Tuesday, August 29, 2017

परतीचे दरवाजे बंद करणारा समाज

ही पोस्ट फेसबुकवर दिसणाऱ्या राजकीय पोस्ट्स बाबत आहे. प्रत्यक्ष जग इतके एकेरी नाही याची मला कल्पना आहे आणि ते तसे होऊही नये अशी अपेक्षा आहे.
---
भारतात कुठल्याही एका विचाराच्या अनुयायांना आपल्या सहकाऱ्यांवर / बांधवांवर, त्यांच्या सचोटीवर अतिशय अल्प प्रमाणात विश्वास असतो. आणि आपल्या सचोटीच्या कसोट्या फारच लुटुपुटुच्या असल्याने त्या चटकन मोडल्या जातात. उदाहरणार्थ, कांदा लसूण किंवा मांसाहार किंवा मद्यपान किंवा स्नानसंध्या किंवा दाढीमिश्या वाढवणं किंवा कपडे घालण्याची पद्धत वगैरे.

त्याहून मुख्य म्हणजे एखाद्या मित्र किंवा आप्ताकडून जर अशी तकलादू कसोटी मोडली की त्याला स्वगृही / पूर्वगृही यायचे सगळे दरवाजे कायमचे बंद. आपल्या गटातून बाहेर पडायचे तर परतीचे दरवाजे बंद करूनच. आणि तुम्ही जरी परत यायचं म्हणालात तरी पूर्वगृहीचे कोणी तुम्हाला परतू देणार नाहीत.

हिंदूंमधून जैन किंवा बौद्ध धर्मात गेलात तर पुन्हा हिंदू व्हायचे दरवाजे बंद. हिंदू, जैन किंवा बौद्ध धर्मातून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात गेलात तर पूर्वीच्या धर्माचे दरवाजे बंद. म्हणजे नवीन विचाराला अनुयायी गमविण्याची भीती जुन्या विचाराकडून अजिबात नाही. असलीच तर ती केवळ अजून नव्या विचाराकडून.

बुध्दाने अन्यधर्मीयांना शस्त्र हाती न धरता आपल्याकडे खेचले. पण पूर्वाश्रमीच्या हिंदू किंवा जैनांना बौध्द धर्म स्वीकारानंतर परतीचे रस्ते बंद झाले होते.

मग मुसलमानांनी शस्त्र आणि राजकीय ताकदीच्या जोरावर हिंदू, जैन, बौद्ध आणि अन्यांना आपल्याकडे खेचले. यासाठी बळजबरी झाली की नाही हा भाग वेगळा पण तरीही परतीचे दरवाजे या धर्मांतरीतांसाठी कायमचे बंद झाले.

मग येशूचे अनुयायी युरोपातून आले. त्यांचं काम तर आपल्या लोकांनी अजूनंच सोपं करून टाकलं. आक्रमकांनी विहिरीत फक्त पाव जरी टाकले आणि त्या विहिरीचं पाणी आपले लोक जर प्याले की लगेच ते बाटले. झाले ते धर्मभ्रष्ट. आणि त्यांचे परतीचे सगळे मार्ग लगेच बंद.

जे गेले ते विचारपूर्वक गेले की धाक किंवा प्रलोभनामुळे गेले किंवा अपघाताने अगर कपटाने गेले त्याने काही फरक पडला नाही. त्या सर्वांना बाकीच्या सर्वांनी वाळीत टाकले. त्यांना परत यावेसे वाटले तरी त्यांचे स्वागत होण्याची सुतराम शक्यता नव्हती. किंबहुना त्यांनी परत येऊ नये हीच व्यवस्था होती.

जे गेले ते आपल्या प्रभावाने नव्या विचारात जुन्याचे रंग भरतील अशी खात्री आपल्यापैकी कुणालाच नव्हती. गेलेला कायम हीन आणि हलका अशीच समजूत करून घेण्यात आपण धन्यता मानली होती.

आता धर्मसत्ता आणि राजसत्ता वेगळी झाली आहे. धर्मांतराच्या बाबतीत आपले विचार तसेच राहिले आहेत. राजकीय पक्षांच्या बाबतीत गेली बरीच वर्षे आपण इतके कठोर नव्हतो. एखाद्याने राजकीय पक्ष बदलला तर त्याला लगेच मध्ययुगातील फितुरीची संकल्पना लावणारे एखाद दोन पक्ष असले तरी राजकीय पक्षनिष्ठा बदलणे किंवा बदलून झाल्यावर पुन्हा पूर्वपक्षात येणे समाजमान्य होते.

मात्र भाजपचे सरकार आल्यापासून आणि भाजपने सर्वपक्षीय वाल्यांचा वाल्मिकी करून घेण्याचा सपाटा लावल्यापासून धर्मांतराच्या बाबतीतला आपला कडवेपणा आता राजकीय पक्षांच्या बाबतीतही लागू होऊ लागला आहे.

आणि यात आपण भाजपचे काम सोपे करीत आहोत. ज्याने भाजपला पाठिंबा दिला त्याला तर आपण झोडतो आहोतंच पण ज्याला भाजपने पाठिंबा/ पुरस्कार / सन्मान दिला त्यालाही आपण झोडतो आहोत. आता भाजपला विहिरीत पाव टाकायचीपण गरज नाही. फक्त एखाद्या विचारवंताला पाठिंबा / पुरस्कार / सन्मान द्यायचा. त्याने नाकारला की प्रसिद्धी आणि सहानुभूती भाजपला मिळणार. आणि त्याने स्वीकारला की अन्य विचारवंत त्याला बाटगा / धर्मभ्रष्ट म्हणून त्याची आपल्या गटातून हकालपट्टी करणार. त्याचे परतीचे सगळे रस्ते बंद करणार. परिणामी त्या व्यक्तीला एकतर सामाजिक जीवनातून संन्यास किंवा भाजपला पाठिंबा देणे हो दोनच उपाय रहाणार.

आता मांसाहार, मद्यपान, पेहराव, दाढीमिश्या याबरोबरच व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वाला नाकारण्याचा अजून एक तकलादू निकष उभा करण्यात आपण यशस्वी ठरलोय. भाजपने दिलेला पाठिंबा / पुरस्कार / सन्मान.

No comments:

Post a Comment