Saturday, April 22, 2017

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ९)



फार प्राचीन काळापासून जगभरातील इतर मानवसमूहांप्रमाणे भारतीय उपखंडावरील मानवसमूहांतदेखील भेदभावावर वसलेली, शोषणकारी, अन्यायकारी, दमनकारी समाजव्यवस्था होती. त्यामुळे जुन्याला कंटाळून भारतीय उपखंडातून आणि नवीन संधीच्या शोधात भारतीय उपखंडाकडे अनेकांचे निर्गमन कायम होत राहिले आहे. जे भारत सोडून गेले ते तिथे इथली संस्कृती घेऊन गेले. जिथे गेले तिथल्या भेदभावाशी जुळवून घेत स्वतःचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करत राहिले. जे इथे आले त्या सर्वांना आपापल्या मगदुराप्रमाणे स्थान मिळत गेले. जे आक्रमक होते त्यांना राज्यकारभारात, व्यापारी होते त्यांना व्यापारात आणि स्वतःची कुठलीही प्रबळ सामाजिक किंवा राजकीय आकांक्षा नसलेल्यांना इतर शोषितांच्या समूहात सामावून घेण्याच्या नोंदींनी भारतीय इतिहासाची अनेक पाने भरलेली आहेत. जणू काही या भूमीतून जगभर होणारे आणि जगभरातून इथे होणारे जनसमूहांचे निर्गमन म्हणजे मोसमी वाऱ्यांसारखी निरंतर चालणारी व्यवस्था होती. आणि जगभरातून निर्गमित होऊन भारतात स्थायिक होणाऱ्या लोकांनी बरोबर आणलेल्या संस्कृतींच्या वर्षावात भारतीय उपखंडातील वेगवेगळे भूभाग वेगवेगळ्या वेळी चिंब भिजत होते. कुठे संस्कृतीचा महापूर तर कुठे असंस्कृतपणाचा दुष्काळ पडत होता.

उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला समुद्र या नैसर्गिक सीमांमध्ये एक मोठे संस्कृतीसरोवर तयार झाले आणि येणाऱ्यांच्या विविध संस्कृती या सरोवरात आपापल्या परीने भर घालत एकमेकांशेजारी नांदत राहिल्या. एकाच विस्तीर्ण जलाशयात कुठे नितळ पाणी, कुठे शेवाळं, कुठे पाणवनस्पतींचे जंगल, कुठे खोल डोह, कुठे स्वतःभोवती गिरक्या घेणारा भोवरा असावा त्याप्रमाणे भारतीय उपखंडात विविध संस्कृती साचत राहिल्या. एकमेकांवर परिणाम करत आणि एकमेकांचे आघात झेलत राहिल्या.

या उपखंडावर जन्म घेणारी प्रत्येक पिढी जणू या संस्कृतीसरोवराच्या मध्यभागी जन्माला येत होती आणि या प्रत्येक पिढीला आपला भूतकाळ आपल्या मागे दिसण्याऐवजी आपल्यापुढे सरोवराच्या काठाकडे विस्तारीत होत जाताना दिसत होता. ज्या दिशेला तोंड फिरवू त्या दिशेला भूतकाळाचा विस्तारणारा एक अंश दिसेल अशी ही व्यवस्था. सर्वांनी एकाच दिशेने पाहावे अशी सक्तीदेखील नाही. त्यामुळे कुणी रामाला पूज्य मानावे तर कुणी कृष्णाला. कुणासाठी परशुराम पूजनीय व्हावा तर कुणासाठी बळीराजा. कुणी विष्णुभक्त व्हावे तर कुणी शिवभक्त. कुणी लक्ष्मीची पूजा करावी तर कुणी सरस्वतीची. कुणी सगुण साकाराच्या चरणी लीन व्हावे तर कुणी निर्गुण निराकाराच्या साधनेत स्वतःला हरवून बसावे. कुणी पूजेसाठी 'पत्रं पुष्पं फलं तोयं' म्हणावे तर कुणी पंचमकाराशिवाय पूजाविधी अशक्य समजावे. कुणी अहिंसा परमोधर्म म्हणून राज्य करावे तर कुणी स्वतःच्या बापाला मारूनच गादीवर यावे. इतकी विविधता असलेल्या या समाजात एक संकल्पना मात्र खूप खोलवर रुजली आणि तिने या समाजातील व्यक्तींच्या जीवनधारणेत आमूलाग्र बदल घडवून आणला.

