Monday, February 1, 2016

ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग

------------------------------------------------------------------------

( Image Credit : WikiMedia )


जी ए आणि त्यांचा ऑर्फिअस तुम्हाला सुरुवातीपासूनच धक्के देऊ लागतात. मी आणि माझ्या मित्रांचा, 'जर फक्त खात्री करायची होती की युरीडीसी येतेय की नाही तर मागे कशाला वळून पहायचे ? फक्त हाक मारायची की, लगेच कळले असते युरीडीसी येतेय की नाही ते', हा बाळबोध मुद्दा जी एंनी एका फटक्यात खोडून काढला. त्यांचा ऑर्फिअस तर प्लुटोचा निरोप घेऊन वळतो आणि परतीच्या मार्गावर युरीडीसीशी गप्पा मारू लागतो. तो तिला तिच्या मृत्यूपूर्वीच्या जीवनातल्या आठवणी सांगू लागतो. तिच्या सौंदर्याच्या, फुलणाऱ्या फुलांच्या, खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांच्या, मंजूळ आवाजाच्या पाखरांच्या, तृप्त निसर्गाच्या, आणि आता पुन्हा ते सुगंधी अनुभव गोळा करता येतील अश्या भविष्याच्या.


पहिला रंग

आणि जी एंची युरीडीसी बोलते. आर्त स्वरात बोलते. सांगते, 'ते सगळे क्षण वेचणारे आपण वेडे होतो. उत्कट आनंदाचे आपण गोळा करीत असलेले क्षण म्हणजे अखेर मृत्युच्याच गळ्यात घालायच्या हारातील मणी आहेत हे मला आता उमजत आहे." जी एंच्या ऑर्फिअसला वाटते पाताळलोकातल्या  किंचितश्या वास्तव्याने तिच्यात अंधार उतरलेला आहे पण सूर्यप्रकाश पडला की हा रक्तात पाझरलेला अंधार विरून जाईल. पण जी एंची युरीडीसी बोलत राहते. ती बोलते वठलेल्या झाडांबद्दल, जराजर्जर म्हाताऱ्यांबद्दल, सुखाचे असले तरी कायम निसटून जाणाऱ्या क्षणांबद्दल. जी एंचा ऑर्फिअस गांगरतो आणि म्हणतो की, "मृत्यूचे अटळ सत्य आपल्याला माहिती होते की!" आणि मग युरीडीसी त्याला सांगते की, "मृत्यू माहीत असणे निराळे आणि स्वतः हाडामासात मृत्यू भोगणे निराळे," तिने तो भोगल्यामुळे तिला आता आयुष्याच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव झाली असते आणि म्हणून ती सर्व आयुष्य जितक्या उत्कटतेने जगता येईल तितक्या उत्कटतेने जगणार असते.


आता मात्र जी एंचा ऑर्फिअस हादरतो. थबकतो. आणि व्याकूळ होऊन देवाला मनोमन विचारतो की, "हे निर्णय घेण्याचे न पेलवणारे स्वातंत्र्य तू माझ्यावर का लादलेस?" पाठवायचे तर सरळ पाठवायचेस नाही तर सरळ नाही. अटळ नियतीला मान्य करून माझी जखम हळू हळू नक्की भरली असती, पण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य माझ्यावर देऊन तू नामानिराळा झालास. निर्णय घेण्याचे हे स्वातंत्र्य त्याला भयानक वाटू लागते, कारण असले अनुभव अद्वितीय असतात. त्यांच्याबद्दल कुठलाही पूर्वानुभव नसतो, कुठलेही मार्गदर्शन नसते. त्यामुळे या अभूतपूर्व निर्णयक्षणी कुठलाही निर्णय घेतला तरी आयुष्यभर दुसरी शक्यता का वापरली नाही त्याची ज्वलंत रूखरूख लागून राहते. मग जी एंचा ऑर्फिअस शांत होतो आणि विचारपूर्वक मागे वळून बघतो. युरीडीसी किंकाळी फोडून पुन्हा परत जाते, यावेळी तिच्या प्रियकराने घेतलेल्या निर्णयामुळे.


