Monday, August 22, 2016

सुटलेल्या पोटाची कहाणी (भाग ६)

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६
--------------------------------------
जिम सुरु करून सहा महिने उलटून गेले. मध्ये मध्ये दांड्या झाल्या पण माझा सहाय्यक माझ्यावर खूष होता. मी छान व्यायाम करतो असे त्याचे मत होऊ लागले होते.  माझा पण आत्मविश्वास वाढू लागला होता. जिने चढताना, चालताना, वर्गात शिकवताना स्टॅमिना वाढल्याचे जाणवत होते. इतकेच काय पण फेसबुकवर टाईप करण्याचा वेग वाढला होता. बोटे दुखणे बंद झाले होते. तासंतास कॉम्पुटर स्क्रीन कडे पाहात बसताना किंवा लोळून पुस्तके वाचताना दम लागेनासा झाला होता. अशी सर्व उत्तरोत्तर प्रगती होत असताना, राजा महाराजांच्या जुन्या गोष्टीप्रमाणे मला एक दु:ख सलत होते. माझे वजन काही कमी होताना दिसत नव्हते आणि ‘सुटलेले पोट’, ज्यामुळे माझ्या आयुष्यातील हा 'शरीरमादयं खलु धर्म साधनं' चा अध्याय सुरु झाला होता. ते जसेच्या तसे होते.


मित्र आणि सोसायटीतले लोक येता जाता विचारायचे, "काय म्हणते जिम? जातोस का सोडलीस ही पण, सायकल विकलीस तशी?" मी त्यावर दांडी यात्रेतील सत्याग्रह्याच्या उत्साहाने  "जातोय अजून" असे उत्तर दिल्यावर, हे विचारक गोऱ्या सोजीराच्या उत्साहाने, "मग, आता किती कमी झालं वजन?" असा पुढील प्रश्नांचा दंडुका माझ्यावर हाणू लागले. त्यावर उत्तर देणे कठीण असल्याने मी जखमी होऊन घरी परतत होतो. फेसबुकवर कोणी विचारले तर, "माझे वजन म्हणजे वैश्विक स्थिरांक आहे. जगाला शून्याची देणगी देणाऱ्या आर्यभट्टानंतर गणितविश्वाला एका नव्या स्थिरांकाची देणगी देणार आहे मी" असे गुळमुळीत उत्तर देत होतो. समोरच्याने त्यावर टाकलेला स्मायली हा माझ्या विनोदाला नसून माझ्या अवस्थेला आहे हे मला कळत होते. पण काय करावे ते कळत नव्हते.


माझ्या सहाय्यकाने, महिन्यातून एकदा मसाज करून घ्या, अंडी खाऊ लागा, आणि प्रोटीन सप्लिमेंट चालू करा म्हणून सांगितले. विशीत एकदा मला कावीळ झाली होती. तेंव्हा आयुर्वेदिक, ऍलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि मांत्रिक अशी सगळी औषधे एकदम चालू केली होती. त्यामुळे माझी कावीळ कश्यामुळे बरी झाली ते मला जरी कळले नसले तरी त्या प्रत्येक उपचारकर्त्याला स्वतःच्या उपचारपद्धतीबद्दल भलताच विश्वास बसला होता. आणि त्यांनी त्यांची फी हिरीरीने माझ्याकडून वसूल करून घेतली होती.  त्यामुळे मी आता एका वेळी एक गोष्ट चालू करून बघायचे ठरवले. म्हणजे मग वजन नक्की कशामुळे कमी झाले, सुटलेले पोट कश्यामुळे आटोक्यात आले, ते कळेल आणि वायफळ खर्च होणार नाही, असा शुद्ध हेतू मनात ठेवून मी प्रथम मसाज करून घ्यायचे ठरवले.    


