आगमन संकल्पना समजायला थोडी गुंतागुंतीची आणि कठीण आहे . कारण आगमनात येणारा विचार एक असतो तर त्याला आपापल्या मगदुराप्रमाणे आणि स्वार्थबुद्धीने प्रतिसाद देणारे प्रस्थापित विचार अनेक असतात. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून एकाच वेळी आगमनाचे स्वागत आणि विरोध चालू असतो. आणि हे सर्व प्रकारचे प्रतिसाद, त्यांच्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे एका व्यक्तीच्या प्रज्ञेला सहजशक्य नसते.
त्यातुलनेत निर्गमन संकल्पना समजायला थोडी सोपी आहे. कारण निर्गमन विचारांचे होत नाही तर व्यक्तीचे होते. त्यामुळे निर्गमनातील अनुभव हे व्यक्तिगत स्वरूपाचे असतात. आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या अनुभवांशी समरस होणे आपल्याला सहजशक्य असते. पण निर्गमन संकल्पनेबद्दल लिहिण्याआधी एक महत्वाची नोंद करून ठेवतो. ज्याप्रमाणे आगमन म्हणजे आक्रमण नव्हे त्याप्रमाणे निर्गमन म्हणजे निष्कासन नव्हे.
निष्कासन म्हणजे व्यक्तीच्या मनाविरुद्ध त्याला एका भू-प्रदेशातून किंवा समाजातून बाहेर जाण्यासाठी शासनाने केलेली सक्ती आहे. याउलट निर्गमनात एक प्रकारची अपरिहार्यता असली तरी ती शासनप्रणीत नसून भू-प्रदेश किंवा समाज सोडण्याचा निर्णय व्यक्तीने स्वतः घेतलेला असतो.
एकदा का निर्गमन म्हणजे निष्कासन नव्हे हे लक्षात घेतले की आपोआप अनेक प्राचीन महाकाव्यांतील किंवा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासातील नायकांच्या आयुष्यातील प्रसंग आपल्याला काळजीपूर्वक निवडावे लागतात.
रामायणातील, राम, सीता आणि लक्ष्मणाचा स्वीकारलेला वनवास निर्गमन ठरतो तर वालीच्या आज्ञेने सुग्रीवाला भोगावा लागलेला वनवास किंवा राज्याभिषेकांनंतर रामाने केलेला सीतेचा त्याग, हे दोन्हीही निष्कासन ठरतात. महाभारतातील कुंती आणि माद्रीसहित पंडुचे हिमालयातील वास्तव्य निर्गमन ठरते तर कुंती आणि पांडवांचा लाक्षागृहाच्या वेळेचा वनवास किंवा द्युतातील पराजय आणि द्रौपदी वस्त्रहरणानंतरचा पांडवांचा द्रौपदीसहित वनवास आणि अज्ञातवास निष्कासन ठरते. यहोवाच्या आज्ञेने इजिप्तमध्ये परत आलेल्या मोझेसबरोबर सर्व ज्यू लोकांचे इझरेलकडे प्रयाण निर्गमन ठरते तर त्यापूर्वी मोझेसच्या जन्माचे रहस्य कळल्याने राजा रामसेसने त्याला दिलेला देशाबाहेर जाण्याचा हुकूम निष्कासन ठरतो. कुराणातील प्रेषित मुहम्मदाच्या आयुष्यातील मदिनेकडील प्रयाण निर्गमन ठरते तर प्रेषिताच्या आज्ञेने बानू नादिरच्या ज्यू टोळीला मदिनेतून बाहेर जावे लागणे निष्कासन ठरते. सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग निर्गमन ठरतो तर बुद्धाने देवदत्ताला भिक्षू संघातून बाहेर काढणे निष्कासन ठरते. गृहस्थाश्रमी विठ्ठलपंतांनी पत्नीच्या परवानगीशिवाय घेतलेला संन्यास निर्गमन ठरते याउलट विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना समाजाने वाळीत टाकणे निष्कासन ठरते.
त्याशिवाय पाश्चात्य विद्या शिकायला परदेशी गेलेले सगळे भारतीय किंवा वेदविद्यांचे अध्ययन सोडून भारतातंच राहून पाश्च्यात्य विद्या शिकणारे भारतीय किंवा भारतातंच धर्म बदलून मुसलमान किंवा ख्रिश्चन आणि नजीकच्या भूतकाळात बुद्धाचा धम्म स्वीकारणारे भारतीय ही देखील निर्गमनाची उदाहरणे आहेत.
