Tuesday, August 29, 2017

परतीचे दरवाजे बंद करणारा समाज

ही पोस्ट फेसबुकवर दिसणाऱ्या राजकीय पोस्ट्स बाबत आहे. प्रत्यक्ष जग इतके एकेरी नाही याची मला कल्पना आहे आणि ते तसे होऊही नये अशी अपेक्षा आहे.
---
भारतात कुठल्याही एका विचाराच्या अनुयायांना आपल्या सहकाऱ्यांवर / बांधवांवर, त्यांच्या सचोटीवर अतिशय अल्प प्रमाणात विश्वास असतो. आणि आपल्या सचोटीच्या कसोट्या फारच लुटुपुटुच्या असल्याने त्या चटकन मोडल्या जातात. उदाहरणार्थ, कांदा लसूण किंवा मांसाहार किंवा मद्यपान किंवा स्नानसंध्या किंवा दाढीमिश्या वाढवणं किंवा कपडे घालण्याची पद्धत वगैरे.

त्याहून मुख्य म्हणजे एखाद्या मित्र किंवा आप्ताकडून जर अशी तकलादू कसोटी मोडली की त्याला स्वगृही / पूर्वगृही यायचे सगळे दरवाजे कायमचे बंद. आपल्या गटातून बाहेर पडायचे तर परतीचे दरवाजे बंद करूनच. आणि तुम्ही जरी परत यायचं म्हणालात तरी पूर्वगृहीचे कोणी तुम्हाला परतू देणार नाहीत.

हिंदूंमधून जैन किंवा बौद्ध धर्मात गेलात तर पुन्हा हिंदू व्हायचे दरवाजे बंद. हिंदू, जैन किंवा बौद्ध धर्मातून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात गेलात तर पूर्वीच्या धर्माचे दरवाजे बंद. म्हणजे नवीन विचाराला अनुयायी गमविण्याची भीती जुन्या विचाराकडून अजिबात नाही. असलीच तर ती केवळ अजून नव्या विचाराकडून.

बुध्दाने अन्यधर्मीयांना शस्त्र हाती न धरता आपल्याकडे खेचले. पण पूर्वाश्रमीच्या हिंदू किंवा जैनांना बौध्द धर्म स्वीकारानंतर परतीचे रस्ते बंद झाले होते.

मग मुसलमानांनी शस्त्र आणि राजकीय ताकदीच्या जोरावर हिंदू, जैन, बौद्ध आणि अन्यांना आपल्याकडे खेचले. यासाठी बळजबरी झाली की नाही हा भाग वेगळा पण तरीही परतीचे दरवाजे या धर्मांतरीतांसाठी कायमचे बंद झाले.

मग येशूचे अनुयायी युरोपातून आले. त्यांचं काम तर आपल्या लोकांनी अजूनंच सोपं करून टाकलं. आक्रमकांनी विहिरीत फक्त पाव जरी टाकले आणि त्या विहिरीचं पाणी आपले लोक जर प्याले की लगेच ते बाटले. झाले ते धर्मभ्रष्ट. आणि त्यांचे परतीचे सगळे मार्ग लगेच बंद.

जे गेले ते विचारपूर्वक गेले की धाक किंवा प्रलोभनामुळे गेले किंवा अपघाताने अगर कपटाने गेले त्याने काही फरक पडला नाही. त्या सर्वांना बाकीच्या सर्वांनी वाळीत टाकले. त्यांना परत यावेसे वाटले तरी त्यांचे स्वागत होण्याची सुतराम शक्यता नव्हती. किंबहुना त्यांनी परत येऊ नये हीच व्यवस्था होती.

जे गेले ते आपल्या प्रभावाने नव्या विचारात जुन्याचे रंग भरतील अशी खात्री आपल्यापैकी कुणालाच नव्हती. गेलेला कायम हीन आणि हलका अशीच समजूत करून घेण्यात आपण धन्यता मानली होती.

आता धर्मसत्ता आणि राजसत्ता वेगळी झाली आहे. धर्मांतराच्या बाबतीत आपले विचार तसेच राहिले आहेत. राजकीय पक्षांच्या बाबतीत गेली बरीच वर्षे आपण इतके कठोर नव्हतो. एखाद्याने राजकीय पक्ष बदलला तर त्याला लगेच मध्ययुगातील फितुरीची संकल्पना लावणारे एखाद दोन पक्ष असले तरी राजकीय पक्षनिष्ठा बदलणे किंवा बदलून झाल्यावर पुन्हा पूर्वपक्षात येणे समाजमान्य होते.

मात्र भाजपचे सरकार आल्यापासून आणि भाजपने सर्वपक्षीय वाल्यांचा वाल्मिकी करून घेण्याचा सपाटा लावल्यापासून धर्मांतराच्या बाबतीतला आपला कडवेपणा आता राजकीय पक्षांच्या बाबतीतही लागू होऊ लागला आहे.

आणि यात आपण भाजपचे काम सोपे करीत आहोत. ज्याने भाजपला पाठिंबा दिला त्याला तर आपण झोडतो आहोतंच पण ज्याला भाजपने पाठिंबा/ पुरस्कार / सन्मान दिला त्यालाही आपण झोडतो आहोत. आता भाजपला विहिरीत पाव टाकायचीपण गरज नाही. फक्त एखाद्या विचारवंताला पाठिंबा / पुरस्कार / सन्मान द्यायचा. त्याने नाकारला की प्रसिद्धी आणि सहानुभूती भाजपला मिळणार. आणि त्याने स्वीकारला की अन्य विचारवंत त्याला बाटगा / धर्मभ्रष्ट म्हणून त्याची आपल्या गटातून हकालपट्टी करणार. त्याचे परतीचे सगळे रस्ते बंद करणार. परिणामी त्या व्यक्तीला एकतर सामाजिक जीवनातून संन्यास किंवा भाजपला पाठिंबा देणे हो दोनच उपाय रहाणार.

आता मांसाहार, मद्यपान, पेहराव, दाढीमिश्या याबरोबरच व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वाला नाकारण्याचा अजून एक तकलादू निकष उभा करण्यात आपण यशस्वी ठरलोय. भाजपने दिलेला पाठिंबा / पुरस्कार / सन्मान.

Wednesday, August 23, 2017

ट्रोलधाड

आज एका भाजप विरोधी मित्राला ट्रोल बनताना पाहून फार वाईट वाटलं.

मी सौम्य भाषा वापरतो. माझ्या मित्रांच्या भिंतींवर जाऊन माझं विरोधी मत सौम्य भाषेत व्यक्त करतो. त्यांनी देखील सौम्य भाषा वापरावी असा आग्रह धरतो याचा त्याला फार राग येतो. विद्यमान सरकारचा मी तीव्र भाषेत निषेध केला पाहिजे. आणि तसा कुणी करत असेल तर मी तिथे सौम्य भाषेचा आग्रह धरला नाही पाहिजे असे त्याचे मत असावे.

इथे मी "असावे" असा शब्द वापरला कारण त्याचे मत सांगताना तो प्रचंड चिडतो. मला मूर्ख, गुरोगामी, हुकूमशाहीचा छुपा समर्थक, काळाची पावले ओळखण्यास असमर्थ असलेला सुशिक्षित अडाणी, लोकशाहीचा मारेकरी, इत्यादी शिव्या देता देता त्याचा मुद्दा हरवतो आणि त्याला मला जे सांगायचे असते ते माझ्या मनात स्पष्टपणे आकार घेत नाही.

