--------------------------------------------------
माझी नववी, दहावीच्या आधी आली आणि आठवीच्या नंतर. आठवीत असताना अनेक नवीन गोष्टी घडल्या. माझा अवखळ स्वभाव पाहून शाळा सुटताना सर्व विद्यार्थी रांगेत नीट जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी माझीच नेमणूक करण्यात आली. त्यामुळे मला आवरण्याचा शिक्षकांचा त्रास वाचला. आणि मला ती दिसली. छान होती. छोटीशी. तिचे कपडे कडक इस्त्रीचे असायचे. चेहऱ्यावर एक उदास हसू असायचे. जणू कुणाला तरी शोधत असावी. मी बघितले की तिची नजर खाली जायची. एकदा ती माझ्याकडे बघून हसली असे मला वाटले आणि इतके दिवस मनाचे श्लोक, मूर्खांची लक्षणे, मारुतीस्तोत्र वगैरेंच्या पाठांतरात प्रत्यक्ष कल्याण स्वामींशी स्पर्धा करणाऱ्या माझी छाटी उडाली.
एकाएकी मला बालकवी आवडू लागले. फुलराणी कशी दिसत असावी ते मला कळले आहे असा विश्वास वाटू लागला. उदास हसू असलेली कडक इस्त्रीच्या कपड्यातली ती माझ्या शेजारून एका रांगेतून जात असताना माझ्याकडे चोरून पहाते आहे असा भास होऊ लागला. एकदा तर ती तशी जात असताना मी बालकवींची क्षमा मागत त्यांच्या फुलराणीच्या थोड्या पाकळ्या काढून,
"छानी माझी सोनुकली ती
कुणाकडे गं पाहत होती.
तो रविकर का गोजिरवाणा
आवडला आमुच्या राणींना"
ही वाक्ये घाई घाईने आणि खालच्या सुरात म्हणून पाहिली. पण ती उत्तर न देता पुढे गेली. वाटले तिच्या वर्गात अजून ही कविता शिकवली नसेल. म्हणून मी धीर धरायचे ठरवले.
बाबांनी बीएसए एसएलआरची फायरफॉक्स ही सायकल घेऊन दिली होती. ती घेऊन मी शाळा सुटल्यावर थेट घरी जाण्याच्या ऐवजी माझा मित्र ओंकारला घरी सोडायला डबलसीट घेऊन जाऊ लागलो. ओंकार माझ्या या प्रेमळपणामुळे भारावून गेला होता. आणि मी त्याचे घर तिच्या घराच्या रस्त्यावर असल्याबद्दल देवाचे आभार मानीत होतो. ओंकारकडे भरपूर पुस्तके होती. रोज घरी डबलसीट सोडण्याच्या बदल्यात तो मला त्याच्याकडची पुस्तके वाचायला देऊ लागला. त्याच्याकडून रोज एक पुस्तक वाचायला घेऊन जात होतो. एकदा तर त्याने मला ‘झेंडूची फुले’ भेट म्हणून दिले. असे प्रेमळ मित्र सध्या दुर्मिळ झाले आहेत. आजकालच्या, फोनवर एकमेकांना फुलं, चॉकलेट, केक आणि नाचणाऱ्या मुलींचे स्मायली पाठवायच्या या आधुनिक युगात लोक खऱ्या खुऱ्या भेटी द्यायला विसरले आहेत हेच खरं. असो, ह्या आभासी स्मायलीच्या खऱ्या जगातून आपण पुन्हा उदास हसू असलेल्या कडक इस्त्रीच्या कपड्यातल्या त्या छोट्या मुलीकडे वळूया.
काही दिवसांनी वाटले की आता तिच्या वर्गात फुलराणी कविता शिकवून झाली असेल, म्हणून पुन्हा एकदा, “गोजिरवाणा रविकर आवडला का?” अशी दबक्या आवाजात चौकशी करून बघितली. पण माझ्या प्रश्नार्थक वचनांनी उदास हसू असलेली कडक इस्त्रीच्या कपड्यातली ती साधी भोळी फुलराणी, कवितेतल्या सारखी “लाज लाजली” वगैरे काही झालेच नाही. परीक्षेच्या दिवसात ती जवळून जात असताना मी हळूच All The Best, All The Best असे देखील पुटपुटलो. पण तिचे उदास हसू तिच्या कपड्यांच्या कडक इस्त्रीप्रमाणे कधी विस्कटलेच नाही.
