भाग १ । भाग २ । भाग ३ । भाग ५ । भाग ६ । भाग ७ | भाग ८
--------------------
मग गुरांचा मालक म्हणजे गुराखी, जमिनीचा मालक हाच त्या जमिनीवरच मजूर हे समीकरण बदलण्यास सुरुवात झाली. स्वतःची गुरे नसताना केवळ गुराख्याचे काम करणाऱ्या किंवा स्वतःची जमीन नसताना शेत कसणाऱ्या, कुठलाही मालकी हक्क न सांगणाऱ्या गुलामांबरोबर, कामगार लोकांचा गट तयार होऊ लागला. अश्या तऱ्हेने मालमत्ताधारक, विनामोबदला काम करणारे गुलाम आणि ठराविक मोबदल्यावर काम करणारे कामगार असे तीन वर्ग तयार करून भांडवलशाही आपला शिक्का गडद करू लागली.
---------------------
--------------------
भांडवल तयार होण्याची सुरुवात
सध्या प्रचलित असलेली भांडवल तयार होण्याची, बचत >> गुंतवणूक >>भांडवल ही साखळी, या आदिम टोळ्यांच्या आणि कुटुंबांच्या आणि भांडवलशाहीच्या उदयाच्या काळात अस्तित्वात असणे शक्यच नव्हते. पैशाचा उगम व्हायचा बाकी होता. जमीन आणि पशुधन हिच उत्पादनाची साधने होती म्हणजे तेच भांडवल होते. मग "सबै भूमी गोपालकी"च्या त्या काळात जो जितकी जमीन लागवडीखाली आणेल, आणि जितक्या जास्त गुरांना माणसाळवू शकेल तेच त्याचे भांडवल बनू लागले. आणि त्याच्या मृत्यूनंतर ते संचित भांडवल त्याच्या वंशजांचे भांडवल बनू लागले.
उद्योग गुंतागुंतीचे नव्हते. निसर्गावर अवलंबून रहाणारे होते. उद्योगासाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे "जमीन", मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी निसर्ग कार्यरत होता. त्यामुळे आधी भांडवल उभारावे, त्यातून मालमत्ता खरेदी करावी आणि मग त्यातून उद्योग सुरु करावा हा सध्या प्रचलित असलेला मार्ग त्या काळात गैरलागू होता. याउलट, आधी उद्योग करण्याची इच्छा, मग त्यासाठी जिथे सुपीक जमीन आणि मुबलक पाणी मिळेल तिथे स्थलांतर, मग त्या जमिनीवर वसाहत, मग पशुपालन, अशी मालमत्तेची निर्मिती होत होती. या मालमत्तेच्या संचायातून मग भांडवलाची निर्मिती असा आजच्या दृष्टीने उलटा प्रवास त्या काळी चालू होता. पैसा महत्वाचा ठरण्या आधीच्या काळात देखील भांडवल तयार होत होते आणि ते उद्योगातून जन्म घेत होते. भांडवलाच्या जन्माच्या / निर्मितीच्या ह्या प्रक्रियेत अधिक उद्यमशील किंवा लढवय्ये असणारे लोक पहिले भांडवलदार ठरले, तर त्यांचे वंशज भांडवलदार म्हणूनच जन्माला आले.