मी राजकारणी नाही. कुठल्याही पक्षाचा सभासद नाही. मी फेसबुकवर कुठल्याही राजकीय ग्रुपचा सदस्य नाही. कुणी मला स्वतःहून ऍड केल्यास मी त्यातून बाहेर पडतो.

मला गांधी, नेहरू, आंबेडकर आणि सगळे स्वातंत्र्यसैनिक प्रातःस्मरणीय वाटतात. त्यांच्याबद्दल अतीव आदर असला तरीही ते देखील मानवी मर्यादांनी बांधलेले होते याची मला जाणीव आहे. ते सर्वज्ञ नव्हते हे मला मान्य आहे. त्यांनी त्यावेळी त्यांच्या आकलनाला अनुसरून जे निर्णय त्याकाळी घेतले आणि त्यातले जे निर्णय या देशासाठी आणि माझ्यासठी फायद्याचे ठरले त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी आहे. आणि त्यातले जे निर्णय दुर्दैवाने देशासाठी किंवा माझ्यासाठी अहितकारक ठरले त्याबद्दल त्यांना दोष देण्याइतका माझा अधिकार आणि अनुभव नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पूर्वजांच्या चुकांबद्दल त्यांना दोष देत बसण्यापेक्षा त्यांच्या चुकांतून योग्य तो बोध घेऊन आपण त्या चुका पुन्हा करू नयेत अशी माझी विचारसरणी आहे.

भाजप- काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप अश्या विविध पक्षांना समर्थन करणारे, सर्वोदयवादी-समाजवादी-कम्युनिस्ट किंवा उजव्या विचारसरणीचे, श्रीमंत-मध्यमवर्गीय-गरीब, याच देशात राहणारे - परदेशात राहणारे, स्त्री-पुरुष, आस्तिक-नास्तिक, आध्यात्मिक-विज्ञानवादी, समवयस्क-वृद्ध- तरुण अश्या विविध वयोगटातलेे माझे मित्र आहेत. या सगळ्यांच्या विविध धारणा बघून मी कधी आश्चर्यचकित होतो, कधी मंत्रमुग्ध होतो, कधी गोंधळतो. पण त्यांची मते अंगीकारण्यापूर्वी ती मला आतून पटली पाहिजेत असा आग्रह स्वतःशीच धरतो.

भलेही हे सरकार ३१% लोकांनी निवडून दिले असले तरी ते मला आपले सरकार वाटते कारण हाच लोकशाहीचा अर्थ आहे. मला या सरकारचे अनेक निर्णय आवडत नाहीत. पण म्हणून त्याबद्दल फेसबुकवर रोज गरळ ओकत राहून जातीय, वर्गीय, राजकीय आणि सामाजिक तेढ पसरवणे मला माझे कर्तव्य वाटत नाही. हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन किंवा खंडन करणे हे माझे नैमित्तिक कर्तव्य मला वाटत नाही. पण माझी खरी ताकद मतदानाच्या दिवशी वापरायला मी विसरणार नाही.

सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर समाजात व्यक्त होताना जपून व्यक्त व्हावे अश्या मताचा मी आहे. 'अभ्यासोनि प्रकटावे' यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझे मत चुकू शकते याची मला जाणीव आहे. पण कुणी उगीच माझ्या अंगावर धावून आल्यास, मला कुठली लेबले लावण्याचा प्रयत्न केल्यास मी त्यांना सौम्य शब्दात त्यांची मर्यादा दाखवून देतो.

मला माहिती आहे की प्रत्येकाला आतून तो स्वतः किंवा त्याचा आवडता राजकीय नेता Atlas Shrugged मधला जॉन गाल्ट किंवा हँक रिअरडन वाटत असतो. आणि सगळे विरोधक जेम्स टॅगार्ट, रॉबर्ट स्टेडलर वाटतात. पण खऱ्या आयुष्यात नायक आणि खलनायक वेगळे नसतात. त्यांचे नायकत्व किंवा खलनायकत्व काळाच्या कसोटीवर ठरते. आपण दिलेल्या पाठिंब्यावर नाही हे माझे स्पष्ट मत आहे.

कुठल्याही विचारवंताला, अभ्यासकाला कुणी पाठिंबा दिला, कुणी त्याचा गौरव केला यावरून मी त्याच्या विचारांचे मोठेपण जोखत नाही.

राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांसाठी मी नसून माझ्यासाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आहेत. मी त्यांचे समर्थन किंवा विरोध करायचा नसून माझ्या विकासाला जे उपयुक्त आहेत, कालसुसंगत आहेत त्यांची निवड करायची आहे. मत देऊन झाल्यावर माझ्या मनासारखे सरकार आले नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा, 'तुम्ही मूर्ख आहात' म्हणून इतरांवर उठसूट आगपाखड करण्यापेक्षा, आपल्या मताच्या मित्रांना सांभाळणे आणि विरोधकांना सौम्य पण ठाम शब्दात आपले म्हणणे ऐकवणे, हे एक नागरिक म्हणून मला माझे कर्तव्य वाटते.

याबद्दल मला कुणी भाबडा म्हटले तरी मला हरकत नाही. पण मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे कुणावरही सातत्याने टीका किंवा समर्थनाची माझ्यावर नसलेली जबाबदारी मी घेणार नाही. यामुळे कुण्या मित्राचा अपेक्षाभंग झाला तर त्याला माझा नाईलाज आहे. पण म्हणून मित्रांनी माझ्यावर ट्रोलिंग केल्यास त्याला तेच जबाबदार असतील.

माझे डोके माझ्या ताब्यात असल्याने मोदी किंवा मोदीभक्त माझ्यावर परिणाम करू शकत नाहीत. पण दुर्दैवाने त्यांच्या विरोधकांवर मात्र त्यांचा खोलवर परिणाम होत आहे. आणि हे अतिशय त्रासदायक आहे.

सिटी लाईट्स इन मॉडर्न टाईम्स


लोकांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत व्हावे म्हणून चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते असे मी समजतो.

गेल्या आठवड्यात बाहुबली पाहायला सहकुटुंब सहपरिवार मल्टिप्लेक्समध्ये गोल्ड चेअर्स बुक केल्या होत्या. जातानाच पॉपकॉर्नच्या टोपल्या, आणि शीतपेये वगैरे घेऊन गेलो होतो.

शेजारी एक जोडपे बसले होते. त्यांचा देखील जामानिमा आमच्यासारखाच होता. आल्याआल्या त्यानी खुर्च्या पसरून त्यावर आडवे होऊन पॉपकॉर्न खायला सुरवात केली होती. मग सचिनच्या चित्रपटाचा ट्रेलर आला.