दिवस भरभर पुढे जात होते. वक्तृत्व स्पर्धेत मला बक्षिसे मिळतंच होती आणि मग जिल्हा स्तरावर निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले. शाळेत नोटीस फिरली. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव झाला. मुख्याध्यापिका बाई मला प्रत्येक वर्गात घेऊन गेल्या आणि सगळ्या मुलांसमोर माझे कौतुक केले. तिच्या वर्गात जाताना काळीज धडधडले. तिने पण टाळ्या वाजवल्या. मग माझ्यातील धैर्याने उचल खाल्ली. मी पत्र लिहायचे ठरवले. आईकडून पाच रुपये घेतले. आणि एक चाळीस पानी छोटी वही घेतली. पत्र कसले निबंधच लिहायला घेतला. सगळ्यात प्रथम फुलराणीची कविता लिहिली. मग मला दोन हात सोडून सायकल चालवता येते. कुकर लावता येतो. लिंबू सरबत करता येते. रोज रात्री जेवायच्या आधी मी ताटे घेतो, पाणी भरतो. आठवड्यातून एकदा कपडे पण धुतो. कराटेमधे यलो बेल्ट आहे. सप्तर्षींची नावे पाठ आहेत. धृव तारा ओळखता येतो. त्यामुळे दिशेचा गोंधळ होऊन रस्ता चुकत नाही आणि घर सोडून जावे लागले तरी मी रस्ता सोडणार नाही. आमच्या घरी कुत्रा किंवा मांजर नाही त्यामुळे माझे प्रेम विभागले जाणार नाही. अशी मोलाची माहिती लिहिली. आणि मग अजून पानं बाकी होती म्हणून झेंडूच्या फुलातले माझे आवडते विडंबन लिहिले.
"तू छोकरी, नही सुंदरी
मिश्कील बाल चिचुंदरी
काळा कडा मी फत्तरी
तू काश्मिरातील गुलदरी"
पूर्ण कविता लिहून झाल्यावर मला स्वतःलाच खात्री पटली की या निबंधात मी नवरसातील सर्व रस ओतले आहेत. त्यामुळे उदास हसू असलेली कडक इस्त्रीच्या कपड्यातली ती छोटी मुलगी आपले आडनाव बदलण्यास राजी होईल याबद्दल मी आश्वस्त झालो होतो. ते दिवस वेगळे होते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव चा काळ संपला होता. जीन्स टी शर्ट चा काळ अजून यायचा होता. चित्रपटातले नायक नायिका छोटा काश्मीरच्या पुढे जात नव्हते आणि महत्वाच्या गोष्टी गुलाबाची फुले जवळ आल्यानंतरच करत होते. एम टी व्ही, व्ही टी व्ही यायचे बाकी होते. त्यामुळे संध्याकाळी चित्रगीत, चित्रहार आणि छायागीत याशिवाय प्रेमाबद्दल मौलिक माहिती देणाऱ्या गीतांचा मारा आमच्या बालमनावर होत नव्हता. नायक "चांदी की सायकल सोने की सीट आओ चले डार्लिंग चले डबलसीट" असे नितीन मुकेशच्या भयाण आवाजात म्हणत होता. नायिकेच्या प्रेमाची आणि पुढाकाराची परमावधी म्हणजे "चल डबलसीट रं लांब लांब लांब" इतकीच होती. छेडछाडीचे काम खलनायकच करत होते. नायक स्वतः "लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता" वगैरे म्हणून आम्हाला दिशादर्शन करीत नव्हते. "पिच्छू पडे है मेरे पिच्छू पडे है… कुछ लडके आगे कुछ पीछे खडे है" असे अभिमानाने सांगणारी नायिका अजून जन्माला यायची होती. अश्या या संस्कृतीसंक्रमणाच्या काळात, संस्कारक्षम आणि टीपकागदासारखे मन असलेल्या माझ्यासारख्या कुमारांना प्रेमाची परिणती आडनाव बदलण्यात होत असावी असे वाटणे स्वाभाविक होते.
पत्र मनासारखे लिहून झाले होते. आता ते सुवासिक असायला हवे असे माझ्या मनाने घेतले. परफ्युम आणि सेंट जीवनावश्यक वस्तू होण्याच्या पूर्वीचा काळ असल्याने त्या घरात असणे शक्यच नव्हते. पण मी हार मानणाऱ्यातील नव्हतो. मग मी आई घरात नसताना अगरबत्ती पेटवली आणि माझ्या चाळीस पानी नवरसपूर्ण वहीला सुवासिक करण्यासाठी धुरी दिली.