निर्गमनात जुन्या आठवणी कडू आणि गोड अश्या दोन्ही स्वरूपाच्या असतात तर निष्कासनात जुन्या आठवणी म्हणजे जळजळीत अपमानाच्या भळभळणाऱ्या जखमा असतात. त्यामुळे निर्गमनात नव्या संस्कृतीशी जुळवून घेण्याची व्यक्तिगत धडपड असते. तशी धडपड निष्कासनातही असली तरी निष्कासनाचे पर्यवसान रक्तरंजित किंवा अन्य मार्गाने घेतलेला बदला किंवा पश्चात्तापदग्ध जीवन किंवा आत्महत्या असते. निर्गमन आणि निष्कासनात असा मूलभूत फरक असला तरी त्या निर्गमित किंवा निष्कासित व्यक्तीची नव्या संस्कृतीशी नाळ जुळवून घेण्याची धडपड बरेचदा सारखी असते आणि आपण सर्वजण या धडपडीशी एकरूप होऊ शकतो.
फार प्राचीन काळापासून "संपली येथील अन्नाची गुऱ्हाळे" असे म्हणत जगाच्या पाठीवर इथून तिथे लमाणांसारखे फिरत राहिलेले मानवांचे तांडे आणि लोकसंख्येतील स्त्री पुरुषांचे प्रमाण जर समसमान मानले तर अर्ध्या लोकसंख्येने लग्नाच्या निमित्ताने एका घरातून दुसऱ्या घरात केलेले निर्गमन यामुळे जगभरातील कथा, कादंबऱ्या, कविता आणि लोकगीते निर्गमनाच्या प्रसंगाला आणि त्यानंतरच्या आयुष्यातील धडपडीला उत्कटतेने व्यक्त करीत आलेले आहे.
आधुनिक जगात नोकरी किंवा धंदा या कारणांमुळे आपण सर्वजण जन्मगावापासून थोड्या कालावधीसाठी किंवा कायमचे दूर जातो किंवा त्याच भू-प्रदेशात राहून नोकरी किंवा धंदा बदलतो. मागील दरवाजे पूर्ण बंद करतो किंवा किंचित किलकिले ठेवण्याचा प्रयत्न करतो. विवाहबंधन स्वीकारतो किंवा घटस्फोट घेऊन पुनर्विवाह करतो. तरुणच काय पण वयोवृद्ध विधुर आणि विधवांनीपण पुनर्विवाह केलेले पाहतो. आईवडिलांपासून वेगळे होऊन स्वतंत्र बिऱ्हाड करतो. त्यामुळे या साहित्यप्रवाहाला आपण प्रत्यक्ष जीवनात अनुभवतो. लेखक किंवा कवीने घातलेल्या रांगोळीत आपल्या अनुभवांचे रंग भरल्याने ती रांगोळी अजून गडद होते आणि तिच्यात आपली भावनिक गुंतवणूकदेखील होते. रामायण, महाभारत या महाकाव्यातील किंवा बायबल, कुराण धर्मग्रंथातील अनेक कथा आपल्याला प्रेरित करतात, मन हेलावून टाकतात, भावनिक आधार पुरवतात ते त्यामुळेच.
खेड्यातून शिक्षण पूर्ण करून शहरात आलेला, कुणाशीही ओळख नसलेला तरुण, आणि लग्न करून नवीन घरात आलेली मुलगी यांची धडपड वेगळ्या परिसरातील असली तरी त्या धडपडीचे स्वरूप सारखेच असते.
सगळे जुने आयुष्य नव्या जगात चालू करण्याची धडपड सुरु होते. जुनी वेशभूषा, जुनी भाषा, खाण्यापिण्याच्या जुन्या पद्धती नवीन समाजात तशाच प्रकारे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. नवीन लोक कसे आहेत त्याचा अनुभव नसल्याने त्यांच्याशी वागताना केवळ कल्पना वापरल्या जातात आणि थपडा खायला सुरवात होते. जिथे नशीब काढायला स्वखुशीने किंवा अपरिहार्यतेने आलो तिथे आपण एकटे आहोत. आपले कुणी नाही. आपण इथे येऊन चूक केली की काय? यापेक्षा जुनेच आयुष्य बरे होते. माझी जुनी मित्रमंडळीच छान होती. तेव्हा त्रासदायक वाटले तरी जुने आयुष्यच अधिक सुखावह होते. तेव्हा भांडलो तरी जुने नातेवाईकच अधिक प्रेमळ होते. असे वाटणे हा पहिला टप्पा असतो.
