प्राणी सुखी असतात किंवा दुःखी. माणूस सुखी किंवा दुःखी असण्याबरोबरच आनंदी किंवा कंटाळलेला देखील असू शकतो. माझ्या दृष्टीने सुख आणि दुःख या कल्पना शरीराशी निगडीत आहेत तर आनंद आणि कंटाळा या कल्पना वेळेशी जोडल्या गेलेल्या मनाशी संबंधित आहेत.
प्राण्यांना काळवेळेची जाणीव असली तरी कालप्रवाहाची जाणीव नसावी. म्हणजे सूर्याच्या स्थितीप्रमाणे बदलणारी वेळ त्यांना जाणवत असणारंच. खोल समुद्राच्या अंधारात जन्माला येऊन तिथेच मरणाऱ्या काही जलचरांना सोडल्यास इतर सर्व प्राण्यांचे शारीरिक घड्याळ सूर्याच्या भ्रमंतीबरहुकून चाललेले असते. म्हणून सूर्यप्रमाणवेळ सर्वांना जाणवत असणारंच. पण वेळ कसा भुर्र्कन उडून गेला किंवा वेळ जाता जात नाही, ही जी माणसाला होणारी कालप्रवाहाची जाणीव आहे ती प्राण्यांत नसावी असे मला वाटते.
कालप्रवाहाची आणि त्याच्या सापेक्ष गतीची जाणीव नसल्यामुळे प्राणी वेळ घालवायला काही विशेष करत नाहीत. समुद्रात इतस्ततः फिरणारे माश्यांचे मोठाले गट असोत किंवा एकेकटा फिरणारा देवमासा असो; आकाशात उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांचे थवे असोत किंवा एकेकटा राहणारा गरुड असो; कळपाने किंवा झुंडीने फिरणारे शाकाहारी - मांसाहारी प्राणी असोत किंवा एकेकट्याने हिंडणारे असोत; कुणीही वेळ घालवायला काही विशेष करताना दिसत नाही. किंवा आपोआप निघून चाललेल्या क्षणांची त्यांना काही चिंता नसते. त्यामुळेआहार, निद्रा किंवा मैथुन यासारख्या नैसर्गिक प्रेरणांच्या पूर्तीमुळे होणारे सुख किंवा त्या पूर्ण न होण्यामुळे होणारे दुःख सोडल्यास प्राण्यांना आनंद, कंटाळा या सारख्या जाणीवा, माणसांइतक्या तीव्र नसाव्यात.
कोणत्या विशिष्ट क्षमतेमुळे कुणास ठाऊक पण माणसाला कालप्रवाहाची जाणीव होते. ही जाणीव जन्मजात नसते. पण लहान असताना वयाच्या कुठल्या तरी एका टप्प्यावर आपल्याही नकळत ही कालप्रवाहाची आणि त्याच्या सापेक्षतेची जाणीव आपल्याला अचानक होऊ लागते. या विशिष्ट जाणिवेमुळे माणूस, सुख आणि दुःखाबरोबरच आनंद, समाधान, कंटाळा अश्या भावना अनुभवू शकतो.
भुर्र्कन उडून गेलेला वेळ आनंददायी असतो आणि न जाणारा वेळ आपल्याला कंटाळवाणा ठरतो. माणसाला कंटाळ्याची भीती वाटते, त्रास होतो आणि मग या कंटाळ्याच्या त्रासातून सुटण्यासाठी माणूस आयुष्यभर आनंदाच्या - समाधानाच्या शोधात असतो. चित्रकला, शिल्पकला, नृत्य, गायन किंबहुना माणसाने केलेली सर्व कलांची निर्मिती ही त्या भुर्रकन उडून जाणाऱ्या वेळेचा आनंद घेण्यासाठी आहे असे मला वाटते.
आहार, निद्रा, मैथुन या नैसर्गिक प्रेरणा पुन्हा पुन्हा उद्भवत असल्या तरी तात्पुरत्या काळासाठी का होईना पण आपल्याला त्यांच्या बाबतीत तृप्तीचा अनुभव होतो. पण आनंद ही संकल्पना अदृश्य आणि अस्पर्श अश्या मनाशी संबंधित असल्याने ती तरल आणि चंचल रहाते. आनंद कायम अतृप्त असतो आणि कंटाळा कायम अनंत असतो. अनंत कंटाळ्याला घालवण्यासाठी आणि अतृप्त आनंदाला तृप्त करण्यासाठी मग माणूस ज्या कलांतून आनंदाची जाणीव होते त्यांची वारंवारता वाढवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी त्याला शारीरिक प्रेरणांच्या पूर्तीसाठी घालवलेला वेळ कालापव्यय वाटू लागतो. कलासाधना आणि कलेच्या रसास्वादासाठी घालवलेला वेळ यथायोग्य वाटू लागतो.
कलेतून मिळणारा आनंद हा सर्व माणसांना हवाहवासा वाटला तरी आनंददायी कला प्रत्येक माणसातून प्रकट होईलच याची खात्री नसते. मग कलासाधना हा नैसर्गिक वरदान मिळालेल्या काही थोड्या थोडक्या लोकांचा प्रांत बनतो आणि त्यांच्याकडून जेंव्हा आणि जशी प्रकट होईल त्या कलेचा रसास्वाद घेऊन शक्य तितके आनंदी होण्याशिवाय इतरांना पर्याय नसतो. कलेच्या पुनरावर्तनात प्रत्येक वेळी तितकाच आनंद मिळेल याची शाश्वती नसते. आपल्याला जेंव्हा कंटाळा येईल तेंव्हा कलाकार आपल्या जवळ असतील याची खात्री नसते आणि जवळ असलेच तरी त्यांची निसर्गदत्त कला आपल्यासाठी सादर करतील याचीदेखील खात्री नसते.
मग माणसाला अजून नवनव्या कला शोधाव्या लागतात, किंवा मग जे जे करता येऊ शकते त्या सर्वात माणूस आनंद शोधू लागतो. आनंदाला पारखा होऊ नये म्हणून झुंडीत रहाणे, कळपात रहाणे ही नैसर्गिक प्रेरणा नसलेला माणूस मग समाज बनवून राहू लागतो. यातून तंत्राचा आणि उपकरणांचा जन्म होतो. त्यामुळे वेळ वाचतो आणि असा रिकामा वेळ पुन्हा माणसाला खायला उठतो. मग त्या रिकाम्या वेळेत आनंदी होण्यासाठी माणूस अजून नवनवीन समाजरचना, कला आणि तंत्राचा शोध लावत बसतो. अश्या तऱ्हेने शारीरिक सुखाच्या बाबतीत इतर प्राण्यांच्या सारखाच असलेला माणूस एक संस्कृतीपूर्ण सामाजिक प्राणी बनून इतर प्राण्यांपेक्षा वेगळा बनतो. निसर्गात घडून येणाऱ्या शारीरिक उत्क्रांती शिवाय तो एका संपूर्णपणे नवीन अश्या सांस्कृतिक उत्क्रांतीचा उद्गाता ठरतो.
No comments:
Post a Comment