Monday, February 1, 2016

ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन

-----------------------------------------------------------------------

( Image Credit : Heidi De Vries )
काही कथा म्हणतात, ऑर्फिअस वेस ओलांडतो आणि  मागे बघतो. पण युरीडीसीने वेस ओलांडली नसते. प्लुटो म्हणतो दोघांनी पाताळ लोक सोडून पृथ्वीवर पोहोचायच्या आधी मागे बघितलस, माझी अट मोडली म्हणून युरीडीसीला परत पाताळलोकात यावे लागणार. या कथेप्रमाणे ऑर्फिअस साधाभोळा दिसतो आणि प्लुटो शाब्दिक कसरती करून माणसाला फसवणारा दुष्ट मृत्युदेव दिसतो. यात ऑर्फिअस आणि युरीडीसी दोघंही सहजीवनाची आस असलेले पण नियतीच्या अगम्य चक्रात अडकून देवाकडून फसवले गेलेले प्रेमी जीव दिसतात.


दुसऱ्या एका कथेप्रमाणे अधीर होऊन ऑर्फिअस वेस ओलांडायच्या आधीच मागे बघतो. कारण एकच संयमाचा अभाव. आणि मग अट मोडते. दु:ख्खी युरीडीसी करूण किंकाळी फोडत पुन्हा पाताळलोकात पडते. या कथेप्रमाणे ऑर्फिअस उतावळा, अधीर आणि अविचारी वाटतो. त्याच्या आणि युरीडीसीच्या दु:ख्खाला तोच कारणीभूत ठरतो. प्लुटो केवळ कराराच्या अटी पूर्ण करून घेणारा निर्लिप्त देव ठरतो. युरीडीसी जीवनाकडून दुसऱ्यांदा लाथाडली गेलेली अबला ठरते आणि ऑर्फिअस प्रचंड ताकदीचा पण उतावळा आत्मघातकी संगीतकार ठरतो.


तर तिसऱ्या कथेप्रमाणे वेशीजवळ आल्यावर ऑर्फिअस घाबरतो. त्याला वाटू लागते कि प्लुटोने मला फसवले तर नसेल. मागे युरीडीसी खरंच येतेय की आपण प्लुटोवर विश्वास ठेवून फसवले गेलोय. अश्या विचारांच्या आणि शंका कुशंकांच्या आवर्तात सापडून तो न रहावून वेस ओलांडायच्या आतच मागे वळून बघतो. अट मोडली जाते. करुण किंकाळी फोडून युरीडीसी पाताळलोकात परत जाते. या गोष्टीतही प्लुटो नामा निराळा राहतो, युरीडीसी अबलाच रहाते पण  ऑर्फिअस मात्र उतावळा, अधीर, अविचारी न वाटता गोंधळलेला प्रेमी वाटतो. मला वाटते हीच गोष्ट आम्हाला शाळेत इंग्रजीच्या धड्यात होती.


सातवी आठवीच्या वयात येऊ शकणाऱ्या समजूतीप्रमाणे  मला आणि माझ्या मित्रांना ऑर्फिअस वेडा वाटला होता. जर फक्त खात्री करायची होती की युरीडीसी येतेय की नाही तर मागे कशाला वळून पहायचे ? फक्त हाक मारायची की, लगेच कळले असते युरीडीसी येतेय की नाही ते. त्यामुळे त्यामुळे ऑर्फिअस चे माझे पहिले आकलन, बावळट आणि डोकं न चालवणारा उतावळा प्रेमिक असेच झाले होते.


मग कुठेतरी वाचताना कळलं की ग्रीक तत्वज्ञ प्लेटो तर ऑर्फिअसला शेपूटघालू आणि सुमार दर्जाचा प्रेमी मानतो. त्याच्या मताप्रमाणे, मेलेल्या युरीडीसीला परत आणायला पाताळलोकात जाणे  हाच एक वेडेपणा. जर ऑर्फिअसचे प्रेम उदात्त असते तर युरीडीसीला परत आणण्याऐवजी त्याने स्वत:च मृत्यूला कवटाळले असते. आणि मग पाताळलोकात तो त्याच्या प्रियतमेबरोबर राहू शकला असता. जे स्वत:च्या प्राणाची आहुती देऊ शकते तेच खरे प्रेम असा काहीसा त्यागवादी प्रेमाचा विचार प्लेटो मांडतो. आणि “कयामत से कयामत तक” वाल्या माझ्या किशोर वयीन मनाला ऑर्फिअस  अजूनच मूर्ख वाटू लागला.

मग दहावी अकरावीत असताना  वाचली ती या गोष्टीची जी एंनी केलेली पुनर्मांडणी. तेंव्हापासून हा ऑर्फिअस खास छळणारा मित्र झालाय.

जी एंचा परिस स्पर्श


'युद्ध, शस्त्रांच्या आधुनिकतेमुळे नाही तर सैनिकाच्या काळजातील शौर्यामुळे जिंकली जातात', अश्या अर्थाचं एक वाक्य आहे. त्याच चालीवर मी म्हणीन की, 'निरर्थक भासणाऱ्या जीवनातील अर्थ आणि सौंदर्य केवळ साहित्यामुळे नाही तर साहित्यिकाच्या सर्वस्पर्शी प्रतिभेमुळे कळू शकतो.' या ऑर्फिअसच्या कथेच्या बाबतीत असंच झालं आहे माझ्यासाठी. परीक्षेसाठी वाचून मत बनवलेल्या आणि प्लेटो साहेबांचे नाव मोठे असल्याने त्यांच्या मतावर विचार न करता टाकलेल्या विश्वासामुळे जी कथा माझ्यासाठी सुमार दर्जाची शोकांतिका होती तिला जी एंच्या सर्वस्पर्शी प्रतिभेने एका अतुलनीय उंचीवर नेवून ठेवले.

--------------------------------------------

No comments:

Post a Comment