Sunday, May 13, 2018

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)

_________

मागल्या भागात आपण पाहिले की जिथून डेटा चोरीला सुरवात झाली असे मानले जाते ते ‘धिस इज युअर लाईफ’ नावाचे ऍप आधी अमेझॉनच्या मेकॅनिकल टर्क या फ्रीलान्स कामाच्या पोर्टलवर आणि नंतर फेसबुकवर अलेक्झांडर कोगनच्या ग्लोबल रिसर्च कंपनीने लॉन्च केले होते. अलेक्झांडर कोगन केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून काम करत असणारा डेटा सायंटिस्ट आहे. त्याच्या ग्लोबल रिसर्च कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती केम्ब्रिज ऍनालिटिका नावाच्या दुसऱ्या कंपनीने.

केम्ब्रिज ऍनालिटिका २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये सुरु झालेली कंपनी होती. आता परवा म्हणजे १ मी २०१८ ला ही कंपनी बंद केली गेली आणि तिचे काम आता एमारडेटा नावाची दुसरी कंपनी करणार आहे. रॉबर्ट मर्सर या अमेरिकन हेज फंड मॅनेजरकडे आणि स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज या कंपनीकडे केम्ब्रिज ऍनालिटिकाची मालकी होती.

१९४६ मध्ये जन्मलेले रॉबर्ट मर्सर अमेरिकन कॉम्प्युटर सायंटिस्ट आहेत आणि अमेरिकेतील अनेक उजव्या (right wing) समजल्या जाणाऱ्या चळवळींचे खंदे समर्थक आहेत. सध्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीत मर्सर यांचा लक्षणीय पाठिंबा होता.

तर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज (एससीएल) ही १९९० मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. या कंपनीची जन्मकथा धूसर आहे. १९८९ मध्ये निगेल ओक्स (Nigel Oakes) नावाच्या माणसाने लंडन युनिव्हर्सिटीमध्ये बिहेव्हियरल डायनॅमिक्स ग्रुप या नावाने एक चाचणी ग्रुप स्थापन केला अशी माहिती एससीएलच्या वेबसाईटवर होती. पण लंडन युनिव्हर्सिटीने त्यापासून हात झटकल्यावर लंडन युनिव्हर्सिटीचे नाव वेबसाइटवरून वगळण्यात आले. निगेल ओक्सच्या शिक्षणाच्या बाबतीतही असाच घोळ आहे. ‘निगेल ओक्स यांनी एटन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथून मानसशास्त्राचे शिक्षण घेतले’ असा उल्लेख एससीएलच्या वेबसाईटवर होता पण युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने याबाबत कानावर हात ठेवल्याने, ‘निगेल ओक्स यांनी एटन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले नंतर मानसशास्त्राचे शिक्षण घेतले’ अशी दुरुस्ती एससीएलने केली.

तर एससीएलच्या वेबसाईटवर दिलेली माहिती खरी मानायची झाल्यास आपल्याला विश्वास ठेवावा लागेल की, १९८९ मध्ये निगेल ओक्सने बिहेव्हेरियल डायनॅमिक्स ग्रुप नावाचा एक चाचणी ग्रुप स्थापन केला. सामाजिक आपत्काळात उपयोगी पडेल असे संवादाचे आणि जनमानस बदलण्याचे तंत्र विकसित करणे हा या ग्रुपचा उद्देश होता. वर्षभरात देशोदेशीचे अनेक नामवंत प्राध्यापक आणि युनिव्हर्सिटीजनी या प्रकल्पात रस दाखवला. त्यानंतर १९९० मध्ये एका युरोपियन गुंतवणूक कन्सोर्टियमने दिलेल्या आर्थिक पाठबळातून बिहेव्हिरियल डायनॅमिक्स इन्स्टिट्यूटचा जन्म झाला. आणि याच इन्स्टिट्यूटचे १९९३मध्ये नवीन नामकरण झाले स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज उर्फ एससीएल.

