Monday, December 25, 2017

बोलेरो (भाग ४)

--------------
तुंबाडचे खोत मध्ये मंगल आणि अमंगलाचा सातत्याने चाललेल्या सोहळ्याला साक्षी असतो वाडा. मोरयाने बांधलेला; प्रचंड, भव्य वाडा. कादंबरीच्या सुरवातीला आपल्याला भेटतात ते त्याचे भग्नावशेष आणि शेवटी कळतात ती त्याच्या भग्नावस्थेची कारणे. म्हणजे अलिप्त असूनही वाडा शेवटी त्या कथेचा बळी ठरतो. खोतांच्या कथेत वारंवार येत असूनही आणि अलिप्त असूनही त्यात बळी न पडलेली अजून एक साक्षीदार असते जगबुडी नदी. दरवर्षी वैशाखी पौर्णिमेला खोत तिची सहकुटुंब पूजा करतात, तिची ओटी भरतात. पण चारशे वर्षांच्या खोत घराण्याच्या इतिहासाला जगबुडी मात्र अलिप्तपणे पहाते. हजारो वर्षांपासून तशीच वहाते. कुठल्याही भावभावनांचे तरंग उमटवू न देता. एकाच तालात, आपल्याच तालात. आणि सगळ्या भावभावनांच्या तरंगात भिजून ओलेचिंब झालेले तुंबाडकर आणि लिंबाडकर तिच्या काठावर आपापले सूर आळवतात. आपल्या स्वभावामुळे निर्माण होणारे आवेग त्या सुरात मिसळतात. आणि जगबुडीच्या लाटांच्या कलकलाटात आपले भेसूर किंवा सुरेल सूर जोडतात.

आधी एक संथ सूर - जगबुडीचा.

तिच्या काठी मोरयाचा वाडा येतो. आणि जगबुडीच्या संथ एकसुरात खोतांच्या घराचे सूर मिसळू लागतात. पाशवी वासनांचे, मग्रुरीचे, रागाचे, द्वेषाचे, लोभाचे, सत्तोन्मादाचे, समजूतदारपणाचे, दबलेल्या दुःखांच्या उमाळ्याचे, हतबलतेचे, आनंदाचे, हताशेचे.

त्यात लिंबाडचे सूर मिसळतात. औदार्याचे, चिरडीला येण्याचे, देशप्रेमाचे, गोंधळल्याचे, ध्येयवादाचे, समजूतदारपणाचे, संशयाचे, दुःखाचे.

त्यात बाहेरील परिस्थितीचे निरनिराळे सूर मिसळत जातात. जातीभेदाचे, आडव्या पंगतीचे, नवीन शिक्षणाचे, मुंबईच्या पैश्याचे, धार्मिक तेढीचे, विधवा विवाहाचे, दारूचे आणि दारूबंदीचे, टिळकांच्या अग्रलेखांचे, गांधींच्या चळवळींचे, सावरकरांच्या गीतांचे आणि कुणी न पाळणाऱ्या त्यांच्या परंपराभेदी विचारांचे, अफवांचे; असे वेगवेगळे सूर मिळून कादंबरी वेग पकडते. आणि या कादंबरीला जर संगीत मानले तर तिचा क्रेसेंडो किंवा उत्कर्षबिंदू म्हणजे गांधीहत्येनंतर वाड्याचे नष्ट होणे.

गेल्या रविवारी कादंबरी वाचून झाली. डोक्यात हे कादंबरीचे संगीतमय रूप भिनलेले होते. ज्या मैत्रिणीने माझा वाढदिवस आहे अश्या चुकीच्या समजुतीने मला ही कादंबरी भेट दिली होती तिचे आभार मानण्यासाठी फोन केला. तिने उचलला नाही. मग तिला मेसेज टाकून घरच्यांबरोबर फिरायला बाहेर गेलो. गाडी सुरु केली तर त्यात माझी आवडती सीडी चालू झाली.

पहिले संगीत होते कार्ल ऑफ्फचे ‘ओ फॉर्च्यूना’. त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन. आणि नंतर सुरु झाले फ्रेंच संगीतकार मॉरिस राव्हेलचे ‘बोलेरो’. हे माझे अतिशय आवडते संगीत आहे. मोठ्या लेकालाही आवडते. आवाज मोठा करून तीनचारदा ऐकले. शेवटी बायको आणि आईने वैतागलेल्या वाटल्या तेव्हा बंद केलं. एकाएकी डोक्यात भिनलेल्या कादंबरीच्या संगीतमय रूपाची राव्हेलच्या बोलेरोशी संगती जुळली. घरी आल्यावर राव्हेलच्या बोलेरोबद्दल जे जे मिळेल ते वाचून काढले.

मॉरिस राव्हेल (बोलेरोचा संगीतकार)
Image Source : Internet 
बोलेरो हा एक लॅटिन अमेरिकन नृत्यप्रकार आहे. क्युबा आणि स्पेनमध्ये लोकप्रिय असणारा हा नृत्यप्रकार म्हणजे जोडीने करायचे नृत्य. यात संगीत आणि नृत्याची लय संथ असते आणि नंतर ती हळूहळू वाढत जाते.

इडा रुबीनस्टेन नावाची एक रशियन नर्तकी राव्हेलची मैत्रीण होती. तिने राव्हेलला तिच्या बॅलेसाठी एका स्पॅनिश संगीतकाराच्या रचनेची सुधारित आवृत्ती करून देण्यास सांगितले. पण त्या रचना दुसऱ्या एका संगीतकाराच्या स्वामित्व हक्काखाली होत्या. त्याने त्या राव्हेलला देण्यासाठी आनंदाने होकार दिला पण राव्हेलने शेवटी स्वतःच एक रचना तयार करायचे ठरवले.

मग एक दिवस त्याने आपल्या मित्राला घरी बोलावले आणि त्याला पियानोवर एक तुकडा वाजवून दाखवला आणि म्हणाला, ‘मी याच तुकड्याला वारंवार वाजवत राहीन आणि प्रत्येक आवर्तनात त्यात एकेक वाद्य वाढवत जाईन. पाच मिनिटात सुचलेल्या त्या तुकड्याचा वाद्यमेळ बनविण्यासाठी राव्हेलला मग सहा महिन्यापेक्षा जात वेळ लागला. त्यातून जे बनलं त्याची सुरवात संथ लयीत आणि शेवट अतिशय वेगात होत असल्याने राव्हेलने त्या संगीताच्या तुकड्याचं नाव ठेवलं बोलेरो.

पंधरा मिनिटे आणि पन्नास सेकंदाच्या या संगीतात जवळपास सतरावेळा तोच तुकडा वाजतो. प्रत्येक वेळी एक नवीन वाद्य जुन्याबरोबर वाजू लागते आणि मग शेवटी अठराव्या आवर्तनात उत्कर्षबिंदूला तो सर्व वाद्यांना घेऊन थांबतो.


कॅरोल लोम्बार्डच्या १९३४च्या बोलेरो नावाच्या चित्रपटात या संगीताला वापरले आहे.


नंतर बो डेरेकच्या ‘१०’ नावाच्या चित्रपटातील एका संवादामुळे आणि बो डेरेकच्या लौकिकाला साजेश्या प्रणयदृष्यात पार्श्वसंगीत म्हणून वापरले गेल्यामुळे संगीताचा हा विलक्षण तुकडा अजून प्रकाशझोतात आला.


राशोमोन चित्रपटात अकिरा कुरोसावाने याच संगीताचे अनुकरण करणारी थीम पार्श्वसंगीत म्हणून वापरली आहे. त्याशिवाय अनेक चित्रपटांत आणि नृत्य नाटकांत या संगीताचा वापर केला गेला आहे.





जेव्हा या संगीताचा पहिला प्रयोग (परफॉर्मन्स) झाला तेव्हा, प्रेक्षक बेभान झाले होते आणि असे म्हणतात की एक स्त्री चित्कारली, ‘ हा वेडेपणा आहे. राव्हेल वेडा आहे’. जेव्हा राव्हेलला हे सांगितले गेले तेव्हा तो म्हणाला.’त्या स्त्रीला हे संगीत कळले आहे’. अजूनही कित्येक वेळा फ्लॅश मॉब करून हे संगीत युरोप अमेरिकेतील मॉल्स किंवा सार्वजनिक ठिकाणी वाजवून कलाकार लोकांची वाहवा मिळवतात.



या संगीतावर टीकाही भरपूर झाली. सगळ्यात जहरी टीका म्हणजे हे संगीत नसून पाल्हाळ लावले आहे अश्या स्वरूपाची होती. ‘प्रत्येक संगीताचा एक अंतबिंदू असतो आणि बोलेरोच्या बाबतीत तो सुरवातीलाच आहे पण हे राव्हेलला कळलेले नाही’ अश्या तीव्र स्वरूपात त्यावर टीका झाली. ही टीका वाचली आणि तुंबाडचे खोत ही एक विसविशीत कादंबरी आहे. श्रीनांनी पाल्हाळ लावले आहे, अशी या कादंबरीवर होणारी टीका आठवली. आणि मला जाणवलेले कादंबरीतील संगीत व राव्हेलच्या बोलेरोची नक्की संगती काय ते माझे मला उमगले. राव्हेलची रचना अनेकांना पाल्हाळ वाटते, कादंबरी अनेकांना पाल्हाळ वाटते. राव्हेलला स्वतःला ही रचना त्याची सर्वोत्कृष्ट रचना वाटत नाही. या कादंबरीबद्दल श्रीनांचेही मत काहीसे असेच होते.

बोलेरो नृत्य म्हणजे दोन नर्तकांचा खेळ. कुरघोडी नाही, आक्रमण नाही, एकमेकांना संपवायची इच्छा नाही. उलट एकमेकांशी खेळून आनंद लुटणे हाच हेतू. किंवा कदाचित आनंद लुटण्यापेक्षा खेळणे हीच प्रवृत्ती असल्याने प्रवृत्तीशरण होऊन खेळत राहणे. कादंबरीत मंगल आणि अमंगल हे ते दोन नर्तक. राव्हेलच्या बोलेरोत एकामागून एक वाद्ये सुरु होत जातात आणि जुन्या वाद्याबरोबर तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळतात. कादंबरीत, मंगल आणि अमंगल सर्व पात्रांतून आपला अविरत खेळ पुन्हा पुन्हा खेळ खेळत रहातात. राव्हेलच्या बोलेरोत ड्रम, एकाच संथ लयीत सुरवातीपासून शेवटपर्यंत वाजत रहातो. कादंबरीत सुरवातीपासून शेवटपर्यंत जगबुडी एकाच संथ लयीत वहात रहाते. राव्हेलच्या बोलेरोत उत्कर्षबिंदूत सर्व वाद्ये एकत्र येऊन जो परिणाम घडवतात तोच परिणाम कादंबरीच्या शेवटी वाड्यावर येणाऱ्या संकटातून आपल्या अंगावर येतो.

कादंबरी मोठी, माझे आकलन तोकडे त्यामुळे त्यावर मी लिहिणार नाही असे आईला निक्षून सांगितले होते पण नंतर गाडीत ऐकलेल्या राव्हेलचे संगीत आणि मनात असलेले श्रीनांनी रंगवलेले शब्दचित्र इतके चपखल बसले की तुंबाडच्या खोतांवर लिहिणार नाही हा संकल्प तुटला. आता तर मला असेच वाटते आहे की कुणी तुंबाडचे खोतवर चित्रपट बनवला तर त्याला पार्श्वसंगीत म्हणून राव्हेलच्या बोलेरोशिवाय काहीही वापरू नये. आणि वाड्याच्या अखेरच्या क्षणी या संगीताचा शेवट येईल असे करावे.

मी ज्या प्रयोगांचा उल्लेख केला आहे त्या राव्हेलच्या बोलेरोच्या प्रयोगांचे आणि मग त्याला चित्रपटात वापरलेल्या तुकड्यांचे तुकड्यांचे किंवा त्यावरून बेतलेल्या पार्श्वसंगीताचे व्हिडीओ वर दिलेले आहेत.

