Wednesday, February 10, 2016

मी आणि शाळेचे Reunion - (भाग २)


--------------------------------------------------
मी शाळेत असताना मैत्रीण असणे ब्रम्हह्त्येइतके महापातक होते. आणि मी पापभीरू असल्याने माझ्यातील कुमारसुलभ भावनांना मुरड घालण्यात तत्कालिन समाजपुरुषाला यश आले होते. अनेक मुली मैत्रीण होण्याची क्षमता बाळगून आहेत आणि काही तर त्याहून अधिक क्षमतेच्या आहेत हे कळत असून देखील मी ब्रम्हहत्या न करताच शाळेतून बाहेर पडलो होतो. त्याशिवाय मला शाळेत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मित्र होते. म्हणजे पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी प्रत्येक वेळी मी नवीन मित्रांच्या घोळक्यात असे. घोळका पण छोटासा, मी धरून चार मित्र. दहावीनंतर ते पण सुटले. याचा अर्थ प्रत्येक वेळी मी आधीच्या मित्रांपेक्षा जास्त वेगाने सजाण होत होतो असा काढून मी स्वतःला समजावीत असलो तरी याचा अजून एक अर्थ दर तीन वर्षात माझे मित्र मला कंटाळत असतील असाही होऊ शकतो हे सत्य मी नाकारू शकत नव्हतो. त्यामुळे मित्रांच्या गोड आठवणींपेक्षा मित्र सुटल्याच्या हुरहुर लावणाऱ्या आठवणी जास्त असल्याने, Reunion ला जावून कुणाशी काय बोलणार? कुणाला आपल्याशी बोलण्यात रस असणार? आणि आता तर एक गांधीबाबा पण गेले,  अश्या विचाराने खिन्न होऊन घरी पोहोचलो.


पाच प्लेट पाणीपुऱ्या पोटात होडी होडी खेळत होत्या. ते हिला कळू देणे महागात पडेल इतके कळण्याइतपत माझे लग्न जुने झाले आहे, म्हणून मग मी जेवणार नसल्याचे जाहीर केले. माझा उतरलेला चेहरा पाहून आणि न जेवण्याचा जाहीरनामा ऐकून, माझं काहीतरी बिनसलंय ते हिला लगेच कळलं. आणि काय झालं? ते तिने खोदून खोदून विचारायला सुरवात केली. ती जेंव्हा अशी चौकशी करू लागते तेंव्हा तिच्या नजरेत एक वेगळीच चमक असते. आवाजात जरब आणून, देहबोली आक्रमक करून, डोळ्याची पापणी न लवता, एकटक रोखून पहात जेंव्हा ती चौकशी सुरु करते तेंव्हा मागल्या जन्मी ती केजीबी किंवा मोसादची चौकशीप्रमुख असावी याची मला खात्री पटते. पण मी देखील खूंखार माफियाच्या टोळीतील अमली पदार्थ चोरून लपवून आणणाऱ्या कट्टर सदस्याप्रमाणे पाणीपुरीची बातमी शिताफीने लपवीत फक्त Reunion बद्दलच बोललो.


तिला न सांगता मी पैसे भरले आहेत यावर तिचा अगोदर विश्वासच बसेना. पण मग जेंव्हा तिला मी सगळा हिशोब दाखवला तेंव्हा ती आनंदाने गिरक्या घेत उडी मारत "अय्या! कित्ती छान. नक्की जा Reunion ला" असे म्हणाली. माझ्याकडून घडलेल्या कृतीचा इतक्या चटकन स्वीकार आणि इतके उत्साही स्वागत झाल्याने, खूंखार माफिया टोळी सोडून केजीबी किंवा मोसादमध्ये भरती व्हायची पाळी आता माझी होती. सर्व चौकशीअंती असे कळले की माझ्या Reunion च्याच दिवशी ही मुलांना घेऊन एका सहलीला जाणार होती आणि पुढच्या आठवड्यात तिच्या शाळेचे देखील Reunion होणार होते. तिला न सांगता  Reunion ला जाण्याच्या माझ्या निर्णयाला अनुमोदन देण्याच्या बदल्यात तिच्या दोन्ही कार्यक्रमांना संमती असा सगळा सौदा होता. त्यामुळे मग मी त्या तिघांच्या सहलीचे चार गांधीजी, तिच्या Reunion चे एक गांधीजी आणि पुन्हा ब्युटी पार्लरचे, वरखर्चाचे पाच सहा गांधीजी देऊन, लक्ष्मी गांधीजींच्या रूपात आली तरी चंचलच असा निष्कर्ष काढून हताश का कायसा होत्सासा झालो होतो.
स्वतःच्या ब्लॉगवर, फेसबुकवर आणि मिपावर थोडे लिखाण प्रसिद्ध झाल्याने आणि सध्या एकंदरीतच “निघाली कॉमेडी एक्स्प्रेस” मधल्या परीक्षकांसारखे सगळ्यांनी सगळ्यांच्या सगळ्याच गोष्टीचे कौतुक करण्याचे दिवस असल्याने चार दोन कौतुकाचे थेंब माझ्यावरही पडले होते. शाळेतल्या त्या काळच्या काही सुंदर खाश्या सुबक ठेंगण्यांचे (सुंखासुठें चे) फेसबुक, मिपावरचे अभिप्राय वाचून, मनातल्या मनात त्यांच्याशी खालील प्रकारे संवाद करत होतो


सुंखासुठें : कित्ती छान लिहितोस रे तू
अस्मादिक : धन्यवाद. विशेष काही नाही गं. उगाच आपलं काहीतरी लिहितोय इतकंच
(मनातल्या मनातील संवादातील स्वगत : मग ! वाटलं काय तुला? शाळेत असताना कधी
एखादं स्मितहास्य दिलं असतंस तर आज एखादा लेख तुला अर्पण केला असता)
सुंखासुठें : वा वा असं कसं ! छानंच आहे. मी तर माझ्या मैत्रिणींना पण सांगितलं की तो जो आनंद आहे
ना तो माझ्या वर्गात होता शाळेत. त्यांना पण फार आवडतं तुझं लिखाण. आम्ही सगळ्या
मिळून वाचतो आणि खूप खूप हसतो.
अस्मादिक : अरे वा. धन्यवाद.
(मनातल्या मनातील संवादातील स्वगत : कुठली मैत्रीण? फेसबुकवर आहे का? प्रोफाईल पिक वगैरे…. ह्म्म्म्म )
सुंखासुठें : शाळेत असताना कधी वाटलं नाही तू इतका हुशार असशील म्हणून.
अस्मादिक : ऑ ……..
(मनातल्या मनातील संवादातील स्वगत : हे असं बोललंच पाहिजे का गं तुला?)


घरगुती ऋजुता, मुले आणि आई, सगळेजण बाहेरच्या खोलीत जेवत होते आणि मी पलंगावर पडल्या पडल्या ह्या संवादाची उजळणी करत होतो. कितीही वेळेला उजळणी केली तरी त्याचा शेवट कायम असाच होत होता. आणि एकाएकी नववीतली एक आठवण झाली.


---------------------------------------------------------

No comments:

Post a Comment