------------------
------------------
सुनता है गुरु ग्यानी या भजनात अनेक रूपके आहेत. आणि प्रत्येक रूपक दुसऱ्याशी सुसंगत देखील नाही. म्हणून शोधलेल्या संदर्भातील वाचलेले अर्थ मनाचे समाधान करीत नव्हते. एक दिवस डॉ परळीकरांच्या आणि लिंडा हेस यांच्या पुस्तकातील भजनांचा क्रम बघत होतो. परळीकरांच्या पुस्तकात भजने कुठल्याही क्रमाने येतात तर हेस बाईंच्या पुस्तकात ती अक्षरमालेच्या अकारविल्हे क्रमाने येतात. आणि एकदम जाणवले दोन्ही लेखक कबीरांच्या मनस्थिती किंवा भावस्थिती ऐवजी शब्द आणि अक्षरप्रधान अर्थ देत आहेत. जिथे भजनाचा आत्मा निर्गुण आहे तिथे सगुण शब्द मुख्य मानून लावलेला अर्थ माझ्या मनाचे समाधान करणारा होत नव्हता. आणि एकाच भजनातील वेगवेगळी रूपके, लेखकाने दिलेला अर्थ वाचूनही परस्परविसंगत वाटत होती. हे जाणवल्यावर मी पुस्तकातील सगळी भजने कोणकोणत्या प्रकारात बसू शकतात त्याचे वर्गीकरण करण्याच्या मागे लागलो. त्यातून मला जाणवलेले निर्गुणी भजनांचे तीन प्रकार, मी दुसऱ्या लेखाच्या सुरवातीला मांडले आहेत. सुनता है गुरु ग्यानी हे भजन त्यातील पहिल्या प्रकारात (ज्यात साधनेचे वर्णन आहे आणि हठयोग साधनेच्या तंत्राचे निरुपण आहे) चपखल बसले, आणि मग ते भजन मला त्याचा थोडा वेगळा अर्थ सांगू लागले. आणि वेगवेगळ्या रुपकांची थोडी अधिक सुसंगती मला लागू लागली.
भजनाचा मला उमगलेला अर्थ सांगण्यापूर्वी एक गोष्ट नमूद करतो की यात वर्णन केलेल्या कुंडलिनी आणि तिच्या प्रवासावर माझा अजून तरी विश्वास बसलेला नाही. जे इंद्रियगम्य नाही त्यावर विश्वास ठेवायला माझी बुद्धी तयार होत नाही. पण जे इंद्रियगम्य नाही ते अस्तित्वातच नाही हे म्हणायला माझे मन तयार होत नाही. त्यामुळे माझी निर्गुणी भजनांची अर्थयात्रा श्रद्धायुक्त अंतःकरणाने नसून कुतूहलपूर्ण मनाने आहे.
मला वाटते या भजनात कबीर, काय करा ते सांगत नसून काय होते ते सांगत आहेत. संपूर्ण भजन सामान्य माणसांनी संसाराच्या तापत्रयांपासून मुक्ती साठी काय करावे त्याचे मार्गदर्शन करत नसून, कुंडलिनी जागृतीची साधना करणाऱ्याला काय काय अनुभव येतात, त्याला कुठल्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे त्याबद्दल मार्गदर्शन करते.
या भजनाचे धृवपदच बेभान करणारे आहे. विश्वरूप दर्शन घडवणारे आहे. तयारी न करता पाहिले तर भीतीने गाळण उडवणारे आहे आणि जाणीवपूर्वक पाहिले तर अनासक्त प्रेमाचा उद्भव करणारे आहे.
सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी
कुंडलिनी साधनेच्या अंतिम टप्प्याला पोहोचलेल्या साधकाला कबीर ग्यानी गुरु म्हणतात. आणि हा ग्यानी गुरु एकाच वेळी स्थूलदेहात (दृष्य देहात) आणि सूक्ष्म देहात (चेतना देहात) स्वतःला अनुभवू शकतो. त्याच्या सूक्ष्म देहातील मस्तकाच्या भागाला (जिथे सहस्त्रार चक्र असते) कबीर "गगन" म्हणतात. आणि या गगनात अखंडितरित्या एक “शांत आवाज” होत असतो. त्या आवाजाचे वर्णन करण्यासाठी, कबीर झीनी झीनी असा शब्द वापरतात. हा कबीरांचा आवडता शब्द आहे. आणि त्याला ते अनेक संदर्भात वेगवेगळ्या भजनात वापरतात. कधी आवाजासाठी तर कधी चादरीसारख्या भासणाऱ्या जीवनाच्या वस्त्रासाठी. त्यातून त्यांना सांगायचे असते एक असलेपण आणि नसलेपण. कर्ता - कारणविरहीत अस्तित्व. सद्गुण - दुर्गुण विरहीत अस्तित्व. गुणातीत, निर्गुण अस्तित्व.
