊ लागला. कुणीतरी त्या वाळूत मोटार सायकल चालवत होतं. मला फार नवल वाटलं. इतक्या गर्दीत वाळूत मोटार सायकल! अगदी बेशिस्तपणा होता हा. त्या मोटार सायकलस्वाराला चांगलं खडसवायचं माझ्यातल्या शिक्षकाने ठरवलं. काय बोलायचं ते मी ठरवेपर्यंत तो मोटारसायकलस्वार आम्हा दोन्ही भावांपर्यंत पोहोचलासुद्धा. आणि मी काही बोलण्याच्या आधीच पोलिसांच्या कमावलेल्या आवाजात म्हणाला, ‘चला निघा. बारा वाजले. आजची चौपाटी संपली’.

चौपाटीवर एकाएकी सुरु झालेल्या आवराआवरीचं कारण मला कळलं. इतका वेळ माझं घड्याळाकडे लक्ष नव्हतं. आणि बारा वाजल्याने पोलिसांनी खेळ आवरण्याची सक्ती केली होती. मोटारसायकलच्या मागे सासू सुना आणि नातवंड उभी होती. आणि माझं कुटुंब चौपाटीबाहेर पडलं. पुतण्या म्हणाला, 'वाळू गार्डन घाण आहे. बरं झालं आनंद काकाचे कपडे खराब नाही झाले'. एकंदरीत परिस्थिती बघून मला हसायला येऊ लागलं. आज माझ्यासाठी मरिन ड्राईव्ह म्हणजे करीन ड्राईव्ह झालं आहे असं म्हणत मी हसलो. आणि मग मी हसलो म्हणून सगळे हसू लागले.

मी थकलेला असेन म्हणून भावजयीने मला मागे बसायला सांगितलं आणि स्वतः गाडी हातात घेतली. भाऊ तिच्या शेजारी पुढे बसला. पुतण्या माझ्या मांडीवर बसला. बायको आणि आई शेजारी होते. माझी पिल्लं माझ्या मागून गळ्याला मिठी मारून बसली होती. मला मरिन ड्राईव्हला आणि चौपाटीला कुठेच बसायलासुद्धा मिळालं नाही म्हणून माझ्या पिल्लांना वाईट वाटत होतं. नाही म्हटलं तरी वातावरण उगाच थोडं गंभीर झालं होतं. आणि एकदम माझी दोन्ही पिल्लं म्हणाली, ‘बाबा आम्ही मोठे होऊन तुझ्यासाठी एक ड्रायव्हर ठेवू. म्हणजे मग तुला पार्किंगसाठी अडकायला होणार नाही.’ त्यावर पुतण्या म्हणाला, ‘आणि आनंद काका, मी तुला खूप मोठ्ठी गाडी घेऊन देईन. इतकी मोठ्ठी की की त्याच्यात माझी सायकलपण मावेल.’ आणि सगळे पुन्हा हसू लागले. त्याक्षणी माझा दिवसभराचा शीण गेला. आणि मी जगातला सगळ्यात रिच डॅड असल्याची खात्री पटली.

रिच डॅड पुअर डॅड (भाग ३)

------------

गाडी आल्यावर सगळ्यांना गाडीतून गोव्याला घेऊन जायचं मी ठरवलं. सगळे प्लॅन्स झाले. बायको, मुलं, आई, भाऊ, भावजय आणि माझा लाडका पुतण्या सगळ्यांना गोव्याच्या लांब प्रवासासाठी तयार केलं. हॉटेलचं बुकिंग झालं. आता फक्त गाडी यायची वाट बघत होतो. गणपतीच्या आधी बुक केलेली गाडी घटस्थापनेला मिळेल याची स्वप्न धुळीला मिळाली होती. मग दसऱ्यालाही आम्ही सीमोल्लंघन जुन्याच गाडीतून केलं होतं. त्या दिवशी जुन्या गाडीत बसून बाहेर जाताना हिने धुसफूस, चिडचिड, टोमणे वगैरे ठेवणीतली शस्त्र बाहेर काढली होती. त्यामुळे आमच्या सोसायटीच्या जागी पूर्वी शमीची झाडं असावीत आणि तिथे ठेवलेली शस्त्र ही कधीही काढून वापरू शकते हे मला पुन्हा एकदा पटलं.

