Saturday, July 22, 2017

आगमन निर्गमन आणि पुनरागमन (भाग ११)


युरोपमध्ये युरोपियनांच्या नकळत आर्थिक मानव अवतरला. त्याचे आगमन अनपेक्षित होते. आणि तो अवतरावा म्हणून कोणी त्याला किंवा अजून कुणाला साकडेही घातले नव्हते. किंबहुना तो अवतरत असताना त्याला सरकार आणि सामान्य माणसांकडून सारखाच विरोध झाला. पण तो आलाच. आणि आल्यावर त्याने केवळ युरोपचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा चेहरा बदलून टाकला. त्याने युरोपचा तळ ढवळून काढला. जुनी व्यवस्था पार मोडून काढली. प्रस्थापितांना उखडून फेकलं आणि नवोदितांनी पुढे येण्याचा मार्ग सुकर केला. अनेकांना भुकेकंगाल केलं पण अनेकांना सुखसमृद्धीचे मालक बनवलं. का जगायचं? का काम करायचं? किती काम करायचं? याची सगळी उत्तरं या आर्थिक मानवाने नव्याने दिली.

का जगायचं? सुख मिळवण्यासाठी.

का काम करायचं? नफा मिळवण्यासाठी.

किती काम करायचं? जोपर्यंत स्वार्थ साधता येतो आहे आणि नफा मिळतो आहे तोपर्यंत.

या उत्तरांमुळे स्पर्धा, नफा आणि स्वार्थ या तीन संकल्पनांना नैतिक अधिष्ठान मिळवून दिलं. ज्यांना ही नवीन उत्तरे, स्पर्धा, नफा आणि स्वार्थ यांना मिळालेले नैतिक अधिष्ठान पटले नाहीत ते आपोआप मागे पडत गेले.

कसा होता हा आर्थिक मानव? आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती होती?

बाजार, वस्तू विनिमय आणि पैसा या गोष्टी मानवी इतिहासात फार प्राचीन काळापासून आहेत. पण त्या देखील सामाजिक मानावाभोवती फिरत होत्या. का काम करायचं? या प्रश्नाचं उत्तर बाजाराकडून मिळत नव्हतं. लोक एखादं काम करत होते कारण ते वडिलोपार्जित होतं किंवा मग कुठल्यातरी राजकीय शक्तीकडून त्यांच्यावर सक्ती केली होती म्हणून ते कामं करत होते. भलेही युरोपात भारतासारख्या जातीव्यवस्था नसतील तरीही तिथेही वडिलोपार्जित व्यवसाय हेच व्यवसाय निवडीचं कारण होतं. 'नफा मिळतो म्हणून अमुक एक व्यवसाय करू' हा विचार कुणाच्याही मनात येत नव्हता.

पण युरोपमध्ये साधारणपणे एकाच कालखंडात चार गोष्टी घडल्या.

१) एकसंध आणि सर्वशक्तिमान कॅथलिक चर्चचे विकेंद्रीकरण होऊ लागले.

२) मुस्लिम धर्माविरुद्ध विजयी होण्याची ख्रिश्चन धर्मियांची इच्छा रक्तपात घडवू लागली.

३) रेनेसांची (नवनिर्माणाच्या काळाची) सुरुवात झाली.

४) मानवी जीवनातील श्रम कमी करू शकणाऱ्या यंत्रांचे शोध लागू लागले.