ऑर्फिअसच्या ग्रीकांनी काढलेल्या पांढऱ्याशुभ्र रांगोळीत जी एंनी आपल्या प्रतिभेचा पहिला रंग भरून पूर्ण झालेला असतो. आणि आपण पहातंच राहतो. ऑर्फिअस जाणून बुजून विचारपूर्वक असा निर्णय घेऊ शकेल हे आपल्याला पटायला जड जाते. त्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पेलवले नाही, कारण प्रसंग अभूतपूर्व होता; असा निष्कर्ष काढून आपण स्वतःला समजावत असतो तो जी ए नवीन रंग भरायला सुरु करतात.  


दुसरा रंग

ज्याचा कुठलाही पूर्वानुभव नाही ज्याच्यासाठी कुठला निकष लावायचा त्याचे ज्ञान नाही अश्या अभूतपूर्व प्रसंगात एक निर्णय ऑर्फिअसने घेऊन झाल्यावर मग जी ए, त्याच्या मनात दुसऱ्या शक्यतेबद्दल (युरीडीसीबरोबरच्या सहजीवनाबद्दल) पुन्हा आशा निर्माण होते, असे दाखवतात.


शेवटी तो ही मानवच. पूर्ण विचारांती एक निर्णय घेऊन झाल्यावर त्याच्याऐवजी दुसरा घेतला असता तर आयुष्य कदाचित अजून छान झाले असते हे जसे आपल्याला वाटते तसे त्यालाही वाटू लागते. जर कदाचित मी मागे वळून पाहिले नसते तर, जर युरीडीसी परत पृथ्वीवर आली असती तर, कदाचित जीवन सुखी झाले असते असे विचार मनात आलेल्या ऑर्फिअसला पुन्हा प्लुटोसमोर उभे करतात.


प्लुटो शांत असतो पण पर्सिफोन मात्र ऑर्फिअसची  निर्भत्सना करते. तीच पर्सिफोन जी नवरा प्लुटोच्या डाळिंब खाऊ घालण्याच्या निर्णयामुळे सहा महिने भूलोकी आणि सहा महिने पाताळलोकी फेऱ्या मारीत असते. माझ्या मते तिला दिसतो तो अजून एक नवरा, निर्णय घेण्याची संधी असताना बायकोच्या आयुष्याची परवड करणारा.


आणि मग जी ए आपल्याला ऑर्फिअसच्या निर्णयाची कारण मीमांसा त्याच्याच तोंडून सांगतात. ऑर्फिअस सांगतो, "माझ्याबरोबर आलेली व्यक्ती केवळ नावाने युरीडीसी होती, पण ती अंतर्बाह्य बदललेली व्यक्ती होती. मृत्यू असतो हे माहीत असलेली व्यक्ती वेगळी आणि मृत्यू भोगलेली व्यक्ती वेगळी. मी ज्या फुलांकडे आसक्तीने बघीन त्यांच्यात तिला उद्याचे निर्माल्य दिसेल आणि ती निर्माल्य होण्याआधीचे क्षण टिपण्यासाठी घाई करेल. आम्ही दोघेही आनंद घेण्यासाठी धावू पण माझे धावणे आसक्तीने असेल तर तिचे धावणे क्षणभंगुरतेच्या भीतीने. तिच्या आत मृत्यू विषासारखा भिनलेला आहे. मी जिच्यासाठी आलो ती ही युरीडीसी नव्हे.  मी आता सकाळच्या कोवळ्या उन्हातले प्रेम, डोळ्यात सूर्यास्त आर्तपणे साठवत असलेल्या युरीडीसीला कसा अर्पण करू? या सर्व विचारांनीच मी जखम असह्य होऊ नये म्हणून शरीराचा तो भागच डागावा तसा वेदनादायी निर्णय घेतला. त्याची जबाबदारी माझी आणि त्याचे प्रायश्चित्त स्विकारायला मी तयार आहे."