कुटुंबसंस्थेचा उदय आणि तिचे भारतातील वेगळेपण
गर्भधारण आणि त्यानंतर मुलांचे संगोपन करण्याची उपजत क्षमता यामुळे प्राथमिक अवस्थेत कुटुंबव्यवस्थेचे स्वरूप स्त्रीकेंद्रित किंवा मातृसत्ताक होते. आणि त्याशिवाय भटक्या लोकांच्या पुरुषसत्ताक टोळ्या देखील होत्या. मातृसत्ताक पद्धतीमध्ये स्त्री स्थिर आणि पुरुष संचारी अशी व्यवस्था असते. मुले आणि मुली आपल्या आईच्या-मामाच्या घरी राहतात. पुरुष स्वतःच्या सासरी येउन जाउन असतो. घरातील स्त्रियांचे आपसातील नाते आई, बहिण, मावशी या स्वरूपाचे असते. या व्यवस्थेमुळे कुटुंबाचा आकार वाढतो आणि तो शेतीला आवश्यक ते मनुष्यबळ पुरवू शकतो. याउलट पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये पुरुष स्थिर आणि स्त्री संचारी अशी व्यवस्था असते मुले आणि मुली आपल्या वडिलांच्या-काकांच्या घरी राहतात. स्त्री सासरी येते, कायमची. घरातील स्त्रियांचे आपसातील नाते सासू-सून, नणंद - भावजई, जावा-जावा असे असते. यामुळे कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण थोडे अधिक असते. कुटुंबाचा आकार मर्यादित राहतो. आणि शेतीपेक्षा पशुपालनास तो जास्त उपयुक्त असतो.
जगाच्या बऱ्याचश्या भागात पुरुषसत्ताक टोळ्यांनी स्त्रीसत्ताक कुटुंबांवर निर्णायक विजय मिळवला. त्यामुळे पाश्चात्य जगात कुटुंबव्यवस्था टोळीइतकीच तकलादू राहिली. आणि तिच्यावर टोळीचे किंवा बाह्य समाजाचे कायम वर्चस्व राहिले. तिथला कुटुंब हा एकक भारतीयांच्या तुलनेत बराच ठिसूळ राहिला. लग्न हा सामाजिक उपचार राहिला. कुटुंबाचा आकार बहुतांशी छोटाच राहिला.
बहुतांश जगात पुरुषसत्ताक विरुद्ध स्त्रीसत्ताक असा संघर्ष चालू राहिला असला तरी, भारतात मात्र, मूळच्या स्त्रीसत्ताक आणि बाहेरून आलेल्या आक्रमकांच्या पुरुषसत्ताक पद्धतीत संकर होत राहिला. आणि त्यातून जन्माला आली एक संकरीत कुटुंबपद्धती. जी पुरुषसत्ताक होती, तिच्यात विभक्तीच्या वाटा खुल्या होत्या तरीही त्यातील अनेक कुटुंबे पिढ्यान पिढ्या अविभक्त रहात होती. त्यामुळे, कुटुंबाचा गाडा कसा चालेल ? एकाच छताखाली अनेक पिढ्या कश्या नांदतील? पुढील पिढीत ज्ञानाचे संक्रमण कश्या प्रकारे होईल? आणि मागील पिढी निवृत्त कधी आणि कशी होईल? हे प्रश्न भारतात महत्वाचे ठरले. प्राचीन भारताने पाश्चात्यांच्यापेक्षा अधिक दूरचा विचार करत, चार आश्रमांची निर्मिती करून कुटुंबव्यवस्था म्हणजे दीर्घकाळ टिकू शकणारी एक स्वचालित व्यवस्थाच तयार करून दाखवली.
अनुत्पादकांच्या प्रश्नाचा उदय
ठिसूळ किंवा स्वचालित कुठल्याही प्रकारच्या कुटुंबव्यवस्थेत, स्थिर जीवन आणि स्थावर मालमत्तेचा परिणाम म्हणून आयुर्मान वाढते. जन्माचा वेग वाढतो तर मृत्यूचा वेग मंदावतो. परिणामी मुलांची आणि वृद्धांची संख्या वाढू लागते. माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहक असतोच पण वृद्ध आणि मुले, अनुत्पादक किंवा अल्प-उत्पादक ग्राहक असतात. कुटुंब व्यवस्थेने टोळी आणि सदस्य या सरळ नात्यात कुटुंब हा नवा घटक आणल्याने, टोळीतील वृद्ध आणि मुले आता कुटुंबातील वृद्ध आणि मुले बनतात. त्यांची जबाबदारी आता टोळीकडून कुटुंबाकडे येते. आणि मग काही नवे प्रश्न समोर येऊ लागतात.