या चार महत्वपूर्ण घटनांमुळे आर्थिक मानवाचे आगमन होण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा दुष्काळ, पूर, भूकंप, रोगराईसारख्या आपत्ती कोसळतात तेव्हा संपूर्ण समाजाला त्याचे चटके बसू लागतात. सगळेजण एकाच नावेतील प्रवासी असल्याने आपल्या दु:खाचे कारण ईश्वरी इच्छा आहे अशी मनाची समजूत घालणं सोपं असतं आणि समाजाला आपल्या नैतिक धारणा पुन्हा तपासून घ्याव्या असे वाटत नाही. पण वर उल्लेख केलेल्या चार महत्वाच्या घटनांमुळे युरोपात गरीब श्रीमंत यांतील दरी एकाएकी वाढली. आणि या घटना नैसर्गिक नसल्याने, ‘आपण सगळेजण एकाच नावेतील प्रवासी नाही. आपल्या दु:खाचे कारण ईश्वरेच्छा नाही’ असे विचार रुजण्यास सुरवात झाली. त्यामुळे युरोपियन समाजातील छोट्या वर्तुळात का होईना पण जुन्या नैतिक धारणांवर विचारमंथन सुरु झाले.

अगदी साधं उदाहरण द्यायचं तर लोकरीचे कापड तयार करणाऱ्या यंत्रांचा शोध लागल्यावर, कामगारांच्या कौशल्यावर आणि वेगावर अवलंबून राहण्यापेक्षा यंत्रांत गुंतवणूक करणे अधिक आकर्षक वाटू लागले. कारण यात निर्माण होणाऱ्या उत्पादनाची गुणवत्ता आणि सारखेपणा कल्पनातीत होता आणि उत्पादनाचा वेगही अचंबित करणारा होता. मग या अथक काम करणाऱ्या या यंत्रांची भूक भागवण्यासाठी मेंढीपालन महत्वाचे ठरले. आणि मेंढीपालनासाठी कुरणे मोकळी ठेवणे आकर्षक ठरले. शेती करण्यापेक्षा कुरणे राखणे कमी श्रमाचे आणि अधिक मोबदल्याचे ठरू लागले. म्हणून जमीनदारांनी आपल्या शेतजमिनी कुरणांत बदलल्या. त्यामुळे अनेक शेतमजूर बेकार झाले. भिकारी होऊन लाचारीचे जगणे त्यांच्या नशिबी आले. त्यामुळे एकट्या इंग्लडात अश्या बेकारांची संख्या इतकी वाढली की सामाजिक सुरक्षेला धोका होऊ नये म्हणून सरकारने त्यांना ठराविक भूभागाबाहेर येण्यास मनाई केली. ज्यांना असे सरकारी मदतीवर जगणे नकोसे वाटत होते ते यंत्रशक्तीवर काम करणाऱ्या कारखान्यात काम करायला तयार झाले. ज्यांचा पिढीजात व्यवसाय शेतजमिनीवर काम करणे होता ते कारखान्यात मजूर झाले. या सगळ्या बदलांत, आपण कारखान्यांत यंत्रे का वापरतो आहोत? आपण शेतजमिनी कुरणात का बदलतो आहोत? त्यावर पिढीजात कसणाऱ्या अनेक कुळांना आपण का विस्थापित करत आहोत? आपण पिढीजात शेतीचे काम सोडून कारखान्यात काम करायला का जात आहोत? या प्रश्नांची उत्तरे शोधणे सगळ्या समाजाला आवश्यक झाले. कारण नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कामी येणारे ईश्वरेच्छेचे प्रयोजन आता कामी येत नव्हते.

माणसाचे एक वैशिष्ट्य आहे. त्याला आपल्या जगण्यावागण्याला नैतिक अधिष्ठान असावे अशी सुप्त इच्छा असते. मग तो आपल्या जगण्यावागण्याचे समर्थन करू शकणारी नीतीतत्वे शोधून काढतो. एकदा ही नीतीतत्त्वे सर्वमान्य झाली की मग त्याच्या निर्णयांची तीव्रता आणि व्याप्ती वाढू लागते.