मर्त्य शरीर - अमर आत्मा, पाप - पुण्य, स्वर्ग - नरक अश्या संकल्पना सर्व धर्मात आहेत. प्राचीन इजिप्शियन लोकांच्या धर्मात तर मृत व्यक्तींना पुनर्जिवित करण्यात येईल अशीही संकल्पना आहे. पण भारतीय उपखंडात या सर्वांहून वेगळी संकल्पना जन्माला आली. ती म्हणजे ‘पुनर्जन्म’.

या संकल्पनांमुळे प्रत्येक व्यक्तीला, या जन्मीच्या दुःखांना सहन करण्याचे एक अत्यंत प्रभावी कारण मिळाले. या जन्मात इतरांकडून आज्ञापालन करवून घेण्यासाठी त्यांच्या पुढील जन्मीच्या सुखांची लालूच देणे शक्य झाले. मालक आणि गुलाम हे नाते क्रूर असेल तर पुनर्जन्म ही क्रूरतेची परमावधी आहे. समजायला सोपी अशी कर्मफल संकल्पना जर पुनर्जन्म संकल्पनेला जोडली तर त्यामुळे होऊ शकणारे शोषण आपल्या कल्पनेबाहेरचे आहे.

व्यक्तीला व्यक्तीची गुलामी करायला लावता येते. गुलामांचे जिणे जनावरासमान असते. गुलामाला कुटुंब नसते. त्याला देहेच्छा पूर्ण करायला जोडीदार मिळेल पण ते संबंधदेखील जनावरांसारखेच असतात. त्यामुळे गुलामाला स्त्रीवर अधिकार गाजवता येत नाही. स्वतःची हक्काची बायको, किंवा स्वतःचा हक्काचा नवरा हा विशेषाधिकार गुलामांना नसतो. त्यामुळे गुलामांची मुले गुलाम म्हणूनच जन्माला येतात. गुलामीची व्यवस्था खुली असते. एखादया व्यक्तीचा गुलामी व्यवस्थेत प्रवेश तीन प्रकारे होऊ शकतो. जन्मदास (गुलाम स्त्रीला झालेली मुले), जितदास (युद्धात जिंकून गुलाम बनवलेले) आणि क्रितदास (विकत घेतलेले गुलाम) असे ते तीन मार्ग आहेत.

गुलामीतही कर्मफल संकल्पना आहे. तुम्ही जे भोगता त्याचे कारण तुमचे कर्म आहे. पण ते कर्म या जन्मीचे आहे. म्हणून गुलाम बंड करू शकतात. गुलाम पळून जाऊ शकतात. गुलाम स्वतंत्र होऊ शकतात किंवा केले जाऊ शकतात. एकेकाळचा गुलाम नंतर आपल्या पदरी इतरांना गुलाम ठेवू शकतो किंवा एके ठिकाणचा गुलाम दुसरीकडे पळून जाऊन सम्राटदेखील बनू शकतो. गुलामी क्रूर असली तरी तिच्यात स्वातंत्र्याची अंधुकशी का होईना पण एक शक्यता असते. गुलामाला गुलामीची जाणीव असेल तर तो स्वातंत्र्याचा प्रयत्न करू शकतो. त्याने असा प्रयत्न करणे शिक्षेस पात्र ठरणारे असले तरी त्याच्या मनात स्वातंत्र्याकांक्षाच येणार नाही अशी हमी गुलामीच्या व्यवस्थेत मिळत नाही.