- वस्तूंचे वाटप कसे करायचे? आणि वस्तू पण कश्या? निसर्गतः तयार झालेल्या आणि आपण फक्त गोळा करून आणलेल्या नव्हे, तर आपण उत्पादन केलेल्या वस्तू.
- श्रमानुसार मोबदला की गरजेनुसार मोबदला?
असे टोळीमध्ये सहसा पडत नाहीत आणि पडल्यास टोळी फोडून किंवा हिंसेने सोडवले जातात. पण कुटुंब तयार झाल्यावर हे प्रश्न थोडे जटील स्वरूप धारण करतात. जटील अश्यासाठी की कुटुंबात हिंसा समर्थनीय नसते आणि कुटुंब फोडणे देखील तितकेसे सोपे नसते. प्रेम, वात्सल्य या नैसर्गिक भावना आणि टोळीमुळे तयार झालेली जबाबदारी, कृतज्ञता, बांधिलकी ही मूल्ये वापरून, अश्या अनुत्पादक आणि अल्पउत्पादक ग्राहकांना देखील कुटुंबात सामावून घेतले जाते. म्हणजे अनुत्पादक आणि अल्पउत्पादक घटकांना सामावून घेणारी कुटुंब व्यवस्था समाजवादीच असते असे म्हणावे लागेल.
मालक नसलेल्या कामगाराचा उदय
कुटुंबाचा आकार वाढल्यावर, कामाचे, सश्रम - श्रमविरहित, कौशल्यपूर्ण - कौशल्यविरहीत असे वर्गीकरण होते. श्रम आणि कौशल्य विरहित कामे लहान मुलांकडे, तसेच कमी श्रमाची कामे वृद्धांकडे जाऊ लागतात. मग निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आणि वाढत्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त उत्पादनाची गरज भासू लागते. त्यासाठी अधिकचे पशुधन, अधिकची शेत जमीन आणि त्यांना सांभाळण्यासाठी, कसण्यासाठी मनुष्यबळ लागते. घरातील मनुष्यबळ अपुरे पडते.
म्हणजे, निसर्गासमोरची हतबलता हे एकट्या माणसांनी टोळ्या बनविण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण होते. टोळीने माणसाला जीवनसंघर्षात टिकून राहण्यास मदत केली. टोळीने शिकार करायला शिकवले. ती शिकार वाटून खायला शिकवले. टोळीने पशुपालन शिकवले. टोळीने शेती शिकवली. टोळीने लहान मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्यायला शिकवले. टोळीने, टोळीतला तो आपला आणि टोळीबाहेरचा तो परका असा भेद करायला शिकवले. टोळीने युद्ध करायला शिकवले. टोळीने जिंकलेल्यांना गुलाम करायला शिकवले. टोळीने कुटुंब व्यवस्था निर्माण होण्यास मदत केली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे टोळीने उद्योगातून भांडवल तयार करून दाखवले. उद्योग >> मालमत्ता >> संचित मालमत्तेचे टोळीच्या पुढील पिढीसाठी भांडवल अशी रचना अस्तित्वात आली. हळू हळू टोळीचा माणसावरील प्रभाव कमी होऊन त्याऐवजी कुटुंबाचा प्रभाव वाढू लागला. सुखाची लालसा तर नैसर्गिक होतीच पण ते थोड्या फार प्रमाणात मिळू लागल्यावर त्याच्या सातत्याची गरज भासू लागली. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेने जगभरातील मानव समूहांवर आपला पगडा बसविला. माणसे टोळीचा घटक म्हणून काम करण्याऐवजी कुटुंबाचा घटक म्हणून काम करू लागली. वृद्ध, लहान मुले आणि अपंगांच्या काळजीची जबाबदारी टोळीकडून कुटुंबाकडे सरकली. आणि उद्योगातून भांडवल बनण्याच्या त्या दिवसात कुटुंबामुळे उद्योग आणि उद्योगासाठी कुटुंब अशी एक वर्तुळाकार साखळी तयार झाली. माणसाच्या जीवनाला श्रेयस आणि प्रेयस अश्या दोन्ही प्रकारचे प्रयोजन मिळाले. आणि आपल्या कुटुंबातील अनुत्पादक माणसाच्या गरजा भागविण्यासाठी परक्या उत्पादक माणसाच्या श्रमांना वापरणे आवश्यक होऊन बसले.