एका रविवारचं सकाळचं लेक्चर दुसऱ्या प्रोफेसरला घ्यायला सांगितलं आणि मसाजची वेळ बुक करून ठेवली. सकाळी आठला जायचं होतं. सकाळी सातचं लेक्चर नसल्याच्या आनंदात मी शनिवारी रात्री एक दोन वाजेपर्यंत पुस्तक वाचत बसलो. आणि मग सकाळी उठलो तोच मुळी पावणे आठला. मग, "तुमची मेली नेहमीची घाई"  हे वाक्य ऐकत घाई घाईत मसाजवाल्याकडे जाण्यास निघालो. मी मसाजला जाणार आहे याची बातमी अख्ख्या डोंबिवलीला कळल्याप्रमाणे सगळे रस्ते स्वच्छ केलेले दिसत होते. काही ठिकाणी पताका वगैरे लावलेल्या दिसल्या. ठिक ठिकाणी रस्त्यावर दिशादर्शक बाण काढलेले दिसले. मी स्वतःवरच खूष होऊन पुढे जात असताना डोंबिवली मॅरेथॉन चा बोर्ड दिसला, आणि या जय्यत तयारीचा उलगडा झाला. तरीही एकंदर प्रकारामुळे आपल्याला सकाळी लवकर जागे होता आले नाही याचा थोडा विसर पडला. माझा स्वभावंच तसा आहे, आपला मूर्खपणा चटकन विसरून जाण्याचा.


याआधीचे माझे मसाजचे अनुभव म्हणजे; एकदा ताज हॉटेलात, एकदा केरळात, एकदा थायलंडात आणि एकदा लीला मध्ये असे पंचतारांकित होते. पण हे प्रकरण थोडं वेगळं होतं. आत गेलो, लज्जा रक्षणार्थ कपडे ठेवून  मसाज सहाय्यकाची वाट पाहू लागलो. तो आला आणि त्याने सहज विचारलं, "टॉवेल लाया है ना?". आणि मग मला जाणवलं की आपण पंचतारांकित स्पा मध्ये आलेलो नसून व्यायामशाळेच्या अंगमर्दनशाळेत आलेलो आहोत म्हणून. मग त्याची क्षमा मागून, पुन्हा कपडे चढवून, बाईकवर स्वार होत, घराकडे जाऊन, वॉचमन बघत असताना, घराच्या खिडकीखाली उभा राहून, मी शक्य तितक्या दमदार आवाजात हिला टॉवेलची पिशवी खाली टाकायला सांगितले. त्यानंतर तिने एकही प्रश्न न विचारता जसा चेहरा करून पिशवी खाली टाकली तो पाहून वॉचमनच्या मनात माझ्या विषयीच्या आदराची घसरलेली पातळी पुन्हा उंचावण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे याची मानसिक नोंद घेत मी घाईघाईने मसाजिस्टाकडे जायला निघालो. गल्लीतून गाडी रस्त्यावर आली आणि आबालवृद्धांचा, खेळाचे बनियन आणि चड्डी  घातलेला एक मोठा थवा समोरून येताना दिसला. मॅरेथॉन सुरु झालेली दिसत होती. वाहतूक थांबवण्यात आलेली होती. लोक टाळ्या वाजवत होते. घड्याळ्यात साडेआठ झालेले दिसत होते आणि मी रस्त्याच्या कडेला उभा राहून हतबल होऊन टाळ्या वाजवत धावकांचे कौतुक करत होतो.