युरीडीसीला तिच्याच प्रेमिकाकडून मिळालेल्या निष्प्रेम वागणुकीमुळे चिडलेली पर्सिफोन क्रोधायमान होते आणि त्याला जायला सांगते. आपल्या निर्णयाने  व्यथित झालेला आणि दुसरा निर्णय योग्य ठरला असता का? मृत्यूची जाणीव घेऊन बदललेली युरीडीसी खरोखरंच आपल्या बरोबर सुखी आयुष्य जगू शकली का? आणि आपण देखील तिच्याबरोबर सुखी होऊ शकलो असतो का? या प्रश्नांची उत्तरे न मिळालेला ऑर्फिअस, निराशेने भरलेल्या मनाने पृथ्वीवर परत जायला वळतो. आणि मृत्यूदेव प्लुटो त्याला थांबवतो. म्हणतो, 'युरीडीसीला परत घेऊन जाण्याची अजून संधी मी देऊ शकतो, पण एका अटीवर'


ऑर्फिअस कळवळून म्हणतो की बाबा रे! आता पुन्हा अट, पुन्हा निर्णय, पुन्हा जबाबदारी देऊ नकोस. आणि देणारच असशील तर निर्णय कशाच्या आधारावर घ्यायचा त्याचे ज्ञान पण दे. मृत्यूदेव प्लुटो म्हणतो, 'अंतिम ज्ञान हे काही आकाशातील नक्षत्र नव्हे की ज्याकडे बोट दाखवून कोणी म्हणेल ते पहा अंतिम ज्ञान. अंतिम ज्ञान कुणाहीजवळ नसते. अगदी देवाधीदेवाकडेही.  काही जण इतरांपेक्षा थोडे पुढे असतात इतकेच. नवनवीन घटनांना सामोरे गेल्यामुळे आपल्याकडचे ज्ञान वाढते इतकेच. देवांना मानवासारखे काळाचे बंधन नसल्याने त्यांच्याकडील अनुभवजन्य ज्ञानाचा साठा वाढण्याची शक्यता जास्त असते.' इतके बोलून देव अट सांगतो. साधी सरळ सोपी अट. युरीडीसीला घेऊन जा. फक्त ती सहा महिने तुझ्याबरोबर राहील आणि मग सहा महिने इथे परत येईल. असे चक्र आपण चालू करूया.  


इथे मला वाटले की जी एंनी प्रतिभेचा उत्तुंग षटकार मारलाय. पर्सिफोनची एकमेवाद्वितीय असलेली कहाणी, ज्यात स्वतः प्लुटोच्या डाळिंब खाऊ घालण्याच्या निर्णयामुळे, पर्सिफोनला सहा सहा महिन्याचा भूलोक आणि पाताळलोक असा प्रवास करावा लागतो, तीच कहाणी जी ए आता प्लुटोच्याच हातून, पण ऑर्फिअसच्या आयुष्यात घडवून आणतात. जणू काही आता प्लुटोला बघायचे असते की त्याच्या निर्णयाऐवजी दुसरी कुठली शक्यता प्रत्यक्षात येऊ शकली असती? आणि ती किती सुखकारक किंवा दु:ख्खकारक झाली असती?


ऑर्फिअस काही बोलायच्या आधी प्लुटो त्याला समजावतो की, 'आंधळ्याने “तांबडा” शब्द उच्चारला म्हणून त्याला तांबड्याचा तांबडेपणा ज्याप्रमाणे कधी कळणार नाही त्याप्रमाणे मानवाने अमर, चिरंतन असे शब्द उच्चारले म्हणून त्याला ते कधी कळणार नाहीत. क्षणभंगुरता हा मानवाच्या आयुष्याचा बोधस्वर आहे. त्याने न घाबरता, उलट अधिक उत्कट आनंदाने आयुष्य जगावे. आणि युरीडीसी सहा महिनेच जवळ आहे नंतर जाणार किंवा आता गेली तरी सहा महिन्याने परत येणार, यामुळे तुला क्षणभंगुरतेचा कधीच विसर पडणार नाही. आणि तुम्ही दोघे  उत्कट आनंदाने आयुष्य जगू शकाल. "


ज्या क्षणभंगुरतेच्या जाणीवेमुळे काही वेळापूर्वी युरीडीसी पृथ्वीवर यायला आतुर झाली होती आणि ऑर्फिअसला ज्या क्षणभंगुरतेची  भीती वाटून, मृत्यूच्या पडछायेची भीती वाटून त्याने युरीडीसीला परत पाठवले होते, आणि मग त्याचे मन  दुसऱ्या शक्यतेच्या (युरीडीसीबरोबरचे आयुष्य) अस्तित्वाने आणि ती शक्यता नाकारली म्हणून आलेल्या निराशेने भरून गेलेले असते, ती दुसरी शक्यता पडताळून पाहण्याची संधी त्याला अनायासे परत मिळते. आणि देव त्याची छान कारणमीमांसा देखील देतो.  