आता किमान दिवाळीच्या आधी गाडी मिळावी आणि गोव्याला गाडीतून जाण्याचा बेत पार पडावा म्हणून मी मारुतीचा धावा सुरु केला. तेहतीस कोटी देवात एक नवा सुझुकी नावाचा देव तयार करून मग त्याचीही आराधना करावी की काय याचा मी विचार करू लागलो. आणि एक दिवस दुकानातून फोन आला की दिवाळीच्या नंतर गाडी हातात येणार. एखाद दोन दिवस पुढे मागे होईल कदाचित पण मिळेल गाडी गोव्याला जायच्या आधी.

त्यातलं एखाद दोन दिवस मागे पुढे ऐकून माझा धीर सुटला. याआधीचे दोन तीन मोघम वायदे जसे पुढे ढकलले गेले होते तसंच याचंही झालं तर काय घ्या? इथे हॉटेलचं बुकिंग करून झालं होतं. घरगुती दवंडीवाल्यांनी अख्ख्या मित्रमंडळाला हॉटेलची वेबसाईट दाखवून वाहवा मिळवून झाली होती. सगळे खुशीत होते की आपण लांबच्या प्रवासाला जाणार आणि इथे आमच्या मारुतीरायाला द्रोणागिरीऐवजी हरयाणाला पाठवलं तर एर्टिगा नावाची औषधी मुळी लवकर सापडत नव्हती. आता बहुतेक रामालाच मूर्च्छित व्हायची वेळ आलेली होती. शेवटी या वाट बघण्याचा ताण असह्य होऊन मी सगळ्यांची विमानाची तिकीट काढली आणि तसं जाहीर केलं.

दिवाळीची सगळी खरेदी जुन्या गाडीतून पार पडली. बरेचदा विमानाने गेलेलो असल्याने विमानप्रवासाचं अप्रूप आता कुणाला नाही, पण मग अगदीत खेड्यातले येडे दिसायला नको या सबबीखाली जास्तीची खरेदी केली गेली. या मारुतीच्या पायी माझा जो काही अवाच्या सव्वा खर्च चालला होता की त्यापेक्षा फॉर्च्युनर किंवा मग ऑडीही कदाचित स्वस्तात पडली असती असं मला वाटू लागलं. मारुतीच्या ब्रह्मचारी असण्याचं रहस्यदेखील कळलं. रामरक्षा लिहायला बसले असताना मारुतीरायाच्या ब्रह्मचर्याचं कौतुक कसं करायचं त्या विचारात असताना जेव्हा बुधकौशिक ऋषींच्या समोर त्यांच्या पत्नीने केलेल्या खरेदीचे बिल आले असेल तेव्हा अगदी सहजपणे त्यांना ब्रह्मचारी हनुमंतासाठी ‘बुद्धिमतां वरिष्ठं’ ही उपाधी सुचली असावी याची मला खात्री पटली.

पण भावजयीसमोर सगळी खरेदी चालली असल्याने आणि त्यात पुन्हा पुन्हा माझं वर्णन अगदी प्रेमळ नवरा असं केलं जात असल्याने चेहऱ्यावर हसू कायम ठेवणं भाग होतं. भावाच्या खिशालाही चाट बसत होती. त्यामुळे ‘मारुतीच्या बेंबीत गार गार वाटतं’ ही कथा आम्हा दोघांना मनोमन पटली. लग्नानंतरची पहिली दिवाळी असावी इतका खर्च करून सतरावी दिवाळीही पार पडली. गोव्याला जायचा दिवस जवळ येत चालला होता आणि तीन दिवस आधी दुकानातून फोन आला, ‘साहेब, गाडी आली आहे. तुमची जुनी गाडी घ्यायला माणूस कधी पाठवू?, तुम्हाला गोव्याला गाडी घेऊन जाता यावी म्हणून सगळी काम धावपळीत केली आहेत. काळजी करू नका. एक दिवस आधी गाडी हातात देतो. मस्त होईल तुमची ट्रिप. अजिबात काळजी करू नका.’

विमानाची तिकिटं रद्द करता येतात पण पैसे परत मिळत नाहीत या प्रकारातील असल्याने ‘जुनी गाडी घेऊन जा. अन नवीन गाडीचं मात्र सगळं एका आठवड्यानंतर करूया.’ असं म्हणून मी फोन ठेवला. नवीन गाडी लगेच लांबच्या प्रवासाला नेऊ नये. थोडी हाताखाली येऊ द्यावी. मग न्यावी. तसंही इतका लांबचा प्रवास म्हणजे बाकीच्यांचे पाय आंबतात, गरगरायला होतं, फ्रेश व्हायला चटकन कुठे जाता येत नाही, पुतण्या अजून लहान आहे, त्याला प्रवास सोसणार नाही; वगैरे गोष्टी स्वतःला सांगत मनाचं समाधान करून घेतलं.