टोळीतून मानवसमूहांची वाटचाल कुटुंब व्यवस्थेकडे झाली याचा अर्थ असा नव्हे की, सगळ्या माणसांनी आपापले कुटुंब बनवायला सुरवात केली. पण ज्यांना मालमत्ता उभारायची आहे त्यांना त्यासाठी कुटुंब ही एक सुयोग्य व्यवस्था ठरली. ज्यांनी आपापली कुटुंबे बनवली त्यांना आपल्या सुखाच्या सातत्यासाठी इतर अनेकांचे श्रम वापरायचे असल्याने अश्या इतरांनी कुटुंबे न बनवणे अधिक फायद्याचे होते. त्यामुळे गुलामांना कुटुंबे बनविण्याचा हक्क नाकारला गेला. त्यांची अवस्था इतर पाळीव प्राण्यांच्या पातळीवर नेण्यात आली. जगण्यासाठी आवश्यक तितकेही न देता केवळ शस्त्र बळाचा वापर आणि हिंसेबद्दल अपार प्रेम या दोन गोष्टी वापरून गुलामीची शोषणकारी व्यवस्था शहरराज्यांच्या (city-states) प्रगतीस कारणीभूत ठरली.
गुलाम काम करत होते पण तो विनामोबदला. पाळीव प्राण्यांसारखे. म्हणून त्यांना कामगार म्हणणे योग्य ठरणार नाही. पण गुलामांकडून कामे करून घेणाऱ्या आणि विशिष्ट प्रकारचे कौशल्य अंगी असणाऱ्या लोकांचा एक वर्ग हळू हळू तयार होत चालला होता. यातील काही स्वतःची कुटुंबे राखून होते तर काही एकेकटे राहण्यात खूष होते. या सर्वांमधील समान सूत्र म्हणजे ते टोळी सदस्य असल्याने गुलाम नव्हते. त्यांच्या अंगी शेती किंवा पशुपालानास उपयोगी असे एक तरी कौशल्य किंवा त्यासाठी भरपूर मोकळा वेळ होता. आणि त्यांना शेतीची किंवा गुरांची मालकी राखण्यात रस नव्हता. हे सर्वजण, उद्योगी कुटुंबाला आपले कौशल्य किंवा वेळ मोबदल्याच्या बदल्यात देण्यास तयार होते. हे पहिले कामगार होते. आपल्या श्रमातून तयार झालेले संपूर्ण उत्पादन हा मोबदला त्यांना महत्वाचा महत्वाचा वाटत नव्हता. त्याउलट, कामाआधी ठरवलेला आणि उत्पादनाच्या पटीशी संबंध नसलेला मोबदला त्यांनी काम करण्याचे कारण होता.
मग गुरांचा मालक म्हणजे गुराखी, जमिनीचा मालक हाच त्या जमिनीवरच मजूर हे समीकरण बदलण्यास सुरुवात झाली. स्वतःची गुरे नसताना केवळ गुराख्याचे काम करणाऱ्या किंवा स्वतःची जमीन नसताना शेत कसणाऱ्या, कुठलाही मालकी हक्क न सांगणाऱ्या गुलामांबरोबर, कामगार लोकांचा गट तयार होऊ लागला. अश्या तऱ्हेने मालमत्ताधारक, विनामोबदला काम करणारे गुलाम आणि ठराविक मोबदल्यावर काम करणारे कामगार असे तीन वर्ग तयार करून भांडवलशाही आपला शिक्का गडद करू लागली.
---------------------
No comments:
Post a Comment