लंडन सिम्फनी ऑर्केस्ट्राचा प्रयोग जरी पंधरा मिनिटे पन्नास सेकंद इतका मोठा असला आणि सुरवातीला थोडा संथ वाटला तरी शेवटपर्यंत ऐका ही विनंती. त्यात साधारण १५व्या मिनिटानंतर जे होते तिथे वाडा नष्ट होतो आहे अशी कल्पना मी केली आहे.

मग कदाचित तुम्हाला पटले नाही तरी किमान शक्यता जाणवेल की तुंबाडचे खोत म्हणजे मंगल व अमंगलाने एकमेकांशी मांडलेला खेळ आहे. कुरघोडी न करता एकमेकांना जोखण्याचा खेळ. दोन प्रवृत्तींचा प्रवृत्तीशरण अविरत अंतहीन खेळ. एकाच वाद्याने संथ लयीत चालू होऊन नंतर वेग आणि वाद्ये वाढवत जाणारा खेळ. ज्याचं नाव बोलेरो.


----

बोलेरो (भाग ३)

-----
तुंबाडचे खोत म्हणजे एक महाकादंबरी आहे. चार भाग असलेली आणि दोन खंडात विभागलेली ही कादंबरी काळाच्या एका विस्तीर्ण पटलावर घडते. एका घराण्याच्या चार पिढ्यांची कथा, कोकणच्या निसर्गाचे उत्कृष्ट शब्दचित्र रेखाटणारी कादंबरी, कोकणच्या माणसांची स्वभाववैशिष्ट्ये सफाईने रेखाटणारी कादंबरी अश्या अनेक प्रकारे तिचे वर्णन केले जाऊ शकते. मागील दोन भागात तिची रूपरेषा मांडण्याचा मी प्रयत्न केला. आता तिच्यावरील आक्षेपांकडे वळतो.

‘तुंबाडचे खोत’ वर श्री ना पेंडसे स्वतःदेखील फारसे खूष नव्हते असे माझ्या काही मित्रांशी बोलताना मला कळले. ही कादंबरी महा कादंबरी आहे पण महान कादंबरी नाही, अश्या स्वरूपाचे मत त्यांचे स्नेही विं दा करंदीकरांनी व्यक्त केले होते. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत स्वतः श्री ना म्हणतात, ‘त्या थोर कादंबरीकारांना ज्यांनी माझी जागा मला दाखवली’. काही टीकाकार तिच्यावर टीका करताना काहीजण तिला प्रादेशिक कादंबरी म्हणतात; तर काहीजण, ‘प्रयोजनहीन किंवा सूत्रहीन कादंबरी असा आरोप करतात. म्हणजे ही कादंबरी का वाचावी? ही नक्की कुणाची कथा? वाड्याची, घराण्याची, वाताहतीची की अजून कशाची? ते कळत नाही अशी टीका करतात. ऐसी अक्षरे या संस्थळावर एका वाचकाने असेही मत नोंदवले की या कादंबरीची पहिली पाचदहा आणि शेवटची पाच पाने फाडून ती वाचली तरी वाचकाला काही फरक पडत नाही. म्हणजे त्या पानांत असलेले कथानक आणि बाकीच्या कादंबरीतील कथानक यांचा सांधा जुळवायला शिरूभाऊ यशस्वी झालेले नाहीत.

माझ्या मते कादंबरीच्या शेवटी आलेले, ‘मंगल हवे असेल तर अमंगलाची किंमत मोजा’ हे वाक्य या कादंबरीचे सार किंवा सूत्र आहे. खोतांच्या घराण्यातील चार पिढ्यांच्या कथेच्या निमित्ताने मंगल आणि अमंगलाचा जिवंत वळवळणारा गोळा (हा कादंबरीतील शब्द आहे) शिरुभाऊंनी रेखाटला आहे. पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी रेखाटलेली या कादंबरीच्या दोन्ही खंडांची मुखपृष्ठेही तेच सांगत आहेत असे मला वाटते. 



पहिल्या खंडाचे मुखपृष्ठ पाहताना असा भास होतो की वाचक समुद्रकिनाऱ्याजवळील एखाद्या टेकडीवर उभा आहे आहे, समोर नारळी पोफळीची झाडे आहेत, त्यापुढे हिरवीगार झुडपे आहेत आणि त्यापुढे किनाऱ्याकडे येणारी नीलधवल लाट आहे आणि त्यावर पसरलेले निळेशार आकाश आहे. त्या चित्रात सकाळ प्रसन्न करणारी वाऱ्याची एक सुखावह मंद झुळूक जाणवते. पुस्तकाचे नाव पुस्तकाच्या शीर्षस्थानी निळ्या आकाशात आहे. पुस्तकाचे आणि आणि लेखकाचे नाव पांढऱ्या रंगात आणि डोळ्यांना प्रसन्न वाटेल अश्या गोलाई असलेल्या अक्षरात आहे.

याउलट दुसऱ्या खंडाचे मुखपृष्ठ रेखाटताना वाचक समुद्रात तरंगणाऱ्या आणि तुंबाडपासून दूर जाणाऱ्या होडीत किंवा बोटीत बसून दूर सुटत जाणाऱ्या तुंबाडकडे पाहतो आहे असे रेखाटले आहे. समोर समुद्राच्या लाटा आहेत, त्यापुढे तुंबाडचा किनारा आहे. किनाऱ्यावर विरळ झालेली नारळी पोफळीची झाडे आहेत, वेळ रात्रीची आहे. समोर तुंबाड नारिंगी ज्वाळांच्या प्रकाशात भेसूर दिसते आहे. सोसाट्याचा वारा सुटला आहे आणि त्यात उठलेल्या हिरव्या काळ्या धुराच्या लोटात समुद्रकिनारी उभी असलेली झाडे झाकोळून गेली आहेत. पुस्तकाचे नाव पुस्तकाच्या शीर्षस्थानी नसून खाली लाटांमध्ये आलेले आहे. ते नारिंगी रंगात आहे. पुस्तकाचे आणि लेखकाचे नाव भुताळी वाटावे अश्या किंवा ज्वाळांतून उठणाऱ्या वाफेतून पाहिल्यावर पलीकडचे जग जसे हलताना दिसते तश्या अक्षरात आहे. जणू मंगल आणि अमंगलाचा गोळा धगधगतो आहे. आणि साक्षीला आहे जगबुडीचा अविरत प्रवाह.

मंगलातून अमंगल आणि अमंगलातून मंगल अशी सातत्याने चालणारी साखळी या कादंबरीत दिसून येते. जी व्यक्तिरेखा अमंगलाकडे तीव्रतेने झुकते तिच्या समोर उभी ठाकणारी व्यक्तिरेखा तीव्रतेने मंगलाकडे झुकणारी असते. तर ज्या व्यक्तिरेखा सौम्यपणे एकीकडे झुकतात त्यांच्यात मंगल अमंगल भावनांचा कल्लोळ चालू असतो. जणू अमंगलाला मंगलाचे कोंदण आणि मंगलाला आपले मांगल्य उजळून काढण्यासाठी अमंगलाची धग. तुंबाडात तीव्र व्यक्तिमत्वे तर लिंबाडातील लोक तुलनेने सौम्य.

भिकाजीपंतांची तीन मुले. मस्तवाल दादा आणि बंडूमुळे अमंगलाकडे झुकलेला गोळा जणू स्थिर करण्यासाठीच ज्याचा जन्म झाला तो नाना खोत. हा सौम्य प्रकृती खोत पुढे लिंबाडला जातो आणि त्याच्या वंशजांना सौम्य प्रवृत्तीचा वारसा मिळतो.

अहंकारी, उग्र आणि विलासी दादा खोतांचा विवाह होतो सात्विक आणि सोशिक गोदीशी. आणि त्यातून झालेला मुलगा म्हणजे सात्विक आणि निर्मोही गणेशशास्त्री. पण गणेशशास्त्रींचा विवाह होतो साधारण बुद्धिमत्तेच्या स्त्रीशी. त्यातून त्यांना झालेली मुलांत मंगल आणि अमंगलाची सरमिसळ होत जाते. थोरला जनापा म्हणजे शेतमजूर असल्याप्रमाणे राबणारा आणि केवळ शरीराच्या भुकांना जागणारा. दुसऱ्या क्रमांकावर कारस्थानी, पैशाचे आणि शरीरोपभोगांचे लोभी जुळे -चिमापा आणि बजापा. मग धगधगणारा गोळा मंगलाकडे सरकू लागतो आणि जन्माला येतो शरीराने आडदांड पण मनाने प्रेमळ बजापा आणि सगळ्यात शेवटी आजीची प्रतिकृती असलेली सोशिक आणि विद्वान ताई.

यातले जनापा, चिमापा, भिकापा सगळी थेरं करतात. लांड्या लबाड्या करतात, बायका ठेवतात, इतरांचं वाईट चिंततात, लोभाचा कळस गाठतात आणि स्वार्थासाठी नैतिक, अनैतिक असे सगळे मार्ग चोखाळतात. याउलट तीच रग किंबहुना त्याहून जास्त रग असलेला बजापा सगळ्या संधी उपलब्ध असूनही बायकांची लफडी करत नाही, कुणाला फसवत नाही, जुलाली प्रकरणात अडकूनही बायकोला अंतर देत नाही. किंबहुना तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तिच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट करत नाही. सगळ्यात सात्विक ताई. तिचा नवराच गायब होतो आणि ती कायमची माहेरी येते आणि आपल्या थोरल्या तीन भावंडांच्या अमंगलाला सावरत बसते.

शारीरभुकांचा दास असलेला जनापा आणि चिमापाशी संबंध ठेवणारी त्याची बायको यांचा मुलगा म्हणजे देशासाठी प्राण अर्पण करणारा, कुशाग्रबुद्धी, तेजस्वी विश्राम. गणेशशास्त्र्यांच्या अखेरच्या क्षणातही रानात रत असणाऱ्या जनापाच्या विश्रामला मात्र इंद्रियविजय प्राप्त झालेला. चुलत्याचा किंवा पोलिसांचा मार किंवा उपास यापैकी काहीही त्याला नमवू शकत नाही.

कारस्थानी चिमापाचा मुलगा अनंता सत्प्रवृत्त. ताई आत्या आणि विश्रामचा भक्त. वडिलांचा तिरस्कार करू लागतो आणि शेवटी वडिलांच्या आक्रस्ताळेपणामुळे स्वतःच्या जातीबाह्य प्रेमाला मिळवू न शकल्याने दारूत बुडतो. चिमापाची धाकटी पोर ताई. रूपाने आणि बुद्धीने आपल्या आजोबांवर गेलेली. पण तिच्या प्रेमाचे धिंडवडे निघतात आणि आपल्या मनासारखे करण्यासाठी शेवटी तिला वडील आणि चुलत्यांसमोर उग्र रूप धारण करावे लागते. प्रेमळ बजापाचा मुलगा विठ्ठल. तो मनाने प्रेमळ पण तुंबाडच्या तिन्ही काकांबद्दल असलेल्या अढीमुळे हलक्या कानाचा बनलेला. आणि त्यांच्याबद्दल विचार करताना डोक्यावरचा ताबा निसटणारा.

लिंबाड गेलेल्या आणि शामळू खोत म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाना खोताचा मुलगा कर्तबगार मधू खोत. त्याची तिन्ही मुले कर्तबगार निघतात. पण पहिले दोन लिंबाड सोडून घाटावर जातात. डॉक्टर इंजिनियर होतात. तिसरा नरसू खोतही कर्तबगार पण त्याच्या व्यक्तिमत्व शुभ्र पांढरे असण्याऐवजी त्यातही शरीराचे सर्व चोचले पुरवण्याची करडी छटा. सगळे रंगढंग करतो पण घरात आणत नाही. जनापा, चिमापा आणि भिकापासारखा भोगात लिडबिडत नाही पण बजापासारखा नायकिणीलाही बायको करून घेण्याइतका दिलदारही नाही. सगळ्या जगाला मदत करतो. पण धर्मांतर करणाऱ्या त्याच्या थोरल्या मुलाला मात्र जाणून घेऊ शकत नाही आणि धर्मांतरानंतर त्याला मदतही करत नाही. त्याचे संपूर्ण आयुष्य जाते ते चिमापा आणि भिकापाच्या कारस्थानांना तोंड देत, बजापाला आणि त्याच्या मुलाला सांभाळण्यात.

