Monday, January 9, 2017

आनंद आणि क्रौर्य (भाग ४)



संगीत, नृत्य, अभिनय, लेखन, वाचन, चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलांच्या प्रकटनातून किंवा त्यांच्या रसास्वादातून आपण एकरेषीय काळाला विसरून जाऊ शकतो आणि एकमेकांना चिकटून नसलेल्या काळबिंदूना अनुभवू शकतो. या कलांमुळे आपली सूर्यसापेक्ष एकरेषीय काळाची जाणीव हरपते आणि आपण स्वसंवेद्य काळाला अनुभवू शकतो. आपल्याला अवर्णीय आनंदाचा प्रत्यय येतो. एकरेषीय काळ कसा भुर्र्कन उडून गेला ते जाणवून हा आनंद आपल्याला अजून हवाहवासा वाटतो. आनंद  मिळवण्याचे हे प्रकार समाजमान्य असल्याने आपल्याला हा आनंद योग्य वाटतो. पण योग्य अयोग्य ही मानवी मूल्य आहेत आणि   आनंद ही मूल्यनिरपेक्ष जाणीव आहे. त्यामुळे ज्याला समाजाने निषिद्ध मानले किंवा विघातक मानले त्या गोष्टींमधूनदेखील कालजयी आनंदाचा प्रत्यय येऊ शकतो. अमली पदार्थांचे सेवन करणारे कित्येकदा कालातीत होणे अनुभवण्याचे वर्णन करतात आणि पुनःपुन्हा तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे समाजाने निषिद्ध किंवा अयोग्य मानलेल्या गोष्टीतही एकरेषीय काळ विसरवून टाकण्याचे सामर्थ्य असते. आपण या आनंदाला मान्य करतो, त्याला अयोग्य ठरवतो पण त्याला क्रौर्याचा जनक मानत नाही.

आपल्या लेखी क्रौर्याची सुरवात हिंसेतून होते. जेंव्हा  इंग्लिश इतिहासकार James Froude म्हणतो, "Wild animals never kill for sport. Man is the only one to whom the torture and death of his fellow creatures is amusing in itself." किंवा अमेरिकन लेखक Mark Twain म्हणतो, "Of all the creatures [man]...is the only one--the solitary one--that possesses malice....He is the only creature that inflicts pain for sport, knowing it to be pain...all creatures kill...man is the only one...that kills in malice, the only one that kills for revenge." तेंव्हा हे आपल्या मनातील क्रौर्याच्या व्याख्येच्या जवळ जाणारे असते. (यातील James Froude साहेबांचे म्हणणे नंतर झालेल्या शास्त्रीय संशोधनामुळे चुकीचे ठरले.)

सर्व प्राणी हिंसक वर्तन करू शकतात. शाकाहारी प्राण्यांच्या हिंसक वर्तनामागे प्रदेशावर, मादींवर किंवा कळपावर स्वामित्व दाखवण्याची गरज आणि प्रजनन काळात आपण सुयोग्य नर आहोत हे दाखवणे या नैसर्गिक प्रेरणा असतात. यासाठी ते स्वजातीमधील आणि परजातीमधील प्राण्यांवर हिंसक हल्ला करू शकतात. याचा अर्थ शाकाहारी प्राण्यांत दिसून येणारी हिंसा स्वयंसिद्ध अशी नैसर्गिक प्रेरणा नसून ती काम आणि भय या मूळ प्रेरणांचा प्रकट आविष्कार आहे.

मांसाहारी प्राण्यांच्या हिंसक वर्तनामागे वरील सर्व कारणांबरोबर भूक ही अजून एक महत्वाची प्रेरणा असते. पण याचा अर्थ असा नव्हे की मांसाहारी प्राणी भूक नसल्यास हिंसा करीत नाहीत. मुंग्यांच्या काही जाती इतर मुंग्यांच्या वसाहतींवर युद्ध म्हणता येईल असे आक्रमण करतात आणि त्यांना एकतर मृत्यू किंवा गुलामी हे दोनच पर्याय देतात. पोलर बेअर (ध्रुवीय अस्वल) भूक नसतानादेखील सार्डीन माश्यांची कत्तल करते. मानवाला जवळचे चिंपांझी किंवा जलचरांतील डॉल्फिन मासे देखील कित्येकदा खाद्य नसलेल्या इतर प्राण्यांची किंवा आपल्याच टोळीतील नवजात अर्भकांची हत्या करताना दिसतात. कळपात राहणारे कुत्रे, लांडगे, कोल्हे, तरस यांच्यासारखे श्वान कुळातील प्राणी; किंवा वाघ, सिंहांसारखे जंगली तर मांजरीसारखे मार्जार कुळातील पाळीव प्राणी देखील भूक नसताना केवळ अंतःप्रेरणांमुळे हिंसा करताना आढळतात. कदाचित शिकार करण्याची सवय अजून परिष्कृत करणे ही त्यांच्या भूक नसताना केलेल्या शिकारीच्या मागील प्रेरणा असावी.  म्हणजे मांसाहारी प्राण्यांत हिंसक वर्तनामागे कामप्रेरणा, किंवा भय किंवा भूक या प्रेरणा काम करताना दिसतातच, याशिवाय हिंसा एक स्वयंसिद्ध नैसर्गिक प्रेरणा म्हणूनदेखील प्रकट होते.  म्हणजे मानवेतर प्राणी आनंदासाठी हिंसा करत असतील असा निष्कर्ष काढता येत नाही.