गोव्याहून परतलो आणि एका शनिवारी गाडी घ्यायला जायचं ठरवलं. भावाला फोन करून सांगितलं की मी संध्याकाळी येतो आहे. पुतण्या खूष झाला होता. त्याला आनंद काकाची मोठी गाडी पाहायची होती. ‘तू लौक्कर ये’ असा त्याचा गोड हुकूम ऐकला आणि दुकानाकडे निघालो. गाडी सजलेली होती. गुलाबी रंगाची सॅटिनची फुलं लावलेली गाडी बघून आम्ही सगळे खूष झालो. वेगवेगळ्या सह्यांचे सोपस्कार झाले. ऍक्सेसरीजचे वेगळे पैसे द्यायचे होते. मी रोख रक्कम काढून ठेवली होती. मला वाटलं ही पर्समध्ये टाकून आणेल हिला वाटलं मी घेतली आहे. मग हिने लगेच माझी बाजू सावरत धावपळ करून घरी जाऊन रोख रक्कम आणली. आपण प्रेमविवाह करताना योग्य निवड केली याची जाणीव होऊन मी थोडा खूष झालो आणि आपल्या नवऱ्याचं आपल्यावाचून काही चालत नाही या जाणीवेने तीही सुखावल्यासारखी वाटली.

मग विक्रेत्याने अर्धा पुरुष उंचीची मोठी चावी काढली. लहानपणी मला या चावीचे आणि क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅचला देतात तो मोठा चेक देतात त्याचे फार अप्रूप होते. इतकी मोठी चावी वापरायची कशी? आणि कॅशियरच्या समोरच्या छोट्या खिडकीतून तो मोठा चेक आत द्यायचा कसा? ह्या प्रश्नांनी माझं बालमन चिंतेत असायचं. माझ्या आयुष्यातील क्रिकेटची विकेट फार लवकर गेली असल्याने तसला मोठा चेक मिळण्याची शक्यता कधीच मावळली होती. पण ती मोठी चावी पाहून माझं बालपण पुन्हा डोळ्यासमोर आलं.

सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहून मोठी चावी हातात घेऊन फोटो बिटो काढून घ्यायला सुरवात केली. सात जणांच्या सात फोनमध्ये फोटो काढताना कारचा सेल्समन दमून गेला. आणि सकाळचे कोवळे ऊनही बऱ्यापैकी चटके देते याचा मला प्रत्यय आला. शेवटी सगळ्यांच्या मोबाईलमध्ये फोटो आल्यावर गाडी ताब्यात घेतली. आणि विक्रेत्याने मोठी चावी परत घेतली. तेव्हा ती चावी घरी घेऊन जायला मिळणार नाही म्हणून माझा धाकटा थोडा हिरमुसला. आणि हा गुणही त्याने माझ्याकडूनच घेतला या आनंदात त्याचं सांत्वन करून मी ड्रायव्हिंग सीटवर बसलो. बायको शेजारी बसली. आई, सासू सासरे मधल्या सीटवर बसले आणि पोरं मागच्या सीटवर बसली. पोरांचा उत्साह, आई आणि सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावरचं कौतुक आणि हिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझा इतके दिवसांचा ताण निवळला. एका अनामिक आनंदाने माझं मन भरून गेलं होतं. माझा स्वभावंच तसा आहे, घरचे सगळे खूष झालेले दिसले की खूष होण्याचा.

थोडं इकडे फिरून सासू सासऱ्यांना घरी सोडलं. संध्याकाळ होत आली होती. भावाला फोन केला की मी निघालो आहे, आपण रात्री मरिन ड्राईव्हला जाणार आहोत.

रिच डॅड पुअर डॅड (भाग २)

-----------

माझ्या मुलांनी माझे बरेच गुण उचलले आहेत. त्यातले ‘नेमके नको ते गुण’ उचलले आहेत असं ही म्हणत असते. ही म्हणते ते सगळं बरोबर असतं याचा प्रत्यय मला थोड्याच दिवसांत आला.

