------------------
मी राशोमोनवर दुसरा भाग लिहून थांबलो होतो. पण मन शांत झाले नव्हते. आणि फेसबुकवर दुसऱ्या भागाच्या खाली, मंदार काळेंचा प्रतिसाद आला. त्याचा स्क्रीन शॉट खाली देतोय.
तुम्ही 'हरण्याऐवजी' ,'गमावणे' हा शब्द सुचवला आणि माझ्या मनातले विचार अजून स्पष्ट होण्यास मदत झाली म्हणून जे लेखन मी काल संपवले होते त्याचा अजून एक धागा लिहावासा वाटला. मला आशा आहे की ह्या धाग्यातील विचारावर कमेंट केल्यास मी अजून काही लिहित राहीन अशी भीती तुम्हाला वाटणार नाही.
भाग २ मध्ये चित्रपटावर माझे मत मांडताना मी राशोमोनचा खरा नायक भिक्षू आहे असे मला वाटते ते लिहिले होते. त्याचा मुद्दा तुम्ही सुचवलेल्या 'गमावणे' मुळे अजून स्पष्ट झाला. राशोमोन म्हणजे नगराचे द्वार. जे आता भग्न अवस्थेत आहे. दारही भग्न आतील नगरही भग्न. निसर्गाच्या लहरीपणाविरुद्ध मानवाच्या विजयाचे प्रतीक म्हणजे सुव्यवस्थित नगर. नगराच्या आत मानवाने वसवलेला संस्कृतिपूर्ण समाज. नगराभोवती बांधलेली संरक्षक दगडी भिंत. आणि त्या संस्कृतिपूर्ण शहरात प्रवेश करण्यासाठीचे द्वार म्हणजे राशोमोन. जंगल आणि शहराला वेगळी करणारी भिंत आणि त्या भिंतीतून शहरात प्रवेश करण्यासाठी असलेले द्वार म्हणजे राशोमोन. निसर्गावर विजय मिळवत माणूस नगरे वसवण्यात उत्तुंग यश मिळवतो. या नगरात जंगलाला प्रवेश नाही. अव्यवस्थित, अनियंत्रित, अक्राळ विक्राळ जंगल नगरच्या बाहेर ठेवण्यात माणूस यशस्वी होतो. नगरात सुरचित रस्ते, सावली देणारी झाडे सगळं कसं अगदी सुव्यवस्थित. माणसाची ही निसर्गावर मात करणारी थक्क करून सोडणारी प्रवृत्ती अनेक कवींना प्रेरणा देणारी. मानवाचा जन्म निसर्गाच्या निरर्थक, अनियमित आणि निर्हेतुक जगात व्यवस्था निर्माण करण्यासाठी झालाय असा आशावाद देऊन आपल्या जन्माला हेतूची जोड देणारी हे प्रवृत्ती कवींना माणसावर, त्याच्या आयुष्यावर, त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा अशी सुखद कल्पना करू देते.
पण निसर्ग आणि त्याची अनियमितता, जंगल आणि त्याची अव्यवस्था कदाचित राशोमोन मधूनच नगरात शिरते. हे जंगल गर्द झाडाझुडपांचे नव्हे आणि हे नगर रस्ते आणि घरांचे नव्हे. हे जंगल आहे ते आपल्या नकळत आपल्यावर राज्य करणाऱ्या शारीर वासनांचे आणि हे नगर आहे माणसाने माणसाशी कसे वागावे ते ठरवणाऱ्या समाजनियमांचे. एक छोटीशी वाऱ्याची झुळूक येते आणि झाडाखाली झोपलेल्या ताजोमारूला प्रत्यक्षात अतिसुंदर नसलेल्या स्त्रीचा मोह पाडते. मोह देखील असला की तिचा उपभोग तो एकांतात घ्यायच्या ऐवजी तिच्या बांधून ठेवलेल्या नवऱ्यासमोर घेतो. जंगल ताजोमारूमध्ये शिरते. जंगल ताजोमारूच्या रूपाने स्त्रीच्या आणि सामुराई च्या आयुष्यात शिरते. त्यांची झटापट पाहणाऱ्या आणि शेवटी खंजीर उचलून घेणाऱ्या लाकूडतोड्यामध्ये शिरते. त्या सर्वांचे सुव्यवस्थित आयुष्य गिळंकृत करते आणि आत्तापर्यंत कमावलेले त्यांचे संस्कारांचे नगर गमावून बसतात. ताजोमारू, अजिंक्य दरोडेखोराची कीर्ती आणि शिक्षेनंतर प्राण दोन्ही गमावतो. सामुराई, गौरव आणि प्राण दोन्ही गमावतो. स्त्री, शील आणि नवरा दोन्ही गमावते तर लाकूडतोड्या खंजीर उचलून, खोटी साक्ष देऊन मन:शांती गमावतो.