काय प्रतिभा आहे जी एंची ! दोन पुरुष. पूर्वी स्वतः घेतलेल्या निर्णयामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आयुष्य जगत आहेत. आपापल्या स्त्रियांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दु:ख्ख दिले आहे. त्यातला एक स्वत:बद्दल निर्णय घेण्यासदेखील दुबळा आहे तर दुसरा नवीन संधी देण्याइतका सामर्थ्यवान. तो संधी देतो ती पण कशी, की जी स्वीकारली तर काळाचे बंधन नसलेल्या देवांची कहाणी मर्त्य मानवात पेरली गेली तर काय होईल त्याचे दर्शन व्हावे आणि ती नाकारली तर देवाने स्वतः त्याच्या आयुष्यातील निर्णय वेगळा घेतला असता तर काय झाले असते त्याचे दर्शन त्याला व्हावे. प्लुटो तयार होतो. पर्सिफोन तयार होते. ऑर्फिअस तयार होतो. आपण पण तयार होतो, आता युरीडीसी पर्सिफोनचे आयुष्य जगणार म्हणून. पण इतक्या सहज वाचकाला सोडतील तर ते जी ए कसले !


मग सुरु होतो तो या रांगोळीतला तिसरा रंग.


युरीडीसी ऑर्फिअसच्या शेजारी येउन उभी राहते. आपल्याला वाटते की ती ऑर्फिअसवर चिडेल, ओरडेल. पण तसे न होता ती बोलते. तिचा आवाज कोवळा झरा नुकताच बाहेर येत असल्याप्रमाणे मृदू असतो. ती ऑर्फिअसला काही वेळापूर्वीच्या निर्णयाबद्दल क्षमा करते. ती मान्य करते की मगासचा ऑर्फिअसचा निर्णय तिला दु:ख्ख देणारा वाटला तरी, तो योग्य होता कारण तिचे आणि त्याचे सहजीवन म्हणजे एक कायमस्वरूपी अग्निपरीक्षा ठरले असते. तिच्या तोंडी जी एंनी जे संवाद दिलेत त्याचा मला लागलेला अर्थ असा, ‘एक अनुभव घेऊन पुढे गेलेला जोडीदार आणि एक अनुभव घ्यायचा बाकी असलेला जोडीदार हे जोडीदार असूच शकत नाहीत. दोघांनी अनुभव घेतलेला असणं किंवा दोघांनी अनुभव घेतलेला नसणं हेच जोडीच्या आनंदाचं खरं रहस्य आहे. नाहीतर कायम पुढे गेलेल्याचा खोळंबा आणि मागे राहिलेल्याची ओढाताण आणि त्यातून निर्माण होणारा कोंडमारा आणि दु:ख्ख.’


ऑर्फिअस ऐकत नाही. म्हणून मग ती सांगते की सहा महिने जीव लावणं आणि नंतर ते सगळं सोडून परत येणं, माझ्याच्याने होणार नाही. आणि माझं असं जाणं तू तरी सहन करू शकशील काय? मग ती शेवटचा बिंदू गाठते, म्हणते, ‘मी येणं जाणं करीन देखील पण मी जायच्या आधी जर तूच गेलास तर मी ते दु:ख्ख सहन करू शकणार नाही. मृत्यू हा एक बिंदू आहे. तो ओलांडल्यावर पुन्हा मागे येणे शक्य नाही. आता आपली भेट, तू जेंव्हा तुझी जीवन यात्रा संपवून, तुझा मृत्यूबिंदू ओलांडून इथे येशील तेंव्हाच. मी तुझी वाट पहात राहते.’  