याउलट कर्मफलाला पुनर्जन्म कल्पना जोडल्यावर ती इतकी ताकदवान बनते की ती व्यक्तीला त्याच्या गुलामीची जाणीवच होऊ देत नाही. पुनर्जन्म आणि आणि कर्मफल एकत्र आले की व्यक्तीची, प्राप्त परिस्थितीविरुद्ध लढण्याची इच्छाच नाहीशी होते. काही अत्यंत बंडखोर व्यक्ती सोडल्यास बहुसंख्य सामान्य लोक प्रारब्धाचे भोग म्हणून येणारे आयुष्य जगायला तयार होतात. या व्यवस्थेत कोणीच स्वतःच्या मर्जीचा मालक नसतो. इथे सगळेच गुलाम असतात. एकमेकांचे गुलाम नाही तर आपापल्या पूर्वजन्मसंचितांचे गुलाम. इतरांसाठी श्रम करणारापण गतजन्मीच्या पापांचा गुलाम तर इतरांचे श्रम फुकट लाटणारापण गतजन्मीच्या पुण्याचा गुलाम. म्हणजे;

  1. आज एखादा श्रीमंत का? कारण त्याने मागील जन्मी पुण्य केले असावे. 
  2. आज एखादा गरीब का? कारण त्याने मागील जन्मी पाप केले असावे. 
  3. आज एखाद्याचे भाग्य का उजळले? कारण त्याने मागील जन्मी पुण्यकर्म केले असले पाहिजे. 
  4. आज एखादा अधिकारी देशोधडीला का लागला? त्याच्या मागील जन्मीच्या पापांचेच फळ असणार. 
  5. मला इतरांची सेवा करायला आवडत नाही तर मग मी ती का करू? कारण अशी सेवा करावी लागणे हेच तुझ्या मागल्या जन्मीच्या पापाचे फळ आहे. 
  6. मी ते फळ नाकारले तर काय होईल? पुढील जन्मी अजून नीच कर्म करावी लागतील. आणि यातून सुटका होणार नाही. 
  7. मी ते फळ स्वीकारून माझ्या मनाविरुद्ध इतरांची सेवा करत राहिलो तर काय होईल? पुढील जन्मी तुला अधिकारपद प्राप्त होईल आणि तू सर्व सुखांचा उपभोग घेऊ शकशील. इतर लोकांचे श्रम तुला फुकट खाता येतील. 
  8. आज एखादा धनिक व्यक्ती मातलेला आहे, इतरांचे शोषण करतो आहे. मी त्याला धडा का नको शिकवू? कारण त्याच्या पापाचा घडा भरतो आहे आणि पुढील जन्मी त्याला या सर्व पापांचा हिशोब फेडावा लागेल. 
  9. आज मी धनिक आहे. इतर लोक माझ्यासाठी राबताहेत. ते बंडदेखील करू इच्छित नाहीत. मग मी त्यांना मानाने का वागवू? कारण तू उतलास, मातलास की हे सुखोपभोग पुढील जन्मी तुझ्या नशिबी येणार नाहीत आणि तुला इतरांसाठी श्रम करत जगावे लागेल. अशी सगळी प्रारब्धयोगी मांडणी.

पण मनुष्य स्वार्थी आणि स्खलनशील असल्याने शेवटच्या प्रश्नाचं उत्तर फारसं मनावर न घेता, किंवा त्याचा स्वतःला सोयीचा अर्थ लावून अधिकारारूढ व्यक्तींनी इतरांचे शोषण करणे चालूच ठेवले. आणि या पापातून मुक्ती मिळण्यासाठी मग देवदेवस्की, दान धर्म, अश्या संकल्पनांना जोर आला. निर्मिती आणि संहार करणारा निर्गुण, निराकार, निर्लोभी आणि निर्मम असा परमेश्वर मग प्रसादाच्या बदल्यात पाप पुण्याची फेरफार करणारा लाचखोर अधिकारी बनला.