आपल्यातल्या पशूला कसे सांभाळायचे आणि त्याला पुन्हा संस्कारांच्या नगरीत कसे आणायचे ते न कळल्याने त्यांची कृत्य त्यांच्या स्वभावाविरुद्ध होऊ लागतात आणि त्या कृत्यांना त्यांनी लावलेले अर्थ वेगवेगळे होऊ लागतात. जे झाले ते समर्थनीय संस्कारांच्या कक्षेत बसवण्याचा त्यांचा अट्टाहास सुरु होतो आणि ते सत्यकथनाच्या ऐवजी सत्योत्पादनाच्या मागे लागतात.
ताजोमारू : स्त्री लढाऊ होती, माझ्या पौरुषाला आव्हान देणारी होती, सामुराई शूर होता, मी त्याला वीराचे मरण दिले असले सत्य गुंफतो.
स्त्री : स्वतःला अबला, परपुरुषाकडून बलात्कारित झाल्यामुळे नवऱ्याने झिडकारल्याने मूर्च्छित होणारी आणि संपूर्ण घटनेत शरीराने आणि मनाने जखमी झालेली व्यक्ती असले सत्य गुंफते.
सामुराई : स्त्री नालायक होती, तिला मीच काय ताजोमारूने देखील झिडकारले आणि मी सामुराई परंपरेचा निर्वाह करीत मृत्यू पत्करला असले सत्य गुंफतो.
लाकुडतोड्या : ताजोमारूची नागरी गृहस्थ आयुष्य जगण्याची इच्छा, त्यासाठी पापाने कमावलेला पैसा नको असेल तर सरळ काम करण्याची इच्छा, आणि त्यायोगे ताजोमारू, स्त्री आणि सामुराई च्या प्रसंगात जो राहून गेला तो खंजीर आपल्या नागरी जीवनाला आधार देण्यासाठी उचलण्याच्या स्वतःच्या कृतीचे समर्थन करतो.
यात अजून एक गोष्ट लक्षात येते. की ताजोमारूला, स्त्रीला आणि सामुराईला त्यांनी एकमेकांनी सांगितलेले सत्य वेगवेगळे का आहे ? सत्याचे खरे स्वरूप काय?, हे प्रश्न पडतंच नाही. हे प्रश्न पडतात ते फक्त लाकूडतोड्याला. “सगळे असे वेगवेगळे का बोलले?”, हा प्रश्न छळतो फक्त लाकूडतोड्याला. भिक्षूला देखील प्रश्न पडतो पण तो सत्याच्या स्वरूपाबद्दल नाही तर जंगलाने नगरावर, आदिम पशुतुल्य प्रेरणांनी संस्कृतीवर इतक्या सहज विजय मिळवल्यावर माणसावर विश्वास ठेवायचा कसा ?” अश्या स्वरूपाचा. माणूस, “मनातल्या जंगलावर कायम स्वरूपी नगर व्यवस्था तयार करू शकेल का?” हा प्रश्न त्याला छळतो.