जागतिक ब्रॅण्ड्स, देशोदेशींची सरकारे आणि सैन्य यांना आपापल्या कामात मदत करणे हे एससीएलचे काम होते आणि आहे. त्यांच्या वेबसाइटवर ते सांगतात की १९९४ पासून त्यांनी देशोदेशींच्या सरकारांना सामाजिक आपत्तीकाळात लोकांशी संपर्क कसा साधायचा त्याचे मार्गदर्शन केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेपाळ, इराक यासारख्या देशात निवडणुका व्यवस्थित पार पाडाव्यात म्हणून मदत केली आहे. विविध राजकारण्यांनी आपली इमेज समाजासमोर कशी मांडावी याचेही मार्गदर्शन ते करतात. एससीएलचे काम प्रामुख्याने तिसऱ्या जगात चालते.काही मिलिटरी उठावातही त्यांचा हात होता अशी कुजबुज आहे. एससीएलची कार्यपद्धती इंग्लंड आणि अमेरिकेच्या सरकारांनी मान्य केली आहे असा उल्लेख एससीएलच्या जुन्या वेबसाईटवर होता.

तर या एससीएल नावाच्या ब्रिटिश कंपनीने रॉबर्ट मर्सर नावाच्या उजव्या विचारसरणीच्या अमेरिकन अब्जाधीशाच्या पैशाने २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये केम्ब्रिज ऍनालिटिका स्थापन केली. तिने केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये काम करणाऱ्या अलेक्झांडर कोगनच्या ग्लोबल रिसर्च कंपनीला अमेरिकन लोकांचा डेटा गोळा करायला पैसे पुरवले.

त्याचवेळी म्हणजे २०१३ मध्ये कॅनडात ‘ऍग्रीगेट आयक्यू’ नावाची अजून एक कंपनी स्थापन झाली. हिचे पण काम होते डेटा गोळा करणे, त्याचा अर्थ लावणे आणि त्याचा उपयोग करणे. या कंपनीत केम्ब्रिज ऍनालिटिका किंवा रॉबर्ट मर्सरचा पैसा लागलेला नव्हता. परंतु या कंपनीला सहा मोठी गिऱ्हाइकं मिळाली ती ब्रिटनमधून.

२००९ पासून ब्रिटनमध्ये युनायटेड किंगडम इंडिपेन्डन्ट पार्टी नावाचा लहानसा पक्ष लोकप्रिय होत होता. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे अशी या पक्षाची मागणी होती. सत्ताधारी असलेल्या आणि उजव्या विचारसरणीच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षातील अनेक सभासददेखील याच मताचे होते. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांचे मत होते की युरोपियन युनियनच्या नियमांत बसून ब्रिटिश जनतेच्या मागण्या मान्य करता येतील. त्यासाठी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची गरज नाही. पण स्वपक्षातील सभासदांचा वाढता दबाव आणि युनायटेड किंगडम इंडिपेन्डन्ट पार्टीने तापवलेले वातावरण यामुळे कॅमेरॉननी या मुद्द्यावर सार्वमत घ्यायची घोषणा केली. आणि ‘व्होट लीव्ह’, ‘बी लीव्ह’ ‘व्हेटरन्स फॉर ब्रिटन’ यासारखे प्रचारगट सुरु झाले. त्यांना भरपूर डोनेशन्स मिळू लागले. आणि त्यांनी या डोनेशन्सचा वापर करून ‘ऍग्रीगेट आयक्यू’ ला कंत्राट दिले.

ऍग्रीगेट आयक्यूचे काम होते ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे यासाठी जनमत तयार करणे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कंत्राटे मिळाल्याने ऍग्रीगेट आयक्यू कामाला लागली. आणि नक्की ऍग्रीगेट आयक्यूच्या प्रचारतंत्राचा किती हात आहे ते सांगता येत नसले तरी निसटत्या अंतराने ब्रिटिश जनतेने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. यात केम्ब्रिज ऍनालिटिकाचा प्रत्यक्ष संबंध दिसत नसला तरी चॅनेल ४ या ब्रिटिश चॅनेलच्या शोधपत्रकारांसमोर बोलताना केम्ब्रिज ऍनालिटिकाचा सीईओ अलेक्झांडर निक्सने ब्रेक्झिटमध्ये केम्ब्रिज ऍनालिटिकाचा हात होता अशी कबुली दिली. आणि विविध उजव्या विचारसरणीच्या प्रचारगटांना मिळालेल्या डोनेशन्समध्ये उजव्या विचारसरणीचा अब्जाधीश रॉबर्ट मर्सरचा किती हात होता तेही गुलदस्त्यात आहे.