त्याची बायको आयुष्यभर नवऱ्याची सावली बनून राहते पण धाकट्या लेकाच्या लग्नानंतर मात्र नवऱ्याच्या वर्तनावर लांछन लावते आणि संपूर्ण घराला कसर लावते. त्याचा मोठा मुलगा हुशार पण शेवटी डॉक्टर होताना नापास होतो, वडिलांना न सांगता जास्तीचे पैसे मागत राहतो आणि शेवटी हिंदू धर्माला बोल लावत धर्मांतर करतो पण त्यामागील त्याग उदात्त नसून क्षुद्र आहे असे नरसूचे मत असते. धाकटा मधू, अबोल पण कामसू. लग्नानंतर बायकोच्या प्रेमात बुडालेला. पण शेवटी हलक्या कानाचा निघतो बापावर संशय घेतो आणि शेवटी वेडा होतो. वेडातून सुधारल्यावरही बायकोला घाबरून बाहेरचे मार्ग चोखाळतो. या मधुची बायको गुणी आणि सुंदर. पण तीही सासूच्या आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळते आणि मग तिच्या मूळ स्वभावाला विपरीत वागू लागते.

त्याच वेळी बाह्य जगात जाती जातीत भांडणे होत असतात. लोक कुणाबद्दल हळहळ व्यक्त करत असतात तर कुणाच्या दुःखाला परमेश्वराचा न्याय समजत असतात. हिंदू मुस्लिम दंगे होत असतात. दंग्यात घरे जाळणारे नंतर आपल्या मित्राचे घर जळाले म्हणून कानकोंडले होत असतात. टिळकभक्त गांधीभक्त होतात. गांधीभक्त गोंधळतात. शिवाजी, टिळक, गांधी, सावरकर ही आपल्या क्षुद्र आणि दुबळ्यांच्या समाजाला पडलेली स्वप्ने आहेत. त्यांचे विचार आपल्याला कितीही आवडले तरीही ते प्रत्यक्षात आणण्याइतका आपला समाज ओजस्वी नाही हे मान्य करून स्वतःला जमेल तितका स्वार्थमूलक परमार्थ करतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आपल्याच नाकर्तेपणाच्या आणि स्वार्थाच्या अमंगलाला देशभक्तीच्या, नेतेभक्तीच्या मंगलाचे कोंदण द्यायचा प्रयत्न करतात.

त्यामुळे कादंबरीच्या सुरवातीच्या आणि अखेरच्या काही पानांचा मूळ कादंबरीशी असलेला क्षीण संदर्भ हा आक्षेप मला मान्य असला तरी, ‘कादंबरी सूत्रहीन आहे’ असे काही मला वाटत नाही.

------

बोलेरो (भाग २)

-----
श्री ना पेंडसेंच्या ‘तुंबाडचे खोत’ या महाकादंबरीने माझ्या मनावर गारूड केले.

उत्कृष्ट चित्रकार गरज नसल्यास संपूर्ण कॅनव्हास रंगवत बसत नाही. याउलट जिथे आवश्यक असेल तिथे कोऱ्या कॅनव्हासलाच चित्राचा भाग बनवतो. शिरुभाऊंनी या कादंबरीत हेच तंत्र अवलंबले असावे असे मला प्रस्तावना वाचून वाटले आणि मग संपूर्ण कादंबरी वाचताना शिरुभाऊंनी समाजात झालेले बदल कसे दाखवले आहेत, तिथेही माझे लक्ष जात राहिले.

कादंबरी सुरु होते पेशवाईच्या अस्ताच्या वेळी आणि संपते गांधीहत्येनंतर. या विस्तीर्ण कालखंडात भारतीय समाजात झालेले बदल लेखकाने मोठ्या सफाईने मांडले आहेत. कादंबरीतले पहिल्या पिढीतले खोत दादा आणि बंडू, अघोरी तंत्रमार्गाची उपासना करतात खरं तर मला हा भाग हास्यास्पद वाटायला हवा होता आणि या वर्णनाला मी लेखकाचं स्वातंत्र्य म्हणून मान्य करत पुढे गेलो असतो. पण माझ्या सुदैवाने मी नंदा खरेंचं, ‘बखर अंतकाळाची’ वाचलं होतं आणि त्या अनुषंगाने इतर वाचनही झालं होतं त्यामुळे पेशवाईच्या अखेरच्या काळात भारतीय समाजात तंत्रमार्गाची, शाक्तांची, अघोर पंथीयांची किती चलती होती ते मला माहिती होते. त्यामुळे दादा आणि बंडू खोतांच्या तंत्रउपासनेमागे तत्कालीन समजुतींचा लेखकाने वापर करून घेतल्याचे मला जाणवले. आणि पुढे जाऊन चिमापा, भिकापा व ताई आपल्या आजोबांच्या या अघोर साधनेला ‘ब्रिटिश सत्ता उलथवण्यासाठीचा प्रयत्न’ असा हेतू जोडून देऊन आपल्या घराण्याची प्रतिष्ठा राखतात. पुनर्लेखन करून सोयीचा इतिहास उभा करून आपल्या अस्मिता टोकदार करण्याची आणि समाजात आपले वजन वाढवण्याची भारतीय प्रवृत्ती अधोरेखित करतात. श्रीनांच्या लेखणीतून उतरलेले हे प्रसंग वाचताना, ‘वर्तमानात जगत भविष्य घडवत असताना भारतीय समाज त्याच वेळी घटित इतिहासालाही घडवत असतो’ हे माझं मत बरोबर असल्याची खात्री पटली.

दादा खोतांचा जन्म १७८० चा तर बंडू खोतांचा जन्म १७८२ चा. म्हणजे जेव्हा मुंबईची सात बेटं एकत्र करण्याचा प्रकल्प सुरु झाला त्याच वर्षाचा. म्हणजे खोतांच्या या काळात मुंबई अजून नावारूपाला आलेली नसते. त्यामुळे कादंबरीच्या या भागात मुंबईचा उल्लेख येत नाही. तो येतो अगदी नंतर म्हणजे खोतांच्या तिसऱ्या पिढीच्या वेळी, नरसू बजापाच्या वेळी. तोपर्यंत सगळं कथानक तुंबाड आणि लिंबाडच्या जवळपासच्या परिसरात फिरत रहातं. तालुक्याचा उल्लेखही कादंबरीत नंतर येतो. दादा खोत आणि बंडू खोत गावात अनिर्बंध सत्ता उपभोगत असतात.गावात कुणाला आणायचं, कुणाला कुठली जमीन द्यायची, कुणाच्या बायकोला आपल्या छपरी पलंगावर न्यायचं सगळा त्यांच्या मर्जीचा मामला. कुणी विचारणारं नाही. ‘हम करेसो कायदा’ हाच नियम. ना कोणी पोलीस पाटील ना कोणी न्यायाधीश. जेव्हा खोत बंधू अघोरी उपासनेतील अमानुष प्रकार करतात तेव्हा कादंबरीत कंपनी सरकारच्या कायद्याचा प्रवेश होतो आणि तुंबाडात टोपीकराबरोबर फौजदार येतो. त्याला त्या अमानुष प्रकाराचा छडा लावण्यात जितका रस आहे त्यापेक्षा आता खोतांच्या हम करेसो कायद्यासमोर कंपनीच्या कायद्याची ताकद दाखवायची आहे. आणि कंपनीचा कायदा सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवायचं आहे. त्यामुळे त्याचा आवेश लेखकाने वाजवीपेक्षा जास्त ठेवला आहे. नंतर कोर्टकचेरी न करता फौजदार पैसे खाऊन प्रकरण दाबतो, तेव्हा आजही टिकून असलेली सरकारी कमर्चाऱ्यांची वृत्ती अधोरेखित होते.

या काळात पोलीस नाहीत. मुंबई नाही. वर्तमानपत्र नाही. शिक्षण नाही. प्रेमविवाह नाहीत. पण विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंध सर्रास आहेत. ब्राह्मणांत केशवपन सक्तीचे आहे. जन्माधारित अधिकार आणि त्याने आलेली मग्रुरी किंवा लाचारी यानेच समाजाचा गाडा चालतो आहे. ब्राह्मणेतर समाजात मराठ्यांचे स्थान महत्वाचे आहे पण ब्राह्मण स्वतःला उच्च समजतात आणि इतरही त्यांना तसे समजतात हे दिसून येते. काही ब्राह्मण केवळ पूजापाठ सांगतात आणि गरीब आहेत तर काही ब्राह्मण जमीनीचे मालक आहेत, सधन आहेत आणि आपली जमीन कुळांना कसायला देत आहेत. स्वतः व्यापार उदीमात लक्ष घालत आहेत. सोवळे ओवळे पाळत असले तरी स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या वैविध्याला जातीपातीचे बंधन नाही. सधन ब्राह्मण अनधिकृतरित्या अनाचार करत असले तरी गरीब ब्राह्मण कुलाचार, सोवळे ओवळे आणि नियमांच्या बाबतीत काटेकोर आहेत. गरीब ब्राह्मणावर हात टाकायला कुठल्याच जातीला फार भीती वाटत नाही. आणि आपल्याच जातभाईकडून अधिकृतरित्या जातीबाह्य वर्तन झाल्यास त्याला बहिष्कृत करण्याचे ब्राह्मणांचे वर्तन मराठ्यांसकट सर्व जातींना हास्यास्पद वाटते आहे. थोडक्यात सांगायचे तर व्यवहारात ‘बळी तो कान पिळी’ हा नियम असूनही ब्राह्मणातील गरीब श्रीमंत सारेजण किमान अधिकृतरीत्यातरी आपल्या पूर्वजांच्या धर्माचे नियम पाळण्यात धन्यता मानत होता.

शिक्षणासाठी गणेशशास्त्री पुण्यास जातात आणि नंतर सरळ काशीला. मुंबईला नाही. काशीहून धन्वंतरी होऊन येतात. पण नंतरच्या पिढ्यात मात्र डॉक्टर, वकील होणे प्रतिष्ठेचे मानले जाते आणि शिक्षणासाठी पुण्याऐवजी मुंबई महत्वाची ठरू लागते. सुरवातीला तुंबडबाहेर न जाणारी माणसे मग आगबोटीने मुंबईला फेऱ्या मारू लागतात. मुंबई जेव्हा कादंबरीत येते तेव्हाही ती कुणालाही विरघळवून टाकणारा मोठा जनसागर म्हणून येते. तिथे मोठमोठ्या इमारती आहेत, हॉस्पिटल आहेत, कॉलेजेस आहेत, लॉज आहेत, पेढ्या आहेत बग्ग्या आहेत, ट्राम आहे, चाकरमानी आहेत आणि नायकिणी आहेत. मुंबईचा प्रवेश झाल्यावर पुणे आणि काशी मागे पडते.

तुंबाडात शाळा सुरु होते ते प्रकरण वाचताना मला भैरप्पांची तंतू कादंबरी आठवली. शाळेत ब्राह्मण समाजातून येणारी जास्त मुलांची संख्या. मराठ्यांची त्यामुळे होणारी चडफड. त्यावरून होणारे राजकारण हा भाग तंतूपेक्षा वेगळा असला तरी काही माणसांचा आटापिटा. इतर सगळ्यांचा आडमुठेपणा. पैशाचं अपुरं पाठबळ. ध्येयवेडे शिक्षक. पालकांची आणि मुलांची शिक्षणाबाबतची उदासीनता, हे सगळे भाग सारखेच. आणि ब्राह्मण मराठे वाद वाचताना नेमाडेंचे चांगदेव चतुष्ट्य आठवतेच.

