Monday, January 30, 2017

दाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)



Image Courtesy : Internet 
खरी दाढी आणता येत नाही ती आपोआप यावी लागते. आणि ती सगळ्या पुरुषांना सारखीच येते असंही नाही. दाढी विरळ किंवा भरघोस असणे हा शारीरिक उंचीप्रमाणे निसर्गनियंत्रित भाग आहे. आणि तो विविध घटकांवर अवलंबून असतो. जन्मदात्यांकडून आलेलया जनुकांचे गुणधर्म, चेहऱ्यावरील केसांच्या रोमछिद्रांची संख्या किंवा केसांच्या ग्रंथी, शरीरातील टेस्टेस्टेरॉनची पातळी, पोषक आहार, पुरेसा व्यायाम आणि पुरेशी झोप या सर्वावर दाढीमिश्यांचे प्रमाण अवलंबून असते. या सर्व गोष्टी पुरेश्या प्रमाणात आहेत याचा एक दृश्य संकेत म्हणजे दाढी मिश्या असा होतो.

याचा उलटा अर्थ असा केला जातो की विरळ दाढीमिश्या असलेल्या व्यक्तीमध्ये टेस्टेस्टेरॉन कमी असावे. परंतू हे पूर्णसत्य नाही. दाढीमिश्यांसाठी विपरीत जनुकीय गुण किंवा विरळ केशिका ग्रंथी यामुळे देखील टेस्टेस्टेरॉनची समाधानकारक पातळी असलेला पुरुष देखील विरळ दाढीधारी होऊ शकतो. थोडक्यात, 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' किंवा 'का रे भुललासी वरलिया रंगा' हे इतर अनेक गोष्टींप्रमाणे दाढीमिश्यांना देखील लागू होतं.

उत्क्रांतीच्या अंगाने जीवशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करणारे काही शास्त्रज्ञ असं पण मानतात की स्त्रियांना, प्रजननयोग्य काळात दाढीवाले पुरुष जास्त आकर्षक वाटतात. वंशसातत्य हे निसर्गातील प्रत्येक जीवाचे निसर्गदत्त कर्तव्य आहे. आपली जनुकीय रचनाच तशी आहे. अशक्त जोडीदार म्हणजे अशक्त संतती आणि वंशसातत्य खंडित होण्याची शक्यता जास्त, म्हणून मग सशक्त जोडीदार ओळखणे ही मोठी गरज असते. स्त्री व पुरुषांचे वेगवेगळे शारीरिक अवयव या शोधात दृश्य खुण म्हणून कामाला येतात. पुरुषांची दाढी हा सशक्तपणाचा मोठी नैसर्गिक खूण आहे. त्यामुळे दाढीधारी पुरुष, स्त्रियांमध्ये थोडे जास्त लोकप्रिय असतात अशी सगळी या विचारामागील धारणा आहे. 

Image Courtesy : Internet 
फुलांचे रंग आणि गंध जसे फुलपाखरांवर, नर पक्ष्यांचा पिसारा किंवा तुरा किंवा नृत्यकौशल्य जसे पक्षिणींवर, नर हरणांची शिंगे किंवा त्यांचा गंध जसा हरिणींवर, बेडकाची गालफडे जसा बेडक्यांवर, नर चिम्पाझीचा आकार आणि आक्रमकता जशी मादी चिम्पाझींवर; प्रभाव पाडतात त्याप्रमाणे दाढीमिश्या स्त्रियांवर प्रभाव पाडत असाव्यात, असा निष्कर्ष काढायला अनेक दाढीधारी पुरुषांना आवडू शकते. तो कितपत परिपूर्ण आहे याबद्दल संशोधकांत मतभेद आहेत.

उत्क्रांतीच्या अंगाने जीवशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असे पण सांगतात की पूर्ण उमललेले टपोरे (Bee Stung lips) किंवा लालचुटूक ओठ, स्त्रीच्या प्रजननक्षमतेची आणि ती मिलनोत्सुक असण्याची दृश्य खूण असते. बहुसंख्य स्त्रियांना नटण्यामुरडण्याची निसर्गदत्त आवड असते असा समज आणि स्त्रीला उपभोग्य वस्तू मानण्याच्या सरंजामशाही, राजेशाही आणि आता भांडवलशाहीच्या युगात, स्त्रियांची प्रसाधनाची साधने वाढतच गेली. आणि ओष्ठशलाका (lipstick) आता अगदी लहान मुलींच्यादेखील रोजच्या वापराची गोष्ट बनण्याच्या मार्गावर आहेत. आणि पुरुषांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यात लिपस्टिक बऱ्यापैकी प्रभावी ठरताना दिसते.

स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांचे कथित मानसशास्त्र जे सांगते त्याला मान्य करून विविध संस्कृतींनी आणि बाजाराने प्रचंड प्रमाणात नवनवीन उत्पादने सातत्याने तयार केलेली दिसतात. आणि फार प्राचीन काळापासून स्त्रियांनी सजण्याचे, नटण्याचे प्रमाण वाढतंच गेलेले दिसते. याउलट, पुरुषांच्या बाबतीत मात्र बाजार आणि सर्वच संस्कृती थोड्या अरसिक होत गेलेल्या दिसतात. सुरवातीच्या काळात सर्रास प्रचलित असलेले अंगावर गोंदणे, कर्णभूषणे, बाहूबंद किंवा मुकुट वापरणे आता सर्वत्र बाद झालेले आहे. सर्वसाधारणपणे पुरुषांत, एखाद दुसरी अंगठी आणि सोन्याची चेन वापरण्याकडे कल असतो. (याला, फ्लेक्सवर चमकणारे काही सन्माननीय अपवाद आहेत, याची मला जाणीव आहे) आजकाल काही तरुण कानातील डूल आणि केसांची पोनीटेल वापरताना दिसतात. पण त्याचा उपयोग स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी होतो याबद्दल संशोधनांती काही बोलता येईल. त्याशिवाय काजळ, गंध, अत्तराचा फाया, हाताला गजरे, अश्या प्रकारे शरीराला सजविणे हे एकतर धार्मिक किंवा अतिरसिक मनोवृत्तीचे लक्षण मानले जाते. 
Image Courtesy : Internet 
म्हणजे रोजच्या जीवनात जितक्या सहजतेने स्त्रिया लिपस्टिक किंवा नेलपॉलिश वापरतात आणि सहेतुक किंवा अहेतुकपणे पुरुषांचे लक्ष्य वेधून घेण्यात यशस्वी ठरतात तितक्या सहजतेने पुरुषाने काही करावे म्हणून बाजार आणि सध्याची संस्कृती त्याला फार प्रोत्साहन देताना दिसत नाही. सध्याची पुरुषांची सगळ्यात लोकप्रिय प्रसाधने म्हणजे शरीरगंध लपवणारे परफ्युम्स, केस काळे ठेवणारी द्रव्ये आणि दाढी गुळगुळीत ठेवण्यासाठीची क्रीम्स व उपकरणे हीच आहेत. म्हणजे सध्या तरी बाजाराने पुरुषांच्या बाबतीतले स्त्रियांचे कथित मानसशास्त्र नाकारलेले दिसते आहे. आणि कल्पक मानवाने दाढी मिश्या वाढवण्याची साधने किंवा औषधे शोधत राहण्यापेक्षा ती कापण्याची साधने शोधण्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेले दिसते.

कदाचित ज्याप्रमाणे अप्रत्यक्षपणे स्त्री ही उपभोग्य वस्तू मानली गेली आहे त्याप्रमाणे पुरुषाला देखील उपभोग्य वस्तू म्हणून दर्शविणे सद्यकालीन समाजाला कठीण वाटत असावे. त्याशिवाय, स्त्री म्हणजे फूल तर पुरुष म्हणजे फुलपाखरू किंवा भ्रमर या कल्पनेने जोरदार मूळ धरले असल्याने भ्रमराने सजणे तितके महत्वाचे वाटत नसावे. पुरुष स्वभावतः अनेक साथीदार शोधतो आणि स्त्री स्वभावतः कमीत कमी साथीदार शोधते हा समजही या फूल भ्रमर कल्पनेला पोषक ठरतो. त्यामुळे फुलाला भ्रमराबद्दल काही मानसशास्त्र असावे याबद्दल मानवी समाज अजून तितका गंभीर नाही.

म्हणजे दाढीमिश्यांमुळे पुरुष, स्त्रियांना अधिक आकर्षक वाटतात की नाही?, याबद्दल मानवी समाज उदासीन असला तरी इतिहासकाळापासून पुरुषांची दाढी वेगवेगळ्या स्थळकाळात वाढत किंवा घटत गेलेली दिसते.

असे असेल तर मग पुरुष दाढीमिशा का ठेवतात किंवा का काढतात? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. मी जेव्हा याबद्दल इतिहासात आणि भूगोलात डोकावतो तेव्हा यामागे अनेक भौगोलीक, सामाजिक आणि राजकीय कारणे काम करत असवीत असे मला वाटू लागते. त्याबद्दल पुढील भागात लिहीन.

दाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)

उमलत्या वयातील मुलांसाठी दाढीमिश्या जिव्हाळ्याचा विषय असतो. लहानपणी दुधाच्या मिश्या, मग थोडे मोठे झाल्यावर शाळेत गॅदरिंग मध्ये चिकटवलेल्या खोट्या दाढी मिश्या मुलाला उगीच मोठेपणाचा आभास देतात. मग पुस्तकातील प्रसिद्ध व्यक्तींना दाढी मिश्या काढणे सुरु होते. पुरुषांच्या चित्रावर चढवलेल्या या दाढीमिश्या मग झाशीची राणी किंवा सरोजिनी नायडू यांना पण लावल्या जाऊ शकतात. सगळे बालवीर इतिहासाच्या शिक्षकांवरचा राग असा पुस्तकांतील वीरांच्या चित्रांवर काढतात आणि आपल्या चित्रकलेच्या शिक्षकांचा पगार सार्थकी लावतात.

Image Courtesy ; Internet
मग बाबांचे दाढीचे सामान वापरून त्यातला फोम किंवा ब्रश लावायला गम्मत वाटू लागते. मग चाफेकळी अर्धी वाकवून तिला रेझरप्रमाणे वापरत तो फोम काढायला सुरवात होते. कॉलेजात गेल्यावर मिश्या असणे हे मर्दानगीचे लक्षण मानले जाते. बोलताना ज्याचा हलणारा कंठ दिसतो किंवा ज्याला राठ दाढी आली आहे तो तर कुमार किंवा युवकाऐवजी पुरुष मानला जातो. चॉकलेट हिरो किंवा चॉकलेट बॉय ही शिवी वाटू लागते. थोडे अजून मोठे झाल्यावर नोकरी लागेपर्यंत दाढी न करणे, केस अस्ताव्यस्त ठेवणे, हे बंधनमुक्त व्यक्तीमत्वाचे महत्वाचे दृश्य लक्षण वाटू लागते. जगाचे नियम झुगारायला दाढी वाढवणे हा सोपा प्रतीकात्मक उपाय असतो. त्याशिवाय तो बुद्धिमान, विचारवंत, कलाकार किंवा एकंदरीतच कलंदर लोकांचा ट्रेडमार्क आहे असे वाटू लागते. विचार करताना दाढी खाजवणे, मधे मधे मिशीवर हात फिरवणे या लकबी पण सुरु होतात.

पण मग नोकरीसाठी मुलाखतीला जायला सुरवात झाली की पहिले उतरते ते दाढीचे जंगल. कॉर्पोरेट जगतात रोज दाढी करणे सक्तीचे असते. एखादा टणक असेल तर वीकेण्डला दाढीचे खुंट बाळगतो किंवा अजून दर्दी असेल तर मग फ्रेंच कट किंवा इतर प्रकारे दाढी कोरून स्वतःची वेगळी ओळख तयार करतो. नेहमी दाढी करणाऱ्याने एखाद्या दिवशी दाढी केली नाही की तो कळकट वाटतो. याउलट नेहमी दाढी ठेवणाऱ्याने ती काढून टाकली की त्याला ओळखणे अवघड जाते. नवीनच माणसाशी बोलतोय असे वाटत रहाते. डोळ्यांवर सगळ्यात मोठा आघात होतो, तो मिशी काढून टाकल्यावर. किती का बारीक किंवा विरळ असेना पण असलेली मिशी जर कुणी निग्रहाने काढून टाकली की नाकाखालची जागा फार मोकळी वाटू लागते. उग्र माणूसही मवाळ वाटू लागतो. स्त्री पार्ट निभावणाऱ्या पुरुषाचा मेकअप अर्धा उतरवून झाला असताना त्याच्याकडे बघितल्यावर जसे वाटावे तसे काहीसे, या जुनी मिशी भादरलेल्या व्यक्तींकडे बघताना वाटू लागते.

दाढी मिशी हे पुरुषार्थाचे लक्षण कसे झाले असावे? भारतीय आणि पाश्चिमात्य पुरुषांचे व स्त्रियांचे मत कसे बनत गेले असावे? याबद्दल विचार करत राहिलो की काही गमतीशीर दुवे मिळू लागतात.