मग जनगणमन सुरु झाले. मी आणि माझे माझे कुटुंब उभे राहिले. जोडप्यातील स्त्रीला त्या अंधारात खुर्ची नीट करण्याचे बटण सापडले. पण पुरुषाला काही सापडेना. आणि खुर्ची पूर्ण उघडल्याने त्यावरून त्याला पाय खाली टाकून उभे राहता देखील येईना. इथे आम्ही विंध्य हिमाचल करत द्राविड उत्कल बंग पर्यंत जाऊन पोहोचलो. पुरुष कावरा बावरा झाला. आमच्यापैकी कुणी कायदा हातात घेणारे नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी तो केविलवाण्या नजरेने आम्हा सगळ्यांकडे पाहात होता. त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर, 'कुठे घेऊन जायच्या लायकीचे नाहीत' हे भाव त्या अंधारातही स्पष्ट वाचता येत होते. शेवटी आम्ही 'जय हे' करायला सुरवात करेपर्यंत तो मनुष्य आपल्या पॉपकॉर्नची टोपली उधळीत कसा बसा उभा राहिला आणि त्याने आपली राष्ट्रभक्ती सिद्ध केली. त्यानंतर, संपूर्ण चित्रपटात, जेव्हा जेव्हा हाणामारी चालू होती तेव्हा मी आणि माझी मुले ते पायाजवळ पडलेले पॉपकॉर्न जोरजोरात पाय आपटून पॉप करत होतो.

प्रसंग नंतर विसरलो होतो. पण रविवारी चार्ली चॅप्लिनचा सिटी लाईट्स हा सिनेमा पाहात होतो. त्याचा सुरवातीचा सीन पाहिला. त्यात राष्ट्रगीत वाजते आणि नुकत्याच अनावरण झालेल्या पुतळ्याच्या हातातील तलवारीत पॅन्ट अडकलेल्या चार्लीची धडपड पहिली आणि बाहुबलीतील शेजाऱ्याची धडपड आठवली. शेजाऱ्याची धडपड जरी कॅमेऱ्यात पकडू शकलो नसलो तरी चार्लीचा तो सीन आंतरजाल आणि युट्युबमुळे तुमच्याशी शेअर करू शकतो. 


डिमॉनेटाझेशन अँड ब्लॅक मनी

६ मे २०१७ ला लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत 'डिमॉनेटाझेशन अँड ब्लॅक मनी' या 'श्री. सी राममनोहर रेड्डी' यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मी करून दिलेला परिचय प्रसिद्ध झाला होता. त्याचे शीर्षक लोकसत्ताने दिले असले तरी माझ्या मूळच्या लेखात कुठलाही बदल केलेला नव्हता. तो लेख खालीलप्रमाणे.
----


२०१६च्या रब्बी पिकांच्या लागवडीचा हंगाम संपला आहे. विविध राज्यांतील नगरपालिकांच्या आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका व उत्तरेतील काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ संपले आहे. नवीन आर्थिक वर्ष २०१७-१८ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेने मंजूर केला आहे. राजकीय पक्षांना देणग्या देण्याबाबत या अर्थसंकल्पात विशेष लगाम घातलेला नाही. आणि ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदिंनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाबरहुकूम नोटा बदलून घेण्याच्या सर्व मुदती संपल्या आहेत. पण नोटबंदीच्या या निर्णयाबाबत नेमकी सांख्यिकी अजून आरबीआय आणि सरकारकडून प्रसिद्ध केली गेलेली नाही. ज्या निर्णयामुळे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था ढवळून निघाली; जागतिक मानांकन संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदारचे आपले अंदाज कमी केले आणि अर्थतज्ञांच्या मते आरबीआयची विश्वासार्हता कमी झाली त्या निर्णयाच्या फलनिष्पत्तीबद्दल संबंधित सरकारी संस्थांकडून अधिकृतरीत्या कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

या पार्श्वभूमीवर स्क्रोल या संकेतस्थळाचे संपादक, सी राममनोहर रेड्डी यांनी लिहिलेले 'डिमॉनेटायझेशन अँड ब्लॅक मनी' (नोटबंदी आणि काळे धन) हे पुस्तक म्हणजे नोटबंदीच्या घटनेच्या सैद्धांतिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाजूंचा संदर्भासहीत घेतलेला परिपूर्ण आढावा आहे. लेखक श्री. सी राममनोहर रेड्डी हे १९९३ ते २००४ या कालावधीत द हिंदू या दैनिकात अर्थविषयक संपादनाचे काम करीत होते. त्यानंतर त्यांनी २०१६ पर्यंत इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली या या नियतकालिकाचे संपादन केले. मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्राचे पदवीधर असलेले श्री रेड्डी यांनी आय आय एम कलकत्ता येथून मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण केला असून त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात मास्टर ऑफ फिलॉसॉफी आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या पदवी मिळाल्या आहेत. अर्थशास्त्र हाच लेखकाच्या अध्ययन आणि अर्थार्जनाचा विषय असल्याने त्यांनी विषय अतिशय सोपा करून मांडला आहे. अर्थशास्त्रातील संकल्पना माहित नसणाऱ्या वाचकालादेखील पुस्तक सोपे वाटावे म्हणून पारिभाषिक संज्ञांचा वापर न करता सोपी आणि प्रवाही भाषा वापरली आहे. त्यामुळे विषय समजून घेण्यासाठी वाचकाला केवळ इंग्रजी भाषेचे ज्ञान असले तरी पुरेसे आहे.

विषयाची मांडणी करताना पुस्तकात चार भाग आणि चौदा प्रकरणे वापरली आहेत. पहिला भाग 'काळे धन' या संकल्पनेला विशद करण्यासाठी वापरला आहे. दुसऱ्या भागात 'काळ्या धनावर उपाय, नोटबंदीची त्याबाबत उपयुक्तता, कॅशलेस अर्थव्यवस्थेचे स्वरूप' यावर चर्चा केली आहे. तिसरा भाग नोटबंदीमुळे झालेल्या त्रासाची आणि हानीची नोंद करणारा आहे. तर चौथ्या भागात लेखकाने बँकांवर आणि आरबीआयवर झालेल्या नोटबंदीच्या परिणामांची चर्चा करताना पुढे काय करायची आवश्यकता आहे त्याचा उहापोह केला आहे. पुस्तकात अनेक परिशिष्टे, तळटीपा आणि कोष्टके देऊन लेखकाने आपला मुद्दा स्पष्ट केला आहे.

नोटबंदीच्या निर्णयामागील कारण म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला गांजणाऱ्या काळे धन, नकली चलन आणि दहशतवाद या तीन समस्या पुढे केल्या गेल्या. परंतू काही काळानंतर कॅशलेस भारत किंवा डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी नोटबंदी हे पहिले पाऊल आहे असे सांगण्यात येऊ लागले.

'काळे धन बाळगणारे लोक आपले काळे धन रोख रकमेच्या स्वरूपात बाळगतात' हे नोटबंदीच्या मागील एक महत्वाचे गृहीतक होते. आणि याच गृहितकावर लेखकाने बोट ठेवून त्याचा फोलपणा दाखवायचा साधार प्रयत्न केला आहे. बरेचदा काळे धन आणि काळा पैसा हे शब्द एकमेकांना पर्यायी शब्द म्हणून वापरले जातात. पण हे चुकीचे असून या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, हे सांगण्यासाठी लेखकाने पुस्तकातील पहिला भाग वापरला असून त्यात काळ्या धनाबाबत विस्तृत सैद्धांतिक चर्चा केली आहे.

