---
श्री ना पेंडसे (तुंबाडचे खोत या कादंबरीचे लेखक) Source : Internet |
अश्या या मोरयाचा एक वंशज भिकाजी; पहिल्यांदा तुंबडबाहेर पडतो. त्याला स्वतःचं संस्थान स्थापन करायचं आहे तुंबाडात. पण तो पेशव्यांबरोबर पानिपतावर जातो आणि लंगडा होऊन परततो. त्याचं संस्थान स्थापनेचं स्वप्न विरून जातं. त्याची तीन मुलं; बंडू, दादा आणि नाना. त्यातील बंडू आणि दादा खोतपणाची रग मिरवणारे तर नाना मात्र खोत वाटत नाही इतका मवाळ.गावात त्याला सगळे शामळू खोत म्हणतात. भिकाजीपंतांचं संस्थान स्थापनेचं स्वप्न बंडू आणि दादा खोताच्या डोक्यात शिरतं. पेशवाई सरत चालली आहे. भारतात कंपनी सरकारचं राज्य आलं आहे. बंडू आणि दादा खोत गावात आणि बिछान्यात आपले रंग उधळत आहेत. चाळीशीच्या तिजवर दादा खोताचा विवाह होतो गरीब किर्तनकार बापाच्या कोवळ्या पोरीशी, गोदीशी. वाड्याच्या आणि दादाच्या प्रथम दर्शनाला पोरगी गांगरते पण स्वतःला आणि नंतर घराला सावरते. इथे संस्थान स्थापन करण्याचं खोत बंधूंचं स्वप्न उचल खातं. कंपनी सरकारचं राज्य उलथायला ते अघोरी मार्गाची उपासना करतात. मोरयाच्या टेंभुर्णीला सोडून, खाडीतील बेटावर असलेल्या गिऱ्हाडीला नवस करतात. मद्य, मास, मैथुनाचा नैवेद्य करतात आणि शेवटी आपली उपासना पूर्ण करण्यासाठी अतिशय क्रूर आणि अमानवी प्रकार करतात. ते पाहून शामळू नाना खोत विभक्त होतो. वाड्याची वाटणी होत नाही आणि इतर सामायिकीची जी वाटणी होते त्यात त्याच्या हाताला फार काही लागत नाही. पण तो मोरयाच्या मूळ वाड्यापासून दूर लिंबाडला स्वतःचा वाडा बांधतो. मूळ वाड्यासारखाच पण लहान. कारण मोरयाच्या मानाला धक्का लागायला नको. पण त्या अघोरी प्रकारामुळे कंपनी सरकारचा फौजदार तुंबाडला चौकशीला येतो. बंडू खोत परागंदा होतो. दादा खोताची चामडी लोळवली जाते. गावातून वरात निघते. नंतर प्रकरणातून घराण्याच्या नावाला सावरण्यासाठी फौजदाराची धन करावी लागते आणि त्यात दादा खोत निर्धन होतात. तरीही घराण्याचा नावलौकिक जातो तो जातोच. वाड्याचे नष्टचर्य चालू होते.
दादा खोतांचा मुलगा गणेश, आईसारखा तेजस्वी आणि हुशार. दादा खोताने दुखावलेल्या गावकऱ्याकडून त्याचा अपमान होतो. त्याला शिक्षणासाठी गावापासून दूर पाठविण्याचा निर्णय गोदाताई घेतात. आणि नंतर त्याच मुलाला विद्याभ्यासासाठी काशीला पाठवतात. त्यावेळी लाखेश्री करेल असं पुण्यातील एका मुलीचं स्थळ नाकारतात. नाना खोत चिडतो. पण गोदाताई ऐकत नाहीत. तुंबाडच्या वाड्याला मरणकळा येते. वैभव लयाला गेलेले असते. आणि मग विद्याभ्यास संपवून गणेश परततो तो गणेशशास्त्री होऊन. तेजस्वी आणि विद्वान वैद्य होऊन परतलेल्या गणेशशास्त्रींना बघून तुंबाड थरारतं. नाना खोत गोदावहिनीचे पाय पकडून माफी मागतो. गोदाताई आपल्या आनंदाचं प्रदर्शन मांडत नाहीत. वाड्याचे दिवस फिरू लागलेले असतात.
