भाग १ । भाग २ । भाग ३ । भाग ४ । भाग ६ । भाग ७ | भाग ८
--------------------
इथपर्यंत भारतीय उपखंडातील भांडवलशाहीची वाटचाल जगाबरोबर चालू होती. पण इथून पुढे मात्र भारतीय भांडवलशाहीने स्वतःचे वेगळे रूप धारण केले. विज्ञानाची कास भरून तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध आणि त्यायोगे होऊ शकणारे औद्योगिकीकरण हा मार्ग भारतीय भांडवलशाहीने सोडला. उत्पादनाच्या साधनांची आणि व्यवसायांची मालकी प्रस्थापित करून भारतीय भांडवलशाही जातीव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करू लागली.
--------------------
भागधारक ते कामगार ते कारागीर
जोपर्यंत टोळीतले सगळे काम करत असतात तोपर्यंत सगळेच मालक असतात. सगळेच उत्पादनाचे वाटेकरी असतात. उत्पादन नाशिवंत असल्याने, उपलब्धतेनुसार आणि गरजेनुसार वाटे करण्याची पद्धत सर्वमान्य असते. हजीर सो वजीर हा कायदा असतो. क्षमतेनुसार काम आणि गरजेनुसार वाटणी हा नियम सगळ्यांना योग्य वाटतो. उत्पादन जास्त असले की वाटे मोठे होतात आणि उत्पादन कमी निघाले की वाटे छोटे होतात. जास्तीच्या उत्पादनाचे सुख आणि कमी उत्पादनाचे दु:ख सगळ्यांनी भोगणे अटळ असते. सगळ्याच व्यक्ती टोळीतील असल्याने वाटणी अपरिवर्तनीय नसते. गरज पडल्यास एकमेकांकडून त्यांचा वाटा मागता येतो. आणि तो तसा देणे म्हणजे काही मोठा त्याग नसतो. अतिरिक्त उत्पादन अस्तित्वात येणे अजून शक्य नसते.
पण गुलाम वापरून काम सुरु झाले की नवीन गोष्ट घडते. उत्पादन करताना आणि वाटणीच्या वेळी व्यक्तींच्या दोन श्रेणी तयार होतात. मालक कमी श्रम करतो तर गुलाम जास्तीचे श्रम करतो. म्हणजे क्षमतेनुसार काम हा नियम मोडला जातो. आणि मग वाटणी करताना गरजेनुसार वाटणी हा नियम देखील मोडला जातो. गुलामाला त्याच्या गरजेनुसार वाटणीचा हिस्सा मिळण्याऐवजी, जगण्यासाठी आवश्यक इतकाच वाटा मिळतो. म्हणजे गुलामीच्या व्यवस्थेमध्ये गुलामरूपी पूर्ण व्यक्तीचे श्रम असतात पण वाटणीमध्ये त्याचा वाटा नगण्य असतो. त्याच्या वाटणीचे पण त्याला न दिलेले उत्पादन इतर टोळी सदस्यांना अधिकचा वाटा देऊ लागते. थोडक्यात सांगायचे म्हणजे, गुलामांना क्षमतेपेक्षा अधिक काम करण्यास भाग पाडले जाते आणि त्यांना गरजेपेक्षा कमी वाटा मिळतो. याउलट मालक क्षमतेपेक्षा कमी काम करतात आणि स्वतःचा वाटा तर घेतातच पण त्याशिवाय गुलामांचा उरलेला वाटा देखील मालकांच्या मालकीचा असतो. अश्या तऱ्हेने टोळीसदस्यांना अतिरिक्त उत्पादनाची चटक लागते.
स्वातंत्र्याच्या नैसर्गिक उर्मीने गुलाम कधी पळून जातात. तर कधी ते बंड देखील करतात. बऱ्याचदा त्यांच्या पळण्याच्या प्रयत्नांचा किंवा बंडांचा अंत दु:खद असतो. क्वचित त्यांची संख्या मालकांपेक्षा जास्त असेल किंवा मालक कमकुवत असेल तर बंड यशस्वी ठरते. मालकांनी गुलामांवर कायमस्वरूपी तर गुलामांनी मालकांवर संधी मिळताक्षणी हिंसा, हा अश्या समाजाचा स्थायीभाव असतो.