Wednesday, January 25, 2017

गॉर्डन के आणि Allo Allo

काल संध्याकाळी सहज रावांचा मेसेज आला. “गॉर्डन के यांचं देहावसान झालं.” मला संदर्भ लागेना. मग पुढचा मेसेज आला, “Allo Allo मधले कलाकार”. मग लक्षात आलं की सहज रावांच्या मनात, “बऱ्यापैकी माहिती बाळगून असणारा माणूस” अशी प्रतिमा बनवण्यात मी यशस्वी झालो आहे. पण एका प्रतिमेच्या साच्यात मी अडकण्याचा धोका ओळखून, स्वर्गवासी गॉर्डन साहेबांनी जाता जाता माझ्या माहितीच्या छोट्या परिघाची मला जाणीव करून दिली. त्यात रात्री सोसायटीच्या मीटिंगमुळे उशीर झाला आणि माहितीचा परीघ आपल्या मर्यादेतच राहिला. पण सकाळी थोडा वेळ मिळाल्यावर ‘आलो आलो’ शोधलं. यु ट्यूबवर व्हिडीओ मिळाला. तो पाहताना सारखा हसत राहिलो आणि मनातल्या मनात सहज रावांचे आभार मानले. बोलणाऱ्याला / लिहिणाऱ्याला त्याच्या विषयाची माहिती असायलाच हवी, हा नियम मी कसोशीने पाळतो. पण आज ‘Allo Allo’चा व्हिडिओ बघितल्यावर या नियमातून स्वतःला सूट द्यायचं ठरवलं. त्यामुळे केवळ एकंच व्हिडिओ बघून हा लेख लिहिला आहे.
७५ वर्षाचे गॉर्डन के, ब्रिटनच्या हडर्सफील्डमध्ये १९४१ मध्ये जन्मले. इंग्लडमध्ये (आणि युरोपातील काही इतर देशातसुद्धा) हॉस्पिटल रेडिओ म्हणून एक व्यवस्था आहे. यात हॉस्पिटलमधल्या पेशंटसाठी विशेष रेडिओ स्टेशन्स स्वयंसेवकांच्या सहाय्याने चालवली जातात. यावर संगीताचे विविध कार्यक्रम चालतात. एकट्या इंग्लंडमध्ये २३० च्या आसपास अशी हॉस्पिटल रेडिओ स्टेशन्स आहेत. गॉर्डन साहेब हडर्सफील्डमधल्या एका हॉस्पिटल रेडिओ स्टेशनमध्ये स्वयंसेवक होते. त्यांनी टेक्सटाईल मिल्स, वाईन फॅक्टरी आणि ट्रॅक्टर फॅक्टरीमध्ये कामे केली. यातच सर अॅलन ऐकबॉर्न यांनी दिग्दर्शित केलेल्या रेडिओवरील नाटकात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. आणि मग त्यांच्याच सल्ल्याने गॉर्डन, बोल्टन ऑक्टागॉन थियेटर मध्ये ऑडिशनला गेले. तिथून त्यांची रंगमंच कारकीर्द सुरु झाली. मग १९६८ मध्ये बीबीसी मध्ये ते कलाकार म्हणून काम करू लागले. सुरवातीला फुटकळ रोल्स करत असताना तेथील अतिशय यशस्वी लेखक आणि निर्माते डेव्हिड क्रॉफ्ट यांच्या Are You Being Served? या विनोदी मालिकेत त्यांनी काही स्मरणीय भूमिका केल्या. आणि डेव्हिड क्रॉफ्टवर त्यांची चांगलीच छाप पडली.
Are You Being Served? मालिका संपत आली होती. डेव्हिड क्रॉफ्ट नवीन विषयाच्या शोधात होते. त्यांच्या मित्राने युद्धकाळ दाखवणाऱ्या मालिकांचे विशेषतः Secret Army या मालिकेचे विडंबन करूया असे सुचवले.
Secret Army ही मालिका १९७७७ -१९७९ मध्ये बीबीसीवर दाखवली जात होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडणाऱ्या या मालिकेत जर्मनीचा प्रतिकार करणारे एक बेल्जीयन युनिट, हॉटेल मालक असलेला तिचा एक सदस्य, त्याची आजारी बायको, रखेल, वेट्रेस, त्याच्या हॉटेलात येणारे जर्मन अधिकारी, आणि त्यांच्या संभाषणातून ब्रिटिश सैन्याला मिळणारे संदेश; असा असा सगळा जामानिमा होता.
क्रॉफ्टना ही कल्पना आवडली. आणि त्यातून जन्म झाला “Allo Allo’’ चा. आणि सुरू झाला गॉर्डन केंच्या आयुष्यातील सुवर्णाध्याय. क्रॉफ्टनी मालिकेची संहिता लिहिली आणि गॉर्डनकडे पाठवताना सांगितले की गॉर्डनने यातील रेने आर्टोईसची भूमिका करावी. गॉर्डनने भूमिका स्वीकारली आणि पुढे १९८२ ते १९९२ अशी दहा वर्षे ते रेनेची भूमिका करत होते. मालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ भागात आणि मालिकेच्या १२०० पेक्षा अधिक रंगमंचीय सादरीकरणात ते रेने बनून प्रेक्षकांना हसवत राहिले. रेने त्यांच्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग झाला होता की १९८९ मध्ये त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे नावही Rene & Me: A Sort of Autobiography ठेवले होते. हॉटेलमधले शेफ घालतात तसा ऍप्रन घातलेला रेने ही त्यांची कायमची प्रतिमा बनली. मालिका संपल्यावर एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘खरं सांगायचं म्हणजे, मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेसाठी बनलोच नव्हतो.’
काय होतं Allo Allo मध्ये? रेने आर्टोईस हा जर्मनीने जिंकून घेतलेल्या फ्रान्समधल्या Nouvion गावातला एक मध्यमवयीन हॉटेल मालक. त्याच्या बरोबर असते एक साधारण दिसणारी, बेसूर गाणारी, वेंधळी बायको आणि अंथरुणाला खिळलेली कटकटी बहिरी सासू. ती इतकी कटकटी असते की रेने म्हणतो, ‘देव तिला लवकर उचलत नाही कारण त्याला पण स्वतःची शांती गमवायची नाही’. त्याच्या हॉटेलात दोन सुंदर वेट्रेसेस काम करत असतात. त्या दोघींबरोबर रेनेच्या भानगडी चालू असतात. आणि जेव्हा कधी रेनेची बायको त्याला रंगेहाथ पकडते तेव्हा तो तिला काहीतरी कारण सांगून तिचा संशय दूर करण्यात कायम यशस्वी होतो. त्याच्या हॉटेलात अनेक जर्मन अधिकारी येतात. त्यांच्याशी गोड बोलून कधी स्वतःचे शब्द तर कधी वेट्रेसेसचे सौंदर्य वापरून त्यांची मर्जी राखत असतो. त्याच्या बदल्यात रेशनचे नियम धुडकावून जास्तीचे रेशन मिळवत रहातो.
मग त्याच्याकडे येते एक ब्रिटिश अधिकारी. ती सांगते, की जर्मन अधिकाऱ्यांचा त्याच्यावर चांगला विश्वास आहे यामुळे त्याच्या हॉटेलात कोणी धाड मारणार नाही. म्हणून त्याच्या हॉटेलात दोन ब्रिटिश सैन्याधिकाऱ्यांना लपवायचे आहे. रेने घाबरतो. पण तयार होतो. ब्रिटिश मुख्यालयाशी संपर्क साधण्यासाठी सासूच्या खोलीत रेडिओ ट्रान्समिशन यंत्र बसवतो. रेनेचे उच्चार फ्रेंच हेल असलेले असल्याने, तो हॅलो हॅलो बोलण्याच्या ऐवजी ‘आलो आलो’ बोलतो. म्हणून मालिकेचे नाव ‘आलो आलो’.
तोपर्यंत जर्मनीहून गेस्टापो अधिकारी येतो. हिटलरने त्याला The Falling Madonna चे प्रसिद्ध चित्र शोधून आणायची जबाबदारी दिलेली असते. ते चित्र रेनेकडे नेहमी येणाऱ्या जर्मन अधिकाऱ्याने स्वतःसाठी ठेवलेले असते. त्याला गेस्टापोची भीती वाटते. म्हणून तो ते चित्र लपवायला रेनेच्या हॉटेलात येतो. आता रेने कैचीत सापडतो. एकाचवेळी तो बायको आणि वेट्रेस, सासू आणि बायको, लपवलेले ब्रिटिश अधिकारी आणि लपवलेल्या मौल्यवान कलाकृती, अश्या गोंधळात सापडतो. त्याबरोबर हा गोंधळ वाढवायला मधून मधून गेस्टापो आणि ब्रिटिश गुप्तहेर तिथे येत रहातात.
या मालिकेतली अजून एक धमाल म्हणजे, यात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि इटली या चार देशातले लोक येतात. पण चार भाषा वापरल्या तर मग मालिका समजायला कठीण जाईल म्हणून सगळे संवाद इंग्रजीतून बोलले जातात. फक्त वेगवेगळ्या देशाचे लोक आपापली विशिष्ट हेल काढून बोलतात. त्यामुळेच रेने ‘आलो आलो’ बोलतो. गंमत अशी की फ्रेंच पात्रांनी फ्रेंच हेल असलेल्या इंग्रजीतून बोललेले संवाद आपल्याला कळतात आणि मालिकेतल्या फ्रेंच पात्रांना कळतात पण त्यावेळी समोर असलेल्या इतर देशातील पात्रांना काळात नाहीत. तीच गत जर्मन हेल असलेल्या इंग्रजीची. ते प्रेक्षकांना कळते आणि जर्मन पात्रांना कळते पण इतर पात्रांना काळात नाही. त्यामुळे अजून धमाल येत रहाते.
यु ट्यूबवर मला याचे बरेचसे भाग मिळाले आहेत. त्यामुळे किमान ८५ रात्री तरी रेनेच्या संगतीत हसत हसत जातील.
हे असे दुसऱ्यांदा झाले आहे. याआधी जॉर्ज कार्लिनशी ओळख झाली ती २००८ मध्ये त्याच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर. आणि आता गॉर्डन केशी ओळख झाली सहज रावांमुळे, गॉर्डन साहेबांच्या स्वर्गवासाच्या दिवशीच.
आता बहुतेक गॉर्डन साहेब, परम कृपाळू दयाघन परमेश्वराला प्रेक्षकाच्या भूमिकेत बसवून रेनेच्या गमती करत हसवत असतील. आणि कदाचित हसून तृप्त झालेल्या ईश्वराच्या आनंदामुळे जगात सर्वत्र आनंदी आनंद नांदू लागेल.


Monday, January 23, 2017

संघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य

माझे मित्र उत्पल वनिता बाबुराव यांनी असलेपण नसलेपण या शीर्षकाखाली संघ आणि मार्क्सवाद याबद्दल त्यांचे विचार २०१५ मध्ये मांडले होते. आणि मग ते फेसबुकवर शेअर पण केले होते. विषय संघ असल्यामुळे फेसबुकच्या शिरस्त्याप्रमाणे त्यावर शेरेबाजी झाली. आणि मग त्याच्यावर प्रतिसाद देताना हे लिखाण झालं

Utpal Vanita Baburao मला तुमचा लेख आवडला. त्यावरच्या इतरांच्या प्रतिक्रिया आणि त्यावर तुम्ही संयत भाषेत दिलेली ठाम उत्तरे देखील आवडली. मणेरीकरांनी मांडलेला वैचारिक गोंधळ आणि एकदिशेचा मुद्दा आणि त्यावरचे तुमचे बहुदिशेने संपन्न होण्याचे उत्तर पण वाचले. आणि एकदम मी मागे मांडलेल्या भारतीय समाजाच्या आणि भारतीय इतिहासाच्या बद्दलच्या माझ्याच विचारांची आठवण झाली. तुमच्या सोयीसाठी ते आधी इतरत्र मांडलेले विचार प्रथम लिहितो आणि मग त्याची या लेखाशी माझ्या मनात असलेली संगती मांडतो.

"आपल्या भारत देशाचे प्रश्न फारच वेगळे आहेत …. इंग्रजांच्या गुलामीतून मोकळे झालेले इतर देश इंग्रजी आक्रमणापूर्वी सामाजिक, वैचारिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत होते या उलट जाती पातीमध्ये आणि जुन्या अंधश्रद्धामध्ये अडकलेला भारतीय समाज वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत असला तरी सामाजिक आणि वैचारिक दृष्ट्या खूपच प्रगत होता ….

त्यामुळे जरी इंग्रजी अमलाखालील इतर देशांच्या इतिहासाचे सरळ सरळ दोन भाग पडतात,

१) इंग्रजी राज्याच्या आधीचे अंधार युग ,

२) आणि इंग्रजी राज्याच्या नंतरचे नवीन युग

ज्यांना समाज हि संकल्पना माहिती नव्हती ते एक भाषा, एक धर्म, एक देव आणि व्यापाराची एक संस्कृती असलेली देशाची संकल्पना इंग्रजांकडून उचलतात आणि तिथपासूनच त्यांच्या देशाचा इतिहास सुरु होतो ….

तरी भारताचे मात्र तसे नाही…. इंग्रजी अंमल चालू होण्यापूर्वी आपण जन्म मृत्यूच्या आणि कर्म सिद्धांताच्या वर्तुळाकार चक्रात फिरणारा एक संस्कृतिपूर्ण समाज निर्माण केला होता … या समाजात पाश्चात्यांप्रमाणे देशाची एकरेषीय संकल्पना नसली तरी वेगवेगळी सार्वभौम राज्ये असलेली अनेकदा लयाला जाऊनदेखील मनात कायम तेवत असलेली राष्ट्राची संकल्पना होती….

या केवळ संकल्पनारूपी राष्ट्रात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या चालीरीती, भाषा, खाद्य संस्कृती, कुटुंब व्यवस्था गुण्यागोविंदाने नांदत होत्या. चर्चिल ने सांगितलेल्या एका भाषेने आणि एका देवाने जोडला गेलेला आणि एका राजाशी निष्ठा ठेवणारा असा आपला देश कधीच नव्हता …. काही भागात स्त्री सत्ताक पद्धती होती तर काही भागात पुरुष सत्ताक. काही भागात अनेक पत्नी असणे तर काही भागात अनेक पती असणे समाज मान्य होते. काही भागात योनी पूजा तर काही भागात लिंग पूजा प्रचलित होती. काही भागात कनिष्ठ वर्णीयांच्या स्त्रिया वरिष्ठ वर्णीयांच्या कायम सेवेसाठी होत्या तर काही भागात रोटी बेटी व्यवहार आणि शरीरसंबंध पूर्णपणे नियंत्रित होते. काही ठिकाणी खजुराहोचे उन्मुक्त प्रदर्शन आणि कामाख्येची पूजा होती तर काही ठिकाणी ब्रह्मचारी हनुमंत पूजनीय होता… इंग्रजांशी लढून स्वतंत्र केलेला हा देश कधी देश नव्हताच मुळी.

त्यात पुन्हा भर पडते ती आपल्या वर्तुळाकार इतिहासाची. पाश्चात्य संस्कृती एक रेषीय आहे. पुढील पिढी केवळ त्यांच्या मागील एका पिढीचे अनुकरण किंवा उल्लंघन करते पण कोणी मागच्या च्या मागच्या पिढीचे अनुकरण करत नाही. येशू आवडला ना मग आदम, मूसा वगैरे विसरून जायचे. मुहम्मद आवडला ना मग येशूला पण विसरून जायचे. अब्राहम, इसाक, इस्माइलचे नाव घ्या पण नियम पाळायचे शेवटच्या प्रेषिताचे. त्यामुळे समाजात एकाच बिंदूतून निघून वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या नवीन रेषा तयार होत असतील पण सर्व रेषा अंतहीन आणि सरळच रहातात वर्तुळाकार होत नाहीत. या उलट भारतीय समाजाच्या वर्तुळाकार पद्धतीत प्रत्येक नवीन पिढी वर्तुळाच्या केंद्रबिंदूत जन्म घेते आणि हळू हळू परीघामध्ये रूपांतरित होते. त्यामुळे प्रत्येक नवीन पिढीला आपल्या इतिहासाचा आरंभबिंदू स्वतःच्या मागे न मिळता स्वतःच्या समॊर विस्तारणाऱ्या परिघात बघत येतो … त्यामुळे एकमेकांशी असंबद्ध असा सगळाच भूतकाळ आपल्या इतिहासाचा भाग होतो. कोणी एकपत्नी रामाचा आदर्श ठेवतो तर कुणी अनेकपत्नी कृष्णाचा. कुणी खजुराहोला आपलेसे करते तर कुणी ब्रह्मचारी हनुमंताला. कुणी सती प्रथा मानतो तर कुणी विधवा विवाह. कुणी जातीप्रथा मानतो तर कुणी वसुधैव कुटुंबकम. कुणी जरठकुमारी विवाह मानतो तर कुणी त्याला चिमुकल्यांचे लैंगिक शोषण.

मग ह्या प्राचीन वैविध्यपूर्ण राष्ट्राचे रूपांतर एका विकसित देशात करायचे तरी कसे ?"

मूळ पोस्ट संपूर्ण स्वरूपात इथे आहे. या पोस्टचा इथे न दिलेला शेवट वैचारिक नसून कल्पनारम्य असला तरी पोस्ट मधील वर दिलेल्या निरीक्षणावर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही.

आता वरील पोस्टची, तुमच्या विचारांशी आणि मणेरीकरांशी झालेल्या संवादाशी मला लागलेली संगती सांगतो.

तुमच्या पोस्ट मध्ये तुम्ही हिंदुत्ववादी आणि संघनिष्ठ लोकांच्या आचार विचारांवर मत मांडले आहेत. मी लहानपणी अनियमितपणे खेळायला शाखेत जायचो त्यानंतर माझा आणि संघाचा संबंध पुस्तकातून, प्रचारकी साहित्यातून आणि बातम्यांमधूनच आला आहे. पण संघाबद्दल मला हे जाणवले आहे की बहुदिशांनी धावणाऱ्या आणि तरीही स्वतःचे सनातत्व मिरवणाऱ्या हिंदू समाजात; दिशा ठरवून, कार्यक्रम आखून, दीर्घकालीन वाटचालीसाठी तयार असणारी, त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पदर असणारी संघ हि एकमेव संघटना आहे. त्यांची दिशा योग्य की अयोग्य? त्यांचे साध्य आणि साधन विवेकी कि अविवेकी? हा भाग पूर्ण वेगळा, पण आपल्या वर्तुळाकार समाजात इतर एकरेषीय समाज आणि धर्मांपासून प्रेरणा घेऊन अस्तित्वात आलेली हि पहिलीच संघटना आहे.