पैसा म्हणजे विनिमयाचे साधन. ते आरबीएआयने परिणामी सरकारने निर्माण केले असल्याने पैसा काळा नसतो. याउलट धन म्हणजे साठवून ठेवलेली संपत्ती. ती जर कायदेशीर मार्गाने कमवून आणि सर्व कर भरून बाळगली असेल तर ती पांढरी असते. याउलट जर ती गैरमार्गाने कमवाली असेल करचुकवेगिरीतून कमावली असेल असेल तर मात्र ती काळी संपत्ती किंवा काळे धन बनते. हे काळे धन साठवून ठेवायचे असल्याने; स्थावर मालमत्ता, सोने, किंवा बेनामी बँक अकाउंट्सच्या माध्यमातून साठवणे अश्या करचुकव्यांना सोपे जाते.

बहुतांश काळे धन असे मालमत्तेच्या स्वरूपात असल्याने त्याचा विनिमयासाठी वापर करणे कठीण असते. कुठलाही व्यवहार पूर्ण करण्यासाठी जर काळ्या धनाला वापरण्याचे ठरवले तर त्याला रोख स्वरूपात रुपांतरीत करून घेणे आवश्यक असते. त्या तात्पुरत्या काळासाठी काळे धन रोख रकमेच्या किंवा पैशाच्या स्वरूपात बदलले जाते. पण त्याचे हस्तांतरण पूर्ण झाले की त्याला स्वीकारणारी व्यक्ती पुन्हा त्या रोख रकमेला स्थावर मालमत्ता किंवा सोने किंवा बेनामी बँक अकाउंट्समध्ये रुपांतरीत करते. बेकायदेशीर व्यवहारातून किंवा मिळवलेली रोख रक्कम रोख स्वरूपात धरून ठेवणे फायद्याचे नसल्याने अशी रोख रक्कम धरून ठेवण्याचे प्रमाण संपूर्ण देशाच्या अर्थकारणावर परिणाम घडवू शकेल इतके मोठे नसते. रोख रकमेच्या स्वरूपात काळे धन धरून ठेवण्याचे प्रमाण फार कमी असल्यामुळे नोटबंदी करून काळे धन पकडले जाईल असा आशावाद बाळगणे म्हणजे काळ्या धनाच्या स्वरूपाविषयी अनभिज्ञ असण्याचे लक्षण आहे.

केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने २०१२ साली काळ्या धनाच्या बाबतीत काढलेल्या श्वेत पत्राच्या आधारे, लेखकाने काळ्या धनाचा उगम दोन ठिकाणाहून होतो असे मांडले आहे. उगमाचे पहिले ठिकाण आहे 'बेकायदेशीर कृत्ये'. यात तस्करी, खंडणी, वेश्याव्यवसाय, प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर होणारा भ्रष्टाचार हे सर्व अंतर्भूत आहेत. तर दुसरे ठिकाण आहे 'करचुकवेगिरी'. यात असंघटीत क्षेत्रातील उद्योग, संघटीत क्षेत्रातील आणि स्थावर मालमत्तेसंबंधी व्यवहार, सरकारी खात्यांकडून केली जाणारी खरेदी, समभाग व्यवहारात करचुकवेगिरी करण्यासाठी स्थापन केलेल्या शेल कंपनींमार्फत केले जाणारे व्यवहार आणि वाढीव किंवा अल्प दराने बनवली जाणारी बिले, ट्रान्स्फर प्रायसिंग या गोष्टी येतात. यातले कित्येक व्यवहार चक्क बँकांतूनच होतात. म्हणजे व्यवहारासाठीसुद्धा रोख रक्कम वापरली जात नाही. आणि ज्या व्यवहारात ती वापरली जाते ती देखील व्यवहार पूर्ण झाल्यावर स्थावर मालमत्तेत किंवा बेनामी बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. त्यामुळे नोटबंदी या काळ्या धनाविरुद्ध अतिशय बोथट हत्यार आहे.

हा मुद्दा विषद करताना लेखक तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता आणि त्यांची सहकारी शशिकला यांचे उदाहरण देतो. दोन दशकापूर्वी जयललिता यांच्या अवैध संपत्तीला पुन्हा पांढरे करून घेण्यासाठी ३४ शेल कंपन्यांची ५० बँक अकाउंट वापरली गेली होती. आणि आता वीस वर्षानंतर तर नवनवीन आर्थिक व्यवहार करून अवैध संपत्तीला पांढरे करून घेणे अजूनच सोपे झाले आहे. म्हणजे ज्या काळ्या पैशाविरुद्ध ही लढाई सुरु झाली तो कधी काळा नसतोच. असलेच तर साठवून ठेवलेले धन काळे असू शकते. आणि ते देखील रोख रकमेच्या स्वरूपात फार कमी असते. त्यामुळे रोख रकमेच्या स्वरूपात पकडून ठेवलेल्या थोड्याथोडक्या काळ्या धनाला पकडण्यासाठी नोटबंदी करणे म्हणजे नखाच्या कामाला कुऱ्हाड वापरण्यासारखे आहे; अशी साधार मांडणी करून लेखक नोटबंदीच्या दुसऱ्या उद्दिष्टाकडे वळतो. ते म्हणजे ‘कॅशलेस अर्थव्यवस्था’.

यातदेखील लेखक हे सप्रमाण दाखवून देतो की एनइएफटी, आरटीजीएस सारख्या सुविधा देऊन आरबीआयने संस्थात्मक व्यवहार कॅशलेस करण्याला एक दशकभरापूर्वीचा सुरवात केली होती. आणि त्यात मोठे यशदेखील मिळवले होते. पण वैयक्तिक पातळीवरील व्यवहार कॅशलेस करण्यात अनंत अडचणी होत्या आणि त्या अजूनही आहेत. सर्व खेड्या पाड्यात बँकिंग सुविधा नसणे; वीज, मोबाईल आणि इंटरनेट जोडणी नसणे; सर्व नागरिकांकडे स्मार्टफोन नसणे; स्मार्टफोन, फीचर फोन आणि साधा टेलिफोन या सर्वांना उपयुक्त ठरेल अशी एकसमान प्रणाली तयार करणे, ती विविध भाषांत उपलब्ध करून देणे; या सर्व अडचणी सोडविण्याचा प्रयत्न गेली दशकभर चालू आहे आणि तो चुटकीसरशी सुटणार नाही. विकासाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने कॅशलेस व्यवहाराचा प्रश्न सुटणार नाही. नोटबंदीमुळे काही रोखीचे व्यवहार बंद व्हायला मदत होईल हे खरे असले तरी सर्व रोखीचे व्यवहार बंद करायला नोटबंदी करणे म्हणजे हवा फिरवण्यासाठी पवनचक्की उभारण्यासारखे आहे.