वय, उत्पन्न, लिंग, वंश सारख्या घटकांवर आधारित मतदारांचे वर्गीकरण करून, त्यांना समाजमाध्यमांवर लक्ष्य करून, त्यांच्यावर विशिष्ट मतांचा मारा करून त्यांचे मतपरिवर्तन करण्याच्या ऍग्रीगेट आयक्यूच्या कामासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणारा माणूस होता ‘क्रिस्तोफर वायली’. ब्रेकझिटचे काम झाल्यावर तो ऍग्रीगेट आयक्यू सोडून तो केम्ब्रिज ऍनालिटिकाला येऊन मिळाला. जो प्लॅटफॉर्म त्याने ब्रेक्झिटसाठी ऍग्रीगेट आयक्यूत बनवला होता; तोच प्लॅटफॉर्म आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीसाठी वापरला जाणार होता. आणि सगळे काम पूर्ण झाल्यावर हाच क्रिस्तोफर वायली केम्ब्रिज ऍनालिटिकाविरोधात व्हिसलब्लोअर म्हणून उभा राहाणार होता.



आता केम्ब्रिज ऍनालिटीकाकडे अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीतील पहिलं गिऱ्हाईक आलं. त्याचं नाव होतं रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार टेड क्रूझ. पण त्याच्यासमोर आव्हान होतं त्याच्याच पक्षातील दुसऱ्या एका उमेदवाराचं. त्याचं नाव होतं डोनाल्ड ट्रम्प. अध्यक्षपदासाठी कोण लढणार या रेसमध्ये टेड क्रूझ डोनाल्ड ट्रम्पकडून पराभूत झाला. मग डोनाल्ड ट्रम्पने केम्ब्रिज ऍनालिटिकाची मदत घ्यायचं ठरवलं. आता डोनाल्ड ट्रम्पची स्पर्धा सुरु झाली ती डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटनशी.

इंग्लंडमध्ये मजूर (labour) पक्ष म्हणजे उदारमतवादी आणि डावा मानला जातो तर कन्झर्व्हेटिव्ह पक्ष म्हणजे उदारमतवादी पण उजव्या विचारसरणीचा मानला जातो. ब्रेक्झिटच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये उजवी, राष्ट्रवादी आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विरुद्ध असलेली संकुचित विचारसरणी जिंकली होती. त्याचप्रमाणे अमेरिकेत बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटनचा डेमोक्रॅटिक पक्ष म्हणजे उदारमतवादी आणि डावा मानला जातो. याउलट डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष उजव्या आणि राष्ट्रवादी विचारसरणीचा मानला जातो.

आता या उजव्या राष्ट्रवादी विचारसरणीला इंग्लंडनंतर अमेरिकेत जिंकायचं होतं. सोबत होती केम्ब्रिज ऍनालिटिका; अलेक्झांडर कोगनच्या धिस इज युअर लाईफने लोकांना अंधारात ठेवून गोळा केलेला ५० कोटी अमेरिकन लोकांचा डेटा आणि समोर होती डेमोक्रेटिक उमेदवार हिलरी क्लिंटन.

केम्ब्रिज ऍनालिटिकाने कुंपणावरचे मतदार शोधणे, त्यांना समजेल अश्या भाषेत स्लोगन तयार करणे, त्यांच्या फेसबुक फीडमध्ये हे संदेश पुन्हा पुन्हा येत राहतील अशी व्यवस्था करणे या सर्व गोष्टी केल्या. लोक प्रचाराला बळी पडत नाहीत पण आपल्या मित्रांच्या मतामुळे त्यांचे मतपरिवर्तन होऊ शकते, या गृहीतकाला वापरून विविध हॅशटॅग वापरणे, लोकांच्या चर्चा होतील असे विषय समाजमाध्यमांवर उठवणे; हे सर्व उद्योगही या निवडणुकीत झाले. शिवराळ भाषेत बोलणारे ट्रम्प हरतील अशी सर्व निवडणूक पंडितांची अटकळ असताना आश्चर्यकारकरित्या हिलरी हरल्या आणि राष्ट्रवादी उजव्या विचारसरणीचे ट्रम्प अमेरिकन अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले.

याचा अर्थ फक्त उजव्या विचारसरणीच्या रिपब्लिकन पक्षाने निवडणुकीत चलाखी केली का?

