आस्तिक आणि नास्तिक वाद भरपूर चालू असतात. माझ्या आस्तिक मित्रांना मी नास्तिक वाटतो पण माझ्या नास्तिक मित्रांना मी आस्तिक वाटतो.
मला वाटतं आस्तिक आणि नास्तिक हे माझ्या मनात सी-सॉ खेळणारे दोन खेळाडू आहेत. आणि मी कुणाचीही बाजू न घेता, कुणी जिंकावा असा विशेष प्रयत्न न करता ह्या दोघांनी चालवलेल्या खेळाचा आनंद घेणारा प्रेक्षक आहे. आई, बायको, मुलं, भाऊ, भावजय, पुतण्या आणि इतर जिवलग यांच्यापैकी कुणालाही बरं नसलं की डॉक्टरांचा सल्ला ऐकताना हळूच देवाला मनोभावे नमस्कार करतो. पण व्यवसायात नुकसान झालं की स्वतःला धारेवर धरतो. देवासाठी काही करत नाही पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या भावनेसाठी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या समाधानासाठी भक्तिभावाने देवाला नमस्कार करतो. सासू सासरे बायको जेंव्हा मी पूजा करावी असा हट्ट धरतात तेंव्हा त्यांना मूर्खात काढत नाही आणि मुलं जेव्हा देवाच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह लावणारी मतं मांडतात तेंव्हा त्यांना न ओरडता त्यांचं कौतुक करत भावनेला जपत नास्तिक कसं व्हायचं ते शिकवायचा प्रयत्न करतो. भविष्यात, जर माझ्या दोन्ही मुलांच्या कट्टर नास्तिक मित्रांना ते आस्तिक आणि कट्टर आस्तिक मित्रांना ते नास्तिक वाटले तर बहुतेक मी जिंकलेलो असेन. हे झालं वैयक्तिक.
सामाजिक पातळीवर देखील मला जगात हा सी-सॉ मोठ्या प्रमाणावर दिसतो. आस्तिक आणि नास्तिक इथे हमरीतुमरीवर येऊन खेळतात. ज्यांच्या बाजूला जास्त लोक असतात ती बाजू तात्पुरती जिंकते आणि मग दुसऱ्या बाजूचे लोक वाढले की ती बाजू जिंकते. आस्तिकांची संख्या वाढणे फार सोपे असते. लहान मुले जिज्ञासू असली तरी क्वचितच चिकित्सक स्वभावाची असतात. त्यामुळे लहान मुलाला नास्तिक बनवण्यापेक्षा आस्तिक बनवायला फार कमी कष्ट पडतात. असे झाल्याने आस्तिकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत राहाते. त्यामुळे नास्तिकांना आपली संख्या वाढवण्यासाठी अधिक तीव्र आणि अधिक कठोर व्हावे लागते. त्यांचे काठिण्य मग देवापासून ते कर्मकांडापर्यंत आणि भक्तीपासून ते श्रद्धेपर्यंत सर्वांवर प्रहार करते. त्यांची तीव्रता वाढली की मनापासून आस्तिक असलेले लोक देवावर हवाला ठेवून, मसीहा किंवा अवताराची वाट पहात स्वस्थ बसतात. पण आर्थिक आणि राजकीय कारणांसाठी आस्तिक झालेले दिखाऊ आस्तिक मात्र अस्वस्थ होऊन नास्तिकांवर जोरदार हल्ला चढवतात. पुन्हा त्यांच्याकडे भाबड्या आस्तिकांचे प्रचंड संख्याबळ आणि त्यांच्या श्रद्धांचे नैतिक अधिष्ठान असते. हमरीतुमरी हाणामारी पर्यंत जाऊन पोहोचते.
माझ्या मते कट्टर आस्तिक किंवा कट्टर नास्तिक असण्याऐवजी आपण जर प्रत्येकाच्या मनात चाललेला हा आस्तिक नास्तिकाचा सी-सॉ उमजून त्यावर शेरेबाजी टाळू शकलो; हात का जोडलेस? देवाला नमस्कार का केला नाहीस? याचा जाब विचारत बसण्यापेक्षा हात जोडायची किंवा नमस्कार करावासा न वाटण्याची वेळ का आली असावी? ते समजून भावनांच्या या करामतीवर खूष होऊ शकलो; आस्तिक्याकडून नास्तिक्याकडे किंवा उलट दिशेने होणाऱ्या कुणाच्याही प्रवासाला सजगपणे पाहू शकलो, त्यात त्यांनी केलेल्या चुका टाळू शकलो आणि समाजाच्या आर्थिक आणि राजकीय बाजूला आस्तिक आणि नास्तिक या दोघांपासून दूर निरपेक्ष ठेऊ शकलो तर हमरी तुमरी बंद करून सी-सॉचा निसर्गाने चालू केलेला खेळ सोपा होईल आणि आपण आपली ऊर्जा अधिक महत्वाच्या गोष्टींकडे वळवू शकू. किंवा कदाचित वैयक्तिक पातळीवर चालणाऱ्या सी-सॉला मान्य केलं की सामाजिक पातळीवर चाललेला सी-सॉ समतोल राखू शकेल आणि आपण नवा खेळ शोधू शकू.
Original Post by Medha Naik is as follows,
There are no absolutes for something so relative as a human life.
There are no rules for something so gentle as a heart.
Hugh Prather
My parents were god fearing people. Also very ritualistic. My mom recited the " vyankatesh stotra" every night before having dinner. As a kid I also remember being hungry and sleepy trying to convince her to have dinner first. I would sit on her lap half asleep till she finished her recitation. In sometime I had learnt it by heart. Summer holidays , every evening, at 7 pm we had to recite " manache shlok and ramraksha stotra ".
As a teenager, I rebelled. And the rituals were forgotten.
When my kids were born, I would recite them every evening. Without fail. Praying to the Almighty and asking him to bless them...
As teenagers, they rebelled. And the rituals forgotten.
After my dad, mom performed the Pooja every morning.
I was too caught up in my job, life , etc etc.
Now, mom has forgotten that she used to do so. Sometimes she does remember. Sometimes, she feels sad that she no longer can sit in front of her deities and pray.
Now, I light a diya before leaving the home. And some incense sticks for the fresh pleasant aroma.
She seems content. And relaxed....
I neither claim to be an atheist or a theist. Neither a ritualistic nor a non....
There are no absolutes for something so relative as a human life.
There are no rules for something so gentle as a heart.