आता आपण माणसांकडे वळूया. खाद्यसाखळीत माणसाला स्वतःचे निसर्गदत्त स्थान नाही. तो सर्वाहारी असल्याने त्याचा मांसाहार अनैसर्गिक नाही.  याबरोबरच नैसर्गिक प्रेरणांशिवाय स्वतःची मूल्यव्यवस्था उभारणारा आणि त्यानुसार नैसर्गिक वर्तनातदेखील योग्य अयोग्य काय? ते ठरवणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. माणसाची सगळी मूल्यव्यवस्था त्याला पशूंपासून वेगळे होण्यास शिकवणारी आहे. आपण केलेल्या मूल्यव्यवस्थेच्या नियमांप्रमाणे एखाद्याचे वर्तन निंदनीय असेल तर आपण त्याचे वर्णन पशुतुल्य किंवा पाशवी वर्तन असेच करतो. त्यामुळे आपल्याला पशूंपासून वेगळे दाखवण्याच्या नादात, सर्वाहारी माणसाला शाकाहार हे उच्च मूल्य वाटते. आणि भुकेसाठी केलेली हिंसादेखील माणसाला क्रूर वाटू लागते.

खाद्यसाखळीशिवाय इतर प्राण्यांना निसर्गात आपले स्थान काय याबद्दल चिंता नसते. पण माणसाला मात्र निसर्गाच्या केंद्रस्थानी किंवा शीर्षस्थानी स्वतःला पाहायला आवडते. त्यातून मग भूक नसताना, शाकाहार उच्च मूल्य मानणारी माणसे शिकार करायला लागतात.आपल्या शिकारीची मिळकत दिवाणखान्यात टांगतात. ही शिकार मग खेळात बदलते. चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, लेखन, वाचन, अभिनय याबरोबरच वेळ घालवण्यासाठी माणूस शिकार करतो.  आणि माणसाला हिंसेतून आनंद मिळतो असे दिसू लागते. मग तो आनंदासाठी हिंसा करतो असे वाटू लागते. अश्या तऱ्हेने आधी हिंसेतून आनंद मग आनंदासाठी हिंसा असे चक्र सुरु होते. जेंव्हा या चक्राचा आनंदासाठी हिंसा हा भाग सुरु होतो, तेंव्हा मानवी मूल्यव्यवस्थेला मोठा धक्का बसतो आणि या आनंदासाठी केलेल्या हिंसेला आपण क्रौर्याचे नाव देतो.

मानवी हिंसा केवळ इतर प्राण्यांकडे रोखलेली नसते, तर ती इतर मानवांकडेदेखील रोखलेली असते. स्वामित्वभाव त्याला इतरांप्रती हिंसक करतो. आणि त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबियांच्या किंवा त्याच्या मालमत्तेच्या बाबतीत पूर्वी घडून गेलेली हिंसा त्याला भविष्यकाळात सूड घेण्यास उद्युक्त करते. म्हणजे माणसासाठी पूर्वी घडून गेलेली हिंसा येणाऱ्या हिंसेचे कारण बनू शकते. अशी सूडातून उद्भवणारी हिंसा क्षुधाशांती, खेळ किंवा आनंदासाठी नसून मनःशांतीसाठी असते, त्यामुळे तिची तीव्रता आणि तिचे स्वरूप भयावह असते. ही हिंसा आपोआप क्रूर वाटते.

म्हणजे आनंदासाठी किंवा सूडासाठी केलेल्या हिंसेला आपण अयोग्य ठरवतो आणि त्याहून पुढे जाऊन आपल्याला अश्या हिंसेत क्रौर्याचा उगम दिसतो. हे समजायला सोपे असले तरी माझ्या मते यात क्रौर्याचे संपूर्ण स्वरूप ओळखण्यात आपण कमी पडतो आहोत.

No comments:

Post a Comment