बहुदिश आणि त्यामुळे वर्तुळाकार फिरत असलेला समाज आपल्या प्रगतीचे किंवा पतनाचे कुठलेही कारण सांगू शकत नाही. तो कधीही नामशेष होत नाही आणि कालबाह्य देखील होत नाही. तो नदीप्रमाणे प्रवाही न राहता साचलेल्या डबक्याप्रमाणे स्थितीशील राहतो. त्याच्या चुका होत नाहीत असे नाही पण त्या मान्यच केल्या जात नाहीत आणि म्हणून त्या सुधारण्याचा प्रयत्न देखील करता बऱ्याचदा विफल ठरतो. अश्या समाजातील संस्था डबक्याचे शिळेपण वाढवतात.

गरज आहे ती अश्या समाजात एकरेषीय संस्था तयार होण्याची जी डबक्याचे तोंड फोडेल आणि पाणी वाहते करेल. संघ हे करू शकेल का? याचे उत्तर देणे कठीण आहे. कारण संघ निर्मितीचे हेतू डबक्याला प्रवाही करण्याऐवजी त्याला नियंत्रित करण्याचे आहेत असे संघ विरोधकांना वाटते.

पण कुठलीही संस्था तिच्या व्यक्त केलेल्या उद्देशांशी पूर्णपणे प्रामाणिक कधीच राहू शकत नाही हे सत्य जर आपण विधायक दृष्टीने वापरायचे ठरवले तर संघ देखील त्याला आवडणाऱ्या आणि भारतात सध्या जे पुरोगामी म्हणून ओळखले जातात त्यांना न आवडणाऱ्या व्यक्त उद्देशांशी प्रामाणिक राहू शकेल याची काय शाश्वती ?

रॉबर्ट ओवेनच्या न्यू लानार्क च्या कामगार कल्याणाच्या प्रयोगाची इतिश्री त्याच्या कामगारांनीच केली होती आणि मार्क्स ची वाक्ये संदर्भ सोडून त्याचे भक्त आणि विरोधक कश्या प्रकारे वापरतात याचे उदाहरण तुम्ही स्वत: या लेखात दिलेच आहे. गांधीजींच्या विचारांची हत्या त्यांचे गोळ्या न झाडणारे अनुयायी अधिक जोषात अजूनही करत आहेत आणि जीनांचे सेक्युलर पाकिस्तानचे स्वप्न त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या अनुयायांनी धुळीस मिळवले. मग संन्यास शिकवण्यासाठी संस्था स्थापन करून शेकडो देशातून विलासी राहणीसाठी आणि समाजविघातक कृत्ये करतात म्हणून तडीपार केलेल्या ओशो रजनीशांनी सांगितलेले “संस्था संस्थापकाचा हेतू नष्ट करते” या पुन्हा पुन्हा प्रत्ययास येणाऱ्या सत्याला संघ अपवाद ठरेल याची सर्व संघ विरोधकांना इतकी खात्री कशी?

तुम्ही स्ट्रॅटेजिक विचार म्हणालात म्हणून माझे मत सांगतो. मला तर वाटते की संघाला सरसकट विरोध करण्याऐवजी लोकशाही मार्गाने राजकीय ताकद मिळवलेल्या या संस्थेचे पालकत्व आणि मालकी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. संघाला जे हवे त्याला विरोध करण्याऐवजी त्याला तेच का हवे? असा प्रश्न विचारले पाहिजे. जे आपल्या प्रगतीसाठी हवे आहे असे संघासकट आपल्या सगळ्यांना मान्य असेल त्याच्या सिद्धतेसाठी कुठला मार्ग निवडणार हे देखील संघाला विचारून इतर पर्यायी मार्ग सुचवले पाहिजेत. ह्यामुळे आपण प्रगती करू शकू आणि संघाची उद्दिष्टे किंवा मार्ग जर बहुसंख्यांना पटत नसतील तर संस्था संस्थापकाचा हेतू नष्ट करते हे वैश्विक सत्य पुन्हा संघाच्या बाबतीत खरे होताना पाहू शकू.

मी वाचलेल्या सर्व सामाजिक क्रांतींमध्ये मला एक समान गोष्ट जाणवली की पुरोगामी विचारवंत, प्रस्थापित सत्तेला खाली खेचण्यासाठी अत्यंत मोलाचे वैचारिक बळ देतात. आधुनिक भारतात प्रस्थापित कोण ? हा एक गुंतागुंतीचा प्रश्न असल्याने भारतातील पुरोगामी विचारवंतांचे काम अधिकच कठीण आहे.

पण भारतीय इतिहासाला समजून त्यामुळे तयार होणाऱ्या भारतीय मनाला समजून ज्याप्रमाणे गांधीजींनी समग्र भारताला स्वातंत्र्य संग्रामात अलगद आणले, रक्तरंजित आणि हिंसक क्रांती टाळून जागतिक राजकारणाच्या विविध घडामोडी स्वकीयांच्या फायद्यासाठी वापरून आपल्याला भंगलेल्या देशाचे का होईना पण राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यास मोलाचा हातभार लावला, त्याप्रमाणे आपल्या पिढीची जबाबदारी आहे ती या मातीतले नवे सामाजिक आणि राजकीय आकृतिबंध तयार करण्याची. विदेशी मातीत रुजलेले विचारवृक्ष आपल्याकडे आपोआप रुजतीलच अशी भोळी आशा आपल्या प्रगतीच्या वाटा अरुंद करून टाकेल.

पानसरे सरांची श्री. उत्तम कांबळेंनी घेतलेली एक दीर्घ मुलाखत पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली होती. आत्ता हे लिहिताना त्याची आठवण झाली आणि पुस्तक काढून बघितले. पृष्ठ क्र ५३ वर सरानी मार्क्स बद्दल असं स्पष्ट म्हटलंय की “धर्माचं जेवढं कौतुक मार्क्स ने केल तेवढं कौतुक धर्मवाद्यांनीही केलं की नाही शंका आहे.” आणि मग सर तुम्ही इंग्रजीमध्ये उद्घृत केलेला परिच्छेद देतात. त्याआधी पृष्ठ क्र ५२ वर ते म्हणतात, “गणपती नवसाला पावतो, त्याला नारळ दिला की तो पावतो. ही टाकाऊ गोष्ट आहे. पण उत्स्व्वाच्या निमित्तानं नाचायला, मिरवायला मिळालं पाहिजे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. या सहज प्रवृत्तीचं पोषण झालं पाहिजे. जे टाकाऊ ते काढून टाकलं पाहिजे असं मला वाटतं. पर्यायी उत्सव तयार करणंही आवश्यक आवश्यक आहे. आपल्याला दंग करायला मिळाला पाहिजे, नाचायला मिळालं पाहिजे हे वेगळ्या पर्यायामधून दिलं नाही तर लोक परंपरागत सव उत्सवाकडे वळतात. पर्याय देण्यात आपण कमी पडतो. महात्मा फुल्यांनी असे पर्याय देण्याचा प्रयत्न केला. पण या पर्यायांकडे कम्युनिस्टांच दुर्लक्ष झालं.”

म्हणून भारतीय पुरोगामी मग ते डावे असतील किंवा उजवे, त्यांना पुढील मार्गक्रमणासाठी पर्याय निवडताना महात्मा फुल्यांनी सुरु केलेला, गांधीजीनी यशस्वीरीत्या वापरलेला आणि दुर्गापूजेत सहभागी होऊन बंगाली कम्युनिस्टांनी प्रशस्त केलेला मार्ग स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला आपल्या पोथ्या तयार कराव्या लागतील भविष्यात ज्या जागतिक विचारधारेशी जुळू शकतील पण ज्या या मातीत शतकानुशतके रुजलेल्या परंपरांचा स्वतःसाठी मुळं म्हणून वापरून घेतील. त्या मन लावून आचरणात आणाव्या लागतील.

पुढील पिढ्यांसाठी जेंव्हा त्या कालबाह्य ठरतील जेंव्हा त्यांना या कालसापेक्ष पोथ्यांचा त्रास होईल तेंव्हा ते आपण निर्माण केलेल्या पोथ्या मोडीत काढतील, कदाचित आपला तिरस्कार करतील, आपल्याला नावे ठेवतील, आपल्या पोथ्यांतील वाक्ये संदर्भ सोडून वाचून त्यांचा उपहास करतील, हे सर्व मान्य करूनच आपण आपले डबके फोडू शकू.

synthesis होण्यासाठी लागणारा antithesis हा synthesis च्या मजबूतीवरच आपले वैशिष्ट्य दाखवू शकतो म्हणून गरज आहे ती सनदशीर मार्गाने आपला लढा तीव्र करीत राहण्याची.

माझ्या विचारात कुठे विसंगती आढळल्यास तो माझ्या वैचारिक अपरिपक्वतेचा दोष समजून तो सुधारण्यास आपण आणि आपले माझ्यासारखेच इतर मित्र मला सहाय्य करतील अशी खात्री आहे.

मसान


माझे मित्र मंदार काळे उर्फ रमताराम यांनी मसान चित्रपट पाहून त्यावर जग दस्तूरी रे या लेखात त्याचे रसग्रहण केले. ते वाचून चित्रपट न पाहताच माझ्या मनात केवळ रसग्रहणामुळे  जे विचार आले ते लिहून ठेवले होते.



Source ; Internet 
मी मसान पाहिला नाही अजून, पण परीक्षण वर्तमानपत्रात वाचले आणि दूरदर्शन वर पाहिले… YouTube वर ट्रेलर देखील पाहिले होते… ह्या रविवारी कुटुंबाला द्रिष्यमचे दिलेले वचन पूर्ण करायचे असल्याने मसान पाहण्यासाठी वेळ कसा काढायचा त्याच्या विचारात होतो तेवढ्यात तुमची परीशीलनाची पोस्ट वाचली आणि मूळ चित्रपटापेक्षा तुमच्या लेखाची वाट पाहू लागलो .

खूप छान लिहिले आहे तुम्ही. माणसाला कुठल्या गोष्टी चटकन दिसतात त्यावरून त्याच्या विचारांची दिशा, प्राथमिकता आणि वैचारिक क्षमता दिसून येते… आणि या सर्वच पातळींवर तुम्ही वाचणाऱ्याला तुमच्या अनुभवाजवळ घेऊन जाण्यात यशस्वी झाला आहात. वाचायला सुरुवात केल्यानंतर एक क्षणही इकडे तिकडे न बघावसं वाटावं इतकी छान पकड आहे आणि दुसऱ्या कुठल्याही विषयावर विचार न करता यावा इतकी सुंदर मुद्देसूद मांडणी आहे लेखाची … अगदी लेख संपल्याची -oOo- खूण देखील या चित्रपटाच्या अस्सलपणाची आणि रमता राम ह्या रसग्रहणात किती रमला होता त्याची साक्ष देते.

या सुंदर परिशीलनापुढे काही लिहिणे म्हणजे सोनियाच्या ताटी नरोटी ठेवण्यासारखे आहे हे माहिती असून मी नाथ महाराजांचे उसने अवसान आणून काही विचार मांडतो.

सृष्टीच्या अविरत चालणाऱ्या चक्रात आपण हिंदू लोकांनी उत्पत्ती - लय - विनाशाचे तीन बिंदू शोधले आणि वर्तुळाला त्रिकोणाचे स्वरूप दिले. मग त्रिमूर्तीची संकल्पना मांडून हि तीन कामे तीन देवांना वाटून टाकली. निर्माण करणारा ब्रम्हा, प्रतिपाळ करणारा विष्णू आणि संहार करणारा महेश. आणि मग त्याहिपुढे जाऊन त्यांच्या वास्तव्याच्या जागा ठरवून टाकल्या.

जसे आपले जीवनाचे आकलन तशीच आपली मांडणी. जीवन सुरु कुठून आणि का होते त्याचा काही पत्ता लागत नाही म्हणून त्याचा अनुत्तरीत प्रश्न विसरून जायचा, इतका कि त्याच्या देवतेचे स्थान नगण्य ठेवायचे. जीवनाचे प्रेम आणि सुखांची ओढ प्रचंड म्हणून प्रतिपाळ करणाऱ्याला अवतारांच्या रूपाने घरात, नगरात, आणि मंदिरात मंगलतेचे प्रतीक बनवून त्याच्या लीलांचे प्रेममय वर्णन करून मधुरा भक्तीची नवीन परंपरा सुरु करायची आणि अनर्थकारी आणि अतर्क्य मृत्यूला भिउन संहारकर्त्याला वेशीबाहेर; आपल्या प्रेममय, मंगलमय, सुखी जीवनापासून दूर ठेवायचे. कुठे ? तर मसणात. बनारस किंवा वाराणसीला आपण ओळखतो तेच मुळी त्याच्या मृत्यूशी असलेल्या गाठीमुळे. संहाराची देवता महादेवाचं हे क्षेत्र. महादेव आपण बहाल केलंय स्मशान. मराठी बोलीभाषेत मसण आणि हिंदी बोलीभाषेत मसान. हे बनारस म्हणजे अखिल हिंदूंचे सर्वात मोठे मसान.

आपण जरी या त्रिकोणी रचनेत बऱ्यापैकी स्थैर्य शोधले असले तरी मुळात निसर्ग फिरतोय वर्तुळात. ज्याला नसतो आरंभ आणि नसतो अंतदेखील. प्रत्येक बिंदू असतो त्याच्या मागील बिंदूचा अंत तर त्याच्या पुढील बिंदूचा आरंभ. प्रत्येक बिंदू असतो निर्माता आणि संहारकर्ता देखील. म्हणूनच आरती प्रभू म्हणाले असावेत,

अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी

वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी

देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी

हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे ।।

परंपरेला मानणाऱ्या सर्वांचा अंत त्यांचा अस्त होण्याआधीच होतो आणि परंपरे विरुद्ध हळी देणारे सारेच हुतात्मे होत असतात .

एकूण काय, विकासाचे सुख अशाश्वत ठरून शाश्वत राहतो फक्त आरंभ आणि अंत. आपल्याला आवडो किंवा नावडो, उत्पत्ती आणि विनाश हे दोनच बिंदू शाश्वत ठरतात आणि त्या दोघांमधील भासमान अंतरातील आपल्या वाटचालीला आपण उगाच विकासाचे, प्रगतीचे, उन्नतीचे गोंडस नाव देऊन त्यात आपले सुख शोधत असतो.

मी आधी म्हटल्याप्रमाणे हे दोन बिंदू वेगवेगळे नसून प्रत्येक बिंदू दोन्ही कामे करीत असतो, एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे. जी निर्मिती तोच संहार. जो ब्रह्मा तोच महेश. इकडून पाहिला तर ब्रह्मा आणि तिकडून पाहिला तर महेश.

विष्णूला खरं तर निसर्गात स्थान नाहीच. असलेच तर नाण्याच्या जाडीएव्हढे भासमान कार्यक्षेत्र विष्णूचे. निर्मिती म्हणजेच विनाशाच्या ह्या अविरत चक्रात भांबावून बुडणाऱ्या आपल्या अस्तित्वाला काडीचा आधार म्हणजे विष्णू आणि त्याचे अवतार.

जीवनदात्री निसर्गदेवता म्हणून जिचे पूजन करावे ती आहे खरी तर निर्दय मृत्युदेवता आणि आपले जीवन म्हणजे म्हणजे या मृत्युदेवतेचे तांडव करण्याचे ठिकाण … स्मशान - मसण, शमशान - मसान. असे माझे आकलन होते.

पण तुमचे परिशीलन वाचल्यावर; जीवन समुद्राच्या लाटेवर स्वार या ओंडक्यांच्या एकत्र राहाण्याच्या वेळेचा आलेखाची, वेगवेगळ्या प्रतलात एकाचवेळी चालणाऱ्या वेगवेगळ्या जीवांच्या या चित्रपटातील कथांची तुम्ही मांडलेल्या संगतीमुळे माझ्या आकलनाला एक नवीन आयाम मिळाला.