मी बऱ्यापैकी खरं बोलतो. म्हणजे कित्येक गोष्टीत खोटं बोलून काय मिळणार ते मला कळत नाही म्हणून मी खरं बोलत असावा. शाळाकॉलेजात असताना काही मित्र मंडळी कधीही विचारलं ‘अभ्यास झाला का?’ तर कायम खांदे पाडून चेहरा गंभीर आणि रडका करून किती अभ्यास बाकी राहिला आहे त्याबद्दल सांगायचे. मी मात्र लगेच ‘अभ्यास झाला’ असं सांगून मोकळा व्हायचो. कारण थोडाफार का होईना पण अभ्यास झालेला असायचा. पण नंतर रिझल्टच्या वेळी ही खांदेपाडू मंडळीच जास्त मार्क घेऊन जायची. आणि वर विचारलं तर सांगायची की पेपर सोप्पा आला म्हणून बचावलो नाहीतर काशी झाली असती. मला जास्त मार्क मिळाले तर मी मात्र हे श्रेय माझ्या हुशारीला, सातत्याला द्यायचो. पुढे मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धा बघितल्यावर आईवडील आणि गुरुजनांच्या आशीर्वादालाही देऊ लागलो. पण मुद्दा हा की कुणी काही विचारलं की मी बऱ्यापैकी खरं सांगतो.

साधारणपणे मला एक गोष्ट जाणवली आहे की प्रेम झालं असेल, लग्न ठरत असेल, घरी पाळणा हलणार असेल किंवा मग नवीन गाडी येणार असेल तर लोक कमालीची गुप्तता बाळगतात. चोरी किंवा खून केला तर जसं लपवावं तसं याबाबतीत कमालीची गुप्तता बाळगतात. कालांतराने सत्य जगासमोर आलं की मग पेढे वाटतात (म्हणजे चोरी / खुनाचे नाही पण लग्न ठरणे / पाळणा हलणे/ गाडी येणे वगैरेचे. तुलना चुकली बहुतेक. पण गुप्तता तशीच असते.). त्या दिवशी गाडी बुक करून घरी आलो तर सोसायटीत शिरताच पोरांच्या मित्रांनी त्यांना विचारलं, ‘काय रे, कुठे गेला होतात? आम्ही वाट बघत होतो. फुटबॉल हवा होता तुमच्याकडचा’.

यावर आमच्या दोन्ही लेकांनी दवंडी पिटायला मिळावी अशी गेल्या जन्मी पाहिलेली स्वप्न या जन्मी पूर्ण करण्याच्या आविर्भावात दहाव्या मजल्याला स्पष्ट ऐकू जाईल अश्या आवाजात आमच्या एर्टिगाची बातमी जाहीर केली. मला फार कौतुक वाटलं. नेहमी खरे बोलावे या शिकवणुकीचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव पाहून माझी मुले संस्कारक्षम आहेत आणि मी उत्तम संस्कार करू शकतो यावरच माझा विश्वास वाढला. आणि त्याच आनंदात मी माझ्या सगळ्या मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना गाडी बुक केल्याची बातमी कळवून टाकली. सगळीकडून होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावाने मी इतका खूष झालो होतो चंद्रावरून पाहणाऱ्या माणसाला देखील असं वाटलं असतं की यांनी मारुतीची फॅक्टरी विकत घेतली आहे की काय? माझ्या हिला भीती वाटू लागली की या आनंदाच्या भरात अभिनंदन करणाऱ्याला मी मोत्याचा कंठा देण्याचं वचन वगैरे देतो की काय. दोन तीन दिवस असे कौतुकसोहळ्यात गेले.

मग कळलं की आपण जुन्या गाडीचं आरसीबुक हरवू नये म्हणून इतकं जपून ठेवलं आहे की ते कुठे ठेवलं आहे तेच लक्षात येत नसल्याने ते चोरांपासूनच नव्हे तर आपल्या स्वतःच्या हातांपासूनही दूर सुरक्षित आहे. मग संपूर्ण घर उलथं पालथं करून झाल्यावर आणि ‘म्हणून म्हणत होते, माझ्याकडे देत देत जा. एक गोष्ट नीट ठेवाल तर शपथ’ या वाक्याची १०१ पारायणे बायकोने पूर्ण केल्यानंतर शेवटी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरसीबुक हरवण्याची तक्रार द्यायला गेलो. माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून किंवा मग हिच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे बघून मला पुरेशी शिक्षा झालेली आहे हे कळल्यामुळे असेल कदाचित, पण पोलिसदादांनी मला लगेच तक्रारीची प्रत दिली. तिथून निघताना मी काहीतरी बोलायचं म्हणून हिला म्हणालो, ‘बघ, आपलं सगळं व्यवस्थित असलं की सरकारी कार्यालयातपण आपली काम कशी चटकन होतात.’ यावर ती काही न बोलता गप्प राहिली. मग मी पण गप्प राहिलो. माझा स्वभावंच तसा आहे, बायकोसमोर फार काही न बोलण्याचा.

