--------------------
३ ऑक्टोबर २०१५ ला सकाळी १०:०९ ला फेसबुक नोटिफिकेशन आले. "Mandar Kaleमेन्शंड यू इन अ कमेंट."
ग्रीस प्रश्न, याकूब फाशी प्रकरण, त्याकाळचे जुनिअर आणि नंतर जुलिअन झालेल्या ब्रह्मेंच्या भिंतीवर मी चालवलेली दंगामस्ती आणि मसान चित्रपटाचे त्यानी २५०० शब्दांत केलेल्या रसग्रहणावर मी आगाऊपणाने केलेली दीर्घ कमेंट या साऱ्यांमुळे मंदार काळेंशी फेसबुक संपर्क वाढला होता. तोपर्यंत मी त्यांना मंदार काळे म्हणूनच संबोधित असे. पण नोटिफिकेशन उघडले आणि तेंव्हापासून मराठी आंतरजालाचे "म्हातारबाबा" आणि माझ्यासाठीचे "मंदार काळे" भूमिका बदलून स्वतःहून "काळे गुरुजी" या नव्या भूमिकेत शिरले.
राशोमोन या चित्रपटाचे त्यांनी लिहिलेले ८ भागांचे रसग्रहण वाचण्याची आज्ञा, "Anand More तुला हे वाचणे मस्ट आहे. पन्नास मार्कांचा पेपर देणार आहे नंतर. smile emoticon" अश्या शब्दात केली होती. मी १०:१० ला पेपर सुरु केला आणि या रमतरामाच्या विश्रांतीस्थळी पोहोचलो. राशोमोन चा अवघड पेपर ४ ऑक्टोबरला संपवला. (अजून गुरुजींनी त्यावर मार्क दिलेले नाही आहेत, याचा अर्थ पेपर माझ्यासाठी अवघड असल्याने माझी उत्तरे असंबद्ध झाली असावीत हे कळण्याइतपत मी हुशार असल्याने आणि झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीवर पूर्ण विश्वास असल्याने, नंतर मी पण त्यांना मार्कांसाठी त्रास दिला नाही). पण त्याचवेळी माझी नजर ११ भागांच्या दुसऱ्या एका लेखमालेवर पडली होती. नाव होते, "समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने". (मूळ लेखमालेसाठी इथे क्लिक करा)
वेळ मिळेल तेंव्हा वाचू म्हणत २०१५ संपले. आणि काल वेळ मिळाला. म्हणून मग गुरुजींनी पेपर द्यायच्या आधी स्वत:च सगळे भाग एका बैठकीत वाचून काढले. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचा विजय झाला. काँग्रेस सोबत आम आदमी पक्षाचा पण धुव्वा उडाला. आम आदमी पक्षाला साथ सोबत देणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांचा, समाजवादी विचार मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यावर चिंतनात्मक आणि परखड विचार मांडणारी ही दीर्घ लेखमाला लिहिल्याबद्दल काळे गुरुजींचे एकाच वेळी आभार आणि अभिनंदन. संख्याशास्त्रातील डॉक्टरेट घेतलेला हा माणूस जितक्या तरलतेने चित्रपटाचे रसग्रहण करतो, तितक्याच ठामपणे राजकीय, सामाजिक आणि वैचारिक विषयांवर नम्र पण अधिकारवाणीने किती सुसंगत लिहू शकतो ते अनुभवायचे असेल तर ही लेखमाला वाचायलाच हवी.
लेखमाला वाचताना एक गोष्ट जाणवली की या लेखमालेत वाचकाला समाजवाद काय आहे? ते माहिती असेल असे गृहीतक आहे. आणि काळे गुरुजींचे लेख वाचणाऱ्या सर्वांना ते माहीत असणारच हे सत्य आहे. पण माझ्या व्यवसायात मी नुकतीच शाळा संपवून आलेल्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी CA झालेल्या साधारणपणे १६ ते ३० च्या वयोगटातील लोकांना भेटतो. तेंव्हा समाजवाद - साम्यवाद या संकल्पना, भारतीय राजकारणातील लोहिया, रॉय प्रभूतींनी समाजवादाचा लावलेला अर्थ माहित असलेले लोक फारच कमी आढळतात.
तेंव्हा काळे गुरुजींना याबाबतही एक लेख लिहा असे सांगावे असा विचार मनात आला. पण, "मी का म्हणून लिहू? इच्छा असेल तर शोधेल वाचक त्यांचा अर्थ" अश्या अर्थाचे एखादे उत्तर ते देतील पण नंतर पुन्हा हे काम करायचे आहे अशी नोंद त्यांच्या रोजनिशीत करून ठेवतील अशी शक्यता असल्याने त्यांच्या व्यस्त दिनक्रमात त्यांना अजून त्रास न द्यावा या इच्छेने मीच जे काही अल्प स्वल्प मला समजले ते लिहावे या इराद्याने लिहायला बसलो आहे.
या विषयावरचा माझा अधिकार आणि अभ्यास किती कमी आहे ते मला माहित आहे पण अश्या प्रकट लेखनामुळे नवीन समविचारी मित्र मिळावेत ही इच्छा आणि "जेंव्हा विद्यार्थी तयार होतो तेंव्हा शिक्षक अवतरतो" या अवतरणावर विश्वास असल्याने माझे मडके किती कच्चे आहे ते कळल्यास माझा शिक्षक अवतरेल याची खात्री असल्याने पुन्हा पुन्हा सुटणारा धीर धरून ठेवून मनातले विचार मांडू शकीन अशी आशा आहे.
--------------------
--------------------
No comments:
Post a Comment