राजकारण आणि स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख येतो तोही कथानकाला पुढे घेऊन जातो. आपल्या हाताने सुल्तानकीची वस्त्रे खलिफाला पाठवून त्याचा आशीर्वाद मिळवून आपापल्या रयतेवर हुकूम गाजवण्याचा शिरस्ता ज्याप्रमाणे मुघल साम्राज्याच्या काळी रुळला होता तोच कित्ता मोरया गिरवतो आणि हर्णेच्या किल्ल्यावर आलेल्या शिवरायांकडून स्वतःचा सत्कार करून घेतो. नंतर चिमापा स्वतःच्या पैशाने समारंभ करून स्वतःचा सत्कार करवून घेतो ते वाचताना तर सध्याच्या कित्येक पुरस्कारांची आठवण व्हावी.

तुंबाडात फार थोड्या लोकांकडे केसरी येऊ लागतो. त्यातले बहुतेक लोक तो वाचत नाहीत. पण उमलत्या वयातील विश्राम ते ताईआत्याबरोबर वाचून भारावून जातो आणि देशकार्यासाठी घर सोडतो. काँग्रेसचा सदस्य वगैरे न होता त्याला क्रांतिकारक व्हायचे असते. लढ्याचे स्वरूप काय? कुणाशी, कुणासाठी आणि कसं लढायचं ते माहीत नसताना घरातील वातावरणापासून तुटलेला कोवळा पोरगा जेव्हा सरकारविरोधासाठी घर सोडतो तेव्हा तत्कालीन क्रांतीकारांची मानसिक अवस्था वाचकाला थोडी वेगळ्या अंगानेही दिसू लागते.

टिळक कोकणचे आणि त्यातही ब्राह्मण असल्याने त्यांचे नेतृत्व ब्राह्मण समाजात सहजी स्वीकारले जाते. पण ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारंच’, अशी गर्जना करणाऱ्या टिळकांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी कुणी घर सोडून बाहेर पडत नाही. ती किमया होते काँग्रेसमुळे आणि त्यातही गांधींमुळे. लोकांना गांधी कळत नाहीत. त्यांचे नेतृत्व अनेकांना गोंधळात पाडते. चळवळ सुरु करून मध्येच मागे घेणे, उपोषण, आमरण उपोषण, युद्धात सरकारला सहकार्य पण नंतर असहकाराची चळवळ, खादी, चरखा, सूत, परदेशी कापडाची होळी यातल्या कित्येक गोष्टीमागील राजकीय आणि आर्थिक तत्वे सामान्यांच्या गावीही नसतात. परदेशी कापडाची होळीत टाकलेले कपडे हे चळवळीतला सहभाग नसून काका पुतण्याचे भांडण म्हणून आलेले असतात. आणि नंतर कित्येक लोक मँचेस्टरचे कापड वापरणे चालू ठेवतात ते वाचताना स्वातंत्र्यलढ्यातील सामान्यांच्या सहभागाची वेगळी बाजू समोर येते.

काँग्रेसचा प्रचार करणारे बापू, नरसू आणि नरुशेट आपापल्या स्वभावाप्रमाणे चळवळीतील सोयीचा भाग उचलतात. बापू गावाचे गांधी होतात. ब्रह्मचर्य ते मैला साफ करणे ते विजातीय विवाह कर्मकांडांशिवाय लावून देणे वगैरे कामे करू लागतात. लोकांत अप्रिय होतात. पण गांधीवाद सोडत नाहीत. त्यामागे त्यांचे एक वैयक्तिक दु:खही असते, ज्याचा उल्लेख ते शेवटी नरसूकडे करतात आणि पुन्हा सार्वजनिक भूमिकेमागील वैयक्तिक कारणांकडे लेखक आपलं लक्ष वेधून घेतो. नरुशेट दारूबंदी होईपर्यंत काँग्रेसबरोबर राहतात पण नंतर मात्र त्यांना काँग्रेस नकोशी होते. नरसूला गांधी पटत नाही. त्याला गांधींचे नेतृत्व म्हणजे देशाचे दुर्दैव वाटते पण त्या माणसाच्या एका हाकेसरशी सारा देश हलतो याचे त्याला फार कौतुक असते. पुणे कराराच्या वेळी गांधींनी आंबेडकरांची केलेली अडवणूक त्याला पटत नाही पण स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय? हेच त्याला कळत नाही. आणि नंतर एकाएकी अस्पृश्योद्धाराचा कार्यक्रम सुरु होणे, दलितांना हरिजन संबोधणे हे त्याला हास्यास्पद वाटते. त्याला गांधी आणि सावरकर दोघेही काळाच्या पुढे असलेले नेते वाटतात. सावरकरांची मते समाजाला पचणार नाहीत असे त्याला वाटते. गावात सुरु होणारे सावरकर मंडळाचे प्रतिज्ञापत्र छापायलाही तिथला ब्राह्मण मालक नकार देतो कारण त्यात हिंदू हीच माझी जात, विज्ञान हाच देव, गाय हा एक उपयुक्त पशू वगैरे मते नोंदवलेली असतात. आणि या मंडळाचे सभासददेखील ती प्रतिज्ञा न वाचताच केवळ तरुण नातेवाईकाचे मन राखावे म्हणून सभासदत्व घेतात आणि मंडळाच्या एकाही सभेला हजार राहात नाहीत.

गांधींचे साधे रहाणे लोकांत चेष्टेचा विषय असते टिळकभक्त लोकांना गांधींचा उदोउदो आवडत नाही. म्हणून ते सावरकरवादी होतात. पण सावरकर अंगीकारत नाहीत. सगळे राजकीय वाद केवळ वैयक्तिक हेवेदाव्यांसाठी वापरले जातात. हिंदू मुस्लिम दंग्यामागेही वैयक्तिक हेवेदावे हेच मोठे कारण असते. प्रत्येक सामाजिक चळवळीच्या उदात्त मुखवट्यामागचा वैयक्तिक हेवेदाव्यांचा ओबडधोबड चेहरा दाखवून लेखक त्याची चकाकी खरी किती आणि खोटी किती याचा निर्णय वाचकांवर सोडतो.

शेवटी फाळणीला गांधींना जबाबदार मानणाऱ्या काँग्रेसी नरसूला, टिळकभक्त असलेले देहाडराय जेव्हा सांगतात की फाळणीला गांधींचा विरोध होता आणि तिची बीजे टिळकांनी केलेल्या लखनौ करारात होती. हे कळल्यावर नरसूला जो धक्का बसतो त्यावरून स्वातंत्र्यलढ्यातील कित्येक घटनांबद्दल बहुसंख्य भारतीय समाज किती अज्ञानी होता त्याकडे लेखक आपले लक्ष वेधून घेतो.

जातीबाह्य विवाह, काळाबाजार, मुलींनी नोकरी करणे, प्रेमविवाह, केशवपन थांबणे, चित्रपट, त्यातील नायिकांप्रमाणे केसांच्या रचना, हिंदू अविभक्त कुटुंब, त्यातील सामायिक मालमत्तेबाबत होणारे वाद आणि त्यावर गडगंज होणारे वकील, देश सोडून बाहेर स्थायिक होणारे हुशार भारतीय, नीरा आणि माडीची जागा घेऊन संसार उध्वस्त करणारी दारू; हे सारे आपल्याला मधून मधून भेटत राहतात आणि तत्कालीन समाजाचे बदलते चित्र आपल्या मनात उभे राहू लागते. श्रीनांनी कथेतील व्यक्तींबरोबर तत्कालीन समाजालाही कथेचा नायक बनवल्याचे जाणवते. हे थोडे सध्याच्या हॉलिवूड पटांसारखे आहे. लाईफ इज ब्युटीफुल मध्ये नाझी छळछावणीच्या पार्श्वभूमीवर बापलेकाची कथा किंवा टायटॅनिक मध्ये त्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एका जोडप्याची प्रेमकथा, ही उदाहरणे त्याच धाटणीची आहेत फक्त यात श्रीनांनी फार मोठ्या काळाची पार्श्वभूमी आणि अनेक पात्रांच्या जीवन कथा एकात एक गुंफल्या आहेत.
----

Sunday, December 17, 2017

बोलेरो ( भाग १)

---
श्री ना पेंडसे (तुंबाडचे खोत या कादंबरीचे लेखक)
Source : Internet 
मोरया दिसत नाही पण तो घराण्याचा मूळपुरुष मानला जातो. तुंबाडचा खोत. सुपारी आणि नारळाचा व्यापार करून सधन झालेला. शिवाजी महाराजांकडून सत्कार झालेला. कदाचित त्यामुळेच त्याला खोत घराण्याचा मूळपुरुष मानत असावेत आणि जगबुडी नदीच्या काठी तुंबाडचं गाव त्याच्यामुळेच नावारूपाला येतं. त्याने तुंबाडात गोड पाण्याची मोठी विहीर बांधली. जगबुडीची ओटी भरायचा रिवाज त्याने चालू केला. नवसासाठी टेंभूर्णीला प्रतिष्ठाही त्याच्या काळात मिळाली. नंतर जर मानवी हस्तक्षेप झाला नसता तर अजूनही टिकून राहिला असता असा चार शतकांचा साक्षीदार असलेला वाडा त्याने बांधला. तो कोण होता ते कुणाला माहिती नाही. काहीजण म्हणतात तो कदाचित दरोडेखोरही असावा. पण त्याचे अस्तित्व गावाला आणि वाड्यातल्या माणसांना सारखे जाणवत रहाते. गावात त्याची पावलं असलेले दगड असतात, जणू त्याने ठरवलेली गावाची सीमा सांगणारे. गावात येणारा - जाणारा त्या पावलांशी डोकं टेकून मगच पुढे जातो. तो वाड्यातील काही स्त्रियांच्या स्वप्नात येतो. कधी पाणी पितो कधी नाही. बोलत नाही पण शुभ किंवा अशुभ भविष्याची सूचना देतो अशी वाडेकरांची श्रद्धा असते. त्याने बांधलेला वाडा अजस्त्र, पहिल्या भेटीत अंगावर येणारा आणि कित्येक मंगल अमंगल घटनांना आपल्यात सामावून घेणारा. वाडेकऱ्यांना तुंबाडचं खोतपण देणारा.

अश्या या मोरयाचा एक वंशज भिकाजी; पहिल्यांदा तुंबडबाहेर पडतो. त्याला स्वतःचं संस्थान स्थापन करायचं आहे तुंबाडात. पण तो पेशव्यांबरोबर पानिपतावर जातो आणि लंगडा होऊन परततो. त्याचं संस्थान स्थापनेचं स्वप्न विरून जातं. त्याची तीन मुलं; बंडू, दादा आणि नाना. त्यातील बंडू आणि दादा खोतपणाची रग मिरवणारे तर नाना मात्र खोत वाटत नाही इतका मवाळ.गावात त्याला सगळे शामळू खोत म्हणतात. भिकाजीपंतांचं संस्थान स्थापनेचं स्वप्न बंडू आणि दादा खोताच्या डोक्यात शिरतं. पेशवाई सरत चालली आहे. भारतात कंपनी सरकारचं राज्य आलं आहे. बंडू आणि दादा खोत गावात आणि बिछान्यात आपले रंग उधळत आहेत. चाळीशीच्या तिजवर दादा खोताचा विवाह होतो गरीब किर्तनकार बापाच्या कोवळ्या पोरीशी, गोदीशी. वाड्याच्या आणि दादाच्या प्रथम दर्शनाला पोरगी गांगरते पण स्वतःला आणि नंतर घराला सावरते. इथे संस्थान स्थापन करण्याचं खोत बंधूंचं स्वप्न उचल खातं. कंपनी सरकारचं राज्य उलथायला ते अघोरी मार्गाची उपासना करतात. मोरयाच्या टेंभुर्णीला सोडून, खाडीतील बेटावर असलेल्या गिऱ्हाडीला नवस करतात. मद्य, मास, मैथुनाचा नैवेद्य करतात आणि शेवटी आपली उपासना पूर्ण करण्यासाठी अतिशय क्रूर आणि अमानवी प्रकार करतात. ते पाहून शामळू नाना खोत विभक्त होतो. वाड्याची वाटणी होत नाही आणि इतर सामायिकीची जी वाटणी होते त्यात त्याच्या हाताला फार काही लागत नाही. पण तो मोरयाच्या मूळ वाड्यापासून दूर लिंबाडला स्वतःचा वाडा बांधतो. मूळ वाड्यासारखाच पण लहान. कारण मोरयाच्या मानाला धक्का लागायला नको. पण त्या अघोरी प्रकारामुळे कंपनी सरकारचा फौजदार तुंबाडला चौकशीला येतो. बंडू खोत परागंदा होतो. दादा खोताची चामडी लोळवली जाते. गावातून वरात निघते. नंतर प्रकरणातून घराण्याच्या नावाला सावरण्यासाठी फौजदाराची धन करावी लागते आणि त्यात दादा खोत निर्धन होतात. तरीही घराण्याचा नावलौकिक जातो तो जातोच. वाड्याचे नष्टचर्य चालू होते.