आरसीबुकच्या मागे आम्हा दोघांची दोन तीन आठवडे धावपळ चालू होती. आणि इथे रोज एकेकाचे प्रश्न येऊ लागले. ‘काय मग, केव्हा येणार गाडी?’ सुरवाती सुरवातीला मी मोठ्या तत्परतेने आणि उत्साहाने उत्तर देत होतो. पण तीन आठवडे झाले तरी दुकानातून फोन आला नाही मग माझ्या उत्साहाला थोडी ओहोटी लागली. तेवढ्यात सोसायटीतल्या एका मित्राने कुठलाही गाजावाजा न करता होंडा सिटी आणली आणि पेढे द्यायला घरी आला. जेव्हा त्याने सांगितलं की त्याला बारा दिवसात डिलिव्हरी मिळाली तेव्हा मात्र इतके दिवस शांत असलेल्या हिचा धीर खचला. त्यांना बारा दिवसात मिळाली, आपल्याला मात्र एकवीस दिवसांनीही नाही. साधा फोनही नाही येत दुकानातून. आरसीबुक प्रकरणात तिला झालेल्या मनस्ताप आणि धावपळीचा राग शेवटी कारच्या दुकानावर निघाला. तेव्हा कळलं की जीएसटी मध्ये एसयूव्ही कार्सवर होऊ घातलेल्या तरतुदींमुळे मारुतीची देशभरात तुफान बुकिंग झाली होती. त्यामुळे आमच्या गाडीला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार होता.

दिवसामागून दिवस जात होते. चौकश्या वाढू लागल्या. समोर आल्यावर गाडीची चौकशी करणारे लोक आता फक्त चौकशी करण्यासाठी समोर येत आहेत की काय असे मला वाटू लागले. ग्रुपव्यतिरिक्त कधी माझ्याशी स्वतंत्र न बोलणारे मित्र आणि मैत्रिणी आता स्वतंत्र मेसेज करून ‘आला का रे तुझा रथ?’ वगैरे विचारपूस करू लागले. शेवटी शेवटी तर मला माझी गाडी म्हणजे गंगा आणि मी म्हणजे भगीरथ आहे असं वाटू लागलं. माझे नको ते गुण मुलं घेतात हे माझ्या बायकोचे मत मला या सततच्या चौकश्यांमुळे पटले. मित्रांनी फुटबॉल मागितल्यावर त्यांच्यासमोर आपण गाडी बुक केल्याची दवंडी पिटायची त्यांना काही गरज नव्हती असं मला वाटून गेलं. पण मग नंतर आपणही हिरीरीने तेच केलं आहे हे कळून मी गप्प बसलो.

अशात एक दिवस भावाकडे गेलो असताना त्याने मुलांना रात्री मरिन ड्राईव्हवर फिरवून आणलं. ग्लास टॉप बाजू करून खांद्यापर्यंत शरीर बाहेर काढून रात्रीच्या रस्त्यावर फिरून मुलं इतकी खूष झाली होती की त्यांनी मला तो सगळा अनुभव रंगवून सांगितला. आपल्या गाडीला ग्लास टॉप नाही याची मला आठवण झाली आणि एकदम पुअर डॅड असल्यासारखं वाटलं. मुलांचा नंतर भ्रमनिरास होऊ नये म्हणून आपल्या कधी ना कधीतरी येणाऱ्या गाडीची वैशिष्ट्ये त्यांना सांगितल्यावर दोघेही म्हणाले बाबा आम्हाला तुझ्याबरोबर मरीन ड्राईव्हला जायचंय. तू पण पाहिजेस आणि काका पण पाहिजे. हे ऐकल्यावर माझ्यातला पुअर डॅड कुठल्याकुठे पळून गेला आणि मी रिच डॅड असावा यावर विश्वास ठेवावासा वाटू लागला. मग गंगावतरण झाल्यावर अख्ख्या कुटुंबाला मरीन ड्राईव्हला घेऊन जाण्याचं वचन भगीरथाने स्वतःहून दिलं.

