------------------
------------------
सुनता है गुरु ग्यानी या भजनाचा कुंडलिनीच्या प्रवासाशी मी लावलेला संबंध काही वाचकांना, "मारून मुटकून गणपती" बनवण्याचा माझा प्रयत्न वाटला. आणि काहींनी सौम्य शब्दात तशी प्रतिक्रिया देखील दिली. अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न म्हणजे ढगांच्या आकारातून प्राणी शोधण्याचा एक प्रकार वाटू शकतो हे मला मान्य आहे, पण माझ्या मनात कुंडलिनी आणि या भजनाचा संबंध लागण्याचे सगळ्यात मोठे कारण असलेल्या चरणापर्यंत आपण आता पोहोचलो आहोत. त्यामुळे शेवटच्या तीन चरणांचा अर्थ वाचताना कदाचित माझा सगळा प्रयत्न वायफळाचे मळे फुलवण्याचा नव्हता हे वाचकांना पटेल असे मला वाटते. कदाचित कुंडलिनीचा आणि या भजनाचा संबंध वाचकांना माझ्यापेक्षा अधिक स्पष्ट प्रमाणात जाणवू शकेल.
या दोन चरणांचे बोल आहेत,
बिन धरती एक मंडल दीसे, बिन सरोवर जूँ पानी रे
गगन मंडलू में होए उजियाला, बोले गुरु-मुख बाणी हो जी ll 4 ll
ओऽहं सोऽहं बाजा बाजे, त्रिकुटी धाम सुहानी रे |
इडा पिंगला सुखमन नारी, सुन धजा फहरानी हो जी ll 5 ll
कहत कबीरा सुनो भई साधो, जाय अगम की बानी रे..
दिन भर रे जो नज़र भर देखे, अजर अमर वो निशानी हो जी … ll 6 ll
चौथ्या चरणात कबीरांनी धरतीशिवाय दिसणारे मंडल, सरोवराशिवाय जमा झालेले पाणी, गगन मंडळात पसरणारा प्रकाश यांचे वर्णन केले आहे.
यात कबीर आपल्या गुरूंच्या वचनाचा दाखला देत सांगतात की साधना सुरु केल्यावर साधकाला धरित्रीच्या आधाराशिवाय वसलेले मंडल दिसेल. सर्व प्राण्यांच्या शरीराला पायाचा आधार, झाडांना खोडाचा आणि खोडाला मुळांचा आधार. तर या पायांना, मुळांना धरतीचा आधार. म्हणजे सजीव आणि निर्जीवांच्या पार्थिवाला पृथ्वीचा आधार. पण मग अंतराळात तरंगणाऱ्या धरतीला कशाचा आधार? किंबहुना सर्व विश्वाला कशाचा आधार?
स्वतःला स्वतःतून अनुभवण्याच्या परमेश्वराच्या इच्छेने हे विश्व तयार झाले हा सिद्धांत मानला तर सबंध विश्वाला ईश्वरी इच्छेचा आधार हाच त्याचा अर्थ होतो. सर्व पार्थिवांना जरी धरतीचा आधार लागत असला तरी मनुष्याच्या पार्थिव देहात वसणाऱ्या चैतन्याला मात्र असा धरतीचा आधार लागत नाही. स्वतःला अनुभवण्याच्या इच्छेने सगुण शरीरात मस्तकातून दाखल झालेले चैतन्य म्हणजे कुंडलिनी. ही कुंडलिनी मानवी शरीरात सूक्ष्मदेहात मूलाधार चक्राच्या जागी साडेतीन वर्तुळांचे मंडल करून विसावलेली असते. तिचा आधार धरती नाही, चैतन्याची गुण अनुभवण्याची इच्छा हाच तिचा आधार.