ईश्वरेच्छा, पिढीजात व्यवसाय, शासनाची इच्छा ही सगळी प्रयोजने बाद ठरलेल्या काळात युरोपात स्पर्धेचे, नफ्याचे आणि स्वार्थाचे तत्वज्ञान जन्माला आले. या तत्त्वज्ञानाने राजेरजवाडे आणि त्यांचे युद्धखोर सरदार दरकदार, जमीनदार आणि त्यांची कुळे आणि त्यांच्या वंशपरंपरागत उतरंडीला जबरदस्त धक्का बसला. आणि सगळ्यांना एका पातळीवर आणून त्यांचे ढोबळमानाने जमीनदार, कामगार, उद्योजक आणि भांडवलदार असे चार वर्ग बनवले. आणि आपल्याकडील जमीन, श्रमशक्ती, कल्पना आणि योजनाशक्ती आणि धन इतरांना उपलब्ध करून देण्यासाठी नफा आणि स्वार्थ ही तगडी कारणमीमांसा तयार होत गेली. कंपनी नावाची अमूर्त पण ताकदवान व्यक्ती बनण्याच्या प्रक्रियेला वेग आला. ठरलेल्या कामासाठी कंपनी देश किंवा राष्ट्रांपेक्षाही अधिक ताकदवान होती आणि तिच्यावर नागरिकांचे भले करण्याचेही ओझे नव्हते. त्यामुळे तिची ताकद अमर्याद होत चालली होती.

नवीन विचारांचे हे आगमन युरोपात बदलास सामोरे जाण्यास तयार नसलेल्या लाखो लोकांसाठी अत्यंत यातनादायी ठरले. राजांचे अधिकार कमी होण्यास आधीपासून सुरवात झालेली होती पण आता राज्यक्रांती होण्यासाठी समाज तयार झाला. लोकशाही विचारांचे आगमन होण्याची वेळ आली होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ह्या त्रयीचा अर्थ युरोपातील किमान काही लोकांना उमगू लागला होता. त्यांना स्वातंत्र्य हवे होते ते कुणा परकीय शक्तीपासून नव्हे तर त्यांच्याच जुन्या तंत्रापासून. त्यांना त्यांच्या समाजाला पुढे नेणारे जुने तंत्र झुगारून द्यायचे होते. त्यांना समता हवी होती पण ती आर्थिक मानव म्हणून. समता आली म्हणजे पूर्वाश्रमीचा राजा आपल्याला पंगतीला बसवेल अश्या भ्रमात ते नव्हते. पण जीवन जगण्याच्या धडपडीत सगळे समान आहेत ही मान्यता त्यांना हवी होती. पूर्वजांचे किंवा पूर्वाश्रमीचे कुठलेही ओझे नवीन आयुष्यावर पडू ना देता सर्वांना एकाच पातळीवरून सुरवात करण्याची मुभा आहे अशी मान्यता हवी होती. बंधुत्व म्हणजे कोणी आपल्या ताटातले काढून दुसऱ्याला स्वतःहून देईल अश्या गॉड स्वप्नांत ते रममाण नव्हते तर आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांत प्रत्येक माणूस त्याचे धार्मिक संस्कार बाजूला ठेवून नवीन विचारांच्या सहाय्याने एका गटात सामील होऊ शकेल असा विश्वास त्यांना निर्माण करायचा होता.

भाग सहा मध्ये आगमन संकल्पनेबद्दल बोलताना मी वर्णन केलेली नवीन विचारांची प्रस्थापित विचारांबरोबरची लढाई युरोपने पूर्ण केली. त्याची भरपूर किंमत मोजली. आणि आपल्या समाजाला स्थिर करण्यासाठी, नवीन विचारांच्या आगमनामुळे समाजात होत असणारी उलथापालथ थोपवण्यासाठी युरोपमधून सुरु झाले ते विजेत्यांचे निर्गमन. त्यातून सुरु झाला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद. म्हणजे युरोपात नवीन विचारांचे आगमन त्यांच्या समाजाच्या घुसळणीमुळे झाले. स्पर्धा, नफा आणि स्वार्थ यावर उभ्या राहणाऱ्या या अस्थिर व्यवस्थेला स्थिर करण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या संकल्पना पुढे आल्या आणि शेवटी त्याचे पर्यवसान साम्राज्यवादात होऊन जगातील इतर समाज आर्थिक मानवासाठी तयार नसताना त्यांत आर्थिक मानव आणि लोकशाही विचारांचे आगमन बाहेरून झाले. त्यामुळे या विचारांनी युरोपात जितकी पडझड केली त्यापेक्षा कित्येक पटीने मोठी पडझड इतर देशात होणार होती. पण त्याची कल्पना ना युरोपियन साम्राज्यवादयांना होती ना त्यांच्या विस्तारणाऱ्या साम्रज्यात जोडल्या जात असलेल्या प्रजेला.