गणेशशास्त्रींनी गुरूजवळ शपथ घेतलेली असते की विद्या वापरून अर्थार्जन करणार नाही. पण त्यांच्या हाताला प्रचंड गुण असतो. धन्वंतरीच जणू. पंचक्रोशीतून त्यांच्याकडे रोगी येतात आणि निरिच्छ भावनेने गणेशशास्त्री त्यांचे रोगनिदान करतात. लोक मोबदला देऊ करतात तर तो नाकारतात. खोत घराण्याचा लौकिक वाढू लागतो. गणेशशास्त्रींच लग्न ठरतं. उपकृत गाव लग्नाचा सोहळा दिमाखात साजरा करतं. लग्नानंतर रोगी शास्त्र्यांच्या पत्नीकडे रोगनिदानाच्या कृतज्ञतेने भेटी देऊ लागतं आणि ती त्या भेटी शास्त्रीबुवांच्या नकळत स्वीकारू लागते. आता तो शिरस्ता होतो. वाड्याची भरभराट होऊ लागते.
शास्त्र्यांना चार मुलं आणि एक मुलगी. पहिला जनापा. तो खैराचं झाड निघतो. नोकरांच्या संगतीत लागतो. शास्त्र्यांची विद्या घेणं त्याच्या कुवतीबाहेरचं असतं. गड्यांच्या सवयी उचलतो आणि आयुष्यभर शेतात राबतो. नंतर जुळे चिमापा आणि भिकापा. वडिलांच्या विद्येला तेही ग्रहण करू शकत नाहीत. तालुक्याला दुसऱ्याच्या दुकानात काम करतात. त्याच्याकडून व्यापार शिकतात शेवटी तालुक्याला वखार काढतात. चौथा बजापा. आडदांड आणि लहरी. बापाचा एकही गुण न उचललेला, शिकार आणि मित्र हेच शौक असलेला. बाकी सगळे खोत बाईबाजी करणारे पण बजापा मात्र त्या बाबतीत अगदीच निरस. आणि पाचवी ताई. हिने रूप आपल्या आजीचं घेतलेलं असतं. आणि हुशारी बापाची. तिचं लग्न मोठ्या थाटात होतं.
आपली बायको रोग्यांकडून पैसे घेते हे कळताच गणेशशास्त्री हाय खातात. गुरूने दिलेल्या व्रताचा भंग झाल्याने ते बिथरतात. अचानक उद्भवलेल्या असाध्य आजाराने गणेशशास्त्र्यांचं देहावसान होतं. काही वर्षातच ताईचा नवरा परागंदा होतो आणि ती वाड्यावर परतते. शास्त्र्यांच्या बायकोने माहेरी व्याजाने लावण्यासाठी दिलेले पैसे परत देण्यास तिच्या माहेरचे नकार देतात. पैसे घेतले हे वाक्य येताच कानावर हात ठेवतात. शास्त्री देवाघरी. मोठा मुलगा अजून नाकर्ता. नंतरचे तीन अजून नशीब चाचपडणारे. मुलगी परत आलेली. माहेरी दिलेलं धन गायब झालेलं. वाड्याचे दिवस फिरू लागलेले असतात.
इथे शामळू नाना खोताच्या मुलाने, मधू खोताने लिंबाडला सावरलं असतं. तुंबाडात जातपात आणि कडक सोवळं, मात्र लिंबाडात जातभेदाची धार बोथटलेली. तुंबाडात इतर जातींची पानं आडवी मांडलेली, लिंबाडात मात्र ती ब्राह्मणांबरोबर सरळ रेषेत. मधू खोताला मुलगा होतो. त्याचं नाव नृसिंह किंवा नरसू खोत. सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, हुशार डोक्याचा, व्यापारी आणि वृत्तीने रसिक. त्याची आणि बजापाची दोस्ती घट्ट होत जाते. ती दोस्ती जुळ्या चिमापा आणि भिकापाला सलू लागते. पण बजापा नरसूचा आधार सोडत नाही. नरसूच्या बायकोच्या नात्यातल्या मुलीशी बजापाचं लग्न होतं. जुळे नरसूला पाण्यात पाहू लागतात. त्यांना वाटतं बजापाला हाताशी घेऊन नरसू त्यांना बुडवणार. ते नरसूच्या खोड्या काढू लागतात. नरसू बजापाला मुंबईला घेऊन जातो. तिथे त्याची भेट जुलालीशी होते. म्हटलं तर नायकीण पण कुणाला जवळ येऊ न देणारी. कुणाला बोलूही न देणारी जुलाली बजापावर भाळते. आणि बायकांच्या नादाला न लागणारा बजापा तिच्याजवळ जातो. पंधरा दिवस मुंबईला तिच्याजवळ नंतर पुन्हा तुंबाडला असा त्याचा दिनक्रम सुरु होतो. तिच्या पैशातून तुंबाडला उर्जितावस्था येते. वाड्याचे दिवस फिरू लागलेले असतात.