पहिल्या टप्प्यात खाल्लेल्या टक्के टोणप्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अधिक परिपक्व होऊन मग ती व्यक्ती नवीन जगात कुठे समविचारी मित्र मिळतात ते शोधू लागते. आपल्या स्वभावाचे कुठले हळुवार कोपरे दडवायचे?, कुठे खोटे काठिण्य आणायचे? आणि कुठे जुन्या चालीरीती सोडून द्यायच्या? याचा निर्णय घेणे आता सुरु होते. वेशभूषा बदलते. भाषा बदलते. नवीन जगातील लोकांच्या काही सवयी प्रयत्नपूर्वक अंगी बाणवल्या जातात. कित्येकदा नव्या जगातील लोक ज्यांच्याबद्दल आग्रही नाहीत त्या चालीरीतींबद्दलही आग्रही राहणे सुरु होऊ लागते. थोड्या असभ्य शब्दात सांगायचं झाल्यास, "नया नया मुल्ला जोरसे बांग देता है”, अशी काहीशी अवस्था या दुसऱ्या टप्प्यात असते. साधारणपणे, परत फिरावे की सोडून आलेल्या जगाच्या परतीचे दोर कापून टाकावेत त्याचा निर्णय आता पक्का होतो.
जुन्या स्वभावाला मुरड घालताना आता काही दबलेल्या भावना उफाळून वर येतात. सोडून आलेल्या समूहाचे दडपण नसल्याने आता या सुप्त किंवा दबलेल्या भावना पूर्ण करणे सुरु होते. त्यात अपराधबोध वाढतो. त्याला दूर करण्यासाठी मग नव्या संस्कृतीतील विचारांचे साहाय्य घ्यावे लागते. बेफिकिरीचा आव आणावा लागतो. हे सगळे करताना ती व्यक्ती अजून संबंध टिकवून असलेल्या जुन्या लोकांना तर दुखवतेच पण कित्येक नव्या लोकांनादेखील दुखावते. पण हा तिसरा टप्पा म्हणजे स्वतःला पैलू पाडण्याचा एक भाग असतो. आपण असेही वागू शकतो, आपल्या व्यक्तिमत्वाला ही देखील एक बाजू आहे, याची जाणीव होऊ लागते. आपण कुठल्या मर्यादा सहज तोडू शकतो आणि कुठल्या मर्यादा तोडणे आपल्याला शक्य नाही, हेदेखील कळून चुकते. इथे तिसरा टप्पा संपतो.
आता नव्या भू-प्रदेशाला किंवा समाजाला स्वीकारलेले असते. खाणे, पिणे, लेणे, बोलणे याच्या नवीन सवयी आत्मसात झालेल्या असतात किंवा सोडून आलेल्या जगातील सवयीचे कंगोरे घासून त्या नव्या भू-प्रदेशात किंवा समाजात कश्या वापरता येतील ते कळलेले असते. नव्या भू-प्रदेशातील किंवा समाजातील लोकांच्या कमकुवत बाजू, त्यांचे दौर्बल्य, त्यांचे पूर्वग्रह, त्यांचा अडाणीपणा, त्यांची गतानुगतिकता दिसू लागलेली असते. इतिहासापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांचीदेखील चालू असलेली धडपड दिसू लागते. या सगळ्यावर कुरघोडी करण्यासाठी सोडून आलेल्या आपल्या समाजातील इतर नातेवाईकांना, मित्रमंडळींना इथे बोलावून घेणे सुरु होते. नवीन नोकरीच्या जागी जुन्या नोकरीतले सहाय्यक किंवा मित्र आणण्याचा प्रयत्न होतो. तसे कुणी येणे शक्य नसेल तर आपल्यासारखे जुन्या समाजाला सोडून आलेल्या समानशील लोकांचा शोध घेणे सुरु होते. सोडून आलेल्या समाजातील अजूनही हव्याहव्याशा वाटणाऱ्या काही चालीरितींचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जातो. माहेरच्या काही पद्धती सासरी सुरु होतात. परदेशात महाराष्ट्र मंडळे, कन्नड समाज, बंगाली समाज वगैरे सुरु होऊन गणेशोत्सव, युगादी, दुर्गापूजा वगैरे साजरे केले जाऊ लागतात. आणि मग निर्गमित व्यक्ती नवीन समाजात जुन्या आणि नव्याचा संगम घडवू लागते.
अनेकांच्या निर्गमनाचा प्रवास इथे संपतो. पण काही जणांच्या बाबतीत तो संपत नाही. इथे मन रमवू न शकलेल्या व्यक्ती पुन्हा नवीन निर्गमनाच्या मागे लागतात किंवा पुन्हा मागे परत फिरतात. जर त्यांनी मागे परत फिरायचे ठरवले तर सुरु होते पुनरागमन. त्याच्याबद्दल पुढील भागात लिहीन.

No comments:
Post a Comment