------------------
मी चित्रपट पाहणार नव्हतो. आणि न पाहताच जर त्यावर काही लिहिले असते तर माझ्या मतावर तुमच्या मताची दाट छाया पडली असती किंवा माझे मत परप्रकाशित राहिले असते. याचा अर्थ असा नव्हे की मला जाणवलेला चित्रपटाचा अर्थ तुम्हाला जाणवलेल्या अर्थाच्या पूर्ण विरुद्ध आहे. पण इतके मात्र खरे की काही काही ठिकाणी तुम्ही दिलेली संगती मला तितकी जाणवली नाही आणि काही ठिकाणी मला वेगळी संगती लागली.
आपापली साक्ष झाल्यावर लाकूडतोड्या आणि भिक्षू मागे बसून राहण्यामागे त्यांना सत्याचे स्वरूप जाणून घ्यायचे होते आणि ताजोमारू बसत नाही कारण तो घटनेचा केवळ साक्षीदारच नव्हे तर स्वतःच घटनाकर्ता होता, हे जे मत तुम्ही मांडले आहे ते मला तितकेसे पटले नाही. किंबहुना हे दोघे का बसले आणि ताजोमारू का नाही बसला हा प्रश्नच मला पडला नाही. म्हणून त्याचे दुसरे कुठलेही उत्तर मला सुचले नाही. याशिवाय चित्रपटभर धो धो कोसळणारा पाउस शेवटी थांबतो याबाबत तुम्ही काहीच निरीक्षण नोंदवले नाहीत याचे मला आश्चर्य वाटले. या दोन गोष्टी सोडल्यास तुमच्या रसग्रहणाचा मला चित्रपट पहाताना प्रचंड फायदा झाला. आणि मी चित्रपटाच्या कथेशी अधिक समरस होऊ शकलो.
हर्षद चे आभार की त्याने राशोमोन या नावातील मोन चा अर्थ दार असा सांगितला मग मी थोडे शोधल्यावर कळले की राशो म्हणजे शहराची भिंत आणि मोन म्हणजे दार. थोडक्यात राशोमोन म्हणजे शहराचे मुख्य दार. चित्रपटातले प्रसंग जंगलात आणि कोर्टात घडत असले तरी खरी कथा क्योटो आणि नारा शहरांच्या मध्ये असलेल्या, वाईट आत्म्यांचे घर बनलेल्या आणि कथेच्या वेळी पडझड झालेल्या ह्या दिंडी दरवाजातच घडते. दरवाजाच्या एका बाजूला जंगल आहे आणि बाजूला उध्वस्त झालेले क्योटो शहर. चित्रपटाची सुरवात होते ती दरवाजात बसलेल्या लाकूडतोड्या आणि भिक्षूकडे जंगलातून आलेल्या त्या माणसाने आणि शेवट होतो लहान बाळाला घेऊन लाकूडतोड्या शहरात परतण्याने आणि तो माणूस शहराबाहेर निघून जाण्याने. जो बाळ सांभाळण्याची जबाबदारी घेतो तो शहरात आणि जो दाराची लाकडे बेदरकारपणे तोडून शेकोटी पेटवतो, बाळाच्या आई वडिलांना ते दारात सोडून जाताना किती दु:ख झाले असेल त्याबद्दल विचार करण्यास नकार देऊन फक्त किमोनो घेण्यात स्वारस्य दाखवतो तो शहराबाहेर जाताना दाखवून एका अर्थाने शेवट उध्वस्त शहराला भविष्यकाळ आहे हे दाखवतो, आणि भिक्षूने मानवतेवर विश्वास का ठेवावा ? याचे आपल्याला देखील एक उत्तर देतो.
चित्रपटभर धो धो कोसळणारा पाऊस मला अविरत कोसळणाऱ्या विचारांचे प्रतीक वाटला आणि शेवटी जेंव्हा विचार कोसळण्याचे थांबतात, लाकूड्तोड्याला कानफटात बसते, त्या माणसाला किमोनो मिळतो, तो माणूस किमोनो घेताना लाकूडतोड्या खंजीर घेताना लुटारू नाही मग मी पण किमोनो घेताना लुटारू नाही, खरंतर आपले सर्वांचे वागणे परिस्थितीजन्य आहे आणि म्हणून योग्य आहे हे सिद्ध करतो, लाकूडतोड्या मुलाची जबाबदारी घेताना भिक्षूचे कटू शब्द परीस्थितीजन्य आहेत हे मान्य करून त्याचा राग धरत नाही आणि भिक्षूला माणसावर विश्वास ठेवायला कारण मिळते तेंव्हा पाऊसही थांबतो. म्हणून मला तो पाऊस त्यांच्या गोंधळलेल्या मनाचे त्यातील विचारांच्या आवर्ताचे प्रतीक वाटला.