Sunday, July 16, 2017

बखर बिनपोवाड्याची

परवा द मॅन इन द हाय कॅसल या अॅमेझॉन प्राईम वर उपलब्ध असणाऱ्या सिरियलबद्दल लिहिलं. अनेक मित्रांनी प्रतिसाद दिले. कुणाला जयंत नारळीकरांची 'गंगाधरपंतांचे पानिपत' ही कथा आठवली. कुणाला कॅटॅस्ट्रॉफ थियरी आठवली. कुणी रॉबर्ट हॅरिस आणि लेन डेटन हे अस्तित्वात येऊ ना शकलेल्या इतिहासाबद्दल लेखन करणारे लेखक सुचवले. हे सगळे वाचायचे आहेत याची नोंद मनात करून ठेवत असताना मला माझ्याकडची नंदा खरेंची दोन पुस्तके आठवली.

पहिलं, अंताजीची बखर आणि दुसरं, बखर अंतकाळाची.

अंताजी हा या दोन पुस्तकांचा काल्पनिक लेखक. हा पेशवाईच्या काळात विविध घटनांना साक्षी असतो. पहिल्या बाजीरावाच्या काळात जन्मलेला अंताजी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बखर लिहीत असतो. नागपूरकर भोसल्यांची बंगालवर स्वारी, प्लासी, पानिपत, कुंभेरी, खर्डा अशी अनेक मोठी युद्धे तो पाहतो. इतकेच काय पण नारायणरावाच्या खुनाच्या वेळी तो तिथे हजर असतो. अनेक महत्वाच्या व्यक्तींशी त्याचा संबंध येतो त्यामुळे त्यांचे व्यक्तिविशेष जाणणे त्याला शक्य होते. त्याला रंगवताना खरेंनी लंपटपणा, थोरांबाबत अनादर, स्वतःचा व इतरांचा घाबरटपणा, स्त्रियांविषयी अनुचित आकर्षण, धर्माचरणाबाबत अरुची, अघोरी कृत्यांबद्दल घृणास्पद कुतूहल हे त्याचे स्वभावविशेष ठरवले आहेत. पण स्वतःच्या अनीतीची चाड नसल्याने अंताजीचे लेखन स्वतःस खोटे मोठेपण देण्याच्या दोषापासून मुक्त आहे.

दोन्ही पुस्तकात खरेंनी प्रचलित इतिहासातील अनेक गोष्टींना दूर ठेवले आहे. यात सरसावणारे शेले नाहीत. उसळणाऱ्या तलवारी नाहीत. गर्रकन वळणारे किंवा करारी नजरेने रोखून पहात आपल्या पहाडी आवाजात गर्जणारे शूरवीर नायक नाहीत. राजाचे अश्रू नाहीत. पत्नीसमवेत सारीपाट खेळता न आल्याचे शल्य उरी बाळगणारे हळुवार मनाचे तरीही रणझुंझार योद्धे नाहीत. मंद पावले टाकीत अदबीने झुकून बोलणारे कारभारी नाहीत. पण इतिहास तोच आहे. थोडक्यात अंताजी आपल्याला काचेपलीकडे वर्ख लावून ठेवलेल्या मिठाईच्या मुदपाकखान्यात घेऊन जातो.

