Sunday, April 2, 2017

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)



आगमन निर्गमन आणि पुनरागमन ह्या तीन संकल्पना आपण कुठल्याही समाजाला किंवा असामान्य आणि सामान्य व्यक्तींच्या आयुष्याला लावून पाहू शकतो. जेव्हा समाज किंवा व्यक्ती आगमन, निर्गमन किंवा पुनरागमानापैकी कुठल्याही एका वादळात सापडतात तेव्हा त्या वादळाला त्यांनी ज्या प्रकारे तोंड दिले त्यावरून त्यांचा भविष्यकाळ ठरतो.

आगमन म्हणजे आक्रमण नव्हे. आक्रमण ही एक लष्करी चाल आहे. याउलट आगमन म्हणजे प्रस्थापित मोठ्या लोकसमूहात आलेले नवीन विचार. हे नवीन विचार समूहांतर्गत घटकांकडून येऊ शकतात किंवा समूहबाह्य व्यक्तींकडूनदेखील येऊ शकतात. निर्गमन म्हणजे अश्या प्रस्थापित मोठ्या लोकसमूहातील काही व्यक्तींचे बहिर्गमन आणि त्या अनुषंगाने जेत्यांच्या समाजातील विचारांशी, त्यांची झालेली झटापट. तर पुनरागमन म्हणजे अश्या बहिर्गमीत व्यक्तींचे त्यांच्या स्वतःच्या प्रस्थापित समूहात पुन्हा झालेले आगमन आणि त्यामुळे व्यक्ती आणि समाज या दोघांची होणारी वैचारिक ससेहोलपट. माझे वाचन अपुरे आहे पण माझ्या माहितीप्रमाणे ही तिन्ही वादळे एकाच समुदायात घडूनही तो समाज टिकून असण्याचे भारत हे एकमेव उदाहरण आहे. बाकीचे कित्येक समाज यापैकी कुठल्यातरी एका वादळात समूळ नष्ट झालेले आहेत.

माणूस ही निसर्गाची निर्मिती आहे. गुंतागुंतीचे मानवी समाज ही मात्र मानवी विचारांची निर्मिती आहे. कुठलाही मानवी समुदाय धार्मिक, आर्थिक आणि राजकीय आधारस्तंभांवर उभा असतो. आणि या तिघांवरही सातत्याने नवीन विचारांचे किंवा नव्या बाटलीत जुनीच दारू अश्या प्रकारे जुन्या विचारांचे आगमन होताना दिसते. त्यात कधी आगमनकर्ता नवा विचार तर कधी जुनी समाजव्यवस्था विजेती झालेली दिसते.

धार्मिक विचारांचा मागोवा घेतला तर असे जाणवते की, जिज्ञासू असणारे सर्वजण चिकित्सक असतीलच खात्री देता नाही. त्यामुळे आस्तिक असणे ही जणू सर्व माणसांची नैसर्गिक स्थिती आहे. परिणामी वेगवेगळ्या स्वरूपात आलेल्या आस्तिक विचारांना मान्य करणे मानवी समाजांना शक्य झालेले आहे. पण आस्तिकतेच्या खुळचटपणाला ओळखून नास्तिक विचारांचे आगमन कुठल्याही काळात झाल्यास ते मात्र तितके प्रभावी झालेले नाही. म्हणजे नास्तिकांच्या समाजात आस्तिक विचारांचे आगमन किंवा एका प्रकारे आस्तिक असणाऱ्या समाजात दुसऱ्या देवाचे किंवा पूजा पद्धतीचे आगमन मोठ्या प्रमाणात यशस्वी होते. पण आस्तिकांच्या समाजात नास्तिक विचारांचे आगमन मात्र अल्पजीवी ठरते. चार्वाक दर्शनांसारख्या दर्शनांचा क्रूर मृत्यू, अत्त दीपो भव म्हणणाऱ्या बुद्धाच्या धर्मात मूर्तिपूजाप्रधान महायान पंथाचा उदय आणि एकेश्वरवादी अब्राहमीक धर्मांचा जगावरील गेल्या दोन हजार वर्षांचा प्रभाव, या सर्व गोष्टी मानवी मनाच्या आस्तिक्यप्रेमी असण्याचे द्योतक आहेत असे मला वाटते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास आगमन करणारा विचार जर आस्तिक्याचा उद्घोष करणारा असेल तर तो जिंकतो, याउलट आगमन जर नास्तिक्याचे असेल तर प्रस्थापित समाज त्याला दडपण्यात यशस्वी होतो, असे इतिहास सांगतो.