संपूर्ण कथेचे तुम्ही अतिशय सुंदर रसग्रहण केल्यामुळे मला एका दिशेने गेल्यावर हा चित्रपट कसा दिसू शकतो हे कळत होते आणि म्हणून कदाचित नकळत मी थोडा वेगळा विचार करू शकलो. आता तो खरोखरच वेगळा आहे की नाही ते तुम्ही ठरवा.
मला संपूर्ण चित्रपटाचा गाभा म्हणजे स्त्रीवर झालेला अतिप्रसंग, सामुराई ची झालेली हत्या आणि त्याचे ताजोमारू, स्त्री आणि सामुराई यांनी केलेलं वेगवेगळे वर्णन म्हणजे ज्या युद्धात सगळेच हरतात त्यात प्रत्येकजण आपले हरणे उदात्त करण्याचा प्रयत्न करताना सत्याचा अपलाप कसा करतात त्याचे चित्रण वाटले.
ताजोमारू हरला कारण इतका प्रसिद्ध डाकू एका य:कश्चित शिपायाकडून पकडला गेला तेदेखील कुठलाही प्रतिकार न करता, पोट दुखीने व्याकूळ झालेला असताना. सामुराई हरला कारण तो सहजगत्या एका डाकूकडून फारशी लढत न देता बंदी झाला आणि त्याची स्त्री त्याच्यासमोर त्या डाकूने भोगली. स्त्री हरली कारण तिच्या नवऱ्यासमोर तिचे शील लुटले गेले. ज्यांच्या आयुष्यात घटना घडते ते तिघेही हरले.
एक क्षण आपण जर स्त्री व सामुराई ची कहाणी खोटी मानली. त्याऐवजी ताजोमारू व लाकूडतोड्याची कहाणी खरी मानली तर; रामायणात रामाऐवजी रावण जिंकला असता तर सीतेची, महाभारतात पांडवांऐवजी कौरव जिंकले असते तर द्रौपदीची आणि बॅटमॅनच्या गोष्टीत जर जोकर जिंकला असता तर गोथॅमच्या रहिवाश्यांची अवस्था काय झाली असती त्याची कल्पना करता येते. जो नायक येणार, जो आपल्याला बंदिवासातून सोडवणार, जो आपल्यावरच्या अत्याचाराचा बदला घेणार म्हणून आपण इतके दिवस धीर धरला तो कुचकामी निघाला. ज्याला आपण खलनायक मानले तोच जिंकला आणि म्हणून तोच नायक ठरणार हे कळले तर मूळच्या खलनायकाला (जो आता विजयामुळे नायक ठरला आहे) विरोध करून जिवंत राहिलेल्या लोकांच्या मनस्थितीची कल्पना करावी लागेल.
आता मंदोदरी महाराणी. आणि आपले शील मातीमोल. आता दुर्योधन राजा आणि आपण पाच पतींनी भोगलेली भरसभेत विवस्त्र केली गेलेली एक य:कश्चित दासी. आता कारच्या मागे उगाचच धावणाऱ्या कुत्र्याप्रमाणे आयुष्याच्या कुठल्याही निर्णयामागे कुठलिही योजना नसणारा जोकर नायक आणि मुखवट्यामागे रहात सर्वांची काळजी घेणारा बॅटमॅन आणि त्याचे साथीदार मूर्ख. मग जिवंत राहिलेल्यांच्या नशिबी काय लिहून ठेवले असणार? या मूळच्या खलनायकाशी (जो आता विजयामुळे नायक ठरला आहे) जुळवून घ्यायचे तर कसे? आपल्या वागण्याचे स्पष्टीकरण द्यायचे तर कसे? त्यात सुसंगती ठेवायची तर कशी? आपण संधीसाधू नाही, वाऱ्याबरोबर पाठ फिरवणारे नाही हे पुढच्या पिढीला सांगायचे कसे ? आपण उच्च आदर्शांना सोडले नाही, किंबहुना आपले जीवन उच्च आदर्शांचे निदर्शक आहे, हे जगाला पटवायचे कसे ? हे सगळे प्रश्न त्यांना आपापल्या सत्याचे उत्पादन करायला भाग पाडतात.
आता जर आपण ताजोमारूची कथा खरी आहे असे मानले तर जिंकलेला रावण समजा नंतर अयोध्येहून आलेल्या भरताकडून किंवा जिंकलेला दुर्योधन पांडवांच्या कुठल्या दुर्लक्षित वंशजाकडून किंवा जिंकलेला जोकर रॉबिनकडून पकडला गेला तर तो स्वतःला धर्मयुद्ध खेळणारा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आपल्या एका सत्याचे उत्पादन करेल.