म्हणजे या पुस्तकांत अस्तित्वात नसलेल्या इतिहासाबद्दलची कल्पना नसून अस्तित्वात असलेल्या इतिहासाचे उघडे वाघडे रूप आहे. इतिहास लिहिताना तो लोकप्रिय रूपात लिहिण्याचा आणि त्यासाठी अरुंद, कोता आणि बराचसा असंवेदनशील दृष्टिकोन ठेवण्याचा जो प्रघात पडला आहे त्याला न जुमानता, अंताजी आपल्याला त्या काळात घेऊन जातो. रूढार्थाने ही इतिहासाची पुस्तके नाहीत आणि पोवाडेदेखील नाहीत. पण ऐतिहासिक साधने वापरत असताना व्यक्तींच्या उदात्तीकरणाचा मोह टाळला आणि आपली वर्तमानकालीन उद्दिष्टे पूर्ण करून घेण्यासाठी त्याला न रंगवता तिरसट व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो पाहिला तर कसा दिसेल याचे शब्दचित्र आहे.

अंताजीची बखर १९९१ च आहे तर बखर अंतकाळाची त्यानंतर सुमारे १८ वर्षांनी लिहिलेलं आहे. अंताजीचं पात्र कसं सुचलं ते लिहिताना, लेखकासमोर जॉर्ज मॅकडॉनल्ड फ्रेजर या लेखकाने निर्माण केलेला फ्लॅशमन हा काल्पनिक नायक होता. प्रस्तावनेत त्याची ओळख करून देताना खरे लिहितात, 'हा फ्लॅशमन हलकट, घाबरट आणि स्त्रीलंपट दाखवला आहे. पण तो इतिहासातल्या अनेक महत्वाच्या घटना घडत असताना हजार होता अशी कल्पना आहे .

प्रस्तावनेतील फ्लॅशमनचे वर्णन आज पुन्हा वाचताना मला ब्लॅक अॅडर ही माझी आवडती मालिका आठवली. त्यासोबत मॉन्टी पायथॉनचा लाईफ ऑफ ब्रायन चित्रपट आठवला. आणि फ्रेजर साहेबांची पुस्तके वाचायचा कधीचा करून ठेवलेला पण आचरणात न आणलेला संकल्प पुन्हा आठवला. आणि नंदा खरेंची इतर पुस्तके वाचायची बाकी आहेत हे पण आठवले. रात्र थोडी सोंगे फार ही माझी कायमची अवस्था आहे. फक्त इथली सोंगे उत्कृष्ट आहेत आणि माझी ताकद अपुरी.

Tuesday, July 11, 2017

एन्कीच्या राज्यात



लहानपणी कधी कधी आईच्या काकांकडे जायचो. म्हणजे वर्षा दोन वर्षातून एखादा दिवस. सकाळी जाऊन संध्याकाळी परत. आजोबा खूप मस्ती करायचे आमच्याबरोबर. मामा जेजेला कमर्शियल आर्टिस्टचं शिक्षण घेत असल्याने त्याच्याकडे कार्टूनची, इंग्रजी चित्रपटांची चित्रं असलेली भरपूर मासिकं असायची. तिथेच माझी स्टार वॉर्सशी, कॉनॅन द बार्बेरिअयनच्या अरनॉल्डशी, इंडियाना जोन्सशी ओळख झाली होती. आजीकड़ून दुधाची पावडर आणि साखर वाटीत घ्यायची, त्रिदेव चित्रपटाचे संवाद असलेली कॅसेट लावायची आणि ती सचित्र मासिक घेऊन बसायचं हा माझा आणि माझ्या धाकट्या भावाचा लाडका उद्योग. तिथेच मी पहिल्यांदा बॉनी एमचं संगीत ऐकलं. Brown Girl in the Ring, Rasputin, Daddy Cool, Ma Baker, Holiday, By The Rivers of Babylon वगैरे गाण्यांची धून फार आवडायची. शब्द कळायचे नाहीत. त्यामुळे जी समजली असतील ती एखाद दोन वाक्य म्हणायची आणि बाकीचं गाणं ‘ड डा ड डा’ सारखे आवाज चालीत काढत गाण्याची हौस पूर्ण करून घ्यायची सुरवात तिथेच झाली. 