आपले बिन्दुरूपी जीवन एक भरीव बिंदू नसून ते देखील एक पोकळ छोट्या परिघाचे वर्तुळ आहे आणि मागील पिढ्यांची बिन्दुरूपी वर्तुळे पुढील पिढ्यांच्या बिन्दुरूपी वर्तुळांना कायम छेदत आहेत. काहींच्या बिंदूचा परीघ त्यांच्या मागच्या आणि पुढच्या बिन्दुन्पेक्षा मोठा असल्याने तो दोन तीन पिढ्यांना आपल्या आवाक्यात घेत आहे. त्यामुळे दोन तीन पिढ्यांना थोडा अधिक काळ शाश्वततेचा आभास होत आहे. पण शेवटी हरमन हेसेच्या सिद्धार्थला वसुदेवाने दिलेल्या दृष्टांतात दिसल्या प्रमाणे सर्व बिंदू आपापले दु:ख उपभोगीत आहेत. कधी कळत तर कधी नकळत. आणि जीवनगंगेच्या तीरी आयुष्यरूपी बनारसच्या मसणात ब्रम्हारूपी महेशाची निर्मितीतून विनाशाची किंवा महेशरूपी ब्रम्ह्याची विनाशातून निर्मितीची लीला कायम चालू आहे.

मसान वेशीबाहेर नाही तर आपण सर्व मसणातच आहोत.

पॉर्नबंदी


२०१६मध्ये केंद्र सरकारने पॉर्न बंदी करण्याचा प्रयत्न केला.  एका आठवड्यात मोडून पडला. त्यावेळी मित्रांशी झालेला संवाद



माझ्या आवडत्या लेखिका इरावती कर्वे बाई त्यांच्या काळातील पिवळ्या कव्हरच्या पुस्तकांबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या की वाचून किंवा चित्रे बघून माणसाला मिळणारे सुख जास्त हवे हवे वाटते. कारण त्यात शारीरिक मेहनत नसते. मनात विचार आले की ते प्रत्यक्षात आणण्यासाठी बर्याच गोष्टींची जुळवाजुळव करायला लागते. जोडीदार, त्याचा मूड, जागा, वेळ आणि स्वतःची इच्छा सगळ्यांची जुळवाजुळव करताना बऱ्याचदा इच्छेची तीव्रता कमी होते आणि त्यानंतरदेखील प्रत्यक्षात अनुभव घेताना, जागेची योग्यता, त्या वेळेची आल्हादकारकता, संपूर्ण वातावरणाचा परिणाम, जोडीदाराचा मुखश्वासगंध आणि होणारे शारीरिक श्रम यामुळे अनुभव कल्पनेच्या तोडीस तोड असेल याची खात्री नसते.

याउलट जेव्हा शरीरभोगांची वर्णने पुस्तकात येतात, चित्रात दिसतात किंवा चित्रपटात पाहायला मिळतात तेंव्हा हे जागेचे, वेळेचे, वातावरणाचे, घामाचे, गंधाचे आणि श्रमाचे परिणाम भोगावे लागत नाही आणि मेंदूला मात्र सर्व समाधान मिळते. संपूर्ण शरीराऐवजी केवळ डोळे आणि मेंदू हे दोनच अवयव बाकी सर्व अवयवांचे काम करतात. गंध आणि स्पर्शदेखील केवळ कल्पनेने अनुभवाला जातो. म्हणून पिवळी पुस्तके आणि कामुक चित्रपट बहुतेकांना खासगीत तरी आवडतातच.

ज्या गोष्टींमुळे मेंदूला श्रमाशिवाय मिळणारे गंमत हवीहवीशी वाटते त्याच गोष्टींच्या अभावाने मग मेंदूला मिळणारे दृष्टिसुख कमी वाटू लागते. मिळणाऱ्या झिणझिण्या कमी होऊ लागतात. अनुभवांची तीव्रता जाणवेनाशी होते. मग सुरु होते केवळ शब्दातून किंवा चित्रातून किंवा कलाकारांकडून मेंदूला पटकन उद्दीपित करू शकेल, बोथटलेल्या जाणिवांना धक्का देऊ शकेल, अश्या कलाकृतीची अपेक्षा. मग कला कुठे संपते आणि क्रौर्य कुठे सुरु होते हे कळण्याचा मार्ग नसतो.

सभ्य समाजात समाजघटकांना होणाऱ्या सर्वच नाही तरी शक्य तितक्या भावनांचे विरेचन होणे आवश्यक असते. यात एक विरोधाभासी गंमत अशी की विरेचनाची साधने नसल्यामुळे किंवा मुबलक प्रमाणात असल्यामुळे दोन्ही वेळेस समाजात बुभुक्षितपणाच वाढीला लागतो.

म्हणून सरकारचे आणि नागरिकांचे काम केवळ साधनांच्या नियंत्रणाचे नसून समाजाला जाणवणाऱ्या भावना आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीशी सांधून घ्यायला शिकवणे हे देखील असते. त्यामुळेच आपल्या भावनांबद्दल अपराधी वाटण्याऐवजी किंवा त्यासाठी नैतिक- अनैतिक किंवा कायदेशीर - बेकायदेशीर मार्ग चोखाळण्याऐवजी समाज अधिक जबाबदार होऊ शकेल.

नाहीतर खजुराहो आणि वात्स्यनांची भूमी, राधा कृष्णाच्या बिन लग्नाच्या प्रेमाची मंदिरे बांधणारी भूमी खोट्या नैतिकतेखाली कुंभ मेळ्यात आणि नवरात्रोत्सवात कंडोमच्या होणाऱ्या वाढत्या खपाबद्दल आश्चर्य व्यक्त करत बसेल.



माझ्या कालच्या इरावती कर्वे बाईंच्या लेखनावर आधारीत लेखावर लिहिलेल्या कमेंट आणि पोस्ट वर आलेल्या प्रकट आणि खाजगी प्रतिक्रियांवर विचार करताना सुचलेले विचार इथे मांडतो आहे


ओमकार, आपल्या समाजावरची तुझी व्यक्ती आणि समष्टी वाली कमेंट वाचताना जाणवले कि, आपल्या भारत देशाचे प्रश्न फारच वेगळे आहेत …. इंग्रजांच्या गुलामीतून मोकळे झालेले इतर देश इंग्रजी आक्रमणापूर्वी सामाजिक, वैचारिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत होते या उलट जाती पातीमध्ये आणि जुन्या अंधश्रद्धामध्ये अडकलेला भारतीय समाज वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत असला तरी सामाजिक आणि वैचारिक दृष्ट्या खूपच प्रगत होता …. त्यामुळे इंग्रजी अमलाखालील इतर देशांच्या इतिहासाचे सरळ सरळ दोन भाग पडतात,

१) इंग्रजी राज्याच्या आधीचे अंधार युग ,
२) आणि इंग्रजी राज्याच्या नंतरचे नवीन युग

ज्यांना समाज हि संकल्पना माहिती नव्हती त्यांनी एक भाषा, एक धर्म, एक देव आणि व्यापाराची एक संस्कृती असलेली देशाची संकल्पना इंग्रजांकडून उचलली आणि तिथपासूनच त्यांच्या देशाचा इतिहास सुरु होतो ….

भारताचे मात्र तसे नाही…. इंग्रजी अंमल चालू होण्यापूर्वी आपण जन्म मृत्यूच्या आणि कर्म सिद्धांताच्या वर्तुळाकार चक्रात फिरणारा एक संस्कृतिपूर्ण समाज निर्माण केला होता … या समाजात पाश्चात्यांप्रमाणे देशाची एकरेषीय संकल्पना नसली तरी वेगवेगळी सार्वभौम राज्ये असलेली अनेकदा लयाला जाऊन मनात कायम तेवत असलेली राष्ट्राची संकल्पना होती….

या केवळ संकल्पनारूपी राष्ट्रात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या चालीरीती, भाषा, खाद्य संस्कृती, कुटुंब व्यवस्था गुण्यागोविंदाने नांदत होत्या. चर्चिल ने सांगितलेल्या एका भाषेने आणि एका देवाने जोडला गेलेला आणि एका राजाशी निष्ठा ठेवणारा असा आपला देश कधीच नव्हता …. काही भागात स्त्री सत्ताक पद्धती होती तर काही भागात पुरुष सत्ताक. काही भागात अनेक पत्नी असणे तर काही भागात अनेक पती असणे समाज मान्य होते. काही भागात योनी पूजा तर काही भागात लिंग पूजा प्रचलित होती. काही भागात कनिष्ठ वर्णीयांच्या स्त्रिया वरिष्ठ वर्णीयांच्या कायम सेवेसाठी होत्या तर काही भागात रोटी बेटी व्यवहार आणि शरीरसंबंध पूर्णपणे नियंत्रित होते. काही ठिकाणी खजुराहोचे उन्मुक्त प्रदर्शन आणि कामाख्येची पूजा होती तर काही ठिकाणी ब्रह्मचारी हनुमंत पूजनीय होता… इंग्रजांशी लढून स्वतंत्र केलेला हा देश कधी देश नव्हताच मुळी.

त्यात पुन्हा भर पडते ती आपल्या वर्तुळाकार इतिहासाची. पाश्चात्य संस्कृती एक रेषीय आहे. पुढील पिढी केवळ त्यांच्या मागील एका पिढीचे अनुकरण किंवा उल्लंघन करते पण कोणी मागच्या च्या मागच्या पिढीचे अनुकरण करत नाही. येशू आवडला ना मग आदम, मूसा वगैरे विसरून जायचे. मुहम्मद आवडला ना मग येशूला पण विसरून जायचे. अब्राहम, इसाक, इस्माइलचे नाव घ्या पण नियम पाळायचे शेवटच्या प्रेषिताचे. त्यामुळे समाजात एकाच बिंदूतून निघून वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या नवीन रेषा तयार होत असतील पण सर्व रेषा अंतहीन आणि सरळच रहातात वर्तुळाकार होत नाहीत. या उलट भारतीय समाजाच्या वर्तुळाकार पद्धतीत प्रत्येक नवीन पिढी वर्तुळाच्या केंद्रबिंदूत जन्म घेते आणि हळू हळू परीघामध्ये रूपांतरित होते. त्यामुळे प्रत्येक नवीन पिढीला आपल्या इतिहासाचा आरंभबिंदू स्वतःच्या मागे न मिळता स्वतःच्या समॊर विस्तारणाऱ्या परिघात बघत येतो … त्यामुळे एकमेकांशी असंबद्ध असा सगळाच भूतकाळ आपल्या इतिहासाचा भाग होतो. कोणी एकपत्नी रामाचा आदर्श ठेवतो तर कुणी अनेकपत्नी कृष्णाचा. कुणी खजुराहोला आपलेसे करते तर कुणी ब्रह्मचारी हनुमंताला. कुणी सती प्रथा मानतो तर कुणी विधवा विवाह. कुणी जातीप्रथा मानतो तर कुणी वसुधैव कुटुंबकम. कुणी जरठकुमारी विवाह मानतो तर कुणी त्याला चिमुकल्यांचे लैंगिक शोषण.

मग ह्या प्राचीन वैविध्यपूर्ण राष्ट्राचे रूपांतर एका विकसित देशात करायचे तरी कसे ?

कदाचित जास्त आततायी वाटेल पण मला वाटते कि इतर कुठल्याही देशाने न सोडवलेला पेच आपल्या देशासमोर आहे तो म्हणजे विस्तृत आणि विविधतापूर्ण प्राचीन इतिहासामधून पुढील काळासाठी जे उपयोगी पडेल तो इतिहास निवडून घेण्याचा. अश्या निवडा निवडीत बरेच जन समूह दुखावले जातील आणि ज्यांच्या हाती हे काम देऊ ते एकाचवेळी इतिहासाचे जाणकार आणि भविष्याचा खोल वेध घेऊ शकणारे दूरदर्शी असावे लागतील. अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्व कमीच असतील त्यामुळे आपला इतिहास ठरवण्याच्या या कर्मकठिण प्रयत्नाला एका व्यवस्थेचे रूप द्यावे लागेल. जे घेतले ते का घेतले त्याची कारणे स्पष्ट ठेवावी लागतील आणि जे सोडले त्याला फेकून न देत त्याचे प्रेमपूर्वक विसर्जन करावे लागेल. सोडलेल्या त्या इतिहासाला नाकारून गाडून टाकायचे नसून, त्याला केवळ एक कालवश झालेल्या परंतू अमुल्य आणि प्रिय अश्या खापरपणजोबांचे रूप द्यावे लागेल. सद्य स्थितीत आपल्या समाजाकडे इतकी प्रगल्भता नसेल कदाचित पण भाषावार प्रांत रचनेचा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी करून आपण १००% नाही तरी विशेष उल्लेखनीय श्रेणीत पास होण्याची क्षमता तर नक्कीच दाखवली आहे .

मी आणि नाविक चिरतरुणी

मला काही कळण्याच्या आधीच मी नात्यात पडलो. म्हणजे माझे रक्ताचे नातेवाईक आणि हे नाते जिच्याशी होणार होते ती, असे सगळे जण माझ्या आगमनाची वाट पहात आधीच तयार होते. मग मी एखाद्या  पुढाऱ्याप्रमाणे अगदी उशीरा या जगात दाखल झालो. आता मला तो समारंभ तितकासा आठवत नाही. पण बहुधा माझ्या आगमनानंतर सगळ्या नातेवाईकांनी माझे डोळे भरून दर्शन घेतले असावे. आणि ज्याच्यामुळे आपण आई, बाबा काका, मामा, मावशी, आजी, आजोबा झालो तो जीव कसा जीव तोडून रडतो आहे याबद्दल माझे कौतुक केले असावे. त्या सोहळ्याबद्दल बाकी काही आठवले नाही तरी त्यात माझा धाकटा भाऊ आणि ती, हे दोघेही नव्हते हे मला नक्की आठवते आहे.  

माझ्या आईवडिलांचे मी पहिले अपत्य. लहानपणी मी फार मस्तीखोर असावा. म्हणजे तसे काही ठोस पुरावे नाहीत.  पण सरकारी धोरणांवर कायम टीका करणाऱ्या माझ्या तीर्थरूपांनी, माझ्यानंतर केवळ एकाच भावंडाला जन्म देऊन झाल्यावर लगेच 'हम दो हमारे दो' चा नारा दिला. माझ्या जन्मानंतर साधारण चोवीस वर्षांनी आम्ही घर बदलल्यावर आमचे शेजारी लगोलग आमच्या मागे नवीन घरी शेजार थाटायला आले नाहीत.  मी क्रिकेट वगैरे खेळून खिडक्यांची तावदाने फोडू नयेत म्हणून सगळ्यांनी लाकडाच्या खिडक्या माझ्या जन्माआधीपासूनच बसवून घेतल्या होत्या. आमच्या घरासमोरच्या मोठ्या मैदानात गोट्या खेळण्यासाठी मी ठिकठिकाणी करून ठेवलेल्या गल्लींना (खोलगट खड्डयांना) कंटाळून शेवटी मालकाने तिथे दुसरी चाळ बांधली. इतकंच काय पण शाळेत देखील दरवर्षी शिक्षक दिनाला सर्व शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना गुलाबाचे फूल देऊनसुद्धा  शाळेने किंवा शिक्षकांनी मला कधीच प्रेमाने एकाच इयत्तेत बसवले नाही, दहावी झाल्यावर शाळा सोडल्याचा दाखला तर न मागता लगेच देऊन टाकला. या सर्वांवरून मी इतकाच निष्कर्ष काढू शकतो की लहानपणी मी फार मस्तीखोर असावा. माझ्या या मस्तीखोरपणात सगळ्यात मोठा वाटा तिचाच होता. तिनेच माझ्यातल्या कल्पनाशक्तीला पंख लावले.  ती मला आनंदी कावळ्याची गोष्ट जगून दाखवत होती. आणि तसेच जगण्यासाठी अजूनही उद्युक्त करते आहे.