रिच डॅड पुअर डॅड (भाग १)

-----------

मला गाडी चालवायला अतिशय आवडतं पण गाडी माझ्यासाठी वाहतुकीचं साधन आहे स्टेटस सिम्बॉल नाही. त्यामुळे मला ऑडीच क्यू ३ मॉडेल सोडल्यास बाकीच्या गाड्या चटकन ओळखता येत नाहीत. क्यू ३ ओळखता येते कारण एकदा दुसऱ्याच्या ऑडीबरोबर माझ्या गाडीने भर रस्त्यात लडिवाळपणा केला होता. त्यामुळे मग हिंदी चित्रपटातील गर्भश्रीमंत मुलीचा अमरीश पुरी छाप दिसणारा उर्मट बाप, गरीब हिरोच्या ए के हंगल छाप तत्वनिष्ठ बापाला सुनावतो, 'अपने लाडले को संभालो, जितना तुम कमाते हो उतना तो मेरी बेटी लिपस्टिकपे खर्च कर देती है,' तश्या प्रकारचे संवाद भर रहदारीच्या रस्त्यावर, प्रचंड मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर घडल्याने ऑडी क्यू ३ तर मी डोळे बांधून झोपलो तरी ओळखू शकतो. माझा स्वभावंच तसा आहे, घडलेल्या प्रसंगाची हिंदी पिक्चरशी संगती लागली की मग मी कधी काही विसरत नाही.

गाड्यांच्या बाबतीत केवळ उपयुक्ततावादी दृष्टिकोन बायकोत आणि मोठ्या मुलात रुजवायला मी यशस्वी झालो असलो तरी धाकट्या मुलाच्या बाबतीत मात्र माझं जरा दुर्लक्ष झालं आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा उठवला. त्याला गाडीच्या लोगोवरून गाड्या ओळखता येतात. त्याला गाड्यांच्या किमती माहिती असतात त्यांची वैशिष्ट्ये माहिती असतात. कुठल्या गाडीची कुठली मॉडेल्स आता बंद झाली आहेत? कुठली आता नवीन बाजारात येणार आहेत? हे त्याला सगळं माहिती असतं. आणि तेही घरात कुठलंही कार किंवा बाईकविषयक मासिक येत नसताना. तो ही सगळी माहिती कुठून कुठून गोळा करत असतो कुणास ठाऊक?

त्याच्या या ज्ञानामुळे माझा उपयुक्ततावादी दृष्टिकोन अगदीच हा आहे हे आपल्या आईला आणि मोठ्या भावाला पटवून देण्यात तो यशस्वी ठरला. नंतर नंतर तर मला केवळ दृष्टिकोनच नव्हे तर मीदेखील अगदीच हा आहे असं मला वाटू लागलं. आणि आमच्या जुन्या कारचं मॉडेल कुठलं होतं ते कुणी चटकन विचारलं तर टाटा इंडिगो की टाटा इंडिका ते सांगताना अडखळायला होऊ लागलं. तो जवळ असला की तोच त्या संभाषणात भाग घेऊन माझी सुटका करायचा आणि समोरच्याची शाबासकी मिळवायचा. शेवटी माझ्यावर दया येऊन त्याने एकदा मला नियम बनवून दिला होता की कुणी विचारलं तर लक्षात ठेवायचं की गो म्हणजे गेली पण आपल्याकडे तर गाडी आहे म्हणजे आपली गाडी इंडीगो नाही. तेव्हापासून माझा गोंधळ कमी होऊ लागला. मला त्याचं फार कौतुक वाटलं. मला शिकवू शकणाऱ्यांचं मला कायम कौतुक वाटतं.

आमची ही गाडी बरीच जुनी झाली. घरातील मंडळी तीच असली तरी त्यातील लहानांची उंची आणि रुंदी वाढली. त्यामुळे त्यांच्यासमोर आपण अगदीच लहान दिसू नये याची मला काळजी वाटू लागली. चाळीशीत उंची वाढवता येत नाही हे कटू सत्य जाणवल्यामुळे चिंता वाढून रुंदी वाढत राहिली. पण त्यामुळे गाडीतील उपलब्ध जागेचा प्रश्न अजूनच कठीण होऊ लागला. मुले मोठी झाल्याने माझ्याशेजारी पुढच्या सीटवर कोण बसणार यावरून होणारी भांडणे उग्र रूप धारण करू लागली. आणि मग जुन्या टाटाला टाटा करायची वेळ आली आहे हे मी हळूहळू स्वीकारायला सुरवात केली. आणि एक दिवस धाकट्या भावाने त्याची स्कोडा गाडी बदलून नवी होंडा सिटी घेतली. भाऊ घरी आला आणि त्याच्या गाडीची सगळी वैशिष्ट्ये त्याच्या आधी माझ्या धाकट्या पोराने त्याच्यासमोर सांगितली. मग विजयी वीराच्या आविर्भावात सिटीतून सिटी फिरवायला घेऊन चल म्हणून आपल्या काकाला ऑर्डर सोडली. भावाचं त्रिकोणी आणि माझं चौकोनी कुटुंब एका गाडीतून जाणं शक्य नसल्याने शेवटी त्याच्या सिटीबरोबर मी टाटा घेऊन निघालो. त्या दिवसानंतर दोन्ही पोरांनी टाटाचं नाव टाकलं. आणि शेवटी मी नवी गाडी घ्यायला तयार झालो.