दादा खोतांचा मुलगा गणेश, आईसारखा तेजस्वी आणि हुशार. दादा खोताने दुखावलेल्या गावकऱ्याकडून त्याचा अपमान होतो. त्याला शिक्षणासाठी गावापासून दूर पाठविण्याचा निर्णय गोदाताई घेतात. आणि नंतर त्याच मुलाला विद्याभ्यासासाठी काशीला पाठवतात. त्यावेळी लाखेश्री करेल असं पुण्यातील एका मुलीचं स्थळ नाकारतात. नाना खोत चिडतो. पण गोदाताई ऐकत नाहीत. तुंबाडच्या वाड्याला मरणकळा येते. वैभव लयाला गेलेले असते. आणि मग विद्याभ्यास संपवून गणेश परततो तो गणेशशास्त्री होऊन. तेजस्वी आणि विद्वान वैद्य होऊन परतलेल्या गणेशशास्त्रींना बघून तुंबाड थरारतं. नाना खोत गोदावहिनीचे पाय पकडून माफी मागतो. गोदाताई आपल्या आनंदाचं प्रदर्शन मांडत नाहीत. वाड्याचे दिवस फिरू लागलेले असतात.

गणेशशास्त्रींनी गुरूजवळ शपथ घेतलेली असते की विद्या वापरून अर्थार्जन करणार नाही. पण त्यांच्या हाताला प्रचंड गुण असतो. धन्वंतरीच जणू. पंचक्रोशीतून त्यांच्याकडे रोगी येतात आणि निरिच्छ भावनेने गणेशशास्त्री त्यांचे रोगनिदान करतात. लोक मोबदला देऊ करतात तर तो नाकारतात. खोत घराण्याचा लौकिक वाढू लागतो. गणेशशास्त्रींच लग्न ठरतं. उपकृत गाव लग्नाचा सोहळा दिमाखात साजरा करतं. लग्नानंतर रोगी शास्त्र्यांच्या पत्नीकडे रोगनिदानाच्या कृतज्ञतेने भेटी देऊ लागतं आणि ती त्या भेटी शास्त्रीबुवांच्या नकळत स्वीकारू लागते. आता तो शिरस्ता होतो. वाड्याची भरभराट होऊ लागते.

शास्त्र्यांना चार मुलं आणि एक मुलगी. पहिला जनापा. तो खैराचं झाड निघतो. नोकरांच्या संगतीत लागतो. शास्त्र्यांची विद्या घेणं त्याच्या कुवतीबाहेरचं असतं. गड्यांच्या सवयी उचलतो आणि आयुष्यभर शेतात राबतो. नंतर जुळे चिमापा आणि भिकापा. वडिलांच्या विद्येला तेही ग्रहण करू शकत नाहीत. तालुक्याला दुसऱ्याच्या दुकानात काम करतात. त्याच्याकडून व्यापार शिकतात शेवटी तालुक्याला वखार काढतात. चौथा बजापा. आडदांड आणि लहरी. बापाचा एकही गुण न उचललेला, शिकार आणि मित्र हेच शौक असलेला. बाकी सगळे खोत बाईबाजी करणारे पण बजापा मात्र त्या बाबतीत अगदीच निरस. आणि पाचवी ताई. हिने रूप आपल्या आजीचं घेतलेलं असतं. आणि हुशारी बापाची. तिचं लग्न मोठ्या थाटात होतं.

आपली बायको रोग्यांकडून पैसे घेते हे कळताच गणेशशास्त्री हाय खातात. गुरूने दिलेल्या व्रताचा भंग झाल्याने ते बिथरतात. अचानक उद्भवलेल्या असाध्य आजाराने गणेशशास्त्र्यांचं देहावसान होतं. काही वर्षातच ताईचा नवरा परागंदा होतो आणि ती वाड्यावर परतते. शास्त्र्यांच्या बायकोने माहेरी व्याजाने लावण्यासाठी दिलेले पैसे परत देण्यास तिच्या माहेरचे नकार देतात. पैसे घेतले हे वाक्य येताच कानावर हात ठेवतात. शास्त्री देवाघरी. मोठा मुलगा अजून नाकर्ता. नंतरचे तीन अजून नशीब चाचपडणारे. मुलगी परत आलेली. माहेरी दिलेलं धन गायब झालेलं. वाड्याचे दिवस फिरू लागलेले असतात.

इथे शामळू नाना खोताच्या मुलाने, मधू खोताने लिंबाडला सावरलं असतं. तुंबाडात जातपात आणि कडक सोवळं, मात्र लिंबाडात जातभेदाची धार बोथटलेली. तुंबाडात इतर जातींची पानं आडवी मांडलेली, लिंबाडात मात्र ती ब्राह्मणांबरोबर सरळ रेषेत. मधू खोताला मुलगा होतो. त्याचं नाव नृसिंह किंवा नरसू खोत. सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, हुशार डोक्याचा, व्यापारी आणि वृत्तीने रसिक. त्याची आणि बजापाची दोस्ती घट्ट होत जाते. ती दोस्ती जुळ्या चिमापा आणि भिकापाला सलू लागते. पण बजापा नरसूचा आधार सोडत नाही. नरसूच्या बायकोच्या नात्यातल्या मुलीशी बजापाचं लग्न होतं. जुळे नरसूला पाण्यात पाहू लागतात. त्यांना वाटतं बजापाला हाताशी घेऊन नरसू त्यांना बुडवणार. ते नरसूच्या खोड्या काढू लागतात. नरसू बजापाला मुंबईला घेऊन जातो. तिथे त्याची भेट जुलालीशी होते. म्हटलं तर नायकीण पण कुणाला जवळ येऊ न देणारी. कुणाला बोलूही न देणारी जुलाली बजापावर भाळते. आणि बायकांच्या नादाला न लागणारा बजापा तिच्याजवळ जातो. पंधरा दिवस मुंबईला तिच्याजवळ नंतर पुन्हा तुंबाडला असा त्याचा दिनक्रम सुरु होतो. तिच्या पैशातून तुंबाडला उर्जितावस्था येते. वाड्याचे दिवस फिरू लागलेले असतात.

जनपाला मुलगा होतो. त्याचे नाव विश्राम. आजोबांसारखा देखणा आणि कुशाग्रबुद्धी. पण जनापा त्याला बापाचं प्रेम देऊ शकत नाही. जनापाच्या बायकोचं चिमापाबरोबर प्रकरण चालू असतं. शेवटी तिला वेड लागतं आणि ती विवस्त्रावस्थेत खाडीत उडी टाकून जीव देते. जनापा घरात अजून अबोल होतो. विश्राम ताईशी बोलत राहतो. तिच्याबरोबर केसरी वाचतो. क्रांतिकारकांच्या गोष्टी ऐकून भारावून जातो. वडिलांबद्दल त्याच्या मनात अढी असते. एक दिवस चिमापाकडून गुरासारखा मार खातो. आणि मग त्याचे अन्नपाणी तोडले जाते. मार खाताना तो तोंडातून अक्षरही काढत नाही. स्वतःहून अन्नपाणी मागतही नाही. शेवटी चुलता चिमापा माघार घेतो. विश्राम जेवतो पण लवकरच घर देशकार्यासाठी घर सोडतो. क्रांतिकारक होतो. त्याच्या मागावर असलेले पोलीस वाड्यावर येऊन जुळ्यांना बडवतात.

बजापा तालुक्याला नवीन वाडा बांधणार असतो. मोरयाच्या वाड्यासारखा पण त्याहून छोटा. पण त्याआधी त्याची बायको होरेत (दलदलीत) उडी टाकून जीव देते. त्याचे कारण जरी वेगळे असले तरी बजापाला आणि गावाला वाटते की जुलाली प्रकरणामुळे तिने जीव दिला. त्या वाड्यावरून बजापाचं मन उडतं. अर्धवट बांधलेला वाडा तसाच सोडून तो मुंबईला जातो. त्याचा मुलगा विठ्ठल त्याच्याशी कुठलीच आपुलकी दाखवत नाही आणि मग बजापा मुंबईला तर विठ्ठल ताईजवळ तुंबाडला राहतो. पण त्याला आदर वाटतो तो लिंबाडच्या नरसूबद्दल.

मग तुंबाडला शाळा काढली जाते. त्यात मराठा ब्राह्मण वाद येतो. देणगीदार फसवतात. नरसू सगळं निभावून नेतो. चिमापाला शाळेचा चेअरमन करतो. शाळेसाठी जिवाचं रान करतो. देहाडरायांसारखा टिळकभक्त शाळेचा हेडमास्तर होतो. पण बापू वकिलांच्या संगतीने नरसू काँग्रेसमध्ये शिरतो. त्याला गांधी कळत नाहीत पण गांधींचं ऐकावंसं वाटतं. तो सत्याग्रहात भाग घेतो. तुरुंगात जाऊन येतो. पुणे करारामुळे त्याला गांधी अनाकलनीय होतो. पण काँग्रेसच देशाचं भलं करेल असं वाटत असल्यामुळे तो काँग्रेसमध्येच रहातो. तुरुंगवासामुळे त्याची प्रतिष्ठा वाढते. चिमापा जळफळतो. तो बांडेरामाच्या देवळाचा पंच झालेला असतो. नरसूला विरोध म्हणून तो टिळकपंथी होतो. शतचंडीचा यज्ञ करतो. त्यात बांडेरामाच्या आवाराजवळील एका दर्ग्याचे प्रकरण घडते. आणि ज्या मुलीवर आपलं मन बसलेलं होतं तिला चिमापाने ठेवून घेतली म्हणून बिथरलेला खान वकील दर्ग्याच्या प्रकरणात तेल ओततो. गावात हिंदू मुसलमान दंगल घडते.

नरसूची पहिली दोन मुले अनाकलनीय आजाराने लहानपणीच मरतात. जुळे सोडून तुंबाड आणि लिंबाड नरसूसाठी हळहळतं. तिसऱ्या मुलाच्या वेळी बजापा आणि जुलालीच्या हट्टाने नरसू मुंबईला डॉक्टरांकडे जातो आणि हा तिसरा मुलगा वाचतो. पुढे हाच मुलगा मुंबईला डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायला जातो. नापास होत राहतो आणि परीक्षा देत राहतो. आणि एक दिवस नरसूच्या दृष्टीने क्षुल्लक असलेल्या कारणासाठी तो धर्मांतर करतो. नरसूला धक्का बसतो. पण तो धक्का नरसू पचवतो. मुलाला विसरतो. धाकट्या मुलावर लक्ष देतो.