अतिरिक्त उत्पादन मिळू लागल्याने टोळीतल्या टोळीत कुटुंबे तयार होण्याचा वेग वाढतो. कुटुंबांना पोसण्यासाठी अतिरिक्त उत्पादनाची गरज वाढते. गुलामीची व्यवस्था अजूनच प्रखर होऊ लागते. कमी संख्येतील पण युद्धखोर मालकांच्या टोळ्या आणि त्यांच्या हाताखाली प्रचंड संख्येने राबणारे गुलाम असे चित्र तयार होऊ लागते. अश्या मोठ्या संख्येतील गुलामांनी बंड करू नये आणि त्यांच्यातील स्वातंत्र्याची नैसर्गिक भावना वाढीस लागू नये म्हणून त्यांना कुटुंब बनवायचा अधिकार नाकारला जातो. किंवा जिथे तो दिला आहे तिथे देखील गुलामांची मुले गुलाम म्हणून जन्माला येउन गुलामीतच मरतात. जितदास (युद्धात जिंकलेले शत्रू टोळीसदस्य), क्रीतदास (मोबदला देऊन घेतलेले गुलाम) यांच्याबरोबरीने जन्मदास (गुलामाच्या पोटी जन्मलेले म्हणून आपोआप गुलाम) अशी नवीन संकल्पना तयार होते.
एकाच टोळीत असूनही काहीजण स्वभावतः अधिक युद्धखोर असतात तर काहीजण कमी युद्धखोर असतात. काहीजणांना अधिकाची अधिक अभिलाषा असते, तर काहीजण अल्पसंतुष्ट असतात. काहींना धोका पत्करण्याची खुमखुमी असते तर काहीना धोका अजिबात नकोस वाटतो. काहीजण अधिक उत्पादनासाठी (जे कदाचित सर्वच्या सर्व उपभोगणे त्यांना शक्यदेखील नसते) कित्येक पट मोठा धोका पत्करण्यासाठी तयार असतात. तर काहीजण धोका, चढउतार टाळण्यासाठी उत्पादनातील कमी वाट्यावर समाधान मानतात. हा निसर्गदत्त स्वभावाचा भाग असतो. मागील भागात बघितल्याप्रमाणे टोळीतील अशी काही अल्पसंतुष्ट कुटुंबे उत्पादनाच्या साधनांवर मालकी मिळवण्याऐवजी, उत्पादनाच्या कामांवर अधिक लक्ष देऊ लागतात.
यांना आपण मागील भागात, "कामगार" म्हटले. टोळीतील यांची स्थिती गुलामांपेक्षा वरची असते. हे काम सुरु करायच्या आधी ठरलेल्या मोबदल्याच्या हमीवर काम करतात. उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त आले किंवा कमी, तरी यांच्या मोबदल्याच्या प्रमाणात फरक पडत नाही. टोळीमधील, कमी युद्धखोर आणि कमी धोका पत्करणाऱ्या लोकांसाठी ही व्यवस्था फायद्याची असते कारण तुलनेने कमी मोबदला मिळाला तरी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका त्यांना बसत नाही. तसेच ही व्यवस्था धोका पत्करण्यास तयार अश्या लोकांच्या पथ्थ्यावर पडते. कारण यात ठराविक मोबदल्याची सक्ती असली तरी अतिरिक्त उत्पादनाची देखील शक्यता असते.
कामगार काही गुलाम नसतात. त्यामुळे त्यांची कुटुंबे असू शकतात. आणि मग कामगारांच्या कुटुंबात जन्माला आलेली पुढील पिढी जन्मापासून एकाच प्रकारचे काम बघून त्यात पारंगत होत जाते. कालपर्यंतचे कामगार हळू हळू, “कारागीरात” परिवर्तीत होऊ लागतात. या पुरातन टोळ्यांच्या सदस्यांचे सरासरी आयुष्य आपण ५० वर्षे जरी मानले, तरी वयाची सुरवातीची १२ - १५ वर्षे कामगार पालकांच्या हाताखाली तयार होऊन हे नवे कामगार, टोळीत कुशल कारागीर म्हणूनच सामील होतात. त्यामुळे टोळीला उत्पादनाचा वेग वाढवणे, त्याची प्रत वाढवणे शक्य होते. नैसर्गिक स्वभावाचा फायदा घेऊन, भांडवलशाही, टोळीत सदस्यांची वेगवेगळ्या श्रेणीत विभागणी करते. काहींजण उत्पादनाच्या साधनांचा संचय करतात तर काहीजण काम करण्याच्या पद्धतीच्या ज्ञानाचा संचय करतात.