लेखकाने बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या संस्थळावरून सतरा देशांचा जीडीपी आणि रोख रकमेच्या प्रमाणाचा (३ डिसेंबर २०१६ रोजी लागू असलेला) एक तक्ता दिलेला आहे. त्यात युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, सौदी अरेबिया, कोरियासारख्या देशातील रोख रकमेचे जीडीपीशी प्रमाण भारतापेक्षा फार कमी आहे हे दिसून येते. त्यामुळे विकसित होण्यासाठी कॅशलेस व्यवहार आवश्यक आहेत अशी समजूत होणे शक्य आहे. पण त्याचबरोबर तक्ता हेदेखील सांगतो की स्वित्झर्लंड, अमेरिका, जपान, हॉंगकॉंग, सिंगापूर आणि युरोझोन या विकसित अर्थव्यवस्थांमध्येदेखील जीडीपीच्या तुलनेत रोख रकमेचे प्रमाण भारतापेक्षाच काय पण सामूहिक सरासरीपेक्षादेखील जास्त आहे. म्हणजे विकसित अर्थव्यवस्था होण्यासाठी आधी कॅशलेस होणे आवश्यक आहे या प्रकारची मांडणी ठिसूळ होते.

म्हणजे नोटबंदी ज्यासाठी केली ते काळे धन नोटबंदीमुळे नष्ट होणार नाही. कॅशलेस अर्थव्यवस्था हा केवळ दिशादर्शन करणारा ध्रुवतारा असू शकतो, ते मुक्कामाचे ठिकाण नाही. आणि त्या दिशेने आपली वाटचाल दशकभरापूर्वीच सुरु झाली आहे हे सर्व स्पष्ट केल्यावर लेखक एका मोठ्या मुद्द्याला हात घालतो. तो आहे निवडणुका आणि काळे धन.

आपल्या देशातील निवडणुका हा काळे धन रोखीत येण्याचा आणि त्याचे हस्तांतरण होण्याचा महामार्ग आहे, हे उघड गुपित आहे. निवडणुकीत उमेदवाराने जाहीर केलेला खर्च आणि त्याचा प्रत्यक्ष खर्च यात ताळमेळ नसतो. त्याशिवाय निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची संपत्ती किमान २००% ने तर निवडून न आलेल्या लोकप्रतिनिधींची संपत्ती १३०% च्या आसपास दराने वाढते. म्हणजे प्रत्येक उमेदवार निवडणुकीवर केलेला खर्च पुन्हा या ना त्या मार्गाने वसूल करतो. त्यासाठी सत्ता आणि उद्योग अशी अभद्र युती होत असून; व्यावसायिक आणि राजकारणी यांच्यातली दरी कमी होत आहे. हे चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाकडे नोंद झालेल्या राजकीय पक्षाला २० हजारापेक्षा कमी रकमेच्या देणग्यांचा तपशील द्यावा लागत नाही या नियमाचा वापर करून अनेक राजकीय पक्ष कोणतीही निवडणूक न लढवता केवळ निवडणूक आयोगाकडे नोंद करून अस्तित्वात आहेत. ते मोठ्या राजकीय पक्षांची किंवा त्यांच्या नेत्यांची काळी संपत्ती पांढरी करून घेण्याचे कारखाने आहेत.

निवडणूकीत कराव्या लागणाऱ्या अधिकृत खर्चावरील नियंत्रण अवास्तव आहे म्हणून निवडणुकीत अनधिकृत पैशाचा वापर वाढतो अशी मांडणी जर कुणी निरीक्षकाने केली तर तिथेदेखील भारतीय समाज निरीक्षकाला बुचकळ्यात पाडतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चाची सरासरी ही अधिकृत कमाल मर्यादेच्या केवळ ५७% इतकी आहे. म्हणजे जर अधिकृतरीत्या १०० रुपये खर्च करण्यास परवानगी असताना उमेदवारांनी केवळ ५७ रुपये खर्च करून निवडणुकीत यश मिळवले आहे. आणि लोकसभेच्या १/३ सभासदांनी तर अधिकृत कमाल मर्यादेच्या केवळ ५०% रक्कम खर्च केली असे जाहीर केले आहे.

म्हणजे उमेदवारांनी जाहीर केलेली संपत्ती आणि त्यांचे राहणीमान यांचा ताळमेळ बसत नाही. त्याच प्रमाणे उमेदवारांनी जाहीर केलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्षात झालेला निवडणूक खर्च यात देखील ताळमेळ दिसत नाही . निवडणुकीत दिसून येणाऱ्या, भारतीय लोकशाहीत पर्यायाने भारतीय समाजात आणि अर्थव्यवस्थेत आपली पाळेमुळे खोलवर रुजवलेल्या खोटेपणाकडे लक्ष वेधून घेताना लेखक निवडणुकीतील अजून एका कलाकडे लक्ष वेधतो. ते म्हणजे राजकारण्यांनी व्यावसायिक होणे आणि श्रीमंत व्यावसायिकांनी राजकारणात उतरणे.

पक्षांना देणगी देऊन आपल्याला हवी तशी धोरणे वळवून घेण्याचा प्रयत्न जगभरातले सर्व व्यावसायिक करतात. पण भारतात मात्र राजकारणी आणि व्यावसायिक यातील सीमारेषा मिटत चालली आहे. त्यामुळे शासन हा व्यवसायाचा भाग बनत चालला आहे. आणि क्रोनी कॅपिटलिझमला उत्तेजन मिळते आहे. निवडणुका काळ्या धनाला जन्म देत आहेत आणि काळे धन अयोग्य उमेदवाराला निवडणुका लढविण्यासाठी बळ पुरवत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला राजकारणातून जडलेल्या आणि काळ्या ध्यानाला बळकटी देणाऱ्या आजाराचे नेमके निदान केले आहे परंतू त्यावर कुठलीही उपाययोजना सुचविली नाही आहे.

सोन्याप्रती भारतीयांच्या प्रेमाबद्दल लेखकाने एक पूर्ण प्रकरण दिले आहे. भारतात सुवर्णनियंत्रण कायद्याची पार्श्वभूमी, कायद्याच्या काळात भारतात चालू राहिलेली सोन्याची तस्करी, भारतीय महिलांच्या आयुष्यातील सोन्याचे स्थान, स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या सरकारांनी तिजोरीत अडकलेले हे सोने बाहेर आणण्याचे केलेले विविध प्रयत्न आणि नोटबंदीच्या काळात सोने खरेदीवर सरकारने आणलेले नियंत्रण याबाबत लेखकाने चर्चा केलेली आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरांनुसार स्त्रियांना मालमत्तेत वाटा नसल्याने स्त्रीधनातील सोने हा स्त्रियांचा आधार बनण्याची प्रक्रिया लेखकाने विस्ताराने मांडली आहे. पण अर्थव्यवस्थेला गतिरोधक म्हणून काम करणाऱ्या सोन्याच्या ह्या आत्यंतिक हव्यासावर लेखक काही उपाय सुचवत नाही.

नोटबंदीच्या निर्णयामुळे आरबीआयच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचला असल्याचे नोंदवून लेखक त्याला वाटणारी खरी भीती नोंदवतो. लेखकाच्या मते जर नोटबंदीच्या निर्णयामुळे कोणताही दृश्य फायदा आला नाही तर भविष्यात अश्या कोणत्याही योजनेस मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद नकारात्मक असेल. हे म्हणजे आजारी व्यक्तीची जीवनेच्छा कमी करण्यासारखे आहे. आणि लेखकाची ही भीती मला रास्त वाटते.