मग सरोवराचे रूपक वापरून ते सांगतात की साधकाला सरोवराशिवाय जमा झालेले पाणी दिसेल. सरोवरच का ? महासागर का नाही? नदी का नाही? समुद्र स्थिर असतो. पण त्यात पाण्याचा उगम नसतो. त्यात पाणी वहात येते. याउलट अनेक झऱ्यांचा एकत्रित समूह म्हणजे नदी. हिच्यात पाण्याचा उगम दिसला तरी नदी स्थिर नसून प्रवाही असते. आता राहिले सरोवर. सरोवरात पाण्याचे झरे असतात आणि त्याचे पाणी नदीपेक्षा स्थिर रहाते. याचा अर्थ उगम असूनही स्थिर रहाण्याची क्षमता असण्याच्या गोष्टीचे रूपक म्हणजे सरोवर. आता जेंव्हा मी पहिल्या चरणातील "नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी। " या वाक्याचा संबंध "बिन सरोवर जूँ पानी रे" शी लावतो तेंव्हा तेंव्हा त्याचा संबंध कुंडलिनी साधनेतील, शेंडीच्या ठिकाणी असलेल्या बिंदूस्थानातून होणारा विसर्ग, जो सहजप्रेरणेने नाभी जवळील मणिपूर चक्रात वाहत जाऊन शारीरिक वृद्धत्व आणतो, पण जर साधकाने दुसऱ्या चरणात सांगितलेला "उलटी फाँस फंसानी हो जी" चा उपदेश अमलात आणला तर हा विसर्ग टाळूजवळील ललना चक्रात साठवून ठेवता येतो आणि त्याचे अमृतात रुपांतर होते; या संकल्पनेशी लागतो. त्यामुळे बिंदूतून होणारा आणि ललना चक्रात साठवून ठेवलेला विसर्ग म्हणजे सरोवर. बिन पाण्याचे सरोवर.
साधनेच्या पुढच्या टप्प्यावर मग साधकाला गगन मंडळ म्हणजे मस्तकातील पोकळीत प्रकाश पसरताना दिसेल. हा प्रकाश चर्मचक्षुंनी बघण्याचा प्रकाश नसून अंतःचक्षुंनी अनुभवायचा प्रकाश असेल. आणि मग चौथा चरण संपवताना आपल्या या सगळ्या प्रतिपादनाला कबीर आपल्या गुरूंच्या वचनाचा आधार सांगतात.
जोपर्यंत गाणे ऐकत होतो तोपर्यंत पाचव्या चरणाची सुरवात माझ्यासाठी "कोहं सोहं" अशीच होती. कारण मला "कोहं सोहं", "मी कोण आहे?, मी तोच आहे" ही प्रश्नोत्तरे ऐकून माहिती होती. पण मग जेंव्हा गाण्याचे बोल वाचायला मिळाले तेंव्हा मात्र पाचव्या चरणाचा अर्थ समजून घेताना मी अडखळलो. कारण परळीकरांच्या आणि श्रीमती हेस यांच्या पुस्तकात दोन्हीकडे स्पष्ट उल्लेख होता "ओऽहं सोऽहं". मला हे "ओऽहं सोऽहं" काही माहिती नव्हते. मग पुन्हा शोधणे आले. या शोधात जी विविध माहिती मिळाली त्यातील सगळ्यात महत्वाची आणि कुंडलिनीशी सरळ संबंध सांगणारी माहिती होती "अजपा जप" या संकल्पनेची आणि “हंस मंत्राची”. किंबहुना याच चरणामुळे माझी खात्री झाली की हे भजन कुंडलिनी साधनेचे वर्णन आहे.
सगळ्यात सोपा, आपोआप घडणारा, न जपता जपला जाणारा जप म्हणजे अजपा जप. या जपात शब्द मंत्र नाही. हा ध्वनी मंत्राचा जप आहे. जो सर्व सजीव नकळत करत असतात. आपण श्वास घेतो तेंव्हा होणारा ध्वनी म्हणजे "सा किंवा सो" आणि जेंव्हा आपण उच्छ्वास सोडतो तेंव्हा होणारा ध्वनी म्हणजे "ह किंवा हं". याचा अर्थ श्वासोच्छवासाच्या क्रियेतून सर्व सजीव जन्माला आल्यापासून ते मृत्यूच्या क्षणापर्यंत अव्याहत करत असलेला जप म्हणजे सोहं जप. या सोहं चे उलट म्हणजे हंस किंवा हंसो. म्हणून हा हंस मंत्र. श्वासोच्छवासामुळे हा सतत चालू असतो म्हणून प्राण गायत्री असे देखील म्हणतात.
