एक एक सकाळ एक एक नवीन गाणं घेऊन येते. आणि मग तेच गाणं दिवसभर माझा ताबा घेऊन बसतं. दोन दिवसापूर्वी असंच झालं. "हजारो ख्वाहिशे ऐसी" या चित्रपटातलं, "बावरा मन देखने चला एक सपना" हे गाणं आठवलं. स्वानंद किरकिरे साहेबांनी एकंच शब्द वापरला आहे "बावरा" पण काय मौज केली आहे !
या "बावराला" समर्पक शब्द मला मराठीत सापडला नाही. पण त्याला जवळ जाणारा एक शब्द आहे बेभान. तुम्हाला अजून चांगला शब्द सापडला तर कमेंट मध्ये सुचवा. गाण्याचे बोल खाली देतोय.
बावरा मन देखने चला एक सपना
बावरे से मन की देखो बावरी हैं बातें
बावरी से धड़कने हैं, बावरी हैं साँसें
बावरी सी करवटों से, निंदिया दूर भागे
बावरे से नैन चाहे, बावरे झरोखों से, बावरे नजारों को तकना
बावरा मन देखने चला एक सपना
बावरे से इस जहाँ मैं बावरा एक साथ हो
इस सयानी भीड़ मैं बस हाथों में तेरा हाथ हो
बावरी सी धुन हो कोई, बावरा एक राग हो
बावरे से पैर चाहें, बावरें तरानो के, बावरे से बोल पे थिरकना
बावरा मन देखने चला एक सपना
बावरा सा हो अंधेरा, बावरी खामोशियाँ
थरथराती लौ हो मद्धम, बावरी मदहोशियाँ
बावरा एक घुंघटा चाहे, हौले हौले बिन बताये, बावरे से मुखड़े से सरकना
बावरा मन देखने चला एक सपना
हा चित्रपट आणि त्यातलं हे गाणं माझ्या लग्नानंतर जवळपास पाच वर्षांनी आलं.मी हा चित्रपट पाहिलेला नाही, त्यामुळे तिथे हे गाणे कुठल्या संदर्भात मांडले आहे ते मला माहिती नाही. पण त्यातलं दुसरं कडवं मला तर मला अजूनही वेड लावतं. तरूण वयात, कुणीतरी आपल्या प्रेमात पडलं असताना, सळसळत्या उर्जेने, अख्खं जग बदलण्याचा जोर आपल्या मनगटात आहे असा विश्वास मनात असताना, कुठलाही प्रियकर जे विचार करत असेल ते इतक्या समर्पक शब्दात बाकी कुठेही मांडलेले मला दिसले नाहीत.
"बेभान जगात फिरताना मला तितकीच बेभान साथ हवी आहे. बेभान जगात राहूनही भान न हरपलेल्या लोकांच्या गर्दीत तुझा हात माझ्या हातात असू दे."
हे गाणं वाचताना जी मजा येते तितकीच बहार शंतनू मोईत्रा च्या संगीताने उडवून दिली आहे. ही आहे त्या गाण्याची यु ट्यूब वरची लिंक.
गाणं गुणगुणत क्लासला जायची तयारी करत होतो, बावरा शब्दाच्या पुनरावर्तनामुळे होणारा आनंद अनुभवत होतो, आणि गंमत झाली.
एकदम अजून एक गाणं आठवलं. एकाच शब्दाची पुनरावृत्ती करून मन मोहून टाकणारी रचना. फक्त इथे बेभान जगात तितकेच बेभान जगण्याची इच्छा नाही. तर त्याच्याउलट जगाचे सारे रंग शेवटी डागाळलेले, कलंकित, काळे आहेत आणि त्यांचे हे स्वरूप कळल्यामुळे गीताचा रचनाकार, परमेश्वराच्या निष्कलंक रंगात मिसळून जाण्याची इच्छा धरतो आहे. शब्द आहेत संत कबीर दासांचे तर स्वर आणि संगीत कुमार गंधर्वांचे. यात अंजन म्हणजे काळा / कलंकित, तर निरंजन म्हणजे काळेपणाचा लवलेश नसलेला / निष्कलंक, हे ध्यानात ठेवलं तर रचनेचा अर्थ आपोआप उलगडतो.
"राम निरंजन न्यारा रे
अंजन सकल पसारा रे...
अंजन उत्पति ॐकार
अंजन मांगे सब विस्तार
अंजन ब्रहमा शंकर इन्द्र
अंजन गोपिसंगी गोविन्द रे
अंजन वाणी अंजन वेद
अंजन किया ना ना भेद
अंजन विद्या पाठ पुराण
अंजन हो कत कत ही ज्ञान रे
अंजन पाती अंजन देव
अंजन की करे अंजन सेव
अंजन नाचे अंजन गावे
अंजन भेष अनंत दिखावे रे
अंजन कहाँ कहाँ लग केता
दान पुनी तप तीरथ जेता
कहे कबीर कोई बिरला जागे
अंजन छाडी अनंत ही दागे रे
राम निरंजन न्यारा रे
अंजन सकल पसारा रे...
ही आहे राम निरंजनची यु ट्यूब लिंक.
बावरा मध्ये आयुष्याचा प्रवास सुरु होतानाची लगबग आहे. तर राम निरंजन मध्ये तो प्रवास पूर्ण करून आलेले शहाणपण आहे. बावरा ची रचना ओढ लावते तर राम निरंजन ची रचना हुरहूर, चुटपूट लावते. बावरा म्हणजे, रंगलेल्या गरब्यातून आपल्या मित्राने किंवा मैत्रिणीने बाहेर धावत येऊन आपल्या हाताला धरून खेचत त्या गरब्यात आपल्याला घेऊन जाण्याचा अनुभव आहे. तर राम निरंजन म्हणजे, सूफी साधकाने स्वतःभोवती मारलेली धुंद गिरकी आहे. बावरा म्हणजे, सुस्नात होऊन, प्रसन्न मनाने, उगवतीच्या प्रकाशात, पक्ष्यांच्या किलबिलाटात केलेली मोठ्या प्रवासाची सुरवात आहे तर राम निरंजन म्हणजे मावळतीच्या प्रकाशात, गावाच्या वेशीत शिरून त्या प्रवासाचा शेवट होत असताना दूरच्या देवळातून ऐकू आलेले एकतारीवरचे भजन आहे. बावरा म्हणजे, जमिनीतून नुकतंच उगवलेलं वडाचं झाड आहे तर राम निरंजन म्हणजे त्या झाडाची पूर्ण वाढ झालेली आणि खाली जमिनीत पुन्हा पोचलेली पारंबी आहे. बावरा म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या तान्हुल्याच्या चेहऱ्यावरचं निर्व्याज हसू आहे तर राम निरंजन म्हणजे अनुभवसंपन्न आणि किल्मिषविरहीत वृद्धाच्या चेहऱ्यावरचं कृतकृत्य हसू आहे.
नेहमी एकंच गाणं आठवतं आणि माझा दिवस भारून टाकतं पण परवा मात्र शब्दाच्या पुनरावर्तनाचा खेळ करणारी, आणि प्रवासाची निष्कपट सुरवात ते प्रवासाचा अनुभवसंपन्न शेवट हा प्रचंड मोठा पल्ला दाखवणारी दोन गाणी एकाच वेळेला आठवली आणि मी स्वानंद साहेबांच्या साथीने सुरू केलेला प्रवास संत कबीरांच्या हाताला धरून पुरा करू शकलो.
---oOo---
No comments:
Post a Comment