या पुस्तकाला रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री. वाय व्ही रेड्डी यांची मुद्देसूद प्रस्तावना लाभली आहे. ऋणनिर्देशात लेखकाने हे देखील सांगितले आहे की श्री. रेड्डी यांनी प्रत्येक प्रकरण काळजीपूर्वक नजरेखालून घातले आहे. नोटबंदीच्या काळात श्री. वाय व्ही रेड्डी स्पष्टपणे नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध बोलले होते. त्यावरून आणि ऋणनिर्देशातील स्पष्ट उल्लेखावरून हे पुस्तक म्हणजे श्री. वाय व्ही रेड्डीआणि श्री सी राममनोहर रेड्डी यांनी संयुक्तपणे लिहिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या प्रस्तावनेत श्री वाय व्ही रेड्डी यांनी नोटबंदी तज्ञांच्या वर्तुळात टीकेचा विषय झाली असली आणि नोटबंदीमुळे सामान्य लोकांचे जीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असले तरी नोटबंदीबाबत जनमत सर्वसाधारणपणे अनुकूल असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. माझ्यामते १९९१च्या आर्थिक सुधारानंतर पहिले दशक भारतीय उद्योगांसाठी धक्कादायक ठरले. अनेक उद्योग जागतिकीकरणाच्या त्या झंझावातात नामशेष झाले. पण त्याचवेळी माहिती क्रांती आल्यामुळे हे दशक सामान्य नागरिकांसाठी धक्कादायक न ठरता नवीन संधी घेऊन आले. त्यानंतर सावरलेल्या उद्योगांनी संगणकांना जवळ केले. आणि माहिती क्रांतीची लाटदेखील ओसरू लागली. पण या मोठ्या बदलांमुळे बहुसंख्य भारतीयांना आर्थिक सुधारणेच्या दुसऱ्या दशकात आपण 'नाहीरे' वर्गात ढकलले गेलो आहोत याची जाणीव झाली. यातून श्रीमंत आणि नवश्रीमंत लोकांविषयी चीड निर्माण होऊन बहुसंख्य भारतीय नोटबंदीच्या कार्यक्रमात कडकलक्ष्मीच्या रूपात स्वतःला फटके मरून घ्यायला तयार झाले असावेत.

अर्थव्यवस्थेला ग्रासून असलेल्या जुन्या आजारांपासून आणि नोटबंदीच्या धक्क्यापासून सावरण्यासाठी प्रस्तावनेत माजी गव्हर्नरांनी सात मुद्दे मांडले आहेत. त्याचे सार सांगताना त्यांनी स्वतःच बायबलमधील "Physician, heal thyself" या उक्तीचा उल्लेख केला आहे. 'जो दुसऱ्यावर उपचार करू इच्छितो त्याने प्रथम स्वतः निरोगी असावे' अश्या अर्थाच्या या उक्तीतून श्री रेड्डी यांनी शासन, प्रशासन आणि न्यायासन या लोकशाहीच्या तिन्ही अंगांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.

पुस्तक जरी आक्रस्ताळा विरोध करणारे नसले तरी नकली चलन आणि दहशतवाद यांच्यावर नोटबंदीच्या निर्णयाचा काय परिणाम झाला ते यात नोंदवलेले नाही. तसेच नोटबंदीच्या काळात हवाला व्यवहारांत लक्षणीय घट झाली होती असे अहवाल इकॉनॉमिक टाइम्स सारख्या वृत्तपत्रातूनही आले होते. त्यांचा देखील पुस्तकात कुठे उल्लेख आढळत नाही. कदाचित ही केवळ तत्कालीन घट होती असे लेखकाचे अनुमान असावे म्हणून त्याने या गोष्टींचा उल्लेख केलेला दिसत नाही. असे असले तरी विपुल संदर्भ, अभिनिवेशरहित विवेचन आणि नोटबंदीच्या घटनेच्या सैद्धांतिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाजूंचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.

भक्तवत्सल देवीचं जग

कधी कधी वाटतं व्हॉटस अॅप म्हणजे देऊळ आहे. अनेक देवींच्या छोट्या छोट्या देवळांचं एक मोठं देऊळ संकुल.

इथे सगळे भक्त वेगवेगळ्या देवींची अखंड भक्ती करत असतात. भक्तांच्या मनोकामना पुऱ्या होतात की नाही हा विषय संशोधन करण्यास चांगला आहे. पण देवींना पुष्कळ भाव मिळतो. इतका की आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे हे खोटे वाटेल.

साधारणपणे प्रत्येक देवीचा नित्यक्रम असा असतो.

डीपी बदलावा.त्यात शक्य असेल तर डोळ्यात आर्त भाव आणावेत. किंवा एकदम बेफिकीर भाव आणावेत. किंवा स्टेटस मेसेज बदलावा. त्यात विदेशी भाषेतील (विशेषतः स्पॅनिश किंवा फ्रेंच भाषेतील) वाक्ये टाकावीत. यासाठी गुगल ट्रान्सलेट वापरावे. किंवा 'एकटं वाटतंय', 'कधी येशील', टाईप वाक्ये टाकून प्रत्येक भक्ताला ही देवीची आपल्याला घातलेली आर्त साद आहे असे वाटू द्यावे. किंवा स्टेटस बदलावा. त्यात अनेक फोटोंची एक मालिका गुंफावी. त्यातला किमान एक फोटो पतिदेवांबरोबर, एक बाळदेवाबरोबर आणि बाकी सर्व एकटीचे ठेवावेत. आणि मग भक्तांची वाट पहावी.

याउलट प्रत्येक भक्ताचा दिनक्रम असा असतो.

रोज सर्व देवींच्या डिपीचं दर्शन घ्यावं. कधी देवी फूल असते, कधी पानं, कधी बालरूपात, कधी बालपणापासून ते आजपर्यंतच्या अनेक रूपांचा कोलाज, कधी आपल्या सख्यांसोबत असते, कधी बाळदेवासोबत, तर कधी साक्षात पतिदेवांसोबत. मग ज्यांचे स्टेटस मेसेज बदलले आहेत त्यांचे मनन करावे. ते विदेशी भाषेतील असतील तर गुगल ट्रान्सलेट वापरून स्वतःचे ज्ञान वाढवावे. मग ज्यांचे स्टेटस बदलले आहेत त्यांच्या स्टेटसचा स्लाईडशो भक्तिभावाने बघावा. देवीची अशी विविध रूपे पाहून झाली की मग अनन्य भक्तिभावाने हृदय भरून घ्यावे.

मग सत्यनारायणाच्या पुजेत सांगतात त्याप्रमाणे देवीचे मनोरंजन करायचे ही जबाबदारी स्वतःवर घ्यावी. देवीच्या डीपीचं कौतुक करावं. बाळ मोठा झाला आहे अगदी आईवर गेला आहे वगैरे सांगावं. पतिदेवांना जिममध्ये पाठव! तुला शोभत नाहीत वगैरे मनधरणी करावी. मग विनोद किंवा गाणं वगैरे पाठवून देवीचं मनोरंजन करावं.

आणि मग देवळाचं दार बंद करून दिवसभर आपल्या कामाला लागावं. सारखं सारखं नामस्मरण करत रहावं. आणि मध्ये मध्ये व्हॉटस अॅपच देऊळ उघडून देवीपर्यंत आपली प्रार्थना पोहोचली की नाही याची खातरजमा करून घ्यावी. देवी बघत असेल यावर विश्वास ठेवावा.