शेवटी एकदाचा नऊ वाजता पोहोचलो पण तोपर्यंत पुढची वेळ घेतलेला भिडू आलेला होता. त्यामुळे मला थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हते. विडीकाडीचे व्यसन नसल्याने, आता पुढचा एक तास कसा काढायचा हा प्रश्नच होता. पुन्हा बाहेर गेलो असतो तर वाहतूक मुरंब्यात अडकलो असतो त्यामुळे तिथेच एका स्टुलावर बसून राहिलो. फेसबुक फेसबुक खेळलो. इतरांनी केलेल्या ढापू शेरो शायरीच्या अपडेटसना, तिरक्या मानेच्या स्वप्रतिमांना,  घाऊक संख्येने  लाईक्स आणि आपण लिहिलेल्या लांबलचक पोस्ट्सना कर्तयव्यपूर्तीत आनंद मानणाऱ्या मित्रांच्या किरकोळ चुकार लाईक्स बघून मन भरून आले. व्हाट्सऍप  उघडले. कोणीच ऑनलाईन नव्हते. मग जुन्या मित्रांना उगाच फोन करून, रविवारी सकाळी उठवून त्यांच्या शिव्या खाल्ल्या. अश्या प्रकारे सगळीकडून हताश होऊन एक तासाभराने पुन्हा त्या मसाजिस्टापुढे आडवा झालो. सकाळच्या बोहोनीच्या टायमाला खोटी झाल्याने तो बराच वैतागलेला दिसत होता. त्यानंतर त्याने अर्धा तास जे काही केले त्यामुळे कालियामर्दन प्रसंगानंतर यमुनेच्या डोहात आपल्या घरी परतल्यावर कालिया नागाला काय झाले असेल ते प्रत्यक्ष जाणवून मला एकंदरीतच नाग लोकांबद्दल भलतीच सहानुभूती वाटू लागली. या मसाज कम अंगमर्दनाचा मी इतका धसका घेतला की यापेक्षा अंडी खाणे बरे अश्या निष्कर्षाप्रत आलो.


या निर्णयाला पहिला विरोध झाला तो घरगुती ऋजुता दिवेकर कडून. ‘माझ्या घरात ही असली थेरं चालणार नाहीत. मी हे असले प्रकार करून देणार नाही’, वगैरे म्हणताना संपूर्ण शाकाहारी असलेल्या हिचा चेहरा फारच हिंसक झाला होता. मग अंड्यांचे दोन प्रकार. फलित अंडी आणि अफलित अंडी. त्यातील अफलित अंड्यांमध्ये जीव नसतो वगैरे सप्रमाण सांगितल्यावर एकंच वेगळे भांडे वापरायचे आणि चोचले माझे मीच पुरवायचे अश्या अटींवर ही तयार झाली. मग अंडी कुठली खावीत. गावठी की ब्रॉयलर? हा प्रश्न पडला. एका जाणकार मित्राला विचारले तर तो म्हणाला, 'अंड्यांपेक्षा तू कोंबडीच खा'. पण मग माझ्या घरची परिस्थिती जाणून असलेला तो प्रेमळ सुहृद लगेच म्हणाला, 'कुठलीही खा, पण ब्रॉयलर तुला पचायला सोपी जातील.' त्या दिवशी अंडी घ्यायला दुकानात गेलो तर माझं मलाच फार अप्रूप वाटू लागलं. दुकानदाराने एकेक अंड हातात अलगद उचलणं, ते अलगद कागदाच्या पिशवीत टाकणं मग हलक्या हाताने कागदी पिशवीचं तोंड बंद करणं माझ्यासाठी सगळंच मोठं नवलाचं होतं. त्याच्या हातावर पैसे ठेवले. आणि त्याच्याकडे कॅरीबॅग मागितली, तर त्याने दुकानात टांगून ठेवलेल्या पाटीकडे बोट दाखवले, 'कॅरी बॅग मागू नये'. आता मी मोठ्या पेचात सापडलो. ती अर्धा डझन अंडी कॅरी बॅग नसताना ऍक्टिवावरून एकट्याने कशी न्यायची? शेवटी दुकानाशेजारच्या पेपरवाल्याकडून त्यादिवशीचे सगळे पेपर घेतले. ऍक्टिवाच्या डिकीत त्याची एक गादी तयार केली. काही पेपरांचा चोळा मोळा करून त्यांच्या उश्या बनवल्या. आणि त्यावर त्या अफलित अंड्यांना विराजमान करून माझी स्वारी घराकडे निघाली.


दार उघडताच हिने तर मी आत्ताच कुणाच्या तरी मर्तिकाला जाऊन आलोय अश्या आविर्भावात मला घरात घेतले, आणि स्वतः अंग चोरून टीव्ही बघत बसली. मी स्वयंपाकघरात गेलो. ठरलेले भांडे घेतले. त्यात दोन अंडी टाकली. पाणी टाकले आणि ते प्रकरण गॅसवर चढवले. थोड्या वेळाने गुडगुड आवाज येऊ लागला म्हणून बघायला गेलो तर भांड्यातील पाण्यावर साबणाच्या पाण्यासारखा फेस आलेला दिसला. मी गोंधळात पडलो. जाणकार मित्राला फोन केला. मला वेड्यात काढत तो म्हणाला, ‘नक्की कोंबडीची अंडी आणलीस का कबुतरांची? असे फेस बीस काही येत नाहीत.’ मग त्याला फोटो पाठवला. त्यावर, मी अंडी भांड्यात टाकताना फारच जोरात टाकली असावीत की ज्यामुळे त्यांना बारीक तडे गेले असावेत आणि परिणाम म्हणून आतील पदार्थ असा बाहेर आला आहे असे त्याचे मत पडले. आता भांड्यात जे काही उकळत किंवा रटरटत होते त्याचे काय करायचे ते न सांगताच त्याने फोन ठेवला. मग मी त्या मिश्रणातील पाणी सिंक मध्ये ओतण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी ही स्वयंपाकघरात आल्याने मी दचकलो आणि पाण्याबरोबर दोन्ही कच्ची पक्की अंडी सिंकमध्ये पडली. त्यानंतर जे काही झाले त्याबद्दल मी एव्हढेच सांगू शकतो की मी अंड्याचा नाद सोडून प्रोटीन सप्लिमेंट्स घ्यायचे ठरवले.


आधी माझी कल्पना होती की प्रोटीन सप्लिमेंट म्हणजे रोज कडधान्य डाळी वगैरे खावे लागेल. पण मग जिममधला सहाय्यकाने सांगितले की बाजारात प्रोटीनची पावडर मिळते. ती पाण्यात घालून प्यावी, जिममध्येच, रोजचा वर्कआउट झाल्यावर. मी घाबरलो. म्हटलं त्याने वजन वाढेल. तर त्याने गेनर आणि सप्लिमेंट मधला फरक समजावून सांगायचं प्रयत्न केला. ते प्रकरण माझ्या डोक्यावरून गेले. पण मी त्याला पाच पौंड म्हणजे साधारण अडीच किलो पावडर आणण्याची ऑर्डर देऊन आलो. दोन दिवसांनी पावडर आली. ती घरी घेऊन आलो. क्लासला जायचं होतं म्हणून पिशवी घरी टाकली आणि झटपट तयार होऊन क्लासला गेलो. रात्री घरी आलो तर दारात भरपूर चपला दिसल्या. कोण आलं असेल? असा विचार करत घरात गेलो तर हॉल मध्येच सोसायटीतल्या मुलांना घेऊन मध्यभागी प्रोटीनच्या पावडरीची पिशवी ठेवून माझ्या लेकांनी रिंगण केलेलं होतं. त्यावरील धष्टपुष्ट आणि प्रमाणबद्ध माणसाच्या चित्राकडे पाहात ते सगळेजण चर्चा करत होते. "बाबा, तू पण असाच दिसणार हे खाल्ल्यावर? मग मला पण पाहिजे." धाकट्याने मला अवघडवून टाकत मागणी केली. त्या पिल्लांपुढे काय बोलायचे. म्हणून मी आपला, 'हो हो, तुझी परीक्षा झाली ना की आणू तुझ्यासाठी पण" असं थातूर मातूर उत्तर दिलं आणि सर्व पोरट्यांना घरी पिटाळलं. दिवसभरात, घरगुती ऋजुता दिवेकरने त्यातील घटक द्रव्यांची यादी वाचून त्यात अंडी नाहीत याची खात्री करून घेतली होती. त्यासोबत एक प्लॅस्टिकचा शेकर (घुसळण्याचा / मिसळण्याचा बाटलीसारखा डबा) मिळालेला होता. त्यावर वेगवेगळे आकडे लिहिलेले होते. हिने विचारले किती पाणी घ्यायला सांगितले आहे. मी म्हणालो २०० ते ३०० मिलीच्या मध्ये. त्यावर तिने त्या शेकरच्या वरच्या टोकाला हात ठेवत, "अच्छा इथे लिहिलंय" असे बोलून तो पसारा आवरला. धाकट्याला ती बॅग उघडून आतली गंमत बघायची फार इच्छा होती. सकाळी उघडूया असे सांगून त्याला बळेबळे झोपवलं.


दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना रक्षाबंधनाची सुट्टी होती. तरीपण दोन्ही पोरं लवकर उठली. आणि दात बीत घासून प्रोटीनची पिशवी घेऊन बसली. शेवटी एकदाची ती पिशवी उघडली. चॉकलेटचा वास आला. धाकट्याने आणि मोठ्याने चटकन पिशवीत बोटे घालून त्या प्रकाराची छाननी करायला सुरवात केली. त्यांना एकेक चमचा चवीला देऊन, माझ्या प्रमाणाबरहुकूम पावडर शेकरमध्ये टाकून मी जिमला निघालो. मोठा म्हणाला बाबा तुझा लॉल (LOL) झालाय, हे स्मूथ केलेलं बोर्नव्हिटा आहे. तू उगाच जास्त पैसे दिलेस. त्याला धपाटा घालून मी घराबाहेर पडलो. पिशवीत प्रोटीन असल्याने मनाला वेगळी उभारी आलेली होती. आता छान व्यायाम करायचा. भरपूर घाम गाळायचा. मग लगेच प्रोटीन प्यायचे. मग छान स्नायू पिळदार वगैरे होतील. मग पोट आत जाईल. आणि मग अनेक गोड घास टाळून केलेला हा अट्टाहास पुरा होईल अशी स्वप्ने पाहात मी त्या दिवशीचा व्यायाम पूर्ण केला.


कपडे बदलायच्या खोलीत गेलो. तिथे दोन जण आधीच बसले होते. गर्दी नको आणि आपल्या प्रोटीनपानाला साक्षीदार नकोत म्हणून शेकर घेऊन बाहेर आलो. वजनकाट्यावर बसलो. शेकर काढला. चष्मा नव्हता. त्यामुळे शेकरवरचे आकडे दिसत नव्हते. मग हिने आदल्या रात्री हात कुठे ठेवला होता ते आठवत तितकं पाणी भरलं. पाणी शेकरच्या गळ्यापर्यंत आलं. व्यवस्थित हलवलं. आणि प्यायला सुरवात केली. थोडं पाणचट वाटलं.  मला वाटलेलं हे प्रकरण झटकन संपेल. पण माझ्या मते मोठे असलेले तीन चार घोट घेऊन झाल्यावर बघतो तर काय अजून अर्धा शेकरही संपलेला नव्हता. पुन्हा दोन घोट प्यालो. तोंडात ती पाणचट चॉकलेटची चव फिरू लागली. घोट गिळवेना. आधी पोटात गेलेले प्रोटीन गळ्याशी आले आहे असे वाटू लागले. आता अजून अर्धा शेकर प्यायचा आहे या विचाराने मला स्वतःचीच दया येऊ लागली. उभा राहिलो. जिमभर दोन फेऱ्या मारल्या. सहाय्यक जवळ आला. काही त्रास होतोय का वगैरे विचारपूस करू लागला. मी मानेनेच नकार दिला. आणि शेकर तोंडाला लावला. आता जर मी पारदर्शक असतो तर ते प्रोटीनयुक्त पाणी माझ्या भुवयांपर्यंत पोहोचले आहे हे कोणीही ओळखू शकला असता. २०० -३०० मिली पाणी पण आपल्याला पिता येत नाही म्हणून स्वतःची लाज वाटू लागली. मोठेमोठे खेळाडू कसं काय जमवत असतील याबद्दल मला कौतुक वाटू लागलं. हे असं सगळं करूनही महंमद अली जर 'फ्लोट लाईक या बटरफ्लाय' म्हणू शकतो तर तो खरंच सर्वश्रेष्ठ असला पाहिजे.  कारण मी इतकं पाणी प्यायल्यावर हवेतंच काय पण पाण्यातही फ्लोट करू शकलो नसतो याची मला खात्री पटली होती. त्या क्षणी जर मला चुकून एखादी सुई किंवा टाचणी टोचली असती तर जिमभर प्रोटीनचा पाऊस पडला असता याची मला खात्री झाली. मग अजून दहा मिनिटं उठत-बसत, चालत-फिरत, शेवटी मी ते प्रोटीनयुक्त पाणी संपवलं. आणि रंगपंचमीला शर्टाच्या आत पाणी भरलेले फुगे ठेवलेला मुलगा कसा अलगद चालतो, तसा अलगद घरी आलो.


