Wednesday, August 23, 2017

सार्थ

हे लेखन ९ एप्रिल २०१७ चं आहे.
----------
आज मुंबईत नास्तिक सभा आहे हे फेसबुकवर वाचलं आणि दिवसाची सुरुवात झाली.

संध्याकाळी क्लासमधे पालकसभा आहे म्हणून दाढी कोरून घ्यायला सकाळी सकाळी न्हाव्याकडे चाललो होतो. रस्त्यात पारसमणी चौकात गर्दी आणि लगबग दिसली. चांदी, स्टील वगैरेंच्या घोडागाड्या रांगेत उभ्या होत्या. लहान मुलं खेळत होती.

दाढी करून परत येत होतो.

सगळ्यात पुढे माणसांनी ओढलेल्या गाड्यावर वेगवेगळ्या रंगाचे ध्वज लावलेले दोन ध्वजस्तंभ... त्यामागे ढोल... मग आपल्या मित्रांशी गप्पा मारत चालणारी छोटी मुलं... त्यामागे एकाच डिझाईनच्या साड्या घातलेल्या आणि डोक्यावर कलश घेतलेल्या बायका... मग पुन्हा ढोलपथक... मग पुरूष ओढत असलेल्या तीन गाड्यात देवतांच्या मूर्ती पकडून त्यांना हातातील पांढऱ्या झाडूने वारा घालणारी स्त्री आणि तिच्या शेजारी बसलेला शांत पुरूष... त्यामागे तरूण मुलामुलींचा भिरभिरत्या नजरेचा घोळका... मग चालणारे प्रौढ स्त्री पुरुष... मग वृध्द स्त्री पुरूषांना घेऊन जाणाऱ्या चांदीचा पत्रा ठोकलेल्या एका रांगेतल्या घोडागाड्या... या सर्वाना एका रांगेत ठेवून रहदारी नियंत्रण करणारे पांढऱ्या झब्बा लेंग्यातले अनेक तरुण... आणि या सगळ्यांकडे कुतूहलाने पहाणारी बघ्यांची गर्दी. अनेक हिंदू, काही बौद्ध, तुरळक मुसलमान; आज या मिरवणूकीचे शांत प्रेक्षक होते..

मला एकदम वाटलं की हजारो वर्षांपासून भारतात अशा विविध धर्मांच्या, जातींच्या वेगवेगळ्या दिवशी मिरवणूका निघत आल्या आहेत... ज्यांची मिरवणूक ते त्या दिवशीचे कलाकार बाकी सगळे त्या दिवशी प्रेक्षक.... मग आपला दिवस संपला की हे कलाकार लगेच पुन्हा बघ्याच्या भूमिकेत... गुण्यागोविंदाने कलाकार आणि प्रेक्षक अशी भूमिकांची सातत्याने चालू असलेली अदलाबदल... अंतहीन प्रवासाला निघालेले वेगवेगळे सार्थ

मीपण थांबून बघत होतो. हजारो वर्षांनंतरही एका समूहाला मार्गदर्शन करणाऱ्या भगवान महावीराला मनातल्या मनात नमस्कार केला.

घोडागाड्यांच्या मागे त्यांच्या मालकांच्या संपर्काची माहिती होती. अर्ध्या गाड्या गायकवाड नावाच्या माणसाच्या होत्या आणि उरलेल्या गाड्या अश्रफभाई, पीरभाई, रहमानमियॉं नावाच्या भिवंडीच्या व्यक्तींच्या होत्या.

मांसाहारींच्या घोडागाड्या शाकाहारींना घेऊन चालल्या होत्या आणि शाकाहारींचा पैसा मांसाहारींच्या धंद्याला बरकत देत होता.... सार्थ चालत होते.....

आणि आज संध्याकाळी आस्तिकांच्या या भूमीच्या एका कोपऱ्यात नास्तिकांचा सार्थ निघणार होता... फक्त तो इतर आस्तिकांच्या सार्थाला प्रेक्षक म्हणून पहात राहील की त्यांचा सार्थ मोडावा म्हणून प्रयत्न करेल? कुणास ठाऊक...

असे सगळे विचार डोक्यात येत असताना मी अश्रफभाईच्या घोड्याच्या खिंकाळण्याने भानावर आलो...

आता माझी प्रेक्षकाची भूमिका संपली होती... आता मी एक सार्थवाहक बनणार होतो... एक वर्ष चालणारा सार्थ... व्हॉटस अॅप, फेसबुक, माहितीचा महापूर, नोकरी, कर्जाचे हप्ते, महागाई, टीन एज संपत येऊन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली मुलं आणि या साऱ्यांच्या प्रचंड वेगाने भांबावून गेलेल्या किंवा या साऱ्यांकडे दुर्लक्ष करून स्वमग्न रहाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांचा आणि निसर्गाच्या हाकांना बहर बहर आलेल्या त्यांच्या मुलामुलींचा सार्थ..

(सार्थ म्हणजे तांडा)

1 comment: