Sunday, May 13, 2018

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ५)

_________

आयबीएम ही उद्योगांसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी होती. SAP, Oracle, BAAN या सॉफ्टवेअर बनवून उद्योगांना विकणाऱ्या कंपन्या होत्या. ऍपल ही पीसीसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी होती. मायक्रोसॉफ्ट ही पीसीसाठी सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी होती. याहू ही एक वेब पोर्टल कंपनी होती. गूगल एक सर्च इंजिन होते. तर फेसबुक एक सोशल नेटवर्क होते. गुगलने केलेले सोशल नेटवर्क म्हणजे ऑर्कुट आणि फेसबुक यांचा जगासाठी जन्म एक दोन महिन्यांच्या अंतराने झाला. पण त्यातलं फेसबुक टिकलं तर ऑर्कुट बंद पडलं. असं होण्यामागे फेसबुकचा जितका वाटा आहे तितकाच वाटा टेलिफोन उद्योगातील क्रांतीचाही आहे. त्यामुळे या भागात टेलिफोन क्रांतीचा थोडक्यात आढावा घेतो.

१८७६ला अलेक्झांडर ग्रॅहम बेलला अमेरिकेत टेलीफोनचं पेटंट मिळाल्यापासून १९७३ मध्ये मोटोरोलाने जगातील पहिला कुठेही घेऊन जाता येण्याजोगा (कार किंवा ट्रेनमध्ये न बसवलेला) मोबाईल फोन बाजारात आणेपर्यंत टेलिफोनच्या जगातील नवनवे शोध हे टेलिफोनच्या उपकरणाऐवजी टेलिफोनच्या नेटवर्कशी संबंधित होते. टेलीफोन एक्स्चेंजमधील स्विच कसे असावेत? ते माणसांनी नियंत्रित न करता स्वयंचलित कसे करावेत? संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे न्यावेत? तारेतून की बिनतारी? त्यासाठी कुठल्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरावे? रेडिओ लहरी किंवा उपग्रहांचा वापर करून टेलिफोन संदेश कसे पाठवता येतील? यासारखे प्रश्न सोडवण्यात टेलिफोन तंत्रज्ञांना रस होता. टेलिफोनच्या उपकरणात मात्र वरवरचे बदल होत होते.

१९५० मध्ये बाजारात पेजर आले. म्हणजे ध्वनीसाठी आणि लिखित संदेशांसाठी दोन वेगवेगळी उपकरणे विकसित झाली. यातील ध्वनीसाठी असलेला फोन अचल होता. फारतर धावत्या ट्रेनमध्ये किंवा कारमध्ये फोन उपलब्ध झाले होते. पण पेजर जसा ग्राहकांना स्वतःबरोबर कुठेही नेता येत होता त्याप्रमाणे फोन कुठेही नेणे ग्राहकांना शक्य नव्हते. या समस्येतून मोटोरोलाने मार्ग काढला. १९१७ ला एका फिनिश तंत्रज्ञाने मोबाईल फोनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. पण प्रत्यक्ष मोबाईल बाजारात यायला १९७३ साल उजाडले. फोनच्या उपकरणाच्या बाबतीत संशोधनाची मंदगती चालू होती. आणि एकाभिमुखता (Convergence) किंवा एकाच उपकरणातून वेगवेगळ्या सेवा ही संकल्पना टेलिफोनच्या विश्वात मूळ पकडत नव्हती.

मोबाईल फोन १९७३ला बाजारात आले. त्यानंतरही त्यांचा वापर केवळ ध्वनिसंदेशांसाठी केला जात होता. मोबाईलमधून sms पाठवता यावेत या संकल्पनेवर काम करायला १९८० च्या दशकात सुरुवात झाली. प्रायोगिक तत्वावर जगातला पहिला sms १९९२ च्या अखेरीस पाठवला गेला आणि सर्व ग्राहकांसाठी sms सुविधा १९९३ला सर्वप्रथम स्वीडन मध्ये सुरु झाली. सुरवातीला केवळ नोकिया कंपनीचे हॅंडसेट्स sms पाठवण्यासाठी सक्षम होते. नंतर जवळपास वीस वर्षे टेलिफोनच्या क्षेत्रात अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे राज्य करण्यासाठी नोकियाच्या साम्राज्याच्या पाया या sms सर्व्हिसेस ने घातला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लोकांच्या हातात आलेल्या फोनवर आता स्क्रीन आली होती. त्यावर मेसेज येऊ शकत होते आणि त्यावर स्नेक सारखे साधे गेम खेळणेही शक्य होते.