मी तिच्या अंगाखांद्यावरच वाढलो. आणि आज जरी आम्हा दोघांत दुरावा दिसत असला तरी मनाने मी अजून तिचाच आहे. तिला मी काही दिले नसले तरी तिने मात्र मला भरभरून दिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने मला जगाकडे बघायचं कसं ते माझ्याही नकळत शिकवलं. सुखाचा शोध घेताना समाधानी कसं रहायचं ते शिकवलं. मी शिष्योत्तम नसलो तरी तिच्याबरोबर घालवलेल्या आयुष्याचा ठसा काही प्रमाणात माझ्यावर पडला आहे.

ती फार उंच नव्हती. दिसायला सुबक सुंदर पण नव्हती. खरं सांगायचं तर ओबडधोबडच होती. पण प्रेमळ होती.
बैठी, लांबलचक पसरलेली, मंगलोरी कौले असलेली बारा अधिक दहा घरांची आमची चाळ आजही मनात घट्ट रुतून बसली आहे.

आजचं आमचं डोंबिवली म्हणजे जुन्या छोट्या छोट्या गावांचं आणि पाड्यांचं एकत्रीकरण करून झालेलं शहर. पूर्वी इथे मोठ्या प्रमाणावर शेती चालायची. अश्याच शेतात मग तिथल्या गाववाल्यांनी चाळी उभ्या केल्या आणि गिरणगावात किंवा गिरगावात जागा घेणं न परवडणारे अनेक चाकरमानी इथे राहायला आले. एक दिवस खाचरातून, चिखलातून रस्ता काढत माझे तीर्थरूप देखील इथे आले आणि इथलेच झाले. इथे आल्यावर त्यांचं लग्न झालं. आयुष्याला स्थैर्य आलं. ते माझा जन्म होईपर्यंतच टिकलं. इथेच त्यांनी आयुष्याबाबत स्वतःची स्वप्नं बघितली, त्यासाठी मन लावून झटले आणि त्यातली बरीचशी स्वप्नं पूर्ण होत असताना ते चाळीतल्या आपल्या छोट्या घरात समाधानी राहिले. मला वाटतं माझं चाळीवरचं प्रेम माझ्या वडिलांकडूनच आलं असावं.

आमची चाळ खरी बारा खोल्यांची. पण मग चाळ मालकिणीच्या नातेवाईकाने त्याच्या मालकीच्या जागेच्या हिस्स्यावर बांधण्याच्या चाळीचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने एक भिंत कमी बांधण्यासाठी आपली दहा खोल्यांची चाळ आमच्या चाळीच्या वरच्या अंगाला चिकटून बांधली. त्यामुळे आकाशातून ती एक बावीस डब्यांची लांबलचक मालगाडी  दिसत असावी.

चाळीच्या शेवटच्या टोकाला सोनचाफ्याचं झाड होतं. त्यावर चढून त्याला गदागदा हलवून आम्ही मुलं सोनचाफ्याचा सडा खाली पाडायचो. मग त्या फुलांच्या प्रत्येक पाकळीला मध्ये हलकेच दुमडून नखाने एक छोटं गोल छिद्र पाडून, त्या पाकळीला उलटं वळवून  देठात गुंफून त्याची अंगठी तयार करायचो. कश्यामुळे कोण जाणे पण आम्ही त्या अंगठ्यांना वनवासी सीतेच्या अंगठ्या म्हणायचो. अगदीच लहान असताना खराट्याच्या काड्यांचे धनुष्य खांद्यावर, त्याच खराट्याच्या काड्यांचे बाण बनियनच्या भात्यात आणि सीतामाईच्या ह्या अंगठ्या दोन बोटांच्या बेचक्यात मिरवणं हा आम्हा मुलांचा छंद होता.  शाळेत शिकवलेला घडीचा जपानी पंखा सोडल्यास या अंगठ्या ही मला जमलेली एकमेव हस्तकला होती. चाळीत समवयस्क मुली कमी होत्या त्यामुळे आम्ही बनियन चड्डी धारी चिमुकले राम लक्ष्मण, सीताहरण होऊन गेल्यानंतर सीतेला शोधायला निघाल्यासारखे दिसत असू.

त्याच चाफ्याच्या झाडावर फांद्या वठल्यामुळे दोन ठिकाणी इंग्रजी व्ही आकाराच्या बेचक्या तयार झाल्या होत्या. त्या नैसर्गिक बेचक्यात प्रत्येकी एकंच जण बसू शकत होता. रावण व्हायला कुणीच तयार नसल्यामुळे, राम लक्ष्मणांची एक जोडी लवकर जाऊन त्या बेचक्यांची जागा पकडून बसून खाली उभ्या असलेल्या बाकीच्या राम लक्ष्मणांवर शरवर्षाव करीत असे. अश्या तऱ्हेने या अभूतपूर्व युद्धाद्वारे, आम्ही राम लक्ष्मणांना 'आपुला संवाद आपणाशी' च्या धर्तीवर 'आपुलेची युद्ध आपणाशी' करण्यात भाग पाडून वाल्मिकींच्या रामायणात तुकोबा आणि मायावी गृहयुद्ध घुसडत होतो. युद्धात जो उंचावर असतो त्याची सरशी होऊ शकते हा युद्ध शास्त्राचा पहिला नियम, वेढा नीट आवळून जर उंचावरच्या शत्रूची शस्त्रास्त्रांची रसद तोडली तर आपण उंचावरच्या शत्रूला देखील हरवू शकतो हा दुसरा नियम आणि युद्ध संपल्यावर खराट्याच्या काड्या गोळा करून ठेवायच्या नाहीतर परब काकू ओरडतात हा तिसरा नियम आम्ही सगळी मुलं लहानपणीच शिकलो.

चाफ्याच्या झाडाच्या बाजूला एक चिंचेचं झाड होतं आणि चाळीच्या मागे गावठी आंब्याचं. दोन्ही झाडांची खोडे सरळसोट उंच वाढली होती. त्यामुळे त्यावर चढणे अशक्य होते. मग खाली पडलेल्या चिंचा आणि बाळकैऱ्या वेचणं हा पोराटोरांचा आवडता उद्योग होता. चिंचा कैऱ्या पाडण्यासाठी रबरी बेचक्या वापरायचा प्रयोग आम्ही एका दुपारी केला पण त्यामुळे इच्छित फळ मिळण्याऐवजी आधी तीन चार जणांची कौले फुटली मग आम्हा बेचकीधारकांची कानशिले लाल करण्याचा आनंद, प्रथम पीडित कुटुंबांनी आणि मग ज्याच्या त्याच्या आईवडिलांनी यथेच्छ लुटल्यामुळे बेचक्या पुन्हा चाळीत दिसल्या नाहीत.

चाळ बैठी होती. आटोपशीर होती. तिला गिरगावातील चाळींचा किंवा साहित्यात प्रसिद्ध झालेल्या चाळींचा नखरा नव्हता. घरं छोटी छोटी होती. इतकी छोटी होती की आमच्या अशिक्षित मालकीणबाईने टॉल्स्टॉयची "How much land does a man require?" ही कथा वाचली असावी अशी शंका मनात यावी.  प्रत्येक घराच्या मधोमध एक अर्ध्या उंचीची भिंत. तिच्या अलीकडच्या बाजूला दारातून आत शिरताच हॉल कम डायनिंग कम बेडरूम आणि पलीकडच्या बाजूला किचन कम बाथरूम. अशी साधी सोपी सरळ रचना होती. सगळा मिळून दीडशे स्क्वेअर फुटाचा पसारा की ज्या योगे अपरिग्रह हे मूल्य सगळ्या बिऱ्हाडकरूमध्ये आपोआपच रुजले. मालकीणबाईंनी चाळ बांधताना केलेल्या तडजोडीमुळे दोन घरात एक भिंत सामायिक, अशी रचना होती. त्यामुळे एका बिऱ्हाडात केलेली खुसफूस दुसऱ्या बिऱ्हाडात इतकी सहज ऐकू जायची की 'भिंतीना कान असतात' ही म्हण मुळात "भिंतीना तोंडे असतात" अशीच असावी हा माझा संशय अजूनही फिटलेला नाही.

जे आवाजाचं तेच वासाचं. संध्याकाळी एका घरात भाजीला दिलेली फोडणी, दोन्ही दिशांना, शेजारच्या किमान तीन घरात आमोद सुनांस करीत होती. जोशी अन पेंडश्यांना देखील आज परबांकडे पापलेट आहेत की बोंबील हे नुसत्या वासाने सांगता येत होते. भोईर आणि साळुंख्यांच्या घरचे लसूण देवस्थळींच्या गोडांबट वरणाला घमघमवत होते. माणसांचेच काय पण चाळीत सऱ्यावरून फिरणारे उंदीर देखील खोबऱ्याचा वास नक्की कुठल्या बिऱ्हाडातून आला ते न कळल्याने बऱ्याचदा बावीस घरे ओलांडत सऱ्यावरून उलट सुलट चकरा मारत रहात. उंदरांच्या या धावपळीमुळे, इतिहासाच्या पुस्तकातलं, शिवाजी महाराज सुरत लुटायला जाण्याचं वर्णन, "पहाडातले उंदीर धावत होते सुरती बर्फीच्या दिशेने" असं वाचल्यावर मला बराच काळ,  सुरतेच्या मोहीमेला मावळे कौलारू घरांच्या सऱ्यावरून गेले असावेत असं वाटत होतं.

प्रत्येक घरापुढे अंगण होतं. दिवाळीच्या दहा पंधरा दिवस आधी लाल मातीवाला यायचा. मग ती माती विकत घेऊन, अंगणात त्याचा एक ढिगारा करून ठेवायचा. कारखान्यात कामाला जाणाऱ्या पुरुषांना शुक्रवारी तर ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना रविवारी सुट्टी मिळायची. मग जसा वेळ मिळेल तसे सगळे पुरुष लोक आपापल्या अंगणातील ढिगारा वापरून अंगण सारखे करायचे. त्यावर पाणी मारून, धुणी धुवायचा सोटा वापरून ते चांगलं चोपून काढायचे. मग पुन्हा त्यावर शेण टाकून ते छान सारवून घ्यायचे. नऊ साडेनऊला झोपी जाणारी आमची चाळ त्यावेळी मात्र उशीरापर्यंत जागी असायची. कुणाचंही अंगण चोपायचं असलं तरी आम्ही सगळे बच्चेकंपनी त्याच्या मदतीला जायचो. दिवाळीत या अंगणावर सगळ्या बायका छान रांगोळ्या काढायच्या. नेहमी आईला रांगोळी काढण्यात मदत करता करता एकदा मी स्वतः एकट्याने रांगोळी काढायचं ठरवलं. अर्धी रांगोळी काढून झाल्यावर माझ्या  लक्षात आलं की अठरा ठिपके अठरा ओळीच्या माझ्या महत्वाकांक्षी रांगोळीत मी केवळ सतरा ओळीच काढल्या होत्या. आता कुठल्याही क्षणी माझ्या डोळ्यात तरंगणाऱ्या गंगा यमुनांच्या लोटात माझी रांगोळी वाहून जाणार अशी परिस्थिती तयार होत असताना, शेजारच्या दोन तीन तायांनी येऊन माझी जुनी रांगोळी भरभर आवरून पुन्हा मला अठरा ठिपके अठरा ओळी घालून दिल्या होत्या ते चांगलं आठवतंय.

आमच्या या छोट्या घरांच्या छोट्या अंगणांपुढे एक मोठे मोकळे मैदान होते. मैदानाच्या शेवटच्या टोकाला पापडीची झाडं होती. हिवाळ्यात त्याच्या पापडी सुकून चाळभर उडायच्या आणि आम्ही मुलं त्या गोळा करून त्याच्यावरचे पातळ आवरण काढून त्या खात बसायचो. चारोळीसारख्या लागणाऱ्या या पापडी खाणे हा आम्हा मुलांचा आवडता उद्योग होता. मैदानाच्या पलीकडे बांबूचं बन होतं. त्यातले बांबूचे कोवळे कोंभ काढून त्याला उलगडून त्या पानाचा किंचित खरखरीत तलमपणा, हलका पोपटी पांढरा रंग आणि ओलसर सुवास अनुभवणे हा अजून एक खेळ होता. पापडीच्या झाडाखाली जमिनीतून वर आलेले मोठे मोठे दगड होते. झाडाच्या सावलीत या दगडांवर बसून मी अनेकदा, चिंता करतो विश्वाची च्या आविर्भावात आजूबाजूच्या धुळीत काठीने रेघोट्या मारत बसायचो. पण मग मित्र मंडळी आली की ही चिंता कुठल्या कुठे पळून जायची.  

शाळेतून आल्यावर आम्ही सगळी मुलं मुली या मैदानात पडीक असायचो. फार लहान मुले पकडापकडी, शिवाजी म्हणतो, दगड की माती असले खेळ खेळायची. तर थोडी मोठी मुले विषामृत, लगोरी, डब्बा ऐसपैस, लपंडाव, चोर-पोलीस, गोट्या, आबाधुबी आणि नंतर क्रिकेट सुद्धा तिथेच खेळायची.

क्रिकेट लोकप्रिय होण्याच्या आधी आमचा आवडता खेळ होता गोट्या. रिंगण, गल्ली वगैरे खेळून दुसऱ्या कडच्या गोट्या जिंकून घ्यायच्या आणि आपल्याकडील संग्रह वाढवून जगातील गोटी सम्राट बनायचे असे आम्हा साऱ्या चाळकरी मुलांचे स्वप्न होते. त्याकाळी ऑलिम्पिक मध्ये गोट्यांचा खेळ असता आम्ही चाळकरी मुलांनी सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकच काय पण उत्तेजनार्थची प्रशस्तीपत्रकं देखील जिंकून भारतमातेला खूष करून टाकलं असतं. हळू हळू गोट्यांचं वेड निवळलं आणि त्याची जागा क्रिकेटने घेतली. सगळ्यांकडे क्रिकेटची सगळीच साधने नसल्याने, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे आम्हाला मान्य करावे लागले. कुणी बॉल आणायचं, कुणी बॅट असा सगळा मामला होता. स्टंप, बेल्स, ग्लोव्ह्ज आणि पॅड ही थेरं आम्ही केली नाहीत. फलंदाजाच्या मागे ठेवलेले तीन दगड हेच स्टंप होते. आणि त्यांची उंची फलंदाजागणिक बदलायची. ज्याची बॅट आहे तो फलंदाज असला की हे स्टंप बुटके होऊन त्याला कधी आउट होऊ द्यायचे नाहीत आणि साधनविहीन फलंदाज आला की मात्र त्यांची उंची वाढायची आणि त्या बिचाऱ्याचा डाव झटपट आटपायचा. त्या काळात तेंडुलकर नसल्याने आम्हा मुलांच्या क्रिकेटने चाळीच्या मैदानाबाहेर धाव घेतली नाही. असं असलं तरी, चाळीतल्या या क्रिकेटमध्येच, आंतरराष्ट्रीय राजकारणात सदैव वापरात असलेला, 'ज्याची बॅट तो दोनदा किंवा तीनदा आउट झाला की मगच एकदा आउट' हा महत्वाचा नियम आम्ही सगळेजण शिकलो.

याच मैदानात कठपुतळीवाला खेळ करायला येऊन जायचा. गादीतला कापूस पिंजण्यासाठी आपली धनुकली घेऊन 'टोंय टोंय' असा आवाज करत पिंजारी यायचा. गांधी टोपी आणि खाकी हाफ पॅन्ट घातलेला कल्हईवाला यायचा.  पाटीला टाकी लावून देणाऱ्या बायका पाठुंगळीला लहान बाळ बांधून यायच्या. सगळ्यांचे कार्यक्षेत्र म्हणजे आमचे मैदान. पहाटे वासुदेव, दुपारी कडकलक्ष्मी आणि संध्याकाळी साईबाबांचे नाव घेत, धूप फिरवत आणि मोरपीसाचा झाडू डोक्यावर मारत फकीर यायचे. अमावस्येला 'अवस वाढा वो माय' म्हणत तर ग्रहणाच्या वेळी 'दे दान सुटे गिरान' म्हणत बायका यायच्या. चाळीने कुणाला विन्मुख पाठवले नाही. या  सगळ्यांनी दिलेल्या आशीर्वादाचे शब्द भिन्न असले तरी त्यांचा अर्थ एकंच होता.