भग्न राशोमोन हे मला त्या भिक्षूच्या मनाचे प्रतीक वाटते. त्याला माहिती आहे की त्या माणसाप्रमाणे अनेक जण त्याच्या बोलण्याला प्रवचन, फुकाची बडबड म्हणून हेटाळणार आहेत. म्हणून त्याला स्वतःच्या शब्द्दात प्राण फुंकण्यासाठी, आधी स्वतःला मानवावरचा आणि त्याच्या चांगुलपणावरचा विश्वास कमावणे महत्वाचे वाटते.
एक संस्कृती तिच्या चरम उत्कर्षापर्यंत पोहोचून जेंव्हा नामशेष होते, काही मूल्यांना शिरोधार्य मानून यशाची कमान चढलेले एक युग संपून जेंव्हा युगांत होतो, कोण चूक कोण बरोबर याचा निवाडा जेंव्हा कठीण होतो, किंबहुना सगळेच चूक आणि सगळेच बरोबर असे वाटून कुठलीही व्यवस्था बनणे जेंव्हा अशक्य होते, जेंव्हा माणसाला स्वार्थ, स्वतःला जगविणे, नवीन पिढीचा देखील विचार न करता त्यांच्या वाट्याचे देखील ओरबाडून खाणे अश्या पशुपेक्षाही खालच्या पातळीवर राहणेदेखील योग्य वाटू लागते, जेंव्हा राशोमोनची पडझड होते, जंगल आणि नगराची सीमा पुसली जाते, त्यावेळी यातूनही काही व्यवस्था निर्माण होऊ शकते असे विचार केवळ प्रचंड आशावादी आणि बेदरकार निर्णय घेऊन, सर्वव्यापी राखाडी रंगाच्या छटांमधून कोण शुभ्र धवल पांढरे, कोण मुळापासून कुट्ट काळे, असे वेगळे करणारा माणूसच करू शकतो. या निर्णयासाठी त्याला हवा असतो तो केवळ विश्वास. माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वास.
मग तो भविष्यात होणाऱ्या रामकथेचे वर्णन करून ठेवणारा महर्षी वाल्मिकी असो किंवा वर्तमानात घडणाऱ्या महाभारताला शब्दबद्ध करून ठेवणारा वेदव्यास असो किंवा भग्न क्योटो शहराच्या राशोमोन वर बसून माणसावर विश्वास कसा ठेवायचा त्या विचारात पडलेला भिक्षू असो.
वाल्मिकी किंवा त्यांच्या नावाखाली आपण सर्व, स्त्रीला अग्निपरीक्षा करायला लावणाऱ्या, राजाचे नागरिकांप्रती असलेले कर्तव्य पितृवचनाखातर टाळणाऱ्या, वालीला कपटाने मारण्यात सुग्रीवाला मदत करणाऱ्या आणि शेवटी जिच्यासाठी युद्ध करून प्रचंड संहार घडविला तिला केवळ धोब्याने काही बोलले गेले म्हणून गर्भारशी असताना वनात सोडून येणाऱ्या श्रीरामाला मर्यादापुरुषोत्तम ठरवतो आणि सोन्याची लंका वसवणाऱ्या शिवभक्त रावणाला स्त्रीलंपट ठरवून मोकळा होतो.