एक टिक म्हणजे देवी बाळदेव आणि पतिदेवांकडे लक्ष देते आहे. दोन टिक्स म्हणजे देवीला वेळ मिळाला. निळ्या टिक्स म्हणजे आपली सेवा पोचली.

मग अनेकदा देवी उत्तर देत नाही म्हणजे कौल डावा पडला. क्वचित कधीतरी देवी भक्तवत्सल होते आणि उत्तर देते. म्हणजे कौल उजवा पडला.

मग जो मेसेजरूपी प्रसाद मिळाला असेल तो भक्तिभावाने ग्रहण करावा. आणि देवीच्या जयघोषात फोन कपाळाला बांधायचाच काय तो बाकी ठेवावा. किंवा जमल्यास कपाळावर बांधून फिरावे.

जे सुविचार शाळेच्या बोर्डावर लिहिले असताना त्यातील काना मात्रा वेलांटी किंवा एखादा शब्द खोडून त्याचा अर्थ बदलण्यास तो हिरीरीने पुढे सरसावला असता, जे सुविचार आईवडिलांकडून आले असता तो तडक उलट उत्तर देता झाला असता; असे सगळे सुविचार जेव्हा देवीकडून येतात तेव्हा त्याला त्याचा वेगळाच अर्थ समजतो. केवळ विचार चांगला असून भागत नाही तर गुरुपण तितकाच प्रेमळ आणि लोभसवाणा असावा लागतो, हे सत्य त्याला उमगतं.

कित्येक भक्त अशी सेवा दिवसातून अनेकवेळा करतात. इतके सगळे प्रेमळ भक्त आणि भक्तवत्सल देवी असूनही आजकाल माणूस खऱ्या प्रेमाला पारखा झालाय असं सगळे का म्हणतात? ते काही कळत नाही.

सार्थ

हे लेखन ९ एप्रिल २०१७ चं आहे.
----------
आज मुंबईत नास्तिक सभा आहे हे फेसबुकवर वाचलं आणि दिवसाची सुरुवात झाली.

संध्याकाळी क्लासमधे पालकसभा आहे म्हणून दाढी कोरून घ्यायला सकाळी सकाळी न्हाव्याकडे चाललो होतो. रस्त्यात पारसमणी चौकात गर्दी आणि लगबग दिसली. चांदी, स्टील वगैरेंच्या घोडागाड्या रांगेत उभ्या होत्या. लहान मुलं खेळत होती.

दाढी करून परत येत होतो.

सगळ्यात पुढे माणसांनी ओढलेल्या गाड्यावर वेगवेगळ्या रंगाचे ध्वज लावलेले दोन ध्वजस्तंभ... त्यामागे ढोल... मग आपल्या मित्रांशी गप्पा मारत चालणारी छोटी मुलं... त्यामागे एकाच डिझाईनच्या साड्या घातलेल्या आणि डोक्यावर कलश घेतलेल्या बायका... मग पुन्हा ढोलपथक... मग पुरूष ओढत असलेल्या तीन गाड्यात देवतांच्या मूर्ती पकडून त्यांना हातातील पांढऱ्या झाडूने वारा घालणारी स्त्री आणि तिच्या शेजारी बसलेला शांत पुरूष... त्यामागे तरूण मुलामुलींचा भिरभिरत्या नजरेचा घोळका... मग चालणारे प्रौढ स्त्री पुरुष... मग वृध्द स्त्री पुरूषांना घेऊन जाणाऱ्या चांदीचा पत्रा ठोकलेल्या एका रांगेतल्या घोडागाड्या... या सर्वाना एका रांगेत ठेवून रहदारी नियंत्रण करणारे पांढऱ्या झब्बा लेंग्यातले अनेक तरुण... आणि या सगळ्यांकडे कुतूहलाने पहाणारी बघ्यांची गर्दी. अनेक हिंदू, काही बौद्ध, तुरळक मुसलमान; आज या मिरवणूकीचे शांत प्रेक्षक होते..

मला एकदम वाटलं की हजारो वर्षांपासून भारतात अशा विविध धर्मांच्या, जातींच्या वेगवेगळ्या दिवशी मिरवणूका निघत आल्या आहेत... ज्यांची मिरवणूक ते त्या दिवशीचे कलाकार बाकी सगळे त्या दिवशी प्रेक्षक.... मग आपला दिवस संपला की हे कलाकार लगेच पुन्हा बघ्याच्या भूमिकेत... गुण्यागोविंदाने कलाकार आणि प्रेक्षक अशी भूमिकांची सातत्याने चालू असलेली अदलाबदल... अंतहीन प्रवासाला निघालेले वेगवेगळे सार्थ

मीपण थांबून बघत होतो. हजारो वर्षांनंतरही एका समूहाला मार्गदर्शन करणाऱ्या भगवान महावीराला मनातल्या मनात नमस्कार केला.

घोडागाड्यांच्या मागे त्यांच्या मालकांच्या संपर्काची माहिती होती. अर्ध्या गाड्या गायकवाड नावाच्या माणसाच्या होत्या आणि उरलेल्या गाड्या अश्रफभाई, पीरभाई, रहमानमियॉं नावाच्या भिवंडीच्या व्यक्तींच्या होत्या.

मांसाहारींच्या घोडागाड्या शाकाहारींना घेऊन चालल्या होत्या आणि शाकाहारींचा पैसा मांसाहारींच्या धंद्याला बरकत देत होता.... सार्थ चालत होते.....

आणि आज संध्याकाळी आस्तिकांच्या या भूमीच्या एका कोपऱ्यात नास्तिकांचा सार्थ निघणार होता... फक्त तो इतर आस्तिकांच्या सार्थाला प्रेक्षक म्हणून पहात राहील की त्यांचा सार्थ मोडावा म्हणून प्रयत्न करेल? कुणास ठाऊक...

असे सगळे विचार डोक्यात येत असताना मी अश्रफभाईच्या घोड्याच्या खिंकाळण्याने भानावर आलो...

आता माझी प्रेक्षकाची भूमिका संपली होती... आता मी एक सार्थवाहक बनणार होतो... एक वर्ष चालणारा सार्थ... व्हॉटस अॅप, फेसबुक, माहितीचा महापूर, नोकरी, कर्जाचे हप्ते, महागाई, टीन एज संपत येऊन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली मुलं आणि या साऱ्यांच्या प्रचंड वेगाने भांबावून गेलेल्या किंवा या साऱ्यांकडे दुर्लक्ष करून स्वमग्न रहाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांचा आणि निसर्गाच्या हाकांना बहर बहर आलेल्या त्यांच्या मुलामुलींचा सार्थ..

(सार्थ म्हणजे तांडा)

Wednesday, August 16, 2017

ओड टू इंडिया

उंच डोंगररांगा. त्यावर साचलेलं बर्फ. दऱ्याखोऱ्यात पसरलेला तो पांढराशुभ्र थर. गोठलेल्या पाण्याचा. जणू जीवन गोठलंय असं वाटायला लावणारा. त्यातून बाहेर डोकावणारे सूचिपर्णी वृक्ष. त्यांच्याही सुयांसारख्या पानांवरून ओघळणारे बर्फ. स्तब्ध झालेला वारा. मग बारीक हिमवृष्टी सुरू होते. बर्फावर बर्फ साचत रहातो. चक्र चालू रहातं. काहीच बदल नाही. साचलेपण. गोठलेपण. थंडगार. स्तब्ध. स्थितीशील. सोसाट्याचा वारा सुटून वादळ आलंच तर तेही बर्फाचे थर हलवू शकणार नाही इतका साचलेला घट्ट बर्फ

एक दिवस काहीतरी वेगळं होतं.