बापू वकील, वकिली सोडतात. गावात खादी आणतात. नरसू त्यात भाग घेतो. मग बापू वकील मैला साफ करू लागतात. नरसू त्यात भाग घेत नाही. आंतरजातीय विवाह करून देऊ लागतात. नरसूला ते कळत नाही. पण तो त्याला विरोधही करत नाही. महायुद्ध चालू होतं. नरसूला हिटलर आवडू लागतो. तो देहाडरायांशी त्याबद्दल बोलतो. टिळकभक्त असलेले देहाडरायांनी माईन काम्फ वाचलेलं असतं. हिटलरबद्दल ते नरसूला जे सांगतात ते ऐकून नरसू अजून गोंधळतो. न पटणारा गांधीच आपल्या कामाचा आहे असं त्याला वाटू लागतं. त्या एकट्या माणसाच्या जोरावर अख्खा भारत ढवळला जात आहे हे त्याला दिसतं. इतरांप्रमाणे गांधींची धरसोड वृत्ती त्याला पटत नाही. सर्वांप्रमाणे अहिंसा त्याला मूर्खपणा वाटतो. आंदोलन सुरु केल्यावर मध्येच मागे घेणाऱ्या गांधींबद्दल, 'बेभरवशाचे नेतृत्व' हेच त्याचे मत असते. पण भारतातील सर्व जातीधर्माच्या सर्व नेत्यांना मान्य नसूनही बहुसंख्य जनतेला पटणारा गांधींशिवायदुसरा कुठला नेता नाही हे त्याला पटलेले असते. नरसू काँग्रेस सोडत नाही. मनात नसताना दारूबंदी कार्यक्रमात भाग घेतो.

हिंदू मुस्लिम दंग्यात मर्दुमकी गाजवलेल्या भंडारी जातीच्या संताजीवर चिमापाच्या मुलीचं मन बसतं. तो सावरकरवादी असतो. गांधींना मानणाऱ्या नरसूला विरोध म्हणून चिमापा सावरकरवादी होतो. पण मुलगी भंडाऱ्याबरोबर जाईल हे कळताच बिथरतो. त्यात पुन्हा संताजी नरसूचा मानसपुत्र असतो. मुलीचं लग्न दुसरीकडे करून दिलं जातं. पण सर्व काही सुरळीत होत असताना तिथे गडबड होते. मुलगी परत येते. सासरकडून पुन्हा बोलावणं आल्यावर सासऱ्याला आणि नवऱ्याला जे प्रश्न विचारते ते जणू द्रौपदीने वस्त्रहरणप्रसंगी कुरुसभेला विचारलेल्या प्रश्नांच्या तोडीचे असतात. आणि मग पाच पतींबरोबर संसार करणाऱ्या द्रौपदीप्रमाणे पहिला नवरा हयात असताना घटस्फोट न घेताच संताजींबरोबर संसार करू लागते.

स्वातंत्र्य मिळते. पन्नास कोटीचा चेक पाकिस्तानकडे जातो. नौखालीत दंगली होतात. बातम्या येत असतात. लोकांना गांधी नकोसा होतो. त्यांचा उल्लेख आता 'म्हातारा' असा होऊ लागलेला असतो. गांधींनी उपोषण करावे आणि त्यात ते मरावेत अशी अनेकांची इच्छा असते. संतू, नरसू आणि खान वकिलावर चिडलेला चिमापा गांधींवर गोळ्या झाडायची भाषा करत असतो. नेमकी गांधींवर गोळी झाडली जाते तेव्हा तो मुंबईला असतो आणि नंतरच्या दंगलीत अडकतो. गावी बातमी पसरते की चिमापा सावरकरवादी आणि गोळ्या झाडायची गोष्ट करणारा म्हणजे तो मारेकऱ्याला सामील आहे. मारेकरी ब्राह्मण आहे हे कळल्यावर उसळलेल्या ब्राह्मण द्वेषात तुंबाड आणि लिंबाडची वाताहात होते. श्री ना पेंडसेंच्या तुंबाडचे खोत या महाकादंबरीची ही थोडक्यात रूपरेषा.
____

Tuesday, December 12, 2017

I do what I do

दिनांक २५ नोव्हेंबर २०१७रोजी लोकसत्तामध्ये बुकमार्क या सदरात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ रघुराम राजन यांच्या I do what I do या पुस्तकाचा मी करून दिलेला परिचय प्रसिद्ध झाला होता. शब्दसंख्येच्या मर्यादेमुळे लोकसत्ताने त्यातील काही भाग गाळला होता.  तो मूळचा पूर्ण  लेख असा होता. 




Image Courtesy : Internet 

वित्तक्षेत्रात मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांचे दोन प्रकार मानले जातात. ज्या अध्यक्षांच्या दृष्टीने बेरोजगारीपेक्षा चलनवाढ अधिक मोठी समस्या आहे ते अर्थव्यवस्थेत व्याजदर चढे ठेवतात. त्यांना Hawk (हॉक - शिकारी ससाणा) मानलं जातं. याउलट ज्या अध्यक्षांना चलनवाढीपेक्षा बेरोजगारी अधिक मोठी समस्या वाटते ते व्याजदर कमी ठेवतात म्हणून त्यांना Dove (डव्ह - शांत कबूतर) मानलं जातं. भारतीय रिजर्व्ह बँकेचे पतधोरण साधारणपणे दर दोन महिन्यांनी जाहीर केले जाते. एका पतधोरणाच्या पूर्वसंध्येला परिषदेत तत्कालीन गव्हर्नर डॉ रघुराम राजन यांना एका पत्रकाराने विचारलं, 'उद्याच्या धोरणात तुम्ही कोण आहात? जेनेट येलेनप्रमाणे डव्ह की पॉल व्होल्करप्रमाणे हॉक?' (येलेन आणि व्होल्कर दोघेही अमेरिकन मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. येलेन यांच्या कारकिर्दीत व्याजदर उतरते होते तर व्होल्कर कारकिर्दीत व्याजदर चढे होते.) थोडक्यात दुसऱ्या दिवशी जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर वाढतील की कमी होतील, त्याचा अंदाज काढायचा प्रयत्न त्या पत्रकाराने केला. त्याला उत्तर देताना जेम्स बॉण्डच्या सुप्रसिद्ध संवादाच्या चालीवर डॉ. राजन म्हणाले, "माझं नाव आहे रघुराम राजन... " आणि मग दुसऱ्या दिवशी जाहीर होणाऱ्या पतधोरणाला फुटू न देता, वाक्य पूर्ण करण्यासाठी ते म्हणाले "आय डू व्हॉट आय डू" आणि मग दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्राचे मथळे ठरले. पतधोरण आतील पानावर गेले पण 'आय डू व्हॉट आय डू' हे वाक्य गाजले. डॉ राजन आपल्या पदावरून पायउतार झाल्यानंतर गव्हर्नर म्हणून काम करत असताना त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचे संकलन वाचताना त्यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळाचे जणू सिंहावलोकन करण्याची संधी आपल्याला मिळते आणि मग ‘आय डू व्हॉट आय डू’ हे त्यांचे गाजलेले वाक्य या पुस्तकाचे शीर्षक म्हणूनही अगदी चपखल बसले आहे ते जाणवते.

डॉ राजन यांची विविध भाषणे आणि लेख या पुस्तकात तीन भागात संकलित केले आहेत. पहिल्या भागाचे नाव आहे 'आरबीआयमधील दिवस'. दुसऱ्याचे नाव 'आंतरराष्ट्रीय वित्तीय संकट' तर तिसऱ्याचे नाव आहे 'प्रासंगिक लेख'. आरबीआयमधील दिवस या भागातील सव्वीस भाषणे विषयानुसार नऊ उपशीर्षकाखाली मांडली आहेत. तर आंतरराष्ट्रीय वित्तीय संकट या भागात चार लेख असून प्रासंगिक लेख या विभागात सात लेख आहेत. सदतीस लेखांचे हे संकलन वाचताना डॉ राजन यांच्या बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाची आणि भारतीय बँकिंग क्षेत्रासमोरील अडचणींबाबत त्यांच्या अभ्यासाची जाणीव तर होतेच पण आपण केवळ एका अध्यापनात रमणाऱ्या एका तज्ञाचे विचार वाचत नसून कुशल प्रशासकाचे विचार वाचत आहोत याचाही प्रत्यय येतो. केवळ प्रश्न सोडवण्याकडे डॉ राजन यांचा कल नसून ते तसेच का सोडवले याबाबत सोप्या शब्दात सामान्य जनतेला समजावणेही त्यांना आवश्यक वाटते हे दिसून येते. आणि हे करताना प्रवाही भाषेचा, अनेक उदाहरणांचा व कवितांचा वापर केलेला पाहून डॉ राजन यांच्या बहुश्रुत आणि ऋजू व्यक्तिमत्वाची साक्ष पटते.

पहिल्या विभागातील भाषणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी केलेली असल्याने वाचकाला संदर्भहीन झाल्यासारखे वाटून त्याचा गोंधळ उडू नये म्हणून प्रत्येक भाषणाच्या आधी त्याच्या स्थळकाळाचे, श्रोतृवर्गाचे, कुठल्या प्रश्नावर भाष्य केले आहे त्याचे आणि त्या भाष्यामागची भूमिका मांडणारी छोटेखानी प्रस्तावना दिलेली आहे. त्यामुळे वाचकाला संदर्भ लक्षात येऊन भाषणातील मुद्दे समजायला मदत होते.

देशाचे करधोरण वित्त मंत्रालय ठरवते तर पतधोरण ठरवण्याचे काम मध्यवर्ती बँकेकडे असते. पण आर्थिक उदारीकरणानंतर, संगणक क्रांतीनंतर आणि २००८ च्या जागतिक आर्थिक संकटानंतर पतधोरण ठरवण्याच्या मुख्य कामाबरोबर इतर अनेक कामांत आरबीआयला जुनी धोरणे बदलावी लागली किंवा कित्येकदा संपूर्ण नव्याने विचार करावा लागला. त्यापैकी अनेक बदल डॉ राजन यांच्या कार्यकाळात घडून आले. हे बदल प्रसंगोपात्त होत गेले आणि आरबीआय केवळ मूक साक्षीदार बनून होती असे नसून ते सर्व बदल आरबीआयच्या स्वयंप्रेरणांचा भाग होते हे सप्टेंबर २०१३ला पदभार स्वीकारताना त्यांनी केलेल्या भाषणातून दिसून येते. आपल्या कार्यकाळात कोणत्या गोष्टी ते ऐरणीवर घेणार आहेत त्याचे सूतोवाच त्यांनी या भाषणातून केलेले दिसते.

चलनफुगवटा आणि व्याजदर

उद्योगाला कमी व्याजदर हवे असतात याउलट ठेवीदारांना चढे व्याजदर हवे असतात. त्यामुळे व्याजदर कितीही ठेवला तरी अर्थव्यवस्थेतील एक गट नाराज होतोच. व्याजदर ठरवणे हे मध्यवर्ती बँकेचे अत्यंत महत्वाचे काम आहे. त्यासाठी मध्यवर्ती बँकेला चलनवृद्धीचा चालू निर्देशांक किती आहे ते माहिती असणे आवश्यक असते. त्यासाठी दर दोन महिन्यांनी प्रकाशित केला जाणारा WPI वापरण्याऐवजी दर महिन्याला प्रकाशित केला जाणारा CPI वापरावा अशी सूचना प्रथम बिमल जालान आणि नंतर डॉ. उर्जित पटेल यांच्या समितीने सुचवली होती. एप्रिल २०१४ मध्ये डॉ राजन यांनी या सूचनेवर अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. जुन्या काळी तंत्रज्ञान फार प्रगत नसताना वापरायला सोपा असा WPI निर्देशांक वापरण्याशिवाय RBIला गत्यंतर नव्हते. या निर्देशांकाचे घटक कमी असल्याने आणि ते सर्व घाऊक बाजारातून मिळत असल्याने तो मोजायला सोपा असला तरी त्यात सेवा क्षेत्र अंतर्भूत होत नसल्याने तो महागाईबद्दल अचूक संकेत देत नाही. पण संगणक क्रांतीनंतर अधिक गुंतागुंतीचा CPI हा निर्देशांक काढणे शक्य झाले आहे. त्याशिवाय, सेवा क्षेत्राला अंतर्भूत करणारा हा निर्देशांक शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या महागाईचा संयुक्त निर्देशांक असल्याने तो अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अधिक अचूक संकेत देऊ शकतो. असे स्पष्टीकरण डॉ राजन देतात.