एप्रिल महिन्यात परीक्षा आटपल्या की चाळीत वाळवणं सुरु व्हायची. लिज्जत लोकप्रिय होण्याच्या पूर्वीचा काळ असल्याने घरोघरी पापडाचं पीठ तयार केलं जायचं. कुणाकडे मीठ जास्त पडायचं तर कुणाकडे मिरी. त्याशिवाय सांडगे, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याच्या चकल्या, ताकातल्या मिरच्या, कुरडया आणि खारोड्या असा अधिकचा जिन्नस देखील बनायचा. घरात उभ्या करून ठेवलेल्या फोल्डिंगच्या खाटा मग बाहेर मैदानात यायच्या. आधी एक चादर मग त्यावर एक प्लॅस्टिकचा कागद अंथरला जायचा. त्यावर हे वाळवण मांडले जायचे. मग धूळ बसू नये म्हणून त्यावरून पुन्हा प्लॅस्टिकचा कागद पसरायचा. आणि मग ही मांडामांड उडू नये म्हणून चार कोपर्‍यावर दगड ठेवले जायचे. या कामी शेजारणी एकमेकींना मदत करायच्या. मध्ये मध्ये आम्हा पोराटोरांची लाट्या किंवा कच्चं पीठ खायला लुडबुड चालू असायची. आम्हाला दूर सारून उन्हं वर यायच्या आत कामं उरकण्याकडे त्यांचं सारं लक्ष असायचं. एकदा त्यांची कामं पूर्ण होऊन वाळवण सूर्यनारायणाच्या स्वाधीन केली की बायका आपापल्या घरी परतायच्या आणि मग गाईंनी वाळवण खाऊ नये, ओढून खाली टाकू नये म्हणून आम्ही काठ्या घेऊन त्याची राखण करत पापडीच्या झाडाखाली दगडावर बसायचो. "तळे राखी तो पाणी चाखी", ही म्हण आम्ही एकमेकांना इथेच प्रात्यक्षिकांसहित शिकवली.

एप्रिलच्या अखेरीस परीक्षेचा निकाल लागला की चाळ ओस पडायची. आमच्यासारखी गावी काहीच नसलेलया एक दोन कुटुंबांवर राज्याची जबाबदारी टाकून सगळी बच्चे कंपनी भरतासारखी आजोळी जायची. आणि मग उरलेल्यांचा वनवास सुरु व्हायचा. आजोळी गेलेले सगळे भरत आणि शत्रुघ्न  परतायचे जूनच्या पहिल्या आठवड्यात. तोपर्यंत चाळ सुस्त पडून राहायची. माझी वाचनाची आवड कदाचित या सक्तीच्या एकांतवासामुळे वाढली असावी.

जूनमध्ये शाळा सुरु व्हायचे वेध लागलेले असायचे. नवी पुस्तकं, रेनकोट किंवा लांब दांड्याच्या छत्र्या, गमबूट वगैरे नवीन खरेदी तरी व्हायची किंवा मागील वर्षीच्या वस्तूंना तेलपाणी केलं जायचं.  त्याचवेळी पुरुष माणसं  एका मोठ्या सोहळ्याच्या मागे लागलेली असायची. निळ्या, पोपटी, नारिंगी अश्या विविध रंगांची प्लॅस्टिकची मोठी कापडं आणली जायची. आणि पहिला पाऊस सुरु व्हायच्या आत पुरुष मंडळी शिड्या लावून कौलांवर चढून प्लॅस्टिकची ही आच्छादने कौलांवर अंथरत. हे मोठं जिकिरीचं काम असायचं. पाय घसरू द्यायचा नाही. कौलं फुटू द्यायची नाहीत. सुटलेल्या वाऱ्यात ते प्लॅस्टिक उडू द्यायचं नाही आणि मग ते प्लॅस्टिक दोन रांगा सोडून तिसऱ्या रांगेतील कौलांच्या खाली दाबून अख्ख्या घराला, वरुणराजाला भेटण्यासाठी तयार करायचं. इतकं करूनही कुठेतरी कौल नीट बसायचं नाही. मग पाऊस सुरु झाला की घरात ठिबक सिंचन सुरु व्हायचं. ते थांबवण्यासाठी मोठी काठी घेऊन हलक्या हाताने कौलाला खालून उचकून नीट करायला लागायचं. असं सगळं करून किमान एखादा आठवडा पाऊस झाला की मग चाळ न गळता पावसात मनसोक्त भिजू लागायची. शाळेतून येताना, वाहत्या पाण्यात गमबूट छप छप वाजवत, छत्रीतून बघताना, पागोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहू देणारी आमची चाळ मोठी लोभसवाणी दिसायची.  बऱ्याच घरासमोर पागोळ्याखाली एक दोन बादल्या भरायला लावलेल्या असायच्या. मग तेच पाणी हात पाय धुवायला किंवा कधी कधी कपडे भांडी करण्यासाठीही वापरलं जायचं.  त्या काळचं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा ना.

चाळीत गणेशोत्सव वगैरे साजरा होत नसे. पण चाळीतील मुलांची नाटकं, नाच वगैरे बसवून घेण्यात माझी आई पुढे असायची. मला नाच शिकवण्यापेक्षा पांगळ्यांना नाच शिकवणं सोपं आहे आणि मी नाटकात छान भूमिका करतो हे माझ्या आईला तिथे कळलं. माझ्या नृत्यकौशल्याबद्दलच्या मातोश्रींच्या मताला माझ्या लग्नानंतर हिने दुजोरा दिला.  पण केवळ भूमिकाच नाही तर मी एकंदरीत चांगलीच नाटकं करतो असं तिचं मत आहे.

ही बसवलेली नाटकं आणि समूहनृत्य मग आम्ही गणपतीच्या दिवसात डोंबिवलीतील ठिकठिकाणच्या गणपती उत्सवात करत असू. कधी कुठल्या सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर बांधलेल्या स्टेजवर तर कधी मंदिरात. कुठल्याही कार्यक्रमात प्रेक्षकांकडून कधीच नाराजीचा सूर उमटला नाही. त्यावरून डोंबिवलीच्या लोकांच्या रसिकतेच्या कक्षा रुंदावण्यात आणि कलेबाबतच्या धारणा सर्वसमावेशक करण्यात मी आणि माझ्या चाळकरी मित्र मैत्रिणींनी  मोठा हातभार लावला आहे, हे मान्य करून  मराठी रंगभूमी आमची सदैव ऋणी राहील याबाबत माझ्या मनात शंका नाही.

चाळीतली बरीचशी माणसं चाकरमानी होती. पण काही जणांनी आपापले व्यवसाय देखील चालू करून बघितले. एक शेजारी दर उन्हाळ्यात कोकणातून परतताना ट्रक भरून आंबे आणि फणस आणायचे. एका चाळकऱ्याने टेलरिंगचा कोर्स पुरा करून लोकांचे कपडे शिवून देण्याची तयारी दाखवली. एक पुरोहित होते. एकाने चिट फंड चालू करून बघितला. पण बहुतेक सगळ्यांनी मराठी माणूस धंदा करताना काय काय चुका करतो त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवायची जबाबदारी आपल्यावर आहे असे वर्तन केले. शेवटी कुणाकडे फारसा पैसा जमला नाही तरी धंदा करताना काय काय करू नये हे सांगण्याचा अनुभवजन्य अधिकार तयार झाला. हे सगळे चाकरमानी सकाळी साडेसातच्या आत घर सोडायचे. दीड दोन तास प्रवास करत मुंबई गाठायचे आणि मग कामे पूर्ण करून परतीचा प्रवास करत संध्याकाळी सात साडेसातला घरी परतायचे. चाळीत पुरुष माणसांची अशी भरती ओहोटी चालू असायची. सातच्या आत घरात हे तत्व कर्त्या पुरुषांकडूनच पाळले गेल्याने बाकीचे सगळे आपोआप घड्याळाच्या काट्यावर चालायचे.

माणसं फार धार्मिक नव्हती पण मूर्तिभंजक देखील नव्हती. कुणाकडे गजानन महाराजांची पोथी वाचली जायची तर कुणाकडे नवनाथ भक्तीसार. कुणाकडे खंडोबाची तळी भरली जायची तर कुणाकडे आठवले शास्त्री बुवांचा स्वाध्याय चालायचा. जो तो आपापल्या कुळाचाराला धरून होता आणि दुसऱ्याच्या कुळाचाराबद्दल कुणाला काही आक्षेप नव्हते. खाण्यापिण्याबाबतचे एकमेकांचे स्वातंत्र्य सगळ्यांना मान्य होते. लोक एकमेकांना धरून होते. कुणी कुणाकडून उधार उसनवार घेत नव्हते त्यामुळे फसवाफसवीचा प्रश्न नव्हता. भांडणे देखील क्वचितच व्हायची पण त्यामागे समोरच्याविषयी राग असण्याऐवजी परिस्थितीवरचा राग जास्त होता. कुणी कुणाची आय माय काढत नव्हता. काही पुरुषांच्या बोलण्यात शिव्या सहजस्वभावाचा भाग म्हणून येत होत्या पण त्या आपल्या मुलांनी देखील शिकाव्यात असा त्यांचा काही अट्टाहास नव्हता. कुणी कुणाचा दुस्वास किंवा हेवा करत नव्हते. पण एकाकडे आलेली वस्तू वर्ष दोन वर्षात बाकीच्या सगळ्यांकडे आलेली असायची. त्यामुळे रेडिओ, टी व्ही, मिक्सर, फ्रिज, टेपरेकॉर्डर, मुलांसाठी सायकली अश्या वस्तू एखाद्या लाटेसारख्या सगळ्या घरात येत गेल्या. आणि चाळीतलं समाधान कधी उतरणीला लागलं नाही.

बाकी सगळ्या बाबतीत वयं पंचाधिक शतं असणारे आम्ही बावीस बिऱ्हाडकरू, फक्त पोटे साफ करण्याच्या बाबतीत एकमेकांना पाठ लावून विरुद्ध दिशेने पाहात असू. आमच्या बारा खोल्यांचे संडास बाराव्या खोलीच्या डाव्या बाजूला तर पहिल्या दहा खोल्यांचे संडास पहिल्या खोलीच्या उजव्या बाजूला अशी विभागणी होती. इकडच्या लोकांनी तिकडे जाऊ नये असा अनाक्रमणाचा अलिखित करार आम्ही मुले कधी कधी निसर्गापुढे हतबल झाल्यामुळे मोडत असू. पण ज्याने त्याने पाणी घरून आणायचे असल्याने त्यावरून कधी भांडणे झाली नाहीत. बारा बिऱ्हाडात प्रत्येकी किमान चार डोकी या हिशोबाने दोन संडास आमच्या चाळीसाठी फार कमी होते त्यामुळे मेटाकुटीला येणे, घायकुतीला येणे, दम धरणे, धीर धरणे, प्राण कंठाशी येणे, जीव नकोसा होणे, बांध फुटणे या सर्व वाक्प्रचारांचा अर्थ माझ्या लेखी अनेक वर्षे "रांगेत उभे रहाणे" हाच होता. तिथे उभे असलेले रांगेतले सगळेजण, आतल्या समाधिस्थ उमेदवाराला इष्टदेवतेने लवकर मोकळं करून समाधीतून बाहेर काढावं म्हणून बाहेर प्रार्थना करीत उभे राहायचे. त्याची समाधी भंग करायला कोणी मेनका उर्वशी येणार नाही या जाणीवेने कधी हे रांगेतील समाधीच्छूक उमेदवार "ठोठावा म्हणजे उघडेल" या प्रभूवचनाचा हवाला देत आतल्या व्यक्तीला बाहेरील परिस्थितीची जाणीव करून देत. सगळे उपाय थकले की मग डोळे मिटून, शांतपणे बाहेरील रांगेतच, बाराव्या घराच्या भिंतीला टेकून कधी उजवा पाय तर कधी डावा पाय मुडपून उभे रहात आणि आपली तप:साधना चालू ठेवीत. ते पाहून मुळाक्षरांच्या तक्त्यावरचा, एका पायावर उभा असलेला बगळा देखील अश्याच कुठल्या रांगेत उभा असावा असा शोध बालवाडीत जाणाऱ्या धाकट्या माझ्या भावाने लावला होता.

जेंव्हा चाळ बांधली तेंव्हा सुरवातीला या दोन्ही संडासाची दारं चांगली असावीत पण नंतर त्याच्या कड्या निखळून पडायच्या किंवा पावसाळ्यात दारं फुगायची. त्यामुळे चाळकऱ्यांकडून  नोकरीसाठी आवश्यक अश्या  "knock before you enter" या नियमाचे सक्तीने पालन आणि धंद्यासाठी आवश्यक असा "लाथ मारीन तिथे पाणी काढीन" साठी लाथ मारण्याचा सराव या दारांनी येता जाता करून घेतला. त्यात कधी कधी कुणी खोडकर मुले आपला कार्यभाग आटोपून जाताना बाहेर कुणी नसले की दार पुन्हा घट्ट लावून, नंतर येणाऱ्या अनेकांना नशीबाच्या हवाली करून जात. आणि इतके करून जर दार उघडून बाहेर येणारा उमेदवार विडी पिणाऱ्या दोन चाळकऱ्यांपैकी असला तर बाहेर असणारे अनेक जण आपला नंबर स्वतःहून पुढच्या उमेदवाराला द्यायचे. आणि अत्यंत कठीण प्रसंगात सुद्धा आपण धीरोदात्तपणे इतरांचा विचार आधी करु शकतो त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवायचे.

चाळीने सगळे बदल पाहिले.पण चाळ गांगरली नाही. उलट ती सगळ्या बदलांना समर्थपणे सामोरी गेली.  समोरच्या मोकळ्या मैदानात नवीन चाळी उभ्या राहिल्या. अंगणे आक्रसली. मातीवाला येणे बंद झाले. उरलेली छोटी अंगणे चाळीने कोब्याची करून घेतली. त्यावर गेरू लावून आपली रांगोळीची हौस भागवली. ग्रामोफोन गेले आणि टेपरेकॉर्डर आले. लाकडी मांडणी आणि त्यावरची पितळी भांडी गेली आणि अॅल्युमिनियमच्या आटोपशीर मांडणीत स्टीलची भांडी आली. स्वयंपाकाच्या ओट्याखालचा पाटावरवंटा आणि खलबत्ता जाऊन ओट्यावर मिक्सर आला. नेहमीचा कल्हईवाला जेव्हा एका मोसमात आंबे आणि इतर वेळी सोलापुरी चादरी विकायला आला तेव्हा चाळीने त्याचे देखील स्वागत केले.

