(Image Courtsey : IMDB) |
पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स. प्रकाशाचे गोळे वगैरे. त्या युद्धाची एकदम मोठी ठळक आठवण म्हणजे गल्लोगल्ली सुरु झालेले पी सी ओ / एस टी डी / आय एस डी चे फोन बूथ. मोबाईल अजून यायचे बाकी होते. म्हणून गल्फ मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांसाठी संवाद करण्याचा तो महत्वाचा दुवा होता. माझा प्रिय मित्र ओंकार पत्की याचे बाबा सौदी अरबला असायचे. जेंव्हा अमेरिकेने चढाई सुरु केली त्या दिवशी ते सौदीला परत गेले होते. त्यानंतर ओंकार आणि त्याची आई यांची जीवाची घालमेल जवळून पाहिली होती. युद्ध तसे दूरच होते ते जवळ आले होते केवळ ओंकारच्या बाबांमुळे.
नंतर करीअर आणि अभ्यास करताना हे दूरचे युद्ध विसरलो. जवळपास १० वर्षांनी स्वतःचा क्लास चालू केला क्लासमध्ये मुलांना १९९१ च्या आर्थिक उदारीकरणामागची कारणे शिकवताना, भारतापुढील परकीय चलनाचे संकट गल्फ युद्धाने वाढले हे सांगताना युद्धाचे आर्थिक परिणाम वाचायला मिळाले. आणि दूरचे युद्ध आर्थिक अंगाने दिसू लागले. एअरलिफ्टमुळे झाले काय की या दूरच्या आणि केवळ आर्थिक बाजू दिसलेल्या युद्धाला माझ्या मनात मानवी स्पर्श मिळाला. आणि गेल्या दहा वर्षात वाचनामुळे कल्पिलेल्या आणि आंतरजालामुळे वाचू किंवा बघू शकलेल्या अनेक गोष्टी अधिक परिणामकारकपणे अनुभवता आल्या. त्यांची दाहकता अंगावर आली. आपण किती सुरक्षित जीवन जगत आहोत ते जाणवले.
२०१५ च्या एप्रिल मध्ये झालेले "ऑपरेशन राहत", ज्यात येमेनमधून ४६४० भारतीयांना आणि ९६० परदेशी लोकांना बाहेर काढले गेले त्या सुटकेचे आपण सर्व साक्षीदार होतो. आता २४ तास चालणारी माध्यमे आणि त्याशिवाय सोशल मिडियाद्वारा सतत हातात मिळणाऱ्या अपडेट्स यामुळे आपण त्याचा थरार अनुभवू शकलो होतो. पण जेंव्हा संपर्काची साधने तुटपुंजी होती त्या काळात १,७०,००० लोकांना १३ दिवस दिशाहीन आणि नंतरचे ५९ दिवस त्या युद्धकाळात वाळवंटात कसे वाटले असतील त्याची जाणीव एअरलिफ्ट अगदी यथार्थपणे करून देतो.
मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीशी मोझेस बद्दल बोललो होतो. इजिप्तच्या राजदरबारात वाढलेला मोझेस. रामसिस राजाच्या भावासारखा वाढलेला मोझेस. ४०,००,००० लोकांना केवळ देवाच्या वचनावर विश्वास ठेवून इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढणारा मोझेस. मग वचनात सांगितलेल्या दुधा मधाच्या प्रदेशापर्यंतची सिनाई च्या वाळवंटातील ४० वर्षाची दिशाहीन, कंटाळवाणी आणि असुरक्षित वाटचाल करणारा मोझेस. अन्न धान्याची टंचाई. अनुयायांचा अविश्वास, त्यांच्या कटकटी सहन करणारा मोझेस. देवाकडून स्पष्ट दिशानिर्देश मिळत नाही म्हणून हतबल झालेला मोझेस. जोशुआ सारख्या मदतनीसांच्या आधारे सर्व अडचणीना पुरून उरणारा मोझेस. यातील अनेक गोष्टी मला रणजीत काट्याल मध्ये दिसल्या.
इराकी सैनिक निशस्त्र कुवेती नागरिकांना जवळून डोक्यात गोळ्या घालताना पाहिले आणि दक्षिण व्हिएतनामच्या National Police चा प्रमुख असलेला लोन ग्युएन चे एडी अॅडम्स ने काढलेले जगप्रसिद्ध छायाचित्र आठवले.
(Image Courtesy : Free Bible Images) |
इराकी सैनिक निशस्त्र कुवेती नागरिकांना जवळून डोक्यात गोळ्या घालताना पाहिले आणि दक्षिण व्हिएतनामच्या National Police चा प्रमुख असलेला लोन ग्युएन चे एडी अॅडम्स ने काढलेले जगप्रसिद्ध छायाचित्र आठवले.