काही ठिकाणी कुंडलिनीचे वर्णन हंसाचे पंख असलेला सर्प असे केले आहे तेंव्हा हा हंस म्हणजे उलट फिरून सहस्रार चक्राकडे निघालेली कुंडलिनी शक्ती असा अर्थ निघतो. तर काही ठिकाणी, हंस म्हणजे प्राण आणि मन असे दोन पंख असलेला आत्मा असे वर्णन आहे. त्याला शिव किंवा पुरुष स्वरूप मानले आहे. तर कुंडलिनीला स्त्री किंवा शक्ती स्वरूप मानले आहे. मस्तकात असलेल्या सहस्रार चक्राकडे हा हंस कुंडलिनीला उचलून घेऊन जातो आणि तिथे असलेल्या परमात्म्याशी एकरूप होतो, असे वर्णन आहे. साधनेच्या सहाय्याने, जिथून सुरवात तिथेच शेवट असा उलटा फासा किंवा वर्तुळ पूर्ण करतो. हंसाला असे जागृत करण्यासाठी आणि कुंडलिनीचा उलटा प्रवास घडवण्यासाठी आवश्यक काय असते? याचे उत्तर शोधायला गेलो तर कबीर म्हणतात “बाजा बाजे” म्हणजे पुन्हा भेटला नाद.
नाद कुठला? तर गगन मंडळात (मस्तकात) झिनी झिनी चालणाऱ्या ओंकाराचा आणि त्याबरोबर लक्ष देऊन केलेला अजपा जप यांचा नाद. म्हणजे साधकाने जाणीवपूर्वक "सोहं" जप सुरु केला हंसाची कुंडलिनी सोबत ऊर्ध्वगामी गती सुरु होते. जेंव्हा आपोआप चालणाऱ्या सोहं कडे साधक लक्ष देऊ लागतो, तेंव्हा श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित होते. त्यायोगे प्रथम नाकाच्या शेंड्याकडे मग दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित होते. ही जागा आज्ञा चक्राची असते. ही बरोबर शेंडीच्या समोरची म्हणजे बिंदूची जागा. कुंडलिनी बाह्य मार्गाने तात्पुरती जागृत करताना किंवा दीक्षा देताना गुरु या आज्ञा चक्रावरच बोटे टेकवतात. इथे इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडींचा संगम होतो. इडा नाडी गंगा मानली जाते, पिंगला यमुना आणि सुषुम्ना नाडी म्हणजे सरस्वती मानली जाते. म्हणजे एक प्रकारे आज्ञा चक्रावर त्रिवेणी संगम होतो. म्हणून भृकुटी मध्याला प्रयाग क्षेत्र असेही म्हणतात. सोहं वर लक्ष ठेवले, इडा आणि पिंगला नाड्यातून होणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित केले, त्याला नियंत्रित केले, तर सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी उर्ध्वगामी होते आणी प्रयाग क्षेत्री येउन पोहोचते. इथे झिनी झिनी चालणारा ओम चा अनाहत नाद आणि आपोआप होणारा सोहं चा नाद एकरूप होतात. ही साधकासाठी मोठ्या विजयाची गोष्ट असते. या विजयाच्या यात्रेचे वर्णन करताना कबीर पाचवा चरण रचतात. ते म्हणतात,
ओऽहं सोऽहं बाजा बाजे, त्रिकुटी धाम सुहानी रे |
इडा पिंगला सुखमन नारी, सुन धजा फहरानी हो जी ll 5 ll
कबीरांच्या शब्दात, “साधकाने विजयाचा ध्वज फडकवलेला आहे”. अजून या भजनाच्या शेवटच्या चरणाचा अर्थ लिहिणे बाकी आहे. आणि जन्माने व संस्काराने हिंदू असलेले, अध्यात्मात विश्वास आणि अनुभूती यावर भरअसतो हे मान्य असलेले पण त्याचवेळी शिक्षणाने आधुनिक शास्त्रांचा शंकेखोरपणा अंगी बाणवलेले माझे मन आत्तापर्यंत केलेल्या लिखाण प्रवासाचा शेवट, न झालेल्या अनुभूतीच्या आधारावर करावा की अजून न शमलेल्या शंकांच्या सहाय्याने करावा अश्या द्वंद्वात सापडले आहे. म्हणून मी इथेच थांबतो. पुढील भाग लिहायला सुरवात करेपर्यंत माझ्या मनातील द्वंद्व शमले असेल अशी माझी आशा आहे.
------------------
------------------
No comments:
Post a Comment