जनपाला मुलगा होतो. त्याचे नाव विश्राम. आजोबांसारखा देखणा आणि कुशाग्रबुद्धी. पण जनापा त्याला बापाचं प्रेम देऊ शकत नाही. जनापाच्या बायकोचं चिमापाबरोबर प्रकरण चालू असतं. शेवटी तिला वेड लागतं आणि ती विवस्त्रावस्थेत खाडीत उडी टाकून जीव देते. जनापा घरात अजून अबोल होतो. विश्राम ताईशी बोलत राहतो. तिच्याबरोबर केसरी वाचतो. क्रांतिकारकांच्या गोष्टी ऐकून भारावून जातो. वडिलांबद्दल त्याच्या मनात अढी असते. एक दिवस चिमापाकडून गुरासारखा मार खातो. आणि मग त्याचे अन्नपाणी तोडले जाते. मार खाताना तो तोंडातून अक्षरही काढत नाही. स्वतःहून अन्नपाणी मागतही नाही. शेवटी चुलता चिमापा माघार घेतो. विश्राम जेवतो पण लवकरच घर देशकार्यासाठी घर सोडतो. क्रांतिकारक होतो. त्याच्या मागावर असलेले पोलीस वाड्यावर येऊन जुळ्यांना बडवतात.
बजापा तालुक्याला नवीन वाडा बांधणार असतो. मोरयाच्या वाड्यासारखा पण त्याहून छोटा. पण त्याआधी त्याची बायको होरेत (दलदलीत) उडी टाकून जीव देते. त्याचे कारण जरी वेगळे असले तरी बजापाला आणि गावाला वाटते की जुलाली प्रकरणामुळे तिने जीव दिला. त्या वाड्यावरून बजापाचं मन उडतं. अर्धवट बांधलेला वाडा तसाच सोडून तो मुंबईला जातो. त्याचा मुलगा विठ्ठल त्याच्याशी कुठलीच आपुलकी दाखवत नाही आणि मग बजापा मुंबईला तर विठ्ठल ताईजवळ तुंबाडला राहतो. पण त्याला आदर वाटतो तो लिंबाडच्या नरसूबद्दल.
मग तुंबाडला शाळा काढली जाते. त्यात मराठा ब्राह्मण वाद येतो. देणगीदार फसवतात. नरसू सगळं निभावून नेतो. चिमापाला शाळेचा चेअरमन करतो. शाळेसाठी जिवाचं रान करतो. देहाडरायांसारखा टिळकभक्त शाळेचा हेडमास्तर होतो. पण बापू वकिलांच्या संगतीने नरसू काँग्रेसमध्ये शिरतो. त्याला गांधी कळत नाहीत पण गांधींचं ऐकावंसं वाटतं. तो सत्याग्रहात भाग घेतो. तुरुंगात जाऊन येतो. पुणे करारामुळे त्याला गांधी अनाकलनीय होतो. पण काँग्रेसच देशाचं भलं करेल असं वाटत असल्यामुळे तो काँग्रेसमध्येच रहातो. तुरुंगवासामुळे त्याची प्रतिष्ठा वाढते. चिमापा जळफळतो. तो बांडेरामाच्या देवळाचा पंच झालेला असतो. नरसूला विरोध म्हणून तो टिळकपंथी होतो. शतचंडीचा यज्ञ करतो. त्यात बांडेरामाच्या आवाराजवळील एका दर्ग्याचे प्रकरण घडते. आणि ज्या मुलीवर आपलं मन बसलेलं होतं तिला चिमापाने ठेवून घेतली म्हणून बिथरलेला खान वकील दर्ग्याच्या प्रकरणात तेल ओततो. गावात हिंदू मुसलमान दंगल घडते.
