क्रौर्य; स्थल, काल आणि व्यक्तिसापेक्ष असावं, आणि क्रौर्य ही निसर्गदत्त स्वाभाविक गोष्ट नसून तो मानवी मनाचा खेळ असावा, हा निष्कर्ष मान्य करूनही मला तो पूर्णपणे पटत नाही. कारण या निष्कर्षातली व्यक्ती कोण ते आपल्या मनात पूर्णपणे स्पष्ट नसतं.
क्रौर्याच्या बाबतीत मला तीन गट दिसतात. पहिल्या गटात ज्याने कृती केली ती व्यक्ती, प्राणी, समाज किंवा व्यवस्था येतात. आपण या गटाला ‘कर्त्यांचा गट’ म्हणूया. दुसऱ्या गटात ज्यांच्याविरुद्ध ती कृती घडली ती व्यक्ती, प्राणी, समाज किंवा व्यवस्था येतात. आपण या गटाला ‘बळींचा गट’ म्हणूया. आणि शेवटी असतो, ‘तटस्थ निरीक्षकांचा’ तिसरा गट. (जर कर्ता, बळी आणि निरीक्षक समकालीन असतील तर तटस्थ निरीक्षक हा केवळ काल्पनिक गट असतो हे मान्य करूनही हा तिसरा गट मला महत्वाचा वाटतो. कारण जेंव्हा प्रश्न अस्मितांचा नसतो तेंव्हा गतकालीन घटनांबद्दल तटस्थ राहणे, किमान काही लोकांना तरी शक्य असते.)
जर आपण क्रौर्याची व्याख्या, 'कर्तासापेक्ष' करणार असू तर प्रत्येक वर्तनाची संगती सांगू शकत असल्याने कुठलेच वर्तन क्रूर ठरणार नाही. जर ती 'बळीसापेक्ष' करणार असू तर कर्त्यांचे प्रत्येक वर्तन क्रूरच भासेल. आणि जर ती 'निरीक्षकसापेक्ष' करणार असू तर आपल्याला क्रौर्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचता येणार नाही. कारण एकंच वर्तन एकाच वेळी दोन निरीक्षकांना, किंवा दोन वेगवेगळ्या वेळी एकाच निरीक्षकाला, किंवा दोन वेगवेगळ्या स्थळांवर घडताना, दोन वेगवेगळ्या वस्तूंबाबत, जीवांबाबत घडताना; आत्यंतिक क्रूर किंवा त्यात क्रौर्याचा अंशदेखील नाही असे त्या निरीक्षकाचे मत होऊ शकते.
म्हणून क्रौर्याची व्याख्या करताना व्यक्तीसापेक्ष क्रौर्य मान्य करूनही तिथेच न थांबता, मी विचारांबरोबर पुढे जायला तयार होतो. कारण माझ्या मते स्थल, काल आणि व्यक्तीनिरपेक्ष क्रौर्य देखील अस्तित्वात असतं. ते हिंसेतून जन्माला येऊ शकतं आणि ते हिंसेशिवायदेखील जन्माला येऊ शकतं.
चौथ्या भागात, माणसासकट सर्व प्राण्यांत हिंसेमागे काम, भय आणि भूक या प्रेरणा काम करता असतात. शिकारी प्राण्यांमधेतर हिंसा एक स्वयंसिद्ध नैसर्गिक प्रेरणा म्हणूनदेखील प्रकट होते असा मुद्दा मी मांडला होता. आपल्या सर्वसाधारण समजुतीप्रमाणे हिंसा शब्द परपीडनाशी जोडला गेलेला असतो. म्हणून प्रथम, या परपीडनात्मक हिंसेचा आणि क्रौर्याचा मला जाणवलेला संबंध सांगतो, मग आत्मपीडनात्मक हिंसेचा आणि क्रौर्याचा संबंध सांगतो आणि मग हिंसेशिवाय उद्भवणारे क्रौर्य मला कसे जाणवते ते सांगतो.