युरीडीसी नाहीशी होते.  ऑर्फिअस परत फिरतो. आपण सुन्न होतो. वाटते कथा संपली. पण नाही. जी एंच रंग भरणं  अजून संपलं नसतं. पर्सिफोनला हा सगळा वेडेपणा वाटतो. तिला ऑर्फिअस आणि युरीडीसीचे निर्णय अयोग्य वाटतात. आणि तिने तसे प्लुटोला सांगताच, जी ए कळसाध्याय सुरु करतात. किंवा रांगोळीतला चौथा आणि चमकीचा रंग, की ज्याने रांगोळी अधिकच मनमोहक बनते.

रांगोळीतला चौथा आणि चमकीचा रंग


आत्तापर्यंत या गोष्टीत जी ए आपल्याला ऑर्फिअस आणि युरीडीसी ह्या  दैव गतीमध्ये अडकलेल्या दोन अभागी जीवांबरोबर सर्वशक्तिमान मृत्युदेवासमोर आणि देवतेसमोर उभे करून प्रेम, मृत्यू, अनुभव, अभूतपूर्व परिस्थितीत घेतलेले निर्णय, असा प्रवास घडवून आणतात. जणू हे दोघे प्रवासी आणि पाताळलोक हे  गंतव्य स्थान. या मर्त्य मानवांना प्लुटोने संधी द्यावी म्हणून गळ घालणारी पर्सिफोन आणि त्यांना अटी घालणारा मृत्यूदेव  प्लुटो  हे जणू या प्रवासाच्या सीमारेषेवरचे शेवटचे बिंदू असतात.


पण ज्याक्षणी पर्सिफोन ऑर्फिअस आणि युरीडीसीचा निर्णय अयोग्य आहे असे मत प्रदर्शित करते त्याक्षणी आत्तापर्यंत ऑर्फिअस आणि युरीडीसी या दोन प्रवाशांची असलेली ही गोष्ट आता त्या दोघांबरोबरच प्लुटो आणि पर्सिफोनला पण दैवगती न कळणाऱ्या पात्रात रुपांतरीत करून चार प्रवाशांची गोष्ट होते. निर्णय कसा घ्यावा ? योग्य काय अयोग्य काय? इतरांनी घेतलेले निर्णय योग्य की अयोग्य कसे ठरवायचे? आणि ते तसे ठरवायचा अधिकार आपल्याला असतो का? या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात नकळत निघालेले प्रवासी.


अंतिम ज्ञान अस्तित्वात नसते हे मानणारा प्लुटो, ज्याने अनंत आयुष्य पदरी असल्याने सतत नवनवीन अनुभवांची शिदोरी बांधून आपले ज्ञान वाढवीत ठेवले तो प्लुटो,  किंबहुना ज्ञान प्राप्तीसाठी वेगवेगळे निर्णय घेऊन येणारे अनुभव हाच एकमेव मार्ग वापरणारा मृत्युदेव प्लुटो, ऑर्फिअस आणि युरीडीसीला नवीन अटी घालून त्यांच्याबरोबर स्वतः देखील नवीन अनुभव घेऊन स्वतःचे ज्ञान वाढवू पाहणारा प्लुटो, स्वतःच्या आयुष्यातील एक घटना दुसऱ्याच्या आयुष्यात घडवून आणून तिच्यातून स्वतःच्या  निर्णयाच्या योग्यतेची खातरजमा करून घेणारा प्लुटो म्हणतो की, 'त्या दोघांनी आपापल्या मर्यादा ओळखल्या आहेत याला कदाचित ज्ञानदेखील म्हणता येईल. अनंत आयुष्य जगणाऱ्या देवांना, सांत आयुष्य जगणाऱ्या आणि अमृतफळ पेरून सुद्धा विषफळ हाती लागणाऱ्या, सहन करण्याची मर्यादित ताकद असूनही अमर्याद दु:ख्ख वाट्याला येणाऱ्या मानवी आयुष्यात योग्य काय आणि अयोग्य काय ते ठरवण्याचा अधिकार नाही.'