ज्यू जरी एकेश्वरवादी असले तरी समतावादी नाहीत. याउलट ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांचे धर्म केवळ एकेश्वरवादी नसून समतावादी आहेत. हे एकेश्वरवादी आणि समतावादी धर्म थोड्याच काळात अस्थिर होऊ लागतात. ‘सगळेच समान तर मग कोणाची इच्छा बलवान आणि इतरांसाठी शिरोधार्य?’ हा प्रश्न मोठा गुंतागुंतीचा आहे आणि गेल्या दोन हजार वर्षात त्याला उत्तर सापडलेले नाही. त्यामुळे त्या प्रश्नाला बगल देत या दोन्ही धर्मांनी धर्मांतरातून विस्तारवाद हे तत्व स्वीकारले आहे. त्यातूनच या दोन्ही धर्मविचारांचे जगाच्या कानाकोपऱ्यात आगमन झाले. आणि त्यांच्यापुढे (भारतीय समाज सोडता) अनेकेश्वरवादी धर्मांनी सपशेल शरणागती पत्करली.

आर्थिक विचारांचा मागोवा घेतला तर त्यातही आस्तिक नास्तिक प्रमाणे उत्पादन आणि खाजगीमालमत्ताकेंद्री व्यवस्था विरुद्ध वितरण आणि सामाजिकमलमत्ताकेंद्री व्यवस्था असे दोन विचार प्रवाह दिसून येतात.

मूत्रविसर्जन करून एखादे क्षेत्र आपल्या अधिपत्याखाली आहे हे दर्शविणाऱ्या वाघ - सिंहाप्रमाणे खाजगी मालमत्ता बाळगणे ही माणसांची सहजप्रवृत्ती आहे असे आपल्याला वाटत असले तरी खाजगी मालमत्तेचा आकार आणि तिच्यात काय काय अंतर्भूत असायला हवे याबाबत व्यक्तींची मते वेगवेगळी असतात. इतकेच काय, वयोमानापरत्वे या बाबतीतील एकाच व्यक्तीची मतेदेखील बदलताना आढळतात. त्यामुळे जो आर्थिक विचार एकाच वेळी माणसांतील या दोन्ही प्रवृत्तीना व्यवस्थितरित्या सामावून घेऊ शकतो तोच विजयी होऊ शकतो. सध्याचे आर्थिक विचार, मानवी स्वभावातील या असमानता आणि अनित्यतेला सामावून घेऊ शकणारे नसल्याने ते एकमेकांच्या प्रदेशात आगमन करीत आहेत आणि एकमेकांसोबत स्वतःला परिपूर्ण करून घेत आहेत असे माझे मत आहे.

ढोबळमानाने असे म्हणता येईल की अभावग्रस्त समाजात प्रथम वितरण आणि सामाजिक मालमत्ताकेंद्री विचारांचे आगमन यशस्वी होते. समूहशक्तीतून उत्पादनवाढ झाल्यास तिथे उत्पादन आणि खाजगी मालमत्ताकेंद्री विचारांचे आगमन होते आणि ते यशस्वीदेखील होते. खाजगी मालमत्तेच्या अधिकाराचा अतिरेक झाला आणि राजकीय विचारांचे आकृतीबंध, मूठभर लोकांच्या हातात एकवटलेला खाजगी मालमत्तेचा हा डोलारा सांभाळण्यास कमी पडू लागले की लोकांना हे मूठभर धनिक नकोसे होतात. मग खरे तर सामाजिक मालमत्तेच्या विचारांचे आगमन व्हायला हवे पण तसे न होता केवळ खाजगी मालमत्तेला विरोधाचा मुखवटा घातलेल्या क्रांतीविचारांचे आगमन होते. ते सध्याच्या प्रस्थापितांना हलवून इतरांनी प्रस्थापित होण्याचा मार्ग सुकर करते.