सर्व प्राण्यांचे खाद्यसाखळीतील स्थान निसर्गदत्त आहे. अनेक प्राण्यांना, मांसाहार की शाकाहार अशी निवड करावी लागत नाही. त्यांच्यासाठीची निवड निसर्गाने आधीपासून करून ठेवलेली असते. जे प्राणी सर्वाहारी (सर्वभक्षी) असतात ते आपल्या सर्वभक्षी असण्याबद्दल संतुष्ट किंवा असंतुष्ट दिसत नाहीत. आपल्याला आहाराची निवड करावी लागते आहे. आपण कधी शाकाहारी तर कधी मांसाहारी असल्याने आपल्या वागण्यात विसंगती दिसते, आपल्याबद्दल कुठलेही आडाखे बांधता येत नाहीत, याबद्दल ते आनंदी किंवा दुःखी होत नाहीत. आपले निसर्गदत्त सर्वभक्षीपण, शिकारीपण त्यांनी स्वीकारलेले असते. किंबहुना, ते अस्वीकार करता येऊ शकते का? करावे का? कसे करावे? का करावे? याची त्यांना जाणीवसुद्धा नसते. प्रयोजनशून्य आयुष्याचा स्वीकार त्यांच्याकडून आपोआप केला जातो. स्वसंवेद्य काळाची जाणीव नसल्याने, कंटाळा त्यांना अनंत न भासता सांत वाटत असावा आणि त्याला घालवण्यासाठीची त्यांची आनंदाची शोधयात्रा फारच लुटुपुटुच्या गोष्टींत संपत असावी. परिणामी त्यांना हिंसेत आनंद शोधावा लागत नसावा.
पण माणसाची मात्र निसर्गाने गडबड करून ठेवली आहे. त्याची शरीररचना मांसाहार आणि शाकाहार या दोन्ही गोष्टीसाठी सोयीस्कर आहे. याचा अर्थ त्याने शाकाहारच करावा किंवा मांसाहारच करावा असा निर्णय निसर्गाने त्याच्या बाबतीत करून न ठेवता त्याला निवडीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्याची मूळ प्रवृत्ती झाडावरून पडलेली फळे खाण्याची आहे आणि त्याचबरोबर जिवंत प्राण्याची शिकार करण्याची देखील आहे. त्यामुळे भूक नसताना, केवळ शिकार करण्याची सवय परिष्कृत करण्यासाठी हिंसा करणे ही देखील माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे. यामुळे तो स्वजातीय किंवा अन्यजातीय, खाद्य किंवा अखाद्य प्राण्यांची हत्या केवळ नैसर्गिक अंतःप्रेरणेने करू शकतो. अश्या हिंसेत मला क्रौर्य दिसत नाही.
परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे माणसाला स्वसंवेद्य काळाची जाणीव होत असल्याने, अनंत कंटाळ्यापासून दूर जाण्याची त्याची धडपड चालूच रहाते. संगीत, अभिनय, चित्र, शिल्प, नृत्य या कलांमधून मिळणारा आनंद वैश्विक असला तरी तो उपभोगण्यासाठी मनाची, शरीराची आणि परिस्थितीची अनुकूलता लागते. त्यामुळे या कलांमधून आनंद घेण्यात मर्यादा येतात. म्हणून मग जे जे शक्य आहे त्यातून आनंद मिळवण्याची माणसाची धडपड चालू होते. त्यात सर्वात प्रबळ असते ती काम प्रेरणा आणि भूकेची प्रेरणा. या दोघांच्या तृप्तीमधून माणसाला काही काळापुरता आनंद मिळतो. काम आणि भुकेचे शमन केल्यावर मिळणाऱ्या आनंदाच्या अनुभूतीसाठी चित्र, शिल्प, अभिनय, संगीत, नृत्य इत्यादी कलांइतके शरीराचे, मनाचे आणि परिस्थितीचे अनुकूलन लागत नाही. त्यात शारीर इच्छांची देखील पूर्ती होते. आणि हा आनंद घेण्यासाठी आनंदसाधनेतील तज्ञ असण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे इतर कलांपेक्षा कामशांती आणि क्षुधाशांतीचा आनंद स्वस्तात मस्त या धर्तीवरचा ठरतो. तो हवाहवासा तर असतोच. आणि तो मानसिक गरजेबरोबर शारीरिक गरजेतून येत असल्याने त्याची वारंवारता वाढते. यातूनच मग नैसर्गिकरित्या शिकारी असलेल्या माणसाकडून, स्वसंरक्षण, भूक किंवा अंतःप्रेरणेपोटी केलेल्या हिंसेच्या जागी सुरु होते आनंदासाठी केलेली हिंसा. ही इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळी असल्याने, या परपीडादायी हिंसेत क्रौर्य प्रथम जन्माला येते, असे मला वाटते.
No comments:
Post a Comment