साचत गेलेल्या बर्फावर होत राहिलेला हिमवर्षाव आपली सीमा ओलांडतो. कुठल्यातरी एका उंच सरळसोट उतारावर बर्फ स्वतःला सावरू शकत नाही. आणि बर्फाचा तोल जातो. इतके वर्षाचं साचलेपण मोकळं व्हायला सुरुवात होते. बर्फ मोकळा होतो. खाली पडतो. पडताना तिथल्या बर्फाच्या साचलेपणाला धक्का मारतो. त्याला खाली पाडतो. आता साखळी प्रक्रिया सुरू होते. एक छोटासा मोकळा झालेला बर्फ एका मोठ्या लाटेत रूपांतरीत होतो. हजार तोंडांनी रोंरावत उतारावरून खाली उतरू लागतो. रस्त्यात येणाऱ्या सगळ्या झाडांना गिळून टाकतो. उखडून टाकतो. दऱ्या भरून टाकतो. डोंगरांना उघडं पाडतो. प्रचंड मोठा ध्वनी त्या डोंगरदऱ्यात घुमत रहातो.

मग पुन्हा सगळं शांत होतं. हिमधुरळा खाली बसतो. पुन्हा स्तब्धता. गोठलेपण. स्थिरता. बारीक हिमवर्षाव. साचत रहाणारं आयुष्य. पुढल्या हिमस्खलनाची हळूहळू तयारी करत रहाणारं.

बिथोवेन नावाचा एक युरोपियन संगीतकार. चुकलो...!!!... महान संगीतकार! ज्याच्याबद्दल खुद्द मोझार्ट म्हणतो की 'याच्याकडे लक्ष ठेवा कारण हा जगाला काहीतरी अतुलनीय देणार आहे.' आयुष्याच्या अखेरीस बहिरा होऊनही अत्यंत सुंदर संगीतरचना करणारा हा महान संगीतकार. त्याची एक सिंफनी आहे. सिंफनी क्रमांक नऊ. त्याच्यात एक गाणं आहे. नाव आहे, 'ओड टू जॉय' म्हणजे 'आनंदाचं स्तोत्र'. 




मूळ गाणं लिहिलं होतं जर्मन कवी फ्रेडरिक शिलरने. त्याच्यात थोडा बदल करून बिथोवेनने आपल्या सिंफनी क्रमांक नऊमधे वापरलं. ते इतकं सुंदर आहे की 1972 मधे युरोपियन कौन्सिलने आणि नंतर युरोपियन युनियनने त्याला आपले राष्ट्रगीत म्हणून वापरलं आहे.



पंधरावीस वर्षापूर्वी, अंधेरीला एकटा रहात असताना एक नवीन टिव्ही चॅनल सुरू झालं होतं. नाव आठवत नाही. सकाळी सातच्या लेक्चरला जायला तयार होत होतो. टिव्ही लावला होता. ते अनोळखी चॅनल लागलं. नाव झळकलं 'ओड टू अव्हलांच' म्हणजे 'हिमस्खलनाचे स्तोत्र' सहा सात मिनिटं हिमस्खलनाच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर बिथोवेनचं ओड टू जॉय, ओड टू अव्हलांच म्हणून वाजत राहिलं. त्या दिवसापासून हिमस्खलनाचा संबंध माझ्या डोक्यात ओड टू जॉयशी लागला तो कायमचा. उत्कट नैसर्गिक घटनेसाठीचं तितकंच उत्कट संगीत.




हजारो वर्षे स्तब्ध असलेला समाज. त्याच्यातील धर्म, पंथ, उपासना पध्दती, जातीमुळे तयार झालेल्या अविचल डोंगर रांगा. गोठलेलं जीवन. साचलेलं, दबून गेलेलं समाजमन. त्यावर सतत होणारी परदेशीयांची आक्रमणं. आणि मग त्या आक्रमकांचंही इथल्या स्थिर गोठलेल्या स्तब्धतेत मिसळून जाणं.

मग कुठेतरी तीव्र उतारावर कुठल्यातरी गोठलेल्या मनाचा धीर तुटणं. तिथून स्वदेशाबद्दलची, स्वातंत्र्याबद्दलची जाणीव बाहेर पडणं. इतर गोठलेल्या मनांवर तिने आघात करायला सुरुवात करणं. सुरवातीला छोटीशी वाटणारी ही कल्पना मग रोंरावत या अख्ख्या भूभागावर फिरणं. तिने राजे रजवाडे, परकीय आक्रमक, सगळ्यांना उखडून टाकणं. जुन्या दऱ्या बुजवून टाकणं. जुन्या समाजाचे बुरूज उध्वस्त करून जुने डोंगर उघडे पाडणं. स्वातंत्र्य विचारांचा हा प्रचंड लोंढा शंभर वर्षांपर्यंत आपलं रूप बदलत, मोठा होत, अनेकांना आपल्यात सामावून घेत, अजून मोठा होणं. शेवटी 15 अॉगस्टला स्वतंत्र होऊन त्याचा वेग आवरला जाणं.

आज आपल्या घरात बसून विचारांच्या सहाय्याने मनातल्या मनात बघताना, शंभर वर्षे चाललेला तो विचारांचा अव्हलांच रोमांचकारी वाटला तरी तत्कालीन पिढ्यांसाठी अतिशय यातनादायी असावा. अगदी तसाच जसं टिव्हीवर दिसणारं हिमस्खलन आपल्याला रोमहर्षक वाटतं पण तिथे असणाऱ्या सगळ्यांना मात्र ते जीवघेणं वाटतं.

मग आधीचा धुरळा खाली बसला. पुन्हा हिमवर्षाव चालू. सत्तर वर्षे होऊन गेली. नवी स्तब्धता. नवं गोठलेपण. नवं साचलेपण तयार होत राहिलं.

पुन्हा कुठलातरी विचाराचा गोठलेला कडा फुटेल. आणि त्याला शक्य असेल तितक्या प्रमाणात इतरांच्या मनात आपलं स्फुल्लिंग टाकायचा प्रयत्न करत, स्वतःचा आकार मोठा करत गोठलेल्या जीवनात वेग आणेल. मधे येणाऱ्यांना नष्ट करत नव्या दऱ्या बुजवण्याचा प्रयत्न करेल. जुन्या डोंगरांनी पांघरलेलं नवं बर्फ ओरबाडून काढेल. त्यांना पुन्हा उघडं करून नवीन पिढीकडे देईल आणि सांगेल, 'आता तुमची पाळी. जिवंत पांघरूण घाला. गोठलेलं आणि गोठवणारं नको.'

आणि मागे बहिऱ्या बिथोवेनचं संगीत चालू असेल. 'ओड टू जॉय', 'ओड टू अव्हलांच'. मी त्याचं नवीन नाव ठेवलं आहे. 'ओड टू इंडिया'.