१९८०च्या दशकात न्यूझीलंडने राबवलेली इन्फ्लेशन टारगेटिंग (नियंत्रित भाववाढ) ही आरबीआयने डॉ राजन यांच्या नेतृत्वाखाली राबवायला सुरुवात केली. विकसित देशांत भाववाढ रोखणे हे एकमेव उद्दिष्ट असते त्यामुळे तिथे इन्फ्लेशन टारगेटिंग राबवणे सोपे असते. परंतू विकसनशील देशांत मात्र भाववाढ रोखतानाच विकासाचा दर वाढवणे हे देखील उद्दिष्ट असते. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशात ही संकल्पना तितकीशी उपयोगी ठरणार नाही, असा आक्षेप काही तज्ञ मंडळी घेतात. त्यांच्या या आक्षेपांना उत्तर देताना डॉ राजन विकसनशील देशांपुढील आव्हाने मान्य करून पुढे सांगतात की असे असले तरीही इन्फ्लेशन (भाववाढ) कधी हायपर इन्फ्लेशनमध्ये(अपरिमित भाववाढीत) बदलेल हे सांगता येत नाही. किती इन्फ्लेशन अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त आहे याची सीमारेषा कधीच स्पष्ट नसते. म्हणून किती भाववाढ अपेक्षित आहे याबद्दल जर एक जनमत बनवता आले तर त्या सार्वत्रिक अपेक्षेमुळे अपरिमित भाववाढ होणे टळू शकते. त्याप्रमाणे भारताने भाववाढीचे पंचवार्षिक लक्ष्य चार टक्क्यावर ठेवून त्याला वर सहा टक्के आणि खाली दोन टक्के अशी सीमा आखून दिलेली आहे. त्या सीमारेषा ओलांडल्या तर सरकार आणि आरबीआय दीर्घ मुदतीचे उपाय करेल अन्यथा एकदा घेतलेले धोरणात्मक उपाय, प्रतिक्षिप्त क्रियेसारखे अर्थव्यवस्थेतील प्रत्येक झटक्यामुळे बदलले जाणार नाहीत.

पुढे व्याजदर CPI प्रमाणे कमी ठेवले म्हणून पेन्शनर लोकांच्या तक्रारी आल्यावर त्यांना उत्तर देताना डोसानॉमिक्स या या शीर्षकाखालील भाषणात ते कमी व्याजदरामुळे कमी डोसे विकत घेता आले तरी भाववाढ कमी झाल्याने मुद्दल आपले मूल्य हरवून बसत नाही इकडे श्रोत्यांचे आणि वाचकांचे लक्ष वेधून घेतात. आणि कमी व्याजदर कमी भाववाढ अश्या व्यवस्थेत भाववाढीत मुद्दल वाहून न गेल्याने ते मुद्दल आणि व्याज मिळून ग्राहकांची क्रयशक्ती वाढलेली असते हे पटवून देतात. त्याचवेळी CPI प्रमाणे ठरवलेला व्याजदर WPI आधारित व्याजदरापेक्षा जास्त आहे असे वाटणाऱ्या उद्योगक्षेत्राला समजावताना ते सांगतात की आरबीआयने जरी व्याजदर ०.२५% असा कमी केला तरी जोपर्यंत उद्योग क्षेत्र आपल्या व्यवसायातील जोखीम कमी करत नाही आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवरील अनिश्चिततेचे मळभ दूर होत नाही तोपर्यंत कर्ज देणाऱ्या बँका जोखीम अधिभार लावून व्याजदर चढाच ठेवतील. त्यामुळे व्याजदर कमी करण्यासाठी उदोयग क्षेत्राने आरबीआयकडे आशेने बघण्याऐवजी आपल्या व्यवसायातील जोखीम कमी कशी करता येईल तिथे लक्ष द्यावे.

डॉ राजन पुढे सांगतात, आरबीआयने पतधोरण व्यवस्थित राबवले तरी काही गोष्टी आरबीआयच्या कक्षेबाहेरच्या आहेत. उदाहरणार्थ पाऊस आणि शेतीचे उत्पादन. जर हे उत्पादन घटले तर पुरवठ्यात तूट निर्माण होऊन भाववाढ अटळ असते. त्याचबरोबर जेव्हा सरकार मनरेगा सारखे कार्यक्रम राबवते तेव्हा मजुरांचे किमान उत्पन्न वाढल्याने ते शेतीच्या कामाला अनुत्सुक होतात. परिणामी शेतीतही मजुरीचे दर वाढून शेवटी भाववाढ होते. त्याशिवाय जेव्हा सरकार, कर्मचारी वेतनावर अधिकचा खर्च करते किंवा विविध सरकारी योजनांत भ्रष्टाचारामुळे पैशाची गळती होते तेव्हा गळती झालेल्या या पैशामुळे अर्थव्यवस्थेत एक झुकाव निर्माण होऊन भाववाढ होणे अटळ असते. त्यामुळे उत्तम मोसमी पाऊस, चांगलं पीकपाणी, मजुरीच्या आणि शेतीसाठीच्या कच्च्या मालाच्या दरात घट, शेतकऱ्याला मिळणाऱ्या आणि ग्राहकांनी दिलेल्या किमतीतील तफावतीत घट करण्यासाठी मध्यस्थांचे प्रस्थ कमी करणे, कररचनेत सुधार आणि विविध सरकारी योजनांत पारदर्शकता असणे हेदेखील भाववाढ रोखण्यासाठी महत्वाचे घटक आहेत. सगळी कामे केवळ आरबीआय करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

चलनवाढीसंबंधीच्या भाषणांच्या या विभागाच्या शेवटी पतधोरण ठरवण्यासाठी सरकारने बहुसदस्यीय समितीची रचना करण्याचा जो प्रस्ताव दिलेला होता त्याचे स्वागत करताना डॉ राजन म्हणतात, पतधोरण ठरवणे आणि ते जाहीर करणे यात हे एका व्यक्तीची जबाबदारी असेल तर त्यात एकांगीपणा येऊ शकतो. अर्थव्यवस्था केवळ पूर्वी ठरवलेल्या नियमांनी चालत नसून कित्येकदा तिचे वर्तन बघून नियम ठरवावे लागतात. त्याशिवाय पतधोरण आणि करधोरण यात समन्वय नसेल तर सरकार आणि मध्यवर्ती बँक या दोघांत तणावाचे वातावरण तयार होणे स्वाभाविक असते. अर्थव्यवस्थेचा विकास हे समान ध्येय असणाऱ्या दोन संस्थांत असे तणावाचे प्रसंग अडसर ठरतात. आणि कित्येकदा पाशवी बहुमत असलेले सरकार पडद्याआडून पतधोरणावर आपला प्रभाव पाडू शकते. त्यामुळे पतधोरण ठरवताना त्यात सरकारचे मत ऐकले जावे आणि सरकारचा हा सहभाग लिखित नियमांनुसार संस्थात्मक पातळीवर असावा अशी व्यवस्था होणे पूर्ण अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचे आहे; असे मत त्यांनी मांडले आहे.

बँकिंग क्षेत्राचे सक्षमीकरण

या विषयवार बोलताना डॉ राजन सांगतात, सरकारी बँकांचे खाजगीकरण हा एक मार्ग काही तज्ञांना सुयोग्य वाटतो तर काही तज्ञ त्याला विरोध करतात. पण त्यांच्या मते दोन्ही टोकाचे मार्ग तडकाफडकी अमलात आणणे फायद्याचे नसून त्याचा मध्यममार्ग अमलात आणला पाहिजे. स्पर्धा हा नवीन जगाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे बँकांनी स्पर्धेच्या वातावरणास तयार राहायला हवे. ही स्पर्धा केवळ खाजगी बँक आणि सरकारी बँक अशी राहणार नसून. बँकिंगशिवाय इतर वित्तीय संस्था देखील त्यात उतरतील तर भारतीय वित्तीय क्षेत्रातील अडचणी दूर होतील असे त्यांचे मत आहे. सरकारी तिजोरीकडून मिळणारा पाठिंबा गृहीत धरणं सरकारी बँकांनी बंद करावं आणि सरकारनेही तसे धोरण राबवावे असा सल्ला ते देतात. सरकारने या बँकांच्या व्यवस्थापनातील हस्तक्षेप थांबवावा. निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची सोय म्हणून त्यांना या बँकांच्या व्यवस्थापक मंडळांवर नेमणे थांबवावे. कर्मचारी वेतन निर्धारणाबाबत या बँकांना पूर्ण स्वायत्तता द्यावी. नवीन तंत्रज्ञान अमलात आणण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. आणि अंतिमतः सरकारी बँकांवर नियंत्रण ठेवणारे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस बंद केले जावे.

मोठे बांधकाम प्रकल्प उभे करणे सरकारने थांबवावे. ते क्षेत्र खाजगी गुंतवणुकीसाठी खुले करावे. त्यासाठी कर्जरोख्यांचा बाजार तयार करावा. खाजगी गुंतवणूक कंपन्यांना प्रोत्साहन द्यावे. आणि या खाजगी गुंतवणूक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बँकांचे CRR आणि SLR च्या धोरणात सुसूत्रता आणावी. कर्जरोखे आणि खाजगी गुंतवणूक कंपन्यांकडून स्पर्धा वाढल्याने बँकांकडील ठेवी कमी होतील. आणि या इतर वित्तीय संस्थांना CRR व SLR चीअट नसेल त्यामुळे त्यांना नियंत्रणाखाली आणावे लागेल व त्याचबरोबर CRR व SLR च्या पातळीत घाट करावी लागेल. यामुळे सरकारला उपलब्ध असणारा पैसा कमी होईल पण मोठे प्रकल्प सुरु करण्यातून सरकारने स्वतःला बाजूला केलेले असल्यामुळे सरकारची मोठ्या रकमेची गरजही कमी झालेली असेल. अश्या रितीने मिश्र अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्ण करण्यासाठीचा मार्ग सुकर होईल. ही मते वाचताना नव्याने आकार घेत असलेल्या कर्जरोखे बाजाराला सेबीच्या नियंत्रणालाखाली देण्याचा निर्णय सरकार घेत होते. त्यामुळे बँकांवर नियंत्रण आरबीआयचे तर कर्जरोखे उभारणाऱ्या कंपन्या मात्र सेबीच्या नियंत्रणाखाली असा प्रकार होऊन वित्तक्षेत्रात एकापेक्षा जास्त नियंत्रक निर्माण होऊन भारतीय अर्थव्यवस्थेतील चलनपुरवठा अनियंत्रित होईल अशी रास्त चिंता वाटून आरबीआयने त्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. आणि शेवटी सरकारने तो निर्णय घेणे टाळले, हे आठवले.

त्याशिवाय बँकिंग क्षेत्र अजून स्पर्धात्मक करून त्याचा दर्जा सुधारण्यासाठी आरबीआय नवीन बँकांना परवानगी आणण्याचे धोरण अमलात आणते आहे. ज्याबरहुकून नवीन मोठ्या व लघु बँकांना परवानगी देताना आरबीआयचे धोरण शेवटी 'मागाल तेव्हा परवानगीपर्यंत' नेण्याचे सूतोवाच ते करतात. संगणक आणि दूरसंचार क्रांतीच्या लाटेवर मोबाईल पेमेंट बँक नावाच्या नवीन प्रकारच्या बँकेची ते मुहूर्तमेढ करून देतात. सध्या गाजत असलेलया पेटीएम किंवा एयरटेल या पेमेंट बँका, सक्षमीकरणाच्या या धोरणाचा परिणाम आहेत.