याउलट मुबलकता असलेल्या समूहात, वितरण आणि सामाजिक मालमत्ताकेंद्री विचारांचे आगमन तितकेसे यशस्वी होत नाही. कारण अभावाच्या पातळीपासून थोडे दूर मुबलकतेच्या दिशेने गेल्यावर खाजगी मालमत्तेचे आकर्षण अधिक जोरदार असते.
ज्या समाजात पशुशक्ती, यंत्रशक्ती आणि औद्योगिकीकरण होते त्यांचे उत्पादन उपभोगाच्या तुलनेत वाढून विक्रीसाठी स्थलांतर आवश्यक होते. अश्या समाजात व्यक्तींनी एकत्र येण्याचे नवनवे मार्ग शोधले जातात आणि मग या व्यक्तीसमूहांच्या लालसेचे इतर अप्रगत समाजात जेव्हा आगमन होते तेव्हा हे इतर समाज अक्षरशः मोडकळीस येतात. अमेरिकेतील रेड इंडियन्स, पेरूतील इंका, आफ्रिकेतील नीग्रो, न्यूझीलंडमधील माओरी किंवा ऑस्ट्रेलियातील अबॉरिजिनल लोकांच्या समाजात व्यापारी संस्कृतीच्या आगमनाने झालेली पडझड त्याचेच उदाहरण आहे.

राजकीय विचारांचा मागोवा घेतला तर असे दिसते की माणूस एकटा असताना व्यक्तिकेंद्री असतो. जेव्हा तो समूहात जातो तेव्हाही तो व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असतो मात्र समूहातील इतरांचे कुणीतरी नियंत्रण करावे असे त्याला तीव्रतेने वाटते. स्वतःच्या स्वातंत्र्याला जपण्यासाठी इतरांचे व्यक्तीस्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणात किंवा संपूर्णपणे हिरावून घेणे त्याला अयोग्य वाटत नाही. त्यामुळे त्याला एकाच वेळी त्याच्या मताचा आदर करणारी लोकशाही आणि इतरांच्या मताला उडवून लावणारी राजेशाही या दोघींचे आकर्षण असते.
आर्थिक विचारांप्रमाणे राजकीय विचार देखील प्रथम समाजकेंद्रीत आणि नंतर व्यक्तिकेंद्रित होत जाताना दिसतात. आणि समाजकेंद्रीत व्यवस्था जेव्हा आर्थिक गर्तेत व्यक्तिकेंद्रित व्यवस्था विचारांचे तिथे आगमन सुकर होते. याउलट व्यक्तिकेंद्रित व्यवस्थांमध्ये जेव्हा स्वातंत्र्याचा लोप होतो तेव्हा समाजकेंद्रीत व्यवस्था विचारांचे तिथे आगमन होण्याचा मार्ग प्रशस्त होतो.

राजकीय विचार म्हणजे ‘इतरांच्या नकळत आपले विचार त्यांच्यावर लादण्याची व्यवस्था’ असल्याने त्यात अधिकारांचे वाटप समान रीतीने होत नाही. उलट अधिकारवाटपाच्या वेळी लिंगभेद, वर्णभेद, वंशभेद, जातीभेद, आर्थिक स्तरभेद अश्या वेगेवगेळ्या भेदविचारांचे त्या व्यवस्थेत आगमन होत असते. तसेच अधिकारांचे हस्तांतरण होत असताना घराणेशाही, भाऊबंदकी, रक्तपात, उठाव या विचारांचे आगमन होताना दिसते. सध्याच्या लोकशाहीने रक्तपात आणि सशस्त्र उठाव हे मार्ग जवळपास नष्ट केले असले तरी अधिकारांचे हस्तांतरण होत असताना; घराणेशाही, भाऊबंदकी आणि वैचारिक अनागोंदीचे आगमन रोखणे लोकशाहीला शक्य झालेले नाही. त्यामुळे लोकशाहीलासुद्धा अधिकारांच्या हस्तांतरणाच्या प्रत्येक प्रसंगी सामूहिक भ्रम, उन्माद, मनगटशाही आणि आर्थिक मुजोरी या सर्वांच्या आगमनाला सामोरे लागते.

लोकशाही परिपूर्ण राजकीय व्यवस्था नाही. लोकशाहीच्या बुरख्याआडून कधी धनदांडगे, कधी धर्मवादी, कधी जातीवादी, कधी प्रांतवादी, कधी वंशवादी तर कधी द्वेषवादी विचार सत्तेवर येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे लोकशाही विचाराचे सध्याचे स्वरूप परिपूर्ण नसल्याने अधिकार वाटप आणि हस्तांतरणाच्या वेळी तिच्यात इतर राजकीय व्यवस्थांतील विचारांचे आगमन होत राहाते.