नवी गाडी घ्यायची तर कमीत कमी सात सीटर घ्यायची असं ठरलं. धाकट्या पोराने लगेच ताकीद दिली की ओम्नी घ्यायची नाही आहे. बायकोच्या मैत्रिणींकडे ज्या गाड्या होत्या त्या महागड्या असल्या तरी सात सीटरची माझी अट पुरी करणाऱ्या नव्हत्या. गाडीची किंमत राहत्या घराच्या किमतीच्या दहा टक्क्यापेक्षा जास्त असू नये हे माझं तत्व आता घरात कुणालाच पटत नव्हतं. जी गोष्ट पैसे मिळवून देते तिच्यात जास्त गुंतवणूक करावी. जिच्यातून कमाई होत नाही अश्या कुठल्याही गोष्टीला आपण जरी आपली मिळकत मानत असलो तरी ती आपलया गळ्यातील लोढण्यासारखी असते हे माझे मत 'रिच डॅड पुअर डॅड'च्या पुस्तकात छापून आलेले आहे असे मी जेव्हा सांगितले तेव्हा सगळ्यांनी माझ्याबरोबर तो लेखकही अगदी हा आहे अशी प्रतिक्रिया दिली.

मग माझा उपयुक्ततावाद आणि धाकट्याचं ब्रँड ज्ञान यांचं उघड गृहयुद्ध सुरु झालं. आता घरातले सगळे धाकट्या लेकाचे भक्त होऊन माझ्या विरुद्ध उभे ठाकले होते. धाकट्याने फॉर्च्युनर, लॅंड क्रूजर वगैरे गाड्या सुचवल्या. मग, तुमचा बाप अगदी ए के हंगलच्या भूमिकेइतका इतका गरीब नसला तरी अमरीश पुरीच्या भूमिकेइतका श्रीमंत नाही हे समजावून सांगण्यात माझा बराच वेळ गेला. मग त्याने इनोव्हा, होंडा बी आर व्ही सुचवल्या. मी टाटा हेक्सा बद्दल बोललो तर त्याने त्याबद्दल नकारात्मक रिव्ह्यू दिला. त्यापेक्षा मारुती एर्टिगा बरी असं तो चुकून बोलला आणि माझा जन्म शनिवारचा असल्याने मारुतीराया माझ्या उपयुक्ततावादाच्या बाजूने उभे राहिले असल्याचं मला जाणवलं. मी लगेच एर्टिगा वर शिक्कामोर्तब केलं. आपण काय चूक केली ते धाकट्याच्या लक्षात आलं होतं पण आता मी मागे हटणार नव्हतो. मग त्याने बऱ्याच वाटाघाटी करून बाकीच्या ऍक्सेसरीज वाढवून घेतल्या. आणि शत्रुपक्ष तहाची कलमे उधळून टाकून नव्याने गृहयुद्ध सुरु करायच्या आधी मी एर्टिगा बुक करायला धावलो.

दुकानातील विक्रेता मला वेगवेगळ्या कार्स दाखवायचा प्रयत्न करत असताना मी त्याला थांबवून हे पैसे घे आणि एर्टिगा बुक कर असे सांगून आश्चर्यचकित केलं. गिऱ्हाईक दुकानात आल्यापासून त्याला पाणी द्यायच्या आत तिसऱ्या मिनिटाला कार विकली जाण्याचा हा त्याच्या आयुष्यातील पहिला प्रसंग असावा. बाकी सगळं ठरत असताना मुद्दा आला तो रंगाचा. धाकट्याला लाल रंग आवडतो तर मोठ्याला निळा. पण एर्टिगात लाल रंग येत नाही, हे आधीच माहित असल्याने धाकटा त्यातून बाहेर पडला. मग बायकोने पर्ल ब्लू ब्लेझ निवडला. विक्रेता म्हणाला हा रंग फार कमी वापरला जातो त्यामुळे कार यायला नेहमीच्या वेटिंगपेक्षा जास्त वेळ लागेल. पण बायको त्याच रंगावर ठाम राहिली आणि आम्ही दुकानातून दहाव्या मिनिटाला बाहेर पडलो. विक्रेता खूष दिसत होता आणि त्याचे साथीदार आश्चर्यचकित. निर्णय घेऊन मग दुकानात जाण्याच्या माझ्या सवयीमुळे त्या दिवशी दुकानाच्या मॅनेजरने विक्रेत्याची पाठ थोपटली असेल या कल्पनेने मी खूष झालो. माझा स्वभावंच तसा आहे दुसऱ्याचं काम सोपं झालं की खूष होणारा.