बँकिंग क्षेत्राची व्याप्ती वाढवणे

२०१३ ला अमेरिकन मध्यवर्ती बँकेने सरकारी रोख्यांच्या बाबतीत आपले धोरण बदलले होते. त्यामुळे अमेरिकन वित्तीय क्षेत्रात बरीच पडझड झाली होती. या पडझडीतून सावरल्यावर भारताने आता मोठे बदल (बिग बँग रिफॉर्मस) झटकन आणावेत अशी इच्छा अनेक अर्थशास्त्री करत होते. त्यांना उत्तर देताना डॉ राजन यांनी धक्कादायक पद्धतीने कुठलाही निर्णय राबवायला स्पष्ट नकार दिला. भारताच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. वित्तीय क्षेत्राबाबत बहुसंख्य भारतीयांचे अज्ञान पराकोटीचे आहे. वित्तीय क्षेत्रात नियंत्रक संस्थांची उभारणी अजून फारच प्राथमिक पातळीवर आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्राची व्याप्ती वाढवणे जरुरी असले तरी त्यासाठी घाई गडबड करून चालणार नाही. एका बाजूला आपल्या डिमॅट खात्यातून लोकांना सरकारी रोख्यांचे व्यवहार करू देत असतानाच गुंतागुंतीच्या डेरीव्हेटीव्ह्ज बाजाराला मात्र कडक नियंत्रणाखाली ठेवणे, उद्योगांना बँकांव्यतिरिक्त इतर वित्तीय संस्थांकडून कर्जे उचलण्यास परवानगी देणे, या वित्तीय संस्थांनी बँकांकडून कर्जे घेण्यावर नियंत्रण वाढवून त्यांना बाजारातून कर्जे घेण्यास प्रोत्साहन देणे, भारतीय वित्तीय बाजारात परदेशीयांना व्यवहार करण्यास उत्तेजन देताना परदेशी बाजारात भारतीय रोख्यांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे असे उपाय आवश्यक आहेत या मुद्द्यांप्रमाणे आरबीआयचे धोरण पुढे जाईल असे डॉ राजन सांगतात.

वित्त क्षेत्राची व्याप्ती वाढवणे

सामान्य जनतेतील वित्तीय क्षेत्राबाबतचे अज्ञान हे भारताच्या अर्थव्यवस्थेला मारक आहे. त्यामुळे जितके अधिक लोक बँकिंगच्या सेवेचा लाभ घेऊ शकतील टीका भारत महासत्ता होण्याचा मार्ग प्रशस्त होत जाईल हे सांगून अधिकाधिक जनतेच्या सहभागासाठी डॉ राजन पुढील दिशादर्शन करतात. या मुद्द्यासाठी नवीन लोक बँकिंगच्या प्रभावाखाली आणणे, आहेत त्यांना अधिकाधिक सेवा पुरविणे आणि सेवा अधिकाधिक सुरक्षित करत जाणे ही तीन मार्गदर्शक तत्वे वापरली आहेत.

मोबाईलधारकांची संख्या जास्त असली तरी त्यातील अनेक प्रीपेड आहेत आणि बहुसंख्यांचे मोबाईल हँडसेट प्राथमिक आहेत त्यामुळे मोबाईलवर आधारित व्यवस्था उभारताना उच्च दर्जाचे सॉफ्टवेअर वापरणारे मोबाईल लक्षात घेण्याऐवजी सर्वात प्राथमिक दर्जाचे मोबाईल ध्यानात घेऊन व्यवस्था निर्माण केले जाईल. संदेशवहनासाठी तात्काळ एसेमेस हा महत्वाचा दुवा मनाला जाईल. ज्याच्याकडे बँक अकाउंट नाही त्याला नातेवाईकाच्या किंवा इतरांच्या संमतीने त्यांच्या बँक अकाऊंटमधून एटीएमद्वारे पैसे काढण्याची सोय व्हावी अशी व्यवस्था तयार केली जाईल. दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकिंग दूत म्हणून काही संस्थांना वापरण्यात येईल. व्यवहार करताना फसवणूक होऊ नये म्हणून कार्ड बरोबर पिन नंबर वापरण्याची सक्ती केली जाईल. आणि OTP सारख्या प्रणाली सक्तीच्या केल्या जातील. त्याशिवाय KYC च्या अटी शिथिल करून केवळ राहण्याचा कायमचा पत्ता असेल तरी कुठल्याही बँकेत खाते उघडण्यास परवानगी दिली जाईल असा नियम ते सांगतात. बँका जास्तीची कागदपत्रे मागतात ती आरबीआयने मागितलेली नसून फसवणूक झाल्यास पुढे होऊ शकणाऱ्या संभाव्य कायदेशीर कारवाईसाठी बँका तसे करतात हे देखील ते नमूद करतात.

त्यासाठी आहेत त्या संस्थांना जास्तीचे अधिकार देणे, एकेक कामासाठी समर्पित नवीन संस्था उभारणे आणि लोन ऐवजी बचतीच्या मार्गाने लोकांना बँकिंग क्षेत्राशी जोडणे हे तीनही मार्ग ते महत्वाचे मानतात.

कर्जवसुली आणि दिवाळखोरी

कर्जवसुली आणि दिवाळखोरी या भारतीय आर्थिक क्षेत्रापुढील जटिल आणि व्यापक समस्या आहेत. या बद्दल बोलताना डॉ राजन परखड मते मांडतात आणि उपाय सुचवतात आणि त्यातील कित्येक अमलात आणण्यासाठी पावले उचलतात. शेती कर्ज माफी हा सध्याचा गाजलेला मुद्दा असताना डॉ राजन कर्जमाफीबाबत आपली नापसंती स्पष्टपणे नोंदवतात. पण त्यांना लहान कर्जदारांपेक्षा मोठे कर्जदार अधिक धोकादायक वाटतात. आजारी कंपन्या या संकल्पनेबरोबर भारताने आजारी प्रवर्तक नावाची संकल्पना भारताने वापरावी अशी सूचना ते करतात. जोखीम घेणारा उद्योजकवर्ग मोठ्या प्रमाणात असेल रोजगार निर्मिती होते हे मान्य करताना जोखीम घेणे हे बँकांचे काम नाही उद्योजकाचे आहे हा मुद्दा ते अधोरेखित करतात. प्रकल्प अडचणीत आला की बँकेकडून आणि सरकारकडून मदत मागणारे प्रवर्तक नंतर प्रकल्प फायद्यात आला की बँक आणि सरकारप्रती आपले काही कर्तव्य नाही असेच वागतील हे मान्य करून अडचणीत आलेल्या प्रकल्पांना मदत करावी अशी सूचना ते करतात.

भारतात कर्जवसुलीसाठी नवीन कडक कायदे करायची गरज नसून आहेत ते कायदे योग्य रीतीने राबविणे, कर्जवसुलीच्या निकालांविरुद्ध अपील करण्यासाठी कडक अटी घालणे, अपील लवकर निकाली निघावेत म्हणून अपील न्यायालयांना आर्थिक प्रोत्साहन देणे असे मार्ग ते सुचवतात. कर्जे देताना बँकांना जोखीम कशी जाणावी ते समजून घ्यायला सांगतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत असली तरी उज्वल भूतकाळ उज्वल भविष्यकाळाची खात्री देत नसतो हे वैश्विक सत्य स्वीकारून मगच कर्जे देण्यास पुढे व्हावे असा सल्ला ते देतात. ज्या प्रकल्पात प्रवर्तकांचा हिस्सा कमी आहे त्या प्रकल्पांना कर्जे देणे टाळावे. तर सरकारने दिवाळं जाहीर करण्याचे आणि प्रकल्प पुनर्रचना करण्याचे कायदे सोपे करावेत असा सल्ला ते देतात.

प्रासंगिक भाषणे

या विभागात डॉ राजन विविध मुद्द्यांना स्पर्श करतात. त्यांचा सारांश म्हणजे,

१) भारतीयांनी अतीव आशावाद आणि अतीव निराशावाद अश्या हिंदोळ्यावर स्वार होऊ नये.

२) सरकारी खर्चांना सरकारने वेसण घालावी.

३) दर्जेदार उत्पादन, सुलभ वितरण, सुयोग्य किंमत निर्धारण, ग्राहक संरक्षण आणि नफा या पाच गोष्टींकडे लक्ष दिल्याशिवाय सर्व भारतीयांना अर्थव्यवस्थेचे फायदे मिळणार नाहीत.

४) सर्वांगीण विकासासाठी शिस्त जितकी महत्वाची आहे तितकीच लोकशाही आणि सर्वसमावेशकताही महत्वाची आहे. मुक्त अर्थव्यवस्था आणि स्पर्धा हेच आपल्या देशाला पुढे नेऊ शकतात आणि त्यासाठी कुठल्याही भेदभावाशिवाय सर्व भारतीयांचा सहभाग आवश्यक आहे.

५) निर्यातीपेक्षा मेक इन इंडियाचा भर भारतीय बाजारांत दर्जेदार उत्पादने कमी किमतीत कशी उपलब्ध होतील तिथे असला तर ते अर्थव्यवस्थेसाठी उपकारक ठरेल.

६) भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे आणि आर्थिक महासत्ता बनण्यासाठी हे दोन्ही गुण टिकवून ठेवणे आवश्यक आहेत.

७) टीकाकारांबद्दल आदर दाखवणे आवश्यक आहे.

८) नेत्यांचे आणि प्रशासकांचे शब्द महत्वाचे असतातंच पण त्यामागील हेतूदेखील तितकेच महत्वाचे असतात.

भाषणानंतरचा विभाग

या  विभागात डॉ राजन यांनी आधी केलेले लिखाण मांडलेले आहे.

२००८चे आंतरराष्ट्रीय वित्तीय संकट येण्यापूर्वी त्याबद्दल अचूक भाकीत करून डॉ राजन आंतरराष्ट्रीय वित्तीय क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरले होते. त्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि भविष्यकालीन संकटांवर मात कशी करावी याबद्दल त्यांचे विचार मौलिक आहेत.

१) गुंतवणूक बँक आणि व्यापारी बँक यातील भेद मिटवू नयेत.

२) मूडी किंवा स्टॅंडर्ड अँड पुअर सारख्या मानांकन संस्थांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण असू द्यावे.

३) मानांकन संस्थांच्या मोबदल्याबद्दल पारदर्शकता असावी.

४) बँक व्यवस्थापकांच्या वेतनावर निर्बंध असावेत आणि त्यांचे वेतन कर्जवाटपाशी संलग्न नसावे.

५) रोखे आणि डेरिव्हेटीव्ह बाजार अनिर्बंध असू नये.

६) जागतिक अर्थव्यवस्था एकसंध मानावी आणि सर्व मध्यवर्ती बँकांनी एकमेकांशी सहकार्य करावे.

७) भांडवलशाहीला खरा धोका अवास्तव जोखीम घेणाऱ्या भांडवलदारांपासून आहे.

संपूर्ण पुस्तक वाचताना २००८ पासून २०१७ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकारण कश्या रीतीने पुढे सरकत होते, त्याबद्दल डॉ राजन कसा विचार करत होते आणि अधिकाराच्या पदावर असताना संस्थात्मक पायाभरणी करण्यासाठी ते कश्याप्रकारे कार्यरत होते याबद्दल वाचकाला स्पष्ट चित्र पाहायला मिळते. परंतु पुस्तक सुंदर असले आणि भाषा प्रवाही असली तरीही पुस्तक वाचताना वाचकाला अर्थशास्त्रीय संकल्पना माहीत असल्यास समजणे सोपे जाते अन्यथा पहिले दोन उपविभाग वाचकाला निरस वाटू शकतात.