म्हणजे १८७६ला लँडलाईन, आणि तिच्याशी संलग्न असणारे अचल टेलीफोन्स, नंतर १९१७च्या आसपास रेल्वे आणि कार्समध्ये बसवलेले फोन्स, नंतर १९५० ला पेजर, नंतर १९७३ ला मोबाईल फोन्स आणि मग १९९३ला एकाच फोनमधून ध्वनी आणि sms पाठविण्याची आणि साधे गेम्स खेळण्याची सोय , अशा मंदगतीने टेलिफोन उपकरणांच्या तंत्रज्ञानाची प्रगती चालू होती. १९८०तील १जीवरून १९९० मध्ये २जी, २.५जी अश्या प्रकारच्या नेटवर्कवर काम करून नोकिया जगभरात यशाचे ढोल वाजवत होती. त्याचवेळी ३जी नेटवर्कवर काम सुरु झाले होते.

थोडक्यात सांगायचं म्हणजे १जी सर्किट स्विचिंगवर काम करत होतं. २जी ध्वनिसंदेशांसाठी सर्किट स्विचिंगवर आणि डेटासाठी पॅकेट स्विचिंगवर काम करत होतं. आता ३जी मध्ये सर्किट स्विचिंग टाळून केवळ पॅकेट स्विचिंगवर सर्व कामे होणार होती. नोकियाने ३जी मध्येही लक्ष घातले. पण नोकिया सामान्य गिऱ्हाईकांना सेवा देण्याकडे लक्ष देत असताना, केवळ उद्योग क्षेत्राला हवी तशी सुरक्षितता देण्याच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली ती १९९६ मध्ये स्थापन झालेल्या रिसर्च इन मोशन या कंपनीने. तिने ईमेल, sms, आणि मर्यादित प्रमाणात ब्राउजिंग करू देणारा नवा फोन बाजारात आणला. त्या फोनचं नाव होतं ब्लॅकबेरी.

१९९३ ला IBM ने जगातील पहिला स्मार्टफोन बाजारात आणल्यानंतर आता फोनचा बाजार बदलू लागला होता. IBM पेक्षा ब्लॅकबेरी जास्त लोकप्रिय होऊ लागला होता. ब्लॅकबेरी इतका लोकप्रिय होता की सगळे उद्योग आपल्या कर्मचाऱ्यांना ब्लॅकबेरी फोन देऊ लागले. सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना देखील ब्लॅकबेरी वापरणे सोयीचे वाटू लागले. अगदी आताच्या अमेरिकन निवडणुकीतील रशियन हस्तक्षेपाच्या घटनेत हिलरी क्लिंटन यांच्या ब्लॅकबेरी फोनच्या खाजगी सर्व्हरमधील इमेल्सची चोरीदेखील गाजली.

स्मार्टफोन आल्यामुळे फोन, डिजिटल डायरी, एसेमेस, ईमेल, मर्यादित ब्राउजिंग अश्या सगळ्या सेवा एका उपकरणातून मिळू लागल्या होत्या. त्यामुळे मोबाइललाही आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असणे आवश्यक होते. लँडलाईन फोनला वीज लागत नव्हती. पण मोबाईलला स्क्रीन आल्यापासून त्याला वीजेचा पुरवठा होणे आवश्यक होते. पण मोबाईल गिऱ्हाईकाच्या खिशात राहणार असल्याने त्याला बॅटरी असणे आवश्यक झाले. आता कमी वजन, खिशात मावण्याची आवश्यकता आणि ऊर्जेची बचत या सगळ्या गरजांना पूर्ण करू शकणारी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणे आवश्यक होते. आणि डेस्कटॉप किंवा लॅपटॉपप्रमाणे वापरून झाल्यावर कुणी मोबाईल बंद करणार नव्हतं. तो कायम चालू राहणार होता. त्यातील ईमेल क्लायंट ठराविक कालावधीनंतर स्वतःहून ईमेल सर्व्हरशी संपर्क साधून आलेल्या ईमेल्स फोनवर डाउनलोड करणार होता. त्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टीम रिअल टाईम असणार होती. कॉम्प्युटरला लागते ती OS (Operating System) फोनला लागते ती RTOS (Real Time Operating System) एरिक्सन, मोटोरोला आणि नोकिया एकत्र आले आणि सिम्बियन ऑपरेटिंग सिस्टीमचा विकास सुरु झाला. या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स त्या स्मार्टफोन्सवर काम करणार होत्या ज्यांचा अर्ध्याहून अधिक पृष्ठभाग स्थिर कीबोर्डने व्यापलेला होता.

फोनच्या दुनियेत अशी धामधूम चालू होती. आणि इथे कॉम्प्युटर व इंटरनेटच्या दुनियेत गुगलचा जन्म झाला होता. इंटरनेट बँकिंग सुरु झालं होतं. ईबे (e -bay) सुरु झालं होतं. काही देशातील सरकारनी लोकांचे आयकर रिटर्न्स इंटरनेटवरून स्वीकारता येतील का त्याची चाचपणी करायला सुरवात केली होती. १९९९ ते २००१ अश्या केवळ दोन वर्षात नॅपस्टरने गाणी मोफत वाटून इंटरनेटची ताकद काय असू शकते ते दाखवत मनोरंजन उद्योगाची झोप उडवली होती. मायक्रोसॉफ्टबरोबर ब्राऊजर युद्ध हरलेल्या नेटस्केपने आपला सगळा सोर्सकोड दान करून मोझिला या नव्या ब्राऊजरच्या विकासासाठी रस्ता मोकळा केला होता. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात ओपन सोर्स ही नवी संकल्पना उदयाला येऊ लागली होती. वेबसाईट चालवण्यासाठी ड्रूपल, वर्डप्रेस, जूमला अशी वेगवेगळी सॉफ्टवेअर ओपन सोर्सवर उपलब्ध होऊ लागली होती. २००१ ला विकिपीडिया सुरु होऊन माहितीचा अनमोल खजिना मोफत उपलब्ध झाला होता.

