माझ्या आयुष्यात कन्नड साहित्य उशीरा आले. तोपर्यंत मराठी साहित्याने माझ्या मनावर गारूड केले होते. (इथे साहित्य हा शब्द मी कथा आणि कादंबरी इतक्या मर्यादित अर्थानेच वापरला आहे. त्यात वैचारिक लेखन गृहीत धरलेले नाही.) पण उशीरा येऊनसुद्धा एकमात्र स्पष्ट जाणवले की मी वाचलेले कन्नड साहित्य मी वाचलेल्या मराठी साहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. बहुतांश मराठी कादंबऱ्या मला व्यक्ती आणि निसर्ग किंवा व्यक्ती आणि व्यक्ती किंवा व्यक्ती आणि त्याचा समाज यांच्यापैकी कुठल्यातरी एकाच नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या वाटल्या. पण एकाच वेळी इतिहास आणि वर्तमान, व्यक्ती आणि समग्र समाज, भावना आणि तत्त्वविचार, पुराण आणि विज्ञान, लैंगिकता आणि अध्यात्मिकता; या सगळ्यांना कवेत घेण्याची कन्नड कादंबऱ्यांची क्षमता मी वाचलेल्या मराठी कादंबऱ्यांपेक्षा जास्त आहे असे मला वाटते.
माझ्या तोकड्या दृष्टीने केलेल्या निरीक्षणाप्रमाणे; कदाचित कन्नड समाजातील प्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे. त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्याचा वाचकवर्ग सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून येतो. याउलट मराठीत मात्र विविध स्तरांतील लोकांनी आपापले साहित्य तयार केले आहे. त्यामुळे ब्राह्मणी साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य असे भेद मराठी साहित्यात मोठे होत जाऊन जुने आणि नवे असे दोन ठळक प्रवाह दिसून येण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह दिसून येतात. परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.
चंपूकाव्य परंपरा सोडून कन्नड साहित्याने नवता धारण करताना जी सफाई दाखवली आहे तितक्या सफाईने मराठीला संत, पंत आणि तंतसाहित्याचा प्रभाव मोडून काढणे शक्य झालेले नाही. त्याशिवाय कन्नड साहित्यिक जितक्या ठळकपणे सामाजिक आणि राजकीय भूमिका घेतात तितक्या ठळकपणे सामाजिक आणि राजकीय भूमिका घेताना मला मराठी साहित्यिक दिसत नाहीत. आणि या ठळक भूमिकेच्या अभावाने तिचा आग्रह धरणे किंवा पाठपुरावा करणे दूरच राहते.
मराठी साहित्याच्या तुलनेत कन्नड साहित्याचे आणि त्याला मिळालेल्या लोकाश्रयाचे मला जाणवलेले हे गुणविशेष डोक्यात असताना, प्रो टी पी अशोक यांनी भारतीपूरसाठी लिहिलेली प्रस्तावना वाचली. ती वाचताना, 'प्रोफेसर' ही उपाधी मिळवण्यासाठी विचारांची स्पष्टता किती असावी आणि ते सहजपणे मांडण्याची हातोटी कशी असावी याचा वस्तुपाठच मिळाला. कन्नड साहित्यातील नव्य किंवा नव्योदय चळवळीबाबत लिहिताना प्रो अशोक यांनी “आगमन, निर्गमन आणि पुनरागमन” हे सूत्र मांडले आहे. प्रो. अशोकांच्या मते कन्नड साहित्यातील नव्योदयाच्या प्रवाहात तीन वेगवेगळे प्रवाह एकामागून एक येताना दिसतात. त्यांना ते अनुक्रमे “आगमन, निर्गमन आणि पुनरागमन” म्हणतात. या तिन्ही संज्ञांबाबत प्रो. अशोकांनी अगदी थोडक्यात विवेचन केले आहे पण ते वाचून माझ्या मनात जे विचार आले ते आता लिहितो.
No comments:
Post a Comment