नंतरही बॉनी एमची गाणी अनेकदा भेटली. पैसे कमवू लागल्यावर एकदोन कॅसेट्सपण विकत घेतल्या. पण का कुणास ठाऊक गाण्याचे बोल शोधायची कशी इच्छा झाली नाही. ‘ड डा ड डा’ वर मी खुश होतो आणि कॅसेटमधल्या बॉनी एमची पण त्यावर काही तक्रार नव्हती.

एक दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर अविनाशशी ओळख झाली. बोलता बोलता अविनाशने मी न वाचलेले काही लेखक मला सुचवले. त्यात एक होते विलास सारंग. सारंगांनी पुलंवर टीका केलेली असल्याने त्यांची पुस्तके वाचू की नको याबद्दल मन स्पष्ट नव्हतं. पण मग त्यांची पुस्तके घेतली. ‘अमर्याद आहे बुद्ध’ फार आवडलं. अविनाशने सारंगांचं ‘एन्कीच्या राज्यात’ सुचवलं होतं. ते काही मला मिळालं नव्हतं. गेल्या वर्षी फेसबुकवरच भेटून मला निवृत्ती आणि स्वतःला मुक्ताबाई म्हणवून घेणाऱ्या वैशालीशी बोलताना तिला म्हणालो होतो की मी जयप्रकाश नारायणांचं पुलंनी अनुवादित केलेलं ‘स्वगत’ आणि विलास सारंगांचं ‘एन्कीच्या राज्यात’ शोधतोय. नंतर तिला हे बोललोय हे मी विसरून गेलो होतो. आणि इतकं विसरलो होतो की डोंबिवलीत साहित्य संमेलन झालं त्यावेळी ही पुस्तकं शोधायचं माझ्या लक्षातसुद्धा आलं नाही.

जूनमध्ये वाढदिवस झाला. आणि वाढदिवसाच्या आधी कुरियर आलं. उघडून पाहतो तो 'स्वगत'. पाठवणाऱ्याचं नाव नाही. फक्त माझ्या फोन नंबराबरोबर बरोबर अजून एक फोन नंबर पाकिटावर छापलेला होता. मग मोबाईलमध्ये टाईप करून बघितला तर वैशालीचा नंबर निघाला. तिचे आभार मानण्यासाठी तिला फोन लावला तर म्हणाली ‘कुठलं पुस्तक आलं?’ मी स्वगतचं नाव सांगितलं तर म्हणाली अजून एक येईल आणि ते पाहून तू आनंदाने उड्या मारशील. उत्सुकता ताणली गेली. आणि तीन चार दिवसांनी वैशालीच्या कृपेने, मौजकडून, मला “एन्कीच्या राज्यात” प्रवेश देणारं कुरियर आलं. स्वगत बंद करून सारंगांचा हात धरला.

इराणमधली शहांची राजवट कोसळण्याच्या आधी इराकमध्ये सोशलिस्ट विचारधारेच्या बाथ पार्टीची राजवट आली. नंतर तिची सूत्र सद्दाम हुसेनच्या हाती गेली. १९७९मध्ये इराणमध्ये शहाच्या राजवटीविरोधात लोक रस्त्यावर उतरले. त्या कालखंडात अमेरिकेत अध्यापन करत असलेला मूळचा कोकणातला डॉ. प्रमोद वेंगुर्लेकर, नोकरी बदलून दक्षिण इराकमध्ये एका कॉलेजात अध्यापक म्हणून रुजू होतो. त्याच्या नजरेतून मध्य आशियातील त्या काळाची स्थिती रंगवणारी कादंबरी म्हणजे ‘एन्कीच्या राज्यात’.