खाजगी मालमत्तेचा हक्क
निसर्गापुढे हतबल होणारा माणूस टोळीत संघटीत झाला. शिकार करायला शिकला. केलेली शिकार आणि गोळा केलेले अन्न वाटायला शिकला. नवजात मुलांची आणि वृद्धांची काळजी घेऊ लागला. स्थलांतर करू लागला. एका ठिकाणी वसती करून राहू लागला. भटकेपणा त्यागून स्थिर होऊ लागला. पशुपालन आले. शेती आली. युद्ध करू लागला. गुलाम बाळगू लागला. कुटुंब आले. अतिरिक्त उत्पादन आले. कामगार आले. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काम करण्याच्या पद्धतींचे हस्तांतरण कुटुंबातल्या कुटुंबात होऊ लागल्यामुळे, आता तर कारागीर देखील आले.
कामाच्या पद्धती कुटुंबातल्या कुटुंबात हस्तांतरीत होणे यात कुणालाच काही वावगे वाटणे शक्य नव्हते. पण उत्पादनाची साधने, पशुधन आणि शेतजमीन जेंव्हा कुटुंबातल्या कुटुंबात हस्तांतरीत होऊ लागते तेंव्हा त्यात भांडणे होणे स्वाभाविक होते. जोपर्यंत उत्पादनाची साधने आपल्या ताब्यात घेणारी किंवा स्वतःहून कामगारपणा स्वीकारणारी पहिली पिढी जिवंत असते तोपर्यंत भांडणे मर्यादित असतात. जो तो आपापल्या नैसर्गिक स्वभावानुसार केलेल्या निवडीप्रमाणे जगत असतो. आयुष्य सोपे करण्यासाठी प्रत्येक टोळी सदस्याने केलेली निवड इतर टोळी सदस्य देखील मान्य करतात. पहिल्या पिढीच्या हयातीत मालमत्ता खाजगी आहे की नाही? हा प्रश्न कुणाला पडत नाही. पण जेंव्हा ह्या पिढीचा आयुष्यकाल संपतो, तेंव्हा त्यांची संचित स्थावर आणि जंगम संपत्ती त्यांच्या कुटुंबालाच मिळावी की पुन्हा पूर्ण टोळीच्या मालकीची व्हावी? असा तात्विक प्रश्न तयार होतो.
स्वतःचे आयुष्य सोपे करण्यासाठी जर पहिल्या पिढीने स्वभावानुसार टोळीतील आपल्या स्थानाची निवड केली होती, तर नैसर्गिक न्यायाच्या पद्धतीप्रमाणे, प्रत्येक पिढीला टोळीतील आपले स्थान निवडण्याचा हक्क मिळायला हवा. जन्मदास ही संकल्पना स्विकारल्यामुळे गुलामांच्या पुढील पिढीचा मुद्दा या टोळीने आधीच क्रूरपणे सोडवलेला असतो. तरी बाकीच्या टोळीसदस्यांच्या बाबतीत पहिल्या पिढीतील कामगाराचा मुलगा, त्याला हवे असेल तर उत्पादन साधनांचा मालक होऊ शकला पाहिजे आणि पहिल्या पिढीतील उत्पादन साधनांच्या मालकाच्या मुलाला कामगार व्हावेसे वाटले तर त्याला तशी निवड करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. पण असे होत नाही. पहिल्या पिढीतील सर्व व्यक्तींचे आयुष्य एकाचवेळी न संपणे आणि अपत्यप्रेम ही नवीन गोष्ट मध्ये येते.