तीच गत व्यासमुनींच्या नावाने आपण लावलेल्या महाभारताच्या संगतीची. बीज क्षेत्र न्यायाने आणि नियोगाच्या समाजमान्य असणाऱ्या रुढींचे पालन न केल्याने ज्यांच्या कुरु कुलीन असण्यावर प्रश्नचिन्ह लागते, ज्यांच्यातील एकजूट केवळ एक स्त्री एकाच भावाला मिळाली तर भंगू शकते, जे भिल्लीणीच्या कुटुंबाला लाक्षागृहात आपल्या जागी जाळतात, जे द्यूत खेळताना स्वतःवरचा ताबा सोडून बसतात, जे खांडववनदाहाच्या वेळी मूळ स्थानिकांना हुसकून लावतात, जे स्वतःच्या गुरूला, पितामहांना इतकेच काय पण स्वतःच्या मामाला देखील युद्धासाठी स्वतःच्या पक्षात वळवू शकत नाहीत, त्यांना देवपुत्र ठरवून त्यांच्या मागे भगवान श्रीकृष्णाचे पाठबळ देवून; थोरल्या राजकुमारच्या थोरल्या राजपुत्राचा हक्क डावलून त्याला उर्मट, अहंकारी, अतिमानी आणि स्त्रीची मानखंडना करणारा ठरवून व्यासांच्या नावाखाली आपण मोकळे होतो.
या सर्व मोकळे होण्यामागे मला एक समान सूत्र दिसते ते म्हणजे; एक बाजू घेतली, एक मूल्य महत्वाचे ठरवले, एक वृत्ती घातक ठरवली की पुन्हा संस्कृतीरूपी नगर वसवण्याचे काम सुरु करता येते. मग त्या बाजूने ते मूल्य खरोखरच शिरोधार्य मानले असो किंवा नसो, त्यांची वर्तणूक त्या मूल्याचे चालते बोलते जिवंत स्वरूप असो किंवा नसो.
राशोमोनच्या भिक्षूपुढचा प्रश्न अजूनच गुंतागुंतीचा ठरतो कारण लाकुडतोड्या सोडल्यास जंगलाने नगरावर केलेल्या त्या घटनेतले कोणीच बाके राहिलेले नसते. सामुराई मरतो, स्त्री नाहीशी होते, ताजोमोरूला शिक्षा होते. उरतो तो फक्त लाकुडतोड्या. त्यानेपण साक्ष खोटी दिली हे कळल्याने भिक्षू अजूनच गोंधळात पडतो. आता पुढची संगती लावायची कशी? चांगले मूल्य म्हणायचे कशाला ? आणि वाईट वृत्ती म्हणायची कोणती? भिक्षू भोवती चे सगळे राखाडी रंग काळ्या रंगाकडे झुकत चाललेले. म्हणून तो भविष्याला कुशीत घेऊन सांभाळून उभा असतो. आणि मग ज्या क्षणी लाकूडतोड्या पांढऱ्या रंगाकडे झुकण्याची थोडी तयारी दाखवतो ती भिक्षूसाठी सुटकेची वेळ ठरते. खंजीर उचलणारा लाकूडतोड्या, मानवच्या चांगुलपणाचे प्रतीक ठरतो. सामुराई, ताजोमारूआणि स्त्री एक दु:स्वप्न ठरतात आणि किमोनो घेऊन पळणारा तो माणूस ठरतो - खलनायक.
कदाचित राशोमोन चित्रपट दोन गोष्टींच्या एकत्रीकरणातून तयार झालाय त्यामुळे असेल पण तुम्हाला जाणवलेल्या सत्य प्रकटीकरणाच्या मर्यादेच्या कथेत मला राखाडी रंगाच्या एका छटेला पांढरा आणि बाकी सर्वांना काळ्या रंगात रंगवून आपल्या संस्कृतीरूपी नगरीवर होणाऱ्या आदिम शारीर प्रेरणांचे आक्रमण थोपवण्याची माणसाची मर्यादा जाणवली. किंवा कदाचित एकाच जंगलात, एकाच प्रकाश स्त्रोतापासून येऊन माझ्यावर पडलेले कवडसे तुमच्यावर पडलेल्या कवडशांपेक्षा थोडे वेगळे निघाले असे वाटते.
जरी मला कवडशांनी थोडे वेगळे सत्य दाखवले असले तरी तुम्हाला खुळावणाऱ्या राशोमोनने मला देखील तितकेच खुळावले हेच खरे.
------------------
No comments:
Post a Comment