मुलं खाली खेळायला गेली होती. हिने दार उघडलं. मी पहिल्यांदा अंघोळीला गेलो. त्या आन्हिकात पंधरा वीस मिनिटं गेली. आता, जरा मोकळं वाटू लागलं होतं. प्रोटीन थोडं स्थिर झालं होतं. मी हिला म्हणालो की २००-३०० मिली पाणी पिणे सोपे नाही. मला त्रास झाला. तर तिला खरेच वाटेना. मग मी शेकर हातात घेतला आणि कुठपर्यंत पाणी भरले ते दाखवत म्हणालो, 'मग तू, इतकं पाणी पिऊन दाखव'. त्यावर माझ्या हातातला शेकर खेचत ती पतीप्रमादसिद्धतापरायण स्त्री म्हणाली, अहो २००-३०० मिली बोललेलात ना मग हे १५०० मिली काय प्यालात?' आता मात्र मी चिडलो. अंगात भिनलेले प्रोटीन उसळ्या मारत माझा अव्हेंजर्स सिरीजमधला हल्क (Hulk) होतोय असं वाटू लागलं. चिडून म्हणालो, 'अगं, काल रात्री तूच तर हात दाखवलास ना इथपर्यंत पाणी म्हणून'. त्यावर माझ्यातल्या हल्क कडे दुर्लक्ष करत ती म्हणाली, 'खोटं बोलू नका. मी फक्त इथे आकडे लिहिलेत असं म्हटलं होतं. चष्मा नव्हता म्हणून दिसत नव्हतं इथपर्यंत ठीक आहे पण बोलता तर येतं ना !  तिकडे विचारायचं ना कुणाला. एवढा काय तो मेला माझ्यावर विश्वास. बाकी कुठल्या गोष्टीत ऐकत नाही माझं, इथे बरं ऐकलं.' त्या संपूर्ण संवादाच्या शेवटी  चूक माझीच होती हे मला पटवून देण्यात ती नेहमीप्रमाणे यशस्वी ठरली, आणि मी क्लासला जायच्या तयारीला लागलो.

टी शर्ट घातला. तो दंडाच्या इथे थोडा घट्ट झाला. म्हटलं प्रोटीन फारच लवकर काम देतंय वाटतं. म्हणून हिला जरा कौतुकाने सांगितलं तर ती म्हणाली दंडाचं दिसत नाही आहे पण पोटाला मात्र घट्ट झालेला दिसतोय. मग मी टी शर्ट बदलला आणि  शेकरवर लाल पेनाने २००-३०० मिलीवर खूण करून क्लासला जायला निघालो.

--------------------------------------
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६