एन्की म्हणजे सुमेरियन लोकांचा देव. जिथे आज इराक आहे त्या टायग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांच्या प्रदेशात सुमारे ५००० वर्षांपूर्वी सुमेरियन संस्कृती नांदत होती. त्यांच्या सर्वशक्तिमान देवाचं नाव एन्की. त्याने समुद्र, नद्या आणि वाऱ्याला मर्यादा आखून दिल्या आणि लोकांना आपल्या आज्ञेत राहण्यास सांगितले. नंतर साधारण १२०० वर्षांनी (म्हणजे आजपासून सुमारे ३८०० वर्षांपूर्वी) तिथून सुमेर लोक नामशेष झाले (कदाचित एन्कीच्या आज्ञा ऐकल्या नसतील म्हणून असे झाले असेल). आणि तिथे अक्कादिन लोकांची बॅबिलोनियन संस्कृती उदयास आली.
Image Source : Wikipedia
एन्कीच्या खांद्यावरून वाहणाऱ्या टायग्रिस आणि युफ्रेटीस नद्या 
५००० वर्षांपूर्वी मानवी जीवनाला स्थिरता देणाऱ्या सर्वशक्तिमान पण हुकूमशहा सारख्या एन्कीचे हे राज्य कसे आहे? तर मैलोनमैल पसरलेल्या सपाट रखरखीत वाळवंटात इथे खारे आणि गोडे पाणी शेजार शेजारच्या तळ्यात नांदते. इथे माती आणि चिखल सारखा एकमेकांत मिसळतो; इथे घटकेत सोसाट्याचा वारा वाहू लागतो आणि धो धो पाऊस कोसळू लागतो; इथे नावालाही कुठे दगड दिसत नाही; इथे डोंगर दऱ्या नसल्याने नजरेला पर्स्पेक्टिव्ह रहात नाही. विरोधी तत्वांची सातत्याने सरमिसळ होत राहिल्याने कशाचाच आधार नसलेल्या या प्रदेशातील लोकांनी सपाट जीवनाला उंचवटयाचा पर्स्पेक्टिव्ह आणण्यासाठी, मातीच्या ढेकळासारख्या आयुष्याला दगडासारख्या काठिण्याचा आधार मिळावा म्हणून हजारो वर्षांपूर्वी एन्कीची शिस्त प्रमाण मानली. मग इस्लामची आणि मग व्यक्तीची ओळख विसरायला लावणाऱ्या सोशलिस्ट सरकारची.

अश्या या मूळच्या एन्कीच्या राज्यात मुक्त विचारांचा डॉ वेंगुर्लेकर जेव्हा साहित्याचा प्राध्यापक म्हणून जातो तेव्हा त्याला तिथले जीवन, सरकारची धोरणे त्यामुळे होणारी तिथल्या लोकांची कुचंबणा, त्या कमालीच्या कोंदट वातावरणातही सुखी राहणारे काही लोक या सगळ्यांबद्दल काय वाटते त्याची नोंद म्हणजे ‘एन्कीच्या राज्यात’ ही कादंबरी.

जून जुलै म्हणजे क्लासच्या धावपळीचे महिने. त्यामुळे एन्कीच्या राज्यातला माझा प्रवास फार हळू हळू चालला होता. शेवटी काल कादंबरी संपली. कादंबरीच्या शेवटी इराणमध्ये क्रांती होते. इजिप्त आणि इस्राएलमध्ये वाटाघाटी सुरु होतात. मध्यपूर्व धुमसू लागते. विमानतळ बंद केले जातात. डॉ वेंगुर्लेकर सुट्टीसाठी घरी जाणार असतो पण त्याची योजना बारगळते. तो आणि त्याचे प्राध्यापक मित्र इराकमध्ये अडकून पडतात. गुदमरवून टाकणारं ही परिस्थिती वाचताना मलापण गुदमरू लागलं होतं. आणि विलास सारंगांच्या त्या नायकाला, वेंगुर्लेकरला एकदम एक गाणं आठवतं. त्या गाण्याची पहिली ओळ वाचली आणि मी थरकलो. हे तर माझं आवडतं गाणं. बॉनी एमचं. ज्याची फक्त पहिली ओळ माहिती होती. पुढे फक्त ‘ड डा ड डा’ करत हे गाणं मी म्हणत आलो होतो.