(image courtesy : Iconic Photos) |
"टिपू सुलतान" जहाज युनोच्या बंदीनंतर वळताना बघितले. ५०० लोक भंगार जहाजात बसून कुवेत बाहेर पडताना बघितले आणि तीन रात्री जागून रडत रडत वाचलेली “लिऑन युरिस” या लेखकाची “बाळ भागवत” यांनी भाषांतरित केलेली “एक्झोडस” ही कादंबरी आठवली. त्यातला "आरी बेन कनान" हा कणखर नायक आठवला. त्यात "आलिया बेत" (homecoming) च्या योजनेंतर्गत दोन आठवड्याच्या रेशनवर ४५०० पेक्षा जास्त ज्यू लोकांना घेऊन आखाती समुद्रात अडकलेल्या “एस एस एक्झोडस” ह्या जहाजावरील प्रवाश्यांची वेदना आणि असुरक्षितता पुन्हा जाणवली. त्यावेळी ब्रिटीश रॉयल एअर फोर्स आणि इतर ब्रिटीश सरकारी संस्थाचे, अजून ज्याला देश म्हणून मान्यता मिळाली नाही पण ज्यांनी महायुद्धाची प्रचंड झळ सोसली आहे त्या व्यक्तीसमूहाशी नियम न तोडता कसे वागावे या बद्दलची घुसमट आणि हतबलता देखील जाणवली.
सगळ्यात शेवटी अम्मानच्या विमानतळावर जाण्यासाठी जॉर्डनच्या वेशीवर भारतीयांच्या बसेस आणि कार्स येतात आणि सीमेवरचा जवान गेट उघडतो तेंव्हा या सुखांतामुळे डोळ्यात आनंदाश्रू आले तरी कुठेतरी याच्या विरुद्ध अत्यंत दुर्दैवी शोकांतिकेचा नायक असलेला तीन वर्षाचा आयलान कुर्दि आणि त्याचे कुटुंबीय आठवून खूप हळहळ वाटली. अम्मानच्या विमानतळावरची भकास चेहऱ्याची गर्दी बघून सिरियन रीफ्युजी क्रायसिस काय असू शकतो, ते दृश्य स्वरूपात जाणवले.
(Image Courtsey : The Daily Star Net) |
चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही. पासपोर्ट नसलेल्या लोकांना ओळखायचे कसे? ही समस्या असलेल्या भारतीय दूतावासाचा राग येत नाही. जेवणाच्या वेळी फोन न उचलणाऱ्या कोहली नामक सरकारी कर्मचाऱ्याचा, मलेशियाला जा सांगणाऱ्या सेक्रेटरीचा, कोहलीला टाळणाऱ्या मंत्र्याचा, प्रत्येक माणशी २०० डॉलर घेऊन ५०० लोकांना घेऊन जाणाऱ्या भंगार जहाजवाल्याचा, युद्ध क्षेत्रात जायला सुरवातीला नकार देणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकांचा, अम्मानच्या विमानतळावर "गर्मी मत खाओ, मुझे भी कुछ पता नही" असे अजीजीने सांगणाऱ्या कर्मचाऱ्याचा, सतत कटकट करणाऱ्या जॉर्ज किंवा पूनावालाचा, इतकेच काय शेवटी कुवेती स्त्रीला पाहून भडकलेल्या आणि नंतर भारतीय लोकांची गर्दी पाहून वरमलेल्या इराकी सैनिकाचा; कुणाचाच राग येत नाही. सगळेच त्या परिस्थितीचे बळी वाटतात. कथेच्या नायकाला देखील पळून जाण्याची किंवा हे सगळं सोडून द्यावंसं वाटणं, त्याच्या पत्नीने आधी विरोध नंतर साथ देणं; सगळं नैसर्गिक वाटतं. कटकट्या जॉर्ज शेवटी विमानात बसल्यावरसुद्धा स्वभावानुसार हवाई सुंदरीला, "फर्स्ट क्लासमध्ये कोण बसणार हे कसे ठरवले?" असे विचारतो आणि ही सगळी आपल्या आजू बाजूला वावरणाऱ्या अनेक लोकांची गोष्ट आहे याची खात्री पटते.
अक्षय कुमारचे चाहते हा पिक्चर तर बघतीलच आणि कदाचित निम्रत कौरचे देखील. पण आपल्या आजूबाजूला सद्य काळात घडत असणाऱ्या घटनांची भीषणता जाणवून घेण्यासाठी आणि व्यवस्था आपले काम कसे करते, त्यात इच्छाशक्ती आणि भावना किती महत्वाचा भाग पार पाडते ते समजण्यासाठी तर हा चित्रपट सर्वांनी पहायला हवा.