आणि जर आपण लाकूडतोड्याची कथा खरी आहे असे मानले तर युद्धाआधी रावणाकडे युद्ध टाळण्यासाठी दूत पाठवणारा, युद्धानंतर अग्निपरीक्षा घेणारा आणि धोब्याने संशय घेतला म्हणून गर्भार राणीला वनात सोडून येणारा राम, राज्यासाठी नातेवाईकांवर शास्त्र चालवावे लागणार ह्या कल्पनेने गलितगात्र होऊन शस्त्र खाली ठेवणारा अर्जुन आणि नको असलेल्या स्त्रीसाठी युद्ध करायला लडखडत तयार झालेले विचलीतबुद्धी ताजोमारू व सामुराई यांची जातकुळी एकच वाटते. आणि धरणीमाते मला तुझ्या पोटात घे म्हणून विनवणी करणारी सीता, दुर्योधनाच्या मांडीच्या रक्ताने केस धुण्यासाठी थांबलेली द्रौपदी आणि आपण कुणालाच नको आहोत या विचाराने दु:ख्खी झालेली आणि वेडीपिशी होऊन इतरांना लढण्यास प्रवृत्त करणारी सामुराई योद्ध्याची स्त्री, एकच दु:ख उपभोगताना दिसतात. आणि त्यात लाकूडतोड्या मात्र आपल्या सहा मुलांची जबाबदारी पेलण्यासाठी युद्धभूमीवर मिळणाऱ्या शस्त्रांच्या विक्रीतून फायदा करून घेणाऱ्या सामान्य नागरिकांप्रमाणे दिसू लागतो. आणि मग आपले केवळ जीवन जगवत राहण्याचे क्षुद्र हेतू उदात्त भासवण्यासाठी लाकूडतोड्या देखील आपल्या एका सत्याचे उत्पादन करेल ही शक्यता नाकारता येत नाही.
मला या चित्रपटाचा खरा नायक वाटला तो म्हणजे भिक्षू. त्याचा मानवतेवर विश्वास आहे. त्याने पूर, दुष्काळ, भूकंप अश्या आपत्तीत देखील माणसांना एकमेकांना धरून राहताना पहिले आहे. म्हणून त्याचा माणसाच्या चांगुलपणावर विश्वास आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर मानवातील समाजधारणेसाठीचे उत्तम गुण जेंव्हा त्याला शारीर वासनांच्या, अहंकाराच्या आणि मानापमानाच्या समोर लीन झालेले दिसतात तेंव्हा त्याला काळजी पडते ती उघड्या पडलेल्या विसंगतीची. आणि जेंव्हा त्याला लाकूडतोड्याने खोटी साक्ष दिली हे कळतं तेंव्हा तो अधिकच विकल होतो. सत्य काय हा प्रश्न त्याला फार छळताना दिसत नाही. त्याला छळणारा प्रश्न आहे तो माणसावर विश्वास कसा ठेवायचा ?त्याच्या चांगुलपणावर विश्वास कसा ठेवायचा ?
जेंव्हा त्याला छोटं बाळ दिसतं तेंव्हा तो ज्या पद्धतीने धरतो ते पाहून तर मला असा वाटलं की तो जणू त्या बाळाला लाकूडतोड्या आणि त्या माणसापासून वाचवतोय. त्यांच्या अविश्वासी वागण्यापासून वाचवतोय. या जगाच्या असहनीय, निरर्थक आणि दाहक सत्याच्या रूपापासून वाचवतोय. सर्व संग परित्याग केलेला भिक्षू त्या मुलाचे जगापासून रक्षण करण्यासाठी कृतीशील होणारच असतो पण जेंव्हा त्याला लाकूडतोड्या सांगतो की माझ्या सहा मुलांमध्ये हे एक मला जड जाणार नाही, तेंव्हा तो कथेतून चटकन दूर होतो. आणि आपल्या वाल्मिकीच्या, व्यासाच्या भूमिकेत जाऊन सत्य काहीही असले तरी चालेल पण माणसाने माणसावर विश्वास ठेवला पाहिजे कारण तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा आहे, त्यातूनच समाज घडेल, शहर वसेल, पडलेल्या दाराच्या आत उध्वस्त झालेल्या शहराच्या राखेतून, करपलेल्या मनाच्या माणसांना दाराबाहेर ठेवून, जे जबाबदारी घ्यायला तयार आहेत त्या माणसांच्या साथीने भविष्य घडेल, असले आशावादी गीत, आयुष्याच्या सुसंगतीबद्दल बोलणारे विचार करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी मोकळा होतो.
मी लेख एकदाच वाचले आहेत. मी चित्रपट एकदाच बघितला आहे. त्यामुळे माझे हे अंतिम आकलन आहे असे मी स्वत: देखील म्हणणार नाही. कदाचित अजून काही दिवसांनी मला माझे आजचे सुसंगत वाटणारे विचार अपूर्ण वाटतील आणि मी पुन्हा कवडशांवरून प्रकाशाचा स्त्रोत शोधायच्या मागे लागीन. तोपर्यंत काळे गुरुजींनी माझ्या पन्नास मार्काच्या पेपराला सहृदयपणे तपासावे ही विनंती.
--------------------
No comments:
Post a Comment