जगभरातील इतरांचे देवही असेच होते. पूर्ण समर्पण मागणारे. परीक्षा घेणारे. वर देणारे. लहान सहान कारणांवरून क्रोधायमान होणारे, चिडखोर. बळी मागणारे, भुकेले. पण इतर समाजात ही पुनर्जन्म संकल्पना नव्हती. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा थेट हिशोब देवाशी होता. आपल्याकडे मात्र प्रत्येक व्यक्तीचा थेट हिशोब स्वतःच्या गतजन्माशी होता. माणसेच काय पण देवही त्यांच्या कर्मफलापासून वाचू शकत नव्हते आणि सर्वशक्तिमान परमेश्वराच्या त्रिमूर्तीपैकी कुणाच्याही मानवी अवतारालासुद्धा या कर्मफलापासून सुटका नव्हती.

त्यामुळे इतर समाज म्हणजे देव, प्रेषित, पुरोहित आणि सामान्य जनता यांची लांबच लांब साखळी किंवा दहिहंडीसारखी उतरंड बनत गेले. याउलट पुनर्जन्म आणि कर्मफलाच्या संकल्पनेमुळे भारतीय समाज म्हणजे, स्वतःभोवती फिरत राहणाऱ्या अनेक भोवऱ्यांचा पुंजका बनून राहिला. भारतीय समाजातील या प्रत्येक भोवऱ्याला त्याच्या पाप पुण्याची आणि पुनर्जन्माची लांबच लांब दोरी गती देत राहिली होती आणि अजूनही देत आहे.

गुलामाला स्वतःचं कुटुंब बनवण्याचा, मालमत्ता बाळगण्याचा अधिकार नाही पण स्वातंत्र्यासाठी धडपड करण्याचा अधिकार आहे. तो पकडला गेला तर मारला जाईल पण सुटला तर इतरांना गुलाम बनवू शकेल, मालमत्तेचा अधिकारी बनू शकेल. याउलट भारतीय समाजात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं कुटुंब बनवण्याचा अधिकार होता आणि कित्येकांना मालमत्तेचा अधिकारही होता पण स्वतःच्या पूर्वजन्मातून कुणाचीच सुटका नव्हती. या लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून सुटका म्हणजे मुक्ती. आणि त्यासाठी निष्काम भावनेने कर्म करत राहणे, संसारत्याग, भक्ती, अनासक्ती असे प्रवृत्तीविरोधी आणि निवृत्तीप्रवण मार्ग सुचवले गेले.

त्यामुळे आपल्या भरतखंडात देवही गर्भगृहात रहातात आणि देवाचे भक्तही मुक्तीच्या प्रतीक्षेत गतजन्मीच्या पाप पुण्याने बनलेल्या आपापल्या कोशात राहतात. अंतिम न्याय, कयामत सारख्या संकल्पनांऐवजी पुनर्जन्म आणि मुक्ती या संकल्पना वापरल्याने येथील समाज मुक्ती हेच परमध्येय मानून भौतिक आयुष्याला मुक्तीच्या मार्गासाठीचा गर्भकोश मानू लागला. मुक्त असूनही गर्भगृहात राहणाऱ्या देवाचे मुक्तीच्या इच्छेने गर्भकोशात राहाणारे असंख्य भक्त अशी या समाजाची वैशिष्ट्यपूर्ण रचना झाली होती आणि अजूनही आहे.

1 comment:

  1. एकमेकांचे गुलाम नाही तर आपापल्या पूर्वजन्मसंचितांचे गुलाम. इतरांसाठी श्रम करणारापण गतजन्मीच्या पापांचा गुलाम तर इतरांचे श्रम फुकट लाटणारापण गतजन्मीच्या पुण्याचा गुलाम. 👌👌

    ReplyDelete