चाळीने भरपूर रेडिओ ऐकला आणि टीव्ही आल्यावर त्याला देखील आपलेसे केले. सकाळी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरचे भक्तिसंगीत ऐकणारी चाळ त्याच उत्साहाने टीव्हीवरील 'दस कदम' पहात फिट राहण्याचा प्रयत्न करू लागली. मैदानातील नवीन चाळीत गुजराथी कुटुंबे आली. त्यांनी त्यांचे फरसाण आणि चादरींचे उद्योग सुरु केले. उत्तर प्रदेशचे भैय्ये आले. त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरु केला. पण त्यांच्या पैसे कमावण्यावर कुणाला असूया वाटलेली दिसली नाही. सामुदायिकरीत्या काहीही साजरी न करणारी चाळ, मुलांनी चालू केली म्हणून होळीसाठी वर्गणी द्यायला आणि बोंब मारायला लगेच पुढे आली. गुजराथ्यांच्या गरब्यात नाचायला जाणाऱ्या घराच्या लेकींना चाळीने कधी नाही म्हटलं नाही. आणि रंगपंचमीत ज्याला रंग खेळायचे नाहीत त्याला कधी चाळीने रंगवलं नाही. दिवाळीत टिकल्या फोडणारी मुले नंतर लक्ष्मी बार आणि सुतळी बॉम्ब फोडू लागली. नंतर त्यांनी तेही बंद केले, पण चाळ हळहळली नाही. नवीन लहानग्यांच्या हातात तिने त्याच कौतुकाने केपांची पिस्तुले दिली.  तरुणपणी मायकेल जॅक्सन च्या ब्लॅक ऑर व्हाईटची गाणी मोठमोठ्याने लावणाऱ्या मुलांवर देखील चाळ तितकीच खूष होती जितकी ती त्याच मुलांनी लहानपणी स्वाध्यायाच्या वेळी गीताईचा बारावा आणि अठरावा अध्याय म्हणून दाखवल्यावर होत होती. चाळ माठातले गार पाणी पिताना खूष होत होती आणि मग त्याच उत्साहाने फ्रिजमधले थंड पाणी देखील पिऊ लागली. चाळीने मुलांची समूहनृत्ये, नाटके ज्या कौतुकाने पहिली त्याच कौतुकाने तिने व्हीसीआर वर आणलेला पिक्चरदेखील बघितला. चाळीने जुन्याबरोबर नव्याचेही कौतुक तितक्याच उत्साहाने केले.

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऎका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनि

ही केशवसुतांनी मागितलेली तुतारी आमची चाळ कायमच फुंकत होती.  

रिक्षा न करता रोज स्टेशनपर्यंत  चालत जाणारे बाप मुलांसाठी सायकली आणून देताना चाळीने पाहिले. आणि मुलगा अभ्यास करत नाही म्हणून कानफाट फोडणारे बापही पाहिले. चाळीने बालमानसशास्त्राचा प्रसार झालेला नसतानाही मुले व्यवस्थित मोठी होताना पाहिली. घरातला कचरा परसदारी टाकणारी बिऱ्हाडे पाहिली आणि डुकरानी गटार उकरून घाण करू नये म्हणून पूर्ण बारा घरांची गटार रविवारी साफ करणारा चाळकरीही पाहिला. संडासाच्या कड्या निखळतात आणि मालकीण काही करत नाही म्हणून धुसफुसणारे लोकही चाळीने बघितले आणि स्वतःच्या खर्चाने कड्या लावून घेणारे चाळकरीही बघितले. चाळीने गावी जाऊन उन्हाळा साजरा करणारी मुले बघितली आणि उन्हाळी शिबिरात जाणारी देखील. "आज कुठे तुमचा नाटकाचा दौरा?" असं म्हणून लहान कलाकारांना चिडवणारे चाळकरी देखील पहिले आणि त्याच मुलांना दूरदर्शवरील किलबिल कार्यक्रमात चमकवणारे चाळकरी देखील पहिले. सायंशाखेत जाणारी मुले पहिली आणि ज्युडो, कराटे, स्विमिंगला जाणारी देखील. ऋषिस्मरण वाचून भारावून गेलेली मुले खगोल मंडळात जाऊन विश्वाचा पसारा पाहून तशीच भारावलेली चाळीने पाहिली.

आता जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा मला वाटते आमची चाळ नाविक होती. स्त्री नाविक. त्यासाठी स्वतःच्या नावेतदेखील ती कालानुरूप बदल घडवून आणत होती.  तिने आम्हा सगळ्यांचा जीवनप्रवास पाहिला. सगळ्यांना प्रवाहाबरोबर पुढे जाण्यास मदत केली. ज्यांना पैलतीरावर जायचे होते त्यांना पैलतीरावर आणि ज्यांना ऐलतीरावर केवळ पुढे जायचे होते त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यात चाळ कायम गुंग होती. तुम्ही हेच स्थळ का निवडलेत प्रवासासाठी असा प्रश्न तिने कधी कुणाला विचारला नाही. जे चाळ सोडून गेले त्यांनाही तिने तोंड भरून आशीर्वाद दिले आणि जे चाळीतच राहिले त्यांना देखील तिने समाधानात ठेवले. सोडून गेलेल्यांच्या जागी आलेल्या नवीन भाडेकरूंना देखील तिने लगेच आपलेसे केले. त्यांच्या सुख स्वप्नांत ती लगेच सामील झाली.

मागल्या दिवाळीत चाळीत परत गेलो होतो. भराव घातल्याने आमची बुटकी चाळ थोडी अजून बुटकी झाल्यासारखी दिसत होती.  एक दोन घरे बंद असल्यामुळे त्यांच्या भिंतीवरचे प्लॅस्टर उडालेले दिसत होते. त्यांच्या दारापुढे अंधार होता. पण अजूनही चाळीत स्वच्छता होती. बाकीच्या राहत्या घराच्या कौलांना आकाशकंदील टांगलेले होते. छोटी मुलं भुईचक्र, अनार, फुलबाज्या लावत होती आणि त्यांचे दादा ताई मोबाईलवर त्याचे व्हिडीओ काढत होते. कौलांवरचे पाच सात आणि तेरा काड्यांचे अँटेना केबलने कधीच मोडीत काढले होते पण आता केबलला मागे टाकणारे डिश अँटेना कौलांवर दिसत होते. माझ्या मोबाईलवर मला एक दोन नवीन वाय फाय नेटवर्क दिसत होते. माझ्या जुन्या घराच्या शेजारचे बिऱ्हाडकरू बदलले होते. त्यांच्या दारात एक मोठी ताई संस्कारभारतीची रांगोळी काढायला सुरवात करत होती. आणि तिच्या शेजारी एक छोटासा मुलगा पाण्याने भरलेले डोळे घेऊन उभा होता. ती ताई त्याला सांगत होती, "ठिपक्यांचा कागद फाटला तर काय झालं, मी शिकवते तुला बिनठिपक्यांची रांगोळी." ते वाक्य ऐकताना मला माझ्या आणि चाळीच्या अदृश्य नात्याचं शब्दरूप ऐकतोय असं वाटलं.

ठिपक्यांची असो व संस्कारभारतीची, रांगोळी काढणे महत्वाचे. जागा  किंवा साधनांची कमतरता असेल तरी आपले अंगण, आपले जीवन सुशोभित करत रहायचे. ‘जुनं ते सोनं’ असलं तरी सरसकट जुन्याला कवटाळून बसायचे नाही. नव्याला अनुभव नसतो आणि स्थैर्य नसते पण म्हणून ते आपोआप टाकाऊ नसते. त्याला फुकाचा विरोध केला तर त्यातील हिणकस गोष्टीच मोठ्या होऊन नव्यातील सौंदर्याला खाऊन टाकतात. म्हणून त्याला अनुभवी मित्राचा हात द्यायचा. जीवनाचा झरा जुन्याकडून नव्याकडे देताना तो तसाच खळाळता रहावा म्हणून आपली सगळी ऊर्जा वापरायची. जुने किंवा नवे टिकणे महत्वाचे नाही, पण समाधान टिकणे महत्वाचे.

मला खात्री आहे उद्या शहरीकरणाच्या प्रचंड वेगात आमची ही चाळ कधी पुनर्विकासासाठी पाडली  तरी तिच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या नव्या इमारतीमध्ये देखील तिचा समाधानी अक्षय आत्मा वास करत राहील आणि तिथल्या बिऱ्हाडकरूंशी आपले प्रेमळ स्त्री नाविकाचे नाते टिकवून ठेवेल.

जेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात

Source : Internet
६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशिदीची विवादित वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर देशात धार्मिक दंगे झाले. माथेफिरू धर्मवेड्यांनी सामान्य लोकांचे जीव घेतले. समाजात एक प्रकारचा उन्माद संचारला होता.  सरकारे बदलली. जुने विरोधी पक्ष सत्तेत येऊन पुन्हा पायउतार झाले. दोन धर्मांचे प्रतिनिधी भांडत राहिले. कोर्ट कचेऱ्या चालू राहिल्या.


खटले विविध प्रकारचे होते. विवादित स्थळावरील वास्तू कोणी फोडली? कोण दोषी? त्यांना काय शिक्षा? हे तर होतेच पण त्याहून जुने खटले देखील होते. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता, विवादित स्थळावर मालकी कुणाची? याबाबत पहिला खटला श्री गोपाल सिंग यांनी १९५०ला अलाहाबाद हायकोर्टात दाखल केला. लगोलग परमहंस दास यांनी देखील त्याच मुद्द्यावर अजून एक खटला भरला पण तो नंतर मागे घेतला. नंतर १९५९ मध्ये निर्मोही आखाड्याने त्या मुद्द्यावर खटला भरला. चौथा खटला सुन्नी सेंट्रल बोर्ड ऑफ वक्फ यांनी १९६१ मध्ये भरला आणि पाचवा खटला स्वतः “श्रीरामलल्ला विराजमान” यांनी १९८९ मध्ये भरला. इथे अडखळू नका. पण हे लक्षात ठेवा की विवादित जागेवर मालकी हक्क कुणाचा? आणि ताबा कुणाला मिळावा? यासाठी शेवटचा खटला स्वतः श्रीरामाने भरला असा या वाक्याचा अर्थ आहे. आणि खरंतर असे कसे होऊ शकले त्याबद्दलच हा लेख आहे. आधी खटल्याचा निकाल काय लागला ते बघूया मग या मुद्द्याकडे येऊया.  


जागा नक्की कुणाची? या प्रश्नावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने, अखेरीस २००२ मध्ये दावे / प्रतिदावे ऐकण्यास सुरवात केली. ही प्रक्रिया २०१० मध्ये संपली. आपला निर्णय हायकोर्टाने २४ सप्टेंबर २०१० ला राखून ठेवला. पण सुप्रीम कोर्टाने निर्णयाला स्थगिती देता येणार नाही असा निर्णय दिल्यामुळे शेवटी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ३० सप्टेंबर २०१० ला रामजन्मभूमी च्या मालकीविषयी आपला निर्णय दिला.


या निर्णयाची अंमलबजावणी करायची असल्यास, विवादित २.७७ एकर भूमीचे तीन भाग करावे लागतील.
  1. जिथे श्रीरामाची मूर्ती विराजमान आहे ती जागा श्रीरामलल्ला विराजमान यांना मिळेल.
  2. सीताकी रसोई आणि राम चबुतऱ्याची जागा निर्मोही आखाड्याला मिळेल. आणि,
  3. सुन्नी वक्फ बोर्डाला उर्वरित जागेचा ताबा मिळेल.

Source : Internet 



म्हणजे जागा कुणाची हा मूळ प्रश्न न सोडवता कोर्टाने, या जागेचा ताबा कुणाकडे आणि कसा विभागून द्यावा ते सांगितले. आता हा प्रश्न धार्मिक अस्मितेचा असल्याने आणि धर्मनिरपेक्ष भारतातील लोकांच्या मनावर अजूनही धर्मच राज्य करीत असल्याने, कोणत्याही पक्षकाराने हा निर्णय मान्य करणे अशक्य होते. त्यामुळे सर्व पक्षकारांनी या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केलेले आहे. परंतू, सुप्रीम कोर्टाने अजून हा खटला सुनावणीसाठी घेतलेला नसल्याने विवादित स्थळ श्रीरामाच्या जन्माचे आहे अशी मान्यता असूनही सध्या त्या खटल्याची अवस्था, श्रीरामाचे पूर्वज सत्यव्रत उर्फ त्रिशंकू सारखी झालेली आहे.  


सुप्रीम कोर्ट काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घेईल, पण जागेची मालकी कुणाची? या खटल्यात, जे एकामागून एक दावे केले गेले त्यातला पाचवा दावा स्वतः श्रीरामाने १९८९ मध्ये केला असा उल्लेख मी वर केला आहे. हे कसे शक्य झाले? स्वतः श्रीराम जर दावा करायला कोर्टात आले होते तर मग त्यांनी स्वतःच हा विवाद संपवून का नाही टाकला? किंवा मग कोर्टाने त्यांनाच विचारून निर्णय का नाही घेतला? ह्या प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आपल्याला भारतीय कायद्यातील देवाचे आणि देवस्थानाचे स्थान समजून घ्यावे लागेल.


भारतात इंग्रज यायच्या आधी मुघलांचे राज्य होते आणि त्याआधी विविध प्रदेशांवर विविध राजघराण्यांचे राज्य होते. संपूर्ण भारतात विविध राजघराण्यांचे राज्य असले तरी त्या सर्व राज्यांत एक गोष्ट सारखी होती. ती म्हणजे समाज  आणि मंदिरांची / मठांची एकात एक गुंफली गेलेली साखळी.


एकेक देवस्थान म्हणजे स्वतःच एक संस्थान असायचे. देवस्थानांत अमाप संपत्ती जमा होत होती. देवस्थानांची स्वतःची शेकडो एकर जागा असायची. भरपूर जडजवाहीर असायचे. अन्नछत्रे चालायची. विविध वार्षिकोत्सव व्हायचे. नृत्य गायनाचे जलसे व्हायचे. जत्रा भरायच्या. पालख्या, मिरवणुका निघायच्या. लोक त्यासाठी गर्दी करायचे. तीर्थस्थाने व्यापाराचे केंद्र बनली होती.संपूर्ण समाजाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा या देवस्थानांवर चालायचा, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. राजे, धनिक आणि सामांन्य लोक देखील मंदिरांना देणग्या द्यायचे. या देणग्या जमीन, जडजवाहीर, धन, पशुधन अश्या स्वरूपात असत. त्याबदल्यात मंदिरातील देव; राजांना अधिकार, धनिकांना व्यापार आणि सामान्यांना पुण्य असे वाटप करत होते.


सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजे, धनिक आणि सामान्य लोक आपापल्या भेटी देवाला वहात होते. देवाच्या चरणी अर्पण करत होते. आणि त्या भेटवस्तू किंवा भेट दिलेली ती मालमत्ता मग देवाच्या (देवस्थानच्या नव्हे, देवाच्या) मालकीची होत होती.


कायद्याने तयार केलेली व्यक्ती (Artificial / Juridical Person) ही ब्रिटिश शासनाने आपल्याला दिलेली देणगी आहे. त्यायोगे आपण आता कंपनी किंवा ट्रस्ट किंवा  भागीदारीचे व्यवसाय किंवा समाजसेवी संस्था चालू करू शकतो आणि त्यांच्या नावाने मालमत्ता खरेदी करू शकतो. त्यांना कायद्याने अमरत्व किंवा इच्छामरणाचा वर दिलेला असतो. या संस्थांचे सभासद येतात जातात पण संस्था चालूच राहते. ही जी दीर्घकाळ चालणारी इच्छामरणी किंवा अमरत्व असणारी कृत्रिम व्यक्तीची कल्पना आहे, तिच्यामुळे व्यापार सोपा होतो. लोक एकत्र येऊ शकतात आणि नातेसंबंध नसताना देखील फसवणुकीच्या शक्यता कमी करत, मोठमोठ्या योजना पार पाडू शकतात.


भारतात ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी, कायद्याने बनवलेल्या कृत्रिम व्यक्तीची संकल्पना नसल्याने आपली काम करण्याची पद्धत वेगळी होती. वैयक्तिक स्तरावर एकत्र येऊन काम करण्यासाठी आपण हिंदू अविभक्त कुटुंब पद्धत (Hindu Undivided Family) स्वीकारली. तर सामाजिक स्तरावर, आपण आपल्या देवांच्या मूर्तीला मनुष्यत्वाचे अधिकार देऊन टाकले. म्हणजे देवाची मूर्ती मालमत्तेची मालक बनू शकते. नवीन मालमत्ता विकत घेऊ शकते. आपल्याकडील मालमत्ता विकू शकते. त्यासाठी देवाच्या मूर्तीच्या वतीने तिचा मुखत्यार (व्यवस्थापक) काम करतो. त्याला दक्षिणेत धर्मकर्ता म्हणायचे तर उत्तरेत शेबैत (Shebait) म्हणायचे.