By the rivers of Babylon, there we sat down
ye-eah we wept, when we remembered Zion.

When the wicked
Carried us away in captivity
Required from us a song
Now how shall we sing the lord's song in a strange land

Let the words of our mouth and the meditations of our heart
be acceptable in thy sight here tonight

पहिल्या ओळीच्या पुढे हे असं काही असेल त्याची मी कल्पनाच केली नव्हती. आणि जर कधी केली असती तरी त्याचा अर्थ चुलत आजोबांच्या घरी साखर घातलेली दुधाची पावडर खाताना कळला नसता.

गाण्याचे बोल मिळाले. अर्थ लागला. मन एकाच वेळी बोल मिळाल्याच्या आनंदात होते आणि अर्थातील कारुण्य कळल्याने दुःखी होते. कादंबरी संपता संपता कधी शोधायचा प्रयत्न न केलेली एक जुनी गोष्ट तिच्या पूर्ण स्वरूपात अनपेक्षितपणे समोर आल्याने मन एका वेगळ्याच प्रकारच्या पोकळीत होते. ती भरून काढण्यासाठी इंटरनेटवर हे गाणं ऐकायला गेलो. तर तिथे अजून काही माझ्यासाठी वाट पहात होते.



मी ज्याला बॉनी एमचं गाणं समजत होतो ते खरंतर ‘द मेलोडियन’ नावाच्या एका जमैकन ग्रुपने रचलेलं रास्ताफेरियन चळवळीतील रेगे प्रकारचं गाणं आहे. आणि हिब्रू बायबलच्या साम (पद) १९ आणि १३७ वरून हे गाणं रचलेलं आहे. मग बायबलचा संदर्भ शोधणं आलं. तेव्हा कळलं की असीरियन लोकांनी ज्यू लोकांना त्यांच्या जमिनीवरून हुसकून लावलं आणि बॅबिलोनच्या नद्या (टायग्रिस आणि युफ्रेटीस) यांच्याजवळ बंदी बनवून ठेवलं त्या वेळेचं वर्णन करणारं ते गाणं आहे. रास्ताफेरियन चळवळीत व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या सरकारला ‘बॅबिलोन’ हा शब्द वापरतात.



आता गाण्याचे बोल, त्याची पार्श्वभूमी दोन्ही कळलं होतं. आणि कादंबरीत ते गाणं विलास सारंगांनी ज्या चपखल रितीने पेरलं होतं की त्याचा अर्थ मनाला खूप खोलवर भिडला होता.

अविनाशने सांगितलेली आणि वैशालीने वर्षभर लक्षात ठेवून वाढदिवसाला भेट म्हणून पाठवलेली विलास सारंगांची ही कादंबरी मला वेगळ्याच राज्यात घेऊन गेली. यात माझ्या चुलत आजोबांचं घर होतं. दुधाची पावडर आणि साखर होती. मामाने जमा केलेली इंग्रजी चित्रपटांच्या चित्रांची मासिकं होती. त्रिदेवच्या संवादाची कॅसेट होती. बॉनी एम ची गाणी होती. फक्त त्यातले मी जोडलेले ‘ड डा ड डा’ जाऊन त्यामागचे सगळे संदर्भ अर्थासहित उलगडले होते. वाढदिवसाची भेट अजूनच मूल्यवान झाली होती.