अत्यंत जवळून तेजः पुंज प्रकाश दिसावा पण त्याच्या उष्णतेची धग न लागावी. दिपून न जाता त्या प्रकाशाकडे, डोळे पूर्ण उघडे ठेवून पहाता यावे असा गुणातीत, निर्गुणी शांत प्रकाश. झीनी झीनी प्रकाश. आवाज तर आहे पण त्यामागे कुठलाही नाद, लय, आघात, ताण, सूर नाही. तो स्वयंभू आहे. त्याचा गोंगाट नाही, गोंधळ नाही, तीव्रता नाही, कोमलता नाही, चढ नाही, उतार नाही, मधुरता नाही. असा शांत आवाज. झीनी झीनी आवाज.
जिथे बाहेरील जगाचे सर्व आवाज थांबावेत आणि त्या शांततेत आपल्या अस्तित्वाचा आवाज ऐकू येऊ लागावा. आणि त्याची इतरांच्या अस्तित्वाशी असलेली सुसंगती लागून त्या सर्वांचा कोलाहल न होता शांतता जाणवावी. तो आवाज म्हणजे झीनी झीनी आवाज.
रोजच्या जीवनात आजू बाजूला असणाऱ्या प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूचा आवाज होत असतो किंवा ती आवाज करत असते. वाऱ्याची शीळ आणि त्याचे घोंगावणे. समुद्राच्या लाटांची कलकल आणि त्याच समुद्राची गाज. झाडाच्या पानांची सळसळ. वाटेत येईल ते गिळंकृत करत पुढे चाललेल्या वणव्याचा ल्हा ल्हा असा आवाज. झाडे उन्मळून पडताना किंवा वीज कोसळताना किंवा बर्फाचे किंवा दगडांचे कडे कोसळताना त्यांच्या कडाडण्याचा आवाज. मेघांच्या गरजण्याचा, पावसाच्या टपटपण्याचा आवाज. झऱ्यांच्या वाहण्याच्या खळखळीचा आवाज. वाळवंटातील वाळूचा सरकण्याचा आवाज. प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे चीत्कार, कूजन, डरकाळ्या, गुरकावणे, पाणी पिताना केलेला लप् लप् आवाज. दबा धरून बसलेल्या श्वापदाच्या श्वासांचा आवाज, भेदरून उधळलेल्या प्राण्यांच्या खुरांचा आवाज. शिकार करणाऱ्याच्या भुकेचा आवाज, शिकार होणाऱ्याच्या मृत्यूभयाच्या आकांताचा आवाज. शाकाहारी प्राण्यांनी चरताना झालेला हलका आवाज तर मांसाहारी प्राण्यांनी क्षुधा शांत करताना झालेला हाडे फोडण्याचा आवाज. माणसांचे हसणे, रडणे, चिडणे, प्रेम करणे, भांडणे, कण्हणे या साऱ्यांचा आवाज.
नियमबद्ध रीतीने एका रूपातून दुसऱ्या रुपात परिवर्तीत होणाऱ्या निर्जीव सृष्टीच्या परिवर्तनाचा आवाज आणि वेगवेगळ्या सजीवात वेगवेगळ्या गतीने होत असलेल्या हृदयाच्या धडधडीचा आवाज. एकाच वेळी तऱ्हे तऱ्हेच्या आवाजांचा सृष्टीतला कोलाहल. दुरून पहिला तर कुणाला भेसूर किंवा बीभत्स देखील वाटू शकेल. पण ज्ञानी साधकाला त्यातील एकरूपता जाणवते. अस्तित्वाचे नवीन रूप धारण करणे आणि जुने रूप सोडून देणे दिसते.
प्रसव वेदनेने तळमळणाऱ्या स्त्रीचे रडणे, तान्ह्या बाळाने जन्मतःच रडणे, जिवलग अकाली मृत्यू पावल्यावर त्याच्या आप्तेष्टांनी रडणे आणि सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून झालेल्या व्यक्तीच्या अंतानंतर त्याच्या आप्तेष्टांचे मूक रुदन यातील एकत्व त्याला जाणवते. अश्या या सर्वव्यापी आवाजाचे विश्वरूप दर्शन झाल्यावर ग्यानी साधक त्या अखंड आवाजाला ऐकत राहतो. या आवाजाला कबीर म्हणतात झीनी झीनी आवाज.
------------------
------------------
झीनी झीनी हे आजवर मी फ़क्त नाद अर्थी समजत होतो.त्याचा संदर्भ एवढा आहे हे आता समजतय.
ReplyDeleteलेखाच्या सुरुवातीला आपण म्हणालात की हे लिखण कुतुहलातुन करत आहात.पण कुतूहल हे सुद्धा कुठल्यातरी श्रद्धे मधून च निर्माण होत का? म्हणजे कुतुहल असन म्हणजे सुद्धा एक प्रकारची श्रद्धा च झाली ना?