प्लुटोच्या तोंडी पर्सिफोनसाठी वरील वाक्ये टाकून, जी ए आपल्यालाच दोन गोष्टी सांगतात.


पहिली गोष्ट म्हणजे, निर्णय > अनुभव > ज्ञान ही ज्ञानापर्यंत पोहोचण्याची एकमेव साखळी नसून कित्येकदा आपल्या मर्यादा उमजून, अनुभव न घेण्याचा निर्णय घेणे हा देखील ज्ञान प्राप्तीचा एक मार्ग असू शकतो. किंबहुना आपल्या मर्यादांची जाणीव होणे हीच मानवासाठी ज्ञानाची एक पायरी आहे. हेच सांगण्यासाठी प्लुटो, "याला कदाचित ज्ञानदेखील म्हणता येईल," असे म्हणतो.


दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या मर्यादा आणि इतरांच्या मर्यादा वेगवेगळ्या असतील तर, भलेही ते आपल्याच सारख्या अवस्थांतून जात असतील तरीही त्यांच्या निर्णयाच्या योग्यायोग्यतेबाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. देव असलो तरीही नाही. प्रत्येकाचा निर्णय हा त्यांच्यापुरताच असतो. त्याला योग्य की अयोग्य ते स्वतःच ठरवतील. त्यांचे सुखद किंवा दु:ख्खद परिणाम ते स्वतःच भोगतील.

इथे जी ए कथा संपवतात. आणि आपल्याला जाणवते की या ग्रीक शोकांतिकेमध्ये त्यानी, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य की जबाबदारी?, निर्णय घेण्याचे निकष आणि अंतिम ज्ञान, क्षणभंगुरत्व आणि  चिरंतनत्व, जोडीदारांची व्याख्या, दोन जोडीदारांपैकी एकाने दुसऱ्याच्या आधी अनुभव घेणे आणि मग त्यातून तयार होणारी दरी, आणि  इतरांच्या निर्णयाची योग्य किंवा अयोग्य अशी सरधोपट विभागणी करणे बरोबर की चूक? या सर्व बाजूंना स्पर्श केला आहे. असे सगळे थक्क करणारे आणि  मनोहारी रंग भरले आहेत आणि या लेखमालेच्या दुसऱ्या भागाच्या शेवटी "निरर्थक भासणाऱ्या जीवनातील अर्थ आणि सौंदर्य केवळ साहित्यामुळे नाही तर साहित्यिकाच्या सर्वस्पर्शी प्रतिभेमुळे कळू शकतो" हे वाक्य जी एंच्या बाबतीत किती समर्पक ठरते याचा प्रत्यय दिला आहे.


---------------------------------------

1 comment:

  1. प्लुटोच्या तोंडी पर्सिफोनसाठी वरील वाक्ये टाकून, जी ए आपल्यालाच दोन गोष्टी सांगतात.पहिली गोष्ट म्हणजे, निर्णय > अनुभव > ज्ञान ही ज्ञानापर्यंत पोहोचण्याची एकमेव साखळी नसून कित्येकदा आपल्या मर्यादा उमजून, अनुभव न घेण्याचा निर्णय घेणे हा देखील ज्ञान प्राप्तीचा एक मार्ग असू शकतो. किंबहुना आपल्या मर्यादांची जाणीव होणे हीच मानवासाठी ज्ञानाची एक पायरी आहे. हेच सांगण्यासाठी प्लुटो, "याला कदाचित ज्ञानदेखील म्हणता येईल," असे म्हणतो.

    दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या मर्यादा आणि इतरांच्या मर्यादा वेगवेगळ्या असतील तर, भलेही ते आपल्याच सारख्या अवस्थांतून जात असतील तरीही त्यांच्या निर्णयाच्या योग्यायोग्यतेबाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. देव असलो तरीही नाही. प्रत्येकाचा निर्णय हा त्यांच्यापुरताच असतो. त्याला योग्य की अयोग्य ते स्वतःच ठरवतील. त्यांचे सुखद किंवा दु:ख्खद परिणाम ते स्वतःच भोगतील.>>>मोरे सरकार,
    जमलंय एकदम. जी एं नी भरलेले रंग. :)

    ReplyDelete