मी शोधले म्हणजे माझे झाले, असा ज्ञानावर हक्क प्रस्थापित केला जात नसला तरी, उत्पादनाच्या बाबतीत मात्र, मी कसले म्हणजे माझे झाले. मी धोका पत्करला म्हणजे माझे झाले. आणि जे माझे झाले त्यावर माझा हक्क माझ्या मृत्यूनंतरही लागू होतो असा विचार मूळ धरू लागतो. माझ्या मृत्यूनंतरही जर माझ्या पिढीतील इतर जण जिवंत राहणार असतील तर माझ्या कुटुंबियांना त्रास होऊ नये, त्यांना समान संधी मिळावी, म्हणून माझे हक्क माझ्या मृत्यूनंतरही चालू रहाणे सयुक्तिक वाटू लागते. आणि मग व्यक्तीच्या मृत्यूनंतरदेखील त्याचा हक्क शाबूत रहावा, त्याला कोणी आव्हान देऊ नये, एका पिढीतील एका कुटुंबाच्या संचितावर पुढील पिढ्यांतील दुसऱ्या कुटुंबाने हक्क सांगू नये, म्हणून भांडवलशाही आपले अजून एक गुणवैशिष्ट्य धारण करते. ते म्हणजे "खाजगी मालमत्तेचा हक्क". एका कुटुंबाचे संचित ज्ञान त्याच कुटुंबात पुढे जाते आणि कामगारांना कारागीर बनवते. त्याच प्रकारे एका कुटुंबाची मालमत्ता त्याच कुटुंबात पुढे जाते आणि मालमत्ताधारी भांडवलदार बनतात.
भारतात बलुतेदारीचा उगम
जास्तीत जास्त गोष्टी कमीत कमी श्रमाच्या मोबदल्यात पदरात पडून घेण्याकडे मनुष्याचा कल असतो. त्यामुळे तो धोका पत्करायला आणि साहस करायला तयार होतो. एकदा का खाजगी मालमत्तेचा हक्क प्रस्थापित झाला की लग्नसंस्था आणि पर्यायाने कुटुंबसंस्था अजून जोमाने वाढू लागते.
जसजसे उत्पादन साधनांच्या मालकीचे कुटुंबात हस्तांतरण होऊ लागले, तसतसे जगभरात भांडवलदार तयार होऊ लागले. स्थिर झालेल्या माणसानी गावे आणि नगरे वसवली आणि श्रमविभागणीचे तत्व अजून विकसित होऊ लागले. स्वतःच्या मालकीची जमीन किंवा पशुधन न बाळगता, स्वतःची शेती, पशुपालन न करता आणि इतरांसाठी मजुरी न करता, केवळ एका प्रकारचे पण शेतीला पूरक असे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. म्हणजे उत्पादन साधनांवर मालकी असलेले भांडवलदार, स्वतःच्या घरूनच पण स्वतःच्या सवडीने इतरांसाठी एकाच प्रकारची कामे करण्यात प्राविण्य मिळवलेले कारागीर आणि यापैकी काहीही नसलेले, केवळ इतरांच्या घरी, इतरांच्या इच्छेने पडेल ती कामे करणारे मजूर / कामगार अशी विभागणी होण्यास सुरुवात झाली. भारतात शेतकरी केंद्र मानून शेतीला पूरक व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवस्थेला "अलुतेदारी-बलुतेदारी" किंवा "जजमानी (यजमानी)" असे नाव दिले गेले. शेतकरी हा गावचा यजमान आणि त्याला सहाय्य करणारे बिगरशेतीची पण महत्वाची कामे करणारे बारा बलुतेदार तर बिगरशेतीची पण कमी महत्वाची कामे करणारे अठरा अलुतेदार, अशी रचना भारतात स्थिरावू लागली. कामाच्या मोबदल्याचं नाव बलुतं.
इथपर्यंत भारतीय उपखंडातील भांडवलशाहीची वाटचाल जगाबरोबर चालू होती. पण इथून पुढे मात्र भारतीय भांडवलशाहीने स्वतःचे वेगळे रूप धारण केले. विज्ञानाची कास भरून तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध आणि त्यायोगे होऊ शकणारे औद्योगिकीकरण हा मार्ग भारतीय भांडवलशाहीने सोडला. उत्पादनाच्या साधनांची आणि व्यवसायांची मालकी प्रस्थापित करून भारतीय भांडवलशाही जातीव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करू लागली.
No comments:
Post a Comment