कित्येकदा बहुसंख्यांच्या अपुऱ्या विचारक्षमतेचा फटका बसून कार्यक्षम व्यक्तीना आणि समाजोपयोगी विचारांना जास्त काळ अडगळीत पडून राहावे लागू शकते. असे असले तरी प्रत्येक विचाराला पुढे येण्याची, बहुमताच्या रूपाने क्रिटिकल मास उत्पन्न करण्याची, त्यायोगे स्वतःला राबवण्याची जी क्षमता लोकशाही देते तशी किंवा त्यापेक्षा सरस क्षमता देण्याची शक्ती इतर कुठल्याही व्यवस्थेत नसल्याने लोकशाही विचाराचे जवळपास साऱ्या जगात आगमन झालेले आहे आणि जिथे ते झालेले नाही तेथील जनता ते लवकरच घडवून आणेल याची मला खात्री आहे. बहुसंख्येच्या बाजूने निसर्ग देखील झुकतो त्या अर्थाने इतर कुठल्याही व्यवस्थेपेक्षा लोकशाही अधिक नैसर्गिक आहे.
आगमन संकल्पनेत नव्या विचाराविरूध्द समग्र समाजाची लढाई चालू असते. त्यामुळे त्यात विविध व्यक्तींचे विविध अनुभव असतात. काही व्यक्ती नव्याचे स्वागत स्वार्थभावाने काही उदात्तभावाने तर काही जण अबोधपणे करत असतात. काहीजण त्याच स्वार्थ किंवा उदात्त किंवा अबोधभावाने नव्याचा विरोध करत असतात आणि बहुतांश समाज उदासीनतेने तटस्थ असतो. आगमन अयशस्वी झाले तर जेता समाज त्याला राक्षसांचे आक्रमण म्हणून रंगवतो आणि ते यशस्वी झाले तर जेता विचार जित समाजातील संघर्षाला इतिहासात स्थान मिळू देत नाहीत. त्यामुळे आगमनाच्या प्रसंगांशी व्यक्तीच्या आणि तथ्यांच्या पातळीवर एकरूप होणे कठीण असते. त्यामुळे हा भाग लिहिताना मलादेखील अंधारात चाचपडल्यासारखे होत होते.

यज्ञप्रधान आणि बळीप्रथा मानणाऱ्या संस्कृतीत अहिंसेचे तत्वज्ञान मांडणाऱ्या जैन विचारांचे आगमन, पुनर्जन्म आणि पुण्याच्या चक्रात फिरणाऱ्या हिंदू समाजाला मृत्यूनंतरच्या प्रवासाकडे दुर्लक्ष करायला लावून तृष्णेभोवती जीवनाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या बौद्ध विचारांचे आगमन, सिध्दार्थाच्या, विठ्ठलपंतांच्या, तुकारामांच्या आयुष्यात झालेलं वैराग्याचं आगमन. मूर्तीपूजक भारतीयांच्या आयुष्यात मूर्तीभंजक इस्लामचे आगमन, खुल्क खुदाका मुल्क बादशहाका म्हणण्यात धन्यता मानणाऱ्या मराठी वतनदारांत शहाजीराजे जिजाऊसाहेब आणि शिवबांच्या रूपाने स्वराज्याचे आगमन, रोटीबेटी व्यवहारातही स्पृश्यास्पृश्यता पाळणाऱ्या भारतीयांच्यात येशूचा प्रेमाचा संदेश घेऊन येणाऱ्या आणि विहिरीत पाव टाकून धर्म बाटवणाऱ्या युरोपियनांचे आगमन, अमानुष सतीप्रथा पाळणाऱ्या भारतात राम मोहन रॉय यांच्या नवविचारांचे आगमन, सोवळ्यातल्या विधवांच्या दयनीय आयुष्यात विधवा विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या महर्षी कर्व्यांचे आगमन, शिक्षणाचा हक्क केवळ जातींपुरता मर्यादित असलेल्या समाजात स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांचे आगमन या साऱ्या घटनांतून आपण आगमनाचे स्वरूप समजून घेऊ शकतो.

मराठीतील, ह. ना. आपटेंची 'पण लक्ष्यात कोण घेतो', पडघवली ही गोनीदांची, खानोलकरांच्या आणि पेंडश्यांच्या कादंबऱ्या, त्याशिवाय विनोदी अंगाने लिहिलेले पुलंचे बटाट्याची चाळ किंवा जयवंत दळवींचे सारे प्रवासी घडीचे ही पुस्तके; कन्नडमधील भैरप्पांची वंशवृक्ष, अनंतमूर्तीची संस्कार आणि कारंथांची डोंगराएव्हढा या कादंबऱ्या; मी वाचलेल्या साहित्यात मला आगमनाचे प्रवाह टिपणाऱ्या वाटतात.

1 comment:

  1. Class! या मालिकेतला आतापर्यंतचा बेस्ट भाग.
    पुढे वाचते.

    ReplyDelete