आणि त्याच २००१ मध्ये ऍपलने iPod लॉन्च करून नॅपस्टरमुळे जबर धक्का बसलेल्या संगीत क्षेत्राला नवीन उभारी देण्याचे काम सुरु केले. जे काम १९९५ मध्ये मायक्रोसॉफ्ट MSN च्या सॉफ्टवेअरद्वारे करू शकली नव्हती तेच काम थोड्या वेगळ्या प्रकारे ऍपलने करण्यास सुरवात केली. मनोरंजन पाहिजे तर मनोरंजनासाठी पैसे मोजा. फुकटात मनोरंजन मिळणार नाही. मायक्रोसॉफ्टने यासाठी डेस्कटॉपवर सॉफ्टवेअर वापरण्याचा प्रयत्न केला होता. याउलट ऍपलने विशिष्ट हार्डवेअर वापरून आपली कल्पना यशस्वी करून दाखवली.

ऍपल मनोरंजन क्षेत्राला आकार देत होती. स्वतःचे नवीन डेस्कटॉप आणि लॅपटॉप बाजारात आणत होती. नोकिया, मोटोरोला, ब्लॅकबेरी मोबाईल फोनमध्ये क्रांती घडवून फोन्सना अधिकाधिक स्मार्ट बनवण्याच्या मागे लागल्या होत्या. तेव्हा गूगलने इंटरनेटवर चालणाऱ्या विविध सेवा विकत घेण्याचा आणि गिऱ्हाईकांना त्या मोफत देण्याचा धडाका लावला होता. ऑर्कुट आणि फेसबुक अस्तित्वात आले. फेसबुकने सोशल नेटवर्कवर लक्ष दिलं. तर गूगलने मोबाईल फोनमध्ये लक्ष घालायला सुरवात केली. २००३ मध्ये सुरु झालेली अँड्रॉइड ही फोनसाठी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणारी कंपनी गूगलने 2005 मध्ये विकत घेतली. फेसबुकला सोशल नेटवर्क वाढवायचं होतं. तर गुगलला स्मार्टफोनच्या बाजारात सम्राट व्हायचं होतं. गुगलच्या अँड्रॉइडवर चालणारा फोनही ब्लॅकबेरी आणि नोकिया सारखा असणार होता. अर्धा भाग स्क्रीन उरलेला अर्धा भाग कीबोर्ड.

आणि २००७ मध्ये फोनच्या क्षेत्रात अजून एक मोठी क्रांती झाली. इतर सर्व कंपन्यांपेक्षा किमान पाच वर्षे पुढे असलेले तंत्रज्ञान वापरून तयार केलेले उपकरण हातात घेऊन स्टीव्ह जॉब्स मंचावर उभा राहिला. आणि त्याने एकंच वाक्य तीनदा म्हटलं. “आयपॉड, फोन आणि इंटरनेट डिव्हाईस” त्याच्या पुन्हा पुन्हा बोलण्याला हसून दाद देणाऱ्या प्रेक्षकांना आणि संपूर्ण जगाला नंतर लक्षात आलं की ऍपलने या तीन गोष्टी एका उपकरणात एकत्रित केल्या आहेत. टेलिफोनच्या क्षेत्रात convergence ची कमी शेवटी २००७ मध्ये पूर्ण झाली. एकाच उपकरणात सगळी कामे होणार होती. ते उपकरण म्हणजे एक भलीमोठी टचस्क्रीन असणार होते. त्याला स्थिर कीबोर्ड नव्हता. आणि त्यावर कामं करायला वेगवेगळी ऍप्स असणार होती. 



हे बघताच गूगलचं धाबं दणाणलं. स्मार्टफोनच्या बाजारात अँड्रॉइड आणून वर्चस्व प्रस्थापित करण्याची गूगलची इच्छा धुळीला मिळाली होती. गूगलने अँड्रॉइडवर नव्याने काम सुरु केलं. आता टचस्क्रीन हेच भविष्य होतं. नोकिया, मोटोरोला, ब्लॅकबेरी हे सत्य ओळखायला उशीर करणार होत्या म्हणून त्या मागे पडणार होत्या. गूगलने आपली सगळी शक्ती अँड्रॉइडच्या मागे लावली. आणि फेसबुकने सोशल नेटवर्कच्या मागे.

No comments:

Post a Comment