नरसूची पहिली दोन मुले अनाकलनीय आजाराने लहानपणीच मरतात. जुळे सोडून तुंबाड आणि लिंबाड नरसूसाठी हळहळतं. तिसऱ्या मुलाच्या वेळी बजापा आणि जुलालीच्या हट्टाने नरसू मुंबईला डॉक्टरांकडे जातो आणि हा तिसरा मुलगा वाचतो. पुढे हाच मुलगा मुंबईला डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायला जातो. नापास होत राहतो आणि परीक्षा देत राहतो. आणि एक दिवस नरसूच्या दृष्टीने क्षुल्लक असलेल्या कारणासाठी तो धर्मांतर करतो. नरसूला धक्का बसतो. पण तो धक्का नरसू पचवतो. मुलाला विसरतो. धाकट्या मुलावर लक्ष देतो.
बापू वकील, वकिली सोडतात. गावात खादी आणतात. नरसू त्यात भाग घेतो. मग बापू वकील मैला साफ करू लागतात. नरसू त्यात भाग घेत नाही. आंतरजातीय विवाह करून देऊ लागतात. नरसूला ते कळत नाही. पण तो त्याला विरोधही करत नाही. महायुद्ध चालू होतं. नरसूला हिटलर आवडू लागतो. तो देहाडरायांशी त्याबद्दल बोलतो. टिळकभक्त असलेले देहाडरायांनी माईन काम्फ वाचलेलं असतं. हिटलरबद्दल ते नरसूला जे सांगतात ते ऐकून नरसू अजून गोंधळतो. न पटणारा गांधीच आपल्या कामाचा आहे असं त्याला वाटू लागतं. त्या एकट्या माणसाच्या जोरावर अख्खा भारत ढवळला जात आहे हे त्याला दिसतं. इतरांप्रमाणे गांधींची धरसोड वृत्ती त्याला पटत नाही. सर्वांप्रमाणे अहिंसा त्याला मूर्खपणा वाटतो. आंदोलन सुरु केल्यावर मध्येच मागे घेणाऱ्या गांधींबद्दल, 'बेभरवशाचे नेतृत्व' हेच त्याचे मत असते. पण भारतातील सर्व जातीधर्माच्या सर्व नेत्यांना मान्य नसूनही बहुसंख्य जनतेला पटणारा गांधींशिवायदुसरा कुठला नेता नाही हे त्याला पटलेले असते. नरसू काँग्रेस सोडत नाही. मनात नसताना दारूबंदी कार्यक्रमात भाग घेतो.
हिंदू मुस्लिम दंग्यात मर्दुमकी गाजवलेल्या भंडारी जातीच्या संताजीवर चिमापाच्या मुलीचं मन बसतं. तो सावरकरवादी असतो. गांधींना मानणाऱ्या नरसूला विरोध म्हणून चिमापा सावरकरवादी होतो. पण मुलगी भंडाऱ्याबरोबर जाईल हे कळताच बिथरतो. त्यात पुन्हा संताजी नरसूचा मानसपुत्र असतो. मुलीचं लग्न दुसरीकडे करून दिलं जातं. पण सर्व काही सुरळीत होत असताना तिथे गडबड होते. मुलगी परत येते. सासरकडून पुन्हा बोलावणं आल्यावर सासऱ्याला आणि नवऱ्याला जे प्रश्न विचारते ते जणू द्रौपदीने वस्त्रहरणप्रसंगी कुरुसभेला विचारलेल्या प्रश्नांच्या तोडीचे असतात. आणि मग पाच पतींबरोबर संसार करणाऱ्या द्रौपदीप्रमाणे पहिला नवरा हयात असताना घटस्फोट न घेताच संताजींबरोबर संसार करू लागते.
स्वातंत्र्य मिळते. पन्नास कोटीचा चेक पाकिस्तानकडे जातो. नौखालीत दंगली होतात. बातम्या येत असतात. लोकांना गांधी नकोसा होतो. त्यांचा उल्लेख आता 'म्हातारा' असा होऊ लागलेला असतो. गांधींनी उपोषण करावे आणि त्यात ते मरावेत अशी अनेकांची इच्छा असते. संतू, नरसू आणि खान वकिलावर चिडलेला चिमापा गांधींवर गोळ्या झाडायची भाषा करत असतो. नेमकी गांधींवर गोळी झाडली जाते तेव्हा तो मुंबईला असतो आणि नंतरच्या दंगलीत अडकतो. गावी बातमी पसरते की चिमापा सावरकरवादी आणि गोळ्या झाडायची गोष्ट करणारा म्हणजे तो मारेकऱ्याला सामील आहे. मारेकरी ब्राह्मण आहे हे कळल्यावर उसळलेल्या ब्राह्मण द्वेषात तुंबाड आणि लिंबाडची वाताहात होते. श्री ना पेंडसेंच्या तुंबाडचे खोत या महाकादंबरीची ही थोडक्यात रूपरेषा.