दुसऱ्या दिवशी शाळा सुटताना तिच्या हातात ती वही द्यायची असा विचार मी केला होता. पण ती जवळ येत होती आणि मुख्याध्यापिका बाई समोर आल्या. वही लपवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सगळे वर्ग सुटले. मी धावतच शाळेच्या गेटबाहेर गेलो. उदास हसू असलेली कडक इस्त्रीच्या कपड्यातली ती छोटी मुलगी कोपऱ्यावरून वळताना दिसली. तिच्यामागे जाणार तोच साळवी आडनावाच्या माझ्या एका मित्राने माझा हात धरला आणि म्हणाला, "काय रे कसली वही आहे? काय प्रेमपत्र लिहिले आहेस की काय? कुणाला देणार आहेस?" मी आश्चर्य चकीतच झालो. केवळ वही बघून साळवीला कसं काय कळालं असेल बरं? मी घाईघाईने माझा हात सोडवून घेतला आणि वही दप्तरात टाकली. माझा मूडच गेला होता. घरी जाऊन पुन्हा वही वाचली तर, शाळा सुटेपर्यंत, जे पत्र वाचून ती आपले आडनाव बदलायला राजी होईल अशी खात्री होती ते पत्र मला मूर्खपणाचे वाटू लागले. हे तिने वाचलं असतं तर तिला एखाद्या घरगड्याचा बायो डाटा वाचल्याचा अनुभव मिळाला असता आणि फुलराणी न वाचलेल्या मुलीला मी मिश्कील का असेना पण चिचुंदरी म्हटले याचा धक्का बसून ती अधिकच उदास झाली असती याची मला खात्री पटली. साळवीबद्दल प्रचंड प्रेम, आपुलकी वगैरे भावना दाटून आल्या.साळवीच्या कृपेच्या सावलीमुळे मी बचावलो होतो तेंव्हापासून मी साळवी आडनावाच्या लोकांचा प्रचंड आदर करतो. अजूनही साळवी आडनाव दिसले की क्लासच्या फी मध्ये एखादे गांधीजी स्वतःहून कमी करतो.
या सगळ्या धामधुमीत आठवीच्या अभ्यासाने माझ्या बुध्दीमत्तेचे पितळ उघडे पाडण्याचा जो प्रयत्न केला होता तो केवळ परीक्षेत माझ्या मागे बसणाऱ्या सुनीलच्या हुशारी, सहृदयपणा, हळू आवाजात स्पष्ट बोलण्याची कला अश्या गुणांमुळे आणि पर्यवेक्षकांच्या नजरचुकीमुळे फोल ठरला आणि मी नववीत पोहोचलो. गणितातील कामगिरी बघून मातोश्री गांगरल्या आणि माझी रवानगी शिंदे बाईंच्या क्लासमध्ये करण्यात आली. क्लास साडेतीनचा असायचा. मी आणि माझे मित्र तीनपासूनच ह्या क्लासच्या इमारतीखाली उभे राहून शाळेतल्या शिक्षकांबद्दल, अभ्यासाबद्दल, आकाशी रंगाच्या ड्रेसवर काळ्या रंगाच्या ओढण्या घेऊन वर्गाचा अर्धा भाग व्यापणाऱ्या आमच्या सहाध्यायीनींबद्दल प्रकट चिंतन करत असू. तिचा क्लास पण तिथेच कुठेतरी होता. रोज दिसायची. आता मीपण उदास हसू असलेला मुलगा झालो होतो. पण ती येताना दिसली की बरं वाटायचं. नेत्रपल्लवी व्हायची. बाकी काही नाही.
पावसाळ्याचे दिवस होते. अश्याच एका रिपरिप पावसाच्या दिवशी तिने मला बोलावले. माझा विश्वास बसेना. मनात म्हटलं, "आठवीतली फुलराणीची कविता हिला नववीत शिकवली की काय?" मी उसने अवसान आणून तिच्याजवळ गेलो. एक क्षण नजरेला नजर मिळवली. आणि पुढचे अर्ध्या एक मिनिटाचे, आज्ञार्थक वाक्यांनी बनलेले, एकतर्फी संभाषण संपेपर्यंत, नजर पायाच्या अंगठ्यावरून ढळू दिली नाही. तिने जे काही सांगितले त्याचा अर्थ इतकाच होता की, "तू माझ्या मागे येऊ नकोस मला त्रास होतो. "
इतके बोलून ती माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली. माझी कहाणी, प्रेम कहाणी आहे का? ते समजण्या आधीच संपून गेली होती. तेंव्हापासून, दुर्बोध असण्यात ग्रेसफुल असलेल्या एका मराठी कवीचे मला हृदयनाथांमुळे आवडलेले "ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता" हे कवन ऐकले, की मी नववीतला मुलगा होतो. पायाच्या अंगठ्याकडे बघत, उदास हसू असलेल्या कडक इस्त्रीच्या कपड्यातल्या छोट्या मुलीला काही न विचारताच तिच्याकडून आलेल्या नकाराला ऐकणारा मुलगा.
ह्या आठवणींमुळे अजून उदास होणार होतो, तेव्हढ्यात डोक्यात लख्खकन वीज चमकली. ती पण येईल Reunion ला. उगाच बरं वाटलं आणि पाठीत धपाटा घालून, दोन प्लेट पाणीपुऱ्या माझ्याकडून लाटून, वर मला Reunion ला येण्यास भाग पडणाऱ्या मित्राचे आभार मानावेसे वाटले. आता साळवी आडनावाबरोबर अजून एक आडनाव लक्षात ठेवावे लागणार फी कमी करण्यासाठी अशी खूणगाठ मनाशी बांधली. उदास हसू असलेली कडक इस्त्रीच्या कपड्यातील फुलराणी Reunion ला येणार अशी मला उगाच खात्री वाटू लागली. त्यामुळे Reunion ला जाण्यास मी उत्सुक झालो आणि शांत झोपी गेलो. Reunion ची स्वप्ने पहात.
----------------------------------------------
No comments:
Post a Comment