तर तसे म्हणता येणार नाही. कारण २०१२ च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हीच चलाखी डेमोक्रेटिक पक्षाच्या बराक ओबामांनी सर्वात प्रथम केली होती. तेव्हा बाराक ओबामा यांनी तर फेसबुकवर ओबामा फॉर २०१२ नावाचे ऍप लॉन्च केले होते. त्यात फेसबुक युझर्सनी आपली माहिती द्यायची होती आणि मग हे ऍप त्यांच्या मित्रांची माहितीही फेसबुककडून घेणार होते. म्हणजे जे काम अलेक्झांडर कोगनच्या धिस इज युअर लाइफने २०१३-१४ नंतर करायला सुरवात केली तेच काम २०१२च्या वेळी बराक ओबामा यांच्या ऍपनेही केले होते. आणि त्यांनाही फेसबुकच्या ग्राफ एपीआयने; यूझर्स, त्यांचे मित्र, त्यांचे लाईक्स याचा सगळा डेटा सरसकटपणे दिला होता. आणि तोच वापरून ओबामा दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले होते. आणि टेकसॅव्ही अध्यक्ष म्हणून त्यांचा गौरवही झाला होता.

जर असे असेल तर मग केम्ब्रिज ऍनालिटिकाबद्दल इतका गदारोळ का?

याचं उत्तर, 'मोठ्या कंपन्या करतात ते सगळं बरोबर' अशी मानसिकता असलेल्या भारतीय मनाला कळणे थोडे कठीण आहे. पण २०१२च्या ओबामा ऍपमध्ये आणि २०१३च्या धिस इज युअर लाईफ नावाच्या ऍपमध्ये एकंच मोठा फरक होता. तो म्हणजे ओबामा ऍपमध्ये माहिती देणाऱ्यांना हे माहिती होतं की त्यांचा डेटा राजकीय प्रचारासाठी वापरला जाणार आहे. म्हणजे ऍपला, फेसबुकला आणि युझर्सना सगळ्यांना ओबामा ऍपच्या हेतूंबद्दल पूर्ण कल्पना होती. याउलट धिस इज युअर लाइफने डेटा गोळा करताना केवळ अकॅडमिक संशोधनासाठी डेटा वापरला जाईल असे सांगून तो गोळा केला आणि नंतर तो केम्ब्रिज ऍनालिटिकाला विकला. म्हणजे या ऍपने फेसबुकची आणि यूझर्सची फसवणूक केली. आणि या फसवणुकीला फेसबुक रोखू शकले नाही. किंबहुना आपल्या प्लॅटफॉर्मवर कुठले ऍप्स येतात? डेटाच्या संदर्भात त्यांचे उद्देश, नियम आणि अटी काय आहेत? याबाबत फेसबुकने दुर्लक्ष केले, ऍप्स या डेटाचे काय करू शकतील याबाबत फेसबुककडे कुठलीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे अमेरिकेन लोकांच्या डेटाची चोरी करणे केम्ब्रिज ऍनालिटिकाला शक्य झाले. असा आरोप फेसबुकवर लागला आहे.

स्वतः केम्ब्रिज ऍनालिटिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी, 'हा डेटा उपलब्ध होता परंतू तो वापरण्याऐवजी रिपब्लिकन पार्टीकडे असलेला मतदारांचा डेटा वापरला कारण तो अधिक अचूक होता', असे जाहीर केले आहे. त्यामुळे अमेरिकन अध्यक्षपदी उजव्या राष्ट्रवादी विचारसरणीची व्यक्ती बसण्यात डेटाचोरीचा हात होता की नाही हे गुलदस्त्यात असले तरी फेसबुकला गंडवून त्याद्वारे फेसबुक यूजर्सना गंडवणे ऍप्सना सोपे आहे हे उघडकीस आले आहे. आम्ही जिच्यावर विश्वास ठेवला ती व्यवस्था अपूर्ण आहे, तिला वाकवणे सहजशक्य आहे आणि आमच्या डेटाबाबत ती पुरेशी गंभीर नाही हा धक्का मोठा असल्याने २०१३-१४ मध्ये झालेल्या या डेटाचोरीचा धुरळा आता उडतो आहे.

याशिवाय या गदारोळाला रशियन गुप्तचर संस्थांच्या कारवायांचाही एक मुद्दा आहे. त्याबाबत आणि आता पुढे काय होणार याबाबत पुढील भागात लिहीन आणि ही लेखमाला पूर्ण करीन.

No comments:

Post a Comment