____
इथे अजून सगळे भाग यायचेतसं दिसतं. तरी ब्लॉगवर कमेंटायला पायजे, फेसबुकानं ती गिळंकृत करता नये, म्हणून इथे डकवत आहे.
ReplyDeleteतुंबाड आणि शिरूभाऊ हे दोघंही फार जवळचे. उत्सुकतेनं सगळे भाग वाचले.
पहिल्या भागात टाकलात तो नवनीत-छाप सारांश का टाकावासा वाटला तुम्हांला ते कळेना. त्यानं माझा मेजर रसभंग झाला.
शिवाय तुम्ही काही सूक्ष्म जागा हेरायला चुकले आहात, असंही जाणवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्रज उलथायला खोत अघोरी उपासना करतात हे साफ चूक. तशा प्रकारच्या इतिहासावरच्या सारवासारव्या (खोतबंधूंच्या हेतूंबद्दल नंतर चिमापानं मुद्दामहून पसरवून दिलेली ही फिरवाफिरवी), अंतर्हेतू आणि लोकांच्या मनातली प्रतिमा (खुद्द चिमापाची जेलमध्ये जाण्यामागची उद्दिष्टं आणि लोकांना त्याच्याबद्दल वाटणारा आदर), काळानुरूप उजळत वा विझत जाणार्या प्रतिष्ठितांच्या प्रतिमा (मोरया लढवय्या की दरोडेखोर याबद्दल आता असलेला संभ्रम, किंवा ओड्डलची अवस्था बघून होणारा त्याच्याबद्दलचा समज) ही कादंबरीमधली महत्त्वाची सूत्रं आहेत. काळाच्या विराट चक्रात काहीही कालातीत सत्य नाही-अंतिम सत्य नाही - हे माझ्या मते तुंबाडमधलं सर्वाधिक महत्त्वाचं आणि यशस्वीही विधान आहे. कोणतंही पात्र वा घटना उचलून पाहिली, तरी तिला चिकटलेले लोकार्थ दिसतात आणि पेंडसे हळूच स्वतःच त्याबद्दल 'काय की बॉ' अशी शंका हलक्या सुरात सोडून देतात. हे अतिशय परिणामकारक असं अस्त्र आहे. काळेपांढरे रंग टाळत राखाडी रंग रेखाटत जाण्याचं. हे तुमच्याकडून निसटलंसं वाटतं.
लैंगिक संबंध या गोष्टीला पेंडसे अजिबात बिचकत नाहीत. त्यांचा असा परिणामकारक वापर आणि तरी कथानकावर त्याचीच छाया न पडणं (हे असं भारी पडून पुस्तक उताणं होण्याचं उदाहरण म्हणजे ऋषिकेश गुप्तेंची 'दंशकाल') हे फार म्हणजे फार भारी आहे.
अजून एक. मला तुंबाड आणि अरुण साधूंची 'मुखवटा' आणि एलकुंचवारांची त्रिनाट्यधारा यांत काही साम्य कायम जाणवतात. ती या निमित्तानं नोंदते - ब्राह्मण आणि सरंजामशाही कुटुंब, शेतीवर होत गेलेले विपरित परिणाम, जातीची कमी होत गेलेली प्रतिष्ठा, बदलती कुटुंबसंस्था, बदलती समाजव्यवस्था आणि राजकारण, जोरकस स्त्रीव्यक्तिरेखा, जागतिकीकरणपूर्व काळ, स्थित्यंतरात होणारा एका जीवनशैलीचा विनाश, त्यातूनच दुसरीला धुमारे फुटणं, वाढतं शहरीकरण, निसर्गाशी बदलतं नातं, प्रादेशिक भाषा, सुरुवातीला काळ्या पांढर्या, मग मधला बराच काळ राखाडी आणि शेवटी काळ्या होत गेलेल्या व्यक्तिरेखा, काळाचा चक्राकार दाखवणारे विधी.
संगीताबद्दल लईच आभार. ऐकण्यात येईल.