भारतातील बहुसंख्य देवस्थानांतील देवतांच्या मूर्ती दगडी असायच्या. त्यातही नेपाळमधल्या गंडकी नदीतील किंवा नर्मदेतील किंवा त्यासारख्या इतर नद्यांतील पाषाण वापरून देवतांच्या मूर्ती बनवल्या जायच्या. नदीतील प्रवाहामुळे गुळगुळीत झालेल्या या मूर्तीना, पाणी किंवा दुधाचा अभिषेक सतत केला तरी त्यांची फार झीज होत नसे. त्यामुळे मूर्तीची एकदा प्राणप्रतिष्ठा केली की  जवळपास अमर झाल्यासारखीच असे. भारतातील कित्येक प्रसिद्ध देवळांच्या देवमूर्ती किमान १००० वर्षे जुन्या आहेत.  त्यामुळे या अमर देवमूर्तीच्या नावे मालमत्ता घेणे आणि ती  माणसांच्या पिढ्यानपिढ्या तशीच चालू राहणे अगदी सहज शक्य होते.


फक्त ज्या देवळातील मूर्ती लाकडाच्या असत त्यांची मात्र गडबड होत असे. उदाहरणार्थ पुरीचे जगन्नाथाचे मंदिर. येथील जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेची मूर्ती देवदारू असे उपनाम दिलेल्या कडुलिंबाच्या झाडापासून बनवलेली असते. कितीही कोरडे ठेवले तरी या मूर्ती कालांतराने खराब होऊ शकतात. म्हणून तेथील हिंदूंनी अजून एक शक्कल लढवली. मूर्ती खराब होण्याची वाट न बघता एका विशिष्ट कालावधीनंतर (पुरीला हा कालावधी जवळपास बारा वर्षांचा आहे) त्या बदलून टाकायच्या. पण मग यात काही काळ देवस्थान मूर्तीविहीन होईल. आणि त्या काळापुरता मालमत्तेचा अधिकारी नाहीसा झाला असे कळल्यास कुणी अफरातफर करू शकेल. यावर मार्ग काढण्यासाठी, हिंदूंची कल्पनाशक्ती अजून पुढे गेली.






नवीन मूर्ती आधी तयार केल्या जातात. त्यांना नवकलेवर म्हणतात. म्हणजे प्राणविहीन शरीर. मग त्यांना जुन्या मूर्तींसमोर आणले जाते. देवळाचे दरवाजे बंद होतात. बाहेर लोक देवतेच्या नावाने जयघोष करत असतात.  त्या प्रदेशाचा राजा स्वतः मंदिराबाहेर सर्वांसमोर उभा असतो. आणि मुख्य पुजाऱ्याच्या साक्षीने देवळात बंद दाराआड जुन्या मूर्तीतून देवतेचे प्राण काढून नवीन मूर्तीत स्थापित केले जातात. जुन्या मूर्तीचे कलेवर होते. नवीन मूर्ती आपल्या स्थानावर विराजमान होते.  आणि मग जुन्या मूर्तीच्या प्राणहीन कलेवराचे विधिपूर्वक दहन केले जाते. अश्या रितीने देवमूर्तीच्या अक्षय आत्म्याला सतत नवीन शरीर मिळत रहाते. मालमत्तेचा अमर मालक आणि त्याची कायमस्वरूपी मालकी सातत्याने चालू रहाते. अशी सगळी सुव्यवस्थित योजना करून हिंदूंची अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था वर्षानुवर्षे चालू होती.


पण मग मुसलमानांचे हल्ले सुरु झाले. त्यांचे लक्ष अर्थातच या प्रचंड धनवान देवस्थानांकडे गेले. त्यांनी मंदिरे फोडली. देवांच्या मूर्ती उखडून त्यांना विद्रूप केले.  देवस्थानांची चल संपत्ती लुटून परकीय आक्रमक कधी निघून गेले तर कधी इथलेच व्हायचा प्रयत्न करू लागले.  चल संपत्ती गेली. अचल संपत्ती मागे उरली. ती कुणाची? तर देवाच्या मूर्तीची. पण देवाची मूर्ती कुठे आहे? ती तर उताणी पडली आहे. स्थानभ्रष्ट होऊन, छिन्नविच्छिन होऊन भग्नावस्थेत पडली आहे. थोडक्यात देवाची मूर्ती जी मालमत्तेची मालक होती तीच मृतप्राय झालेली आहे? मग आता या उरलेल्या अचल संपत्तीचा मालक कोण? आता तर नव कलेवर बनण्याच्या आधीच जुन्या मूर्तीचे कलेवर झाले. प्राणप्रतिष्ठा करावी तर कशी? कारण जुन्या मूर्तीसमोर नवीन मूर्ती आणण्याचा सोहळा करायचा राहून गेला. कारण धर्मकर्ता हा केवळ व्यवस्थापक आहे तो देवाच्या मूर्तीचा वारसदार नाही. मग मोडून पडलेली व्यवस्था पुन्हा चालू कशी करायची?


त्यावर, इथल्या हिंदूंनी हतप्रभ न होता अजून एक उपाय शोधून काढला. देवाची प्रत्यक्ष मूर्ती फुटली तरी तिचा अक्षय आत्मा अभंग असतो. मग नवीन मूर्ती तयार होईपर्यंत स्थावर जंगम मालमत्तेवर या अक्षय अभंग आत्म्याचा किंवा कल्पनेतील मूर्तीचा हक्क शाबूत आहे असे मानायचे. मग आपण दुसरी प्रत्यक्ष मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करायची. त्यासाठी मोठे उत्सव करायचे. आणि काही काळ अशरीर झालेल्या देवतेच्या आत्म्याला नवे शरीर धारण करण्यासाठी वेदमंत्रोच्चारात  आवाहन करायचे. मग तो अक्षय अभंग आत्मा आता नव्या मूर्तीत दाखल झाला आहे, विराजमान झाला आहे असे वाजतगाजत जाहीर करायचे. आणि पुन्हा व्यवस्थेचे चाक अविरत चालू ठेवायचे.


अश्या तऱ्हेने भारतीय हिंदूंनी आधी देवाच्या मूर्तीला मानवाप्रमाणे मालकीहक्काचे अधिकार देऊन  दीर्घकाळ चालणारी एक अर्थव्यवस्था निर्माण केली. जेंव्हा त्यांच्या व्यवस्थेचे केंद्र असणारी देवाची मूर्ती फोडली जाऊ लागली तेंव्हा त्यांनी देवाची मूर्ती हे केवळ प्रत्यक्ष मूर्ती न मानता ती एक अक्षय कल्पना आहे, असे मानले. कल्पना असल्यामुळे ती आता कायमची अभंग झाली. तिला जणू अमरत्व मिळाले. आणि भारतीयांची मंदिरकेंद्रित अर्थव्यवस्था चालूच राहिली. देणग्यांचा ओघ मुघल काळातही सर्व देवस्थानांकडे वाहतच होता.


मग इंग्रज आले. त्यांनी भारतभर एक कायदा लागू करून दाखवला. त्यांचे कायदे रोमन कायद्यांवर आधारीत होते. ज्यांत त्यांनी स्वतःचे तत्त्वविचार मिसळून त्यांना अधिक ताकदवान बनवले होते.


हिंदूंच्या व्यवस्थेप्रमाणे, मालमत्ता धारण करण्याचा अधिकार फक्त व्यक्तीला होता किंवा त्यांच्या अविभक्त कुटुंबाला होता किंवा मग देवाच्या मूर्तीला होता. ज्यात शेवटी हिंदूंनी काल्पनिक मूर्ती अशी भर घातली होती.


पण इंग्रजी कायद्याप्रमाणे स्वतःचे कुटुंब नसताना मालमत्ता धारण करण्यासाठी आता देवाच्या प्रत्यक्ष किंवा काल्पनिक मूर्तीचीदेखील आवश्यकता नव्हती. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांची कल्पना करणे आणि त्यांची उभारणी करणे आता कायद्याने शक्य होते. आता काल्पनिक मूर्तीवर व्यवस्था उभी करायच्या ऐवजी, काल्पनिक संस्थांवर व्यवस्था उभी करणे शक्य होते. म्हणजे, तुमचे कुटुंबीय नसलेल्या तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही भागीदारीचा करार करू शकत होता. भागीदार दिसू शकतात पण भागीदारी ही केवळ कल्पना असते. तरीही त्या कल्पनारूपी भागीदारीला स्वतःची मालमत्ता धारण करणे शक्य असते. किंवा मग तुम्ही स्वतःची कंपनी किंवा सेवाभावी संस्था (Charitable Trust) चालू करू शकता. ही कंपनी किंवा सेवाभावी संस्था म्हणजे पुन्हा केवळ एक कल्पना असते पण तिला स्वतःची मालमत्ता असणे शक्य असते. कारण या सर्व कल्पनांना आता आता कायद्याचे पाठबळ मिळालेले असते. म्हणून यांना कायद्याच्या परिभाषेत, Artificial किंवा Juridical Person म्हणतात. म्हणजे कायद्याने तयार केलेली कृत्रिम व्यक्ती.


पण याचा अर्थ असा नाही की इंग्रजांनी भारतीयांच्या कल्पनांना गाडून टाकले. ज्यांना हवे होते ते भागीदारी, कंपनी यासारख्या कल्पना वापरून व्यवसाय करू लागले. येथील पारशी लोकांनी यात चटकन पुढाकार घेतला. पण बहुसंख्य हिंदू मात्र मालमत्ता तयार करण्यासाठी कृत्रिम व्यक्ती वापरण्याच्या या नवीन क्लृप्तीपासून दूरच राहिले. त्यामुळे भारतात एकाच वेळी कंपन्या, भागीदाऱ्या आणि सेवाभावी संस्था स्वतःची मालमत्ता तयार करू लागल्या आणि त्याच वेळी वेगवेगळ्या देवस्थानांत देवांच्या मूर्तीच्या नावाने देखील मालमत्ता वाढतच होती.


मग इंग्रजी राज्य गेले. स्वराज्य आले. आणि कुठले कायदे टाकायचे कुठले स्वीकारायचे हा प्रश्न आला? मुघल कायदे स्वीकारण्यापेक्षा बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतीयांनी आधुनिक इंग्रजी कायदे आणि जुन्या हिंदू परंपरा चालू ठेवल्या. त्यामुळे देवाची मूर्ती असलेली देवस्थाने देखील समाजाची सेवा करीत होती, आणि त्यासाठी मालमत्ता धारण करत होती. त्याशिवाय देवाची मूर्ती नसलेल्या Charitable Institutions देखील समाजाची सेवा करू लागल्या आणि त्यांना कायद्याचे पाठबळ मिळाल्याने त्यांना पण मालमत्ता धारण करता येऊ लागले.


परंपरांवर आघात करून जनमानस बिघडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून भारत सरकारने ब्रिटिश सरकारचेच धोरण चालू ठेवले. देवाच्या मूर्तीला Charitable Institution म्हणून नोंदणी करण्याची सक्ती केली नाही. उलट देवाच्या मूर्तीला कृत्रिम व्यक्ती (Artificial Juridical Person) म्हणून मान्यता दिली.


जी देवस्थाने स्वतःला Charitable Institution म्हणून नोंदवून घेतील त्यांना त्या Charitable Institution साठी बनवलेले नियम लागू होतील तर जी देवस्थाने स्वतःला Charitable Institution म्हणून नोंदवून घेणार नाहीत तेथील देवाच्या मूर्तीला अमर मानवाचा दर्जा दिला गेला. आणि ह्या देवाच्या मूर्तीच्या वतीने शेबैत किंवा धर्मकर्ता, व्यवस्थापकाचे काम करेल असे मान्य केले. जर ह्या व्यवस्थापकाने देवाच्या मूर्तीच्या मालमत्तेला धक्का पोहोचेल असे वर्तन केले तर त्या देवाच्या भक्तांपैकी कोणीही देवसखा या नात्याने त्या व्यवस्थापकांविरुद्ध खटला दाखल करू शकेल. किंवा जर समाजातील कुठल्याही घटकांकडून देवाच्या मालमत्तेला धोका पोहोचत असेल आणि देवाचा कोणी व्यवस्थापक नसेल तर त्या देवाचा कोणीही भक्त देवसखा या नात्याने समाजाच्या उपद्रवकारी घटकांविरुद्ध खटला दाखल करू शकेल.


याहून महत्वाची गोष्ट अशी की खटला चालू होण्यापूर्वी देवाची मूर्ती प्रत्यक्षात अस्तित्वात असणे आवश्यक नाही. कारण आपण हे पूर्वीच मान्य केले आहे की देवाची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष मूर्ती नसून काल्पनिक मूर्ती आहे. फक्त देवाच्या मूर्तीची कल्पना मनात असली तरी प्रत्यक्ष मूर्ती बनायच्या आधी, त्या मूर्तीच्या नावाने व्यवहार करणे शक्य असते. म्हणून संकल्पित देवळासाठी जमीन विकत घेणे, देणग्या घेणे शक्य होते. मूर्तीच्या नावाने खटला भरणे देखील शक्य असते. अजून मूर्ती नसल्याने तिचा धर्मकर्ता कोणीही नसेल पण मग देवसखा या नात्याने त्या देवमूर्तीचा कुठलाही भक्त देवाच्या संकल्पित मूर्तीच्या नावाने खटला भरू शकतो.


कायदयाच्या या गुंतागुंतीचा उपयोग करून घेतला, देवकी नंदन अगरवाल नामक एका व्यक्तीने.


श्री. अगरवाल, एक वरिष्ठ ऍडव्होकेट होते. त्याशिवाय ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते. त्यांनी आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा आणि श्रीराम भक्तीचा वापर करून रामसखा या नात्याने १ जुलै १९८९ ला श्रीरामाच्या नावे विवादित जागेच्या मालकीबाबत आणि ताब्याबाबत कोर्टात केस दाखल केली. ते स्वतः रामसखा तर श्रीरामाची मूर्ती म्हणजे रामलल्ला विराजित.  सिव्हिल प्रोसीजर कोड विराजित मूर्तीला कृत्रिम व्यक्ती मानत असल्याने खटला दाखल करण्यात आला आणि अश्या तऱ्हेने आपल्या जन्मभूमीबाबत माणसांनी घातलेल्या वादात स्वतः प्रभू राम कोर्टात आपल्या रामसखा या मित्राद्वारा खटला दाखल करते झाले.


टीप : या खटल्यात प्रभू रामाचे नाव "रामलल्ला विराजित" का ठेवले? हा प्रश्न जर कुणाला पडला असेल तर त्यामागे असलेली कायद्याची एक संकल्पना थोडक्यात सांगतो.


हिंदूंचा देव विश्वनिर्माता असतो. या विश्वाचा मालक तोच असतो. असे असले तरी देवाची मूर्ती माणसाने बनवलेली असते. ती स्वतः कुठलेही काम करू शकत नाही. म्हणून देव स्वतः जरी सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वाधिकारी आणि सार्वभौम असला तरी देवमूर्ती मात्र कायद्याच्या दृष्टीने ती अज्ञ किंवा minor असते. तिला आपले आशीर्वाद देण्याचे काम करायला आणि मालमत्तेचे व्यवहार पहायला मध्यस्थ किंवा व्यवस्थापक किंवा हितचिंतक लागतो. म्हणजे हा मध्यस्थ किंवा हितचिंतक देवमूर्तीचा पालक (Guardian) असतो. आणि तो देवमूर्तीरुपी बालकाच्या अधिकारांचे वहन आणि रक्षण करतो.   

म्हणून प्रभुराम न होता छोटे राम, बालक राम किंवा रामलल्ला. आणि त्यांची मूर्ती २२ डिसेंबर १९४९ ला बाबरी मशिदीत ठेवली गेली होती म्हणून “श्रीरामलल्ला विराजमान”.
-------
दिनांक ९ नोव्हेंबर २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देऊन संपूर्ण विवादित जागा रामलल्ला विराजमान यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाही या जागेवरचा हक्क अमान्य केला आहे. पूर्ण निकाल वाचण्यासाठी इथे क्लिक करा.