Friday, January 5, 2018

चिदंबर रहस्य

चिदंबरमच्या देवळाच्या गाभाऱ्याचं सुवर्णछत
Source : Internet 
चिदंबरमच्या देवळाच्या गाभाऱ्यात मूर्ती नाही असं वाचलंय. तिथे म्हणे फक्त पोकळी आहे आणि शिवपार्वती तिथे गुप्तरुपाने वास करतात अशी मान्यता आहे. गाभाऱ्यावर पडदा आहे. पुजारी पडदा दूर करतो तेव्हा सामान्यांना फक्त पोकळी दिसते. पण ज्ञात्यांना तिथे शिवपार्वतीचं दर्शन होतं असं म्हणतात. 

काहीजण म्हणतात की पोकळी म्हणजे काळ. आणि गाभाऱ्यावरचा पडदा म्हणजे मेंदूवरचं /आकलनक्षमतेवरचं मायेचं पटल. ते पटल बाजूला केलं की मग सत्याचं, शिवाचं, काळाचं आणि घटनांचं स्वरूप आपण जाणून घेऊ शकतो.

हेच आहे चिदंबर रहस्य.

आपल्या आकलनक्षमतेच्या मर्यादा आणि पूर्वग्रह बाजूला सारल्याशिवाय सत्याचे दर्शन होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला होणारे सत्याचे दर्शन हे खरं तर आपल्याच आकलनक्षमतेचे द्योतक असते.

प्रत्येकाची आकलनक्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे एकाच वेळी अनेकांनी गाभाऱ्यात पाहिले तरी त्या सर्वांना चिदंबराचे रहस्य वेगवेगळे दिसू शकते. त्याचप्रमाणे आपली आकलनक्षमता प्रत्येक वेळी बदलत असते त्यामुळे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या वेळी गाभाऱ्यात डोकावून पाहिले तर त्यालाही चिदंबराचे रहस्य प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे उलगडू शकते.

काल रात्री बातम्यांत ऐकलं की वढू बुद्रुक ग्रामस्थांनी तोडगा काढला. समाधी बांधणार म्हणून मान्य केलं. आणि बाहेरच्यांनी आमच्या सुटलेल्या वादात लक्ष घालू नये म्हणून आवाहन केलं. मग..

कोण जमा झाले?
का जमा झाले?
कुणी भाषण दिलं?
कोण भडकले?
कोणी दगडफेक केली?
कोण जखमी झाले?
कुणाच्या मालमत्तेची नासधूस झाली?
कुणाचा इतिहास बदलला?
कुणाचं भविष्य बदललं?
कुणाचा वर्तमान बदलला?
कुणाचं नेतृत्व पुढे आलं?
आणि हे सगळं का झालं?

चिदंबर रहस्य आहे.

जो ज्या दृष्टीने पडदा दूर करेल त्याला तसं दिसेल. कुणाला ब्राह्मण मराठा... कुणाला ब्राह्मण महार... कुणाला मराठा आणि महार.....कुणाला हिंदुत्ववादी आणि इतर.... कुणाला कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपा... कुणाला पेशवाई आणि आधुनिकता... कुणाला पवार आणि फडणवीस.. कुणाला भाजप शिवसेना... तर कुणाला अजून काय... एकाच काळबिंदूवर एकवटलेल्या भिन्न घटना. प्रत्येकाची कारण परिणामाची साखळी वेगळी... पण एकाच काळबिंदूवर एकवटल्यामुळे कुठलीही घटना कुठल्याही घटनेला कारण परिणाम म्हणून जोडता येऊ शकते.

असते फक्त गाभाऱ्यातील पोकळी. आणि त्यात सतत पुढे जाणारा काळ.

गाभाऱ्यावरचा पडदा दूर केला की आपापल्या दृष्टीप्रमाणे पोकळीत आपापली उत्तरं दिसतात. चिदंबर रहस्य सगळ्यांना एकाच वेळी वेगवेगळ्या पध्दतीने उलगडतं.